लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.
आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवात करण्या आगोदर, मुळातच लिनक्स कुणासाठी बनवलेले (Target User Base) आहे हे बघु. जेव्हा आपण लिनक्सवर; ते वापरायला कठीण आहे, त्यात नेहमीचे सॉफ्टवेअर चालत नाहीत ई. अनेक आरोप करतो तेव्हा लिनक्स मुळातच आपल्यासारख्या वापरकर्त्यासाठी बनलेले आहे किंवा कसे हे तपासुन बघणे गरजेचे ठरते. अन्यथा आपण ज्या देशाचे नागरीक नाही किंवा ज्या भुभागाशी परंपरेने जोडलेले नाही, त्या विशिष्ट देशातले किंवा भुभातले पारंपारीक खाद्यपदार्थ कसे बनवायला कठीण आहेत, विचित्र आहेत, अपायकारकरित्या तिखट आहेत, मांसाहारासाठी वापरलेले साहित्य किळसवाणे आहे किंवा बेचव आहे असे म्हणुन त्याला नावे ठेवणे आणि लिनक्सवरील अनेक आरोप या दोन्हीत काहीच फरक नाही.
लिनक्स हे मुक्तस्त्रोत चळवळीचाच एक भाग आहे. मुक्तस्त्रोत चळवळ आणि आंतरजाल नसते तर लिनक्स आज आपल्यापर्यंत पोहचुच शकले नसते. त्यामुळे लिनक्सवर होणारे अनेक आरोप हे मुक्तस्त्रोत चळवळीवरही होत असतात. त्यामुळे आधी मुक्तस्त्रोत चळवळीबद्द्दल माहिती घेऊ:
मुक्तस्रोत म्हणचे काय व मुक्तस्त्रोत चळवळीचा ईतीहास:
मुक्तस्त्रोत म्हणजे अशी संगणक प्रणाली(Software) जीचा स्त्रोत (Source Code) सर्व वापरकर्त्यांना बघण्यासाठी(view) आणि त्यात बदल(modify) करण्यासाठी कायदेशीररीत्या मुक्तपणे उपलब्ध आहे. असा संगणक प्रणालीचा स्त्रोत घेऊन आपण तो आपल्याला हवा तसा वापरु शकतो तसेच त्यात आपल्याला पाहिजे तो बदल कायदेशीर अधिकाराने करु शकतो व असे बदल केलेली प्रणाली पुढे कायदेशिररीत्या व्यावसायीक फायद्यासाठीही वापरु शकतो. असे करताना ज्या व्यक्तीने किंवा संस्थेने ही प्रणाली प्रथम बनवली किंवा आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात ज्यांनी ज्यांनी जास्तीचे काही बदल त्यात केले, त्यांच्या योगदानाच्या दस्ताऐवजीकरणासाठी सगळ्यांच्या फक्त नावांची यादी नव्या सुधारीत प्रणालीत ठेवने बंधनकारक असते, त्यांना पैसे किंवा ईतर कुठल्याही प्रकारे मोबदला / शुल्क देणे बंधणकारक नसते. ही झाली मुक्तस्त्रोताची ढोबळ व्याख्या. यात अनेक परवाने व त्यांचे उपप्रकार असतात. प्रत्येक परवान्याप्रमाने अनेक छोटेमोठे बदल या मुळ व्याख्येत होतात. पण मुळ ढाचा साधारणपणे हाच असतो.
मुक्तस्त्रोत चळवळ आधुनीक संगणकाच्या ईतिहासात त्याच्या जन्मापासुनच अस्तित्वात आहे. तेव्हा त्या गोष्टीला मुक्तस्त्रोत चळवळ किंवा मुक्तस्त्रोत असे अधिकृत नावही नव्हते. जेव्हा प्रचंड आकाराचे संगणक फक्त संशोधण करणा-या संस्था आणि सैन्य यांच्या पुरतेच सिमीत होते, अगदी तेव्हापासुनच ते संगणक वापणारे सर्व जण आपापसात अनौपचारीकरीत्या संगणाकाच्या आज्ञावलीचा स्त्रोत वाटुन घेत होते. ते ही कोणत्याही आर्थीक नफ्याच्या अपेक्षेशिवाय आणि स्त्रोत चोरीला जाण्याच्या भितीशिवाय! या मागे, आधीच कोणीतरी करुन ठेवलेले काम आपण परत परत करु नये (Don't Reinvent the wheel), आपल्या कामाचा इतरांनाही फायदा व्हावा (कोणत्याही मोबदल्याविना), हे सगळे करताना बरेच काही नवीन शिकायला मिळावे हे मुख्य हेतु असत. या मधे अर्थातच संशोधक , विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मोठा सहभाग होता. नंतर जेव्हा युनिक्स आले आणि ते वापरण्यासाठी परवाना विकत घ्यावा लागत असे, तसेच त्यातील स्त्रोत वाटुन घेण्याची कायदेशीर परवानगी नव्हती तेव्हापासुन या सगळ्या लोकांमधे असंतोष वाढु लागला. त्यातुन मग युनिक्स ची एक शाखा मुक्तस्त्रोत झाली आणि त्याच्या पुढे अनेक उपशाखा तयार झाल्या (१). आजची आघाडीची संगणक प्रणाली ऎपल मॆक ही मुळ मुक्तस्त्रोत युनिक्स पासुनच बनलेली आहे!
