गणेशोत्सव २००९ आभार प्रदर्शन

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 01:19

गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.

मायबोलीकरांच्या सक्रीय सहभागाशिवाय गणेशोत्सव साजरा होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम गणेशोत्सवात स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अवांतर कार्यक्रम आणि जाहिराती ह्यांना मनमोकळी दाद व भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांचा हा सहभाग आम्हा संयोजकांना रोज नवीन उत्साह देऊन जात असे.

मागच्या वर्षी चालू झालेला लिखित व श्राव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपक्रम यंदाही उत्साहात साजरा झाला!

लिखित विभागामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात घडणार्‍या घडामोडींचा आढावा कथामालिकेच्या माध्यमातून खास नेमाडे शैलीत घेतला मायबोलीकर बो-विश ह्यांनी. ही कथामाला आवडल्याचे अनेक मायबोलीकरांनी आम्हांला तसेच बो-विश ह्यांना कळवले आहे. श्री गणेशाचे, अष्टविनायकाचे दर्शन चित्रांच्या माध्यमातून पल्ली ह्यांनी आपल्याला घडवले तर अवती भवती असणार्‍या परिचितांमधल्या अपरिचित व्यक्तींची ओळख मायबोलीकरांना अ‍ॅडम ह्यांनी करून दिली. चीझ ह्या विषयावरची माहितीपूर्ण लेखमाला मायबोलीकर शोनू ह्यांनी सादर केली. ह्या सर्व लेखमालांबद्दल बो-विश, पल्ली, अ‍ॅडम आणि शोनू ह्यांचे संयोजकांतर्फे आभार!

ह्या व्यतिरिक्त लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंडाळलेल्या कापडाची कहाणी, ॐ नमोजी आद्या, आई..ते लेखिका-कवयित्री, सार्थ गणपत्यथर्वशीर्ष, तू असे विविध विषयांवरचे लेख सादर केल्याबद्दल अनुक्रमे नीधप, बासुरी, प्राजु, झक्की व श्रावण मोडक ह्या मायबोलीकरांचे तर आपल्या खास शैलीतल्या गुंफण, दृष्टीभ्रम, आणि सुरूवात ह्या कथा सादर केल्याबद्दल अनुक्रमे सुपरमॉम, कविता नवरे, आणि विशाल कुलकर्णी ह्या मायबोलीकरांचे शतश: आभार!

मायबोलीकर उपासक यांनी संगीतबध्द केलेल्या 'जय हेरंब' ह्या ध्वनीफितीतली सगळी गाणी श्राव्य विभागात सादर झाली. संगीतप्रेमी मायबोलीकरांना ही एक अनोखी मेजवानीच मिळाली. मायबोलीवरचे प्रसिध्द कवी वैभव जोशी ह्यांचे काव्य वाचन तर प्रसिद्ध विडंबनकार मिल्या ह्यांचे हझल वाचन सांस्कृतिक कार्यक्रमांत निराळेच रंग भरून गेले. स्वत: रचलेल्या गणेशविषयक रचना स्वरबध्द करून त्या आपल्या गणेशोत्सवासाठी मायबोलीकर श्यामली आणि जयावी ह्यांनी उपलब्ध करून दिल्या. आपल्या कलाकृती मायबोलीकरांसाठी घेऊन आल्याबद्दल संयोजकांतर्फे उपासक, वैभव जोशी, मिल्या, श्यामली आणि जयावी ह्यांचे आभार.

वरील सर्व लेखक, कवी आणि कलाकारांनी हे कार्यक्रम आपल्यासमोर सादर करता यावेत म्हणून वेळात वेळ काढून अपार मेहनत घेतली आहे. गणेशोत्सव संयोजन समिती ह्या सर्वांच्या मेहेनतीला दाद देत त्यांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवात दोन गद्य STY घेण्यात आली. ह्या दोन्ही STYची उत्कंठावर्धक आणि चटकदार सुरवात करुन दिल्याबद्दल मायबोलीकर psg (जळ्ळं मेलं 'लक'क्षण) आणि प्रकाश काळेल (अपराजित) ह्यांचे खास आभार!

मायबोलीकरांना कोड्यात टाकायला सदा उत्सुक असलेले स्लार्टी, गजानन देसाई आणि क्ष ह्यांनी वेळातवेळ काढून "परस्पर संबंध ओ़ळखा" साठी कोडी बनवून दिली तर "कायापालट" स्पर्धेसाठी मिल्या ह्यांनी मायबोलीवरच्या असंख्य कविता चाळून कवितांची निवड करून दिली. तसेच ह्या कवितांच्या रचनेबद्दल माहितीही दिली. याच स्पर्धेसाठी मायबोलीकर कवी वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांनी आपल्या रचना उपलब्ध करून दिल्या. ह्या अमूल्य योगदानासाठी स्लार्टी, गजानान देसाई, क्ष, मिल्या, वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांना धन्यवाद !

