'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !! :
-------------------------------------------------------------------------
'बेहद्द नाममात्र घोडा' अश्या भीषण नावाची अरुण कोलटकरांची एक कविता आहे. शीर्षकाचा अर्थ समजणे दूरची गोष्ट पण, हे तीन शब्द कधी एकत्र येऊ शकतात अशी कल्पनाही मी पामर करू शकत नाही. त्यामुळे हा शब्दसमुच्चय पुन्हा कधी आयुष्यात येईल असे खरच वाटले नव्हते ... पण आज लोकसत्ता मध्ये कुबेरांचा माफी अल्पाक्षरी माफीनामा वाचला आणि याला काय म्हणावे याचा विचार करत असताना अचानक हा 'बेहद्द'च अचानक डोळ्यासमोर आला...
खरेतर माफीनामा वाचून डोक्यात बराच कल्लोळ चालू आहे. उण्यापुऱ्या २५ शब्दांच्या मागे अनेक ठळक घडामोडी आणि सूक्ष्म अर्थच्छटा आहेत. आणि ते सगळे एकत्र डोक्यात पिंगा घालत असल्यामुळे सारे काही योग्य त्या क्रमाने शांतपणे इ-कागदावर उतरवणे थोडे आव्हानात्मक वाटते आहे.... प्रयत्न करतो.
राजू परुळेकरला अनेक वर्षे माझ्या ध्यानात येणारही नाही एवढ्या बारकाईने टिपत गेलो आणि शेवटी त्याचा (दुरून दिसणारा का होईना) आलेख मी लेखातून मांडला. गिरीश कुबेरांना मी राजू इतके दीर्घकाळ आणि तपशीलवार टिपले नसले तरी या माफीच्या निमित्ताने विचार करता त्यांच्या लोकसत्ताचे संपादक झाल्यापासून इतक्या गोष्टी आठवत आहेत की माझे मलाच आश्चर्य वाटते आहे.
जशी देशाला 'गांधीपरिवार-मुक्त' कॉंग्रेसची गरज आहे तशी 'गांधीभक्ती-मुक्त' संपादकाची 'लोकसत्ता'ला गरज होती, कुमार केतकरच्या तावडीतून सुटका होऊन लोकसत्ता कुबेरांच्या हाती पडला तो एक सुदिनच होता. कुबेरांबद्द्ल पत्रकार म्हणून फारशी माहिती नव्हती. पण अर्थकारण कळणारा आणि आखाती देशातले तेलकारण उमजून असणारा लेखक म्हणून त्यांची 'एका तेलियाने' वगैरे पुस्तकामुळे ओळख झाली होती. समाजाला डोस देणाऱ्या आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा व्यासंग असल्याचा समाज असणाऱ्या अनेक संपादकांची अर्थसाक्षरता ही तोळामासाच असते. त्या तुलनेत अर्थज्ञानी संपादक म्हणून कुबेर वाचायला मिळणे ही एक चांगली गोष्ट होती.
सुरुवातीच्या काळातच (२०११च्या सुमारास) बंगाल निवडणुकीत कम्युनिस्टांवरच्या ममता बानर्जीच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या 'दांभिक गेले, कर्कश आले' सारख्या अग्रलेखातून केलेले अचूक विश्लेषण फारच प्रभावी वाटले होते. डाव्यांच्या ढोंगीपणावर बोट ठेवताना ममताच्या आक्रस्ताळ्या नेतृत्वशैलीतल्या उणीवासुद्धा बरोबर दाखवून दिल्या होत्या. अर्थकारणातल्या खाचाखोचांचे सखोल ज्ञान असल्यामुळे भावनिक/धार्मिक मुद्द्याला अर्थशास्त्रीय आणि भू-राजकीय angle कसा असतो याचा परिपाठच त्यांचे काही अग्रलेख देतात. त्यांच्यातली मुख्य आवडणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सारखेच ठोकणे. डावे, उजवे, अधले-मधले यांच्यावर यांच्यावर ते सारखेच तुटून पडतात. कॉग्रेस, नेहरू-गांधी यांच्या प्रेमात शिगोशिग बुडालेल्या कुमार केतकर यांच्या अग्रलेखामुळे पिवळ्या पडलेल्या लोकसत्तेच्या संपादकीयांना तुकतुकी आल्यासारखी वाटली. मुख्य म्हणजे मला भावनिकदृष्ट्या न पटणाऱ्या कुबेरांच्या मुद्द्यांनादेखील व्यावहारिकतेची किनार जाणवायची/जाणवते. त्यामुळेच त्यांचे काही अग्रलेख पटले नाहीत तरी अग्रलेख वाचणे मी थांबवले नाही.
