पानिपत

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 20 May, 2015 - 14:16

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घेणे, हा असाच त्या लांबलचक यादीतला एक क्षण.

पानिपतात १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी जे काही घडून गेले, तो आता, म्हणलं तर, इतिहास आहे; म्हणलं तर, अजूनही भळभळणारी जखम आहे. त्यावर आजवर बरंच काही लिहिलं गेलंय. याही पुढे लिहिलं जाईल. (जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे!) कोणाचं चुकलं, काय चुकलं वगैरे चर्चा होतील. पण एक सत्य मात्र कधीही पुसलं जाणार नाही. आपल्या घरापासून दूर, परक्या अनोळखी मुलखात छातीत एखादा तीर घेऊन अथवा जिव्हारी लागलेला तरवारीचा घाव सहन करत, घरची आठवण डोळ्यात घेऊन असंख्य वीर मृत्यू पावले. चूक कोण होतं, बरोबर कोण होतं, कोण देशभक्त आणि कोण परके हल्लेखोर हे ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आणि विचरसरणीप्रमाणे ठरवावं. मरणारा कोणी सातार्‍याकडचा असेल तर कोणी जलालाबादचा असेल. पण तो मेला पानपतावर हे त्यांच्यातलं साम्य मात्र कधीच पुसलं जाणार नाही. मरायच्या आधी ते मराठे, गिलचे, रोहिले, बुंदेले, दुर्राणी, गारदी होते. मरताना मात्र ते सगळे केवळ असहाय, तडफडणारे, पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेले मानव होते.

इतिहासाबद्दल पवित्रे असू शकतील माणसांचे, परंतु जे मेले त्यांच्या ’human story' बद्दल कोणाचंही दुमत असणं शक्य नाही.

जेव्हापासून पानिपतला जायचा विषय सुरू झाला तेव्हापासून ’काहीही झालं तरी यु्द्धस्मारक बघायचंच’, असा निश्चयच केला होता. अवांतर वाचन कायमच चालू असतं, त्यानुसार 'आता पानिपतावर काही आहे का?' यावर फार पूर्वीच नेटवर शोधलं होतं. त्यानुसार तिथे अगदी आत्ता आत्ता पर्यंत एक काळा पडलेला आंब्याचा वृक्ष होता हे समजलं होतं. असं म्हणतात की, युदधाच्या धामधुमीत हा आंबा काळा पडला होता. ही दंतकथाच असावी. पण, हा आंबा जिथे होता तिथेच, त्याच विस्तिर्ण मैदानात लढाई झाली होती हे मात्र सत्य आहे. याच झाडावरून, या स्थळाचे नाव ’काला आंब’ असे पडले. काही वर्षांपूर्वी हा ’काला आंब’ जमीनदोस्त झाला. नंतर सरकारने याच जागी एक विस्तिर्ण स्मारक बांधले. तेच हे युद्ध स्मारक.

हे स्मारक खुद्द पानिपतातच आहे की थोडे लांब आहे वगैरे काहीच माहिती नव्हती. इथे पोचलो तेव्हा हे ही लक्षात आले की, मी पानिपतपासून १८-२० किलोमीटरवर एका गावात असेन. शिवाय, स्वत:चे हक्काचे वाहनही नसणार होते. त्यामुळे, स्मारकाला भेट देता येईल की नाही याबद्दल धाकधुक वाटू लागली. कसे जमते ते बघू, असा विचार करून स्वस्थ बसलो. एक दोन दिवस गेल्यावर चाचपणी सुरू केली. आमची व्यवस्था ज्याच्या जिम्मे होती त्याच्याकडे हळूच विषय काढला.

’अरे, **जी, वो पानिपतमे एक युद्ध स्मारक है ना? काला आंब कहते है उसे. कितना दूर है?’

’अरे, सरजी, क्या करियेगा वहां जा के? कुछ नही है वहां. उससे अच्छा की आप कुरूक्षेत्र चले जाइयेगा. पुण्यभी कमा लेंगे! ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!’

’अरे ऐसा ना कहियेगा साबजी! मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’

माझा फट्टकन आलेला जवाब ऐकून **जी चपापले. (माझ्याजागी तू असतास तर बहुधा पानिपतात अजून एक स्मारक बांधावं लागलं असतं... **जींचं! Wink ) त्यांनी त्यानंतर माझं बोलणं हसण्यावारी नेलं नाही. पहिल्याच रविवारी जावं असा बेत होता. पण गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो बेत बारगळला. मग दुसर्‍या रविवारी जमवलंच. मात्र, तडजोड म्हणून बरोबरच्या सहकार्‍यांच्या मताला मान देवून सकाळी कुरूक्षेत्र आणि दुपारी (भर उन्हात) काला आंब असं नियोजन करावं लागलं.

