http://www.maayboli.com/node/57854 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध १
http://www.maayboli.com/node/57861 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - पूर्वार्ध २
http://www.maayboli.com/node/57936 - जम्मू ते पुणे सायकल मोहीम - जम्मूत आगमन
=========================================================================
रात्री झोपतानाही चांगलाच गारठा होता आणि रजई, हिटर वगैरे लाऊनही जाणवत होता. आणि पहाटेच्या सुमारास तर कहर वाढला. इतका की झोप येईना, गुरफटून, पाय पोटाशी घेऊन उब आणण्याचा प्रयत्न केला पण छे थंडी बेणी लईच होती.
मग शेवटी उठून जॅकेट चढवले आणि झोपायचा प्रयत्न केला. डीप फ्रिजरमध्ये झोपल्याचे फिलींग येत होते.
सकाळी उठल्यावर हाच विषय. सगळ्यांची थंडीने वाट लागलेली आणि त्याचे कारण नंतर कळले. त्या रात्री जम्मूत ७१ वर्षानी रेकॉर्डब्रेक थंडी पडली होती. साधारणपणे २.२ डिग्री असणारे तापमान त्या दिवशी-रात्री गोठणबिंदुच्या फक्त अर्धा डिग्रीवर होते. खरे तर मला आश्चर्य वाटले, मला वाटले की इथे शून्याच्या खाली तापमान जाणे सामान्य असेल. पण नंतर कळले जम्मु खोऱ्यात बर्फ पडत असले तरी शहरात सहसा शून्याच्या खाली जात नाही.
नशिब आम्हाला आज राईड करायची नव्हती नाहीतर या धुक्यात, गारठ्यात धुव्वा झाला असता. पण आज सायकली जोडायच्या होत्या आणि त्या जोडताना ग्लोव्जचा उपयोग नव्हता.
काका आणि अद्वैतनी कालच सायकली आणून हॉटेलमालकाशी बोलून त्याच्या गोडाऊनवजा दुकानात ठेवल्या होत्या. सकाळी सकाळी कामाला हात घालण्यापूर्वी गरमागरम चहा घशाखाली घातला.
तिथेच तो स्टोव्हवर काहीतरी गरम करून देत होता. आता नविन गोष्ट दिसली की ती मागवायची हा आमचा अलिखीत नियम असल्यामुळे ते मागवलेच. चक्क पॅटीस होते. आणि गरम करायला काही नसल्यामुळे तो असा डायरेक्ट मेथडनी त्याला खाणेबल बनवत होता. चवीला सुमार दर्जाचेच होते पण काहीतरी पोटात गरम गेले याचाच आनंद.
चैतन्यकांडीविना धुराचे लोट
हॉटेलबाहेरील एक गल्ली, खरेतर हा मुख्य रस्ता होता आणि हॉटेल गल्लीत होते.
सायकली यावेळी आम्ही प्रोफेशनल्सकडूनच पॅक करून घेतल्या होत्या त्यामुळे त्याने अगदी व्यवस्थित बबल रॅप, पुठ्ठावगैरे लाऊन निगुतीने पॅक केल्या होत्या. गेल्यावेळी कन्याकुमारीवरून येताना कार्गोत माझ्या सायकलच्या डिल्युलरची वाट लागली होती. त्यामुळे यावेळी तसे काही होऊ नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. सुदैवाने सगळ्याच सायकली एकदम हातीपायी धड होत्या.
एकापाठोपाठ एक सायकली अनपॅक करून शिस्तीत सगळे काम चालले होते, आणि जम्मुतल्या त्या बोळात असे काहीतरी बघायला गर्दी होणार नाही हे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही काय करतोय बघायला ही गर्दी. त्यातूनच हातगाडी, स्कूटर पासून दुनियाभरच्या लोकांची वाहतूकही चाललेली. त्यामुळे मी जर फोटो काढत राहीलो असतो तर चिक्कार शिव्या खाल्या असत्या. असाही फोन बंद असल्याने मी तो बॅगेतच ठेऊन दिला होता. आणि एसएलआर अजून काढलाच नव्हता. त्यामुळे एक भारी गम्मत मिसली.
सगळे बॉक्सेस काढून मी बाजूला रचत असताना एक भंगारवाला सदृश माणूस आला आणि त्याची मागणी करायला लागला. मी लगेच व्यवहारी हिशेब करून त्याला थेट पैसेच मागितले. पण तो इतका फाटका होता की त्याच्याकडे काही निघेल याची शक्यताच नव्हती. त्यातून बाजूच्या दुकानदारांनी त्याची बाजू घेऊन बोलायला सुरुवात केली.