त्यांचे धाडसी लिखाण अनेक ठिकाणी कौतुक करावे असे असते. पं.नेहरू यांच्याकाळापासून काहीशा डाव्या असणाऱ्या अर्थनीती ऐवजी उजवी अर्थनीती असणे यात गैर काहीच नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भांडवलशाहीचे न लाजता त्यांनी समर्थन केलेच शिवाय पूर्वापार असणाऱ्या 'गरिबी म्हणजे सज्जनता आणि श्रीमंती म्हणजे पाप' अशा भाबड्या समजुतीने नुकसानच कसे केले आणि पैसे कमावण्यात गैर काहीच नाही हा त्यांचा अनेकदा सूर असतो. उगीच ढोंगीपणाने समाजवादी, पुरोगामी वगैरे विचार अग्रलेखातून बिम्बवणाऱ्या आणि प्रत्यक्षात वृत्तपत्राच्या मालकशेठच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्या इतर काही संपादकांपेक्षा अशी वेगळी भूमिका ही नजरेत भरण्याजोगी होती.... त्यांच्या लिखाणाचे समर्थन करत मी फेसबुकवरच्या दोस्त लोकांशी वादसुद्धा घातले आहेत ...
पण अनेकदा अशा संपादकांना कुठे थांबावे हे कळत नाही. संपादकाचा 'संपादकराव' होतो. जनमताच्या विरुद्ध विचार व्यक्त करण्याची झिंग, स्वतःच्या लेखणीच्या प्रेमात बुडून जाणे आणि तथाकथित निर्भिडतेची पट्टी सतत कपाळावर बांधून फिरायचा सोस यामुळे अनेकांचे होते तेच यांचे व्हायला लागले. परखडतेत तुसडेपणा येऊ लागला. एखाद्याला शेलक्या शब्दात किरकोळीत काढणे, किंवा उठसूट सगळ्यांना फाट्यावर मारणे असला वास त्या अग्रलेखांना येऊ लागला. एकंदरीत सगळा समाज कायम उत्सवी मानसिकतेत किंवा उन्मादात असताना अनेकदा त्याला त्यामागचे संभाव्य धोके सांगून वेळीच कान टोचणे आणि जमिनीवर आणणे हे जबाबदार संपादकाचे कर्तव्य नक्कीच असते. पण कुबेरांच्या लिखाणाचे कान टोचण्यापेक्षा टोचून टोचून लिहिणे हेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहे. त्यांच्या लिखाणात दोन कौतुकाचे शब्दही दिसेनासे झालेत. छिद्रान्वेषी वृत्ती वाढली आहे. काहीतरी निमित्त काढून सतत राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक यांना हिणवत राहायचे, कसलीही तर्कटे लढवून आपल्या मुद्द्यांना समर्थन देत राहायचे. अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून हा तुच्छतापूर्ण स्वर प्रकर्षाने जाणवायला लागला. आंदोलन घडत असताना एक भारावलेपण होते. तो एक बुडबुडा होता आणि तो यथावकाश फुटलाही... त्या दृष्टीने त्यांचे त्यावेळचे लेख पुढच्या धोक्याचा इशारा देणारे होतेही त्याचवेळी अग्रलेखात कधीही एवढे लोक आंदोलनाला पाठिंबा का देत आहेत, त्यामागची मानसिकता काय असेल याचे विश्लेषण दिसले नाही. ते दोन चार महिने फक्त आणि फक्त नेत्यांपासून, आंदोलकापर्यंत आणि VIP पासून ते सामान्य माणसाला हिणवण्यात गेले.
