सिर सलामत तो ...(परदेशकथा)

Submitted by Mandar Katre on 10 August, 2015 - 14:17

सिर सलामत तो ...

(** देशाचे नाव देणे हेतुपूर्वक टाळले आहे. )

शाहिद ने विमानातळावरून कराचीच्या विमानात बसल्यावर सर्वप्रथम अल्लाहतालाचे आभार मानले “या खुदा शुकर है तेरा की तूने जिंदा निकाला मुझे इस जहन्नम से! मै शुक्रगुजार हू तेरा!...........”

बरोबर दोन वर्षापूर्वी तो इथे आला होता . पाकिस्तानमध्ये मॅट्रिकपर्यन्त शिक्षण कराचीजवळच्या एका छोट्याशा गावात झाले होते. शेजारचे अनेक मित्र आखाती देशात कामाला होते . मग स्वप्नाळू शाहिदलाही आखाती देशात जाण्याची स्वप्ने पडू लागली. मग अब्दुलचाचाच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करू लागला आणि वर्षभरातच तो ट्रक चालवू लागला. अठरा वर्षे पूर्ण होताच ड्रायव्हिंग लायसेन्स काढून घेतले आणि ड्रायव्हिंग ची छोटी-मोठी कामे करू लागला . त्याचा मित्र शौकत सुट्टीवर आला होता ,त्याच्या मदतीने त्याने पासपोर्ट देखील काढला . आणि लेफ्ट हँड ड्रायविंग कसे करायचे तेही शिकून घेतले.

गावाकडील सोबती लियाकत गेली पाच- सहा वर्षे **त ड्रायवर म्हणून होता. शाहिदने लियाकतला फोन करून सांगितले की माझी सगळी तयारी झाली आहे . मलाही **ला यायचे आहे. मग प्रश्न आला पैशाचा . आधी वडील त्याला बाहेरगावी पाठवायलाच तयार नव्हते. मग कशीतरी समजूत काढून वडिलांकडून एक लाख रुपये उसने घेतले आणि **चा व्हिसा तयार झाला . आणि शाहिद **त पोहोचला. लियाकतच्या रूमवर राहूनच त्याने **मधील ड्रायविंग लायसेन्स साठीच्या परीक्षा दिल्या . या सगळ्यात सहा महीने निघून गेले, पण मित्रांच्या जिवावरच शाहिद कसेबसे निभावून नेत होता. शेवटी एकदाचे GCC Driving License मिळाले बुवा !

मग लियाकतच्या ओळखीनेच एका श्रीमंत शेठच्या गाडीवर प्रायव्हेट ड्रायवर म्हणून नोकरी लागली. पगार 2000/-रियाल . शेठचा व्यवसाय मोठा होता. तो फक्त सकाळी कामावर ऑफिसमध्ये जाताना घराची गाडी वापरत असे आणि मग शाहिदला घरी पाठवत असे. शेठच्या मुलांना शाळेत सोडणे व परत आणणे आणि शेठच्या बायकोला बाजारात किंवा फिरायला नेणे अशी कामे त्याला करावी लागत.

हळूहळू शाहिद रुळला . आता शेठच्या घरचे सर्वजण चांगलेच ओळखीचे झाले . किंबहुना तो त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणेच वागू लागला. पण ... शेठच्या बायकोचे शाहिदवर “विशेष” लक्ष होते. शेठ होता पन्नाशीचा तर बायको पस्तीशीची. दोन मुले होती ,पण सलमा आतून उदास होती. कारण तिला अपेक्षित असे “सुख” तिला नवर्यापकडून मिळत नव्हते. आणि म्हणूनच उमद्या शाहिदवर तिची विशेष मर्जी बसली.

