स्त्री अंधश्रद्धामुक्त झाली की घरदार (आणि समाजही) अंधश्रद्धामुक्त होईल हे तत्व का मान्य होत नाही?

Submitted by Rajesh Kulkarni on 29 November, 2015 - 02:08

स्त्री शिकली की घरदार शिकते, शहाणे होते हे मान्य,
तर मग मग स्त्री अंधश्रद्धामुक्त झाली की घरदार (आणि समाजही) अंधश्रद्धामुक्त होईल हे तत्व का मान्य होत नाही? त्याचा प्रचार का केला जात नाही?
.

शनीशिंगणापूरमध्ये एक मुलीने सुरक्षारक्षकांच्या नकळत शनीला तेल ओतण्याचा पराक्रम केला व काय होत आहे हे कोणाला कळण्याच्या आत तेथून पोबारा केला अशी बातमी वाचली.

स्त्रीपुरूषभेदभावाच्या विरोधातले हे कृत्य असले तरी त्याहीपुढे जाऊन या प्रकारांकडे पाहिले पाहिजे. आजच्या मटामधील प्रगती बाणखेलेंच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तुम्ही आमच्याविरूद्ध भेदभाव करता ना, आम्ही तेथे येणारच नाही अशा प्रकारचा स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संबंधीच्या हॅपी टु ब्लीड या मोहिमेतील काही जणींचा बहिष्कारप्रवण प्रतिसाद अधिक स्वागतार्ह आहे.

शिवाय मंदिरातील जात/लिंग यावर आधारित प्रवेशावर निर्बंध असण्याचा प्रकार आजही अस्तित्वात आहे हे अतिशय दुर्दैवी आहे हे मान्य केले, तरी महिला याच्याहीपलीकडे केव्हा जाणार अशी खंतही यानिमित्ताने वाटते.

घरातली एक स्त्री शिकली की सारे घरदार शिकते हे अतिशय सोपे सूत्र एव्हाना सर्वांना माहीत आहे व मान्यही आहे. त्याच धर्तीवर एक स्त्री अंधश्रद्धामुक्त झाली तर सारे घरदारही अंधश्रद्धामुक्त होईल ही चळवळ उभी करायला हवी. आज चतुर्थीचा उपवास नियमितपणे लक्षात ठेवून उपवास करणे यातच धन्यता मानणा-या अनेक जणी आहेत. हे तर फार साधे उदाहरण झाले. त्या सावित्रीबाईंचा वारसा सांगणा-या खचितच नाहीत.

त्यामुळे यापुढे स्त्रियांचा मंदिरप्रवेश, मासिक पाळीच्या काळातील निर्बंध, वगैरेंना फार महत्त्व न देता स्त्रीला अंधश्रद्धामुक्त करण्याची चळवळ उभी केली, तर त्यातून समाजाचे आरोग्य सुधारण्याचे कामही आपोआपच होईल. असे झाले तर समाजात अनैतिकता बोकाळेल असा सोयीस्कर प्रचार धर्माच्या नावाखाली काही लंडधारी करतील, पण तोही तेवढ्याच आक्रमकपणे हाणून पाडावा लागेल.

फुले दांपत्य, डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाबरोबरच अंधश्रद्धांवर अनेकदा प्रहार केलेच होते. पण त्यातला अंधश्रद्धांविरूद्धचा प्रचार मागे पडला आहे, नव्हे तो सोयीस्करपणे मागे फेकला गेला आहे. तेव्हा आमची ती श्रद्धा तुमची ती अंधश्रद्धा किंवा श्रद्धा व अंधश्रद्धा या वेगळ्या गोष्टी आहेत, अशा अपप्रचाराला किंवा बुद्धीभेदाला बळी न पडता अंधश्रद्धानिर्मूलनाच्या मागे आपली ताकद लावायला हवी.

