राशिभविष्य नोव्हेंबर २०१५
(के. पी. पद्धतीप्रमाणे)
(खालील राशी भविष्य अॅस्ट्रॉलॉजी काउन्सेलिंग तर्फे देण्यात आलेली आहेत.)
(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)
मेष:मेष राशीचा स्वामी मंगळ पंचमात, रवि सप्तमात व पंचमेश आहे. प्रथम व षष्ठ स्थानाचा संबंध आल्यामुळे उष्णतेचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. पण रवि पंचमेश असल्यामुळे तीव्रता कमी जाणवेल. द्वितीयेश शुक्र पंचमात व रवि सप्तमात आणि राहू षष्ठात त्यामुळे आर्थिक बाबतीत परिस्थिती साधारण राहील. कदाचित हा आर्थिक लाभ शेअर्स अगर म्युचुअल फंड ह्यामार्गाने पण होऊ शकतो. तृतीयेश बुध सप्तमात असल्याने जोडीदाराबरोबर थोडे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जुळवून घेण्यातच शहाणपणा आहे. चतुर्थेश चंद्राचा काही काळासाठी अष्टमातील शनिशी नवपंचम योग होईल. घरगुती बाबतीत तो काळ उत्तम जाईल. तरीही अष्टमातील शनिमुळे थोडाफार मानसिक ताण जाणवेल. पंचमातील तीन ग्रह, मंगळ, गुरु आणि शुक्र, मुलांच्या दृष्टीने उत्तम आहेत, त्यांच्या अभ्यासातील प्रगतीच्या दृष्टीने काळजी नसावी. दशमेश शनि अष्टमात असल्याने नोकरीतील ताणामुळे मानसिक ताण जाणवेल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.
वृषभ :वृषभ राशीचा स्वामी शुक्र चतुर्थात, रवि षष्ठात असल्याने शरीरप्रकृतीसंबंधी काही त्रास उद्भवू शकतो. पण पंचमातील राहूमुळे आजारपणाला ताबडतोब आळा बसेल. त्यामुळे फारसे काळजीचे कारण नाही. द्वितीयेश बुध षष्ठात, मंगळ चतुर्थात आणि राहू पंचमात त्यामुळे घरासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे. तरीही चतुर्थात तीन ग्रह, मंगळ, गुरु, शुक्र असल्याने घराबाबत होणारा खर्च त्रासदायक ठरणार नाही. पहिल्या आठवड्यात तृतीय स्थानातील चंद्र काहींच्या बाबतीत लहानसा प्रवास घडवून आणू शकतो. पंचमेश बुध षष्ठात व मंगळ चतुर्थात मुलांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. तसेच शेअर्सचा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील जपून व्यवहार करावेत. षष्ठेश शुक्र चतुर्थात व रवि षष्ठात असल्याने हा योग शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायक आहे, विशेषत: क्लासेस असणाऱ्यांना आर्थिक फायदा चांगला होईल. सप्तमात शनि व सप्तमेश मंगळ चतुर्थात जोडीदाराशी किरकोळ स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे, पण साधारणपणे वातावरण उत्तम राहील. अष्टमेश गुरु चतुर्थात व शुक्र देखील तिथेच, त्यामुळे वाहने शक्यतो जपून चालवावीत. दशमेश शनि सप्तमात असल्याने बिल्डींग मटेरीअलचा व्यवसाय असणाऱ्यांना आर्थिक लाभ उत्तम होईल. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल.
मिथुन :मिथुन राशीचा स्वामी बुध पंचमात असून राहू चतुर्थ स्थानी कन्या ह्या बुधाच्या राशीत आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहील आणि त्या अनुषंगाने प्रकृती देखील उत्तम राहील. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र द्वितीय स्थानी असल्याने काही लोकांना अचानक धनलाभाची पण शक्यता आहे. गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात, ज्यांचा व्यवसाय पुस्तकाशी संबंधित आहे, अश्यांचा व्यवसाय उत्तम चालेल. तसेच लेखक आणि शिक्षक ह्यांन सुद्धा हा काळ अनुकूल आहे. चतुर्थात मंगळ, शुक्र व राहू हे तीन ग्रह असल्याने तुम्ही घरगुती बाबतीत जास्त लक्ष द्याल व काही लोकं कुटुंबासमवेत मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आखण्याची शक्यता आहे. षष्ठातील शनि व पंचमातील रवि प्रकृती उत्तम ठेवेल ह्यात शंकाच नाही, पण षष्ठ स्थान हे धन स्थान असूनही आर्थिक बाबतीत मात्र सावधगिरी बाळगावी. सप्तमेश गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात, जोडीदाराशी सुखसंवाद होतील. अष्टमेश शनि षष्ठात त्यामुळे ज्यांचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय आहे त्यांना उत्तम लाभ होतील. दशमेश गुरु तृतीयात व शुक्र चतुर्थात आणि शनि षष्ठात हे सर्व ग्रहयोग नोकरी करणाऱ्यांना सर्वसाधारण असतील. ज्यांचे व्यवसाय फिरतीचे आहेत अश्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लाभेश मंगळ चतुर्थात व रवि पंचमात घरासंबंधी काहीतरी काम निघण्याची शक्यता आहे. ज्यांना घर विकायचे आहे अश्यांनी थोडा संयम बाळगावा. एकंदरीत हा महिना मिथुन राशीसाठी उत्तमच आहे!
