'इमान' - गोष्टी बुधवारपेठेतल्या ………

Submitted by अजातशत्रू on 23 May, 2016 - 22:07

 पथे.jpg
'इमान' - गोष्टी बुधवारपेठेतल्या ………
पुण्यातल्या बुधवार पेठेत शेवटच्या गल्लीतून खाली आले की तिरंगा हॉटेल लागते. त्याच्या उजव्या बाजूला वळले की आरती बिल्डींग आहे. या पाच मजली इमारतीत वेणाचा गुत्ता आहे. तिचं खरं नाव वेण्णा मात्र सगळे तिला वेणा या नावानेच ओळखतात. सकाळी उशिरा अंघोळ करून ती परकर पोल्क्यावरच तिच्या मुख्य खोलीत रोज ती उभी असते, एका हातात साडीचे एक टोक घ्यायचे अन समोरच्या यल्लम्माच्या तसबिरीला लावून घ्यायचे मग तेच टोक कपाळाला लावून पाया पडल्यासारखे करून ते डाव्या अंगाला परकरच्या नाडीत खोवायचे असा तिचा रोजचा शिरस्ता. त्या दिवशीही ती एका रांगेत लावलेल्या देवांच्या तस्बिरींसमोर उभी होती. साडी नेसताना उजव्या पायाच्या अंगठ्यात साडीचा काठ दाबून धरत अगदी चापून चोपून साडीचा अर्धा घेर घेऊन झाल्यावर पदराचा काठ ओठाच्या चिमटयात पकडून ती अगदी पायघोळ निऱ्या घालत होती. मात्र तिचे लक्ष दुसरीकडेच आहे हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. तिला इथं येऊन आता तीसेक वर्षे झालीत. तिचं वय जेमतेम अकरा बारा असेल तेंव्हा तिचा मामा तिला इथं सोडून गेलेला, तिचा मामा सख्खा की सावत्र की आणखी कसा यातलं तिला काही आठवत नाही. तिचं आंध्रातलं गाव मात्र तिला अंधुक आठवतं. तिला तिच्या भूतकाळाविषयी बोललेलं आवडत नाही, ती तत्काळ विषय बदलते अन मुद्द्यावर येते. तरीही समोरच्याने ऐकलं नाही तर सरळ दाराबाहेर काढते. तिला तिच्या गतकाळाविषयी किळस आहे, उफाळता संताप आहे. ती कधी तिरुपतीला जावून आली की प्रचंड अस्वस्थ असते. तिच्या घालमेलीला अंत नसतो, दोन तीन दिवस नुसती धुमसत राहते. त्यामुळे तिच्या नावडत्या विषयावर बोलायचं धाडस कुणी करत नाही.

ती इथं आली तेंव्हा हा गुत्ता सावित्रीचा होता, सावित्री पण आंध्रातल्या कडप्पाची. तिने वेण्णाला आणल्यादिवसा पासून मायेने सांभाळले, अधाशासारखं लगेच बाजारात बसवलं नाही. काही वर्षे गेली अन वेण्णाला न्हातीधुती झाल्यावर मात्र ती विचारात पडली. तोवर वेण्णाला इथं काय चालतं याचा अंदाज आला होता.आजुबाजुच्या बायका येऊन तिची ओटी भरून गेल्या, एक दोघी मात्र त्या दिवशी सावित्रीशी भांडून गेल्या. रात्री वेण्णाला कळलं की त्या सावित्रीशी वाद घालत होत्या, त्यांचं म्हणणं होतं की, 'सावित्रीने फाजील लाड लावलेत. तिच्या अशा वागण्यामुळे बाकीच्या गुत्त्यामधल्या विड्याची पाने (नवीन लहान मुली) लवकर रंगत नाहीत.सावित्रीने आता वेणाची नथ उतरवावी, झालं इतकं पुरे झालं !' हे ऐकून वेण्णाच्या काळजाचं पाणी झालं. त्याच्या पुढच्याच दिवशी मात्र तिचं दुर्दैव सदाशिवच्या रुपानं तिच्या पुढ्यात उभं राहिलं. सदाशिव हा सावित्रीचा यार, दल्ला ! तो पाच वर्षापासून जेलमध्ये होता. तोंडावर देवीचे व्रण असावेत तशा कपच्या उडालेल्या, सदा तांबारलेले लाल भडक डोळे, राठ काळपट ओठ न त्यावरच्या टोकदार मिशा, कानावर लांब कल्ले, अस्ताव्यस्त पसरलेलले डोक्यावरचे केस अन सारखी बाहेर येणारी लाळघोटी जीभ अशा अवतारातला सदाशिव एकदम आडमाप गडी होता. हातात तांब्याचे कडे अन कानात काळे वाळे, अंगात चुरगळलेला पायजमा सदरा अन एका अंगाने कलत खांदे उडवत चालणे, सारं एका लयीत असे. जेल मधून बाहेर आल्याबरोबर त्याने तडक सावित्रीच्या उंबरठयावर आपल्या जाड चामडी वाहणा रगडल्या. तो आज येणार याची कानोकान खबर नसलेली सावित्री त्याला पाहून जाम भेदरून गेली.

