जयी आज संध्याकाळी वकील सायबांच्या दारात पोचली. त्यांची अजून काही कामं चालली होती आणि लोकं आहेत म्हणाल्यावर ती मागच्या दाराने वकिलीण बाईंकडे आली. ३५-३८ वर्षाची जया त्यांच्या शेतात कामाला यायची. कधी कधी त्यांच्या घरीही काही काम पडलं तर येऊन करून जायची. तिचा नवरा मुंबईला गवंड्याचं काम करायचा. दोन-चार महिन्यातून एकदा यायचा, चार पैसे देऊन जायचा.
तिला आज पाहून बाईंनी विचारलं, "काय गं नवरा येणार होता ना परवा तुझा?आज इकडं कशी काय? परत गेलेला दिसतोय?".
"नायी हाय इथंच अजून. सायेबाना इचारायचं हाय जरा.", घाबरूनच बोलत होती बिचारी.
"त्यांचं काम चालू आहे. येतील बस जरा. सांग काय झालं?", बाईंनी विचारलं.
"परवा 'ते' घरी येणार व्हतं. 'ते' कसलं, मुडदा बशिवला त्येचा", तिला राग अनावर झाला होता.
"तर मी कामावरून घरी आलो तर हा आलेला हुता. घरात आलो तर कोपऱ्यात एक बाई बसली व्हती."
"बाई?", जरा घाबरून बाईंनी विचारलं.
तर झालं असं होतं…
विकास आणि जयाचं लग्न होऊन १५-२० वर्षं झालेली. एक मुलगाही होता त्यांना, १५ वर्षाचा, अर्जुन नाव त्याचं. विकासराव शहरात असले की हे माय-लेक दोघंच घरात. त्यामुळे त्याला तशी आईच्या कष्टाची जाणीव होती. दर २-४ महिन्यात विकास दोन दिवस भेटायला येत असे. पोरालाही तेव्हढंच बापाचं तोंड पाहिल्यासारखं वाटायचं. यावेळी मात्र काहीतरी वेगळं घडलं.
शुक्रवारी रात्री विकासराव घरी आले, ते एका २०-२५ वर्षाच्या मुलीसोबतच. थोड्या वेळात कामावरून जयी घरी आली तर एकदम शंकेने त्या मुलीकडे बघायला लागली.
"ही कोन?", तिने बारीक डोळे करून विचारले.
"सांगतो जरा येळात, बस आत्त्ताच आलियास.', त्याने खोट्या रागाने तिला सांगितलं.
'आता याला कधीपासून माजी काळजी पडली', ती मनातल्या मनात विचार करत होती.
'कधी फोन बी येळेत करत नायी तर कधी पैका पाठवत नायी. आनी म्हनं बस. ', विचार करत ती मोरीत गेली.
जयीने हात, पाय धुतले आणि जेवण बनवायला लागली. तिला घोळ वाटत होता. तिने पटापटा चार भाकरी टाकल्या आणि कालवण केलं. सगळ्यांना जेवायला दिलं तरी तिला जेवण जाईना. ती बाई, बाई कुठली पोरगीच होती, गप्पच होती तीही आणि जरा घाबरलेली. जेवण झाल्यावर तिने पोराला बाहेर पाठवला आणि ती त्याच्याशी बोलायला बसली.
"माझ्या खोलीच्या शेजारी राहतो एक आन्ना. त्याची पोरगी हाय. गेल्या वरशी माह्येरी आली, नवरा गेला म्हून. तवापास्न बापाकड हाय. वस्ती बी चांगली न्हाय तिथ. म्हनला लगीन करा हिच्याशी. लई माग लागला हुता, सा महिनं झालं. म्हनलं आर माझी बायको, पोर सगळी हाय गावाकडं. असं काय जमनार नाय मला. तर म्हनला इथं एकलाच राहता खोलीवर, करंल तुमचं सगलं. पन पोरगी चांगली हुती. चार घरी काम करून पैसा मिळवते. बापाला बी बगते. ", विकास बोलायला लागला होता.