पुढेपुढेही यातल्या बऱ्याच गोष्टी लिखाणात डोकावत राहिल्या. वारू चौखूर उधळले. अश्वमेधाचा बेहद्द अश्वच जणू.... याकुब मेमनच्या फाशीच्या अग्रलेखाने लोकसत्तेच्या नाही तर बहुतेक पत्रकारीतेच्याच इतिहासातली सर्वात खालची पातळी गाठली असावी. जी न्यायव्यवस्था न्यायाधीशाच्या समोर पलायन करून पुन्हा पकडल्या गेलेल्या गुन्हेगारालासुद्धा सुनावणीत 'तो आपल्या डाव्या हाताच्या बेडीत होता की उजव्या हाताच्या हे पोलीस नक्की सिद्ध करू न शकल्या'ने 'बेनिफिट ऑफ डाउट'वर सोडून देण्याइतकी दयाळू आहे, त्या न्यायववस्थेने (दहा-दहा वेळा अपिलाची संधी मिळाल्यानंतर) सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला किरकोळीत काढण्यापर्यंत कुबेरांची मजल गेली. याकुबच्या शिक्षेने झालेल्या जी एक समाधानाची लाट दिसली तीत कुबेरांना 'एक शोकांत उन्माद' दिसला... तो माफीचा साक्षीदार होता अशा आशयाची धादांत खोटी माहिती द्यायचीही लाज वाटली नाही याकुबच्या बापाने व्यथित होऊन पाकिस्तानात सर्वांदेखत याकुबला कानाखाली मारल्याचे तपशीलवार माहित असणाऱ्या कुबेरांना वीस वर्षे खटला चालू असताना त्याच्या मदतीला जायची बुद्धी का झाली नाही ? त्या क्षणी कुबेर मला देशद्रोही वगैरे वाटले नाहीत पण 'जनभावनेच्या आहारी जाणे धोक्याचे असून त्यामुळे बुद्धीवरतीची काजळी धरते' या लाडक्या सिद्धांताच्या पूर्णपणे आहारी जाऊन, मुद्दामुनच जनभावानेच्या विरुद्ध लिहिण्याची कंड शमवू पाहणारा cynic माणूस वाटला...
तेव्हापासून हा माणूस मनातून प्रचंड उतरला. पुढे पुढे लिखाणात काही संतापजनक विधाने आढळली की आधीचे काही प्रमाद आठवू लागले. 'बळीराजाची बोगस बोंब' हा जवळपास सर्व शेतकऱ्यांनी धिक्कारलेला आणि कित्येक ठिकाणी जाहीरपणे जाळला गेलेला अग्रलेख. 'हस्तिदंती मनोऱ्यातली पत्रकारिता' म्हणून त्यावर जळजळीत टीका झाली होती. (दुर्दैवाने तो वाचायचा राहून गेला, त्यामुळे भाष्य करू शकत नाही पण या ठिकाणी त्या अग्रलेखाची आठवण येतेच). मग अचानक आठवला एक अगदी वेगळा संदर्भ. तीनचार वर्षापूर्वी ब्लॉगविश्वावर नजर टाकणारे एक सदर लोकसत्तातून यायचे. ते कोणीतरी लेखक 'अभिनवगुप्त' या टोपणनावाने लिहायचा. त्यातही बऱ्याचदा वेगवेगळ्या ब्लॉगवर टीका असायची. हेरंब ओक नावाच्या ब्लॉगरच्या ब्लॉगचे ('काय वाटेल ते' या नावाचा तो ब्लॉग होता बहुधा) अभिनवगुप्तने वाभाडे काढले होते... त्यातही हेरंब ओकचा ब्लॉग अतिशय लोकप्रिय का आहे याचे कुठलेही विश्लेषण करण्याची इच्छा नव्हती - जणूकाही खूपजण वाचतात म्हणजे मग ती लोकभावना तुसडेपणाने झटकून टाकण्यातच आपली 'निर्भीडता' सिद्ध होते अशी अभिनवगुप्ताला खात्री असावी. लोक जर त्यावरून हेरंब आणि अभिनवगुप्त यांच्यात बरेच इमेल युद्ध रंगले होते. हेरंब हे छातीठोकपणे म्हणत होता की अभिनवगुप्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गिरीश कुबेरच होते. पण हेरंबच्या इ-पत्रांना कधीही समाधानकारक उत्तर दिले नव्हते/देता आले नव्हते (ही माहिती मला हेरंबचा ब्लॉग चाळतानाच मिळाली...मी इथे फक्त मधले काही बिंदू जोडायचा प्रयत्न केलाय). माझा फेबुमित्र अमेय म्हणतो त्याप्रमाणे २ + २ चे उत्तर हे 'पाच ' असे देणार... का ? कारण 'लोक' त्याचे उत्तर 'चार' असे देतात !!