हा विषय काढला की प्रत्येकवेळी मृत्युच्या दारी उभ्या असलेल्या किंवा दोन वेळचे खायला मिळत नसलेल्यांना देवाचा म्हणजे अंधश्रद्धांचाच आधार उपयोगी पडतो, भलेही त्यामुळे त्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नसेल, असा युक्तिवाद केला जातो. पण जेव्हा सगळे व्यवस्थित असलेले, खाऊनपिऊन सुखी असलेले, धडधाकट लोकसुद्धा या समजुतींना बळी पडलेले दिसतात, त्याबद्दल यांच्याकडे काही उत्तर नसते. मग हे सोयीस्करपणे ज्यांना तो मार्ग अनुसारायचा आहे त्यांच्या आड कोणी येऊ नये असा बचाव करतात. हा एक सामाजिक रोग आहे आणि तो जात, सांपत्तिक स्थिती, शिक्षण यांच्यावर अवलंबून नाही, हे लक्षात घेतले तर त्याचे गांभिर्य लक्षात यावे. तेव्हा या रोगावर उपाययोजना झाली तर समाजातील ब-याचशा दुखण्यांचे परिमार्जन आपोआपच होईल याची खात्री वाटते. सुदृढ व निरोगी समाजाची संकल्पना पुढे आणायला हवी.

म्हणूनच काल मी म्हटले तसे या कामासाठी आज आपल्याला नवीन दमाचे ज्योतीसावित्रीच हवेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या येथिल पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रियांचे स्थान हे दुय्यमच आहे.आजही स्त्रिया ह्या जरी विविध क्षेत्रात अग्रेसर असल्या तरी बर्याच जणांना ते रूचत नाही.आपल्या घरी मुलगी जन्माला येणे हे बर्याच सुशिक्षितांनाही कमिपणाचे वाटते ही वास्तुस्थिती आहे. जी लोकसंख्या आहे त्यात स्त्रिया ह्या संख्येने निम्म्या असाव्यात.स्त्रि ही कुठल्याही जातिधर्माची असो तिचे स्थान हे दुय्यम आहे.आता हे शनिशिंगणापुरचे उदाहरण येथे धर्माच्या नावाखालि स्त्रियांना सरळसरळ दुय्यम लेखले जाते तेथे वर कुलकर्णि साहेबांनी सुचवलेला बहिष्काराचा उपाय योग्य वाटतोय.ज्या देवस्थानात आमची किंमत नाही तेथे आम्हि जाणार नाही ही स्वाभिमानाचा जाणिव येणे गरजेचे आहे. अथवा त्या स्त्रिने जि बंडखोरीची भुमिका घेतली तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देउन इतर स्त्रियांनी तिचे अनुकरण करणे अथवा आंदोलन करणे योग्य राहील. धर्मानुसार स्त्रियांनि एखाद्या देवस्थानात जाणे हे निषेधार्ह असेल तर याचे कारण धर्माच्या मांडणित मिळेल. आंबेडकर साहेबांनि धर्मातल्या त्यांना अन्यायकारक वाटणार्या गोष्टिंबद्दल जे आंदोलन उभारले धाडस दाखवले तसे नेत्रुत्व जेव्हा स्त्रियांमध्ये निर्माण होइल त्यांना स्वत्वाची जाणिव होइल तो नक्किच सुदिन असेल.

इथे श्रद्धा-अंधश्रद्धा हा मुद्दा आहे की स्त्री-पुरुष समानता हे आधी नक्की करायला हवे.