आपल्याला पाहून सावित्रीचा चेहरा पांढराफटक का पडला याचा त्याला उलगडा झाला नाही. त्यानं तत्काळ तिला जवळ घेतलं अन तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागला. तशी सावित्रीने त्याला इशारयाने खुणावले, त्या सरशी तो तिच्या खोलीत शिरला. तो खोलीत जाताच सावित्रीने खोलीचे दार लोटले अन लगबगीने ती वेण्णाच्या फळकूट लावलेल्या कंपार्टमेंटमध्ये शिरली अन ती तिच्या कानाशी लागण्याआधी चोरपावलाने मागे आलेल्या सदाशिवने जीभ चाटली अन आपल्या आडदांड अंगाने त्याने दोघींना आत ओढले अन दार लावून घेतले. सावित्रीच्या तोंडावर एक हात लावून धरत त्याने आपली वासना तिच्यासमोरच त्या अश्राप मुलीवर शमवली. सावित्री इच्छा असूनही काही करू शकली नाही. सावित्रीची लेकच त्या दिवशी लुटली गेली. घामाघूम झालेला सदाशिव अन त्याच्या मागे रडवेल्या चेहऱ्याने बाहेर आलेल्या सावित्रीला पाहून बाकीच्या पोरींनी काय ओळखायचे ते ओळखून घेतले. दोनेक तास तिथं थांबलेल्या सदाशिवला सावित्रीने दारू मटण मागवलं. पोटाची आग थंड झाल्यावर तो तिथंच लोळत राहिला. दुपार टळायला झाली तशी तो पुन्हा वेण्णाच्या खोलीकडे जाऊ लागताच सावित्री आडवी आली अन हातपाया पडू लागली. तिला ढकलून तो पुन्हा वेण्णाकडे गेला अन त्या कोवळ्या मुलीच्या कन्हण्याच्या आवाजाने सावित्रीच्या कानाला दडे गेले. सगळ्या बिल्डींगमध्ये एव्हाना बातमी पसरली अन काहींनी सावित्रीची बरी जिरली म्हणून समाधान व्यक्त केले तर काहींनी हे कधीनाकधी होणार होतं असा कोरडा प्रतिसाद दिला. काही दिवस असंच चालू राहिलं, वेण्णाच्या अंगाची लक्तरे झाली होती, तिची हाडे ठणकत होती, ओठ जागोजाग चिरले होते, अंगभर ओरखडे उठले होते, कपाळावर पुढे येणारे तिचे तांबूस कुरळे केस अर्धवट उपटले गेले होते, बोटांची पेरं मोडून पडली होती, तिला न्हाणीपर्यंत चालण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं, पायात जीव राहिला नव्हता, डोळे रडून रडून कोरडे झाले होते, डोळ्याखाली काळी वर्तुळे गोळा झाली होती, पोटपाठ एक झाली होती. तिला बघून सावित्रीच्या डोळ्यात पाणी येत होते, मात्र शिताफीने ती आपला चेहरा लपवून आपलं दुःख पदराआड करत होती.