पाककृती स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिक्षकांचे आभार. तसेच शुध्दीकरण, मुद्रित शोधन व वेळोवेळी लागेल ते सहाय्य केल्याबद्दल मायबोलीकर आयटीगर्ल, psg, शोनू, सुपरमॉम, सशल, चिनूक्स तसेच मंडळाच्या सल्लागार रुनी ह्यांचे विशेष उल्लेखनीय आभार!!

ह्यावर्षी मायबोलीकरांच्या परिवाराला गणेशोत्सावात सामिल करून घेण्यासाठी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या मुलांना ह्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पालक मायबोलीकरांचे तसेच अतिशय छान छान चित्रे काढल्याबद्दल सर्व छोटुकल्यांचे कौतुक.

आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचे. आम्हां सर्वांवर विश्वास दाखवून गणेशोत्सव संयोजनाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळातल्या प्रत्येकातर्फे अ‍ॅडमिन ह्यांना मनापासून धन्यवाद. अ‍ॅडमिन आणि वेबमास्टर ह्यांनी वेळोवेळी तांत्रिक मदत, कायदेशीर बाबींबद्दल सल्ले, मार्गदर्शनपर प्रेमळ सूचना आणि अनुभवांचे बोल सढळ हस्ते आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांच्या मदती शिवाय तसेच सहकार्याशिवाय गणेशोत्सव पार पाडणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत !

गणेशोत्सवाच्या संयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे पण अनवधानाने इथे उल्लेख करायचा राहून गेला अशा सर्वांनाही संयोजकांतर्फे धन्यवाद!

कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणेला वाव असतोच. जर यंदा गणेशोत्सवात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता आल्या असत्या असं आपल्याला वाटत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा. पुढच्या वर्षीच्या संयोजक मंडळाला त्याची निश्चित मदत होईल. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखी काय करता आलं असतं ह्याबद्दल जाणून घ्यायला आम्ही सर्व जण उत्सुक आहोत.

स्पर्धांच्या मतदानासाठी ह्या दुव्यावर पहा.

धन्यवाद,
मायबोली गणेशोत्सव २००९ संयोजक मंडळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती संयोजकांचे मनःपुर्वक आभार! खरेच खूप मजा आली. एकदम अजब उत्साह होता प्रत्येक दिवशी. झब्बू मस्त गेम होता. बाकीही बर्‍याच स्पर्धेची मजा औरच होती.
माझ्या घरी गणपतीचे पहिले वर्षे होते. तरीही सर्व आटपून मायबोलीवर यायला एकदम घाई असायची.
मजा आली. ज्यांच्या सहभागाने हा उत्सव साजरा त्यांचेही आभार. Happy

जय गणेश!
हा गणेशोत्सव कधी संपुच नये....

कित्ती मज्जा केली या वर्षी. असा बहारदार, मजेदार गणेशोत्सव ऑर्गनाईज केल्याबद्दल सर्व संयोजकांचे आणि स्वयंसेवकांचे खूप खूप आभार आणि हा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि धडाक्यात साजरा करणार्‍या सर्व मायबोली करांचे अभिनंदन Happy

आता हे वरचे निरोपाचे भाषण वाचुन डोळ्यात पाणी तरारले. अगदी जसे लहानपणी गणपती विसर्जनाच्या वेळी यायचे तसेच Sad

हे विसर्जन तर केवळ सिंबॉलिक आहे... पण हा गणेशोत्सव तर आपल्या मानात सदैव घर करुन राहिल...हो ना?

जय बोला हो जय बोला
जय जय गजानन बोला!

गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या!!!!

या वर्षी नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार.

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया!!
संयोजक खूप मजा आली या गणेशोत्सवात. उत्तम आयोजन, वेगळ्या आणि सर्व समावेशक स्पर्धा, अ‍ॅतर अनेक भरगच्च कार्यक्रम या सर्वांसाठी आभार आणि धन्यवाद.

सन्योजक मण्डळ व अ‍ॅडमिन्-वेबमास्टर यान्चे अभिनन्दन व आभार Happy
वरल्या लेखात, "झब्बू" या प्रकाराबाबत उल्लेख हवा होता, कोण फोटो देत होत, कुणाचि आयडीया वगैरे. (कशावरुन ते नाही विचारीत Wink ) तेवढी भर घालता का लगेच?

