पारंपारीक ईडली आणि चटण्या

Submitted by आरती. on 14 May, 2015 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पारंपारीक ईडली
P13-05-15_07.32[2].jpg

ईडली राईस - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

रवा ईडलीसाठी

ईडली रवा - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

क्रमवार पाककृती: 

सॉफ्ट पांढरी शुभ्र ईडली

१. सकाळी ईडली राईस, मेथी एकत्र भिजत घाला. उडीद डाळ वेगळी भिजत घाला.
२. संध्याकाळी डाळ तांदूळ वाटायच्या १५ मि. आधी पोहे थोड जास्त पाणी घालून भिजत घाला.
३. ईडली राईस, मेथी पोहे अगदी बारीक वाटून घ्या. अजिबात रवाळ नको. उडीद डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

४. दोन्ही मिश्रण एकत्र करा. त्यात चवीपुरत मीठ घालून एकाच दिशेने ढवळून घ्या. १ टे. स्पून कच्च तेल घालून आंबवायला ठेवा.

५. सकाळी ईडलीपात्रात पाणी घालून ५ मि. उकळवून घ्या. नंतर ईडली स्टॅन्ड ठेवून १५ मिनिटे वाफवा. पहिल्या घाण्याच्या नंतर ईडली पात्रातील पाणी उकळवायची गरज नाही.

रवा ईडलीसाठी

ईडली रवा, मेथी, उडीद डाळ वेगळ भिजत घाला. उडीद डाळ, मेथी, पोहे घालून बारीक वाटून घ्या. ईडली रवा वाटलेल्या मिश्रणात घालून मीठ घालून ढवळून कच्च तेल घालून पीठ आंबवायला ठेवा.

अजून काही ईडलीचे प्रकार

१. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून भिजवलेल्या चणाडाळीचे ४-५ दाणे घाला. ही ईडलीसुद्धा छान लागतात.

२. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून साधी किंवा रंगीत साखर शिंपडा. ही गोड ईडली गोडप्रेमींना खूप आवडते.

३. तट्टे ईडली - ईडलीच पीठ छोट्या डीशमध्ये वाफवा. असच छोट्या वाटी किंवा ग्लासमध्ये वाफवता येते.

४. कांचीपुरम ईडली - ईडलीच पीठ आंबवायला ठेवल की २ टे. स्पून चणाडाळ भिजत घाला. सकाळी काजूचे तुकडे तुपात तळून घ्या. ईडलीच्या पिठात भिजवलेली चणाडाळ, बारीक चिरलेली हि.मि., कढीपता बारीक चिरून, १/२ कप ओल खोबर, १/२ इंच किसलेल आल, काळी मिरी खडबडीत वाटून १ टी.स्पून. हे सर्व मिक्स करा. पिठात काजूचे तुकडे मिक्स करा किंवा वेळ असेल तर ईडलीपात्रातील तेल लावलेल्या प्रत्येक वाटीत काजूचे दोन तीन तुकडे ठेवून् त्यावर पीठ ओता. आणि १५ मिनिट वाफवा.

वरच्या फोटोतील ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार १

ओल खोबर, बेडगी मिरची, आल, लसूण. मी लिंबूरस घातला होता, तुम्ही कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, राई ची फोडणी द्या.

ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार २-ओल खोबर, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

ओल खोबर चटणी प्रकार ३ - ओल खोबर, चटणीची डाळ / पंढरपूरी डाळ, हि.मि. आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

लाल टॉमेटोची चटणी

तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.

डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट.

शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.

आल्याची चटणी
ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.

डोसे प्रकार इथे बघा. http://www.maayboli.com/node/53541

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे, माझ्यासारखे ईडलीप्रेमी दिवसभर चरत असतात. :)
अधिक टिपा: 

प्लीज ईडलीच्या पीठात भात घालू नका. आंबण्याच्या प्रक्रियेत भात नासतो आणि अशी ईडली खाल्ली की पोट बिघडत. अशा ईडल्यांची चव आणि रंगसुद्धा वेगळाच असतो.

पोहे नसतील तर कुरमुरे घाला.

पीठात तेल घातल्यावर ढवळायच नाही.
जी काही पिठाची कंन्सिस्टंसी करायची असेल ती पीठ आंबवायला ठेवण्या अगोदर करावी.
एकदा पीठ आंबल्यावर त्यात अजिबात पाणी घालायच नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादांपेक्षा धागे शोधणं जास्त सोपं पडतं. त्यामुळे नवीन बाफ चालू केलास ते बरं झालं. मी दोन्हीकडे दोन्ही लिंका दिल्यात, शोधायला सोपं पडावां म्हणून Wink

ही शेम्गदाण्याची चटणी मस्त वाटतेय. खोबरं नसल्याने खराब होण्याची काही चिंता नाही. डब्यात न्यायला ओली चटणी म्हणून उपयुक्त वाटतेय.
वर फोटोत इडलीबरोबर आहे ती टोअ‍ॅटो चटणी आहे का?