जर मंदिरात स्त्रियांनी दर्शन घेऊ नये याला अंधश्रद्धा म्हणून बघितले तर,
कोणीतरी देव आहे ज्याची पूजा केल्यास तो आपले भले करतो याला सुद्धा काही जण अंधश्रद्धा म्हणू शकतात.
तसेच जर देव असतो ही अंधश्रद्धा नसून श्रद्धा मानले, तर मग त्याचे जे काही नियम जाणकारांनी बनवले आहेत जसे ईथे स्त्रियांनी दर्शन घेऊ नये, वा ठराविक काळात दर्शन घेऊ नये वगैरे, ते सुद्धा मग तितक्याच श्रद्धेने पाळायला हवेत.
जर अमुक तमुक देवाला प्रसन्न करायला अमुक तमुक पदार्थाचा नैवेद्य द्यावा किंवा त्याच्या वाराला वा सणाला अमुकतमुक निषिद्ध समजावे हे आपण कोणतेही लॉजिक न लावता पाळतो, तर मग एखाद्या देवाचे दर्शन स्त्रियांनी घेणे निषिद्ध समजले जात असेल तर ते देखील स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा उपस्थित न करता तितक्याच श्रद्धेने पाळण्यास हरकत नसावी.

आता जर याला स्त्री-पुरुष समानतेच्या द्रुष्टीकोनातून पाहिले तर,
वरच्या प्रतिसादात आले आहे की स्त्रियांनी त्या मंदिरावर बहिष्कार टाकावा याला अनुमोदन !
मी त्यापुढेही सुचवेन की इथवरच न थांबता स्त्रियांनी त्याच देवाचे एक छोटेसे मंदिर बांधावे आणि तिथे पुरुषांना प्रवेश निषिद्ध अशी पाटी लावावी. Happy

असो,
माझ्यामते त्या मुलीची ही कृती कौतुकास्पद आहे. अर्थात तिचा हेतू प्रामाणिक असेल अशी अपेक्षा करूया. आणि तिला स्थानिक लोकांचा, महिलांचा. तसेच प्रशासनाचा पाठिंबा मिळेल अशी आशा करूया.

अवांतर - एखाद्या ठिकाणी स्त्रियांना जाण्यास बंदी या विरुद्ध स्त्रिया कायद्याने आवाज नाही उठवू शकत का? कोर्टात केस टाकली तर कायदा काय बोलेल?

बातम्या म्हणताहेत की स्थानिक लोकांनी आज गाव बंद, दुकान बंद पाळला. स्थानिक बायकांनी त्यांना चूल बंद ठेवून साथ दिली म्हणे.

आता ही साथ बॅक हॅण्डेड कॉम्प्लिमेंटसारखी आहे का याची कल्पना नाही.

दुधाने अभिषेक करून देवाचे शुद्धीकरण कसे होणार? कुठले दूध वापरले? गायीचे, म्हशीचे, बकरीचे की वाघिणीचे? कुठल्याही जनावराचे असले तरी ते दूध मादी जनावराकडूनच मिळालेले असणार ना? एका स्त्रीच्या स्पर्शाने विटाळलेल्या देवाचे मादी जनावराच्या दुधाने शुद्धीकरण होणे हे तर्कसंगत वाटत नाही.

अहो त्या शिंगणापूरमध्ये काहीही तर्कसंगत नाही आहे. विश्वस्त मंडळींची टीव्हीवरची भाषा ऐकली तरी अ‍ॅरोगन्स त्यातून ओतप्रोत वाहत असतो.गेली कित्येक दशके तिथला भंपकपणा आम्ही पाहत असतो. बाहेरच्याच लोकाना त्याचे फार कौतुक असते. तिथले एकेक किस्से ऐकले तर डोक्याला हात लावायची पाळी येईल.

रॉबिनहूड,
खरोखरच तसे आहे. चोरी न होणे हाही तसाच खोटारडेपणाचा प्रकार आहे. चो-या होतात, त्यांची नोंद केली जात नाही.