त्या बॉक्सेससाठी सगळ्यांनी पार जीवाचे रान केले होते, ते असेच फुकट द्यायला मनाची तयारी होत नव्हती. अगदी त्यातून काय फार पैसे येणार होते असे नाही पण निदान एकवेळचा नाष्टा सुटला असता. पण तिथल्या लोकांनी तो फारच प्रेस्टीजचा प्रश्न केला. जरा रागच आला त्या उपटसुंभाचा पण काय करणार, त्यामुळे घेऊन जा म्हणले, पण सगळे काम झाल्यावर.
हो ना कारण सायकलीचे सगळे पार्ट इस्तता विखुरले होते, त्या बॉक्सच्या नादात तेपण घेऊन गेला असता तर कळलेही नसते आणि आमची बेक्कार पंचाईत झाली अ्सती.
तर आमचे काम संपेपर्यंत तो बाजूला बसून राहीला. आणि आता सगळ्या सायकली जोडून झाल्या, सगळे सुट्टे पार्ट, स्क्रुड्रायव्हर, बारके स्क्रु सगळे एका पिशवीत भरून नीट बाजूला ठेवले आणि आता बॉक्स घेऊन जा म्हणले.
"आता हू " म्हणत तो बहुदा गाडी किंवा काहीतरी आणायला गेला. आम्ही दरम्यान जोडलेल्या सायकली छोटी राईड मारून चेक करत होतो आणि किरकोळ दुरुस्त्या करण्यात मग्न होतो. तर एक अशीच भंगारवाली बाई आली आणि भराभरा ते बॉक्स उचलून जायला लागली.
तिला थांबवून सांगायला लागलो की हे त्या म्हाताऱ्यासाठी ठेवलेत. तर बाई काही ऐकेचना. तोपर्यंत तो हिरा उगवला. आता वाटले की दोघांची चांगलीच खडाजंगी होणार. पण ती बाई इतकी ढालगज होती की तिने पद्धतशीर त्याला हाकलून लावले आणि सातही बॉक्सेस उचलून जायला लागली. ते बॉक्सेस इतके मोठे होते की तीला धड ते उचलून नेता पण येईना पण इतके घबाड सोडायची तयारी नव्हती.
आता मला राहवेना, मी त्या माणसाला म्हणले, "आपके लिये रख्खे थे. आधा आधा बाट लो."
माझ्या प्रोत्साहनाने त्या माणसाला जोश आला. भरीला बाजूच्या दुकानदारांनीपण त्याला चिथवले. त्यामुळे जाऊन त्याने बॉक्स ओढले मात्र, त्या बाईने रणरागिणीचा अवतार घेतला. इतक्या त्वेषाने ती चालून आली आणि त्या म्हाताऱ्याला फटके दिले की मीच घाबरून मागे सरकलो. म्हणलं अजून पुढे गेलो तर ही बाई आपल्याही पाठीत धबका घालायला कमी करणार नाही च्यायला. बॉक्स फुकटच्या फुक़ट देऊन मार काय खायचा.
दुकानदार मात्र फुल एन्जॉय करत होते. मला वाईट वाटले त्या म्हाताऱ्याचे. किती लवकर आपले दृष्टीकोन बदलतात बघा. अर्ध्या तासापूर्वी तो म्हातारा आमचे बॉक्स फुकटचे उपटणार याचा राग येत होता. ते बॉक्स कुणीही नेले तरी आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. पण त्यासाठी तो अर्धा तास का होईना बसून राहीला होता. आणि आता हातातोंडाशी आलेला घास कुणी उपटसुंभ घेऊन चालली होती. आणि तत्क्षणी सगळी सहानभूती त्याच्याकडे वळली.
ती बाई इतकी जहांबाज होती की तिने भराभरा तो बॉक्सेस बांधले आणि अजून दोरी आणायला ती तिथेच सोडून गेली. पण तिची दहशतच एवढी होती की दुकानदारांनी कितीही उकसावले तरी त्या म्हाताऱ्याने तिच्या अनुपस्थितीतही त्या बॉक्सेसला हात लावला नाही आणि उरले सुरले फाटके कागद, प्लॅस्टिक गोळा करून गेला.
