प्रिय फेडी...

Submitted by विशाल कुलकर्णी on 1 February, 2017 - 22:40

प्रिय फेडी,

फेअरवेल वगैरे नाही रे. आणि तुझ्याबद्दल टेनिसप्रेमींना नव्याने काही सांगायचीही गरज नाहीये. इथे तुझ्या कारकिर्दीचा प्रत्येक आकडा तोंडपाठ असलेले टेनिस वेडे आहेत. पण आज उगाचच वाटलं की तुझ्याशी बोलावं. आपल्या आवडत्या खेळाडूचे कौतुक करणे आम्हा भारतीयांना अतिशय आवडते. मग तो खेळाडू तेंडल्या असो, द्रविड असो सायना असो वा धनराज असो, किंवा मग जयसुर्या, लारा, रिचर्ड्स नाहीतर अजून कोणी. टेनिसच्या बाबतीत मात्र आम्हाला आमच्या पेस, भूपती, रमेश कृष्णन किंवा अमृतराज बंधू आणि सानियापेक्षा बोर्ग, एडबर्ग, बेकर, अगासी लेंडल, मेकान्रो, सांप्रास, राफा, जोकोविच, स्टेफी, मार्टिना, गॅबी आणि अर्थातच फेडी ही नावे जास्त जवळची, लाडकी असतात.

तुझ्या गेममध्ये तू मास्टर आहेसच. २००२ मध्ये मायामीला अगासीबरोबर झुंजताना तुला पाहिले तेव्हाच तुझ्या, तुझ्या खेळाच्या प्रेमात पडलो बघ. ती फायनल तू गमावलीस खरी पण अगासीसारख्या मातब्बर खेळाडूशी अगदी शांतपणे, तरीही आक्रमक खेळत दिलेली झुंज माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मात्र जिंकून गेलेली मित्रा.

मी खरेतर आगासीचा डायहार्ड फॅन. आमचा चित्ता या नव्या पोराचे कसे हाल हाल करतो हे बघायला म्हणून पॉपकॉर्न घेऊन बसलेलो. अर्थात ती मॅच अगासीनेच जिंकली. पण तुझ्या खेळाने अगासीबरोबर आम्हा लाखो टेनिसवेड्यांना सुद्धा जिंकून घेतले होते. अर्थात त्या आधीच्या विंबल्डन मध्ये सांप्रासला हरवून क्वाटर्स मध्ये प्रवेश करताना तू " सावध, मी आलोय " अशी चेतावणी दिली होतीस जगभरातल्या टेनिसरसिकांना. पण त्या वेळीही असे खूप वन डे वंडर्स असायचे त्यामुळे आम्ही दुर्लक्षच केले होते. पण अगासीबरोबरच्या तुझ्या त्या खेळाने आम्हाला 'रॉजर फेडरर' या नावाची दखल घेणे भाग पाडले. मग नेहमीप्रमाणे तुझा इतिहास खंगाळून काढणे झाले. तेव्हा लक्षात आले की हे वादळ बऱ्याच दिवसापासून हल्ल्याची तयारी करतेय. मी जर चुकत नसेन तर १९९९ च्या मार्सेलि ओपनमध्ये कार्लोस मोयाला धक्का देऊन आपल्या अश्वमेधाची सुरुवात आधीच केली होतीस तू. मायामीच्या त्या हातघाईच्या लढाईनंतर मात्र तुझे वारू चौखूर उधळले. त्यानंतर त्या विजयी अश्वाला लगाम लावणे मोठी अवघड गोष्ट होऊन बसली होती. २००३ च्या विबल्डनमध्ये मार्क फिलिप्पोसिसला आस्मान दाखवत आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम मिळवलेस आणि टेनिसच्या दुनियेला नवा सुपरस्टार मिळाला. अर्थात वर म्हणाल्या प्रमाणे असे वन डे, वन टाईम वंडर्स टेनिस जगताला नवीन नव्हते. पण तू तर सम्राट बनायच्या महत्वाकांक्षेने आला होतास. I am not just one another champion हे सिद्ध करायच्या हेतूने आलेला होतास. त्यानंतर रॉजर फेडरर हे नाव टेनिसप्रेमींसाठी परवलीचे नाव बनून गेले.