दोनेक आठवडे गेले अन एके दिवशी सदाशिव प्रचंड दारू ढोसून आला, घरात शिरताच त्याने पायातल्या चपला दोन दिशांना भिरकावल्या अन सावित्रीच्या नावाने पुकारा करत तो थेट वेण्णाच्या खोलीत शिरला. आतून कडी कोयंडा अडकवला. अन त्याने वेण्णाला गुरासारखे बडवायला सुरुवात केली, ती पोर आधी काही सेकंद गप राहिली. मात्र जसा त्याने लाथाबुक्क्या सुरु तशी ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. वाघाच्या तावडीत सापडलेल्या हरिणीगत तिची अवस्था झाली होती, त्याने तिचे सर्व कपडे फाडून बाहेर भिरकावून दिले अन तो तिच्या शरीरावर दिसेल तिथे ठोसे मारू लागला. मंदिरात गेलेली सावित्री जेंव्हा रिक्षाने घरापाशी आली तेंव्हा तिने जिन्यात कान लावून उभी असलेली बायामाणसे पहिली, आरडा ओरडा तिच्या कानी पडला तसं तिच्या काळजात धस्स झालं. हातातली पिशवी तिथच टाकून ती अक्षरशः विजेच्या वेगानं वर झेपावली. मधल्या सगळ्या पोरी बिथरून थरथर कापत होत्या, आजूबाजूच्या बायकांनी तिच्या दारासमोर कल्ला केला होता. सगळ्या नुसत्याच पुटपुटत होत्या पण कोणी पुढे होत नव्हते. काही दुसरे दल्ले तिथं आले होते पण ते नुसताच कानोसा घेत होते. त्या सगळ्यांना ढकलून सावित्री घरात शिरली. काय चाललंय हे तिनं एका क्षणात ताडलं, तिनं वेळ न दवडता वेण्णाच्या खोलीकडे धाव घेतली अन दार बडवायला सुरुवात केली. सावित्री संतापानं थरथर कापत होती. सदाशिवला मोठ्या मोठ्याने तेलुगुत शिव्या घालत होती. एव्हाना वेण्णाचा आवाज बंद झाला होता. काही मिनिटात सदाशिव बाहेर आला. त्याच्या अर्धउघड्या शरीराकडे अन रासवट अवताराकडे बघून एक पळभर सावित्रीही गलितगात्र झाली. पण पुढच्याच क्षणाला तिला बाजूला ढकलून सदाशिव पुढे जाऊ लागला, त्याला तसा पाहून दारातली अन मुख्य खोलीतली गर्दी लगोलग पांगली. बाकीच्या पोरींनी आपली कवाडे लाऊन घेतली, एक मिनिटात सारं सामसूम झालं. अगदी बायकांची पुटपुट सुद्धा थांबली. सावित्रीने मात्र हिय्या करून सदाशिवच्या मागून झेप घेतली अन पाठीकडील बाजूने त्याला पुढे ढकलून दिले. सहा फुट उंचीचा तो धिप्पाड काळाकुट्ट कातळ जमिनीवर कोसळला अन त्याच्या मागून तोल जाऊन सावित्रीही खाली पडली, खाली पडलेल्या सावित्रीच्या त्याने झिंझ्या ओढायला सुरुवात करताच तिने पूर्ण ताकद पणाला लावून पायाने त्याला दूर लोटले. ती ताडकन उभी राहिली अन मागचा पुढचा विचार न करता तिने कोपऱ्यात ठेवलेला वरवंटा ताकदीनिशी उचलून त्याच्या डोक्यात घातला. नंतर त्याच्या छातीवर आपटला. दारूच्या नशेत तर्र झालेल्या सदाशिवला तिने प्रतिकाराची संधी दिली नाही. त्याचं मस्तक फुटलं अन सारया खोलीत रक्त झालं. सदाशिवच्या किंकाळीसरशी सगळ्या तिच्या भोवताली गोळा झाल्या, सगळेच भेदरून गेलेले, कोणाला काही सुचत नव्हते. बर्फासारखी थिजलेली सावित्री मात्र वेण्णाच्या खोलीकडे नजर लावून होती.