लिंबूटिंबू, STY च्या बरोबर आणखी एकदा सर्वसमावेशक कार्यक्रम हवा अशी संयोजक मंडळाची इच्छा होती. आणि त्यातूनच झब्बूची कल्पना आली. आपण विचारपुशीत म्हंटल्याप्रमाणे झब्बू स्पर्धेच्या स्वरूपात घ्यावा असाही विचार केला होता, परंतू ते काही कारणांनी शक्य झाले नाही. झब्बूचे काही फोटो संयोजक मंडळातल्यांनी काढले होते तर काही बाकीच्या मायबोलीकरांनी दिलेले होते. त्याबद्दल त्यांचे वैयक्तीक आभार मानलेले आहेत. Happy

गणपती चाल्ले गावाला चैन पडेना आम्हाला!
गणपती बापा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!

सर्व गणेशोत्सव संयोजकांचे अभिनंदन आणि आभार खुप मजा आली. Happy

सन्योजक, कालौघात, (जागा वाचवणे या उद्देशाने) एकवेळ या प्रतिक्रिया वाहून जातिल, पण वरिल मूळ लेख शाबुत राहील, अन त्यात छायाचित्र "झब्बू" खेळाचा उल्लेख हवा होता जसा एस्टीवाय चा आहे असे वाटले म्हणून सान्गितले (वा झब्बू दिला म्हणा हव तर Proud )
त्यातुन तान्त्रिकदृष्या वरील मूळ लेखात भर घालणे अशक्य असेल वा धोरण म्हणून झब्बूचा अभिनव प्रकार तिथे लिहायचाच नसेल, तर बाब वेगळी! Happy

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

मस्त धमाल आली. Happy उत्तम आयोजन! स्पर्धा, खेळ, कार्यक्रम सगळंच छान होतं. संपू नये असं वाटत होतं खरं.
संयोजकांचे, स्वयंसेवकांचे आभार आणि अभिनंदन!

मस्त झाला आपला गणेशोत्सव. सगळ्या संयोजकांचे, स्वयंसेवकांचे आभार व अभिनंदन..उत्तम संयोजन..:)

खूपच उत्साहात आणि दणक्यात झाला यंदाचा गणेशोत्सव. खूप मजा आली. संयोजक मंडळाचे अभिनंदन.
श्राव्य सुविधेचा पुरेपूर आनंद लुटता आला. श्राव्य कार्यक्रम या उत्सवात सामील करून घेतल्यामुळे बहार आली.
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ!!

गणपती बाप्पा मोरया!
खूप मस्त साजरा झाला गणेशोत्सव. यात सहभाग असणार्‍या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. घरच्या गणपती बरोबरच हा ही गणेशोत्सव मनापासून समाधान आणि आनंद देऊन गेला.

मायबोली च्या टीम चे मन:पूर्वक आभार. एक अनोखा गणेश उत्सव सोहळा, लो. टिळ्कांना अभिप्रेत असलेला सार्वजनिक गणेश उत्सव असाच असावा. अप्रतिम..... गणपति बाप्पा मोरया.

गणपती बाप्पा मोरयाSSSS!
मस्त साजरा झाला गणेशोत्सव. यात सहभाग असणार्‍या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. घरच्या गणपती बरोबरच हा ही गणेशोत्सव मनापासून समाधान आणि आनंद देऊन गेला... सगळ्या संयोजकांचे, स्वयंसेवकांचे आभार व अभिनंदन!!!

खरचं यावेळेसचे सर्वचं कार्यक्रम छान झालेत. जाहिरात करण्यासाठी म्हणून केलेले सर्व लेखन कार्यक्रमाकडे खेचणारे होते. शिवाय सर्व संयोजक वर्ग नवानवा होता. तेच तेच आधीच्या पिढीचे आणि मायबोलिवर नेहेमी पुढे दिसणारे यापैकी कुणीही नव्हतं. झब्बूंचा खेळ ही नवीन कल्पना सर्वांनाच खूप आवडली. कार्यक्रमांच्या सर्व links पहिल्याच पानावर अगदी योग्य स्थळी दिल्यामुळे शोधायला अजिबात त्रास नाही झाला.

संयोजक आणि कार्यक्रमात या ना त्या रुपाने सहभागी झालेल्या सर्वांचेच माझ्याकडून अभिनंदन!

