बनुताईंची संध्याकाळ

Submitted by एम.कर्णिक on 30 August, 2009 - 04:18

शाळा सुटली म्हणजे बनुताई येतात रिक्शाकडे
सुरेश सांगतो हासत हासत कसे दिसे रुपडे

"सुटलेलि शूलेस, हेअरबँड हातात नि बॅग मागे फरफटतात
विस्कटल्या ड्रेसवर मातीचे डाग, 'डाग चांगले असतात' म्हणतात"

बनुताई येतात हाततोंड धुवुन अन फ्रॉकही बदलून
अजून चालू असते 'धूम मचा ले' ची धून

आई देते गोड शिरा पण दूधहि लावते प्याया
झोपुन थोडे बनुताई होतात तयार खेळाया

पण बाबांचा हुकूम सुटतो 'बनू बस अभ्यासाला'
अन् मग लागे जबरदस्तिने टेबल्स घोकायाला

गरिब बिचार्‍या आजोबांनाच शिक्षा ती खाशी
इथेहि चालते बनुताईंची सॉलिड चापलुसी

"टू वन्जा टू …. टू वन्जा टू …. आजोबाऽऽ, तो बगा आला टांगा;
टू वन्जा टू …. टू टू जा फो ….पन फाय का नाय ? सांगा"

हताश होऊन आजोबा हात डोक्यावर नेतात
धुम मचा ले ओरडत बनुताई तेव्हढ्यात धुम ठोकतात

बाहुली बाहुला, ठिक्करबिल्ला कोण हे खेळेल?
बनुताईंची गँग खेळते क्रिकेट सारा वेळ

दिवेलागणीच्या वेळी मग घरात त्या येती
'दिव्या दिव्या' अन् 'शांताकारम्' बाबांसह म्हणती

रात्री जेवण भरवायाला आजोबाच त्यांना हवे
हट्टापुढती बाबानाही लागे नमते घ्यावे

मउ भाताचे घास आजोबा गोलगोलसे करतात
घास गालात अन् बोबड्या बोलात बनुताई फर्मावतात,

"ऑजोबॉ मॉलॉ पुडच्यॉ घॉशॉत मॉरंबॉ पॉयजेलॉय"
नाही म्हणतिल आजोबा ऐशी बिशात त्यांची काय?

"भात संपव आधि" किचनमधून आई ओरडते
आजोबांचे जाते बोट तोंडावर नि मुरंब्याचि फोड मिळते

झोपताना बनुताई स्वत:च सांगतात आजोबाना गोष्टी
निष्पाप बोलांनी नकळत भिजते आजोबांची दृष्टी

"आजोबा, शांगा न आजीला तुमी हाक काय मालायचा?
बाबा कशे आईला 'चिम्' म्हंतात तशे तुमि काय बोलायचा?"

बनुताईना घेतात जवळ आजोबा नि मायेने थोपटतात
हळु हळु आंगठा चोखत बनुताई निद्रावश होतात

आजीच्या साडीची आजोबानी शिवलेली मऊ उबदार दुलई,
तिच्यात स्वत:ला घेऊन गुरफटुन निजतात बनुताई

गुलमोहर: 

खुप मस्त! खरेच का तुमची बनुताई आहे? की कल्पनेतली? माझी बनुताई (आर्या) आठ वर्षे वयाची आहे.फुलपाखरासारखी आनन्दी.पण राग आला की...!

आईप्रमाणेच मलाही बनुताईच्या कविता खुप आवडतात.मी आजच सदस्य झाले.मला बनुताईच्या अजून खुप कविता वाचायच्या आहेत -आर्या.

आर्या,
बेटा तुला बनुताई आवडल्या ते वाचून आजोबांनाही खूप आनंद झाला आणि बनुताईंना पण. त्यानी कबूल केलंय आपल्या गमतीजमती तुला सांगायचं. वाचत रहा. हं? आणि बेटा, तुझी आई म्हणते तुला कधी कधी राग येतो. का ग? फुलपाखरांना रागावताना पाह्यलयस तू कधी? नाही न? म?