याथावकाश पोलीस आले. पुढचे सारे सोपस्कार झाले. सावित्रीची रवानगी लॉकअप मधून जेल मध्ये झाली. तिला जामीन मिळावा म्हणून कुणी प्रयत्न केले नाहीत अन तिला कोर्टाने जामीन दिला नाही. तिच्यावर रीतसर खुनाचा खटला चालला अन दहा वर्षे सश्रम कारावासाची तिला सजा लागली. पोलिसांनी तिला आत घालण्याआधी तिनं काही गोष्टी वेण्णाला सांगितल्या. वेण्णा ही तिच्या सख्ख्या बहिणीची मुलगी होती, गावाकडे जाच होऊ लागल्यावर सावित्री इकडे पळून आली होती अन या धंद्यात अडकली होती. तरीही तिचे गावाकडे बोलणे चालणे सुरु होते. वेण्णाचा बाप ती लहान असतानाच निवर्तला होता व ती तिच्या आईसह तिच्या मामाकडे म्हणजे सावित्रीच्या भावाकडे राहत होती. तिच्या मामा - मामीत या मायलेकरांमुळे सारखे खटके उडू लागले, हाणामाऱ्याची नौबत आली तेंव्हा सावित्रीनेच आपल्या भावाला सांगून वेण्णाला इकडे बोलावले होते. तिला वेण्णाला 'लाईन'मध्ये टाकायचे नव्हते, खाऊन पिऊन सुखात ठेवून एखादा चांगला पोरगा बघून तिचे हात पिवळे करायचे इतकेच काय ते तिचे स्वप्न होते. वेण्णापाशी तिच्या आईने वा मामाने सावित्रीचा उल्लेख कधीच केला नव्हता, त्यामुळे तिला सावित्री आपल्यावर इतकी माया का करते याचा उलगडा कधी होत नव्हता तो आता झाला. सदाशिव हा सावित्रीचा म्हटला तर यार, दादला अन म्हटला तर एक अव्वल भडवा. पण त्याने हा गुत्ता सावित्रीला मिळवून देण्यात त्याचा जीव धोक्यात घातला होता, अनेकांशी दुष्मनी ओढवून घेतली होती. तिच्या सगळ्या भांडण तंट्याचं काम तो निपटत असे, बदल्यात कधी शय्यासोबत तर कधी दारू मटन तर कधी पैसा अडका हा त्याचा साधा हिशोब होता. शेजारच्या गुत्त्यातील सुलेमानला सावित्रीवर वाईट नजर ठेवतो म्हणून त्याने हातपाय तुटेस्तोवर मारले अन हाफमर्डरच्या केस मध्ये अडकून त्याला पाच वर्षाची शिक्षा लागली होती. तो जेलमध्ये गेला अन काही दिवसात वेण्णा तिथे आली होती. जेलमधून सुटल्यावर त्याने वेण्णाला पार कुस्करून टाकले तेंव्हा त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दडलेल्या सावित्रीला काय करावे हेच आधी सुचले नाही मात्र शेवटी जेंव्हा पाणी नाकापर्यंत आले तेंव्हा तिने त्याला संपवून टाकले. पण तोवर नियतीने डाव साधला होता अन सदाशिवचे पाप तिच्या उदरात वाढत होते. 'पोर पाडून टाक, वाढवू नको' असं तिला अनेकांनी बजावून सांगून देखील हळव्या स्वभावाच्या वेण्णाला तो निर्णय घेता आला नाही अन तिने गर्भातला जीव वाढवला. पुढे तिने एका देखण्या मुलीला जन्म दिला.

त्या दिवसानंतर पंधरा - सोळा वर्षाची वेणा गुत्त्याची मालकीण झाली अन तिच्या आयुष्याला एक संथपणा आला. रोज उठून पूजा अर्चा करणे, मुलीकडे लक्ष देणे, इतर बायका पोरींकडे नजर ठेवणे यात तिचा वेळ जावू लागला. तिची दिनचर्या ठरून गेलेली असे. कधीकधी तिला सावित्रीची आठवण आली की संताप येई अन पुढच्याच क्षणाला माया दाटून येई. ती कधी तिरुपतीला गेली तर वाटेत तिला तिचे गाव लागे अन आठवणींचे काहूर तिला उध्वस्त करून जाई. सौंदत्तीला ती कधी गेली नव्हती पण सावित्री ती पूजा करत असे अन तिथल्या अनेक घरात यल्लम्माची आराधना चाले म्हणून ती देखील तिची साडी आधी देवीच्या तसबिरीला लावल्याशिवाय अंगाला लावत नव्हती. नाही म्हणायाला तिथं येणाऱ्या काही जोगतिणीसोबत तिची दाट मैत्री झाली होती.त्यातही लक्ष्मीवर तिचा जास्त जीव, ती तिला खाऊ पिऊ घाले, चोळी बांगडी अन जोडीला रगड पैसा देई. मुलीसाठी दुवा कर म्हणून विनवणी करत राही. काही जरी झाले तरी बिनबापाच्या या पोरीला आपण आपले आतडे कातडे झिझवून मोठे केले आहे, तेंव्हा तिला या चिखलात रुतु द्यायचे नाही या हेतूने तिने तिला बोर्डिंगच्या शाळेत घातले होते. काळ वेगाने पुढे निघून गेला अन बघता बघता वेणाची मुलगी मोठी झाली अन तिला तिच्या भाविष्याची चिंता लागून राहिली. ती मुलीला कधी इकडे येऊ देत नव्हती अन तिला मुलीकडे जायचे म्हणजे एक मोठे दिव्य वाटायचे कारण तिच्या बोलण्या चालण्यामुळे ती 'कुठून' आलीय याचा लोकांना लगेच अंदाज येई अन तिची मोठी पंचाईत होई. तरीही तिने मुलीला सगळी वस्तूस्थिती वेळच्या वेळी कानावर घातल्याने ती फारशी जिद्द करत नसे. सदाशिवनंतर तिने आपल्या अंगाला कुणाचा हात लावून घेतला नव्हता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आभा होती. भरल्या अंगाची वेणा चाळीशीतली आहे असं कुणाला खरे वाटत नसे. तिच्या फटकळपणा मुळे तिला सगळे टरकून असत. तिनेही कुठल्या पुरुषाची अपेक्षा मनात ठेवली नव्हती कारण आसपास जे चालत असे ते बघून तिचं मन पार विटून गेलं होतं. तिच्या वासना कधीच मरून गेल्या होत्या. मात्र एक रखरखती दुपार तिच्या आयुष्यात वेगळे वळण घेऊन आली.