मुक्तस्त्रोत चळवळीतील उत्पादनांचे अपेक्षीत वापरकर्ते कोण आहेत? (तुम्ही आहात का)?
आता आपल्या लक्षात आलेच असेल की अगदी पुर्वी पासुन, मुक्तस्त्रोत चळवळ ही लोकांनी लोकांसाठी ( कोणत्याही आर्थीक मोबदल्याशिवाय) चालवलेली चळवळ आहे. यात काम करणारा प्रत्येक जण दुसरी व्यक्ती किंवा संस्था मला काय देणार हे बघुन या चळवळीत येत नाही. तर त्याला स्वत:ला काहीतरी नवी कल्पना प्रत्यक्षात उतरवावी वाटते किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या संगणक प्रणालीत काही कमी असते ती त्याला दुर करायची असते म्हणून येतो.
आता तुम्हीच मला सांगा असे असताना, जर तुम्ही तुमच्या ईच्छेने एखादे मुक्तस्त्रोत उत्पादन वापरायचे ठरवले, आणि त्यात काही कमी आढळले, काही नीट काम करत नसेल, तर अशावेळेला हे उत्पादन बनवना-याला किंवा या उत्पादनाला नावे ठेवण्याचा तुम्हाला नैतीक अधिकार आहे का? कारण मुळातच हे मुक्तस्त्रोत उत्पादन तुमच्यासाठी खास असे बनवलेलेच नव्हते. या उप्पर जर तुम्हाला हे उत्पादन वापरायचेच असेल तर त्यात जी कमी आहे ती दुर करण्यासाठी तुम्ही स्वत: काहीतरी योगदान करणे अपेक्षीत आहे. कारण - ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. प्रत्येकाची समान जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पडली की मग तुमचे हक्क सुरु होतात.
त्यामुळे आंतरजालावर जिथे कुठे असे प्रतिसाद दिसतात की लिनक्स वापरायला कठीण आहे, अमुक एक समस्या आहे, कोणतेतरी प्रसिद्ध सॊफ्टवेअर लिनक्सवर चालत नाहीत - आणि म्हणुन लिनक्स हे बकवास आहे - तेव्हा मला खुप वाईट वाटते. लिनक्स कर्नल आज लाखो ओळींची एक संगणक प्रणाली आहे. त्यात हजारो लोक आणि शेकडो संस्थांचा सहभाग आहे. हे सगळे लाखो मानवी कामकाजाचे तास देऊन बनलेले आहे. त्याला असे कोणीही सोम्यागोम्या येऊन, त्याचे स्वत:चे काहीही योगदान न देता नावे ठेवतो आणि आणखी गैरसमज पुढे पसरवतो हे अतिशय चुकीचे आहे.
आपल्याला कल्पना आहे का की आजचे आंतरजाल हे मुख्यत: मुक्तत्रोत उत्पादनांमुळे चालु आहे. त्यातील सर्वात मुख्य वाटा लिनक्स आणि बी.एस.डी. (२) वर चालणा-या सर्व्सचा आहे. कल्पना करा की एवढे सगळे लाखो सर्वर्स जर विकत परवाना घेणे बंधणकारक असलेल्या संगणक प्रणाली जसे की ऎपल मॆक किंवा विंडोज वापरुन चालवायचे म्हटले असते, तर निव्वळ त्या परव्यान्यांचाच खर्च किती झाला असता?
फुकट्यांनो चालते व्हा:
थांबा. आधीच्या परिच्छेदामधील परवान्याच्या किमतीचे उल्लेख वाचुन लगेच असे मत बनवु नका की ज्यांना पैसे देऊन विंडोज / मॆक विकत घेणे परवडत नाही किंवा विकत घ्यायचे नसते असे लोक मुक्तस्त्रोत चळवळ चालवतात. लक्षात ठेवा जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. मुक्तस्त्रोत उत्पादने म्हणजे स्वातंत्र्य, फुकट नव्हे. Free in Free and Open Source Means Free as in Freedom. Not Free as in Zero Price. हाच आरोप नेट न्युट्रलिटीच्या बाजुने लढणा-यांवर पण झाला होता त्यांचे खच्चीकरण व बदनामी करण्यासाठी की, त्यांना फुकट ईंटरनेट हवे आहे म्हणुन ते नेट न्युट्रलिटी हवी असे म्हणता आहेत. पण हे आरोप करणारे हे विसरत होते की आजही आम्ही सगळे पैसे देऊनच आमचे नेट वापरतो आहेत व पुढेही विकत घेऊनच वापरु तर यात फुकट नेटचा मुद्दा येतोच कुठे? असो.
प्रत्येक स्वातं:त्र्यासाठी बलिदान हे द्यावेच लागते आणि कष्ट करावेच लागतात. प्रत्येक स्वातं:त्र्याची स्वत:ची अशी एक किंमत असते.