स्त्रीच अंधश्रद्धा मुक्त होणार नाही तर पुढचं कठीण आहे.आणि एखादी होऊ पाहील तर समाज तसे करू देत नाही.इकडच्या ग्रामपंचामती खाप पंचायती होत आहेत.
"आमच्याकडे तुळस जगतच नाही" याचे उत्तर शोधण्याऐवजी घरात सोवळं पाळत नाही मानण्याकडेच कल असतो.
थोडक्यात इकडे अंधश्रद्धा "ठूँस ठूँस कर भरी हैं।

srd,
अगदी योग्य. तेथील विश्वस्तच वेडे अाहेत म्हणावे तर सारा गावच तसा आहेसे दिसते. एकमेकांवर दबाव टाकूनही हे होत असेल, पण एकूण परिस्थिती गंभीर आहे हे खरे.

ऋन्मेऽऽष,
केवळ स्त्रीपुरूष समानतेचाच प्रश्न नाही. आपण तेथेच अडकून पडलो आहोत, तेव्हा पुढच्या म्हणजे अंधश्रद्धांना केव्हा हात घातला जाईल हा मुद्दा आहे.

श्रद्धा - अंधश्रद्धांच्या सीमारेषा फार धुरकट आहेत हो.
आत्ता तुम्ही संकष्टीला उपवास करण्यालाही अंधश्रद्धा म्हणताय मग काय बोलावे?
उद्या लोक दिवाळीला करंज्या आणि गणपतीला मोदक करण्यालापण अंधश्रद्धा म्हणतील.

माझा तरी असा लपून छपून तेल ओतून पोबारा करण्याला अगदी विरोध आहे.
यात तुम्ही एखादी गोष्ट लपून करताय याचाच अर्थ ती गोष्ट उघड करण्याची तुमची मानसिक तयारी आणि हिंमत नाही.
स्त्रियांची संघटना करा, जागृती करा, तिथल्या विश्वस्तांसमोर सत्याग्रह करा, किमान सर्वांसमक्ष बेलाशक देवळात घुसून तेल वहा आणि परिणामांना सामोरे जा, तर या सगळ्या स्टंटला काही अर्थ!

जम्माडी जम्मत. सकाळी बातम्यान्मध्ये दाखवले की ज्या वेळेस ती मुलगी/ स्त्री हे सगळे करत होती त्यावेळी चौथर्‍यावर मागच्या साईडला एक माणुस दारु पित बसला होता. हरे राम! मग शनी देव दारु पिणार्‍यावर कोपतील की या स्त्रीवर?

तिथे बाबा अरगडे नावाचे एक प्राध्यापक आहेत त्यांनी चला चोरी करायला शिण्गणापूरला नावाचे पथ नाट्य लिहिले आहे. धमाल आहे ते.

साती, त्या तरुणीने लपूनछपून काही केलेले नाही. चौथर्‍याभोवती चांगलीच गर्दी, रांगा लागलेल्या होत्या.

https://www.youtube.com/watch?v=7jDea6qONH8

मात्र तिने हे जाणीवपूर्वक रूढींविरोधात पुकारलेले बंड आहे की एक इम्पल्सिव्ह कृती याबद्दल दुमत होऊ शकेल.

यानिमित्त विचारमंथन होऊ लागलंय हे चांगलं की दोन्ही -तिन्ही बाजू अधिकच दुराग्रही होऊ लागल्यात हे वाईट हे कळत नाही.

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/security-guard-drink-n...
झी न्युजने शनिमंदीराच्या आवारात सुरक्षा रक्षक मद्यपान करत असल्याचा व्हिडीओ समोर आणला.
महिला प्रवेश केल्याने देव कोपत असेल तर मद्यपान केल्याने देव कसा कोपत नाही?