एका दुपारी एक तरणाबांड पोरगा धावतच तिच्या घरात घुसला अन थेट तिच्या खोलीत जाऊन लपला, आत शिरताच त्याने तिच्या तोंडाला सर्व ताकदीनिशी दाबून धरले अन एक हात वळवून तिला पुढ्यात आवळून उभा राहिला. काही वेळाने तिथे आणखी काही तरुण येऊन डोकावून गेले. त्या नंतर तो तरुण तिच्या खोलीतून सर्रकान बाहेर आला, त्या सरशी पुढे होत वेण्णाने त्याच्या कानाखाली एक लगावली. तिच्यावर रागवायचे सोडून तो तिच्याकडे बघत हसतच उभा राहिला, वेणा ओशाळून पाहत राहिली. तो तिच्यापेक्षा वयाने बराच लहान असावा, पिळदार अंगाच्या त्या तरुणाचा स्पर्श तिला का कुणासा ठाऊक पण घायाळ करून गेला. तो हसतच गाल चोळत तिथून निघून गेला. पण पुन्हा पुन्हा वेगवेगळे कारण काढून परत येऊ लागला. हळूहळू त्याने वेणाचा विश्वास संपादित केला न तिच्या मनावर, शरीरावर कब्जा केला. दिवस जात राहिले अन वेण्णाला त्या पोराचे वेध लागू लागले. जनक त्याचं नाव, बाकी त्यालाही काही आगापिछा नव्हता, बिबवेवाडीला कुठे तरी किरायाच्या खोलीत राहतो अन फावल्या वेळेत हात की सफाई हाच त्याचा कामधंदा इतकीच काय ती त्याची माहिती होती तिनं आपल्या सारया आयुष्याचा सारीपाट त्याच्यापुढे उलगडला. त्यानेही मन लावून तिला आधार दिला. नंतर तो रोज येऊ लागला तशी ही बातमी कानोकानी झाली. एके दिवशी आपण आपल्या मुलीच्या कानावर या बाबतीतही सारे सांगून टाकले पाहिजे असे तिला वाटू लागले. तिने जनकची पुसटशी कल्पनाही मुलीला दिली. आपल्या मुलीला एकदा का होईना आपला नरक दाखवायचा ठरवले, आपण असे का वागतो आहोत, याचा खुलासा करावा असे वाटू लागले. तिने एक महिन्यानंतरचा दिवस मुक्रर केला अन मुलीकडे जाताना जनकलाही बरोबर घेऊन जाण्याचे ठरवून तिला तसा निरोप दिला. त्या नंतर काही दिवस गेले अन सलग पंधरवडा गेला तरी जनक कसा आला नाही या विचाराने ती चिंताक्रांत झाली. तिला काही सुचेनासे झाले. अन एके दिवशी मुलीच्या बोर्डिंगवरून एक फोन आला त्याने ती कोसळून गेली.

