शिवाजी महाराजांचा छावा - संभाजीराजे

Submitted by हेमू on 13 December, 2015 - 11:37

संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी झाला. शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी व मुत्सदी राजांचे पुत्र असल्यामुळे लढाई आणि राजकारण याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले. सईबाईंचे निधन संभाजी लहान असताना झाल्यामुळे संभाजींचा सांभाळ जिजाबाईंनी केला. पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ त्यांची दूध आई बनली. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण कळावे म्हणून शिवाजी महाराजांनी 9 वर्षाच्या संभाजींना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. शिवाजी महाराज आग्‍र्‍याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजींना सोसवणार नाही म्हणून संभाजींना काही काळ मथुरेला (मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी) सुरक्षित ठिकाणी ठेवले व मोगलांची दिशाभूल करण्यासाठी संभाजींचे निधन झाल्याची अफवा पसरवली. शिवाजी महाराज स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी स्वराज्यात सुखरूपपणे परतले.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर (1674) 12 दिवसांनी जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजींकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. संभाजींचे दरबारातील अनुभवी मानकर्यांशी मतभेद होऊ लागले. सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजींच्या विरोधात गेले व त्यानां अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे संभाजींना शिवाजी महाराजांबरोबर कर्नाटक मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजींचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना संभाजीला कोकणातील शृंगारपूरचे (संगमेश्वर) सुभेदार म्हणून पाठवावे लागले. सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजी हे राज्याचे योग्य वारस नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामचे नाव जाहीर करतील.

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजी व्यथित झाले आणि औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील झाले. परंतू दिलेरखानाने भूपाळगडावर हल्ला करून शरणागती पत्करलेल्या 700 मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. तसेच अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. या गोष्टीचा संताप येऊन संभाजी पन्हाळगडावर परतले. संभाजीचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी संभाजीची पन्हाळगडावर भेट घेवून शिक्षा न करता समजूत काढली. मात्र संभाजींच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजींना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या निधनाची (1680) बातमी सोयराबाईंनी संभाजींना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांचा संभाजींना पन्हाळगडावर कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा डाव होता. या प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी सोयराबाईंचे सख्खे बंधू असूनही संभाजींची बाजू घेतली. संभाजी हे गादीचे हक्काचे वारसदार आहेत. तसेच औरंगजेबाच्या स्वराज्यावरील हल्ल्याला तोंड देण्यासाठी संभाजीसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे आहे हे हंबीरराव जाणून होते. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावून अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ करून अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र सोयराबाईच्या सांगण्यावरून अण्णाजी दत्तोनी पुन्हा संभाजीराजांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा कट केला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा ठोठावली.

औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त व राज्य संभाजीराजांच्या स्वराज्यापेक्षा 15 पटींनी मोठे होते. औरंगाजेबाच्या सामर्थ्यशाली सैन्याशी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रामशेजच्या लढाईत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हिमतीने लढा दिला. मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला रामशेजचा किल्ला जिंकण्यासाठी आैरंगजेबाच्या सैन्याला साडेसहा वर्षे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

1689 च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे प्रयत्नांची शर्थ करूनही शत्रूने संभाजीराजांना व कवि कलश यांना जिवंत पकडले. त्यानंतर संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला.

संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढण्यात आली. तसेच फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने संभाजीराजांचे डोळे काढण्याची व जीभ छाटण्याची क्रूर शिक्षा करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. संभाजीराजांची हत्या 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला सर्व गोष्टी लहानपणापासून माहित असतात. बाबासाहेब पुरंदरेना शिवाजी महाराजांचा इतिहास माहित होता. तरी तरूणपणी शिवाजी महाराजांचे जूने दस्तऐवज मिळविण्यासाठी पावसात सायकलीवर रायगड, प्रतापगड इ. गडकिल्ले परिसरात ते फिरत. इतर इतिहासकारांनी लिहलेली शिवाजी महाराजांची पुस्तके असतानाही "राजा शिवछत्रपती" हे पुस्तक लिहले. मी बाबासाहेबांची बरोबरी करत नाही. संभाजीराजांचा गौरव करण्यासाठी हा धागा लिहला.

कथा कादंबरी मधे पोस्ट केलेले आहे. कादंबरी किती शब्दांची, पानांची असावी असा काही नियम असल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे लेखकाला संशयाचा फायदा नक्कीच देता येईल.

नवीन असल्यामुळे कुठे पोस्ट करावे समजले नाही. मायबोलीत टाईप करने अवघड होते म्हणून android docs to go मध्ये टाईप करून गुलमोहर मध्ये पेस्ट केले.

छत्रपती शिवाजी, संभाजी, बाजीराव पेशवे, व अन्य असंख्य मराठा सरदार/शिपाई यांच्या कथा परत परत वाचण्यास मला तरी कसलीच अडचण भासत नाही. कितीही वेळा वाचली तरी आमच्या या पूर्वजांच्या पराक्रमाच्या/त्यागाच्या कथा वाचताना/ऐकताना "वीट " येत नाही, कंटाळा येत नाही. Happy

Back to top