कर्क :कर्क राशीचा स्वामी चंद्र महिन्याच्या सुरुवातीला स्वराशीतच, बुध चतुर्थात आणि केतू नवमात असल्याने शरीर प्रकृती व्यवस्थित राहील. द्वितीयातील गुरु आर्थिक परिस्थिती व्यवस्थित ठेवेल. तृतीयात मंगळ, शुक्र, राहू हे तीन ग्रह आणि केतू नवमात निश्चितपणे प्रवास घडवून आणतील. तसेच पुस्तक लेखन, पुस्तक विक्रेते ह्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. चतुर्थातील रवि आणि बुध तुम्हाला कुटुंबाच्या अधिक जवळ आणतील आणि तुम्ही कुटुंबासाठी बराच वेळ घालवाल. पंचमातील शनि व तृतीयातील मंगळ मुलाबाळांच्या दृष्टीने उत्तम आहे. सप्तमात मकर रास असून शनि पंचमात आहे व रवि चतुर्थात, ह्यामुळे कुटुंबात जोडीदाराशी सुखसंवाद होतील. दशमातील मंगळ तृतीयात आणि रवि चतुर्थात त्यामुळे नोकरीतील तुमचे स्थान उंचावत राहील, नोकरीच्या निमित्ताने प्रवास होत राहतील आणि त्यायोगे बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती देखील संभवते. काहींना प्रमोशन मिळण्याचे देखील योग आहेत. एकंदरीत हा महिना नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
सिंह :गुरु सिंह राशीत, सिंह राशीचा स्वामी रवितृतीयात, बुध-रवि तृतीयातच ह्यामुळे शरीर प्रकृतीविषयी कोणतीही काळजी राहाणार नाही. द्वितीय स्थानातील तीन ग्रह मंगळ, शुक्र, राहू आर्थिक लाभासाठी उत्तमच आहेत, त्यातल्या त्यात ज्यांचा संबंध कम्युनिकेशन, व्याख्याने आणि शिक्षण खाते ह्याच्याशी आहे अश्यांना विशेष लाभदायक आहे. चतुर्थातील शनि, वृश्चिकेतील मंगळ आणि तृतीयातील रवि थोडाफार प्रवास दाखवत आहेत. पंचमेश गुरु प्रथम भावात असल्याने मुलांशी सलोख्याचे संबंध राहतील, तसेच त्यांच्या शिक्षणाबाबत चिंता राहणार नाही. षष्ठेश शनि चतुर्थात व रवि तृतीयात त्यामुळे जुन्या दुखण्यांचा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे, पण रविमुळे परिस्थिती आटोक्यात राहील. काळजीचे कारण नाही. सप्तमेश शनि जोडीदाराशी किरकोळ मतभेदाचे प्रसंग आणण्याची शक्यता आहे. नवमेश मंगळ द्वितीयात आणि रवि तृतीयात प्रवास घडवून येण्यास पुष्टी देतात. दशमेश शुक्र द्वितीय स्थानी व रवि तृतीय स्थानी त्यामुळे नोकरी अगर व्यवसायातील लोकांना प्रमोशन व आर्थिक लाभाची शक्यता आहे, तसेच कामाच्या निमित्ताने प्रवास देखील घडतील. एकंदरीत सिंह राशीला हा महिना चांगला आहे.
