http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध
http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड
http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी
========================================================================
आदले दिवशीची पुरेशी विश्रांती आणि झोप यामुळे पहाटे प्रसन्न जाग आली. आजचा पल्ला खूपच मोठा होता. कराड इतका नसला तरी तवांडी आणि वांटामुरी घाट पार करून बेळगाव मार्गे १४५ किमी अंतर पार करून धारवाड गाठायचे होते. हा प्रवास किती खडतर असेल याची खरे तर कल्पना नव्हती आणि त्यामुळे पहाटेच्या वेळी मजेत होतो.
आधीच्या दोन दिवसांचा अनुभव लक्षात घेता, सकाळी उठल्या उठल्या एक एनर्जीबार संपवला आणि त्यावर अर्धी बाटली पाणी प्यालो. बऱ्यापैकी ताकद आल्यासारखे वाटले.
त्याजोरावर हुप्पा हुय्या करून निघालो.
आजही मस्त काळोख्या पहाटेच चालवायाचे होते पण परिस्थिती बरी होती आणि ती जेमतेम ४-५ किमीपर्यंतच टिकली. कारण निप्पाणी सोडल्या सोडल्या लगेचच तवांडीचा घाट लागतो.
गाडीने जाताना हा घाट फारसा जाणवत नाही पण सगळे वजन घेऊन सायकल मारताना मात्र चांगलेच घामटे काढतो. आज तसा वेग बरा होता त्यामुळे अगदी मागे पडलो नाही आणि फासफुस करत घाट चढायला सुरुवात केली. वाटला होता त्यापेक्षा चढ बराच निघाला आणि शेवटी वैतागून मी उभे राहून पॅडल मारायला लागलो.
बाबूभाई मागेच होता, त्याने अरे उगाच लोड नको घेऊ, गुढग्याला त्रास होईल असा इशारा दिला पण म्हणलं मरूं दे, पहिला हा घाट संपवतो मग बघु. आणि शेवटी घाट संपला तेव्हा इतक्या पहाटे देखील घामाने डबडबून निघालो होतो.
सुदैवाने थोडे पुढेच एक धाबा उघडा दिसला आणि गरमागरम चहा, क्रिमरोल हाणले. आणि त्याचा परिणाम म्हणून निसर्गाने जोरात पुकारले. परत मागे पडायला नको म्हणून सगळ्यांना विचारून खात्री केली, म्हणलं थांबताय ना, मी पटदिशी जाऊन येतो. हो हो म्हणले खरे आणि थोड्या वेळात बघतोय तर च्यायला सगळे आपले सायकलवर टांग मारून निघाले सुद्धा.
असली चिडचिड झाली, म्हणलं आता भेटूच दे, सांगतो की माणुसकीवरचा विश्वास उडालाय माझा.
सुदैवाने घाटपांडे काका आणि नुकतेच येऊन ठेपलेले युडी थांबले होते आणि युडींना लागलेला दम जिरून ते पुन्हा तयार होईपर्यंत वेळ लागणार होता. थोडा वेळ थांबलो आणि एकत्रच निघालो. पण ते दोघेही तसे निवांत चालवणारे असल्यामुळे मी लवकरच त्यांना मागे टाकून पुढे गेलो. आता पुढचा ग्रुप बराच पुढे आणि मागचे बरेच मागे असा प्रकार झाल्यामुळे पुन्हा मी एकटाच. पण आज त्रास वगैरे काही होत नव्हता. उल़ट सूर्योदयाबरोबर थांबून फोटोसेशन वगैरे करण्याचा उत्साहही होता.
संकेश्वर येथील साखर कारखाना
एकटेपणाचा कंटाळा जावा म्हणून मग पहाटेच्या वेळी डायरेक्ट बेबी डॉल दी म्हणण्यापेक्षा सगळी स्त्रोत्रे पार रामरक्षा, भीमरूपी, अर्थवशिर्ष त्यानंतर येतील नसतील त्या सगळ्या आरत्या म्हणल्या. मग भूले बिसरे गीत कार्यक्रम करून झाला. रैनाच्या बाफ ची आठवण काढत अॉलटाईपछपरी गाण्यांनाही न्याय दिला.
