''अरुणा शानबाग, सोहनलाल भरता वाल्मिकी आणि सकाळ शोधपत्रकारिता''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 30 May, 2015 - 02:43

अरुणा रामचंद्र शानबाग या २५ वर्षीय परिचारिकेवर के.इ.एम. रुग्णालयात , कंत्राटि कक्षसेवक सोहनलाल वाल्मिकी याने २७ नोव्हेंबर १९७३ च्या रात्री ती कपडे बदलत असताना तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ती ओरडू नये म्हणून कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळला...ज्याची परिणिती तिच्या विकलांगतेत होवून ४२ वर्षे ना जिवंत ना मेलेल्या अशा वेजिटेटिव स्टेट मधे काढल्यानंतर १८ मे २०१५ ला अरुणाचा मृत्यू झाला.

सोहनलालला पकडण्यात आले आणि त्याच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला. मारहाण आणि चोरीचा गुन्हा सिद्ध होवून त्याला दोन वेळा ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली...ती त्याने भोगली.

अरुणा शानबागच्या म्रुत्यूपश्चात पुन्हा एकदा हे प्रकरण ताजे होवून बरीच चर्चा झडली. वृत्तपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमातून पुनश्च या प्रकरणाचा उहापोह झाला.

सकाळने या पुढे जावून सोहनलाल सध्या कुठे आहे आणि काय करतो आहे...याचा शोध घेतला

sakal2.jpg

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील पारपा या गावी सोहनलाल रहात असून त्याला गावाने आणि नातेवाइकांनी अगदी पत्नीनेसुद्धा झिडकारले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ३० किलोमीटर दूर मजूरी करत असून त्यासाठी रोज ३० + ३० असे साठ किमी रोज वयाच्या ६३/ ६४ व्या वर्षी सायकल दामटवतो.त्याला मासिक ४००० वेतन मिळते. त्यातून त्याची गुजराण होते.

या बातमीनंतर सकाळने आज पुन्हा एक बातमी प्रसिद्ध केली आहे.

sakal1.jpg

४२ वर्षे अरुणाला मरणयातना भोगायला लावलेल्या सोहनलालवर खुनाचा खटला दाखल करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री म्हणताहेत तर त्याला फासावर लटकवायला हवे अशी लोकांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे सकाळ म्हणत आहे.

मला वाटते..... अरुणावर अत्याचार झाले...४२ वर्षे मरणप्राय यातना भोगून तिचे निधन झाले. सोहनलालने शिक्षा भोगली आणि तोही जिवंत असून काही सुखात नाही. आता पुन्हा खटला... पुन्हा प्रसारमाध्यमात चर्वितचर्वण .... आणि सुटका झालेल्या अरुणाची पुन्हा एकदा विटंबना. हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय.

काय म्हणता माबोकर्स?

--डॉ.कैलास गायकवाड .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख, माझ्या माहितीप्रमाणे तरी भारतात अशी शिक्षा नाही. आजन्म कारावास हा शब्दप्रयोग का रुढ झालाय कळत नाही.
मरेपर्यंत फाशी, हा शब्द प्रयोग मात्र बरोबर आहे.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/solid-liquid-a-trans-national-re...

आजच्या लोकसत्तामधला हा एक पुस्तक परीचय.. बघितला तर तसा या बीबीशी संबंध नाही. पण कायदा आणि आधुनिक वैद्यक.. यांच्याशी संबंध आहे. ( या बीबीचा फोकस न भरकटवता अवश्य वाचा. )