सायकली सगळ्या आता सज्ज झाल्या होत्या आणि जेवण झाल्यावर एक १०-१५ किमी राईड करायचे ठरले. अर्थात जेवायला अजून बराच अवकाश होता तर बाजूचेच प्रसिद्ध रघुनाथ मंदिर बघायचे ठरले.
फोटो आंतरजालावरून साभार
रघुनाथ मंदिराविषयी - रघुनाथ मंदिर हे जम्मुतल्या अतिशय गजबजलेल्या चौकात आहे. मंदिराचे प्रवेशद्वार फार भव्य वगैरे नाही त्यामुळे आत इतके मोठे मंदिर आहे याची बिलकुल कल्पना येत नाही. तसेही बाकी देवस्थानांसारखे दुकाने, देवांचे फोटो वगैरे विकणाऱ्यांचा वेढा पडलेला नाही त्यामुळे थेट मंदिराच्या दारातच आपण जाऊन ठेपतो.
या मंदिरावर २००२ मध्ये फियादिन अतिरेकी संघटनेनी दोन हल्ले केले. मार्चमध्ये आत्मघातकी पथकाने केलेल्या हल्ल्यात १० भाविक ठार झाले तर २० जखमी झाले. नोहेंबरमधला अजून मोठा होता आणि त्यात १४ लोक ठार तर ४५ जखमी झाले होते. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोएबाचा हफिज सईद असल्याचा आरोप केला होता.
एरवीही या मंदिराला कडेकोट लष्करी सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि हल्ल्यांनतर तर त्यात वाढ करण्यात आली. मंदिरासमोरच्या चौकात तर एक ठाणेच असल्यासारखे आहे. मंदिराचे फोटो काढायला परवानगी नाही. आत तर नाहीच बाहेरही नाही. मी आपला समोरच्या फुलवाल्याचा फोटो काढायला कॅमेरा काढला तर एकदम तीन चार लष्करी जवान अंगावर आले आणि कॅमेरा आत ठेवायला लावला.
उत्तर भारतातील सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथ मंदिराचे आवार अतिशय प्रशस्त आहे आणि त्यात अष्टकोनाकृती आकारात सात मंदिरांचा समूह आहे. त्यात विष्णु आणि रामासोबत शंकर, हनुमान, गणपती आणि देवी वगैरे इतर देवगणही सुखाने नांदत आहेत. या सगळ्या मंदिरांची फेरी आटपायला पाऊण एक तास लागतो.
मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ज्या राजा रणबिरसिंह यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांनी अरबी आणि फारसी भाषेतील तत्वज्ञानावरचे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरीत करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
(संदर्भ विकिपिडीया)
मंदिरात अर्थातच मोबाईल घेऊन जायला प्रवेश नाही, त्यामुळे मीच पुढाकार घेऊन मी बाहेर थांबतो तुम्ही जाऊन या असे सांगितले. आणि सगळ्यांचे मोबाईल सांभाळत बाहेर फिरत राहीलो. जवानांना संशय वाटू नये म्हणून मग मी शेजारच्याच दुकानात चहा मिळत असेल अशा आशेेने घुसलो.
ते दुकान होते पराठ्यांचे पण चहा नव्हता. पण रामप्रहरी आलेले गिऱ्हाईक जाऊ देईल तर तो दुकानदार कसला. त्याने आप बैठो, चाय हम मंगाते है करत त्याच्या एका नोकराला पिटाळले. तेही पैसे देऊन वगैरे. आणि चहावाल्याचे दुकान होते पार गल्लीच्या त्या टोकाला. मलाच थोडे ओशाळल्यासारखे झाले. पुण्यात त्याने थेट दुकान दाखवून पिटाळले असते.
मग त्याने आणलेला गरमागरम चहा फुंकर मारत विचार करत बसलो. काय म्हणले यांचे जीवन असेल. आपल्याला चिंता असते आज पाणी येईल का, काम नीट होईल का, बॉस काय म्हणेल.
आणि इथे आज टेररीस्ट तर नाही ना येणार, कुठे बॉंम्ब तर नाही ना फुटणार, शाळेला गेलेली मुले सुखरुप येतील ना. कदाचित जम्मु शहरात इतकी तणावाची परिस्थिती नसेल पण सबंध काश्मिर खोरेच या दहशतीच्या छायेखाली आहे. काय कशी रहात असतील इथले लोक.