सात विंबल्डन, पाच ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यु एस ओपन आणि एक फ्रेंच ओपन, अठरा ग्रँडस्लॅम्स ? आणि हा दिग्वीजय करूनही फेडेक्स तोच २००२ मध्ये शांतपणे अगासीला झुंजवणारा सभ्य, सरळ माणूस होता. आता खेळात प्रचंड सुधारणा झालेली होती. आत्मविश्वास तर आधीपासून होताच पण आता त्यात अनुभवाची भर पडली होती. पण यशामुळे येणारा अहंकार, गर्व, उद्धटपणा याचा लवलेशही नव्हता. समोर होता तो, तोच जुना, प्रत्येक नव्या खेळाडुकडून सुद्धा सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रयत्नरत असलेला झुंजार रॉजर फेडरर.

२००४ साल तुझ्यासाठी स्पेशल भेट घेऊन आलं होतं. खरेतर आम्हा रसिकांना तू ते वेडं वर्ष भेट म्हणून दिलं होतंस. अठ्ठयाऐंशीमध्ये मॅट्स विलँडरने केलेल्या पराक्रमानंतर एका वर्षात सलग तीन ग्रँडस्लॅम जिंकणारा तू पहिलाच होतास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सफिन, विंबल्डनमध्ये रॉडीक आणि यु एस ओपनमध्ये हेवीटला नमवत तू एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीस.

फ्रेंच ओपन मात्र तुला कायमच हुलकावणी देत आलं. २००९ चा अपवाद वगळला तर अर्थात. पण यावेळेस तू सुदैवी होतास कारण समोर गेल्या चार वेळचा फ्रेंच ओपन विजेता, क्ले कोर्टचा बादशहा राफा नव्हता. राफाच्या दुर्दैवाने राफाला सोडरलिंगकडून दुर्दैवी, धक्कादायक पराभव पत्करावा लागला आणि फायनल्स मध्ये तुझ्यासमोर आला तो सोडरलिंग. ते बहुतेक नियतीच्या मनातही तुझ्या लिस्टमध्ये किमान एक तरी फ्रेंच ओपन असावे ही इच्छा असावी म्हणूनच. याच वर्षी तू टेनिस जगतातल्या अजून एका निर्विवाद बादशहाच्या विक्रमाशी बरोबरी करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेस. सांप्रासच्या १४ ग्रँडस्लॅम्स च्या विक्रमाची बरोबरी केलीस. याच स्पर्धेत बहुदा नोवोक जोकोविचची पनवती संपली आणि या नंतरच्या काळात त्याचा सुवर्ण काळ सुरु झाला.

२०१२ पासून बहुदा तुझा पडता काळ सुरु झाला असावा. खरेतर त्याला तुझा पडता काळ म्हणण्यापेक्षा राफा आणि जोकोविचचा चढता काळ असे म्हणावे लागेल. कारण फेडी अजून तसाच होता. एक शांत, संयमी लढवय्या. पण राफा आणि नोवॊकच्या जोडीला त्यांचं वय, त्यांचं तारुण्य होतं. टेनिस खेळाडूंचं आयुष्य फार फार तिसाव्या वर्षापर्यंत. मार्टिना एखादीच असते रे. पण कालच्या सामन्यात तू पुन्हा दाखवून दिलेस की Fedex is still the best.

अर्थात मला खात्री आहे की ही मॅच सुद्धा तू नेहमीप्रमाणे अजून एक मॅच हा दृष्टिकोन ठेवूनच खेळला असशील. कारण तुझ्यासाठी टेनिस हा श्वास आहे. व्यवसाय आहेच आहे पण तू त्याचा कधी धंदा होवू दिला नाहीस. साऊथ आफ्रिकेतील निराधार मुलांच्या शिक्षणासाठी , त्यांना खेळाचे व्यवस्थित प्रशिक्षण मिळावे म्हणून सदैव कार्यरत असणारे 'रॉजर फेडरर फाउंडेशन' याची साक्ष आहे. जगभर वेळोवेळी उभ्या राहिलेल्या नैसर्गिक आपत्तीना तोंड देण्यासाठी उभ्या राहिलेल्या फंड रेजिंग उपक्रमामध्ये रॉजर फेडरर हे नाव कायमच अग्रणी राहिलेले आहे. मैदानावर सम्राट बनून वावरताना मैदानाबाहेर मात्र तू कायम एक प्रेमळ पती, एक प्रेमळ बाप म्हणूनच दिसला आहेस.