हे स्वातंत्र्य कशाचे? तर खालील मुद्द्यांचे:
- माझ्या मालकीचे असलेल्या उत्पादनावर माझा पुर्ण हक्क हवा. (तुमची चारचाकी तुमच्या पुर्ण मालकीची असते का?)
- मला हे उत्पादन खोलुन त्याच्या आत बघता आले पाहिजे. संगणक प्रणालीच्या बाबतीत तिचा स्त्रोत बघता आला पाहिजे. (तुम्ही तुमची गाडी खोलुन आत ईंजीन वगैरे बघु शकता का? गाडी काम कसे करते हे तुमच्या मुलांना गाडी खोलुन दाखवुन समजावु शकता का?)
- मला या उत्पादनात पाहिजे तो बदल करता आला पाहिजे. (तुम्ही तुमची गाडी मॊडीफाय करु शकता का? किंवा एखादा पार्ट काढुन त्या जागी तुमच्या पसंतीचा दुसरा पार्ट टाकु शकता का?)
- मला माझ्या मालकीचे उत्पादन माझ्या मर्जीने माझ्या घरातील सदस्य, माझे मित्र किंवा समाजातील कोणालाही थोड्या काळासाठी वापरु देता आले पाहिजे किंवा कायमचे वापरासाठी देऊन टाकता आले पाहिजे. (तुम्ही तुमची बाईक मित्राला चालवायला देता का? तुम्ही तुमची चारचाकी तुमच्या सोबत पर्यटनाला आलेल्या इतर लोकांसोबत शेअर करु शकता का? तुम्हाला जर वाटले तर तुम्ही तुमची गाडी एखाद्या सामाजीक संस्थेला किंवा गरजु व्यक्तीला विना मोबदला देऊ शकता का? तुम्ही अशी दिलेली गाडी, नवा मालक खोलुन बघु शकतो का? त्यात बदल करु शकतो का? किंवा कायदेशीररीत्या ती पुढे विकु शकतो का?)
- मला हे उत्पादन आहे असेच किंवा त्यात पाहिजे ते बदल करुन नफा कमावन्यासाठी विकता आले पाहिजे. यात मुळ उत्पादकाला काहीही कोणत्याही स्वरुपात द्यावे लागु नये. मुळ व इतर उप्तादनकर्त्यांची नाव मात्र मी तशीच नमुद करुन ठेवेन. (तुम्ही तुमची गाडी विकु शकता का? त्यात नफा कमावु शकता का? तुम्ही तुमची मॊडिफाय केलेली गाडी विकुन नफा कमावु शकता का? असे विकताना तुम्ही मुळ गाडी कंपनीला काही पैसे देणे लागता का?)
वरील यादीतील गाडीच्या संदर्भातील तुमची उत्तरे "होय माझ्या मालकीच्या गाडीवर हे सर्व स्वातंत्र्य मला आहे"अशी असतील तर विचार करा जे स्वातंत्र्य तुम्हाल गाडी, मिक्सर, हातोडा, पलंग, घर, सायकल, संगीत उपकरणे, शेतीतील अवजारे व यंत्रे, चित्रकलेचे साहित्य, स्वयंपाकघरातील भांडी व इतर वस्तु, बागेतील कुंड्या व झाडे या सर्व बाबतीत आहे, ते स्वातंत्र्य तुम्ही पुर्ण पैसे देऊन रितसर विकत घेतलेल्या तुमच्या पुर्ण मालकीच्या संगणकावर आणि त्याच्या प्रणालीवर का नाही?
स्वातंत्र्याचा हा मुळ विचार मुक्तस्त्रोत संगणक प्रणाली आणि चळवळीमागे आहे.
वा.वि.प्र. (अडचणी, आरोप, भिती ई.):
- लिनक्स म्हणजे विंडोज नव्हे:
- व्यक्ती तितक्या प्रव्रुत्ती. जैसा देस वैसा भेस. प्रणाली तितके वेग़ळेपण. ज्या दोन प्रणाली एकाच व्यक्तीने एकाच कामासाठी बनवलेल्याच नाहीत्, त्या एक सारख्या कशा असु शकतील? नवीन ठिकाणी जाताना शिकण्याचा संयम ठेवायला नको का? बदल स्विकारण्याचा संयम नको का? या लिंक मधे या वेगळेपणाबाबत सविस्तर वाचु शकता: Linux is Not Windows
- मुक्तस्त्रोतवर विश्वास कसा ठेवावा? ही प्रणाली कोणालाही फेरफार करण्यासाठी मुक्त असल्यामुळे कोणीही येऊन काहिही कोड समाविष्ट करेल? तो कोड हानीकारक नसेलच कशावरुन?
- कोणालाही येऊन त्याचे योगदान द्यायला लिनक्स मुक्त आहे हे बरोबर आहे. पण ही एकप्रकारची लोकशाही प्रक्रियासुद्धा आहे! त्यामुळे आलेले नवे योगदान असे लगेच मुळ उत्पादनात सामावुन घेतले जात नाही. शक्य तिथे त्यचा स्त्रोत बघितला जातो. अनेक स्वयंसेवक परिक्षकांकडुन त्याचे वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या हार्डवेअरमधे सखोल परिक्षण होते. मगच तो कोड मुख्य उत्पादनात सामाविष्ट केला जातो.