कन्या :तीन ग्रह, मंगळ, राहू व शुक्र कन्या राशीत व कन्या राशीचा स्वामी बुध द्वितीय स्थानी तसेच तो दशमेश असल्याने शरीर प्रकृती तर सुदृढ राहीलच, याशिवाय तुमचा सामाजिक दर्जा देखील उंचावण्याची शक्यता आहे. द्वितीयातील रवि व बुध आर्थिकदृष्ट्या चांगलेच आहेत, आर्थिक लाभ करून देतीलच. तृतीयेश मंगळ लग्नी व रवि द्वितीय स्थानी त्यामुळे तृतीय स्थानाच्या माध्यमातून म्हणजेच पुस्कात विक्रेते आणि ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अश्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. ह्या महिन्यात घरासंबंधी थोडाफार खर्च करावा लागेल असे दिसते. पंचमेश शनि तृतीय स्थानी असल्याने मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळजी नसावी. सप्तम स्थानी केतू व सप्तमेश गुरु बाराव्या स्थानी असल्याने जोडीदारापासून काही काळ लांब राहण्याचे योग आहेत. अष्टमेश मंगळ लग्नी आणि रवि द्वितीय स्थानी. द्वितीय स्थान मारक स्थान असल्याने व अष्टमेश मंगळ लग्नी असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. नवमेश शुक्र लग्नी व रवि द्वितीय स्थानी त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना सफलता मिळेल. लाभेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला तिथेच असल्याने बऱ्याच लोकांना आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकुणात हा महिना अतिशय उत्तम जाईल असे दिसते.
तूळ :तूळ राशीचा स्वामी शुक्रबाराव्या स्थानी आणि रवि प्रथम स्थानी ह्यामुळे २-३ गोष्टी संभवतात. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग आहेत.काही लोकांना जर धन स्थान उत्तम असल्यास, परदेशातून नोकरी अगर व्यवसायाद्वारे पैसा मिळण्याची शक्यता आहे. शरीर प्रकृती विषयी काळजी नसावी, जरी शुक्र बाराव्या स्थानी असला तरी रवि प्रथम व गुरु लाभ स्थानी आहे. द्वितीयातील शनि काही प्रमाणात आर्थिक अडचण निर्माण करेल असे दिसते. तृतीयेश गुरु लाभात, शुक्र बाराव्या स्थानी ह्या योगात तुम्ही गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल असे दिसते. मात्र योग्य ठिकाणीच गुंतवणूक होईल ह्याची खबरदारी घ्यावी. चतुर्थेश शनि द्वितीयात आणि रवि लग्नी कुटुंबासाठी अगर घरासाठी बराच खर्च होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ चांगलाच आहे. सप्तमेश मंगळ बाराव्या स्थानी व रवि लग्नी ह्यामुळे जोडीदार लांबच्या प्रवासास जाण्याची शक्यता आहे. दशमेश चंद्र सुरुवातीला दशमात व गुरु लाभात असल्याने महिन्याच्या सुरुवातीला आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे.एकुणात महिना उत्तम राहील.
वृश्चिक :वृश्चिक राशीचा स्वामी मंगळलाभात, रवि महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्याच राशीत आणि राहू देखील लाभात त्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील व कामात तुमचा उत्साह देखील चांगलाच राहील. फक्त शनि तुमच्याच राशीत आणि पहिल्या पंधरवड्यात रवि बाराव्या स्थानी त्यामुळे काही लोकांची जुनी दुखणी उद्भवण्याची शक्यता आहे. द्वितीयेश गुरु दशमात व शुक्र लाभात ह्यामुळे आर्थिकदृष्ट्या लाभदायक काळ आहे हे निश्चित! पंचमेश गुरु दशमात व शुक्र लाभात आणि शनि तुमच्याच राशीत हे योग प्रथमदर्शनी जरी लाभदायक वाटले तरी शक्यतो शेअर ब्रोकर्सनी व्यवहार जपूनच करावेत. मुलांच्या शाळेतील व अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. सप्तमेश शुक्र लाभात असल्याने जोडीदाराशी सुखसंवाद होतील. नवमेश चंद्र नवमातच असून बुध बाराव्या स्थानी आहे. त्यामुळे काही लोकांना महिन्याच्या सुरुवातीलाच परदेशगमनाचे अगर लांबच्या प्रवासाचे योग दिसत आहेत. नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम आहे, आर्थिक लाभ चांगलेच होतील. एकंदरीत हा महिना वृश्चिक राशीला चांगलाच आहे.
धनु :धनु राशीचा स्वामी गुरुनवमात, शुक्र दशमात आणि शनि बाराव्यात त्यामुळे कामासंबंधी प्रवास घडण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शनि बाराव्या स्थानी आणि रवि पण महिन्याच्या उत्तरार्धात बाराव्या स्थानी त्यामुळे खिशाला कात्री लागण्याची शक्यता जास्त! तृतीयेश शनि देखील बाराव्या स्थानी आणि रवि देखील बाराव्या स्थानी येत असल्यामुळे उत्तरार्धात प्रवासाची शक्यता वाढत आहे. पंचमेश मंगळ दशमात त्यामुळे मुलाबाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. सप्तमेश बुध लाभात आहे त्यामुळे जोडीदाराशी संवाद सुखाचे राहतील. महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात चंद्र व बुध लाभात असल्याने मानसिक ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. दशमात मंगळ, शुक्र, राहू हे तीन ग्रह व दशमेश बुध लाभात आणि महिन्याच्या पूर्वार्धात रवि पण लाभात ह्या ग्रहस्थितीमुळे निश्चितच धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ तसेच पदोन्नती किंवा कामाची विशेष दखल घेतली जाणे ह्या पैकी काहीतरी निश्चितपणे संभवते. एकंदरीत हा महिना धनु राशीसाठी सर्व दृष्टींनी उत्तम आहे.