एवढे असूनही त्यांचे अग्रलेख मी अजूनही का वाचतो वाचतो याचे निश्चित उत्तर मलाच देता येणार नाही. कदाचित त्यातल्या cynicism मधून अधून मधून डोकावणारे जागलेपण मला महत्वाचे वाटत असावे. अशातच मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात मराठी भाषा दिन आणि एकूणच दिनाच्या निमित्ताने एक अग्रलेख आला आणि माझे डोकेच गेले. 'कुणीतरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल विक्री कौशल्याची खटपट करत अभिमान गीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो ...' असे निर्भिडतेचे खजिनदार असलेल्या कुबेराने कौशल इनामदारचे नाव न घेता लिहिले...!!! त्यांना ते गीत आवडले नाही असे म्हणायचा पूर्ण अधिकार आहे पण त्यांनी कौशलच्या मेहनतीला असे किरकोळीत काढणे हा घृणास्पद प्रकार आहे. इतका तुसडेपणा येतो कुठून ? आपण स्वयंभू असल्याची भावना पत्रकारात/संपादकात घटत रुजणे अटळ असते का ? याच्या प्रकाशित साहित्याला रिकामटेकड्या तेलवाल्याची पुस्तक विकायची खटपट म्हणायचे का ? अक्षरशः जाहीरपणे मुतण्याच्या लायकीचे आहे हे अग्रलेखातले वाक्य ... घोडा बेलगाम उधळल्याचेच लक्षण हे !! या प्रकाराने पुन्हा माझ्या दुष्टबुद्धीला विस्मृतीत गेलेला संदर्भ आठवला : एका अग्रलेखात महोदयांनी कुठल्याश्या संदर्भात लिहिताना काहीही कारण नसताना प्रवीण दवणेंच्या काव्यप्रतिभेविषयी अतिशय हिणकस भाष्य केले होते (आणि स्वतः मात्र वर दिलेली हे खटपट-झटपट असली यमके किंवा 'सडक्यातले किडके', 'हटाववादी हुच्चपणा', 'हकनाक हनमंताप्पा' असले पोरकट अनुप्रास वापरून अग्रेलखांची शीर्षके आणि मजकूर चटपटीत करणार !!!)....
अशात १६ मार्च आला... 'असंतांचे संत' हा प्रामुख्याने मदर तेरेसावर आणि सोबतच इतरही धार्मिक गुरूंवर घणाघात करणारा अग्रलेख ! वास्तविक मदर तेरेसाच्या ढोंगी समाजसेवेमागच्या धर्मांतराच्या प्रेरणा नि:संदिग्धपणे मांडणारा अग्रलेख... ज्या धाडसीपणा बद्दल कौतुक वाटायचे ती हिम्मत या लिखाणामागे नक्कीच आहे.... पण अरेच्या !!! काल १८ मार्चला मी हे काय बघितले !! महाराष्ट्राने काय बघितले ! जगाने काय बघितले !!! वाघाने 'म्याव' केले ? हिमालय मेवाड्मिक्स आईसक्रीम बनला ? वडवानल विडी पेटवायला वापरला ?? निडरतेचे दुसरे नाव असणारा संपादक आज दुसऱ्याला नावे ठेवण्याऐवजी 'लोकभावने'ने हळहळला ?
