सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.
माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.
तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.
योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.
वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.
मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.
आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.
सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.
समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.
आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.
आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.
वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.
माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.
आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.
वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.
तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.
पण नवा सदाशिव आणि नवी पेठ हे
पण नवा सदाशिव आणि नवी पेठ हे दोन्ही वेगळे का?
अरे हो. नवा सदाशिव मधला
अरे हो.
नवा सदाशिव मधला नवेपणा क्रमांकाचा आहे आणि नवी पेठेतला नवेपणा जागेचा आहे.
राजेंद्रनगर वगैरे भाग म्हणजे नवीपेठ. दांडेकर पुलाच्या सर्कलपासून गांजवे चौकापर्यंत एटीफिट म्हणजे शास्त्री रोडच्या एका बाजूला स पे आणि एका बाजूला न पे
नीधप, शास्त्री रोडच्या नाही.
नीधप, शास्त्री रोडच्या नाही. नवी पेठ विठ्ठल मंदिर ज्या रस्त्याला आहे ( साहित्यपरिषदेच्या समोरच्या बाजूला) तो रस्ता बॉर्डरलाइन होता. मी अगदी त्या बॉर्डर जवळच राहात होते. आमचा पत्ता "नवा सदाशिव" असा होता. त्या भागाला चिमणबाग म्हणत असंत. त्यामुळे शास्त्री रोडच्या दोन्ही बाजू नव्या पेठेतच होत्या.
ओह, चिमणबाग सपे मधे नसून नपे
ओह, चिमणबाग सपे मधे नसून नपे मधे आहे होय?
रमड, नाही ,चिमणबाग नवी सदाशिव
रमड, नाही ,चिमणबाग नवी सदाशिव पेठ मधे आहे. आणि इथेच प्र. बा जोग, शरद तळवलकर, राजा गोसावी, राजा परांजपे, स. प. मधले सुप्रसिद्ध प्राध्यापक के. ना. वाटवे, सुप्रसिद्ध वकील रावसाहेब गडकरी अशी थोर्थोर मंडळी राहात होती.
तेव्हा हा भाग गावापासून लांब, निवांत म्हणून भाडी ५-१० रु. नी जास्त असायची.
आता त्या भागाची रया पार गेलीय.
आम्ही १२६९. प्र. बा जोगांचे
आम्ही १२६९.
प्र. बा जोगांचे ते पुस्तक आहे आमच्याकडे . जरा शोधावे लागेल..मी हा असा भांडतो वगैरे काहीतरी नाव आहे. त्यांच्या नातवांची नावे पण विचित्र होती अचाट, अफाट आणि किमया अशी असावीत बहुतेक.
त्यांच्या पाट्या थोड्या आठवतायत.
"लक्स फिक्स, इना फिना, अमक्याचा लग्नाचा मुलगा कुठे रहातो, तमक्याची लग्नाची मुलगी कुठे रहाते वगैरे विचारायला घराची बेल वाजवू नये. पहिल्यांदा एक बेल वाजवा, नंतर ५ मिनिटांनी दुसरी बेल वाजवा व तरीही दार उघडले गेले नाही तर मालकाला आपल्याला भेटायची इच्छा नाही असे समजा". सगळ्यात शेवटी, "माझ्यावर विश्वास असेल तरच माझ्याकडे या, अन्यथा कायमचे कटा" (गणगोतासह), कटण्याचा रस्ता.. दोन बाण एक उजवीकडे व दुसरा डावीकडे....
अकु, मस्त लिहिलेयस.
स पे मधील थोर थोर मंडळींची एक
स पे मधील थोर थोर मंडळींची एक यादीच तयार होऊ दे की ....
१] श्री. म. माटे २] कुसुमाग्रज - जन्मस्थान स पे ३] गजाननराव वाटवे
वझेबुवा, कृष्णराव फुलंब्रीकर,
वझेबुवा, कृष्णराव फुलंब्रीकर, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी (सुरुवातीच्या काळात)
वसंतराव देशपांडे, काही वर्ष
वसंतराव देशपांडे, काही वर्ष पु ल
शुगोल, तुम्हीही चिमणबागेत
शुगोल, तुम्हीही चिमणबागेत राहायचात का? वा, वा!
