घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.

Submitted by मनोज. on 2 September, 2016 - 14:56

*****************************

भाग १ - कुंभार्ली घाट

भाग २ - कशेडी घाट

*****************************

माणगांवला सकाळी उठलो.. आवरले. किरणने जाहीर केले की त्याला बरे वाटत नाहीये, हातही सुजला आहे त्यामुळे बहुदा तो वाटेतून टेम्पो घेईल. आजचे टारगेट होते ताम्हिणी घाट.

अनेकदा सायकलने माणगांवला उतरून, अनेकदा ताम्हिणी, डोंगरवाडी वगैरे गावांना भेटी देवूनही आम्ही ताम्हिणी घाट कधीही सलग एका दिवसात पूर्ण केला नव्हता. ऊन, अपघात, कंटाळा आणि आळस अशा अनेक कारणांमुळे दर वेळी ताम्हिणी घाटातून परत येताना टेम्पो पकडूनच आलो होतो. आज मात्र काहीही झाले तरी ताम्हिणी घाट पूर्ण मारायचाच्च असे ठरवले होते.

माणगांव ते निजामपूर थोडा चढ थोडा उतार असा रस्ता आहे. फारसा त्रास न होता सलग वेगात सायकली पळत होत्या.

.

अधूनमधून हलका हलका पाऊस पडत होता. आजुबाजूला हिरवळीची सोबत होतीच.

...

वाटेत एक नदी लागली.. थोडे ऊन पडले होते.

..

येथे नदीपात्रात एका दगडाला कोणीतरी हार घालून ठेवला होता. त्या हार घातलेल्या ठिकाणी एखादा आकार दिसतो आहे का ते थोडावेळ बघत बसलो.. नंतर अमित आणि किरण आल्यानंतर पुन्हा पुढे निघालो..

.

मध्येच जोरदार पावसाची सर येवून गेली. भिजलेला चकचकीत रस्ता.

..

निजामपूरला पोहोचलो. सर्वप्रथम एक मेडीकल शोधले. किरणसाठी मूव्हचा स्प्रे घेतला. लगेचच त्याच्या सुजलेल्या हातावर मारला. निजामपूरच्या नेहमीच्या हॉटेलची क्वालिटी बिघडली आहे असे अनेक फीडबॅक मिळाल्यामुळे नाष्टा करायला वेगळे हॉटेल शोधले.

पोहे, आम्लेट पाव अशा ऑर्डरी सुटल्या.

नाष्टा आवरून सायकली विळा MIDC कडे वळवल्या तोच या आजोबांचे दुकान दिसले.

..

मग उगाचच त्या ढोलक्यांवर टांग टांग असे बोट बडवून परत सायकलवर स्वार झालो. थोड्याच वेळात विळा MIDC भागात आलो. अमित आणि किरण येत होतेच. या MIDC चा रस्ता सरळसोट म्हणजे अगदी पट्टीने आखल्यासारखा आहे. मग पॉस्कोच्या भल्यामोठ्या प्लँट समोर उगाचच क्लिकक्लिकाट केला..

....

पुणे आणि कोलाडच्या नाक्यावर तिघेजण पोहोचलो.. किरणने "मी येथून टेम्पो घेतो" असे जाहीर केले. या पठ्ठ्याने सुजलेल्या हातासह २५ किमी सायकल चालवली होती.

आता ताम्हिणी घाट खुणावत होता..

.

वल्लीशेठ - ही कुठली लेणी आहेत का हो..?

.

कशेडी घाट चढताना पाऊस होता त्यामुळे फार त्रास झाला नव्हता.. इथे ताम्हिणी घाट चक्क कोरड्या वातावरणात आणि उन्हात चढायची चिन्हे दिसत होती.

..

एक धबधबा सामोरा आला..

.

धबधब्यासमोर थोडा क्लिकक्लिकाट केला..

अमित. [ हा फोटो पोझ देवून काढलेला नाही. Wink ]

.

मी.

.

ऊन आणि चढामुळे आलेला थकवा धबधब्यामध्ये भिजून घालवल्यानंतर आम्ही पुन्हा सायकली चालवू लागलो.

.

आणखी एक धबधबा..

.

शारूक.. (अमित)

.

या फोटोमध्ये निळे छत दिसत आहे तो पॉस्कोचा प्लँट आहे. आम्ही इतके अंतर चढून वर आलो होतो.

.

राकट देशा.. कणखर देशा.. दगडांच्या देशा..

.

मी पुढे गेलेल्या अमितला मागे बोलावून हा फोटो काढला.

.

येथे रस्त्यावर एक साधेसेच फुलपाखरू निवांत बसले होते. त्याच्यावर साध्या कॅमेर्‍याने मायक्रो फोटोग्राफीचे प्रयोग केले.

.