दुकानदाराशी त्या विषयावर बोलावे वाटले पण शहरी भिडस्तपणा आड आला आणि आम्ही हवापाण्याच्याच गप्पा मारत राहीलो. थंडी, धुके आणि आमचा उद्याचा रस्ता यावर बरीच माहीती त्याने दिली. तोपर्यंत मंडळी आलीच आणि दुकानदाराचा हेतू सफल झाला. सगळ्यांनी दणदणीत ताव मारला पराठ्यांवर.
भक्कम नाष्टा झाला होता, सायकलचे कामही झाले होते त्यामुळे आम्ही सर्वात आवडीच्या उद्योगाला लागलो. ते म्हणजे रजया पांघरून ढाराढूर. दरम्यान काका त्यांचा मोबाईल कुठे दुरुस्त होईल का या शोधात फिरत राहीले आणि त्याच वेळेस सुह्दचे आगमन झाले.
त्याचे विमान दुसऱ्या दिवशीचे होते, त्यामुळे तो २४ ला निघाला खरा पण मध्ये दिल्लीला एक रात्र काढून दुसरे दिवशी जम्मूला पोहचला. आणि अपेक्षेप्रमाणेच हॉटेलला येताना चुकला. त्या गल्लीत दोन चार चकरा मारूनही त्याला सापडेना म्हणल्यावर वेदांग त्याला आणायला गेला.
दुपारचे जेवणही रुमवर उरकले आणि संध्याकाळी पुन्हा फेरफटका मारायला बाहेर पडलो. तोपर्यंत मी सगळ्यांकडून रघुनाथ मंदिराची ख्याती ऐकली होती, त्यामुळे जाऊन यावे असा विचार केला. मी एकटाच राहीलो होतो त्यामुळे येऊ पटकन अशा हिशेबात गेलो खरा पण बराच वेळ गेला. सगळ्यांनी बजावले होते की प्रत्येक मंदिरात पुजारी आहेत आणि ते काहीतरी करुन अभिषेक करा, तिलक करा असे करत पैसे उकळतात त्यामुळे पाकीट न घेताच गेलो. सुदैवाने माझ्यासोबत एक नुकतेच लग्न झालेले जोडपे होते त्यामुळे सगळ्या पुजाऱ्यांचे लक्ष त्यांना लुबाडण्यात होते, आणि मी शांततेने दर्शन करू शकलो.
पण एकदा निघता निघता मात्र मार खाता खाता वाचलो. झाले असे की एकतर संध्याकाळ झाली होती आणि कडाक्याची थंडी, जरी पायात सॉक्स असले तरी फरशी बर्फासारखी गार झाली होती आणि पटापटा फेरी उरकून मी जाण्याच्या विचारात होतो. त्यात एका ठिकाणी असे उंचवट्यासारखे काहीतरी लागले. सिमेंटवर असे चेंडूच्या आकाराचे उंचवटे. आणि ते असे बरेच लांबवर गेल्याचे दिसत होते. कुठे इतके चाला म्हणून मी आपला तो उंचवटा ओलांडला आणि दोघेजण आले ना धावत. इतके संतापले होते ते. मला बापड्याला काही कळेच ना काय भानगड झाली ते.
ते तावातावाने काहीतरी सांगत होते आणि मला त्यांचे क्रुद्ध चेहरे आणि आवाज याची काही टोटलच लागत नव्हती. शेवटी अजूनएक जण आला आणि त्याने सांगितले की मी आत्ता देवांच्या डोक्यावर पाय देऊन आलो.
आईशप्पथ, म्हणलं "किधर है भगवान?". तर त्या सिमेंटच्या उंचवट्यांकडे हात दाखवत म्हणे,
"यही है वो ३३ कोटी भगवान..."
तुमच्या आयला, म्हणलं काकानी असे सिमेंटवर गोळे काढून ३३ कोटी देव दाखवले होते. बर नुसतेच उंचवटे, त्याला शेंदूर तरी फासायचा. मी आपला त्यांना कसाबसा निर्मळ हेतू दाखवला, त्यांच्या समाधानासाठी वाकून नमस्कार केला आणि सुंबाल्या केला. हो ना बाहेर सशस्त्र लोक होते, कोण रिस्क घेणार.
हॉटेलवर आल्यावर मात्र तोंडाचा पट्टा सु़टला. घाटपांडे काकांना तर माझी कथा ऐकून हसावे का रडावे कळेना. याला कुठे न्यायची सोय नाही असे मनातल्या मनात म्हणाले असणार.