शहरात आन्नाची आणि विकासची मैत्री चांगलीच जमली होती. त्याची पोरगी परत आली तेंव्हा आन्ना काळजीत बोलायचा त्याच्याशी. त्याचीही नजर होतीच तिच्यावर. असंही एकट्याने किती वर्षं काढायची. गावाकडे जायचं तरी आता तिकडे मन रमायचं नाही. जयी होतीच, पण इतके वर्षं असं वेगळं राहिल्यावर प्रेम काय असणार ते. तिची त्याच्यावर किती भक्ती आहे ते त्याला माहित होतं आणि असंही दुसरं कोणी त्याचं असं कुणी नव्हतं. पण ही पोरगी पाहिल्यापासून त्याचं मन बदललं होतं. तिच्या बापाने जरा थोडा आग्रह केल्यावर त्यानेही 'हो' म्हणून सांगितलं.
शंका असणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्षात ते पाहणं यात खूप फरक असतो , नाही का. खरंच हा दुसऱ्या बाईला घरी येऊन आला म्हणाल्यावर जयी रागाने थरथरायला लागली.
"तुलाच कसा पकडला बापान तिच्या? दुसरी लोकं मेलीत का त्या शेरात इतक्या मोट्या? तरी म्हनलं याला काय आजकल पोराची बायकोची आठवन येन नाय ती. ", जयी बोलली.
तिला असं तावात पाहून त्याने तिला पाणी दिलं, तो म्हणाला, 'शांत हो !'.
तिकडे हिचा त्रागा बघून मुलगी अजूनच घाबरली होती.
"अगं ऐक तरी जरा. प्रगती नाव हाय तिचं. तिथं राह्यचं म्हंजे तरी काय सोप्पं हाय का? बाकी लोक चोरून करत्यात मी तिला घेऊन आलो.', तो हिमतीनं बोलला.
"मग मी काय करावं? काय सांगू नका मला. ही असली कामं करायला जाताय व्हय तिकडं. मरू दे तो पैका, गप हितं शेतात जावा माझ्याबर. ", तिने जरा दमाने सांगायचा प्रयत्न केला.
"अग पन हिचं काय? तिकडं मी नसतो तर बाकी हुतेच त्रास द्यायला तिला. मला काय माहीत नाय, मी तिच्या बापाला शब्द दिलाय.आन लैच तरास होत असंल तर मी जातोच निघून. बस मग एकलीच. " त्याने एकदम निर्णय सांगितला आणि बाहेर निघून गेला. बायको रागावणार हे तर त्याला माहितच होतं. पण शेवटी तो इतक्या वर्षाचा नवरा तिचा. करून करून काय करणार होती ती?
जयीला तिला काही सुचेना इतक्या वर्षाचा तिचा नवरा आणि ते पोरगं हेच काय ते तिचं जग. पैसा नसला तरी हे दोन लोक पुरेसे होते तिला. बाकी काही नसलं तरी चालणार होतं. त्याच्याशी भांडणार होती पण खरंच त्या पोरीबर निघून गेला तो तर? तिला या विचाराने काही सुचेना.
ती त्या पोरीकडे वळली. "काय गं, तुला दुसरा कोनी मिळाला नाही का? असं भोळ्या लोकांना फ़सवतिस व्हय?"
ती तरी काय बोलणार होती? ती स्वत:च घाबरलेली होती. एकतर तिकडे विधवा झाल्यावर सासरी त्रास व्हायला लागला म्हणून बापाकड गेली तरी त्रास काही कमी होत नव्हता . आयुष्य एकटं काढायचं का जीव द्यायचा या दोन विचारात अडकली होती. विकास ४०चा असला तरी बरा होता, निदान वस्तीतल्या बाकी लोकांपेक्षा बरा म्हणून तिने नाईलाजाने होकार दिला. एका छोट्या देवळात जाऊन त्याने दोन काळे मणी तिच्या गळ्यात घातले आणि खोलीवर घेऊन आला. चार महिने झाले तरी त्याची हिम्मत झाली नव्हती घरी जायची. पोरानं फोन केल्यावर मात्र त्याचा नाईलाज झाला. किती वर्षं असं लपवून ठेवायचं त्यापेक्षा 'जे होईल ते' म्हणून तो तिला घेऊन घरी आला होता.
ती म्हणाली,"ताई असं चिडू नका हो. मला काय बी सांगता येनार नाही. तरून विधवा होन्यापेक्षा मरन बरं, असं चाललं हुतं माझं. बापानं यांच्या मागं आग्रह केला . मी तरी किती नाय म्हननार. एकतर असं त्याच्या गळ्यात येउन पडलो परत, किती दिवस त्याला तरास देनार? विलासराव म्हनलं तवा मना करता यिना. तुमाला तरास द्यायचा नाय मला. "
जयीला काय करावं कळेना. ती भैनिकड जातो म्हणून निघून गेली. पावलं जड झाली होती. अर्धा तास चालून ती बहिणीकडे पोचली. तिच्याकडे जाऊन एकदम गळ्यातच पडली. अशी रात्रीची तिला आलेली पाहून बहीणही घाबरली होती. जयीने घरात घडलेलं सर्व घडाघडा सांगायला सुरुवात केली.