काला आंब खुद्द पानिपत गावापासून पाचेक किलोमीटरवर आहे. शेवटपर्यंत चांगली पक्की सडक आहे. स्मारकाच्या आजूबाजूला विरळ वस्ती आहे. स्मारकाची जमिन सोडल्यास शेती आहे सगळीकडे. स्मारक प्रशस्त आहे. सरकारने खरंच खूप उत्तम स्मारक बांधलं आहे आणि देखभालही उत्तम होत असावी असं जाणवलं. स्मारक म्हणजे खरं तर एक खूप मोठं उद्यान आहे. झाडं आहेत, हिरवळ आहे, पाण्याची कारंजी आणि छोटी तळीही आहेत. कारंजी आणि तळी सध्या कोरडी आहेत. पण अधून मधून वापरात असावीत.

स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. समोरच पानिपतच्या तिन्ही यु्द्धांबद्दल हिंदी व इंग्रजीत संक्षिप्त माहिती देणारे फलक लावले आहेत. जागा प्रशस्त असल्यामुळे गाड्या पार्क करायला काहीच अडचण नाही. ते फलक बघत आपण पुढे निघतो. ऊन भयानक असल्यामुळे त्रास होत होता. हिरवळ असली तरी, झाडं कमी आहेत आणि चालायच्या मार्गाच्या दुतर्फा नाहीत त्यामुळे स्वत:ला ऊन्हात भाजून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गाईड किंवा पत्रक असे काही तिथे नाही त्यामुळे स्वत:च शोधत निघालो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर दूरवर एक चबुतरा आणि त्यावर एक स्तंभ दिसला. नेटवर हे दृश्य असंख्यवेळा पाहिल्यामुळे आपल्याला तिथेच जायचं आहे हे लगेच लक्षात आले. त्या रोखाने निघालो.

चबुतर्‍यासमोर जाऊन उभा राहिलो. युद्ध याच मैदानात झालं होतं हे नक्की. पण विश्वासराव अगदी याच स्पॉटवर गर्दीत हरवला, याच स्पॉटवर त्याचे पार्थिव मिळाले, या ठिकाणी ’भाऊ’ हत्तीवरून उतरला आणि स्वत: गर्दीत घुसला, नेमक्या याच स्पॉटवर इब्राहिमखान गारदी आपल्या प्राणप्रिय असलेल्या धन्यांचे, विश्वासराव व सदाशिवरावभाऊ यांचे, अंतिम संस्कार विधीपूर्वक स्वतः करत असताना अफगाण सैन्याच्या हाती इथे सापडला (आणि मुस्लिम असूनही मराठ्यांची बाजू घेतली म्हणून आधीच त्याच्यावर राग होता त्यांचा, त्यात परत हे असले धार्मिक कृत्य करत होता काफरांसाठी म्हणून त्याचे अतोनात हाल करून त्याला मारण्यात आले) व या स्पॉटवर त्याला मारण्यात आलं .... असले नेमके तपशील आता फक्त काळाकडेच आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी ते तपशील स्वत:पुरते बघायचे. आणि अमोल, नेमका इथेच तू हवा होतास. ते तपशील केवळ स्वत: बघायचेच नव्हे, तर इतरांनाही दाखवायचं कसब तुझ्याकडे आहे. मी माझ्यापरीने प्रयत्न केला आणि मला ते बरंचसं जमलं देखील.

कडक उन्हाळ्यातली भर माध्याह्नीची वेळ त्यामुळे तिथे आम्ही तिघे (त्यातला मी सोडता बाकीचे दोघे दूर एका झाडाखाली सावली धरून उभे होते), आमचा ड्रायव्हर (जो गाडीतच बसून होता), टाइमपास करत बसलेली गावातली काही चुकार पोरे आणि सावल्या व आडोसा धरून बसलेली दोन जोडपी सोडल्यास देहधारी सृष्टीतील एकही व्यक्ती नव्हती. कानभरून शांतता दाटलेली होती.

मी ही थोडा वेळ शांतपणे तिथे उभा राहिलो. माझ्या मोबाईलवर गोविंदाग्रजांनी लिहिलेला ’पानिपताचा फटका’ मुद्दाम कॉपी केला होता. तो एकदा वाचला. त्या सर्वच अनाम वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथून बाजूला झालो.

बाजूलाच काही ठिकाणी युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. पण ते एकंदरीतच तिन्ही युद्धांचे असावेत असे वाटले.

एव्हाना बाकीचे लोक बरेच कावले होते. माझ्या वेडगळपणापायी त्यांनी तरी किती सहन करावे? आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांना पानिपतमध्ये असलेले ’प्रसिद्ध’ बिगबाझार आम्हाला दखवायचे होते व त्याचीच घाई त्यांना झाली होती. (त्यांच्या मते या बिगबाझारमध्ये असलेली ’अपने आप चलनेवाली सीढी (आप बस खडे रहो, खुद आपको उपर या नीचे ले जाती है)’ बघणे अतिशय महत्त्वाचे होते!!!!) त्यामुळे, परत एकदा चबुतर्‍यासमोर उभा राहिलो आणि परत निघालो.