सकाळने त्या नराधमाबद्दल चांगली सहानुभूती तयार केलीये. हे एवढेच कळले या बाफवरच्या काही प्रतिसादांवरून.
भारतामधे कुठलाही गुन्हा न करता प्रचंड जनता हालाखीचे, दारीद्र्यात आणि कष्टमय जीवन जगत असते तेव्हा एका गुन्हेगाराच्या (ज्याला पुरेशी शिक्षा झालेली नाही अश्या) कष्टांचे, हालअपेष्टांचे फालतू कौतुक असू नये.
तो मुलाबाळांसोबत रहातो. हातीपायी धडधाकट आहे. चालता बोलता येते. आणि ती निरपराध बाई ४२ वर्ष अंथरूणात खितपत पडली होती याच्यामुळे. तेव्हा त्याच्या कांगाव्याला कुठलाही अर्थ दिसत नाही.
तो कांगावा छापणारे आणि एका नराधमाच्याबद्दल सहानुभूतीचे पाट वाहवणारे सकाळचे पत्रकार व संपादक दोघांचाही तीव्र निषेध.
सेन्सेशनल दिसले की धावले पत्रकार.. बाकी काही नाही.

जर केस रिओपन होण्यासारखी असेल तर व्हावी. त्या सोहनलालच्या अब्रूची लक्तरे निघावीतच. ते एक उदाहरण ठरेल.

उलट आता जर सोहनलालला शिक्षा झाली तर एक तर ती सश्रम नसेल त्यामुळे जिथे गावात उघड्यावर जगत होता तिथे तुरुंगात आरामात जगेल. दोन वेळचे जेवन मिळेल . जिथे त्याला ८-१० किमी सायकल चालवून काम करावे लागत होते तिथे तुरुंगातच काम करत बसेल. वर ४ पैसे देखील मिळतील. >>>

हे बरोबर आहे .. आता हा विषय सोडून दिलेलाच बरा आहे ..

>>>सकाळने त्या नराधमाबद्दल चांगली सहानुभूती तयार केलीये. हे एवढेच कळले या बाफवरच्या काही प्रतिसादांवरून.<<<

सकाळने निदान स्वतःहून तरी सहानुभुती निर्माण केलेली नाही आहे. त्यांनी त्याला नराधमच संबोधले आहे. फक्त वर असेही म्हंटले आहे की तो जिवंतपणी नरकयातना भोगत आहे. जे पटू शकत नाही. त्याला उदरनिर्वाहासाठी कष्ट करावे लागणे ह्यात काहीही नरकयातना नाहीत. तसेच, ह्या धाग्यावर जे 'त्याला शिक्षा होऊ नये' म्हणत आहेत ते माझ्यामते त्याच्याबद्दल कणव वाटून तसे म्हणत नाही आहेत तर आता काही होणे हे त्यांना अनावश्यक, अशक्य किंवा असंबद्ध वाटत आहे.

बाकी पूर्ण प्रतिसादाला +१

नीधप पुर्ण सहमत .. माझे पन अगदी हेच विचार आहे.
बेफी पण फक्त नराधम संबोधुन त बातमीचा जो रोख ठेवलाय बघता अस वाटत की त्या बातमीदाराने तरी ती बातमी लिहिल्यानंतर डोळ्याखालुन घातली कि नै ..
वर परत ते आमच्या वार्ताहराने १७०० किमी अंतर कापुन याला शोधुन काढले वगैरे म्हणजे निव्वळ स्टंट वाटतो. यांना ना कुण्या जगण्याच ना कुणाच्या मरण्याच सोयरसुतकं . आत्तापर्यंत झोपले होते ?

सोहनलालने पुरेशी शिक्षा भोगलेली नाही पुरुष प्रधान संस्कृतीचा विकृत चेहरा म्हणजे सोहनलाल. सोहनलाल जोपर्यंत मरत नाही तो पर्यंत त्याच्याशी कायद्याने लढले पाहिजे. त्या गुन्ह्याच्या सावलीने आपला पिच्छा अजून सोडला नाही हे त्याला कळायलाच हवे

बेफिकीर,

>> आज हातात असलेल्या एकाला कडक शासन करण्याची संधी सोडून द्यायची का?

माझ्या अंदाजाप्रमाणे सोहनलाल 'हातात' नाही. कारण न्यायालयाने दिलेली शिक्षा त्याने भोगून पूर्ण केली आहे.

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

>> तेव्हा त्याच्या कांगाव्याला कुठलाही अर्थ दिसत नाही.

सोहनलाल कांगावा करत नाहीये. तो स्वत:हून सकाळकडे गेलाच नव्हता.