लक्षात घ्या, एरवी कोणताही पुचाटपंपू संपादक अग्रलेखात 'आम्ही सरकारचा निषेध करतो'वगैरे भाषा वापरतो आणि कधीतरी बातमीत नावे व फोटो छापण्यात चुका झाल्या तर संपादक 'आम्ही दिलगीर आहोत -संपादक' असे संपूर्ण वृत्तपत्राच्या वतीने माफीपत्र छापतो. पण कुबेरांच्या माफीनाम्यात्ला मजकूर ''मी' दिलगीर आहे' असा आहे. आवेशाच्या शिडाला भगदाड पडले आहे. हा 'बेहद्द घोडा' आज मालकानेच घोडा लावल्यामुळे 'नाममात्र' ठरला आहे आता यावर 'निर्भीडतेची नाहीशी नांगी' असा एक आवेशपूर्ण अग्रलेख लिहायला कुबेर आपले शब्दांचे धन वापरतील का ?
आता कुबेरांच्या धगधगत्या अंगाराचे कासवछाप अगरबत्तीत रुपांतर झाल्याची हळहळ-कम-आनंद बाजूला ठेवायचा तर जास्त गंभीर चित्र दिसते. इतके दिवस त्यांनी बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांच्या कासोट्याला यथेच्छ - काहीवेळा तो गरजेचाही होता - हात घातला. न्यायव्यवस्थेपासून ते संगीतकारांपर्यंत सगळ्यांची वस्त्रे फेडली, त्याबद्दल अर्थातच त्यांना निषेधाचे खलिते, शिव्याशाप वगैरे पोचले असणार .... पण ती 'जनभावना' असल्याने त्यांची कदर करायची महाशयांना गरज वाटली नसणार... असे असताना, जगद्वंद्य मदरच्या भक्तांच्या बापुड्या भावनांबद्दल अचानक एका दिवसात कुबेरांना गहिवर कसा आला ? त्या भक्तांची ताकद आणि ओळख कुठपर्यंत जात असेल ? पाशात्य चर्चेस आपल्या इथल्या अनेक मिडिया houses ना भरपूर फंडिंग करतात असे ऐकले होते तीच का ही 'प्रभू'भक्तीची ताकद ? गेल्या काही काळात इंडिअन एक्स्प्रेसची भूमिका अतिशय उद्विग्न करणारी झाली आहे (याकुबच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठ्या font मध्ये 'And they hanged Yakub' अशी संतापाचा स्फोट करवणारी हेडलाईन होती - जणूकाही जंगलराज असणाऱ्या रानटी व्यवस्थेने कट करून त्याला भर चौकात टांगले असा आभास निर्माण करणारी ...) 'लोकसत्ता' हे जवळपास स्वायत्त म्हणावे असे प्रकाशन वाटत असले तरी ते एक्स्प्रेस ग्रुपचाच भाग आहे. त्यामुळे कशावरून कुबेरांवर आलेला दबाव या एक्स्प्रेसच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेला नसेल ? आता हा अग्रलेखच मागे घेतला आहे (वेबसाईटवरून हटवण्यात आला आहे.) आता यापुढे त्यांची credibility काय राहील ? कुबेर कोणाचीही अक्कल काढायला गेले किंवा कुणालाही अग्रलेखातून धारधारपणे सुनावले तरी ते किती फुसके असेल ! "ओ ss ... पावर नाही पंचनामा करायची तर फालतू चौकशा कशाला करता" असे कोणीही मलुष्टे त्यांना जाता येता सुनावू शकतो ..
या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होतीये ती अघळपघळ या पुस्तकातल्या 'प्रा. विश्व. अश्व. शब्दे' या अतीव धमाल लेखाची. दुर्बोध पांडित्य आणि पोकळ विद्वत्तेला अफलातून टपल्या मारणारा हा लेक. गाढ व्यासंगाचा आव आणणारे समीक्षक-कम-प्राध्यापक 'विश्वनाथ अश्वत्थामा शब्दे' या स्युडो-सूर्याची आणि त्यांच्या आजूबाजूला लाळ घोटणाऱ्या विद्वानांची अर्थात स्युडो-ग्रहमंडळाची ही गोष्ट. सार्त्र, काफ्का, कामू वगैरे नावे तोंडी लावत
जडजंबाल चर्चा करणारे आणि या अभिजनांसमोर पांडित्य ताणणारे प्रा. शब्दे सर्वात शेवटी लीन दीन याचक होऊन टेबलावर तंगड्या ठेवून बसलेल्या प्रकाशकापुढे जाऊन त्याच्या तळपायावरची कुरुपे निरखत उभे राहतात !!!! शेवटी माणूस गुलाम पैशाचा ....