'तुमची मुलगी एका नातलगासोबत घराकडे जाऊन येते असं सांगून दहा दिवस झाले तरी आली नाही,तेंव्हा ती कधी परत येणार आहे' अशी विचारणा करणारा तो निरोप ऐकून ती नखशिखांत हादरली. तिने पोलिसात तक्रार नोंदवली तेंव्हा तिला पुढचा धक्का बसला. बोर्डिंगच्या माणसांनी संशयिताचे जे वर्णन केले होते ते सारे जनकसारखे होते पण त्याचे नाव पोलिसांना सांगण्याची तिची हिंमत झाली नाही. दोनेक दिवसात तिला पुन्हा एक फोन आला अन सारया घटनेचा उलगडा झाला. तिला आलेला हा फोन जनकचाच होता. त्याने जे सांगितले ते तिच्या सहनशीलते पलीकडचे होते. जनकच्या मोठया बहिणीला सावित्रीने बऱ्याच वर्षांपूर्वी विकत घेऊन धंद्यात लावले होते. पुढे ती मुलगी तिथून पळून गेली अन तिचे पुढे काय झाले हे कोणालाच कधी कळले नाही. तर आपल्या बहिणीचा मागमूस काढत जनक थेट वेण्णापर्यंत येऊन पोहोचला होता. त्याने तिचा विश्वास संपादन करून तिच्या मुलीची सगळी माहिती गोळा केली होती. कागदपत्रे घेऊन तो तिच्या बोर्डिंगवर गेला अन तिला आईकडे घेऊन जातो असे सांगून भलतीकडे घेऊन गेला. त्याने तिला गुंगीचे औषध पाजून थेट कामाठीपुऱ्यात नेऊन विकले. जिथ तिला विकले तिथला पत्ताही वेण्णाला दिला. आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी त्याने निष्पाप मायलेकरांचा बळी दिला होता. ज्या मुलीला ह्या नरकापासून दूर लोटायचे होते ती केवळ आपल्यामुळेच या घाणीत आल्याचा वेणाला पश्चात्ताप होऊ लागला. तिने ताबडतोब अज्जूभाईला फोन लावून बोलावून घेतले. कामाठीपुरयातला पत्ता त्याला दिला. त्याने त्याचे सारं सर्कल वापरून काही वेळातच 'फिगर' सांगितली. समोरच्या पार्टीला 'नव्या नथी'चे दाम फिक्स केले अन वेणाने आयुष्यभर जमा केलेली पुंजी त्याच्या हातात दिली, त्याच्या पुढे हात जोडले. पोरीला परत घेऊन ये म्हणून सांगितले. वेण्णाने मुलीला तिथल्या नरकातून परत आणतानाच आणखी काही निर्णय घेतले. मुलीसाठी एक चिठ्ठी अज्जूभाईसोबत दिली. त्यात लिहिले होते -
'माझ्या लाडक्या पोरी, माझ्यामुळे तुझे आयुष्य बरबाद झाले. मी तोंड दाखवायला लायक नाही, मी घर सोडून जात आहे. तुला वाटले तर तू बोर्डिंगला रहा. इथल्या पैशावर गुजराण होईल. तुला जिथे वाटते तिथे रहा पण या नरकात राहू नको. इथला सगळा कारभार मी अनिताकडे देऊन जात आहे, तुला वाटले तर तू बाहेरून चौकशी करत राहा.' स्वतः इमानी राहूनही आयुष्यभर वेगवेगळ्या पुरुषांनी धोका दिल्याने अन आपल्यामुळे मुलीचे वाट्टोळे झाले या समजापोटी घराच्या चाव्या अनिताकडे देऊन वेणा थेट सोलापूरला लक्ष्मीकडे निघून आली. तिने फिरून म्हणून पुन्हा कसलीही चौकशी केली नाही. आपलं राहिलेलं आयुष्य देवादिकाच्या सेवेत घालवावं असं तिनं ठरवलं अन त्यानुसार तिची नवी जिंदगानी सुरु झाली......