मात्र तुमच्या उरलेल्या संदेशाशी सहमत.

आ.न.,
-गा.पै.

>>>माझ्या अंदाजाप्रमाणे सोहनलाल 'हातात' नाही. <<<

तो नजरेसमोर आहे असे मला म्हणायचे आहे.

डॉ. कैलास गायकवाड
आपण चर्चे साठी निवडलेल्या या अतिशय संवेदनशील विषयाचे दोन स्वतंत्र पैलू आहेत . एक कायदेशीर बाजू आणि दुसरी भावनिक बाजू . मूळ खटला त्याची कागदपत्रे कदाचित माहितीच्या अधिकारात आजही उपलब्ध होतील . पण पोलिस तपासाचे रेकॉर्ड २० वर्षांनतर नष्ट करण्यात आले आहे . अशी चर्चा आहे.
आता या सद्य स्थितीत पुन्हा खटला उभा करण्याच्या प्रयत्नातील यश अपयश विचारात घेणे जरुरीचे ठरेल .
प्रथम खटला कोणी व कुणाच्या खर्चाने चालवायचा . कारण अरुणाच्या दया मृत्यू प्रकरणात तिच्या मैत्रिणीचा मैत्रीण /हितचिंतक म्हणवण्याचा हक्क न्यायालयाने स्वीकरला नव्हता . त्याखेरीज प्रथम झालेली शिक्षा संपल्यावर किंवा खटला सुरु असलेल्या काळात केंव्हा तरी दुर्दैवी अरुणावर सोहनलाल याने हल्ला किंवा हल्ल्याचा प्रयत्न केला होता . या घटनेची दखल तेंव्हा कायद्याच्या चौकटीत राहून पोलिस' न्याय संस्था यांनी घेतली होती का ?
४२ वर्ष कोमातील जगणे याला जिवंत राहणे मानून, त्यानंतर झालेला मृत्यू हा मुळ हल्ल्याचा परिपाक कि नैसर्गिक मृत्यू, हि चर्चा फक्त न्यायालयीन चौकटीत राहून करणे योग्य ठरते.
माझ्या मते भावनिक पातळीवर तेव्हा योग्य वाटलेला - खटला दाखल करताना 'बलात्कार झाला आहे' हे भीषण सत्य नाकारणे व 'अतिप्रसंग व जबरी चोरीचा प्रयत्न' असा निर्णय हा खटल्याची अरुणा (पिडीत व्यक्ती ) ची बाजू कमकुवत करून गेला. असे समोर आलेल्या बातम्यावरून दिसते .
जेंव्हा हि घटना घडली तेंव्हा अरुणा याही परिस्थितीतून सावरेल व काही दिवसांनतर पुन्हा आपला नियमित दिनक्रम सुरु करेल , असा आशावाद होता. तसेच तीचा विवाह ठरलेला होता. म्हणून सोहनलाल च्या बलात्काराचे दुष्कृत्य झाकण्यात आले.
वरील परिस्थितीचा आज एकत्रित विचार केला तर अरुणा हि योग्य न्याय मिळवण्याच्या बाबतीत पोलिस यंत्रणा आणि सामाजिक बंधने ,चालीरीती या कात्रीत अडकून बळी गेलेली पिडीत आहे असे मला वाटते .
यानंतर विलंबाने मिळणारा न्याय हा देखील अन्याय ठरतो .हि संकल्पना आणि शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी अडकता कामा नये , या सारख्या विचार धारा या ठिकाणी कशा हाताळल्या जाव्यात या बाबत मी ठाम निर्णय घेण्याच्या मनस्थितीत देखील नाही . त्यामुळे माझ्याकडे आता हे सर्व थांबवा किंवा वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याने पुनश्च नवीन खटला उभा करा यातला कोणता निर्णय घेतला जावा हे सांगण्याचे धारिष्ट्य राहिलेले नाही . हेच खरे

नीधप आणि टिनाचे मत पटले.