तिला बहिणीने शांत केले, समजावले,म्हणाली,'हे बघ उगाच लई घाई करू नकोस. शेवटी मानुसच तो, वाकडा जानारच. पन तू तुझा इचार कर. तू काय अशीच काडीमोड दिऊन रह्शील काय? पोराला शिकवायचं हाय, त्याचं लगीन करायचं, उद्या त्याला कोन पोरगी दील?तिकडं ती बाई काय करती याचं तुला काय? चार महिण्यात एकदा येतोय त्यो. पैसा पाठवून तरी दील ना? मरू दे तिला मग.'
बहिणीने असं सांगितल्यावर तिला वाटायला लागलं की आपणच इतका बाऊ करत आहोत का. रात्रभर ती तिथेच राहिली. सकाळी उठून घरी परतली. तिला जिवंत बघून विकासनं मोठा श्वास घेतला. 'निदान जीव तरी देत नाही म्हणजे येईल जागेवर' असा विचार करून त्याच्या जीवात जीव आला. नाहीतर, 'कुठल्या विहिरीत सापडते कि काय' अशी त्याला भीती वाटली होती. तिने घरी येऊन डोक्यावरून भराभरा पाणी ओतलं आणि कामाला निघून गेली. नवऱ्याचे केस उपटून काढावे तशा आवेशात तिने तण उपटून काढलं. दिवस संपला तशा तिच्या भावनाही उतरत चालल्या होत्या. बहिण म्हणते ते बरोबर आहे असं तिला वाटायला लागलं होतं. 'चार महिन्यातून एकदा तो येणार, बाकी तिकडे काय चालतंय त्याचं आपल्याला काय?', असा विचार करू लागली. 'लगेच काही चांगलं वागायची गरज नाही पण त्रागा करायला नको', असं तिने मनोमन ठरवलं. कामाचे पैसे घेऊन ती घरी आली आणि कालचे कपडे धुवायला लागली.
तेव्हढ्यात तिला विकास घरी परत येताना दिसला. मित्राशी बोलून घरी परत येत होता. त्याला असा निवांत बघून तिला खूप संताप झाला. सगळं आयुष्य तिच्यासमोर उभं राहिलं. पोराचा चेहरा आठवला. त्याच्या परस्पर गावात काढलेले एकटे दिवस आठवले. आणि तिचा संताप अनावर झाला. तो घरात आला तशी ती उठली, हातातलं धोपाटन घेऊन त्याला जोरजोरात मारायला सुरवात केली. त्याने आवरायचा प्रयत्न केला पण तिच्या अंगात आलं होतं. तिला आवरणं त्याला जमेना. तिचा मार वाढला तसा तो आरडायला लागला. ती पोरगीही आतून पळत आली.
"अगं का मारतीय? येडी-बिडी झालीस कि काय? मी तुझा नवरा हाय. जये जाग्येवर ये.", विकास ओरडत होता.
जयी बोलतच राहिली, "तुला लई पुळका आला व्हय तिचा. एव्हढंच वाटत होतं तर भैन म्हनून आणायचं हुतास. एकटी बाई दिसली की लगेच नजर वाकडी झालि काय तुजी? मी हीतं तुझ्या पोराला मोटा करतोय. मला काय त्येच काम हाय व्हय. लांब राह्यलो तरी कुनाला हात लावू दिला नाही. तू मातर लगीच तयार झालास सोडून जाया. बाईचा जनमच वाईट. सीतेसारखा एकट्याने काडला तरी शेवटी मातीतंच जायचं तिला."
विकासने मधेच जयीला एक फटका दिलाच. ती जरा कळवळली, पण थांबली नाही. तो जयीला जड जायला लागला आहे हे पाहून असं पाहून ती पोरगी तिच्या मदतीला धावली. आपल्यावर पडलेली प्रत्येक वाईट नजर तिला आठवली, सासरचे टोमणे आठवले आणि बापानं थोडक्यात आपल्याला असं सोडून दिलं 'दुसरी' म्हणून ते आठवलं. यानेही कधी नाही न म्हणता 'दुसरी' म्हणून घेऊन टाकलं. सगळ्या पुरुष जातीचा संताप कसा उफाळून आला. तिनेही एक दांडा उचलला आणि त्याला झोडायला सुरुवात केली. मार खाऊन तो पडून गेला तरी दोघींचं समाधान होत नव्हतं. पोरगा घरी आल्यावर त्याला रिक्षात घालून तिने नवऱ्याला उचलून 'पोलिसात घेऊन जा' म्हणाली.