असो, रात्रीच्या जेवणाचा एक वेगळा प्लॅन माझ्या डोक्यात होता. मी येताना जम्मुतील खादाडी स्पेशल वाचून आलो होतो आणि एका ठिकाणी खास काश्मिरी जेवण मिळते असे कळले होते. मी सगळ्यांना पटवले आणि ते नेमके कुठे आहे याची विचारणा हॉटेलवाल्याला केली तर त्याने पार आडवाच केला.
म्हणे आप हिंदु हो या मुसलमान...
"अर्थातच हिंदु"
तर म्हणे ये जगह आप के लिये ठीक नहीं, ये सब गोश्त की दुकाने है....
धत्त तेरी, काश्मिरी जेवणाची खासियत वाचताना ते व्हेज का नॉन व्हेज हेच बघायला विसरलो होतो. मग मुकाट्याने भारताचे राष्ट्रीय खाद्य अर्थातच पंजाबी जेवण जेवायला गेलो. तिथे सकाळच्या दुकानदाराच्या वृत्तीचा लवलेशही नव्हता.
जेवताना कांदालिंबु मागितले तर सरळ नही मिलेगा म्हणाला वेटर...
"क्यो भाई, क्यो नही मिलेगा"
"मॅनेजर ने मना किया है"
"किधर है मॅनेजर, हमे बात करनी है"
"वो नही है अभी, बाहर गये हुऐ है"
"फिर कैसे मना किया"
"वो जाने से पेहले बोल के गये की मना है"
"अच्छा उनको पता था हम आनेवाले है? .
यावर तो हरलाच आणि गायब झाला पण कांदालिंबु काय दिला नाही.
सेलिब्रिटी डिश
तिच गोष्ट केकवाल्याची. लान्स अर्थात अद्वैतच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यासाठी केक आणायला गेलो. त्याची ही आमच्याबरोबर साजरी केलली दुसरी अॅनिवरसरी. गेल्यावेळी आम्ही कन्याकुमारी राईडच्या प्रॅक्टिससाठी कराडला होतो. आणि आता जम्मूला. म्हणलं पुढच्या वेळी आमच्या सोबत असलास तर घरी गेल्यानंतर सामान आमच्याघरी पाठवून दिल्याचे कळेल तुला.
व्हेज केक आहे का प्रश्नावर त्या केकवाल्याने इतके खऊट उत्तर दिले की समस्त पुणेकर दुकानदारांनी त्यांच्याकडे शिकवणी घेतली असती. केकमध्ये अंडे असलेला केक पण व्हेज असतो, किंवा काही लोक त्याला व्हेज म्हणातात असे वेदांगनी बोलायचा अवकाश, तो इतका बोलला की बाबा रे केक नको पण बोलणे आवर असे म्हणायची पाळी आणली त्याने.
यावर आम्ही पुणेरी दुकानदाराच्या धर्तीवर जमुरी दुकानदार असे नामकरण करत समाधान केले.
काल रात्रीच्या थंडीने सगळ्यांनाच तडाखा दिला होता त्यामुळे जायच्या आधी लोकरी कपड्यांची खरेदी झाली. तिथल्या मिलीटरी दुकानात इतके स्वस्त हातमोजे आणि कानटोपी मिळाली की सायकलवर लादून आणायचे नसते तर अजून बरेच काहीकाही खरेदी करायचा प्लॅन होता. ती कानटोपी आणि मोजे जवळपास महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही वापरत होतो.
जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सायकली चेक केल्या आणि रात्रीच्या थंडीचा पुरेपुर इंतेजाम करून अंग टाकले. उद्या बिग डे होता आणि त्याची स्वप्ने बघतच झोपी गेलो.
=====================================================================================
http://www.maayboli.com/node/58148 - (भाग ५): पठाणकोट - निवांत सुरुवात
जे आमच्या सायकल प्रवासाविषयी
जे आमच्या सायकल प्रवासाविषयी वाचण्याच्या उत्सुकतेने येत असतील त्यांची नमनाला इतके घडाभर तेल घातल्यामुळे निराशा होत असेल याची कल्पना आहे, पण झालेच आता..उद्यापासून नक्कीच राईड सुरु. हे राईडच्या आधीचे स्निपेट्स पण मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून हा प्रपंच...
कळावे, लोभ असावा
मस्त पूर्वपीठिका आहे ही.