एके दिवशी शेठला कामावर आणि मुलांना शाळेत सोडून आल्यावर तिने शाहिदला घरात बोलावून जेवण दिले जेवण झाल्यावर तो परत बाहेर निघाला असता तिने त्याला थांबवले आणि शरीरसुखाची मागणी केली. वर तिने दोनशे रियाल बक्षीस म्हणून देण्याची तयारी दाखवली . शाहिद मनातून घाबरला. हे जर शेठला कळले तर आपली खैर नाही हे तो जाणून होता, पण घाबरत घाबरत तो तयार झाला. आणि मग व्हायचे ते झाले !

मग हे वरचेवर घडू लागले. तिची भूक मोठी होती. शाहिदला आता हे सहन होईनासे झाले. पगाराखेरीज वरकमाई तर मिळत होती, पण तो शेठच्या भीतीने दबलाही होता. आपले भांडे फुटले तर सरळ फाशीवर चढवले जाईल ही भीती सतत त्याला खात होती. आताशा तर तिच्यासोबत तिची दुसरी एक मैत्रीणदेखील असायची . त्या दोघांची शारीरिक भूक भागवणे शाहिदला अशक्य होते. शेवटी त्याने मालकिणीला सांगितले, “ मॅडम ,अब ये मुझसे नही होता, आप कोइभी बहाना बताके मुझे नोकरीसे निकाल दो .मै घर जाना चाहता हू.” त्यावर मालकीण भडकली. तिने धमकी दिली की जर नाही म्हणालास तर नवर्याककडे तक्रार करीन की याची माझ्यावर वाईट नजर आहे. मग नवरा तुला तुरुंगात तरी पाठवेल नाहीतर सरळ गोळी घालेल.

शाहिद प्रचंड दडपणाखाली होता. सुरूवातीला पैसा आणि मजा दोन्ही मिळत असल्याने तो खुश होता, पण आता हे प्रकरण आपल्यावरच शेकण्याची शक्यता निर्माण झाली. त्याची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक सुरू होती आणि हे कुणाला सांगूदेखील शकत नव्हता . शेवटी मग न राहवून लियाकतला सगळी हकिगत त्याने सांगितली,आणि कसेही करून मला यातून सोडव, अशी विनंती करून रडू लागला.

लियाकतने मग पाकिस्तानात शाहिदच्या घरी फोन करून शाहिदचे वडील सीरियस असल्याची तार मालकाच्या पत्त्यावर करायला सांगितले. दोन तीन दिवसात मग लियाकत आणि दूसरा एक मित्र अफजल शेठकडे ऑफिसमध्ये गेले आणि म्हणाले “ साब शाहिदका हीसाब पुरा करके ईसे गाव भेज दो, ऊसका बाप बहुत बीमार है. उसे तुरंत कराची वापीस जाना पडेगा” शेठने मग फारशी खळखळ न करता शाहिदला त्याचे पगाराचे पैसे आणि तिकीट काढून दिले.

जिवावरच्या संकटातून सुटल्याच्या आनंदात शाहिदने ताबडतोब बॅग भरली . त्याला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता . न जाणो ,आपण घरी जाणार हे मालकिणीला समजले आणि तिने शेठला काहीबाही सांगून पुन्हा काही घोटाळा केला तर ? या भीतीने तो लपतछपत घराबाहेर पडला आणि लियाकतच्या गाडीने थेट विमानतळावर पोहोचला . निघण्यापूर्वी लियाकतच्या गळ्यात पडून तो खूप रडला आणि आभार देखील मानले. इमिगेशन क्लिअर करून तो कराचीच्या विमानात स्थानापन्न झाला ,आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला . जेल मध्ये सडणे अन्यथा फाशीच्या तख्तावर लटकणे हेच त्याच्या नशिबात होते. पण लियाकतच्या रूपाने परमेश्वरच धावून आला होता .... आणि त्यामुळेच आता तो परत आपल्या देशात ,आपल्या माणसात सुखरूप परत चालला होता...... आखातात नोकरी करून श्रीमन्त होण्याचे स्वप्न विरून गेले होते, पण जीव वाचला हेच नशीब....म्हणतात ना “सिर सलामत तो पगडी पचास ....!”