- एवढे करुनही एखादा मुद्दमहुन आपाय करण्याच्या हेतुने बनवलेला स्त्रोत, मुख्य उत्पादनात आलाच, तरी जेव्हा हे उत्पादन जगभरातील लाखो लोक वापरतात आणि त्यातील सुरुवातीचे जे लोक असतात ज्यांना याचा त्रास होतो ते लगेच हे योग्य ठिकाणी कळवतात. तिथुन मग लगेच सुचनापत्र काढुन सगळ्यांना सुचीत केले जाते आणि आपतकालीन उपाय कळवले जातात. त्यानंतर कमीत कामी काही तास ते काही दिवसात यावर कायमचा उपाय काढला जातो.
- एवढे करुन अशा एखाद्या गोष्टीवर काहीच कार्यवाही झाली नसेल, तर तुम्हाला माहितीच आहे की चळवळीचा एक सदस्य म्हणुन तुमची जबाबदारी आहे योगदान देण्याची!
- मॆक व विंडॊज सारख्या क्लोज्ड सोर्स उत्पादनात त्यांचा स्त्रोत बघायची सोय नसल्यामुळे जो पर्यंत अशी काही समस्या कंपनीला समजत नाही आणि कंपनी त्यावर काही कार्यवाही करत नाही तोपर्यंत सामान्य वापरकर्ता याबाबतीत काहीही करु शकत नाही.
- लिनक्स वापरायला खुप कठीण आहे:
- हा पुर्वीपासुन पसरलेला समज आहे जो आजच्या काळात गैरसमज बनलेला आहे. पुर्वी लिनक्स फक्त सिस्टींम ऎडमीन वगैरेंपर्यंतच मर्यादीत होते तेव्हा ते त्यांच्या आवडी प्रमाणे बनवलेले होते आणि मर्यादीत होते. पण बदलत्या काळाप्रमाणे यात अनेक बदल झालेले आहेत आणि लिनक्स मधे टर्मिनलचा वापर अजिबात न करता काम करणे शक्य आहे. जास्त माहितीसाठी तुम्ही लिनक्सवर वापरात असलेल्या प्रसिद्ध केडीई या डेस्क्टॊप एन्वायरन्मेंट बद्दल इथे वाचु शकता: https://www.kde.org/
- लिनक्समधेपण व्हायरस असतात, त्यामुळे लिनक्स ईतरांपेक्षा जास्त सुरक्षीत आहे किंवा यात व्हायरस नसतातच हा प्रचार खोटा आहे
- लिनक्सवरही व्हायरस असतात. लिनक्स व्हायरस मुक्त नाही. आजघडीला ४० (चाळीस) माहिती असलेले व्हायरस आहेत जे लिनक्सला अफेक्ट करतात.
- आता इथे थोडा ब्रेक घ्या आणि आपल्या ओळखीत एखादा व्यक्ती किंवा कंपनी असेल जी गेल्या १०-२० वर्षापासुन लिनक्स वापरत असेल त्यांना विचारा की या व्हायरस मुळे त्यांना किती वेळा त्रास झाला? किती करोडोंचे नुकसान झाले? किती वेळा काम बंद राहिले? हेच सर्वेक्षण आता मॆक आणि विंडोजबाबतीत करा आणि दोघांचा डेटा पडताळुन बघा.
- लिनक्सच काय, जगातील कोणतीही संगण्क प्रणाली १००% सुरक्षीत नाही. ९९% सुरक्षीत संगणक तो आहे जो आंतरजालाशी जोडलेला नाही. १००% सुरक्षीत संगणक तो आहे जो बंद आहे!
- वैसे देखा जाये तो, जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या अध्यक्षाची हत्या करता यऊ शकते, त्यांच्या अभिमानाचा भाग असलेल्याअ जुळ्या ईमारती पाडता येऊ शकतात, लंडनमधेही अतिरेकी बॊबस्फॊट करु शकतात, गुगलचेच डोमेन चुकुन विकत घेता येऊ शकते आणि सर्व जगावर राज्य करण्यासाठी गेल्या हजारो वर्षांपासुन चाललेल्या वेगवेगळ्या युद्धांची तर गणतीच नाही. तर मला सांगा यातले काय काय परत परत होते किंवा झाले? (म्हणजे - ते करण्यामागचा हेतुही सफल झाला असेल, असे काही!)