वााटेत त्रास झाला तो म्हणजे व्होल्वो बसेस आणि माजोरड्या एसयुव्ही वाल्यांचा. निप्पाणी ते बेळगाव रस्ता अतिशय सुरेख आहे आणि त्यामुळे या पट्ट्यात सगळ्याच गाड्या सुसाट जात असतात. कितीही अंग चोरून जायचे म्हणले तरी गाड्या अशा बुंगदिशी बाजूने गेल्या तर बिचकायला व्हायचे. त्यातून व्होल्वोचे इंजिन मागे असल्यामुळे त्या अगदी बाजूला आल्यानंतरच आल्याचे कळायचे आणि तारांबळ उडायची. त्यातून एसयुव्ही वाले १२०-१५० च्या वेगाने जाताना कट मारून जायचे आणि त्यावेळी मग शिव्यांशिवाय काही यायचे नाही तोंडात.
आपल्याकडे ना नुसते परदेशाचे गोडवे गायले जातात पण त्यांच्याइतका सेन्स काही नाही. रस्त्यावरून जाण्याचा पहिला हक्क खरे तर सायकलचा असला पाहिजे, पण आपल्याकडे म्हणजे कुठून हे गावंढळ लोक आलेत, एसयुव्हीमधून जायचे सोडले आणि बसलेत पॅडल मारत अशा तुच्छ भावाने बघणारेच बरेच. आणि बाजूला झालो नाही तर आपल्याला चिरडूनही पुढे जातील अशी वृत्ती. (काही सन्माननिय अपवाद होते खरे.. वेदांगला आलेला अनुभव म्हणजे, एक एसयुव्ही त्याला ओव्हरटेक कडून पुढे गेली आणि त्यात खच्चून जनता भरली होती पण त्याना चिअरअप करायचे होते. तर सगळ्या खिडक्यांमधुन जिथून जिथून शक्य आहे तिथून आठ दहा हात वर आले आणि सगळ्यांनी थंब्स अप केले....)
असो, तर संकेश्वर पार करून हुक्केरी, हत्तरगी करत हिडकल डॅमच्या अलीकडे नाष्ट्यासाठी थांबलो. गोकाकचा धबधबाही जवळ होता. पण या सायकल मोहीमेत आम्हाला रस्त्यापासून आजूबाजूला फार भटकायची मुभाच नव्हती. असेही निर्धारित अंतर पार करतानाच नाकी नऊ यायचे त्यामुळे २०-३० किमी रस्ता सोडून आत जाणे आणि साईट सिइंग करणे हा मुद्दाच निकालात काढला होता. नंतरही रस्त्याच्या आजूबाजूला काही प्रेक्षणीय असेल तरच ते स्थळ विचारात घेतले जायचे.
तर मस्तपैकी डोसा आणि कॉफी हाणली. अरे हो, तवांडी घाट संपल्यानंतर मिळालेला चहा हा शेवटचा होता. त्यानंतर पुन्हा पुण्याला परतेपर्यंत आम्ही कॉफीमय होऊन गेलो होतो.
आता उन रणरणायला लागले होते आणि मग सगळ्यांनी आपापली उनप्रतिबंधक आयुधे पाजळली. पण त्यावेळी लक्षात नाही आले की आता व्हिलनची भूमिका सूर्याकडे नसून वाऱ्याकडे आहे. हत्तरगी ते बेळगाव अंतर आहे ३६ किमी. आणि ते ३६० वाटावे इतपत कृपा मरुतगणांनी केली. हेडविंडस अर्थात समोरून वाहणारा वारा इतका जोरात होता की अक्षरश एकेक पॅडलसाठी झगडावे लागत होते. गाडीवर सुसाट जाताना लागणारा सुखावणारा वारा आता आमच्यासाठी प्रमुख अडथळा झाला होता. इतका की सहसा घाटात ज्या गियर कॉम्बिनेशननी जातो तितक्या लो गियरवर आम्ही सरळसोट रस्त्यावर जाताना तडफडत होतो.
