नमस्कार,
२०१६ चा सामाजिक उपक्रमाचा अहवाल आपल्यासमोर मांडत आहोत.
यावर्षी एकुण ८ संस्थांना मदत करण्यात आली.
पहिल्या आवाहनात दिलेल्या संस्थांच्या यादीतून बहुतेक सर्व इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व आवाहनात सांगितल्याप्रमाणे आपापली देणगी त्या संस्थेच्या खात्यावर थेट जमा केली. तसेच त्याबद्दल स्वयंसेवकांना कळवले.
त्यानंतर त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे ही कामे स्वयंसेवकांनी केली.
असं करताना आपण त्या त्या संस्थेच्या महत्वाच्या व तातडीच्या गरजेची शक्यतो पुर्तता होईल याकडेही शक्य तेव्हढं लक्ष दिलं गेलं.
सांगावयास आनंद वाटतो की या वर्षीदेखील उपक्रमाची माहिती वाचून मायबोलीचे सभासद नसलेल्या, किंवा मायबोलीवर केवळ वाचनमात्र येणाऱ्या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला. नियमीतपणे उपक्रमाचा भाग होणारे आपले देणगीदार, नवीन देणगीदार, मायबोलीकरांचे मित्र नातेवाईक अशा सगळ्यांच्या हातभारामुळे हा उपक्रम पुर्णत्वास जाऊ शकला आहे.
देणगीदारांकडून त्या त्या संस्थेत देणगी जमा करण्याचं काम पुर्ण झाले आहे. आवाहनात लिहील्याप्रमाणे त्या देणगीचा विनियोग देखील काही संस्थांनी केला आहे. काही संस्थांमधे विनियोगाचे काम अजून चालू आहे. त्यासगळ्याची माहिती खाली देत आहोत.
आपण यंदा एकूण ४,४४,८६१/- (रुपये चार लाख चव्वेचाळीस हजार आठशे एकसष्ठ मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो.
संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत :
1. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग : रु.४००००/- (रुपये चाळीस् हजार् मात्र) इतकी रक्कम देणगी दाखल देण्यात आली आहे. देणगी रकमेतून गावात सोलार दिवे वाटप करण्यात येणार आहेत. कातकरी मुलामुलींसाठी क्रिडा प्रशिक्षणाची सोय व व्यवस्था, तसेच त्या अनुषंगाने पोषक आहार म्हणून अंडी देता यावीत म्हणून कुक्कुटपालन केंद्र व्यवस्थापन व त्यायोगे मुलामुलींनाही कुक्कुटपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण इत्यादीसाठीही या निधीचा वापर करण्यात आला आहे
2. शबरी सेवा समिती, ता. कर्जत : गरजू शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण् व वृक्षस्ंवर्धन् उपक्रम् हाती घेतला होता. त्यांना मिळालेल्या रु.४३,०००/- (रुपये त्रेचाळीस् हजार मात्र) या देणगीतून त्यांनी ३४४ झाडे लावली. आपली देणगी आणि इतर ठिकाणची देणगी मिळून् शबरी सेवा समितीने यंदा ३०० गावांमधल्या ३३१ शेतकऱ्यांसाठी ४६४५ झाडे लावली आहेत्. पुढच्यावर्षीही असाच उपक्रम राबवून अजून काही शेतकऱ्यांना सक्षम करण्याकडे त्यांचा कल आहे. या कामाचे फ़ोटो लवकरच या धाग्यात देऊ.
3. सुमति बालवन, पुणे : संस्थेला आपल्या उपक्रमांतर्गत रु.६३५००/- (रुपये त्रेसष्ठ हजार पाचशे मात्र) देणगी मिळाली. सुमति बालवन चालवत असलेली शाळा आणि अनाथाश्रम ह्यांच्या इमारती जुन्या झाल्या होत्या आणि बरेच ठिकाणी गळतही होत्या. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना आणि तिथे राहणार्या मुलांना होत होता. मिळालेल्या रकमेचा वापर सुमति बालवनने छतावरील पत्रे काढून सिमेंटचे स्लॅब टाकण्याकरता जे बांधकाम सुरु आहे त्याकरता केला. एका देणगीदाराने सुमति बालवनच्या विद्यार्थ्यांकरता 'टॅबलेट' भेट दिली. त्याचबरोबर मुलांकरता विज्ञानशाळेचे आयोजन केले.
