करंजी बकलावा किंवा करंजी बाकरवडी

Submitted by भरत. on 31 October, 2016 - 08:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा १ कप
करंजीचे सारण
तूप
साखर
वेलची पूड

क्रमवार पाककृती: 

करंजीच्या सारणाची कृती देत नाही. ते आपापल्या रीती.आवडीनुसार करून घ्यायचं. - पिठीसाखर वगळायची. आमच्याकडे बारीक रवा, सुकं खोबरं, पिठीसाखर, खसखस, तीळ, चारोळी हे उतरत्या प्रमाणात असतात.
मैद्यात मीठ आणि तुपाचं मोहन घालून घट्ट कणीक मळून घ्यायची.
आता त्याचे चपाती लाटता येतील एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. त्यांच्या लहान लहान पुर्‍या लाटून घ्या.
एका पुरीला एका बाजूने तूप लावा व ती बाजू मैद्यात घोळवा. याच प्रमाणे आणखी एक पुरी तूप लावून मैद्यात घोळवा. तुपाच्या बाजू मध्ये येतील अशा प्रकारे दोन्ही पुर्‍या एकमेकांवर ठेवा. आता बाहेरच्या बाजू मैद्यात घोळवून जमतील तितक्या पातळ चपात्या लाटून घ्या. दोन पुर्‍या एकत्र लाटल्याने व मध्ये तूप मैदा असल्याने जास्त पातळ लाटता येतील.
अशा प्रकारे सगळ्या जोडचपात्या लाटून घ्या.
आता मंद आचेवर या चपात्या हलक्याच शेकून घ्या. त्या चपात्या आपल्याला भाजायच्या नाहीत. तर फक्त वेगळ्या करायच्यात. बुडबुडे दिसू लागले की काढून घ्या आणि दोन्ही चपात्या वेगवेगऴ्या करा. या झाल्या आपल्या घरगुती फीलो phyllo शीट्स तयार.
थोड्याश्या पाण्यात मैदा मिसळून त्याची पेस्ट करा.
ओव्हन प्रिहिट करा.
आता चपातीची शेकलेली बाजू खाली राहील अशा प्रकारे ती पोळपाटावर/ वर्क सरफेसवर ठेवा.
त्यावर करंजीचे सारण एकसारखे पसरवा.
या चपातीची घट्ट गुंडाळी करा. मैद्याच्या पेस्टने नीट चिकटवून घ्या.
एका बेकिंग डिशला तूप लावून घ्या.
धारदार सुरीने या गुंडाळ्यांचे हवे त्या आकाराचे तुकडे कापा.
हे तुकडे बेकिंग डिशमध्ये ठेवा.
प्रत्येक रोलला तुपाचे ब्रशिंग करा.
१६० डिग्री से.वर ८-१० मिनिटे बेक करा.
बकलावा करंज्या बेक होताहेत तोवर गॅसवर एक वाटीभर साखर , ती बुडेल इतके पाणी यांचा एकतारी पाक करा. त्यात वेलचीपूड घाला.
बकलावा करंज्या बेक झाल्या की त्या गरम असतानाच त्यांवर हा पाक ओता.

karanjee.jpg

अधिक टिपा: 

आयडिया बकलाव्याची . पद्धत बाकरवडीची. म्हणून नाव कधी हे तर कधी ते.
मूळ कृतीत मैद्यासोबत थोडे कॉर्नफ्लोर होते.
मूळ कृतीत बेकिंग टार्ट पॅनमध्ये करायचे असे सांगितलेय म्हणजे तिचा बेस काढून जास्तीचा पाक वेगळा करता येईल.
ट्रायल करताना पहिल्या लॉटला चमच्याने पाकाचा अभिषेक केला. दुसर्‍या लॉटमध्ये एकेका बकलाव्याला पाकस्नान घडवले.

माहितीचा स्रोत: 
कलर्स गुजरातीवरच्या रसोई शोमध्ये स्मिता शाह यांनी दाखवलेला बकलावा. त्यात फिलिंग फक्त ड्रायफ्रुट्स आणि नट्सचा चुरा होता.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पारी रंगीत करता आली, तर आणखी छान दिसेल.
सारणातच पिठीसाखर घातली तर बेकिंग करताना काय होईल याची कल्पना नाही. अनुभवी मंडळीं सांगतीलच.

Very nice.

तिसर्‍या लॉटला सारणात थोडी पिठीसाखर घातली. कॅरॅमल झालं नाही. यावेळी राउंड बेकिंग ट्रे वापरला. ८ मिनिटांत परफेक्ट रोल तयार झाले.