मकर :मकर राशीचा स्वामी शनिलाभात व रवि दशमात त्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान अगर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. द्वितीयेश शनि असल्यामुळे आर्थिक लाभ देखील बऱ्यापैकी होतील. तृतीयेश गुरु अष्टमात व शुक्र नवमात बऱ्याच लोकांना धार्मिक स्थळी प्रवास होण्याची शक्यता आहे. चतुर्थेश मंगळ नवम स्थानी, रवि दशम स्थानी व राहू देखील नवमात ह्यामुळे घरात मंगल कार्य अगर धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. पंचमातील योग मुलाबाळांच्या अभ्यासातील व इतर प्रगतीच्या दृष्टीने चांगले आहेत. सप्तमेश चंद्र महिन्याच्या सुरुवातीला सप्तमातच त्यामुळे जोडीदाराशी सुखसंवादात चंद्राच्या कलेप्रमाणे फरक पडेल. दशमात रवि व बुध हे दोन ग्रह, राहू नवमात त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ त्यांच्या प्रमोशनच्या दृष्टीने चांगलाच आहे, तसेच पीएच. डी. करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फलदायक आहे. लाभातील शनि अनेक प्रकारचे फायदे मिळवून देईल. एकुणात हा महिना बऱ्याच अंशी उत्तम आहे.
कुंभ :कुंभ राशीचा स्वामी शनिदशमात वृश्चिक राशीत आणि रवि नवमात त्यामुळे शरीर प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नाही. तसेच तुमचा उत्साह देखील चांगला राहील. द्वितीयेश गुरु सप्तमात व शुक्र अष्टमात त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आर्थिक व्यवहार जपून करावेत. तृतीयेश मंगळ अष्टमात व महिन्याच्या उत्तरार्धात रवि दशमात हा योग तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या तब्येतीची काळजी घ्यायला लावेल. तसेच तुमच्या देखील प्रवासात अडचणी येण्याचा संभव आहे. वाहने चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. पंचमेश बुध नवमात व राहू अष्टमात मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायला लावतील. गुरु सप्तमात, शुक्र अष्टमात आणि शनि दशमात ह्या योगामुळे तुमच्या कार्य व्यस्ततेमुळे जोडीदाराशी फारसे संवाद होणार नाहीत. दशमात शनि आणि महिन्याच्या उत्तरार्धात दशमातच येणारा रवि हा योग नोकरीसाठी अतिशय उत्तम आहे. एकंदरीत हा महिना कुंभ राशीला संमिश्र फळे देईल असे दिसते.
मीन :मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठात आणि शुक्र सप्तमात असल्याने प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. द्वितीयेश मंगळ सप्तमात आर्थिक व्यवहार जपून करण्याचे सुचवतो. तृतीयेश शुक्र सप्तमात आणि राहू देखील सप्तमातच असल्याने प्रवास शक्यतो टाळावेत, अडचणी येण्याची शक्यता आहे. चतुर्थेश बुध अष्टमात असल्याने वाहने चालवताना खबरदारी घ्यावी. शेअर ब्रोकिंग चा व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सप्तमात मंगळ, शुक्र व राहू हे तीन ग्रह हा योग नोकरी करणाऱ्या जोडीदाराच्या आर्थिक लाभासाठी कारणीभूत होईल. दशमेश गुरु षष्ठात असल्याने नोकरी करणाऱ्यांना थोड्याफार आर्थिक लाभाचे योग आहेत. लाभेश शनि नवमात असल्याने नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांबरोबर सलोख्याचे धोरण ठेवावे. एकंदरीत हा महिना मीन राशीला संमिश्र आहे.
धन्यवाद पशुपति
धन्यवाद पशुपति
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद पशुपती. यावेळेस,
धन्यवाद पशुपती.
यावेळेस, कारणमिमांसेदाखल गोचरीची ग्रहस्थिती सांगत भविष्य कथन केल्याने अधिक नीटपणे समजते आहे व अभ्यासही होतो आहे.
इथे हा प्रश्न योग्य आहे का ते
इथे हा प्रश्न योग्य आहे का ते माहिती नाही . मला केतु महादशे बद्दल माहिती मीळु शकेल का??