भारतात कुठलाही गुन्हा न करता अतिशय दु:खी जीवन जगणारे अनेक आहेत. मग सोहनलालवर इतकी दया का? आणि इतके दिवस हे मीडीयावाले झोपले होते का? आणि ज्या नर्सने कै अरुणाची इतके वर्ष सेवा केली त्यांच्याबद्दल आपल्या सरकारला आणि मीडिला कय वाटते? अशा आदर्श व्यक्ती कितपत जनतेसमोर आणून त्यांचा गौरव केला जातो?

किंकर,

प्रतिसाद आवडला. विशेषत: हे विधान महत्त्वाचं वाटलं :

>> प्रथम झालेली शिक्षा संपल्यावर किंवा खटला सुरु असलेल्या काळात केंव्हा तरी दुर्दैवी अरुणावर सोहनलाल याने
>> हल्ला किंवा हल्ल्याचा प्रयत्न केला होता . या घटनेची दखल तेंव्हा कायद्याच्या चौकटीत राहून पोलिस' न्याय संस्था
>> यांनी घेतली होती का ?

दुसऱ्या हल्ल्याच्या घटनेच्या आधारे अरुणाचा दयावध करण्याचा युक्तिवाद सोहनलाल करू शकतो. तशीही अरुणा गलितगात्रच होतीच. म्हणूनच तिला यातनांतून कायमचं सोडवण्यासाठी तिच्यावर पुन्हा हल्ला केला, असं तो सांगू शकतो.

दुसऱ्या हल्ल्याची दखल कायद्याच्या चौकटीत घेतली गेली असली, तरी त्यातून अरुणाचा फारसा काही लाभ होण्यासारखा नव्हता. तसेच सोहनलाललाही काही फरक पडण्यासारखा नाही. दुसऱ्या हल्ल्यामुळे मूळ परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होतेय इतकं मात्र खरं.

आ.न.,
-गा.पै.

साती,

>> ही सगळी फक्तं चीप पत्रकारिता आहे.

पूर्णपणे सवंग म्हणता येणार नाही. 'का घेतला शोध सोहनलालचा' म्हणून संजय आवट्यांचा लेख आला आहे : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=UIKXu

सोहनलालचा ठावठिकाणा शोधणं जिकिरीचं काम आहे. त्याबद्दल सकाळच्या चमूचं अभिनंदन. मात्र बातमीचं वार्तांकन अयोग्य पद्धतीने केलं गेलंय. बातमीत सोहनलालचं गाव, पत्ता आणि प्रकाशचित्रं द्यायला नको होतं. समजा कोणी सूडसतर्क (vigilante) माणसाने सोहनलालला त्रास दिला तर ते योग्य होणार नाही. बातमी प्रकाशित करतांना तारतम्य बाळगलेलं दिसंत नाही.

इथे इंग्लंडमध्ये गुन्हेगारांची खाजगी माहिती प्रसृत करण्यावर कडक निर्बंध आहेत. तशा प्रकारचा खटला सोहनलाल सकाळवर दाखल करू शकणार नाही बहुतेक.

थोडक्यात काय की सोहनलालची बातमी प्रकाशित करण्यातला हेतू स्तुत्य होता, पण परिणाम तितकेसे स्तुत्य नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

अरुणा शानभागवर सोहनलालनंतर ४३ वर्षांनी मिडियाने पुन्हा बलात्कार केला असं मला स्पष्टपणे वाटलं.

४३ वर्षांनंतर या सार्‍याची गरज नव्हती. इन्वेस्टीगेटीव जर्नालिझमच्या नावाखाली मिडियाने मेलेल्या ढोराचं मांस खाण्याची गिधाडी प्रवृत्ती पुन्हा या निमित्ताने दाखवली. अत्यंत हस्यास्पद कारण देताना काल दोघे पत्रकार म्हणाले कि जगासमोर दुसरी बाजु यावी म्हणुन त्यांनी सोहनलालला शोधले.

सोहनलाल आजही बलात्कार केला नाही असेच म्हणतो आहे. हेच सत्य या निमित्ताने पदरी पडले. जर या केसमध्ये बलात्काराची घटना नसती तर मिडियाला या घटनेत "न्युज व्हॅल्यु" दिसली असती का हा महत्वाचा प्रश्न आहे.