वकील रावसाहेब गडकरी >> चिमणबागेतील एका गडकऱ्यांशी आमच्या टिळक रोडवरील वाड्याच्या मालकांची चांगलीच दोस्ती होती. बहुतेक तेच हे गडकरी असावेत. वाड्याचे मालक मला नातीसारखं वागवायचे. त्यांचा हात धरून चालत चालत या गडकऱ्यांच्या घरी काही वेळा गेल्याचे आठवते.
शिवाजी मंदिरच्या बाजूला सोवनी सर राहायचे. त्यांची मुलगी माझ्या आईची मैत्रीण. आईबरोबर त्यांच्या घरीही येणे-जाणे व्हायचे. त्यांच्या बंगल्याच्या आवारातून शिवाजी मंदिराचे प्रांगण दिसायचे म्हणून मला तिथेच रेंगाळायला खूप आवडायचे.
सपच्या तरणतलावाच्या बाजूने गोपाल गायन समाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चक्रदेवांची शिशुशाळा होती. खूपच छान शाळा व प्रेमळ शिक्षक. याच शाळेत मी काही महिने गेले. माझी बहीणही येथे शिकली. चिं ग काशीकरांच्या घराशेजारी आमची नूतन बालविकास मंदिर ही पिले सरांनी चालवलेली शाळा होती. तीही फार मस्त शाळा होती.
त्या शाळेला पिल्ल्यांची शाळा
त्या शाळेला पिल्ल्यांची शाळा म्हणायचे...
हो, हो! मी सरांना एकदा
हो, हो!
मी सरांना एकदा शाळेबाहेर उभं राहून, कमरेवर हात ठेवून "अहो पिल्ले, बाहेर या!" म्हणून जोरात हाक मारली होती ते चांगलंच आठवतंय. सोबत असलेल्या आईचा चेहरा मात्र गोरामोरा झाला होता.
काय करणार! घरीदारी सगळीकडे शाळेचा उल्लेख पिल्ल्यांची शाळा म्हणून व्हायचा आणि सरांचा 'पिल्ले' म्हणून!
चक्रदेवांची शिशुशाळा ...अ
चक्रदेवांची शिशुशाळा ...अ कु...कसलि आठ्वण काढलिस. माझि आज्जी आजोबा त्याच वाड्यात रहायचे कित्यक वर्श. त्यामुळे तो वाडा चान्गलाच माहिति आहे.
अनघा आमच्या वाड्याची मागची
अनघा

आमच्या वाड्याची मागची बाजू त्या बोळाकडे जाणाऱ्या (तरणतलाव व चक्रदेव शाळा) रस्त्यावर उघडायची. तिथले गेटही अनेकदा खुले असायचे. त्या अंगणात बकुळीचे झाड होते. मी बकुळीची फुले गोळा करायला म्हणून घरातून बाहेर पडायचे व हळूच गेट उघडून त्या रस्त्याने सप कॉलेजात. तिथं आमराईत खेळायचं, नाहीतर तरणतलावाच्या गेटला नाक चिकटवून पाण्याकडे व तिथल्या अॅक्टिविटीजकडे बघत पाय दुखेस्तोवर उभे राहायचे!!
जोगांचे किस्से भरपूर आहेत.
जोगांचे किस्से भरपूर आहेत. शिकवणीवाले पीऽ जोग क्लासेस. तेदेखिल यांच्यातलेच.
पैकी एक जोग ऑर्थोपेडिशियन देखिल आहेत.
त्यांचे किम्वा पेडिअॅट्रीशियन जोग यांचे, नक्की कुणाचे ते आठवत नाही, पण फेमस क्वोट आहे :
"रोग लागला तर बरा होतो. भोग लागला तर भोगता येतो. पण जोग लागला.. तर काही खरे नाही."
बहुतेक ऑर्थो वाल्यांचा ड्वायलॉग असावा. हेच काही दिवसांपूर्वी कॉन्फरन्सेसमधे सेक्स व व्यायाम असल्या काही वाक्यांबद्दल व्हॉट्सॅप फेमस झाले होते. कॉन्फरन्समधे जोग सरांसोबत फिरणार्या रेसिडेंटच्या शर्टाच्या खिशात सर त्यांचा ग्लास ठेवत असत
पोर्टेबल स्टँड 
आमच्या वाड्याची मागची बाजू
आमच्या वाड्याची मागची बाजू त्या बोळाकडे जाणाऱ्या (तरणतलाव व चक्रदेव शाळा) रस्त्यावर उघडायची>>
अकु भटांचा वाडा का? काजुकंदवाल्या अनुपम प्रॉडक्टसच्या शेजारचा?