यात आणखी एक लोच्या आहे. डॉ नीलम गोर्हे या नी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे नेमके कोणत्या बाजूने. नीलमताईंची एकूण मते विचारात घेता त्या स्त्रीस्वातंत्र्याच्या बाजूच्या आहेतच.पण त्यांच्या पक्षाचे काय? राकु म्हणतात तसे आणि जनरलीच सेनेला वैचारिक बेसच नस्ल्याने त्यांची हिंदुत्वाच्या दृष्टीने काय भूमिका आहे हे स्पष्ट नाही. त्यामुळे विधानसभेत बाकी शिवसेना आमदारांचा त्याना पाठिम्बा राहील काय ? २००० साली दाभोळकरानी शिंगणापूर येथे स्त्रियांणा चौथर्‍यावर प्रवेश देण्याचे आंदोलन केले होते तेव्हा शिवसेनेचे दोन आमदार आणि खा. चंद्रकांत खैरे यानी त्याला विरोध केलेला होता. हे एक आणि दुसरे असे की भाजप ची भूमिका काय राहील . भाजप तर ऑर्थोडॉक्स लोकांच्याच बाजूने असतो त्यामुळे दुग्दाभिषेकी लोकांच्या बाजूने राहणे त्यांचे इतिहासदत्त कर्तव्य आहे. त्यामुळे नीलमताईंना हा विषय मांडायला सेना आणि भाजपचे मुखंड परवानगी देनार काय हा कळीचा मुद्दा आहे. त्यात आता त्या मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका असणार आहे. त्यामुळे स्त्रीवाद आणि राजकारण यातून त्या कशाची निवड करतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
तसेच भाजपचे आमदार राम कदम यानी कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या पूजेबाबत स्त्रियांची बाजू घेतली होती व तो हक्क स्त्रियाना मिळावा यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी ते मनसेत होते. आता ते भाजप चे आमदार आहेत. त्यांची विधानसभेत काय भूमिका मांडणार आहेत ते? की आपण त्या गावचे नाहीत. त्यामुळे नीलमताईंना सभागृहात हा विषय माडण्याचे स्वातंत्र्य पक्ष आणि आणि मित्रपक्ष देणार काय?
दुसरी कडे आमदार प्रणिती शिंदे यानी त्या मुलीचे कौतुक केले आहे आणि तिचा त्या सत्कार करणार आहेत. आ. प्रणिती ( सुशीलकुमारांच्या कन्या ) ज्या स्माजातून आलेल्या आहेत त्या समाजाने हिंदुत्व नाकारलेले नाही. तरीही त्यानी घेत्लेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. हिंदू असूनही त्याना समानतेची भूमिका घेता येते तर बाकी ' हिंदूंची ' अक्कल काय चरायला गेली आहे.

उद्धवजीनी आजोबांचे वाड.मय नक्कीच वाचले असेल ते त्यांनी शिवसैनिकांच्या गळी उतरवण्याची फारच गरज आहे... ( किती कडव्या शिवसैनिकांनी प्रबोधनकारांचे वाड.मय वाचले असेल ?)

आजच्या महाराष्ट्राचा पाया गेल्या शतकात घातला गेला. तेव्हा महाराष्ट्राला वळण लावणा-यांमधे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचं नाव खूप वरचं आहे. पण ज्यांना ते प्रबोधनकार म्हणून भावले, त्यांना ठाकरे नावाची ऍलर्जी होती. तर ठाकरे म्हणून त्यांच्या प्रेमात पडणा-यांना, प्रबोधनकार असण्याचा विटाळ होता. त्यामुळे प्रबोधनकार कायम दुर्लक्षित राहिले.
प्रबोधनाकार डॉट कॉम वरून

उद्धवजी अथावा यांनी प्रबोधनकारांचे वाड.मय वाचून आचरले तर ते निवडून येणार नाहीत. त्यांचा 'यूएसपी'च नष्ट होइल. एव्हन बाळासाहेबांची देखील हीच अडचण होती असे वाटते.

आणखी एक प्रश्न. कोणत्या दुधाने शुद्धीकरण केले? गाय म्हैस की शेळी, उंटीण, की वाघीण? शेवटी मादीचेच दूध वापरावे लागले ना? मग एक स्त्राव पवित्र आणि दुसरा अपवित्र कसा? बेसिकम्ध्येच लोच्या आहे हो....