मस्त पूर्वपीठिका आहे ही. मुळीच कंटाळा आला नाही. आता सायकल सफरिवर जाण्यास उत्सूक
वा मस्त आहे भाग ! लिहित रहा.
वा मस्त आहे भाग !
लिहित रहा.
जोरदार!! मस्त वर्णन!!
जोरदार!! मस्त वर्णन!! पु.भा.प्र.
जोरदार!! मस्त वर्णन!!
जोरदार!! मस्त वर्णन!! पु.भा.प्र.
मजा येत आहे सविस्तर वाचायला.
मजा येत आहे सविस्तर वाचायला. माहोल बनत चालला आहे हळूहळू.
येऊ दे.
मस्त !! अजिबात कंटाळा नाही
मस्त !!
अजिबात कंटाळा नाही आला
मजा येत्ये हे वाचायला पण
मजा येत्ये हे वाचायला पण
काय घड़ाभर वगैरे नाही हो भाऊ!
काय घड़ाभर वगैरे नाही हो भाऊ! तेवढे लवकर लवकर पोस्ट करा भाग! चक्का होतो जीवाचा
मस्त चाललंय! हॉटेल्समध्ये
मस्त चाललंय! हॉटेल्समध्ये रूमवर हीटर्स नसतात का असा एक भाप्र पडला.
जमुरी दुकानदार ,व्हेज केलं
जमुरी दुकानदार ,व्हेज केलं >>>>
मस्त लिहिताय , खुसखुशीत एकदम . आणि त्या घडाभर तेलाची काळजी नका करू. त्या तेलाच्या फोडणीमुळे लिखाण चविष्ट होतेय. पुभाप्र
मस्त लिहिता तुम्ही!
मस्त लिहिता तुम्ही!
भारी रे... तू तर काय धमाल
भारी रे... तू तर काय धमाल उडवून दिलीस..
भारी वर्णन केले आहेस.. पुढील
भारी वर्णन केले आहेस..
पुढील भागांच्या प्रतिक्षेत..!!
नै रे, हे सर्व वर्णन हवेच
नै रे, हे सर्व वर्णन हवेच हवे......
आम्ही वाचतोय... समजुन घेतोय... कुणी सांगाव? उद्या कदाचित आम्ही पण जम्मूत त्याच गल्लित फिरत असू ! 

तेव्हा तू बिनधास जसे मनात उमटते आहे तसे लिहुन काढ.
वाचकांना त्यांना काय आवडते, तेच तेव्हडे द्यायला तू काय "लिखाणाचा धंदा उघडुन बसलेला" नाहीयेस.....
तू जे तुझ्या स्वानुभवाचे लिहितोहेस, ते हवे तर "वाचकांनी" वाचावे/ आवडुन घ्यावे/ नावडुन घ्यावे / काहीही ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणे करावे...... पण तुझ्या निखळ लिखाणाला "अमक्या तमक्या" (पगारे स्टाईलने म्हणायचे तर अभिजात्/गावरान्/बहुसंख्य" वगैरेंना) वाचकांना काय आवडेल याचा विचार करत तुच वेगळ्या झालरी लावायची गरज नाही.
याच दिवशीची आशुची आणखी एक मजा
याच दिवशीची आशुची आणखी एक मजा जी त्याने लिहीलेली नाही. त्या रात्रीही चांगलीच थंडी होती. दुसऱ्या दिवशी निघतांना घालायचे कपडे, ग्लोव्हज वगैरे गार पडणार म्हणून याने कॅरीबॅगमधे भरुन ती रजईत पायाकडे ठेवून दिली. सकाळी गरमगरम घालायला मिळतील म्हणून.. मला लगेच झोप लागली म्हणून बरं नाहीतर सुरसुर आवाजाने जागरण लांबलं असतं...
राईड कधी एकदाची सुरु होतेय असं या दिवशी वाटत होतं तसंच आताही वाटतंय. एकदाची सुरु होऊदे राईड.. टाक लगेच पुढचा भाग. वाट पहातोय..
धन्यवाद सर्वांना... कुणालाच
धन्यवाद सर्वांना...
कुणालाच घडाभर तेल जास्त वाटले नाही हे पाहून फार बरे वाटले, नै तर मला वाटले आता माझ्या पाल्हाळानी लोक कंटाळणार. आता लिहीतो पुढचे भाग पटापटा.