आणि त्याहूनही वाईट म्हणजे बसून बसून खालच्या जागचे कातडे सोलवटून निघाले होते. (सॅडल सोअर) आणि त्याने इतके झोंबत होते की नको नको ते सायकल चालवणे असे झाले होते. पण पर्यायच नव्हता त्यामुळे झोंबले की दात ओठांवर रोवून ती वेदना सहन करायची आणि पुढे जात रहायचे.
सुदैवाने आज चक्क बाबुभाई माझ्या बरोबर होता. त्यामुळे तो आणि मी जोडीने वाऱ्याचा सामना करू लागलो.
फोटोतला रस्ता बघा. चढ असला तरी ताशी १५-१६ च्या वेगाने ज्या रस्त्यावर जाऊ शकलो असतो तिथे ताशी ९-१० चा वेगही मिळत नव्हता. शेवटी बाबुभाई पुढे झाला आणि मी त्याच्या ड्राफ्टमध्ये आलो. आणि उपकाराची परतफेड करायची म्हणून मधुन मधुन त्याला बक अप करत होतो. मस्त रे झकास चाललाय, आता थोडेच राहीले, सही स्प़ीड आहे असे बकबक करत. याचा त्याला किती उपयोग झाला ते माहीती नाही पण मला त्याच्या ड्राफ्टमध्ये राहण्याचा फायदा मिळाला.
दरम्यान, सुसाट ग्रुप बेळगाव (नव्हे आता बेळगावी) पोचल्याचे कळले आणि आम्हीही सायकली दामटवत पोहचते झालो. बेळगावला माझा एक आत्तेभाऊ मला भेटायला येणार होता त्यामुळे मी दुपारचे खाणे त्याच्याबरोबरच करणे पसंत केले आणि बाकीच्यांना सांगून त्याच्याकडे गेलो.
आधी कराडला मावशी, मग कोल्हापूरला काका आणि आता बेळगावला भाऊ असे सगळे नातेवाईक मला भेटायला येत असल्याने मामांनी आता पुढच्या गावी कोण येणार असे विचारलेच.
तर ते असो. पण भावाकडे जाण्याच्या गडबडीत माझी आणि सुसाट ग्रुपची चुकामुक झाली. आणि सुहुद, युडी, आणि घाटपांडे काका मागे असल्याचे कळले. त्यांना फोन केला तर ते निघायचेच होते आणि सुहुतच्या फास्ट बोलण्यातून मला असा अर्थबोध झाला की घाटपांडे काकांची सायकल बिघडली आहे आणि ते इति (यांचा परिचय राहीला. यांनीही नर्मदा परिक्रमा केली होती आणि आ्त्ताही आणि तेही आमच्याबरोबर कन्याकुमारीला येणार होते पण काही घरगुती अडचणींमुळे त्यांना यायाला जमले नाही. पण ते आम्हाला भेटायला निप्पाणीला आले आणि दुधाची तहान ताकावर म्हणत निप्पाणी बेळगाव आमच्याबरोबर केला. )
काकांबरोबर ती दुरुस्त करायला जाणार आहेत आणि तो व युडी काका माझ्याबरोबर येणार आहे. मी आपला दोघांची वाट बघत बसलो पण बराच वेळ झाला तरी कुणीच दिसेना. उन्ह पण तापत चालले होते म्हणून मग मी पुढे निघालो. आणि या सगळ्या धांदलीत मी पाणी भरून घ्यायचे विसरलो.
या मूर्खपणाची शिक्षा मला लवकरच मिळाली. दुपारी १२ चा सुमार होता, उन्ह प्रचंड तापले होते आणि कॉँक्रीटचा रस्ता म्हणजे एक भट्टी झाली होती. त्यातून रस्ता सरळ नाही. नुसते डोंगराएवढे चढ, तो उतरला की पुढचा चढ दत्त म्हणून हजर. आधीच हेडविंड्सने सगळी एनर्जी खाऊन टाकलेली आणि आता ताकद, तयारी कमी पडत असल्याचे जाणवत होते. आणि प्यायला जेमतेम घोटभर पाणी.
आणि कहर म्हणजे रस्त्याच्या बाजूला एक झाड नाही, सावली नाही, एक पाण्याचे सोडा कसलेच दुकान नाही. शहाळेवाला नाही, नीरा नाही. नुसता रखरखाट. त्या उन्हाच्या तडाख्याने गर्र व्हायला लागले तेव्हा लान्सला फोन लावला. तेव्हा मी नुकताच या कर्नाटक विधानसभेपाशी पोहचलो होतो.