- मुद्दा असा आहे की, हे खरे आहे की तांत्रीकद्ुष्ट्या लिनक्सवरही व्हायरस बनवने शक्य आहे, पण हे असे व्हायरस पुढे साथीच्या रोगासारखे पसरु शकत नाहीत. मुळात जर हे व्हायरस पुढे जाणारच नसतील तर त्याचा इतरांना त्रास होईल का? याचे कारण आहे की, ज्याला आपण इतका वेळ लिनक्स लिनक्स म्हणतोय ती ओपरेटींग सिस्टीम मुळात लिनक्स नाहीचे. लिनक्स हे त्या ओ.एस. चे कर्नल असुन फक्त एक भाग आहे. साधारपणॆ त्या ओ.एस. ला ग्नु / लिनक्स असे म्हणण्याचा आग्रह असतो. यात लिनक्स आणि ग्नु हे दोन मुख्य मुक्तस्त्रोत प्रकल्प आहेत. पण पुर्ण ओ.एस. बनन्यासाठी आणखीही ब-याच वेगवेगळ्या प्रकल्पांची गरज पडते. यात एवढे वेगवेगळे भाग एकत्र असतात की जो व्हायरस बनवलेला आहे, तो जगातील प्रत्येक लिनकस मशीन वर चालवणॆ अती कठीण आहे. त्यात लिनक्स युजर्स हे इतरांपेक्षा जास्त जागरुक असतात!! हे सगळे वगवेळे भाग एकत्र येऊन ही ओ.एस बनते आणि त्यात प्रत्येक युजरने स्वत:च्या मशीनवर स्वत:च्या पसंतीचे बदल केलेले असतात जे फक्त त्याच्या मशीनवर असतात. असे असताना असा व्हायरस जो एकाच वेळेला हजारो लाखो लिनक्स मशिनला अफेक्ट करेल, असा बनवने फार कठीण आहे.
- येत्या काळात जसजशी लिनक्स युजर्सची संख्या वाढेल आणि इथेही हॆकर्सना आर्थीक मतलब दिसेल तेव्हा असे व्हायरस बनने भरपुर प्रमाणात वाढेल आणि तेव्हा त्यांचा खरा धोका असेल. पण सद्ध्यातरी असे काही नाहीये. कारण कोणत्याही गुऩ्यात मोटीवेशन महत्वाचे असते आणि लिनक्ससाठी व्ह्यायरस बनवत बसण्याएवढा रिकामा वेळ कुणाकडे असणार?
- जेव्हा भविष्यात ती वेळ येईल तेव्हा, लिनक्स च्या मुक्त रचनेमुळे, त्या सर्वांपासुन सुरक्षीततेसाठीही तेवढ्याच तोडीस तोड प्रयत्न होतील आणि तेच प्रयत्न आपल्याला यातुन सुरक्षीत ठेवतील.
- अमुक एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर / हार्डवेअर लिनक्स मधे चालतच नसल्यामुळे / ईन्स्टॉलच होत नसल्यामुळे लिनक्सचा काहिही उपयोग नाही -
- भारताचे चलन रुपये, जसतेचा तसे अमेरीकेत चालते का? की डॊलर्समधे बदलुन घ्यावे लागते? मग माझ्या देशाचे चलन जसेच्या तसे अमेरीकेत चालत नाही म्हणुन अमेरीकेचा काहीच उपयोग नाही ती बिनकामाची आहे असे मी म्हणायचे का?
- दोन स्वत:त्र संगणक प्रणाली ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही त्यांच्यावरील सॊफ्टवेअर जसेच्या तसे दुसरीकडे कसे चालतील? ते सॊफ्टवेअर त्यांच्यपैकी एकावरच चालवण्यासाठी बनलेले असेल ना? दुस-यावर चालवायचे असेल तर त्यालाही बदलुन घ्यावे लागले ना?
- तुम्हाच्या क्षेत्रातील सोफ्टवेअर संबंधी चौकशी करण्यासाठी प्रतिसादात माहिती विचारु शकता.
- लिनक्समधे व्यावसायीक दर्जाची मदत व समस्या निवारण (After Sales Support & Troubleshooting) देण्यासाठी कोणतीही बडी कंपनी नाही
- विंडोज च्या समर्थनार्थ हे कारण पुढे केले जाते की आपल्या व्यवसायाचे काही नुकसान झाले तर आपण कंपनीला कोर्टात खेचु किंवा उद्या काही तांत्रीक गरज पडली तर ते सर्वतोपरी मदत करतील.
- तुम्ही जर विंडोज चे एन्ड युजर लायसन्स ऎग्रीमेंट नीट वाचले तर तुम्हाला हे लगेच कळॆल की मायक्रोसॊफ्टच काय जगातील कोणतीही सॊफ्टवेअर कंपनी त्यांच्या उत्पादनामुळे होणा-या व्यावसाईक नुकसानीची किंवा डॆटा लॊसची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे या काल्पनीक सुरक्षेत जगण्याला काही अर्थ नाही की काही नुकसान झाले तर तुम्ही त्यांना कोर्टात खेचुन नुकसान भरपाई घ्याल. तुमच्या उत्पादनाचे EULA इथे बघु शकता: http://www.microsoft.com/en-in/useterms
- तांत्रीक मदतीसाठी मोठी कंपनी, स्वयंसेवकांपेक्षा चांगली सेवा देऊ शकते हे सत्य नाही. तुम्हाला वॊरंटी मधेच मदत मिळेल. नव्या वॊरंटीसाठी जादा पैसे भरावे लागतील. मी स्वत: विस्टा पैसे देऊन रितसर विकत घेतली होती पण तिला आता अधिक्ुत सपोर्ट नाही? गेले ना माझे पैसे वाया? हेच ७,८ ई. बाबतीत झाले. जोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे भरत आहात आणि नवीन सपोर्ट पैसे देऊन घेत आहात तोपर्यंतच दे मतद करणार.