आमच्या क्रिकेटच्या देवाचा, तेंडल्याचा सुपरहिरो सुद्धा रॉजर फेडररच आहे, यापेक्षा वेगळे अजून काय सांगावे? असे ऐकले की ही तुझी ऑस्ट्रेलियन ओपनमधली शेवटचीच मॅच होती. तुझी उणीव तर जाणवत राहिलंच पण ते ही कधी ना कधी होणारच ना? आनंदाची बाब ही की तुझी विक्रमाची पताका अशीच झळकवत ठेवण्याची परंपरा राफा, मरे, जोकोसारखे खंदे खेळाडू समर्थपणे पेलताहेत. कोण जाणे उद्या अजूनही कुणी नवा येईल. पण फेडी मात्र कधीच विस्मरणात जाणार नाही.

परवा राफाला नमवल्यानंतर तू म्हणालास की खरेतर हे ग्रँडस्लॅम आम्हा दोघांमध्ये विभागून द्यायला हवे कारण या विजयाचा हक्कदार राफा देखील आहे. मला खात्री आहे तू हे केवळ वरवरचे किंवा औपचारिकता म्हणून म्हटलेले नाहीयेस. असला दांभिक दिखाऊपणा तुझ्या स्वभावातच नाहीये. तेच तर देखण्या फेडीच्या सरळ आणि सभ्य स्वभावाचे खरे खुरे सौंदर्य आहे.

FB_IMG_1485928252839.jpg

जियो दोस्त, खूप आनंद दिलास आजवर. या पुढेही देत राहशील. आज ना उद्या कधीतरी निवृत्तही होशील. पण टेनिसप्रेमींच्या मनावर रॉजर फेडरर हे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेलेले आहे यात शंका नाही.

थँक्यू दोस्त, आजवर भरभरून दिलेल्या आणि यापुढेही तू देणार असलेल्या आनंदाबद्दल . थँक्यू व्हेरी मच !

तुझ्या लाखो करोडो पंख्यापैकी एक पंखा...

© विशाल विजय कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

2017 madhe ankhi ek slam nakki aahe fedex che... Djoker la final la harwun jinkawe hich iccha aahe...

आमेन Happy

छान....
आणि च्र्प्स यान्नी म्हटल्याप्रमाणे तो विजयी होवो हिच इच्छा....

च्रप्स यांनी रोमन लिपीत लिहिल्यामुळे आता माबोकर जाऊद्या पण फेडररलाही कळले असेल त्यांना काय म्हणायचे आहे ते! Lol

छान लिहिलेय.
माझे टेनिस ज्ञान आणि आवड सानिया मिर्झाच्या पलीकडे क्वचितच गेले आहे, पण तरीही लेख आवडला.

nadal che kautuk aahe pan...
nadal nasata tar fedex cha count 25+ asata nakkich...
Wimbeldon 2008 chi final mazyamate match of the century aahe...

Fedex cha ankkhi ek vaishishty - nadal, djoker wagaire sarkha kadhi 1st round la harla nahi Fedex. Class aahe....
harel tari SF kinva Final madhech... nahitar nahi...

अगदी अगदी च्रप्स ! नदाल बेस्टच आहे. पण फेडेक्स नंतर माझी पसंती जोकोविचला जास्त आहे. नदालचा संयम लवकर सुटतो, त्यामानाने जोको थंड आहे एकदम.
अर्थात हे बदल होत राहतातच. बोर्ग, मेकान्रोच्या साम्राज्याला बेकर, एडबर्ग, अगासी, लेंडल यांनी धक्का दिला. त्यानंतरचा काळ सांप्रासचा होता. मग फेडेक्स आला आणि आता नदाल, जोको, मरे , वावरीका यांचा जमाना आहे. पण खऱ्या अर्थाने सम्राट म्हणावे असे कमीच. उदा. बोर्ग, बेकर, सांप्रास त्यानंतर फेडेक्स ! या लोकांच्या खेळात कायम जे सातत्य होतं ते इतरांच्या खेळात नाही दिसत. लेंडल होता पण विबल्डनच्या बाबतीत तो कायम दुर्दैवीच ठरला.

छान लिहीले आहे.

फेडरर च्या प्राइम टाईम मध्ये मी टेनिस फॉलो करत नव्हते पुर्वीसारखं त्यामुळे फेडरर पूर्णपणे मनावर कोरला गेला नाही पण त्याच्या खेळातला एलिगन्स खरंच न भुतो न भविष्यती असाच जाणवत रहातो. कितीही अर्थपूर्ण शब्द वापरून लिहीलं तरी ते सूर्यापुढे काजवा प्रकारच होईल फेडरर करता Happy

>> Djoker la final la harwun jinkawe hich iccha aahe...

फेडरर प्रेमींचं हे अ‍ॅम्बिशन (?) इंटरेस्टींग आहे Happy