शाळेत जाताना अनुपप पाशी थांबुन त्या इस्पिक किलवर बदामच्या व श्रीखंडाच्या गोळ्या बनवताना बघणे हा एक कार्यक्रमच असायचा. तसेच काजुकंद बनवताना बघणे हा पण. मला तर अनेकदा तो अक्खा गोळाच पळवावासा वाटलेला आहे.
त्या चक्रदेव माझ्या आजीची
त्या चक्रदेव माझ्या आजीची मैत्रिण. बरेचदा घरी यायच्या.
केप्या, भटांचा वाडा तिकडे
केप्या, भटांचा वाडा तिकडे कुठे?
तो चिमण्या गणपतीच्या गल्लीत. अनुपमचा. आता तिथे सगळी औषधांची ठोक विक्री करणारी दुकाने आहेत. अकु तिकडे गोपाळ गायन समाजाच्या जवळच्या परिसराविषयी बोलतेय
अच्छा मला वाटले गोपाळ
अच्छा मला वाटले गोपाळ टँकविषयी बोलत आहे.
मी देखील प्रबा ह्यांना पाहिले
मी देखील प्रबा ह्यांना पाहिले आहे बरेचदा. पी जोग केमिस्ट्री क्लासेस नुकतेच सुरू झाले होते तेव्हा. तिसृया मजल्यावर क्लासेस व हे तळ मजल्यावर असत जिना चढून जाताना कधी कधी दिसत . घरा च्या तिथे पा ट्या असत. जोग सर छान शिकवत.
केपी, नाही. भट तिकडे कुठे
केपी, नाही. भट तिकडे कुठे नेऊन ठेवलेस??:फिदी: आमचा हा वाडा बादशाही बोर्डिंगच्या शेजारी होता. बादशाहीच्या मेसमध्ये सकाळी सात साडेसातला लसणाची चळचळीत खमंग फोडणी दिली गेली की तिचा ठसका डायरेक्ट आमच्या बाल्कनीतून घरात शिरायचा व घरातील मेंब्रं सटास्सट शिंका देत सुटायची!
कळल कळल अकु. तिथेच मधल्या
कळल कळल अकु. तिथेच मधल्या त्या बोळात वैद्य नावाचा एक मित्र रहात असेल.
केपी पंताच्या गोटात राहाणारं
केपी
पंताच्या गोटात राहाणारं आहे का कोणी इथे?
पंतप्रतिनिधींची वास्तू असलेला हा रस्ता आम्हां मुलांना रात्रीच्या वेळी जा-ये करायला खूप ड्येंजर वाटायचा. रस्त्यात लाटकरांचे कल्पना मुद्रणालय होते. दिवसभर तिथे छापखान्याचे आवाज असत पण रात्री सामसूम. शेजारी काही वाडीवजा घरे होती. संपूर्ण रस्ता आच्छादेल अशी उंच, विशाल झाडे त्या बाजूस होती. रात्री त्या रस्त्याला अजिबात वर्दळ नसायची. रस्त्यातले दिवे कित्येकदा लागलेले नसत. वाडीवजा घरांमधून येणारा मिणमिणता प्रकाश व झाडांच्या सावल्या हे काँबो रात्री जाम भीतीदायक वाटायचे. त्यात या वाडीत काही गावठी कुत्री होती ती मुहूर्त काढून भेसूर रडायची किंवा भुंकत भुंकत येणाऱ्या जाणाऱ्याच्या मागे लागून त्यांना जीव नकोसा करायची! तिथून रात्री जा-ये करायला लागली की आम्ही मोठमोठ्याने रामरक्षा, भीमरूपी, पाढे, सुभाषिते वगैरे जे आठवेल ते म्हणत व कुत्र्यांपासून जीवाला वाचवत तो रस्ता पार करायचो. टिळक रोडला लागलो की हुश्श व्हायचं. नंतर तिथं बरीच दुकानं झाली, नव्या इमारती झाल्या व रस्त्याचा नूरच बदलला. आता म्हणे तिथे त्या बोळात दवाबझार झाला आहे (होलसेल औषध विक्रेत्यांची दुकाने).
पंतांच्या गोट म्हणजे माझा
पंतांच्या गोट म्हणजे माझा रोजचाच महाराष्ट्र मंडळात जायचा यायचा रस्ता होता आणि वर्षातून एकदा (महाराष्ट्र मंडळातले स्नेहसंमेलन संपल्यावर) रात्री १२ वाजता देखिल तिकडून जायचो....