4. अनामप्रेम, अहमदनगर : अंध, अपंग व मुक बधीर मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावल्ंबी बनवण्याकरीता कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी "व्होकेशनल ट्रेनिंग् सेंटर्" च्या बांधकामा करिता यंदा स्ंस्थेला मदत् हवी होती. आपल्या कडून् मिळालेल्या रु. ४६५००/- (रुपये सेहेचाळीस हजार पाचशे मात्र)देणगीचा वापर् त्यांनी या कामासाठीच् केला. त्याचे तपशील् काही दिवसांमधे इथे देण्यात् येतील.
5. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर : त्यांनी निर्धूर् चुली, तसच स्ंगणवर्ग, प्रयोगशाळा, स्ंगीत् वर्ग् यासाठी साहित्य खरेदी साठी निधीची गरज् असल्याचे सांगितले होते. आपण् दिलेल्या रु. २६,३६०/- (रुपये सव्वीस् हजार् तिशने साठ मात्र) देणगीमधून् त्यांनी निर्धूर् चुलींची खरेदी केली.
6. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ: आपण् त्यांना रु. ६०,०००/- (रुपये साठ हजार् मात्र्) देणगी दिली. आत्महत्यग्रस्त शेतकरी परीवारांना यातून मदत करण्यात आली आहे. ज्या घरातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा गरीब कुंटुंबातील मुलांना शिष्यवृत्ती (शाळेची फी, शैक्षणिक साहित्य, शाळेत येण्याजाण्या साठी बसचे पास) देण्यात आली व एका महीलेला व्यवसाय सहाय्य म्हणून "नुडल्स बनविण्याचे यंत्र" घेऊन देण्यात आले आहे
7. परिवर्तन संस्था, डोंबिवली : आपण् त्यांना रु.२३,५०१/- (रुपये तेवीस् हजार् पाचशे एक् मात्र) इतकी देणगी दिली. याचा वापर् ते मुक्त बालिकाश्रमा करीत लागणाऱ्या वस्तूंकरीता करीणार् आहेत्. त्याची खरेदी होताच्, इथे माहिती देऊ.
8. सावली सेवा ट्रस्ट, पुणे : सावली संस्थेच्या बुधवार पेठ रेड लाईट एरियामधील गरजू मुलांची शाळा - कॉलेज व वेगवेगळ्या क्लासेसची फी भरण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता असल्याचे संस्थेने कळविले होते. तसेच मुलांचे गणवेश, चपला-बूट इत्यादी खरेदी करण्यासाठीही त्यांना निधीची गरज होती.
उपक्रमाचे काम चालु असतानाच एक नविनच तातडीची गरज आमच्यासमोर संस्थेने ठेवली. नूतन समर्थ विद्यालयात शिकलेल्या व इयत्ता आठवी - नववीत प्रवेशास पात्र दोन मुलींना देवदासींच्या वस्तीत आपल्या आयांसोबत राहाणे धोक्याचे झाले होते. त्यांच्या आयांची कोठा मालकीण व दलाल या मुलींना वेश्या व्यवसायात ओढण्यासाठी प्रयत्नशील होते व समाजातील इतर काही कंटकांपासूनही धोका होताच! संभाव्य धोका तातडीने लक्षात घेऊन सावली सेवा ट्रस्टने त्या मुलींच्या आयांच्या सहमतीने त्यांना हुजूरपागा शाळेत प्रवेश घेऊन तेथील सुरक्षित वसतिगृहात हलवण्याचा निर्णय घेतला. वसतिगृहाची दोघींची मिळून एक लाख चाळीस हजारांची वार्षिक फी मुलींच्या आवाक्याबाहेर होती. मुलींना त्याच शाळेच्या वसतिगृहात घालण्याबद्दल त्यांच्या आया ठाम होत्या. त्यांना आपल्या मुली वस्तीपासून फार दूर नको होत्या. शेवटी संस्थेने हुजूरपागेतच प्रवेशाचे नक्की केले. या मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी निधीची गरज त्यांनी आमच्यासमोर मांडली. त्यानुसार काही दात्यांनी आवाहन करताच ताबडतोब देणगी देऊ केली. बघता बघता निधी उभाही राहिला! मुलींचे वसतिगृह प्रवेश पूर्ण झाले. देणगीदात्यांना प्रवेशाच्या पावत्यांचे फोटोही संस्थेने धाडले. या मुली सध्या हुजूरपागेत शिकत आहेत. सदर मुलींची नावे त्यांच्या सुरक्षेसाठी गोपनीय ठेवली आहेत.
मिळालेल्या एकूण रु.१,५७,०००/- (रुपये एक् लाख सत्तवन्न् हजार् मात्र) या देणगीतील उर्वरित निधीतून त्यांनी मुलांच्या शाळा-कॉलेज-क्लासेस चे शुल्क भरणे व गणवेश - दप्तरे - चपला - बूट यांची खरेदी केली आहे.