गणेशोत्सवाची कल्पना, संरचना मनापासून आवडली. हा माझा इथला पहिलाच गणेशोत्सव. खूप सातत्यानं प्रतिक्रिया देता आल्या नाही, पण सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद मात्र आवर्जून घेतला. झब्बू खूपच आवडला. सगळे माहितीपूर्ण लेख, काव्य, संगीत यांनी गणेशोत्सवात रंगत आणली. संचालक मंडळाला या अनुपम उपक्रमाबद्दल शतशः धन्यवाद!

अलिकडच्या काळात गणेशोत्सवाचे प्रयोजन काय हा प्रश्न हल्ली बराच चघळला जातोय .. काही अंशी त्यातले मुद्दे बरोबरही आहेत..

पण अशा अभिनव प्रकारे गणेशोत्सव साजरा करुन मायबोलीचे एक कुटुंब तयार करणार्‍या मायबोली प्रशासनाचे आणि संयोजकांचे हार्दीक अभिनंदन!
या उत्सवामागच्या मूळ प्रयोजनास या कारणाने तुम्ही जो हातभार लावत आहात तो अतिशय स्तुत्य विचार आहे!

मोरया!

देशाबाहेर राहूनही गणेशोत्सवाची मजा मायबोलीमुळे थेट घरबसल्या घेता आली !!!!!!
खरय! आभारि आहोत सर्व संयोजकाचे!!!!!!!!!!!
गणपति बाप्पा मोरया!!!!!!!!

संयोजक मंडळाचे आणि सहकार्‍यांचे मनःपुर्वक आभार!
यंदाच्या गणेशोत्सवात खूप धमाल आली... Happy

भरपूर आणि छान काम केले संयोजकांनी. भरपूर लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळविण्यात यशस्वी झाले, यात शंकाच नाही. अशा या अविस्मरणीय आणि यशस्वी गणेशोत्सवबद्दल त्यांचे अभिनंदन. Happy

मायबोलीचा गणेशोत्सव खरोखर अविस्मरणीय !!
संयोजक मंडळाचे आणि सहकार्‍यांचे अतिशय आभार !!... गणपती बाप्पा मोरया Happy

गणपतीबाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!

गणपती उत्सव फारच सुरेखरीत्या आयोजीत केला होता. पुष्कळ नाविन्यपूर्ण अ‍ॅक्टिव्हीटिज होत्या आणि खूप लोकांना सहजपणे भाग घेता आला. कल्पकतेबाद्दल आणि उत्कृष्टपणे आयोजनाबद्दल सर्व संयोजकांना धन्यवाद.

सर्व संयोजक मंडळ व सहकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन , आपण सर्वांनी योजनाबद्ध रितीने अतिशय उत्कृष्ट प्रकारे गणेशोत्सव साजरा केला.

आम्हाला तुमच्यामुळे अगदी घरच्या सारखी मजा आली, मराठी मंडळींपासून इतक्या दूर असून् सुद्धा.

क्ष यांना १००% अनुमोदन. उत्सवाच्या मूळ प्रयोजनास हातभार लावतेय मायबोली.
खूपच देखणा झाला उत्सव. संयोजकांचे, सहकार्‍यांचे आणि सहभागी झालेल्यांचे शतशः आभार आणि अभिनंदन.

अतिशय सुंदर झाला गणेशोत्सव! Happy
हातभार लावण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचेच आभार! घरच्या गणपतीत काम केल्यासारखा आनंद मिळाला! Happy

यंदाचा गणेशोत्सव बहुदा आजवरच्या सर्व गणेशोत्सवांपेक्षा सरस झाला असं मला वाटतं. संयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि उत्तम प्रकारे कार्यक्रम सादर केले. संयोजकांचं, त्यांना मदत करणार्‍यांचं, सल्लागारांचं आणि सहभागी लेखक, कवि, कलाकारांचं मनःपूर्वक अभिनंदन!

गंपति बाप्पा मोर्या !

पीकेला अनुमोदन!

खरंच अगदी मनापासून आवडला यंदाचा गणेशोत्सव! संयोजकहो, खूप मेहेनत घेतलीत. अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद!

गणेशोत्सव खरंच अप्रतिम आयोजीत केला होता .. संयोजक मंडळाचे, अ‍ॅडमिन टिमचे अनेक आभार त्याबद्दल ..

आमच्या कॉलनीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवानंतर त्यात काम केलेल्या, सगळ्यांसाठी श्रमपरिहार/अल्पोपहाराचा कार्यक्रम असायचा .. त्याचं आमंत्रण असणं हा तेव्हाचा prestige issue असायचा .. (:p) तसं काहितरी केलं पाहिजे आपण संयोजक मंडळासाठी .. Happy

Pages