>>>> पुन्हा प्रसारमाध्यमात चर्वितचर्वण .... आणि सुटका झालेल्या अरुणाची पुन्हा एकदा विटंबना. हे सगळं इथेच थांबावं असं वाटतंय. <<<<<
का थांबाव? अन हा फक्त "मिडिया"चा टीआरपीचा धन्दा आहे किंवा आम्हां वाचकांचा सकाळच्या चहाटोस्टखारीच्या नाष्ट्याबरोबरचा चर्चेचा विषय आहे, असेच धरुन का चालायचे?

एका व्यक्तिच्या अमानुष बेकायदेशीर अनैतिक अश्लाघ्य कृतीने दुसरी व्यक्ति एक दोन तिन नाही तब्बल बेचाळीस वर्षे आसन्नमरण अवस्थेत अंथरुणाला खिळली, तशी ती खिळली नसती व जागेवरच मृत झाली असती किंवा तसेही न होता नंतर बलात्कारित म्हणुन जीणे जगत राहिली असती, काहीही झाले असते, तरीही त्या एका व्यक्तिने केलेले कृत्य नराधम या पदवीलाच साजेसे होते, असेल. व अशा त्या व्यक्तिचे अनुकरण करणारे असंख्य नरपुंगव या समाजात वावरत असताना, अशा गुन्हेगार व्यक्तिने तत्कालिक उपलब्ध "पुरावे/साक्षिदार" यास अनुसरुन मिळालेली शिक्षा "भोगली" असली, तरी बेचाळिस वर्षांनंतर, व त्याच गुन्ह्याचा परिपाक म्हणून बाधित व्यक्ति मृत्यु पावली असताना, सदरच्या गुन्हेगाराची सध्याची स्थिती काय आहे हे जाणून घेणे हा केवळ "करमणूविषय/टीआरपीचा" विषय ठरतो असे मला वाटत नाही.

सकाळने हा शोध घेतला व तो मांडला याबद्दल मी त्यांचे आभारच मानतो.

सकाळने शोध घेतला, मांडला हे ठिकच आहे पण बातमीमधे केवळ नराधम शब्द वापरून मग त्याला बिच्चारा ठरवण्याचा जो अट्टाहास आहे तो उबग आणणारा आहे.

@ अतुल ठाकूर - अत्यंत सहमत. आज अरुणा शानबाग गेल्यावर आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ताजी असताना जगासमोर दुसरी बाजू आणायची गरज का भासते? इतकी वर्षं का वाटले नाही? सकाळही अत्यंत सवंग बनत चालला आहे!

इन्वेस्टीगेटीव जर्नालिझमच्या नावाखाली मिडियाने मेलेल्या ढोराचं मांस खाण्याची गिधाडी प्रवृत्ती पुन्हा या निमित्ताने दाखवली.>> +१००

अत्यंत हस्यास्पद कारण देताना काल दोघे पत्रकार म्हणाले कि जगासमोर दुसरी बाजु यावी म्हणुन त्यांनी सोहनलालला शोधले.>> दुसरी बाजू काय म्हणे ती?