अमोल, आपण बरोबर तर जाऊ शकलो नाही पानिपत बघायला. पण परत एकदा जाऊ. यावेळी अजून काही गवसते आहे का ते बघू. जमल्यास ’रोड मराठा’ समाजाशी काही संपर्क करता येईल का ते पाहू. (मला खात्री आहे, सह्याद्रीच्या अनेक डोंगर दर्‍यांमध्ये तझी जशी हक्काची घरं आहेत, तशी पानिपत, करनाल परिसरातही तुझी घरं होतील!) जे मराठे तिथेच लपून राहिले आणि तिथलेच बनले त्यांच्या कथा ऐकायला मिळतात का ते पाहू. हे तरी एकत्रपणे अनुभवायला जमतेय का ते पाहुया!

तो पर्यंत हे काही फोटो काढलेत ते बघ.

तुझा,

बिपिनदा.

ता. क. : परतीच्या वाटेत रस्त्यात एक ’रोहिला टायर वर्क्स’ नावाचे दुकान दिसले. त्या ’रोहिल्या’ला या युद्धाबद्दल काय वाटत असेल? एकदा भेटून गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्याबरोबर.

बिपिनदा.

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयं ..
गोविंदाग्रजांचा फटका इथे दिल्याबद्दलही धन्यवाद. >> +१

हेमन्त्,

>> युधाआधीच आपण हरणार होतो - किंवा तीच आपली लायकी होती.

तुमचा उद्वेग मी समजू शकतो. पानिपताच्या पराभवाच्या वेळोवेळी कारणमीमांसा झाल्या आहेत. त्या बरोबरही आहेत. फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे अब्दालीच्या मनात मराठ्यांबद्दल कमालीचा आदर आहे. त्याने मराठ्यांचं जे वर्णन केलं आहे ते स्फूर्तीदायक आहे.

एव्हढे यश तुला रगड, माझ्या मना बन दगड.

आ.न.,
-गा.पै.

छान वर्णन

पानिपत.... अंगावर काटा आल्यावाचून राहिला नाही.

पानिपतामध्ये लढलेल्या मराठ्यांना विनम्र श्रद्धांजली.

या धाग्यावर आल्यानंतर उद्विग्न होणाऱ्या मनांवर, उसवलेल्या जखमांवर किंचीतशी फुंकर मारणारे उतारे येथे उधृत करीत आहे..

"स्वामी विश्वारुपानंद" यांच्या "महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम" या लेखातील हे उतारे आहेत.
लेखाची लिंक : http://www.maayboli.com/node/54140

<<<<<<
अर्थात पानिपतचे युध्द मराठे लढले म्हणून आजचा भारत अस्तित्वात आला. कारण या युध्दात अहमदशहा अबदालीचे इतके जबरदस्त नुकसान आणि प्राणहानी झाली की तो हाय खाउन परत गेला. पानिपतची लढाईसुध्दा अहमदशहा अब्दालीने अक्षरशः जेमतेम केसाच्या फरकाने जिंकली.अफ़गाणी सैन्याचीही फार कत्तल झाली.

तो परत गेला आणि त्याने पुन्हा भारताकडे बघीतले नाही. पानीपतची लढाई जिंकल्यावर त्याला नानासाहेब पेशवे मोठी फौज घेउन येत आहे ही बातमी कळल्यानतंर तो घाईघाईने परत गेला आणि जातांना दिल्लीच्या मोगल बादशहाला सगळ्यांनी मानावे असा प्रेमळ[???] निरोप देउन गेला.
>>>>>>

<<<<<<
जर मराठे पानिपताला लढले नसते तर अहमद्शहा अबदालीने दूसर्‍यांदा दिल्ली जिंकली असती.[ पहिल्यांदा १७५७ मध्ये] आणि या वेळेला त्याचा सल्लागार आणि धर्मगुरु शहा वलीलुल्ला होता. शहा वलीलुल्ला हा अतिशय प्रभावी मुल्ला होता .त्यामुळे उत्तर भारतात तालिबान सारखे अतीशय कडवट मुस्लिम राज्य आले असते आणि मग भारतभर पसरले असते.कोणास ठाउक याचा पुढे इतिहासावर काय परिणाम झाला असता.
>>>>>>

>>आणि हे युद्ध जर आपण जिंकले असते तर आज आसेतुहिमाचल मराठा इम्पायर असले असते..<<
"आज आसेतुहिमाचल मराठा इम्पायर असले असते" इज मोस्ट अनलायक्ली. पानिपतच्या दारुण पराभवानंतर, मराठ्यांनी उत्तरेला/दिल्लीत परत वर्चस्व प्रस्थापित केलं - ज्याचं सामरीक महत्व पानिपतच्या (हायपथेटिकल) यशाएव्हढच होतं. पुढचा इतिहास आपल्या समोर आहेच...

Pages