- याचा तोडीस तोड मदत मुक्तत्स्रोत उत्पादनांसाठी ही मिळते. हे करणारे सर्व स्वयंसेवक असतात.
- एवढे करुन तुम्हाला कायदेशीर बाबींची पुर्ताता करण्यासाठी कंपनीच हवी असेल तर आज अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या लिनक्ससाठी पेड सपोर्ट देतील. लिनक्स मधील सर्वात प्रसिद्ध अशा रेड हॆट आणि कॆनोनीकल (युबुंटु)चा विचार तुम्ही यासाठी करु शकता.
- मी अमुक या क्षेत्रात काम करते / करतो, इथे वापरले जाणारे अमुक एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर लिनक्सवर उपलब्ध नाही:
- छापील माध्यम आणि बरेचसे गेम्स या क्षेत्रांबाबतीत हे खरे आहे . त्यावर अजुन काम होणॆ गरजेचे आहे.
- पण या व्यतिरिक्त अनेक निशे मार्केट मधे लागणारे सॊफ्टवेअर्स लिनक्सवर मिळू शकतात. जास्त माहितीसाठी तुम्हाला हवे असलेले सॊफ्टवेअर कोणते ते प्रतिसादात लिहा.
गमतीदार गोष्टी:
जगभरातील सरकारे आणि ईतर मोठ्या संस्था जिथे लिनक्स वापरले जाते आहे त्यांची यादी:
https://en.wikipedia.org/wiki/List_of_Linux_adopters
भारतातील केरळ हे पहिले राज्य आहे जिथे अधिक्ुतपणे संपुर्ण मुक्तस्त्रोत प्रणाली सरकारी कार्यालयात वापरण्यासाठी तेथील राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे:
https://en.wikipedia.org/wiki/ICFOSS
अण्णा विश्वविद्यालय, चेन्नई हे भारतातील पहिले विश्वविद्यालय आहे जिथे तुम्ही "मुक्तस्त्रोत" या विषयात शासनमान्य अधिक्ुत पदव्योत्तर पदवी मिळवु शकता:
http://cde.annauniv.edu/Default9.aspx
मायक्रोसॊफ्टही शेवटी त्यांचे स्वत:चे लिनक्स बनवु पाहत आहे:
http://www.wired.com/2015/09/microsoft-built-linux-everyone-else/
जगातील सर्व सुपरकंप्युटर्स लिनक्स वापरतात. हे एक उदाहरण:
https://en.wikipedia.org/wiki/Tianhe-2
नासा त्यांच्या अनेक उपक्रामांत लिनक्स वापरते. आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकामधील लिनक्स बाबत: http://gizmodo.com/the-iss-has-ditched-windows-entirely-for-linux-499593441
http://www.computerweekly.com/blogs/open-source-insider/2013/05/internat...
http://www.zdnet.com/article/to-the-space-station-and-beyond-with-linux/
फ्रांसचे पोलीस खाते अधिक्ुत्यपणे लिनक्स वापरु लागले आहेत:
http://www.wired.com/2013/09/gendarmerie_linux/
(१) - युनिक्सचा स्वत:चा इतिहास आहे आणि ते मुक्तस्त्रोत कसे झाले व त्याच्या पुढच्या उपशाखा कशा तयार झाल्या हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. इथे ते महत्वाचे नसल्यामुळे थोडक्यात धावता आढावा म्हणून असे वाक्य लिहिले आहे.
(२) - बी.एस.डी. ही लिनक्स प्रमाणेच युनिक्स ची एक मुक्तस्त्रोत शाखा आहे.
स्पॉक, अत्यंत आवडीचा विषय,
स्पॉक,
अत्यंत आवडीचा विषय, सोप्या मराठीत उत्तम पध्दतीने मांडल्याबद्दल धन्यवाद!!
लगेच निवडक १० मध्ये समावेश. मी घरी लिनक्स डेस्कटॉप वापरतो व सगळे music/video/photo व महत्वाचे documents त्यावरच आहेत.
जाता जाता तुम्ही लिहिलेल्या 'गमतीदार गोष्टी' मध्ये अजून भर,
* लिनक्स फाउंडेशन या संस्थेने ना नफा ना तोटा तत्वावर Automotive Grade Linux, in short AGL(मराठी शब्द?) प्रणाली मुक्तस्त्रोत वापरून बनवली आहे, त्याचा वापर करून अनेक कार कंपन्यांनी उत्पादनही सुरू केले आहे. त्याबद्लची लिंक ईथे.....http://www.pcworld.com/article/2450067/linux-foundation-introduces-linux...
* माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीची अॅपलची प्रणाली सुध्दा FBSD वरच आधारित आहे/होती, जाणकारांनी यावर अधिक माहिती द्यावी.
एजीएल च्या लिंक बद्दल
एजीएल च्या लिंक बद्दल धन्यावाद अव्यक्त.
मॅक चे मुळ युनिक्समधेच असण्याबद्दल वर लिहिले आहे. मॅकही आधी मुक्तस्त्रोत युनिक्सच्या एका शाखेवर आधारीत होती आणि स्वतः मॅक ही मुक्तस्त्रोतच होती. नंतर ती क्लोज्ड सोर्स झाली.
