पूजा-अर्चा

Submitted by भारती.. on 7 April, 2015 - 03:51

पूजा-अर्चा

निद्रिस्त या ज्वालामुखीच्या गर्द विवराभोवती
सामग्रि सारी मांडते एकाग्रतेने ती किती
येता इथे चढणीवरी ऐवज तिला जो सापडे
ते गुळगुळित गोटेदगड रंगीतसे काही खडे
मुठिएवढे थोडे स्फटिक कंगोरलेले साजरे
डोकावती तेजाळती खडकातले कच्चे हिरे
काचेरले टोकेरले दुधिया छटांचे पुंजके
आकाश उजळत आतले रंगाप्रकाशांचे छुपे
धातूरसांची रोषणाई त्यात चमके थंडशी
की पत्थरांनी प्राशलेली आग धुमसे मंदशी
होत्या कुठुनशा आणलेल्या शंखशिंपा मोतिया
तेव्हा किनारा दूरचा नजरेमध्ये तरळे तिच्या

आरास रचली, घालते आता सभोती प्रदक्षिणा
ती गुणगुणे जी गुंजते डोंगरपठारी प्रार्थना
-‘’गे माळु दे हिरवळ कृपेची शेरडे चरू दे सुखे
आरण्यके वाढो; झरे खडकात पाझरू दे सुखे
जाळासभोती रंगू दे बेहोष गाणे नाचणे
ते राहुटीबाहेर रात्री गात्रकविता वाचणे
ही श्वापदे वनमाणसे झाडेझुडे ही पाखरे
तू सोसलेल्या खोल अर्थांची सचेतन अक्षरे
जो ग्रंथ तू लिहिलास त्याचे तू कथानक वाढवी
पोटातल्या पोटामध्ये लाव्हा तुझा तू शांतवी ‘’
-तेव्हा थरारून लहर गवतातून पिवळ्या धावली
विवरातली बुबुळे तमाची काय किंचित हालली..

(मात्रावृत्त मंदाकिनी )

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताई,

काय गूढरम्य कविता आहे हो! ग्रेस असंच लिहायचे का? मला उगीच त्यांची आठवण आली! शेवटची ओळ मस्तंच आहे. गात्रकविता हा शब्द खूप आवडला. शब्द चपखलपणे योजण्याची तुमची हातोटी आहेच! Happy

आ.न.,
-गा.पै.

Sundar

आहा ! भारती ताई.. सुंदर कविता..
वाटेत भेटलेल्या (की वाट्याला आलेल्या पुल्लिंगी ??) गुळगुळित गोटेदगड ,खडे ,स्फटिक, कच्च्या हिर्‍यांची तटस्थ नोंद घेणार्‍या, स्वप्नात किंवा कधीकाळी प्रत्यक्ष भेटलेलया मोतिया शंख शिंपल्यांची आठवण ठेवणार्‍या ,सगळाच नाही पण, शेवटी सृजनात निर्मीतीतही काहीसा स्वत:च्या स्त्रीत्वाचा ठाव शोधणार्‍या.आणि तो उत्कट पूजासोहळा साजरा करणार्‍या स्त्री ची कविता.. अगदी सुंदर..

ताई तुला किती नमस्कार करावेत या सुंदर कवितेसाठी. कवितेला अर्थांच्या इतक्या छटा उमटल्या आहेत की मी काय बोलणार!
इतर ठिकाणी तुला म्हटल्याप्रमाणे, निर्मितीच्या आधी आदिमाया अशी विचार करत असेल! तिच्यातलं स्त्रीत्व कशाच्याही निर्मितीच्या आधीचं, स्वयंभु आणि विलक्षण!
भन्नाट, झक्कास, भारी, सुंदर आणि अजुन काही विशेषणे असतील ती सगळी या कवितेसाठी! Happy

या कवितेचा पहिला भाग माझ्या डोळ्यांपुढे सेमी Abstract चित्रासारखा पण ठसठशीत बाह्य रेषांतून उमटत राहिला
मनातलेच ठळक रंग घेउन. दुसऱया भागातल्या प्रार्थनेचा मंत्रभारलेपणा एकवटताना शब्द इतके सजीव होतात की शेवटची ओळ वाचतानाच अंगावर शहारा येतो
. वर दाद ने लिहिल्या प्रमाणे जी ए नी पद्य लिहिले अस्ते तर ते असेच काहीसे असते असं वाटून गेलं
भारतीजी तुमची जवळ जवळ प्रत्येक कविता ,अर्थ अनेक पदरी नवनिर्मितीचा घाट ' अशाच रुपात प्रगटते .

ही चमत्कारिक कविता मंदाकिनी या मात्रावृत्तात आहे ( गागालगा *४ ), घाईघाईत पोस्टली होती बाहेरगावी जाण्याआधी .
सर्व सुंदर प्रतिसादांसाठी धन्यवाद, ही खूपच समजून घेतली गेली आहे .दादने म्हटल्याप्रमाणे ग्रेसांपेक्षा ही जी. एं. च्या शैलीजवळची आहे.
गापै , गात्रकविता या आणि अशा शब्दांना दिलेल्या कॉम्प्लीमेंटसाठी धन्यवाद. मलाही ग्रेस खूप आवडतात पण अजिबात न समजणारं बेचैन करणारं असं ते लिहितात म्हणून कुणाकडे तरी त्यांची तक्रारही करावीशी वाटते Happy
अविनाश, आकलनाच्या नेमक्या पायवाटेवर आहात , ज्वालामुखीचं निद्रिस्त विवर हे पृथ्वीच्या आग पचवून हिरवळ फुलवणाऱ्या क्षमाशीलतेचं प्रतीक, म्हणून लक्षणार्थाने स्त्रीतत्त्वाचंही ..
भुईकमळ ,तुम्हाला ही चित्रात्म दिसणारच .
कुलु Happy

दोन दिवस झाले ही कविता पुन्हा पुन्हा वाचतोय. एखादी biologically diverse इको सिस्टीम असावी आणि अंधार उन्हाच्या खेळात प्रत्यही काही नवीन दिसून हर्ष व्हावा....तशी काहीशी अवस्था आहे.

अविनाश चव्हाणांच्या (निपो ) प्रतिसादाचा दुर्मिळ 'कच्चा हिरा' इथे लखलखलाय ,म्हणून इथे थबकले ..किती वेगळं आकलन एका अनघड रचनेचं . खूप बोलायचं राहून जातं अविनाश, अशा तुरळक संवाद-खुणा उरतात.

वाह फार आवडली.
>>>>काचेरले टोकेरले दुधिया छटांचे पुंजके
आकाश उजळत आतले रंगाप्रकाशांचे छुपे
धातूरसांची रोषणाई त्यात चमके थंडशी
की पत्थरांनी प्राशलेली आग धुमसे मंदशी>>> वाह!! अतिशय चित्रदर्शी!!