त्यांना विचारले की बाबरे किती पुढे गेला आहात तर कळले की अर्ध्या तासापूर्वी त्यांनी विधानसभेचा चढ पार केलाय.ठिकाय म्हणलं आपण फार मागे नाही. त्याला कळकळून विनंती केली, म्हणलं माझ्याकडचे पाणी संपलेय आणि इथे पाण्याचा एक थेंबही मिळत नाहीये. तुमच्याकडे असेल तर प्लिज थांब माझ्यासाठी.
ठिकाय ठिकाय म्हणत त्याने थांबतो सांगितले आणि मी पाणी मिळण्याच्या एकमात्र आशेने भराभरा पॅडल मारत सुटलो. चढ जीव काढत होतेच आणि असाच एक अंगावर येणारा चढ चढून आलो तर माझ्याकडे पाण्याची बाटली घेऊन धावत येणारा बाबुभाई दिसला. त्या दृश्याने जे काही समाधान मिळाले त्याला तोड नाही.
त्यावेळी इतका तापून निघालो होतो की आत्ता जर पाणी अंगावर ओतले असते तर तापल्या तव्यावर कसा चर्र आवाज करून वाफ येते तसे होईल असे वाटले. गटागटा पाणी प्यालो. बाजूलाच एक कलिंडगवाला होता. त्याच्या इथल्या सावलीत बसलो आणि मग सगळी उद्वी्ग्नता बाहेर पडली.
"काय आहे काय हे च्यायला. रस्ता आहे का सोंग, कसले चढ, उन्ह नाही सावली नाही..."
या वाक्यावर वेदांग आणि बाबुभाई जे काही हसत सुटले. आजही कुठलाही विषय निघाला की हे वाक्य हटकून म्हणले जातेच. या वाक्यावरून मला इतके चिडवले गेले आहे की बस.
असो, तर मी घाटपांडेंची सायकल पुन्हा एकदा बिघडल्याचा निरोप दिल्यानंतर सगळे चिंताग्रस्त झाले. आणि मामांनी त्यांना फोन लावला. आणि घाटपांडे नक्की त्यांच्याशी काय समजून बोलले ते आजही कळले नाही. आणि काहीतरी तावातावाने सांगितले की सायकल बिघडल्यामुळे त्यांना कोल्हापूर गाठावे लागणार आहे.
आरिच्या, हे काहीतरी वेगळेच होते. त्यात त्यांनी सांगितले की आशिष आणि सुह्द एकत्र आहेत आणि ते पुढे गेलेत. गोंधळ काय आहे म्हणून सुह्दला फोन केला तर त्याने अजून एक वेगळेच व्हर्जन सांगितले, की सायकल घाटपांडेची नाही तर युडींची बिघडलीये. ते आणि इती एकत्र आहेत, मी पुढे आलोय आणि आशिष आणि बाबा (म्हणजे घाटपांडे) मागून येतायत. त्यावर कहर म्हणजे, युडींना फोन केल्यावर ते म्हणले सायकल दुरुस्त व्हायला वेळ लागेल. पण घाटपांडे, सुह्द आणि आशिष एकत्र पुढे निघालेत. ते तुम्हाला गाठतीलच. मामांना काय टो़टलच लागेना. सगळेजण सांगतायत की आशिष त्यांच्याबरोबर आहे आणि मी तर आपला त्यांच्यासमोर बसून पाणी पितोय.
शेवटी जे असेल ते असेल म्हणत मला त्यांनी घाटपांडे व सुहुद साठी थांबायला सांगितले आणि ते सगळे पुढे निघाले. थांबण्याचा निर्णय हा माझा आजच्या दिवसातला दुसरा खूपच चुकीचा निर्णय ठरला कारण मामा आणि बाकीचे निघून गेल्यावर तब्बल पाउण एक तासाने सुहुद आणि त्यांनतर थोड्यावेळाने घाटपांडे काका आले. मग त्यानंतर आम्ही आचरटासारखे एक आख्खे कलिंगड तिघात मिळून संपवले.