सर्व संस्थांनी देणगीदारांना पावत्या दिल्या आहेत्. ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे फोटोग्राफ्स, बांधकाम / प्रकल्पाचे फोटोग्राफ्स आपल्यासाठी पाठविले आहेत. ते लवकरच प्रकाशीत केले जातील.
उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : मो, सुनिधी, अतर्ंगी, महेंद्र ढवाण, पूर्वा, निशदे, गायत्री१२३, अरुंधती कुलकर्णी, कविन
या सर्व उपक्रमामध्ये प्रत्येक पावलाला मायबोलीकरांनी खूपच मोलाचे सहकार्य केले.
सर्व देणगीदारांना मनापासुन धन्यवाद. काही देणगीदार दरवर्षी न चुकता मदतीचा हात पुढे करत असतातच. त्या विश्वासावरच हे पाऊल पुन्हा पुन्हा उचलण्यात येते.
तुम्ही स्वयंसेवकांना प्रत्यक्ष ओळखत नसुनही जी मदत करता त्याचे मोल कशातही करता येणार नाही. नाहीतर हा उपक्रम पार पडुच शकला नसता.
मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली यासाठी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील.
सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता.
काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच ह्याची खात्री आहे.
सस्नेह,
सामाजिक उपक्रम २०१६ स्वयंसेवक टीम
किती मनापासून कामं करताय सर्व
किती मनापासून कामं करताय सर्व स्वयंसेवक. तुमचं कौतुक.
माहितीबद्दल धन्यवाद.
किती मनापासून कामं करताय सर्व
किती मनापासून कामं करताय सर्व स्वयंसेवक. तुमचं कौतुक.>> +१
ग्रेट ग्रेट. सर्वांना
ग्रेट ग्रेट. सर्वांना ___/\___.
मस्तच चाललंय काम !
मस्तच चाललंय काम ! नेहेमीप्रमाणे इथे मांडणे ही मस्तच
किती मनापासून कामं करताय सर्व
किती मनापासून कामं करताय सर्व स्वयंसेवक. तुमचं कौतुक.
माहितीबद्दल धन्यवाद
>>> अगदी !! मामी +१००
अहवाल वाचण्यापूर्वीच मी जाणले
अहवाल वाचण्यापूर्वीच मी जाणले होते की तुम्ही सर्वांनी किती आत्मियतेने आणि मनापासून हे सामाजिक कार्य पूर्ण केले आहे.
संबंधित सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
धागा सुरू करून तपशीलवार आढावा
धागा सुरू करून तपशीलवार आढावा घेतल्याबद्दल खूप धन्यवाद, कविन!
सर्वांना ___/\___. तुमचं
सर्वांना ___/\___.
तुमचं कौतुक. आणि अभिनंदन.!
--^--. खूप छान!
--^--. खूप छान!
खूपखूप कौतुक आणि अभिनंदन!
खूपखूप कौतुक आणि अभिनंदन!
संयोजक आणि स्वयंसेवकांचे
संयोजक आणि स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन!
सुन्दर उपक्रम आहे.
तुम्हा सर्वांचे कौतुक आणि
तुम्हा सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन!
धागा सुरू करून तपशीलवार आढावा
धागा सुरू करून तपशीलवार आढावा घेतल्याबद्दल खूप धन्यवाद, कविन!
एक स्वयंसेविका म्हणून
एक स्वयंसेविका म्हणून मायबोलीवर राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये मी गेली ५ वर्षे सहभागी होत आहे. आपण जिथे वाढलो, मोठे झालो तिथले काही तरी देणे लागतो, तिथल्या समाजाकरता केल्या जाणार्या कार्यामध्ये आपला खारुताईचा तरी सहभाग असावा अशी नेहेमी इच्छा होती. प्रत्यक्ष काम करायला खूप जास्त आवडलं असतं पण अंतरामुळे ते अवघड होतं. भारतातल्या संस्थांबरोबर काम करणार्या अमेरिकेतल्या संस्थांना देणगी देऊन ती इच्छा थोडीफार पुरी केली जायची. पण इथल्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ, प्रत्यक्ष संस्थाचालकांशी बोलून, त्यांचं कार्य, गरजा समजावून घेऊन, ज्यांच्याकरता काम करत आहेत अश्या मुलांना भेटून जे समाधान मिळाले आहे त्याचे मोल कशातही होऊ शकणार नाही.
