बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल सुर्यवंशी यांच्यांशी नुकतीच सविस्तर बातचीत करायची संधी मिळाली. त्यांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सविस्तर माहिती दिली.
आमच्या वाचकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाबद्दल थोडी माहिती सांगाल का? ते नक्की काय कामे करते?
बृहन्महाराष्ट्र मंडळ ही महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांची सर्वांत मोठी संघटना आहे. एवढंच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतील ही सर्वांत जुनी राष्ट्रीय पातळीवरची भारतीय संघटना आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळापासून स्फूर्ती घेऊन इतर अनेक भारतीय भाषकांच्या संघटना तयार झाल्या आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली ५४ महाराष्ट्र मंडळे येतात. मराठी भाषा, संस्कृती आणि कला यांचा प्रसार करणे आणि छत्राखालील मंडळांना एकत्र आणून समान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर मराठी लोकांनी एकत्र यावे म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यरत असते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली उत्तर अमेरिकेतील (अमेरिका व कॅनडामधील) ३४ राज्यांमध्ये मराठी शाळा चालवल्या जात आहेत. यात हजाराहून अधिक मुले मराठीचे धडे गिरवत आहेत. तसेच महाराष्ट्रातील कलाकारांना आपली कला उत्तर अमेरिकेतील रसिकांसमोर सादर करता यावी यासाठीही बृहन्महाराष्ट्र मंडळ मदत करत असते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्याकरता www.bmmonline.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
बृहन्महाराष्ट्र मंडळाशी आपला संबंध कधीपासून आहे?
मी २००० सालापासून स्थानिक मंडळात काम करत आहे. त्यावेळपासूनच मला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाविषयी ऐकून माहिती होती. मी जेव्हा फिलाडेल्फीयातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेलो तेव्हा त्या अधिवेशनाचे भव्य स्वरूप पाहून प्रभावित झालो. त्यातूनच स्फूर्ती घेऊन मी बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी काम करण्याचे ठरवले. मी स्थानिक (कनेक्टीकट) मंडळाचा अध्यक्ष असताना बृहन्महाराष्ट्र मंडळाची कार्यकारीणीने संस्थेची घटना पुन्हा लिहिण्याचे काम सुरू होते. या कामामध्ये मी सहभागी झालो. शिकागो अधिवेशनाच्या वेळी मी कार्यकारिणीचा सभासद झालो. त्यानंतरच्या बॉस्टन अधिवेशन समितीचा मी सदस्य होतो. याच अधिवेशनाच माझ्यावर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपणाची धुरा सोपवण्यात आली.
आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आपल्याला काय वाटते?
'ठेविले अनंते तैसेचि रहावे' ह्या विचारसरणीला दूर सारून आमच्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात केली व गेल्या दोन वर्षांत अधिवेशनाव्यतिरिक्त अनेक मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडले. या काळात बृहन्महारष्ट्र मंडळाच्या सदस्यसंख्येमध्ये वाढ झाली. अनेक नवीन मंडळांत मराठी शाळा पोहोचली. अनेक चित्रपटांचे व भारताहून आलेल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचे तिसाहून अधिक मंडळांत आयोजन केले, ज्या छोट्या मंडळांना हे कार्यक्रम करणे परवडत नव्हते त्यांना खास सवलत देऊन कार्यक्रम भरवण्यात आम्हांला यश आले. अमेरिकन मराठी कलाकारांचे इतर अनेक मंडळांमध्ये सादर करण्यासाठी दौरे आयोजित केले, मंडळांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला उपक्रम - ’उत्तररंग’ जास्तीत जास्त मंडळांपर्यंत पोहोचवला.