टमटमीत पोट भरल्यावर त्या भट्टीतून पुढे निघालो आणि सुहुद नेहमीप्रमाणे सुसाट पुढे निघून गेला आणि घाटपांडे काकाही वेगाने पॅडल मारत पुढे गेले. मी आपला रेटत चाललोय. आणि हे राक्षसी चढउतार काय संपायलाच तयार नव्हते. लांबवर मला काकांची फ्लोरंसंट जर्सी दिसत होती पण ती गाठायला मला शरिर साथ देत नव्हते.
एका लिमिटनंतर मग मी त्यांना गाठायचा प्रयत्न सोडून दिला आणि एका उतार संपल्यावर बाजूला थोडे गवत दिसले तिकडे सायकल सोडून दिली आणि अंग पसरले. आहाहा काय सुख होते ते. शांतपणे पडल्या पडल्याच अजून एक एनर्जी बार संपवला, उरले सुरले पाणी प्यालो आणि पुन्हा ते राक्षस काबीज करायच्या कामावर रुजु झालो. पायांना आता केवळ सवय झालीच होती म्हणून ते आपले यांत्रिकपणे पॅडल मारत होते पण मेंदूचा आणि पायांचा संपर्क तुटल्यासारखाच वाटत होता.
सुदैवाने पुढे काका आणि सुहुद थांबलेले दिसले. आणि मग तिघांनी एकत्रित मार्गक्रमण सुरु केले.
उन्हे कलायला लागली तेव्हा एका हॉटेलात क्षुधाशांती केली आणि पुढे निघालो तेव्हा लक्षात आले की माझ्या मागच्या चाकात हवा कमी आहे. आता ही कधीपासून कमी होती हे लक्षात येईना. मी इतका थकलो होतो की जास्त दमणूक ही चढामुळे होतीये का कमी हवा असल्याने हे ही कळत नव्हते. शेवटी मामगटटीपाशी हवा भरून घेतली आणि तोपर्यंत मोबाईलच्या बॅटरीने जीव टाकला. माझा म्हणजे चडफडाट झाला. आता स्ट्राव्हा वर अपलोड होणार नाही. पण त्यावेळी धारवाड पोचणे हेच मुख्य उद्दीष्ट असल्याने फार त्रागा केला नाही.
हवा भरल्यामुळे श्रम कमी लागत होते पण आता अंधार पडायला लागला होता. तब्बल १२ तास झाले तरी अजून मुक्काम गाठला नव्हता. मी अक्षरश संपलो होतो आणि मानसिकरित्या इतका खच्ची झालो होतो की त्यावेळी घाटपांडे काका बरोबर नसते तर तिथेच मोहीमेला रामराम ठोकला असता. बाकी सगळे व्यवस्थित आहेत आणि मलाच एवढा त्रास होतोय म्हणजे आपण ही मोहीम करायाला लायक नाही असे निराशाजनक विचार मनात डोकावू लागले होते.
आता पुन्हा एकदा सायकलचे लाईट्स लावले आणि कसेबसे धारवाडची हद्द गाठली. पण आजचा हिशेब अजून पुरा झाला नव्हता म्हणून का काय, असे कळले की आमचे मुक्कामाचे हॉटेल गावात आत ६ किमी मध्ये आहे. रात्रीचे साडेसात वाजले होते. धारवाड गावात प्रचंड ट्रॅफिक होतं, ठिकठिकाणी रस्ते खोदलेले, आणि चढ उतारांनी आमचा पिच्छा इथेही सोडला नाही. रस्ता चुकत, विचारत विचारत, ठेचकाळत कसेबसे हॉटेलपर्यंत पोहचलो आणि अजून एक सुवार्ता कळली की त्या हॉटेलमध्ये जेवायची व्यवस्था नाही आणि बाहेर जावे लागणार आहे.