पंताच्या गोटात कुंडलकर
पंताच्या गोटात कुंडलकर काकूंचे पाळणाघर होते. काकू म्हणजे , सचिन, सुयोग कुंडलकरची आई. मस्त पाळणाघर. बाहुलीचे लग्न करायचे तर आदल्या दिवशी कढीभाताचे जेवण असायचे आणि आदल्या दिवशीपासून सर्व बाळे रहायला असायची घरी. मेंदी लावायचा पण कार्यक्रम असायचा. जेवायला जिलबी मसालेभाताचे जेवण असायचे. बाहुलीचे लग्नच धमाल असायचे. एकदा माझी ७ महिन्यांची मुलगी हातात एक वेगळाच किल्ल्यांचा जुडगा घेवून घरी आली म्हणून मी धावत पळत तो परत करायला गेले तर काकू म्हणाल्या, की मुलांना किल्ल्या आवडतात म्हणून आम्ही त्यांना देतो मुद्दाम.
तेव्हा ती कल्पना खूप आवडून गेली होती.
मोठी लोक माहित असायच तेंव्हा
मोठी लोक माहित असायच तेंव्हा वय नव्हत आणि जाणही नव्हती. त्यातल्या त्यात, शरदराव व बाबूराव गोखले आमच्या मित्रांचे वडिल म्हणून माहिती. रघूवीरांच्या बंगल्या बद्दल मात्र गूढ वाटायच
माझ्या पुण्यातल्या शाळेचा पहिला दिवस अजून आठवतोय. अर्धा दिवस सुट्टी, पालखीची. मग श्रावणातली गडबड, सोमवारी का शनिवारी शेजार्यांकडून जेवायला बोलावण आणि वर दक्षिणेची मज्जा. शिवाय मोठी लोक नमस्कार करणार. मग गौरी, गणपती. मोठ्या आवाजात आरती आणि विशेष करून मंत्र पुष्पांजली म्हणायची स्पर्धा. अशी धमाल.
वाड्यातल डबा ऐसपैस आणि क्रिकेट , तासंतास, कुणी तरी हाकले पर्यंत. स्ट्रेट बॅटनी खेळायची सवय तिथे लागली.
आता जाउन यायला पाहिजे परत एकदा.
मेधाव्ही, किती गोड! हर्पेन,
मेधाव्ही, किती गोड!
हर्पेन, पंताचा गोट, पाषाणकर गॅरेजचा पेरूगेट भावे स्कूलसमोरचा भाग, लिमयेवाडीचा आख्खा रस्ता हा आमच्या कल्पक, सुपीक मेंदूंना भुताळी भाग वाटायचा. तिथून रात्री-बेरात्री येता-जाताना कल्पनेतल्या भुतावळीनेच जास्त त त प प व्हायचे.
विक्रम एवढ्या लाहनपणी
विक्रम एवढ्या लाहनपणी स्वतंत्र रहाणं , खरचं मानलं तुम्हा भावंडाना.
अरे त्या जोगांना स्वतंत्र बाफावर हलवा , विक्रमाचा बाफ हायजॅक केलाय त्यांनी आणि इतर सपेकरांनी :स्मितः
मस्त वाटतंय सर्वांच्या आठवणी
मस्त वाटतंय सर्वांच्या आठवणी वाचायला!
मी एरंडवण्यात वाढले. पण माझी आई नारायण पेठेची. मामाही तिकडेच राहात असल्याने तिथे खूपदा जायचे मी. त्याच वाड्यात (जी नंतर बिल्डींग झाली) नंदू पोळ राहतात, त्यामुळे ते कायम दिसायचे.. लहानपणी कुतुहल होते त्यांच्याबद्दल, उंचीमुळे. नंतर कळले ते अॅक्टरपण आहेत वगैरे. शेजारी केसरी वाडा असल्याने आई तिच्या लहानपणच्या रम्य गोष्टी सांगते अजुनही. कोण कोण मोठी लोकं येऊन जायची तिथे..
मला पेठेचे वातावरण अगदीच अनोळखी असल्याने मजा वाटायची त्या गंमतशीर बिल्डींगची..
अकु तुझे डिटेलिंग अफलातून
अकु तुझे डिटेलिंग अफलातून आहे. तू फिक्शन ( कादम्बरी कथा) लिहिण्याचा प्रयत्न कर, खूप यशस्वी होशील
Pages