हॉटेल्समध्ये रूमवर हीटर्स नसतात का असा एक भाप्र पडला
>>>>
होते ना, हीटर्स होते तर ही अवस्था होती. नसते तर कल्पनाच करवत नाही.
त्या तेलाच्या फोडणीमुळे लिखाण चविष्ट होतेय. >>>>>
धन्यवाद
तू जे तुझ्या स्वानुभवाचे लिहितोहेस, ते हवे तर "वाचकांनी" वाचावे/ आवडुन घ्यावे/ नावडुन घ्यावे / काहीही ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणे करावे...... पण तुझ्या निखळ लिखाणाला "अमक्या तमक्या" (पगारे स्टाईलने म्हणायचे तर अभिजात्/गावरान्/बहुसंख्य" वगैरेंना) वाचकांना काय आवडेल याचा विचार करत तुच वेगळ्या झालरी लावायची गरज नाही. >>>>
अगदी मनापासून पटले लिंबुदा...खूप धन्यवाद. पण पगारेंना आणलेत इथे, अजून यशस्वी कलाकार येऊन आपला कट्टा होऊ नये अशीच इच्छा...
दुसऱ्या दिवशी निघतांना घालायचे कपडे, ग्लोव्हज वगैरे गार पडणार म्हणून याने कॅरीबॅगमधे भरुन ती रजईत पायाकडे ठेवून दिली. सकाळी गरमगरम घालायला मिळतील म्हणून >>>>>
हाहाहा, अरे हो हे विसरलोच. बरे झाले लिहीलेस ते...अशाच गाळलेल्या जागा भरून काढ बाबा, मी एका फ्लो मध्ये लिहीत जातोय, काही गोष्टी मिस होतात.
रच्याकने ही कपडे पिशवीत भरून ठेवायची युक्ती माझी जुनी आहे. लेह-लडाख, हिमाचल, धरमशाला वगैरे सगळीकडे फिरताना अनुभवातून शिकलेलो.
मस्तच, इंटरेस्टिंग.
मस्तच, इंटरेस्टिंग.
आशु... मस्त लिहितोयस.. राईडस्
आशु... मस्त लिहितोयस.. राईडस् ची धमाल वाचायची उत्सुकता लागल्येय. पु, भा.शु.
भंगारवाला, पराठेवाला,
भंगारवाला, पराठेवाला, मंदिरवाला... वा वा मस्त चाललयं... मजा येतेय वाचायला... लिखते रहो... चलाते रहो...
मस्तच! अजिबात कंटाळा येणार
मस्तच! अजिबात कंटाळा येणार नाहीये हे सगळं वाचताना ..पुढचा भाग येवु देत
अशु एकदम भारी ... तू तर काय
अशु एकदम भारी ... तू तर काय धमाल उडवून दिलीस..
वाचताना हा लेख कधिच सम्पु नये असं वाटतं
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत...
जमुरी दुकानदार एक से एक धमाल
जमुरी दुकानदार
एक से एक धमाल किस्से
पटापट येऊ देत रे, खूप वाट
पटापट येऊ देत रे, खूप वाट पाहायला लावता तुम्ही लोक्स!
एखादा भाग त्या हेम ला लिहायला सांग.
धन्यवाद सर्वांना... एखादा भाग
धन्यवाद सर्वांना...
एखादा भाग त्या हेम ला लिहायला सांग. >>>
अरे नाही ना लिहीत तो...मी म्हणले होते की आख्खी मालिकाच तु लिही यावेळी...पण काय तो पुढाकार घेईना म्हणल्यावर मी लिहायला घेतली.
आज वाचला. मस्त झालाय. येऊ
आज वाचला. मस्त झालाय. येऊ दे.. नमनाला अजून चार पाच घडे झाले तरी चालेल... आखीर जम्मू-पुणे राईड की कहानी है भाई!
पुढचा भाग कधी
पुढचा भाग कधी
लवकरच
लवकरच
मस्त लिहितोस रे... अजिबात
मस्त लिहितोस रे... अजिबात कंटाळवाणे नाहीये....
जमुरी दुकानदार लय भारी!
जमुरी दुकानदार लय भारी! आशुचॅम्प, अगदी बारीक मज्जेशीर घटना सुद्धा लिहा. पाल्हाळ अजीबात वाटत नाहीये, उलट डोळ्यासमोर असे घडलेय/ घडतेय असे वाटतय. फोटो आणी वर्णन दोन्ही लाजवाब!
Pages