श्रीखंड वडी

Submitted by सायु on 27 September, 2016 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चक्का = १ वाटी (घरी केला असेल तर छानच, नाही तर विकतचा ही चालतो)
साखर = पाउण वाटी
पीठी साखर = १/२ वाटी
जायफळ - विलायची पुड
केशरी रंग - १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

श्रीखंड वडी नाव जरी उच्चारले की आंबड गोड चव जीभेवर विरघळते...::)
माझ्या माहेरी, गणपतीत आणि नवरात्रात संध्याकाळच्या आरतीला, आई रोज वेगवेगळा प्रसाद करते. त्यात सगळ्यांच्या आवडीची श्रीखंड वडी तर हमखास असतेच. तरी आईचीच एक सोप्पी पाककृती ईथे देते आहे..

सगळ्यात आधी एका कढईत १ वाटी चक्का आणि पाउण वाटी साखर एकत्र करुन मंद आचे वर ढवळत रहा, अगदी थोड्याच वे़ळात पातळसर मिश्रण होईल.. गोळीबंद पाक होईस्तोर शिजवुन घ्या.. एका वाटीत पाणी घेऊन त्यात मिश्रणाची गोळी तयार होते आहे का ते बघा.. आता कढई खाली उतरवुन घ्या त्यात १/२ वाटी पीठी साखर, जायफळ विलायची ची पुड आणि चिमुट भर खाण्याचा केशरी रंग घाला.. सगळे मिश्रण नीट एकजिव करा.
एका ताटाला पालथ्या बाजुनी तुप लावुन हे मिश्रण पसरवा, आणि एक वाटीला पालथ्या बाजुनी तुप लावुन
एकसारखे थापुन घ्या, सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापुन घ्या..साधारण २० मी. वड्या छान सुटतात.. (हा वेळ पा.कृ मधे धरला नाहीये)

प्रसाद म्हणुन ही वडी खुप छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२-१३ वड्या होतात, आकारावर अवलंबुन आहे
अधिक टिपा: 

पीठी साखर वरुनच पेरावी, शिजवतांना नको.. त्यामुळे वडी छान खरपुस लागते..

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाककृती आणि सोपी सुध्दा आहे.

एका ताटाला पालथ्या बाजुनी तुप लावुन हे मिश्रण पसरवा, आणि एक वाटीला पालथ्या बाजुनी तुप लावुन ते
एक सारखे थापुन घ्या,>>>> हे माझ्या पालथ्या डोक्यावरून गेले आहे. पालथ्या ताटावर मिश्रण/पाक कसा पसरवणार?

आवनी अभार...माझी आजी सुद्धा करायची ह्या वड्या.
हेमा ताई धन्स, खरच सोप्या आहेत, नक्की करुन बघ..
नरेश धन्यवाद.. हे माझ्या पालथ्या डोक्यावरून गेले आहे. पालथ्या ताटावर मिश्रण/पाक कसा पसरवणार?++++
हे मिश्रण पातळ नसतं त्यामुळे खाली ओघळत नाही आणि असे पालथ्या ताटावर मिश्रण थापले की, वड्या छान कापता येतात..:)

अरे वा, सायु या माझ्या आवडत्या वड्या. घरी करता येतात असा कधी विचार च नाही केला, नेहेमी विकतच्याच खाल्ल्या आहेत. लहाणपणी आणि नंतर ही त्या गोल शेप च्या श्रीखंडाच्या वड्या पिकनिक ला जाताना मस्ट असायच्या. आता नक्की करुन बघेन Happy

सामी, मंजु ताई, साती सगळ्याना धन्स..
खुप सोप्या आहेत नक्की करुन बघा आणि फोटो पण द्या!!!
मंजु ताई दही दुधाच्या वड्या तसेच तुपाच्या वड्या सुद्धा आई करते..:) छानच लागतात.

माझी आत्या फार छान श्रीखंडाच्या वड्या करते. एकूणच वड्या हा प्रकार वरच्या इयत्तेचा असतो असं मला वाटतं. पण ही पाकृ वाचून सोपी वाटतेय. दिलेल्या प्रमाणात साखर घेतली तर वड्या खूप गोड होतात का?

गोळीबंद पाक होईस्तोर शिजवुन घ्या > हे असले काही वाचले की जाम कठीण वाटते सगळेच. पाकाचे प्रकार इथे कुणी लिहिले आहेत का?
जिज्ञासा म्हणाली तसे....वरच्या इयत्तेचा सिलॅबस वाटतो:-)

खुप छान आहे पाकृ.. श्रीखंडाची वड़ी नेहमी विकतचीच खाल्ली आहे.. छोटीशी गोल गोल.. घरी पण करता येईल हे कधी डोक्यातच आले नव्हते..☺

जिज्ञासा, निशा, माणिक सगळ्यांना धन्स..:)
श्रीखंडाची वड़ी नेहमी विकतचीच खाल्ली आहे.. छोटीशी गोल गोल.+++ माणिक त्या श्रिखंडाच्या गोळ्या..:)

पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी पिठी साखर म्हणजे एकूण सव्वा वाटी साखर...हे खुप जास्त गोड नाही का होणार?+++ नाही कारण चक्का जरा आंबटच असतो ना!

दही दुधाच्या वड्या तसेच तुपाच्या वड्या सुद्धा आई करते>>>>>>कृती टाका ना.++ देईन लौकरच.:)

सायु, छान पाकृ.
सामी, गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब टाकला तर तो न पसरता घट्ट रहायला हवा (अशी एकीव माहिती).