स्पॉक, खुपच उपयुक्त
स्पॉक, खुपच उपयुक्त माहिती.
वरवर वाचले आता, निवांत वेळ काढुन वाचायला पाहिजे.
१९९९ पासून घराच्या कम्प्युटर
१९९९ पासून घराच्या कम्प्युटर वर लिनक्स वापरतोय. २००३ पासून विंडोज ला काढून टाकून फक्त लिनक्स. सध्या लिनक्स मिंट रोझा वर आहे. गेली किमान ७-८ वर्ष तरी लिनक्स सोपं नाही हा आक्षेप पूर्ण दिशाभूल करणारा आहे.
गेली किमान ७-८ वर्ष तरी
गेली किमान ७-८ वर्ष तरी लिनक्स सोपं नाही हा आक्षेप पूर्ण दिशाभूल करणारा आहे. +१
लिनक्स वर मायबोलीवर इतका छान
लिनक्स वर मायबोलीवर इतका छान लेख वाचायला मिळेल अस वाटल नव्हतं
हा लेख मला आजीबात कळला नाही
हा लेख मला आजीबात कळला नाही (कदाचित माझा बु दो). पण मला वाटलं होतं की लिनक्स एखाद्या सामान्य वापरकर्त्याला कशी वापरता येईल ह्याबद्दल वाचायला मिळेल. हा लेख वाचून लिनक्स म्हणजे काहीतरी अवघड आहे आणि ज्यांना ती वापरता येते फक्त त्यांना ती सोपी वाटते असा समज अजून पक्का झाला.
.
.
लिनक्स वर मायबोलीवर इतका छान
लिनक्स वर मायबोलीवर इतका छान लेख वाचायला मिळेल अस वाटल नव्हतं >> धन्यवाद अदिति.
माझ्या चौथीतल्या मुलाचे मित्र
माझ्या चौथीतल्या मुलाचे मित्र घरी येतात तेव्हा कधीही लिनक्स वापरले नसूनही त्यांचे काहीच अडत नाही. खरं तर वेगळं सांगितलं नाही तर पटकन लक्षातही येत नाही. खटाखट क्लिक क्लिक मारत फायरफॉक्स उघडून गेम्स चालू करतात.
कधीतरी एखाद्या गटग मध्ये डेमो
कधीतरी एखाद्या गटग मध्ये डेमो दाखवता येईल
व्वाह छान माहिती स्पॉक ! मी
व्वाह छान माहिती स्पॉक !
मी सध्या vi वापरण्याचा सराव करत आहे. जसेजसे जमते तसे ते अधिक सोपे वाटतेय आणि आवडतेय
मी सध्या vi वापरण्याचा सराव
मी सध्या vi वापरण्याचा सराव करत आहे. जसेजसे जमते तसे ते अधिक सोपे वाटतेय आणि आवडतेय
>>
<घसा साफ करण्याचा आवाज> हाय, ईमॅक्स युजर हियर!!
अनिवार्य, एक्सकेसीडी:
अनिवार्य, एक्सकेसीडी:
साभारः http://xkcd.com/378/
ईमॅक्स सोप्प आहे म्हणे vi
ईमॅक्स सोप्प आहे म्हणे vi पेक्षा. मी कधी वापरले नाही. आमच्या सरांनी बळजोरीने vi वापरायला लावले होते. पण आता छान वाटतेय
ईमॅक्स सोप्प आहे म्हणे vi
ईमॅक्स सोप्प आहे म्हणे vi पेक्षा >> हे व्यक्ती सापेक्ष आहे. पण एकुण ईमॅक्स जास्त चांगले!!
असंय का. ok ok.. मी आधी हे vi
असंय का. ok ok.. मी आधी हे vi वर हात साफ करतो थोडे दिवस. आणि मग ईमॅक्स पण पाहतो.
मी vi सोडून अनेकदा nano कडे पलायन केल्याने वातावरण जरा नाराजीचे आहे.
त्यामुळे तत्काळ ईमॅक्स कडे गेलो तर पुन्हा पलायन केल्याचा शिक्का बसेल. :p
त्यामुळे तत्काळ ईमॅक्स कडे
त्यामुळे तत्काळ ईमॅक्स कडे गेलो तर पुन्हा पलायन केल्याचा शिक्का बसेल. >>
ईमॅक्स > विम > नॅनो !!
अर्थातच, व्यक्ती सापेक्ष आणि काय कामासाठी वापरायचे त्यावर!
या "व्यक्ती" सापेक्ष मधले
या "व्यक्ती" सापेक्ष मधले व्यक्ती आमचे सर आहेत त्यामुळे अशी भानगड होते. एकतर मी इलेक्ट्रोनिक्स चा असल्याने software मध्ये फार बागडलो नाहीये. इलेक्ट्रोनिक्स संबंधी भाषा येतात फक्त ज्या इंडोज वरच वापरायचो आम्ही.