थोडे पुढे आल्यानंतर बघतो तोच अमित एका भुभुला काहीतरी देत होता. आणखी जवळ आलो तर लक्षात आले की अमित त्याला राजगिरा लाडू खायला घालायचा प्रयत्न करत होता. यापूर्वीच्या कोकणराईडमध्ये राजगिर्‍याचा अतीरेक झाल्याने मी परत राजगिरा खाल्ला नाहीच. वर अमित त्या भुभुला लाडू खायला घालायचा प्रयत्न करत होता. मी यावर अमितला टोमणे मारले व पुढे निघून गेलो. अमितने त्याला दुसरा लाडू यशस्वीरीत्या खायला घातला आणि नंतर ते भुभु अमितच्या मागे मागे जावू लागले.

अमितने त्या भुभुसोबत काढलेला हा धमाल सेल्फी व्हिडीओ..

ते भुभू असे आमच्या मागे येत होते.

.

अमित.. भुभु आणि फोटोग्राफर मी.

.

पाऊस गायब झाला होता आणि घाटात हिरवळीचे राज्य होतेच

.

याच रस्त्यावरून आम्ही वर आलो होतो.

..

घाट चढवायचा कंटाळा आल्यानंतर आम्ही चालत चालत थोडे अंतर पार केले.

.

वाटेत रस्त्यावर ताजी ताजी दरड कोसळली होती.

.

रस्त्यावर एखादा खड्डा दिसत होता.

.

अन्यथा रस्ता एकदम मख्खन होता.

.

इतका वेळ झाला तरी किरण आमच्या पुढे गेला नव्हता. आम्ही फोनवरून संपर्कात होतोच. घाट चढून वर येणारे गाडीवालेही आम्हाला किरणचे अपडेट्स देत होते.

अरे हो... हे साहेब अजुनही आमच्या सोबत होतेच.

.

२०१४ च्या कोकणराईडला येथेच माझा अपघात झाला होता. विशेष म्हणजे याही वेळी कोणीतरी त्याच मार्गाने अपघातग्रस्त झाल्याच्या टायर खुणा दिसत होत्या.

.

२०१४ च्या माझ्या अपघाताची टायरखुण..

.

हाच तो खड्डा..

.

मुंबई हद्द संपली.. पुणे हद्दीत प्रवेश.

.

पुणे हद्दीत पोहोचल्या पोहोचल्या खड्ड्यांनी स्वागत केले. जाम चिडचिड झाली. या फोटोमध्ये हद्दीनुसार रस्त्यातील फरक कळेल..

.

हा आणखी एक धबधबा लागला.. अमित तेथे माझी वाटच बघत होता.

..

येथे आम्ही थोडी चर्चा करून त्या कणिसवाल्याला विनंती केली की आमचा एक भिडू खाली थांबला आहे त्याला दुचाकीवरून घेवून येवूया.. थोडे आढेवेढे घेवून तो तयार झाला. तोपर्यंत किरणने टेम्पो मिळत नाही म्हणून त्याच परिस्थितीमध्ये घाट चढवायला सुरूवात केली होती.

मग अमित आणि कणिसवाला किरणला घेवून आले.. थोडे पुढे जावून डोंगरवाडीला एका धाब्यावर जेवण आवरले. पिठले, भाकरी कांदा असा बेत होता. जेवता जेवता किरणने घरी फोन करून ड्रायव्हरला कार घेवून डोंगरवाडीला बोलावले.

त्या धाब्यावर डबा खाणार्‍या एका मामांच्याकडे लक्ष गेले तर ते एका छोटा हत्ती मध्ये बसून आले होते व रिकामेच हिंजवडीला चालले होते. मग किरणची आपसूकच त्यांच्यासोबत सोय झाली. किरणने ड्रायव्हरला पिरंगूटला येण्यास सांगितले.

आम्ही वेळेचा हिशेब केला तर सकाळपासून साडेसहा तासात फक्त ३६ किमी अंतर पार केले होते. मूव्हींग स्पीड ९ किमी/तास इतका खाली गेला होता. अजुन ७० ते ७५ किमी जायचे होते आणि दुपारचे अडीच वाजले होते. यावेळी रात्री सायकल चालवावी लागणार नाही + पाऊस या दोन कारणांमुळे मी लाईट घेतला नव्हता. आता बघू काय होते ते असे ठरवून सायकल चालवायला लागलो.. अमित थोडा पुढे निघून गेला.

थोड्या वेळाने दोघांच्यात भरपूर अंतर पडले आहे असे वाटेपर्यंत अमित दिसला. मला येताना बघून तो लगेच पुढे रवाना झाला. नंतर बराच वेळ 'तो पुढे आणि मागे मी' असे अंतर पार करत होतो. तीन साडेतीनच्या दरम्यान एका ठिकाणी थांबून पाणी प्यायले. एक एनर्जी बार पोटात ढकलला. सायकलची हवा कमी झाल्यासारखी वाटत होती म्हणून टायर मध्ये हवा भरली.