त्याला म्हणाली, "हे बघ तूचाच आधार आता मला. 'आईवर, माझ्यावर हात उगारला त्यानं आन दुसरं लगीन बी करून आलाय. कम्प्लेन टाकायची हाय.' असं सांग पोलिसाला. मी आलोच वकील सायबाना घेऊन.
त्याला तिकडे धाडून ती वकीलसाहेबांकडे आली होती.
.....
बाईंनी तिला विचारलं,"अगं बाई. काय करतेयस हे असं. जिवंत आहे न तो? नीट विचार केलायस ना काय करायचं आहे ते? नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. "
जयी बाईंना म्हणाली," व्हय हाय जिवंत हाय. त्यो कुटला मरतोय. बाई, तुमास्नी सांगतो, लई संताप झाला तेच्यावर. इचार बी केला करू द्यावं त्याला पायजे ते. पन परत म्हनलं, त्याला मारून जन्मठेप झाली तरी चालल पन ही असली उमरकैद नको."
तिचा निर्णय पक्का झाला होता !!
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
वा.. छान! वाचता वाचता x x x
वा.. छान! वाचता वाचता x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x x नको'.
(संपादित)
चम्बू, धन्यवाद. Do you mind
चम्बू, धन्यवाद. Do you mind editing your comment, just in case if you feel it would be a spoiler alert. Since I know the story, I cant say if it is. Thank you.
Vidya.
जबरदस्त ! अफाट लिहीलं आहे.
जबरदस्त !
अफाट लिहीलं आहे.
प्रतीक्रिया संपादित केली आहे.
प्रतीक्रिया संपादित केली आहे.
चांगली जमल्ये कथा!
चांगली जमल्ये कथा!
वाह जबरदस्त!
वाह जबरदस्त!
कथा चांगली आहे पण.........
कथा चांगली आहे पण......... जन्मठेप आणि उमरकैद या दोघांचा अर्थ एकच होतो ना ?
रायगड +१
रायगड +१
कथा चांगली आहे पण.........
कथा चांगली आहे पण......... जन्मठेप आणि उमरकैद या दोघांचा अर्थ एकच होतो ना ? >>>>>>>>>
जन्मठेप हि कायद्याची दृष्टीने आणि उमरकैद संसाराच्या दृष्टीने ... मस्त कथा आवडली
छान आहे कथा. नवर्याला
छान आहे कथा.
नवर्याला बदडायला मदत केलेल्या सवतीबद्दल तिने काय निर्णय घेतला ते पण यायला हवं होतं.
जन्मठेप हि कायद्याची दृष्टीने
जन्मठेप हि कायद्याची दृष्टीने आणि उमरकैद संसाराच्या दृष्टीने ...>>>+1
धन्यवाद सर्वाना.
विद्या.
नवर्याला बदडायला मदत केलेल्या
नवर्याला बदडायला मदत केलेल्या सवतीबद्दल तिने काय निर्णय घेतला ते पण यायला हवं होतं.>>>>>
+1
कथा चांगली आहे.
कथा चांगली आहे.
जव्हेरगंज, मलाही एच्छा झाली
जव्हेरगंज, मलाही एच्छा झाली होती त्याच्यापुढे लिहायची, पण टाळले कारण त्यात मला थोडी घाई होतेय असे वाटले. "तिने नवर्याला बदडायला मदत केली' हे त्या दोघिन्च्या एकत्र येन्याचे प्रतिक म्हणून दिले आहे.
विद्या.
चांगली आहे कथा. स्त्री जन्मा
चांगली आहे कथा. स्त्री जन्मा तुझी कहाणी वगैरे वगिरे.... बदल रहा है म्रेआ देश पर...
धन्यवाद अनघा. विद्या.
धन्यवाद अनघा.
विद्या.
मस्त, आवडली कथालिखाण येऊद्या
मस्त, आवडली
कथालिखाण येऊद्या आणखी
मस्त, आवडली
मस्त, आवडली