मनात इच्छा असूनही वेळ, अंतर आणि काही इतर अपरिहार्य कारणांमुळे अधिवेशनाला न येऊ शकणारे अनेक मराठी बांधव अधिवेशनापासून वंचित होते, हे आम्हांला कळायला वेळ लागला नाही. त्या लोकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उत्सवात सामावून घेण्यासाठी प्रांतिक पातळीवर थोड्या थोड्या मंडळांनी एकत्र येऊन mini-convention करायची गरज आहे हे वाटले आणि या गरजेतूनच बृहन्महाराष्ट्र मंडळ महोत्सवाची कल्पना सुचली. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, की गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ओरलँडो व वॉशिंग्टन येथे अशा प्रकारचे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडले व एका आगळ्या वेगळ्या अर्थाने सीमोल्लंघन झाले. या योगे आठ मंडळांतील आपल्या मराठी बांधवांना प्रांतिक पातळीवर आता एकमेकांशी ओळखी वाढवायला मदत झाली. तसेच अनेक स्थानिक कलाकरांना स्थानिक पातळीपेक्षा मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले.
आपली मुले हायस्कूल व कॉलेजला जाऊ लागली की स्थानिक महाराष्ट्र मंडळापासून ती दुरावतात. हे अंतर आम्ही नाहीसे करू शकत नाही, परंतु ते कमी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तर अमेरिकेतील मराठी कुटुंबांतील मुलांसाठी पहिल्यांदाच शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मी स्वत: पंधराहून अधिक मंडळांना भेटी दिल्या. आमच्या समितीने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या बहुतेक सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आम्हांला यश आले. बृहन्महाराष्ट्र मंडळाची कार्यकारणी, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र वृत्ताचे संपादक मंडळ, वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष, मराठी शाळेचे समन्वयक व शिक्षक, अनेक हितचिंतक या सर्वांनी अनेक प्रकल्पावर एकजुटीने काम केले. हे काम करत असताना आम्ही आयुष्यभराची नातीही जोडली, या गोष्टीचा मला विशेष आनंद होतो.
यंदाचे बृहन्महाराष्ट्र मंडळ द्वैवार्षिक अधिवेशन हे सतरावे अधिवेशन आहे, आत्तापर्यंतच्या अधिवेशनाच्या प्रवासाबद्दल काय वाटते?
उत्तर अमेरिकेतील मराठी लोकांना आणि व्यावसायिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने १९८४ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिले अधिवेशन शिकागोमध्ये भरविण्यात आले, ते चार दिवस चालले. पहिल्या दिवशी वीस लोक उपस्थित होते आणि त्यापैकी बारा लोक भारतातून आले होते. नंतर प्रेक्षकांची संख्या सव्वाशेवर गेली. त्यांची शिकागोतील काही मराठी कुटुंबीयांच्या घरीच राहण्याची सोय केली होती. दुसरे अधिवेशन टोरांटोला भरले, तेव्हा जवळपास सहाशे लोक उपस्थित होते. या वर्षीच्या जूलै महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनास जवळपास ४००० हजार लोक उपस्थित असणार आहेत. या अधिवेशनात वेगवेगळे ४६ उत्तमोत्तम कार्यक्रम सादर होणार आहेत. जवळपास दोनशेहून अधिक कार्यकर्ते या अधिवेशनासाठी काम करीत आहेत. १९८४पासून झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये काही गोष्टी चुकल्या आणि काही इतर अधिवेशनांच्या तुलनेत चांगल्या झाल्या. चुकांतून शिकलो आणि यशस्वी गोष्टींना स्वीकारत गेलो. आज बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हे पूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठीजनासाठी एक मानाचा बिंदू ठरले आहे. जरी व्याप, खर्च, थाटमाट खूप वाढला आहे, असे वाटत असले तरी शेवटी हे अधिवेशन म्हणजे 'मराठीयांच्या मेळावा' असतो, व आपल्या घरचे कार्य समजून विनामूल्य रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांची धडपड असते, गेल्या अधिवेशनापेक्षा वेगळे नवीन काहीतरी असा देण्यासाठी प्रयत्न असतो.
अधिवेशनाची तयारी कशी झाली आहे?