मी दोन्हीकडे दोन्ही लिंका दिल्यात, <<<< धन्यवाद मंजूडि. Happy

वर फोटोत ओ.खो. ची चटणी आहे त्याची रेसिपी वर लिहिली आहे.

त्या इडलीच्या पीठात थोडा गुळ, वेलची जायफळ पुड आणी ओल्या नारळाचा चव घालुन इडली करायची. मsssssस्त लागते, अगदी नारळीभातासारखी चव येते.

काल हा आणि मंजूनं टाकलेला फोटो बघून कधी एकदा इडली खातेय असं झालं होतं. पीठ नव्हतं घरात म्हणून घरी जाताना MTRचं मिक्स नेलं आणि इडली-सांबार करून खाल्ल तेव्हा जीव थंडावला Happy

आरती, पुन्हा एक खूप उपयोगी धागा. तुमच्या पाक्कृतींवर आणि त्यातल्या प्रमाणांवर विश्वास बसलाय. Happy धन्यवाद! चटणी-इडल्यांचा फोटोतर सुपरकातिल!

एक शंका आहे. रवाइडलीमध्ये तुम्ही इडलीचा रवा घ्यायला सांगितलं आहे. पण तो तर तांदळाचा असतो ना? रवा इडलीत गव्हाचा (उपम्याचा) रवा नाही का वापरायचा?

मस्त दिसतायत ईडली.
वरच्या फोटोतल्या ईडली तांदळाच्या आहेत की ईडली रव्याच्या? (तांदळाच्या आहेत अस वाटतय)

वांग्याची पण चटणी करतात ना ? <<<< दिनेशदा, वांग्याची चटणी म्हणजे वांग्याच भरीत. मला नाही येत.

पण तो तर तांदळाचा असतो ना? रवा इडलीत गव्हाचा (उपम्याचा) रवा नाही का वापरायचा? <<<< मृण्मयी, हो तांदूळाचा ईडली रवा मिळतो तोच वापरतो आम्ही. उपमा रवा ची ईडली वेगळी ती मला आवडत नाही म्हणून अजून शिकली नाही आहे. Happy घरी सुद्धा ह्या दोनच पद्धतीने ईडली बनते.

वरच्या फोटोतल्या ईडली तांदळाच्या आहेत की ईडली रव्याच्या? <<<< अनुश्री. हो ईडली राईसच्या आहेत.

धन्यवाद सर्वांना. Happy

छान पाकॄ....फक्त चटण्यांच्या रेसिपीचे प्रमाण मिळाले तर माझ्या सारख्या नवशिक्याला सुद्धा हे करता येईल.

केशवरत्न इडली रवा घालुन केलेल्या इडलीची चव घेऊन पहा. शेंगदाणा चटणी ऐवजी नारळाची चटणी ( नारळ, कोथिंबीर, फोडणी घालुन हवा असल्यास पुदीना आणि लसुण)

मुळात उडदाची डाळ आणि आंबवणे ही प्रक्रिया पित्तकारक आहे. शेंगदाणा ऐवजी ओल्या नारळाची चटणी यावर उपाय आहे.

Mi try kelya kal mast zalya. Tevdhyasathi D mart la jaun idli rice aanal a pun worth it. Aata ashyach banavnar thanks.

धन्यवाद सर्वांना.

रोचीन, पीठात तेल घातल्यावर ढवळायच नाही. तसच एकदा पीठ आंबल्यावर त्यात पाणीही घालायच नाही.

मनीशा धन्यवाद ईडली बनवल्यावर ईथे प्रतिसाद दिल्याबद्दल, फोटो का नाही दिला? Happy

मामी वरती अ‍ॅड करते कांचीपुरम ईडली.
अभिरुप <<<< वेळ मिळाला की अ‍ॅड करते प्रमाण, प्रत्येक घरातील तिखट खाण्याच प्रमाण वेगळ असत म्हणून थोडक्यात दिली आहे रेसिपी.

मृणाल १ <<<< डोसाच्या धाग्यावर ही लिहिल आहे जी काही पिठाची कंन्सिस्टंसी करायची असेल ती पीठ आंबवायला ठेवण्या अगोदर करावी.

मी इडल्या केल्या की त्या इडलीपात्राला खालून जरा चिकटतात. मी पहिल्या घाण्याआधी थोडं तेल लावते इडली पात्राला. मा का चु?
इडली चिकटू नये म्हणून काय करयचं?

कुकिंग स्प्रे वापर शूम्पे. बेस्ट सोल्युशन आहे. कणभरही न चिकटता अलगद निघून येतात इडल्या. डीजेने सांगितली होती ही आयडिया, तीच मीही वापरते आता.

कुकिंग स्प्रे मध्ये chemicals like isobutane or propane असतात. वापरताना विचार करा इतकंच लिहेन. मी बंद केलंय वापरणं.

Pages

Back to top