अभिजित, खुप सुंदर लेख लिहिला
अभिजित, खुप सुंदर लेख लिहिला आहेस. मला वाटतं की पुढील लेख लिनक्स वर चालणारी सॉफ्टवेअर्स उदा. Libre Office वगैरे वापरुन सामान्य वापरकर्ता विंडोजला पर्याय म्हणुन लिनक्स कशा तर्हेने वापरु शकतो यावर असला तर उत्तम.
शुभेच्छा
पुढील लेख लिनक्स वर चालणारी
पुढील लेख लिनक्स वर चालणारी सॉफ्टवेअर्स उदा. Libre Office वगैरे वापरुन सामान्य वापरकर्ता विंडोजला पर्याय म्हणुन लिनक्स कशा तर्हेने वापरु शकतो >> जरुर. हा विषय नोंदवुन ठेवला आहे.
धन्यवाद.
स्पॉक, लिनक्सबद्दल अतिशय
स्पॉक, लिनक्सबद्दल अतिशय उत्तम असा लेख.
मी स्वतः लिनक्स वापरकर्ता असल्याचा मला रास्त अभिमान आहे.
अतिशय छान माहिती घरच्या
अतिशय छान माहिती
घरच्या संगणकावर लिनक्स वापरायचे असल्यास काय करावे लागेल? सद्या विंडोज ७ आहे.
मस्त लेख!
मस्त लेख!
घरच्या संगणकावर लिनक्स
घरच्या संगणकावर लिनक्स वापरायचे असल्यास काय करावे लागेल? सद्या विंडोज ७ आहे.
>>
आत्ममग्न,
आपल्या या प्रश्नाचे उत्तर लिहायला घेतले होते. पण ते उत्तरच इतके मोठे आणि स्क्निशॉटशिवाय कठीण होते आहे की हे उत्तर स्वतंत्र लेख म्हणुनच लिहितो.
तोपर्यंत अगदी थोडक्यात म्हणजे जर २ जीबी पेक्षा जास्त रॅम असेल तर, http://torrents.linuxmint.com/torrents/linuxmint-17.3-kde-64bit.iso.torrent इथुन लिनक्स मिंट केडीई उतरवुन घ्या आणि तुमच्या विंडोज ७ मधेच व्हर्चुअलबॉक्स नावाचे सॉफ्टवेअर (https://www.virtualbox.org/wiki/Downloads ) टाकुन, त्या व्हर्चुअलबॉक्स मधे हे लिनक्स इन्स्टल करा आणि १ महिना तुमचे सगळे नेहमीचे काम यावर समाधानकारक होते का ते बघा. मगच लिनक्स थेट तुमच्या संगणकात ईन्स्टॉल करा.
आधीच थेट संगणकात न करता, व्हर्चुअलबॉक्स मधे करण्याचे कारण असे की, जर १ महिन्यांतर किंवा नंतरही कधीतरी तुम्हाला वाटले की आता लिनक्स नको, काढुन टाकुया, तरी लिनक्स चे बुट लोडर काढता येत नाही. आणि विंडोजचे बुट लोडर परत टाकण्यासाठी विंडोज रिइन्स्टॉल करावे लागते. त्यामुळे आता लिनस्क वापराचेच हे पक्के होईपर्यंत व्हर्चुअल बॉक्स मधेच वापरा.
लिनक्स चे बुट लोडर तसेच राहिल्याने विंडोज वापरण्यात काहीच अडचण येत नाही, पण ते दिसायला वेगळे दिसते आणि नुसते डोळ्यासमोर दिसते म्हणुनही काही लोकांच्या पोटात दुखते. लिनक्स चा नुसता ल म्हटला की लगेच अरे उसीकी वजहसे तेरा विंडोज स्लो चल रहा होगा वगैरे मुक्ताफळे चालु होतात.
या काही लिंक्सचा उपयोग होईलः
http://www.instructables.com/id/How-to-install-Linux-on-your-Windows/
http://www.wikihow.com/Install-Ubuntu-on-VirtualBox
२ जीबी पेक्षा कमी रॅम असेल तर व्हर्चुअलबॉक्स आणि त्यातील लिनक्स खुपच हळु चालेल कारणा आधीच बरीच रॅम विंडोजला स्वतःलाच लागेल.
ओ व्हर्चुअलबॉक्स तरी कशाला.
ओ व्हर्चुअलबॉक्स तरी कशाला. डायरेक्ट सीडी मधुन बूट करुन वापरुन बघा ना. नो झन्झट.
डायरेक्ट सीडी मधुन बूट करुन
डायरेक्ट सीडी मधुन बूट करुन वापरुन बघा ना. >> १ महिना + रोजच्या + नेहमीच्या कामासाठी म्हणुन. नेहमीचे काम करताना काय अडचणी येतात / येऊ शकतात ते कळण्यासाठी.
धन्यवाद स्पॉक, करून पाहतो.
धन्यवाद स्पॉक, करून पाहतो.
खुपच सुंदर लेख.
खुपच सुंदर लेख.
लिनक्सबद्दल अतिशय छान असा
लिनक्सबद्दल अतिशय छान असा लेख.
त्या वरच्या व्हर्चुअलबॉक्सच्या दुव्यात अनेक 'व्हर्चुअलबॉक्स' दिसतायत, त्यातला नेमका कोणता डाऊनलोड करायचा.
Pages