श्रीमंत बाजीराव पेशवा ...

Submitted by शैलेशगांवकर on 16 August, 2015 - 13:36

15814_1076257192390201_4556610403942437597_n.jpg

!! रणपंडीत बाजीराव !!!!

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं चाळीसच वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ वीसच वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या वीसच वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती याच बाजीरावाने ! कर्तबगार पेशव्याची आज जयंती. यानिमित्ताने आज हा मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूया. अभिमानाने फुलून जाऊया!!!!

आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलीकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती, साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा कल्पना!! या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे! पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो… नाहीतर मग त्याची जात पाहतो! वस्तुत: महापुरुषांची ‘जात’ नसते पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची ‘वात’ आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली ‘कात’ पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खर्‍या स्वरूपात खुला होतो. उदाहरणार्थ – ब्रिटिश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन ‘A masterpiece of strategic mobility’ या गौरवपूर्ण शब्दांत केलंय! मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि नंतर स्वत:चीच असफजाही राजवट सुरू केलेल्या निजामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत १७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा करार मानायला नकार दिला. वर शहाणा कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू दोघांनाही म्हणू लागला ‘‘तुमच्यातला खरा छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल.’’ पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे संभाजी निजामाला सामील झालेले. महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे काय! पण शाहूंनी मात्र या अपमानास्पद गोष्टींना थारा द्यायचा नाही असं ठरवलं आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. या काळात निजाम स्वत: ऐवजखानासोबत पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता, त्याचा सरदार तुर्कताजखान नाशिक व संगमनेर भागात धुडगूस घालत होता आणि रंभाजी निंबाळकर सातार्‍यावर बरसत होता. स्वराज्यावर असं चहूबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसर्‍याला त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युतवेगाने थेट औरंगाबादच्या दिशेने आणि काही समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या निजामी प्रांताचा पार चुथडा करून टाकला. गडबडून गेलेला निजाम सारे सोडून बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते. वाटेत लागणारा निजामाचा सर्व मुलूख फस्त करत होते. बाजीरावांचा रोख पाहून निजामाला वाटले की, ते बुर्‍हाणपूरवर हल्ला करणार. येडा सगळी तयारी करून बसला, तर बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार भरूचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की, निजामशी हातमिळवणी करून मी गुजरातवर आक्रमण करतोय. निजामाशी उभा दावा असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय दिल्याचे नाटक केले. कशात काही नसताना निजाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने पुणे प्रांत बेचिराख करून टाकला. संभाजींना छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की, बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण निजामाचा सगळा भर तोफखान्यावर. त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे. त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कशाला निजामाला भीक घालताहेत? उलट निजाम पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी उलटलेला पाताळयंत्री निजाम दुसर्‍यांदा अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या डावाला बळी पडला! आपला सारा तोफखाना मागे नगरलाच ठेवण्याशिवाय त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती खळखळून हसली असेल त्यावेळी!! २५ फेब्रुवारी १७२८. अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निजामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणार्‍या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांनी मेहेरबानी करून अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करून दिली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!! चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करून रणमैदानात काय काय चमत्कार करून दाखवता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास या हालचालींमध्ये दिसून येतो. बाजीरावांनी या युद्धाचे ठिकाणही स्वत:च ठरवले, वेळही स्वत:च ठरवली आणि कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निजामाला आपल्या तालावर अक्षरश: हवे तसे नाचवले! याच मोहिमेने बाजीरावांचा आणि मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात झाली.
लेखक ---- ऍड. विक्रम श्रीराम एडके

!!!! बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख..
>>या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलीकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती, साक्षात रणपंडित!!>>> खरंय..

उत्तम माहीती देणारा लेख

पण इथे प्रसिध्द करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेतली आहे का?
लेखक वकिल आहे

उगाच चांगल्या लेखाला "स्पार्क" (ठिणगी) नको लागायला Wink

हो .. लेखकाने पण सर्व महाराष्ट्रीयांना पेशवांचे महत्व कळावे ..म्हणून हा खटाटोप केला आहे ..आपण फक्त त्यांना फक्त "मस्तानी" ह्या खोचट कर्तृत्व ने ओळखतो ...हिच आहे शोकांतिका ...

हा लेख Whatsapp वर फिरतोय.

बिटेल, मायबोलीवर स्वत: केलेले लिखाण लिहा कृपया.

हा लेख Whatsapp वर फिरतोय.<< हो, मला पण आला. अन तो उतारा मुळ पुस्तकातून नव्हे तर मायबोलीवरनं उचललाय असं दिसतेय. शिवाय ना मुळ लेखकाचे नाव, ना पुस्तकाचे नाव..

माफ करा ....हि माहिती मला फेसबुक वर शेअर झाली होती ...शेअर करणा-याची परवानगी घेऊनच ..मी इथे पोस्ट केली .....ठिक आहे .....मला डिलीट ..कसे करता येईल ?

खूप छान लेख आहे. बाजीरावाची ही बाजू दुर्लक्षित केली जाते.

बिटेल, लेख लगेच डीलीट करु नका. तुम्ही लेखकाचं नाव दिलं आहेत. त्यांचा माग काढा. न विचारता लेख इथे टाकल्याबद्दल माफी मागून परवानगीची विनंती करा. ते मायबोलीशी परिचित नसतील तर त्यांना मायबोली बद्दल सांगताना दोन मुद्दे जरुर सांगा की मायबोली कोणालाही लिखाणाचा मोबदला देत नाही व जगातल्या अनेक देशातील मराठी माणसं इथे लिहीतात, वाचतात.
शुभेच्छा!

लेख चांगला आहे. मागील महिन्यात थोरल्या बाजीरावांवरील दोन पुस्तके वाचली. त्यापैकी राऊ ही एक ऐतिहासिक कादंबरी होती. पण दुसरे "अजिंक्य योध्दा बाजीराव" हे जयराज साळगावकरांचे पुस्तक हे इतिहास संशोधनपर पुस्तक आहे. एकुणच थोरल्या बाजीरावांच्या युध्दनीतीची त्यात छान माहिती दिली आहे.

इतर सर्वांनी सांगितलेच आहे पण तुम्ही लेखकाची पुर्वपरवानगी घेऊनच इथे हा लेख लिहिणे अपेक्षित आहे. वर भरत मयेकरांनी लेखकाच्या फेसबुक प्रोफाईलची लिंक दिली आहे. तिथे रितसर परवानगी मागू शकता. परवानगी असेल तरच लेख प्रकाशित करा नाहीतर स्वयंसंपादित करून मायबोली प्रशासनाच्या धोरणात बसत असेल तर लेखाची फक्त लिंक द्या.

अप्रतिम आणि माहितीपूर्ण लेख.
" बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलीकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो." ...खरंय अगदी. हीच भीती आहे संजय लीला भंसाली यांच्या आगामी चित्रपटाविषयी.

अजिंक्य योध्दा श्रीमंत बाजीराव बल्लाळ भट उर्फ पहिले बाजीराव पेशवे यांना त्यांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन.

संजय लीला भन्साळी च्या बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे बाजीराव माहीत झालेले. या लेखामुळे अधिक माहिती मिळाली.

छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी मराठ्यांनी कर्तृत्त्वाने निर्माण केलेल्या स्वराज्याच्या प्रामाणिक प्रधानसेवकास भावपुर्ण आदरांजली..!