जाऊ दे... माझ्या मना बन दगड ! ज्यांच्या ज्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावायची आस होती त्यांचे त्यांचे मातीचे पाय दिसून यायचा काळ आलाय.... कुबेरांसारख्या अर्ध्यामुर्ध्याच्या नि:स्पृह्तेची काय कथा !
काल झंपीचा किस घेतल्याने
काल झंपीचा किस घेतल्याने तिच्या बापाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तो किस मागे घेत आहे.
आपला नम्र - झंप्या
फेसबुकवरून साभार.
लेख आवडला आणि बराचसा पटलाही.
लेख आवडला आणि बराचसा पटलाही. लेखात उल्लेख केलेली जवळ जवळ सगळेच अग्रलेख वाचले आहेत. सध्या बाकी कुठल्याही पेपरांपेक्षा लेकसत्तेतले अग्रलेख आवडतात कारण ते पक्षापाती वाटत नाहीत, सगळयांना सारखच ठोकलेलं असतं आणि बर्याच गोष्टींमधली बर्याचदा समोर न येणारी आर्थिक बाजू सोपेपणाने त्यांच्या अग्रलेखांमधून मांडली जाते. . फक्त हिंदूधर्माला झोडपणार्या 'सेक्युलर' लोकांवर कुबेरांनी बरेचदा टीका केलेली आहेत. त्यापुढे एक पाऊल टाकून ह्या 'संत' प्रकरणाबद्दल परखड मते मांडल्याबद्दल खरतर कुबेरांचं कौतूक वाटलं होतं!
बाकी छापिल अंक बाजारात आल्यानंतर 'मागे घेणं' ह्याला खरच काही अर्थ आहे का हा प्रश्न पडतो तसेच लोकभावनेनुसार अग्रलेख मागे घ्यायचे झाले तर कुबेरांना स्वत: लिहिलेले बरेच लेख मागे घ्यावे लागतील कारण ते ह्यापेक्षाही परखड होते आणि त्यांच्यावर टीका झाली होती!
काल झंपीचा किस घेतल्याने
काल झंपीचा किस घेतल्याने तिच्या बापाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तो किस मागे घेत आहे.
आपला नम्र - झंप्या>>>>≥>>>>>>>>>>>>>>
कोणाच्या भावना दुखावल्या ते स्पष्ट सांगून प्रकर्नातली मजा घालवल्याबद्दल झम्प्याचा निषेध. नक्की कोणाच्या भावना दुखावल्या, झम्पीच्या, तिच्या बापाच्या, आईच्या, भावाच्या कि शेजाऱ्याच्या यावर काथ्याकूट करत मी किमान 100 तरी पोस्टी टाकल्या असत्या.
आणि किस नेमका झंपीचाच घेतला
आणि किस नेमका झंपीचाच घेतला की अजून कुणाचा हा सुद्धा सस्पेन्स ठेवायला नको का?
हे राम, तसे फाटे फोडायचे तर
हे राम, तसे फाटे फोडायचे तर नक्की किसच घेतला कि अजून काही इथूनही सुरवात करता येईल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संपादकिय लिहिताना 'आम्ही' हे
संपादकिय लिहिताना 'आम्ही' हे सर्वनाम वापरले जाते, मग माफीनाम्यामधे 'मी' कसा काय? की या संपादकीयाची जबाबदारी वृत्तपत्राची नसुन 'गिरीश कुबेर' यांची आहे ?
{काल झंपीचा किस घेतल्याने
{काल झंपीचा किस घेतल्याने तिच्या बापाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तो किस मागे घेत आहे.
आपला नम्र - झंप्या }
हे वाक्य इथे मांडताना यांच्या (http://www.maayboli.com/user/31457) भावना दुखावल्या जाऊ शकतात हा विचार करणे गरजेचे होते.
@Kapoche >>> जनमत नेहमी
@Kapoche
>>> जनमत नेहमी बरोबर असतं>>> असे मी म्हटलेले नाही. जनमत नेहमीच बरोबर असते असे अजिबातच नाही. उलट ते बऱ्याचदा भावनेच्या आहारी जाउन बनलेले असते.