लक्ष्मी जोगतीण माझ्या चांगल्या परिचयाची होती. बरेच दिवस झाले लक्ष्मीची भेट झाली नाही म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून तिच्या घराकडच्या रस्त्याकडे वळलो. पन्नाशी गाठलेली लक्ष्मी एक देवदासी आहे, सकाळची पूजाअर्चा करून घरातून ती बाहेर पडली की दिवस मावळायला झाल्यावरच भेटते म्हणून मी गाडीचा वेग वाढवला. लक्ष्मीसोबत अंबादास भेटला तर मग मात्र खूप वेळ जाणार हे नक्की होतं. अंबादास हा जोग्त्या . तो नेहमी लक्ष्मी बरोबर असायचा हातात चौंडकं घेतलेल्या अंबादासच्या तोंडात पानाचा तोबरा इतका भरलेला असे की लाल ओघळ त्याच्या ओठावरून ओघळत असत, त्याच्या डोक्याला लावलेले पचपचीत तेल, घामेजून गेलेले काटकुळे अंग ह्यावर कडी म्हणून की काय त्याचा तोंडाचा पट्टा सदा न कदा चालू असायचा. बोलताना लाल थुन्कीचे कण समोरच्याच्या तोंडावर उडवायचा. तो एकदा बोलायला लागला की लवकर थांबत नसे. तिच्या गल्लीच्या वळणावर गाडी असतानाच लांबून मला लक्ष्मी दिसली. मात्र अंबादास तिच्या सोबत नव्हता, कुणी तरी दुसरीच बाई तिच्यासोबत दिसत होती. मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तिथूनच लक्ष्मीला न्याहाळत उभा राहिलो. लक्ष्मीने अजून मला बघितले नव्हते, तिची नजर डाव्या बाजूच्या घरांकडे होती. घराबाहेर बसलेल्या बाया बापड्या तिला लांबूनच हात जोडत होत्या अन लक्ष्मी त्यांच्याकडे प्रसन्न नजेरेने बघत होती. लक्ष्मी थोराड असली तरी तिच्यात विशीच्या तरुण मुलीची चपळता होती, डोक्यावर लालभडक कुंकू लावलेला यल्लम्माचा पितळी मुखवटा ठेवलेला जग घेऊन जाणारी लक्ष्मीच मला एखाद्या देवीसारखी वाटायची. तिच्या गोलाकार चेहरयावर कायम तेज असायचे, कपाळावर लावलेला भंडारा तिला खुलून दिसायचा. गळ्यात कवड्याच्या माळा अन हातात क्वचित कधी तरी परडी असायची, तिच्या काही केसांच्या जटा तिने अजूनही तशाच ठेवलेल्या अन त्यावरून, डोईवरून पदर घेऊन लख्ख पिवळी साडी नेसून निघालेली लक्ष्मी म्हणजे चैतन्याची ती देवताच भासे. तिच्या सोबतची बाई तिच्या मागेमागे चालत होती, मला तिचा चेहरा लांबूनच ओळखीचा वाटू लागला होता. आपण ह्या बाईला कुठे तरी बघितलेय, कधी तरी भेटलोय असं राहून राहून वाटू लागले. काही क्षणात त्या दोघी जवळ येऊन ठेपल्या तशी माझ्या डोक्यात उजेड पडला. ही तर वेण्णा !

वेणा मला बघून खुश झाली. 'काय बापू अजूनही ल्हितो का ?' असा सवाल तिनं केला. तिची तडफ,तिचे तेज जसेच्या तसे होते. तिथंच उभ्या उभ्या तिनं सारी कथा ऐकवली. मी कधी काळी तिला भेटलेलो, हे तिने नेमके ध्यानात ठेवलेले ते माझ्या लिहिण्याच्या खोडीमुळे ! आता ती देवदासी नाहीये पण लक्ष्मीबरोबर फिरते, आराधना करते, दरसाली सौंदत्तीला जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला रांडाव पुनव साजरी करते अन पौष पौर्णिमेला आहेव पुनव साजरी करते. तिला हे करायचे अधिकार आहेत का नाहीत हे तिला माहिती नाही पण तिला त्यात समाधान मिळते असं ती सांगते. लक्ष्मीला कुठे तरी वर्दी होती, तिला जायची घाई होती अन हिचं बोलणं उरकत नव्हतं. शेवटी हात जोडून ती म्हणाली, 'एक काम करशीला का ?' मी मान डोलावताच ती खुश झाली. पुढे म्हणाली, ' 'आपल्या गुत्त्यावर जाऊन येता का ? पोरीची लई याद येतेय. तिचं पुढं काय झालं हे विचारण्याची हिंमत नाई माझ्यात. तेव्हढा निरोप मला द्याल का ?'

मी मान डोलावली तसे तिच्या डोळ्यात पाणी तरळले. माझ्या कानशिलाभवती दोन्ही हात पालथे ठेवून तिने 'आई यल्लमा सुखी ठेव गं बाई माझ्या भावाच्या संसाराला!' असं काहीसं पुटपुटलं. त्यासरशी त्या दोघी पुढे निघून गेल्या. मी विचार करत तिथच थिजल्यागत उभा होतो. काही पाऊले चालत गेलेली वेण्णा झपकन मागे आली आणि हात जोडून मला म्हणाली. माझ्यावर काही ल्हिले तर मी बेईमान नव्हते असं ल्हीहा ! पोरीनं विचारलं तर सांगा की, नशिबानं तिच्या आईला पार फसवलं पण तिनं कधी कुणाला फसवलं नाही. तिची आई लई लई इमानी होती म्हणून सांगा...'