सकाळ वाले मूर्ख आहेत. हे सर्व आधीच व्हायला हवं होतें, त्यांनी कष्ट घेतले सर्व बरोबर, पण या विषयाची सेन्सिटिव्हिटी न समजता "ऑम्ही कस्सं बुवा सगळ्यांच्या आधी सोहनलाल ला शोधलं आणि आम्हाला कश्शा बुवा सगळ्यांच्या छान छान कॉम्प्लीमेंट मिळाल्या" याची जास्त दवंडी पिटवणं चालू आहे. डोक्यात जातं ते यासाठी की नाशिक मध्ये एक आत्मदहन चित्रीत करणार्‍या साम वाहिनीच्या फोटोग्राफरचं पण सकाळने असंच उदोउदो वालं वृत्त प्रकाशीत केलं होतं.
"त्या माणसाने पेटवून घेतलं. मला पटकन सुचलं आणि एकदम स्पष्ट शूटिंग केलं" वगैरे वगैरे. पण माणसाला वाचवायला काय प्रयत्न झाले याचा साधा उल्लेख नाही. मान्य आहे, शंभर वाचवायला जात असताना तुम्ही एकशे एकावे हे सरव शूट करुन बाकी नंतरचा रेकॉर्ड ठेवायला मदत करता, पण किमान ज्याच्या चितेवर आपली पोळी भाजतोय त्याचा दु:खाचा उल्लेख पण नाही? आता अरुणा प्रकरणात झाल्याबद्दल दु:ख दोन टक्के आणि "टेस्टिमोनियल्स" ९८%. आणि सोहनलाल च्या भोगण्याचं इतकं करुण चित्रण कशाला? अरुणाने काय भोगलं? तो सात वर्षात सुटून आयुष्य उपभोगून नोकरी करुन मुलं सुना आणून आता उतार वयात २-३ वर्षं कष्टात असेल तर इतकी भलामण कशाला? "अरुणा गेली, पण सोहनलालची करुण कहाणी अजून संपली नाही " इ.इ., म्हणजे चित्र असं की अरुणा आणि सोहन एकत्र एखाद्या आपत्तीत सापडले होते आणि ती गेली आणी हा बिच्चारा अजून हाल काढत जगतोय वगैरे वगैरे.
यावर दुसरी बाजू असेल पण, पण सोहनलाल वरचं पूर्ण आर्टिकल डोक्यात गेलं.

बापटांचा लेख आता वाचला आणि बराच पटला. सेन्सिबली हिलीलं आहे.

>>>> शब्द वापरून मग त्याला बिच्चारा ठरवण्याचा जो अट्टाहास आहे तो उबग आणणारा आहे. <<<<
बिच्चारा ठरवताहेत असे मला नै वाटत. उलट अशी नराधम कृत्ये केल्यानंतरचे "कर्माचे फळ" काय पद्धतीने मिळत रहाते व जिवंतपणीच कशा नरकयातना भोगाव्या लागतातच लागतात याचे उदाहरण म्हणुन मी हे बघतो.
सकाळवाले सर्वधर्मसमभावि तसेच कधीकधी निधर्मी/समाजवादी वगैरे असल्याने ते सु:स्पष्टपणे हा हेतू मांडूच शकत नाहीत, पण माझ्यासारख्याला नेहेमीच वाटत रहाणार की इतकी नालायक कृती करुन जिवंत राहिलेल्या गुन्हेगाराला "कायद्याने काही एक शिक्षा फक्त सिद्ध झालेल्या गुन्ह्यापुरती" मिळालेली असली तरी, मानवी कायद्यापुढे सिद्ध होऊ न शकलेल्या गुन्ह्याबाबत देव व दैवाच्या दरबारात त्याचा हिशेब काय घातला गेला आहे ते माहित व्हावे.
सकाळने फक्त वस्तुस्थिती समोर आणली आहे, अर्थात अशा प्रकारचे कसलेच भाष्य न करता.
मला नै वाटत की "त्याला बिच्चारे" वगैरे ठरविले जातय, वा जाईल. उलट मजसारख्या सर्वसामान्य वाचकांची अशीच प्रतिक्रिया असेल, की बरे झाले, अद्दल घडत्ये त्याला.

कसल्या नरकयातना?

भारतातली खूप सारी जनता हालाखीत काबाडकष्ट करते. कुठलाही गुन्हा न करता.
हा माणूस धडधाकट आहे, चालता बोलता आहे, मुलाबाळांच्यात रहातोय....

रस्त्यावर विकलांग अवस्थेत पडला असता तर त्याला नरकयातना म्हणता येतील एकवेळ पण तरीही त्याच्याबद्दल वाईट वाटायची गरज नाही. त्याची अवकाद याहून खालचीच आहे.

माफ करा पण त्याच्या सध्याच्या आयुष्याला नरकयातना म्हणणे हेच मला अरूणा शानबागची टर उडवल्यासारखे वाटते.

Pages