बनुताईंची ट्रीप

Submitted by एम.कर्णिक on 18 September, 2009 - 03:19

पन्हाळ्याची ट्रीप संपवुन जेव्हा बनुताई आल्या
खरचटलेल्या, विस्कटलेल्या तरिही 'एक्साइट्लेल्या'

क्काऽऽय आणी कित्त्ती मज्जा सांगावी सगळ्याना
म्हणून नव्हती उसंत बनूताईंच्या शब्दाना,

"कित्त्ती मज्जा केली म्हाइताय आम्ही ट्रीपमध्धे ?
येता जाता गाणी पण किति म्हटली बसमध्धे.

थंडी वाज्ली, कडकडून ग भूक पण लाग्लेली
टिफिन खाल्ल्यावर सगळ्यानी फिरायला सुर्वात केली

आई, हिस्ट्रीबुक मध्धे पण आहे पन्न्हाळा
कित्त्ती जागा दाखवल्या टीचरनी आम्हाला

सजा कोठडी नावाचे ग दगडी घर एक तेथे
संबाजीला बाबानि त्याच्या प्रिझनर ठेवले होते

अग, शिवाजी म्हाराज संबाजीचे बाबा होते
म्हण्तात संबाजीने त्यांचे काय्तरि ऐक्ले नव्हते

बाबा, संबाजीचे बाबा होते का हो वाईट ?
करत कशी होते मग वाइट लोकांशी ते फाईट ?

आजोबा, तिथं मोठ्ठा स्टॅच्यू होता बाजिप्रभूंचा
नाइ का तुम्मी गोष्ट त्यांची कितिदा सांगायचा?

आणि आई तिथं होता एक बुरुज पिसाटीचा
तबकवन गार्डन आणि विष्णूकुंडहि पाण्याचा

कुंड म्हण्जे वेल गऽऽ, डब्ल्यू ई एल्लेल् वेऽऽल
पाणी गार पण टीचर म्हटल्या ड्रिंकिंग् ला अन्वेल

आण्लय तिथनं तुझ्यासाठि मी कढिलिंबाचं झाड
वॉटरबॉटल्मध्धे ठेवलय पाणी ओतुन काढ

अग्ग, टाकू नको नं काठी ती आहे माझी तल्वार
फत्तेसिंगने दिले मला, ती शाळेत आहे मी नेणार"

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.

गुलमोहर: 

मस्त जमतेय हो कर्णिक बनुताई सिरीज. गम्मत वाटते वाचायला.
यावेळी फोटो नाही टाकलात बरं झालं, तुम्ही लिहीताय त्यातून आपोआप एक चित्र उमटतय मनात.

कसली सुरेख कविता मुकुंददा ! फ़ा.....र आवडली ! Happy

खरचटलेल्या, विस्कटलेल्या तरिही 'एक्साइट्लेल्या' >> Happy

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.>>> मान गये बनुताई को ! Happy

मी आर्याच्या बालपणीच्या काही गोष्टी जशा की तिची चित्रं,तिच्या अभ्यासाच्या वह्या,तिने मला घरातल्या घरात लिहिलेली पत्रं,तिच्या छोट्याश्या तोडक्या मोडक्या कविता आणि असंच काहीबाही जपून ठेवले आहे आणि ठेवणार आहे.तिला मोठेपणी दाखवायला.तशा तुमच्या बनुताईंवरच्या कविता ह्या मोठी झाल्यावर तिच्यासाठी तिच्या बालपणीच्या आठवणींचा एक अमूल्य ठेवा ठरणार आहे.ही कविता पण छान! परिक्षेनंतर आर्याला वाचायला देइन सगळे एकदम.

मस्तच आहेत बनुताई ... मजा येते खुप वाचायला. तुमच्या ( नाही आपल्या ) बनुताई अगदी डोळ्यासमोर दिसतात

कुंड म्हण्जे वेल गऽऽ, डब्ल्यू ई एल्लेल् वेऽऽल

सगळ्या लहान मुलांसारख्याच आईला शिकवतात
आजच वेळ मिळाला तर "आईला शिकवणे" यावरची कविता टाकनार आहे Happy

मस्तच नेहमी सारखी Happy
मी खरतर आज बाल विभागात डोकावले सकाळी तुमच्या बनु ताई दिसतात का बघायला

बोलुनबोलुन थकल्या तेव्हा झोपुन गेल्या ताई
झोपेतदेखिल तल्वार त्यांच्या हातातुन सुटली नाही.

खुप छान्...

स्मितागद्रेंना अनुमोदन... बालकवितांमधे पहिले बनुताईंना शोधतो

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. बनुताईना तुम्ही 'आपल्या' म्हणायला लागलात यातच तुमचं त्यांच्यावरचं प्रेम दिसलं आणि खूप बरं वाटलं. येतायत त्या भेटायला तुम्हाला पुन्हा एकदोन दिवसात. असाच लोभ कायम ठेवा त्यांच्यावर.