काही दिवस गेले अन कामानिमित्त पुण्याला गेल्यावर मी वेण्णाच्या आरती बिल्डींगमधील घरात जाऊन आलो. 'इमारत धोकादायक झाली असून केंव्हाही कोसळू शकते अन येत्या पावसाळ्यापूर्वी खाली करावी' असा फलक पालिकेने तळाशीच लावला होता. वेण्णाची मुलगी मी एका सेकंदात ओळखली. पण ती तिथे असल्याचे फार वाईट वाटले. तिचं वागणं, बोलणं सारं चालचलन खूप खटकणारं वाटलं. अचकट विचकट अविर्भाव करत 'बैठना है तो जल्दी बैठ वरना कट ले ! इस उमर में बिवी ढुंढ रहा हैं क्या ?' असं मला बोलून गेली तेंव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. तिच्याशी काही बोलण्याची माझे धाडस झाले नाही. खाली आल्यावर तिथल्या पानवाल्यापाशी चौकशी करता कळले की बुधवारातील सर्वात कठोर, विकृत, क्रूर अड्डेवाल्या बायकांत हीचं नाव वय कमी असूनही बरंच वरचं होतं. मी परतीच्या प्रवासात असताना मला असं राहून राहून वाटलं की वेण्णाची मुलगी अशी असूच शकणार नाही. ती स्वतःवर सूड घेतेय, ती जगावर सूड घेतेय. तिच्या कह्यात येणाऱ्या प्रत्येक चीजवस्तूवर - माणसांवर ती सूड घेतेय. ती स्वतःच्या आयुष्यावरच सूड घेतेय....

तिथून परतल्यावर काही दिवसांनी मला लक्ष्मीचा फोन आला. ती मला वेण्णाचा काही निरोप आहे का असं विचारत होती. मला खरं सांगण्याचे धाडस झाले नाही. "अनिता सारं सांभाळते, वेण्णाच्या पोरीने लग्न केलेय पण तिला सध्या तरी आईला भेटावं असं वाटत नाही. मात्र कधी भेटायचे झाले तर नक्की कळवते" असा तिचा निरोप असल्याचे मी खोटेच सांगितले. या घटनेनंतर मी लक्ष्मीच्या नंबर वरून आलेले फोन कधीच उचलले नाहीत. कारण वेण्णाच्या इमानाला तोंड देऊ शकेल असं सत्य माझ्याकडे नव्हते....

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/05/blog-post_21.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक गोष्ट!
बहुदा या स्त्रीया देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या असतात आपल्या महान पंरपरा आणि संस्कृतीची काळी भयानक बाजु...

भयानक.....


बहुदा या स्त्रीया देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या असतात आपल्या महान पंरपरा आणि संस्कृतीची काळी भयानक बाजु...

ह्युमन ट्रफिकिंगमध्ये फसवुन पळवुन आणलेल्या मुली सगळ्यात जास्त आहेत.

ह्युमन ट्रफिकिंगमध्ये फसवुन पळवुन आणलेल्या मुली सगळ्यात जास्त आहेत.>>>> + १

तसेही देवदासी प्रथा आता बरीच आटोक्यात आलीये.

जर पुर्वी कधी सौंदतीला गेलात आणी आत्ता जाल तर फरक लगेच जाणवेल.

या केवळ काल्पनिक गोष्टी नसून मला आलेल्या अनुभवातील व्यक्तींची चित्रणे आहेत...नावं बदलली आहेत...@मानिनी म्हणतात तसं एका दशकापूर्वीची आणि आताची सौंदत्ती यात फार फरक झालाय मात्र भोगवस्तू म्हणून स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात तिळमात्र बदल झालेला नाही...इथल्या सर्व महिला आणि देवदासी असा संबंध क्वचित येतो....@पियू - अशा आणखी काही व्यक्तींची शब्दचित्रे नक्कीच इथं उलगडली जातील मात्र त्यात अश्लीलता वा अर्वाच्चता टाळूनच माझं लेखन असेल....@ऋन्मेऽऽष- दोनेक दिवसांत दुसरा भाग इथे पोस्ट करेन ....
सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...

बापरे Sad

Pages