*(सत्यघटनेवर आधारित ,स्थळे व पात्रे पूर्णपणे काल्पनिक )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच मला बरेचदा पुरुषाचा जन्म नकोस वाटतो.
यात भले भले अडकतात. अडकण्यावाचून पर्यायच नसतो. कारण पहिल्यावेळीही नकार दिला असता तरीही तेव्हाही त्या मालकिणीने धमकी देत आपलीच मर्जी चालवली असती.

अवांतर - देशाचे नाव का लपवले समजले नाही? लपवण्यासारखे यात काही नव्हते.

असो, तसेही मला समजलेच. . सौदी अरेबिया Happy

त्याच काय, कुठल्याहि देशात अजूनहि बिचार्‍या पुरुषाच्या बाजूला न्याय मिळणे कठीणच. शिवाय सिद्ध कसे करणार??

यात भले भले अडकतात. अडकण्यावाचून पर्यायच नसतो. कारण पहिल्यावेळीही नकार दिला असता तरीही तेव्हाही त्या मालकिणीने धमकी देत आपलीच मर्जी चालवली असती. >>>> तो घाबरत घाबरत तयार झाला. म्हणजे पहिल्यावेळी नकार दिलाच नाही. तसा प्रयत्नही केला नाही. भिती ती पण कसली तर 'शेठला कळले तर?' याची. तिच भिती त्याने तिला दाखवायला हवी होती. 'तुझ्या नव-याची तुझ्यावर बारीक नजर नक्कीच आहे/असणार' असे सांगून टाळता आले असते.

सोनाली,
तुम्ही ऐतराज हा चित्रपट बघा, मुद्दा समजून येईल.
बाकी यात मला काही सरसकटीकरण नाही करायचेय की अमुक तमुक महिलाच अश्या असतात वा पुरुषच तसे असतात,
पण जर एखादा पुरुष जेन्युअन असेल तरी त्याचीही इथे आड तिथे विहीर अशी परिस्थिती होते.

मंदार.. देशाचे नाव टाळले असले तरी 'सौदी' स्पष्ट जाणवतेय. तिथे या गोष्टी खुप कॉमन आहेत असे म्हणावे लागेल. मी स्वतः सौदीत असतांना अगदी अशीच गोष्ट (सत्य) ऐकलीय. एक तामीळ मुलगा घरकामासाठी एका अरबाकडे जायचा . .. . . . . . . . . नंतर तिने त्याचा पासपोर्ट्च काय पण इकामा पण त्याच्याकडून काढून घेतला.
कसाबसा लपत छपत तो रियाध वरून जेद्दाला आला.
हज यात्रेनिमित्त जेद्दाच्या आसपास असे अनेक जण बेकायदेशीर राहातात, पोलिस त्यांना पकडून वर्षातून एकदा देशाबाहेर घालवतात.
या तामिळ मुलाने पोलिसांना पैसे दिले, जेणे करुन कमीत कमी तूरूंगवास मिळेल आणि घरी जायला मिळेल.

सोनाली .. मनात असो वा नसो .. त्याचा काहीच फरक पडत नाही. कायदे असे आहेत की तो काहीच बोलु शकत नाही. किंबहूना नाही म्हणालाच तर डबल रिस्क, कधीही खोट्या आरोपाला सामोरे जावे लागू शकते.
मायदेशातले जे काही किडूकमिडूक असेल ते विकून, गहाण ठेउन हे लोकं पैसा कमवण्यासाठी तिथे जातात. त्यांची मानसिक स्थिती खुप विचित्र असते.

इकामा म्हणजे.. ओळखपत्र. जनरली तिथे काम करत असतांना आपला पासपोर्ट त्यांच्याकडे जमा कारावा लागतो आणि त्याऐवजी हे ओळखपत्र देतात (ज्यावर फक्त अरेबिक मजकूर असतो)