लै टाईमपास झाला आता काही झाले तरी ५ वाजेपर्यंत किमान मुळशी तरी गाठायचेच्च अशा विचाराने सायकल हाणायला सुरूवात केली..

रस्ता एकदम खराब होता..

.

कुंडलिका..

.

वाटेत सलग असा रस्ता नव्हताच.. नुसते चढ आणि उतार.. सुरूवातीला त्रासदायक असलेले ते प्रकरण नंतर नंतर मी भलतेच एंजॉय करू लागलो.. जमेल ते खड्डे चुकवत आणि वेळप्रसंगी खड्यातून काळजी घेत आजिबात वेग कमी न करता सायकल हाणत होतो.. वाटेत एका ठिकाणी विश्रांती घेत थांबलेल्या अमितलाही मागे टाकले.

.

अशाच एका मंदिराजवळ..

.

ताम्हिणी, मुळशी, पिरंगुट अशी ठिकाणे एका लयीत पार पडली होती.. आणि घड्याळात बघितले तर फक्त सव्वापाच वाजले होते. येस्स... ही एक खूप मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी. ताम्हिणी घाटाची एक नेहमी मनावर बसणारी अढी आज संपणार होती..

एका हॉटेलमध्ये दोन्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पिरंगुटचा घाट चढायला सुरूवात केली..

यथावकाश तो ही घाट संपला.. तो घाट संपताना केडीचा स्टेटस विचारणारा फोन आला.. त्याला हाफ हुफ्फ करत उत्तरे दिली.. या संपूर्ण राईड दरम्यान तिनही दिवस केडी आमचा दररोज थोड्या थोड्यावेळाने ट्रॅक ठेवत होता. फोन करून उत्साह वाढवत होता ..आणि कानपिचक्याही देत होता.
आम्ही फिश थाळी, कुंभार्लीतला अप्रतीम नजारा असे फोटो पाठवून परतफेड करतो होतो. Lol

पिरंगुटच्या माथ्यावर..

.

ठीक ६ वाजून १० मिनीटांनी चांदणी चौकात पोहोचलो...!!

.

साडेतीन तासात ताम्हिणी घाटातले जवळजवळ सत्तर किमी अंतर पार केले होते..!!!! खूप खूप समाधान वाटले..!!!!!!

आजच्या राईडचे आकडे..

.

ग्राफ..

.

हा स्पीडचा ग्राफ मुद्दाम देत आहे.. ६ तास ४८ मिनीटांनंतरचे स्पीड प्रोफाईल जबरदस्त निघाले होते. कमीतमी थांबे आणि चढ उतारांवर राखलेल्या वेगामुळे दिवसा उजेडी पुण्याला पोहोचलो होतो.

.

खूप खूप मजा आली.. धमाल केली..

भेटू पुन्हा.. घाटवाटांचे व्हर्जन 3.0 पूर्ण झाले की..!!

.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे !

घाट चढवायचा कंटाळा आल्यानंतर आम्ही चालत चालत थोडे अंतर पार केले. >> काय अरे? तरी सकाळचे पाच नव्हते ते. भरदुपारी पण कंटाळा. Proud

मस्त! एकदम! Happy

ह्या रस्त्याने किमान २००-३०० वेळा तरी पुणे रोहा केलयं! अगदी रस्त्याचे काम सुरु झालेले खिंड तोडून झाल्यावर मुरमाड रस्ता असल्यापासून .

रायगड हद्दीतला रस्ता कायम चांगला आणि पुणे हद्दीतला भंगार हे रस्ता सुरु झाल्यापसून चे वास्तव आजही पुण्याने पाळलयं! Happy

मस्त.

तुझी धबधब्यातली पोझ अगदी माई नी माई मधल्या सलमान सारखी आहे. समोर 'अपने तन पे भस्म रचा के सारी रैन वो जागा' म्हणायला कोणी होते का ? Wink

ताजी ताजी दरड कोसळली होती >>> आवडला शब्दप्रयोग.

हर्पेन - हो.. फायनली..!!

कृष्णा - हे एक गणित खरंच कळत नाहीये.. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक सगळीकडे महाराष्ट्र सोडले की चांगले रस्ते लागतात. Sad

>>> तुझी धबधब्यातली पोझ अगदी माई नी माई मधल्या सलमान सारखी आहे. समोर 'अपने तन पे भस्म रचा के सारी रैन वो जागा' म्हणायला कोणी होते का ?

हा हा हा. समोर अमित होता, बस्स.

सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल आभार..!!

ताम्हिणी घाट तसा MTB सायकलसाठीच योग्य आहे .....
आणि हो वर्णन अप्रतिम !!!

Back to top