ह्या उपक्रमाद्वारे आपण छोट्या, फार मोठा देणगीदार वर्ग नसलेल्या परंतु पोटतिडकीने काम करणार्या अश्या संस्थांना साधारणपणे मदत करतो. स्वयंसेवक किंवा इतर मायबोलीकर ह्या संस्थांमध्ये जाऊन भेटी देतात, त्यांचे कामकाज बघून येतात, सतत संस्थाचालकांच्या संपर्कात असतात. एवढ्या विश्वासाने जेंव्हा लोक आपली देणगी ह्या उपक्रमाद्वारे देऊ इच्छितात तेंव्हा त्यांच्या देणगीचा विनियोग हा योग्य प्रकारे होतो आहे ना, याची चौकशी करणे, खात्री करुन घेणे यावर स्वयंसेवकांचा नेहेमी भर असतो. ही कामाची पद्धत मला फार प्रामाणिक आणि प्रभावी वाटते.
या उपक्रमाद्वारे मी अंधशाळा (कोथरुड), नुतन समर्थ विद्यालय (बुधवार पेठ) आणि सुमति बालवन (गुजर निंबाळकर वाडी, कात्रज) या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. एवढंच सांगू शकेन की प्रत्येक भेट ही तुम्हाला अंतर्मुख करते, गरजू लोकांकरता प्रत्यक्ष काम करणार्या लोकांविषयी कृतज्ञता दाटून आणते आणि अजूनही अशा कार्याची किती जास्त प्रमाणात गरज आहे याची जाणीव करुन देते.
माझ्याकरता दर वर्षी सर्व स्वयंसेवकांबरोबर काम करणे हा एक अतिशय संपन्न करणारा अनुभव असतो. ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल या उपक्रमाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
_//\\_
_//\\_
मो, फार छान लिहिलंयस.
मो, फार छान लिहिलंयस.
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्ठेला दिलेल्या देणगीचा अहवाल.
१. सामजिक उपक्रम २०१६ मधुन आत्तापर्यंत३० कुटुबांना सोलर लाइट देण्यात आले.
यासंबधीत बातमी
http://newspaper.pudhari.com/epapermain.aspx?queryed=9&eddate=9%2f19%2f2016
२. वेताळ बांबर्डे येथील कातकरी मुलांच्या वसतिगृहामध्ये राहणार्या मुलांसाठी राज्यस्तरीय कबड्डीपटु श्री संदीप सावंत यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येईल. मुलांना पोषण सुधारण्यासाठी सुधारित जातीची (गिरीराज) कोंबडी आपण देणार आहोत. याचा खर्च रु. ५०००/- (१०० x ५० कोंबडी) एवढा येईल. अंड्याबरोबरच कुक्कुटपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण मुलांना मिळेल. यातून भविष्यामध्ये रोजगार निर्मिती होईल.
अभ्यासा करता सोलर लाईट आणि
अभ्यासा करता सोलर लाईट आणि पोषण सुधारण्यासाठी कोंबड्या आणि शिवाय कुक्कुटपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण
खूप छान ! आवडलं !
दिनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक
दिनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेला मिळालेल्या देणगीचा अहवाल
सामाजिक उपक्रम २०१६ अंतर्गत मिळालेल्या देणगीचा विनियोग २ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि एका विधवा महिलेला व्यवसाय निर्मिती करुन देण्यासाठी करण्यात आला.
माहिती खालील प्रमाणे.
१. नावः- लोकेश संतोष बोडाले
पत्ता:- चिखल्गाव, जिल्हा:- यवतमाळ
शाळा:- स्व. देवराव पाटील् विद्यालय, यवतमाळ,ईयत्ता:- पाचवी
२. नावः- नवनिता नारायण सुंकरवार
पत्ता:- पटंबोरी, यवतमाळ
कॉलेजचे नावः- अमलोकचंद महविद्यालय, यवतमाळ
वर्षः- बी. कॉम पार्ट २.
३. महिलेचे नावः- श्रीमती दुर्गा श्रीराम दोकडे
पत्ता:- बोरीसिंह, यवतमाळ.
चालु करुन देण्यात आलेला व्यवसायः- नूडल्स तयार करणे.
मलाहि ह्या उपक्रमात सह्भाग
मलाहि ह्या उपक्रमात सह्भाग घ्यायला आवडेल !
@पोर्निमा अवश्य. जरूर सहभागी
@पोर्निमा अवश्य. जरूर सहभागी व्हा.
सावली सेवा ट्रस्टने ज्या दोन
सावली सेवा ट्रस्टने ज्या दोन मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी देणगीची रक्कम वापरली त्या मुलींच्या हुजूरपागा वसतिगृह प्रवेशाच्या पावत्या

(कोलाज स्वरूपात एकत्रित देत आहे. मुलींची नावे गोपनीयतेसाठी झाकली आहेत. देणगीदारांना स्वतंत्रपणे ईमेल केले आहे.)