ओट्सचे आप्पे

Submitted by पूनम on 12 January, 2016 - 04:38
oats aape
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे Proud त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!

साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.

तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)

बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! Happy मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.

क्रमवार पाककृती: 

१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.

oats appe.png

मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351

वाढणी/प्रमाण: 
२१
अधिक टिपा: 

कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरचा रेसिपी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फुगणार नाहीत का?
फर्मेंटेशन नाही करायचे का? ओटस खायला हा आणि डोश्यांचा उपाय चांगला आहे. बाकी खीरी/उपमे बनवून पण त्यांचा पुठ्ठापणा झेपत नाही.

मस्तच लिखाण आणि फोटोही.

हे आप्पे बहिण करते मग आयते मिळतात खायला ;). माझ्याकडे आप्पेपात्र नाहीये.

छान.

अरे वा! हे नक्की करून बघेन.
भिजवून १० मिनिटांत करायचे पदार्थ माझे फेव्ह.! कारण आधीपासून प्लॅनिंग वगैरे फार झेपत नाही मला. Proud

अरे वा!!! सोप्पे आहेत की. जास्त खटपट नसल्याने सकाळी गडबडीत करायला छान वाटत आहेत. फोटोपण मस्त Happy

अरे! भरपूर ओटस पडलेत घरात. साबान्साठी आणले होते. अप्पे आवडते आणी नो भिजविन्ग कटाकटी, सो करुन बघणारच.

वॉव! मस्त दिसत आहेत ओट्सचे आप्पे. करून बघणार नक्की.
खाताना चिकट नाही ना लागत? मला फक्त धिरडी आणि दुधात शिजवून खायला आवडलेत ओट्स. उपमा नाही आवडला Sad

ती चटणी कशी केली? पुदिन्याची आहे का? इतका मस्त हिरवागार रंग कसा काय आलाय?

वा एकदम छान झालेले आहेत आप्पे थोडे बटाटे वड्यासारखे दिसत आहेत पिवळ्या रंगामुळे.

अशा पाककृती देताना एकेक स्टेप करताना एकेक फोटो दिला तर लवकर वाचकांना जास्त फायदा होतो.

करा करा आणि झब्बू द्या Happy

मंजू, नॉय चिकट नाही लागत. हीच खासियत वाटली यांची. झटपट तरी यम्मी!
पुदिना-कोथिंबीर-मिरची-लसूण-ओलं खोबरं यांची चटणी आहे ती.

बी, पाणी घालून भिजवलेल्या ओट्सचा फोटो काय टाकायचाय? करायची एखादी वेगळी पद्धत असेल, काही खास असेल तर फोटो ठीक आहे. यात असं काहीच नाहीये जे फोटो नाहीये म्हणून समजणार नाही. करून बघ बरं तू.

करुन पाहीन नक्की भाच्यांसाठी तरी एकदा करुन पाहीन. त्यांना नेहमी नवीन काहीतरी हव असत. आणि खूप अ‍ॅप्रीसीऐट करतात मी काही करुन दिल की Happy

एक विचारतो - १० मिनिटात ओट्स आणि रवा भिजतो का? रवा भाजून भिजवला तर चालतो का? एक आपला डमी प्रश्न Happy

रवा भाजून भिजवला>> भाजून असं लिहिलंय का? नाही ना? म्हणजे कच्चाच भिजवायचाय. कशाला साधी रेसिपी कॉम्प्लिकेट करतोय्स? Uhoh
तरीही, ’चालतो का’?- मला माहित नाही. मला असले प्रश्न पडत नाहीत. टीव्हीवरच्या बाईने कच्चा भिजवला म्हणून मीही.
रेसिपीमध्ये ’कच्चा’ असं संपादित करते.

पूनम, तू कच्चा रवा घेतला म्हणूनच मी भाजलेला रवा चालतो का असे विचारले आहे Happy

प्राची धन्यवाद Happy मी भाजलेलाच रवा घेईन Happy

सही! मस्त वाटतेय रेसिपी.
भाजलेला रवा वापरून केली तर हे गाणे जरूर गा -
(बोल ना हलके हलके च्या चालीवर )
गोल हे हलके आप्पे, हो गोल हे हलके आप्पे!
ओट्स चे हलके आप्पे ओ गोल हे हलके आप्पे!
रवा भाजून घेऊ जरा मंदशा आचेवर
...
...
Lol

भाजलेला रवा घालून केलं तर फुलतील का?

ढोकळा मी करते तेव्हा कच्चा रवा वापरला (बेसन पिठात घालते मी थोडा रवा) तर पीठ जास्त फुलतं (फुगतं), ढोकळा जास्त हलका होतो आणि भाजलेला रवा घातला तर कमी असा स्वानुभव म्हणून वरती लिहीलं.

बी करुन बघितल्यावर तुझा अनुभव लिही. पुनम यांचे कच्चा रवा वापरुन चांगले फुगलेत आप्पे.

अन्जू केले तर रवा भाजून करुन पाहीन.

कृती कॉम्पिकेटेड करण्याचा उद्देश नाही पण आपण शीरा करता, उपमा-उप्पीट करताना, रव्याचे लाडू करताना रवा भाजून घेतो तर रवा इडली करताना, रवा डोसा करताना रवा आंबवून घेतो. वरच्या कृतीमधे रवा भाजला नाही की फार वेळ भिजू दिला नाही. मला ही पद्धत पारंपरिक नाही वाटली. कारण पारंपरिक पद्धतीमागे एक शास्त्र असते. कित्येक महिने मी पुर्वी उपमा करताना रवा कधी भाजून घ्यायचो नाही. पोटात तो उपमा गच्च गोळा व्हायचा. म्हणून इथे रवा भाजण्याबद्दल मत मांडले. कृती छान आहे हे पुनश्च सांगतो.

दही, ताक, सोडा ह्यातले काहीही न घालता शिजल्यावर चिकट होणार्‍या ओट्सचे आप्पे फुलतात आणि भाजलेल्या रव्यापेक्षा कच्च्या रव्याचा ढोकळा जास्त फुलतो ही माहिती रोचक आहे Proud
त्यामुळे लवकरात लवकर करुन पाहणार आणि पूनमला कॉन्फिडन्स देणार Happy

वा वा... 'भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही' यात 'सोडा' वाचुन किती आनंद झालाय काय सांगु!!!! Happy

व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने तपासून पहा.
एका वेळी दोन मिश्रणं तयार करा. एक भाजलेल्या रव्याचं. दुसरं न भाजलेल्या रव्याचं. अप्पेपात्रातल्या अर्ध्या खळग्यांत एक मिश्रण , उरलेल्यात दुसरं. रिझल्ट काय येतो ते इथे फोटोसकट कळवा.
बाकीचे सगळे व्हेरिएबल्स : वेगळाच रवा,वेगळेच ओट्स, वेगळंच पात्र, गॅसचं वेगळंच तापमान, वेगळंच पाणी, इ. - सगळे कन्ट्रोल होतील.
फक्त एक आणि एकच व्हेरिएबल. रवा : भाजलेला, न भाजलेला.

मस्त झाले अप्पे. घरात भाजलेलाच रवा होता त्यामुळे तो वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तरीही मस्त टम्म फुगले अप्पे.

घरात ओट्स न आवडणार्‍या मेब्रांनी यात ओट्स आहेत हे ओळखले आणि खाण्यास नकार दिला Happy मला ओट्स आवडतात त्यामुळे अप्पेही आवडलेच.

Pages