जसा एक-एक दिवस जातो आहे, त्याचबरोबर आमचा आनंद, उत्कंठा आणि आतुरताही वाढते आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आमच्या लॉस एंजिलीसच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. शैलेश शेट्ये, अजय दांडेकर, संजीव कुवाडेकर व त्यांचे सर्व सहकारी हा शिवधनुष्य मोठ्या आनंदाने उचलत अहेत. गेल्या अडीच वर्षांपासून सर्व कार्यकर्ते ह्या आनंदोत्सवाच्या आयोजनात गुंतले आहेत आणि गुण्यागोविंदाने कामाचा आनंद लुटत आहेत. 'मैत्र पिढ्यांचे’ ही फक्त संकल्पना न राहता, वेगवेगळ्या पिढ्या खांद्याला खांदा लावून एकत्र कामे करत आहेत.
या अधिवेशनासाठी सर्वच बाबतील आम्हांला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नावनोंदणी, धन-संकलन, कलाकारांचा भाग, व्हिसा, नियोजन ह्या सगळ्या गोष्टींत कुठेही कमी पडलेले नाही, आतापर्यंत सगळे सुरळीत चालू आहे. या अधिवेशनात बऱ्याच गोष्टी प्रथमच होणार आहेत. www.bmm2015.org ला भेट दिल्यावर आपल्याला याचा अंदाज येईलच.
मायबोलीकरांना बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी काय करता येईल?
मायबोलीकर सुज्ञ व सकारत्मक विचार करणारे असल्याने मला त्यांच्याविषयी आदर आहे. आपल्यापैकी जे उत्तर अमेरिकेतील वाचक आहेत, व अजून एकदाही अधिवेशनाला आले नसतील त्यांना "उत्तर अमेरिकेत राहावे आणि पहिले अधिवेशन लवकरात लवकर जाऊन पाहावे”, असे व्रत घेण्याचे मी आवाहन करतो. मंडळात सक्रिय व्हा, मंडळात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करा, कौतुक करा. ज्या गोष्टी आवडत नसतील, त्यासाठी कार्यरत होऊन त्या बदलण्याचा प्रयत्न करा. ज्या संस्कृतीने आपल्याला घडवले त्या संस्कृतीची ओळख सातासमुद्रापलीकडे जन्मलेल्या पिढीला करून देण्यासाठीचा हा अट्टहास आहे. त्यात आपण सर्वांनी भाग घेण्याची गरज आहे.
तुमची अध्यक्ष्यपदाची टर्म लवकरच संपते आहे, पुढे काय करायचा याचा विचार केला का?
सध्या तरी, अधिवेशन एके अधिवेशन एवढा एकच विचार डोक्यात असतो. परंतु कधी कधी मनात विचार डोकावतोच. मी नाशिक जिल्ह्यात मुल्हेर नावाच्या छोटयाशा गावात दहावीपर्यंत शिकलो, त्यामुळे मला महाराष्ट्रातील गावांबद्दल विषेय आत्मीयता व प्रेम आहे. महाराष्ट्रातील गावांसाठी व विशेषत: तेथील शाळकरी मुलांसाठी ठोस काहीतरी करावे, असा विचार आहे. गावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू.
तुमच्या सध्याच्या अधिवेशनाच्या लगीनघाईच्या दिवसांत आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
छान ओळख
छान ओळख
छान ओळख! मला महाराष्ट्रातील
छान ओळख!
मला महाराष्ट्रातील गावांबद्दल विषेय आत्मीयता व प्रेम आहे. महाराष्ट्रातील गावांसाठी व विशेषत: तेथील शाळकरी मुलांसाठी ठोस काहीतरी करावे, असा विचार आहे. गावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू>>
यासाठी खास मनापासून शुभेच्छा!
.
.
गावात वाढल्यामुळे त्यांच्या
गावात वाढल्यामुळे त्यांच्या अडचणी, आकांक्षा मी चांगल्या रीतीने समजू शकतो. एकदा अधिवेशन झाले की समविचारी लोकांना एकत्र आणून, विचारविनिमय करुन नकीच सकारात्मक पाऊले उचलू.>> छान विचार