पण म्हणून याचा व्यत्यास (जनमत नेहमी चुकीचेच असते) कायमच योग्य असे मानणेही धोकादायक असते. आणि असे मानणे याचा अर्थ बऱ्याचदा 'मला इतरांपेक्षा जास्त कळते' ही भावना बळावली आहे असा होतो, जे कुबेरांच्या लिखाणात अनेकदा होत चाललेले आहे.
रेडीफचा लेख कुबेरांनी लिहीला होता का ? टीव्ही पॅनेलिस्ट्समधे तर माजी न्यायमूर्ती पण हेच म्हणत होते. त्या वाहिन्यांबद्दल काय म्हणाल ?>>> रेडीफच्या लेख बद्दल म्हणाल तर त्याबद्दलही हाच मुद्दा उपस्थित होत होता. गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यावर आपण क्षणभर पूर्ण विश्वास ठेवू. पण मग इतके महत्वाचे document इतके दिवस खटल्यात का आणले गेले नाही ? ज्यांना याकुबला न्याय मिळावा असे वाटत होते त्यातल्या कोणालाही ते इतके महत्वाचे का वाटले नाही ? माजी न्यायमूर्तींना तर हे सहज शक्य होते. एकतर हे लोक उशिरा शहाणे झालेले आहेत किंवा ते विरोधाला विरोध म्हणून बोलत आहेत
लोकसत्ताने अमूक तमूक यांच्या भावना दुखावल्याने हे जाहीर करावं >>> हे अगदी पट्लेच
लेखन आवडलं. बरीच मतं पटणारी
लेखन आवडलं. बरीच मतं पटणारी आहेत. पण, लोकसत्तातील अग्रलेख वाचनीय असतात.
-दिलीप बिरुटे
एकुणात या लिखाणात विविध
एकुणात या लिखाणात विविध अग्रलेखांची उदाहरणे आली असली तरी माझा मुख्य मुद्दा त्याच्याही पुढचा आहे : पेपरमध्ये संपादकाचे स्थान नक्की कुठल्या मर्यादेपर्यंत असते ? ही माफी हे एक निमित्त झाले. पण अशी माफी मागितली जात असेल तर विश्वासार्हतेचा बोजवारा उडतो. आणि मुख्य म्हणजे संपादक जर या गोष्टीला 'व्यावसायिक अपरिहार्यता' म्हणणार असतील तर मग ते ज्या ज्या राजकारणी, साहित्यिक वगैरेंच्या भूमिकांवर/गोष्टींवर वर टीका करतात त्यांचीही ती अपरिहार्यता असू शकत नाही का ? का त्यांचा तो स्वार्थ आणि आमची ती अपरिहार्यता ?
@दिलीप बिरुटे : नक्कीच वाच्नीय असतात. आत्तापर्यंत बरेच निष्पक्ष लिखाण आढळत आलेले आहे. त्यामुळे अजूनही हा पेपरच इतरांपेक्षा उजवा (विचारसरणी या अर्थाने नव्हे, स्वतंत्रतेच्या दृष्टीने) वाटतो. पण 'संपादकच स्वयम्भू' ही व्रुत्ती खटकते
झंप्या दामले रेडीफच्या
झंप्या दामले
रेडीफच्या लेखानंतर टीव्ही वरच्या चर्चांना उत आला त्यात अनेक माजी न्यायमूर्ती होते. त्यांनी आधी मतं मांडल्याने या फाशीच्या शिक्षेत सारं आलबेल नाही असं जनमत बनलं होतं. जर ते चुकीचं असेल तर या वाहीन्यांना दोष द्यायला हवा.
माझे मुद्दे तुमच्या लक्षात आले, समजले याबद्दल आभारी आहे. तुमचं फेसबुक्वरचं लिखाण नियमित वाचतो. त्यामुळे असहमत जरी असलात तरी किमान माझे म्हणणे समजून घ्याल ही अपेक्षा होतीच. धन्यवाद. रेडीफच्या लेखाबद्दल मतमतांतरे आहेत. पण त्याबद्दल काथ्याकूट करण्याचा आजचा विषय नाही. गिरीश कुबेर पहिले नव्हते असं मत मांडणारे हे सांगायचं होतं.
Pages