मी आता कशालाही कसलीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हतोच, त्यामुळे फक्त पॅनिअर्स काढून रुममध्ये टाकल्या आणि एकही शब्द न बोलता पाय ओढत गेलो. हॉटेलमधे वेटरने उर्मटपणा करून सहनशक्तीचा अंत पाहिलाच. साऊथ इंडियन थाळी - नही है, नॉर्थ इंडियन - नही है, इडली वडा - ओन्ली मॉर्निंग. म्हणल आता तर आपला ताबा सुटला तर डायरेक्ट मारामारीच. मग अतिशय शांतपणे त्याला जवळ बोलावले, त्याच्या हातात मेनूकार्ड दिले आणि म्हणले, बाबा यातले आता काय आहे ते घेऊन ये आणि त्याने काय आणले ते घशाखाली घालून रुम गाठली आणि अंग पसरून दिले.
आजच्या दिवसातला त्रास हा सर्वात भयानक होता आणि आख्ख्या मोहीमेत त्याईतका वाईट त्रास झाला नाही. दिवसभरात दोन घाट, आणि किमान ८०-९० राक्षसी चढ उतार पार केले होते. त्यातून हेडविंडस आणि उन्हाचा तडाखा. केवळ आणि केवळ मानसिक कसोटीवर टिकून राहील्यामुळे हे करणे शक्य झाले.
पण एक झाले, सगळ्यांनाच थोडा फार त्रास झाल्यामुळे मनातून कमीपणाची भावना थोडी कमी झाली. आपटे काकांना तर फारच विचित्र अनुभव आला. धारवाडच्या अलिकडे शाळेच्या काही टारगट मुलांनी सायकलींना अडवायचा प्रयत्न केला. वेदांग, लान्स आदी झुकांडी देऊन सटकले पण काकांना ते जमले नाही आणि यामुलांनी अंगाशी धक्काबु्क्की करायला सुरुवात केली. एकाने हँडल धरून ओढले. शेवटी जोरात आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोकं आली आणि त्यांची सुटका झाली. पण झाल्याप्रकारचा त्यांना बराच धक्का बसला होता.
माझा मोबाईल बंद पडल्यामुळे लान्सचा स्ट्रव्हा अॅप देत आहे.
खालच्या ग्राफमध्ये लक्षात येईल की हा भाग इतका निराशाजनक सूरात का झालाय ते.
अरे बाप रे! जामच अवघड गेला की
अरे बाप रे! जामच अवघड गेला की रे दिवस. sadal soars हा प्रकार भयानकच.
अरेरे.. खूपच त्रास झालेला
अरेरे.. खूपच त्रास झालेला दिसतोय ह्या टप्प्यावर.
ह्म्म... तुमच्याबरोबर आमचीही
ह्म्म... तुमच्याबरोबर आमचीही खडतर वाटचाल सुरु हाय..
अरे बाप रे. बेळगांव धारवाड
अरे बाप रे. बेळगांव धारवाड इतक्यांदा फिरलोय पण सायकलवरून किती त्रास होत असेल..
आम्ही धारवाड कित्तूर तिथून पुढे एमके हुबळी असं सायकलवरून एकदा गेलो होतो, पण तेव्हा हा एक्स्प्रेस हायवे नव्हता जुना हायवे होता. पण मज्जा आली होती.
खूप छान.
खूप छान.
चालवा. अजून चालवा सायकल..
चालवा. अजून चालवा सायकल..
अकलेपेक्षा जास्त पैसा असलेल्या एसयुव्ही वाल्यांच्या माजावर एक लेख उतरेल.
जबरा प्रवास सुरु आहे. फोटोही सुंदर आलेत.
जबरी लेख. वाचुन असल मस्त
जबरी लेख. वाचुन असल मस्त मोटिव्हेटेड वाटल. एवढे हाल होवून सोडून सुद्धा जिद्द सोडली नाहीत. ग्रेट.
ह्याच रत्यावरुन बाइक वर
ह्याच रत्यावरुन बाइक वर जाताना अथवा कार ने जाताना अहाहा फिलिन्ग येतं.
तोच रस्ता इतका चढ उतार वाला आहे हे लक्षात पण नाही आलं कधी.
त्रासाची कल्पना करु शकतो फक्त.
पण गिव्ह अप नाही केलं ह्यासाठी अभिनंदन
धारवाड ~ एक दु:स्वप्न....ह्या
धारवाड ~ एक दु:स्वप्न....ह्या शीर्षकाने उलगडत गेलेला तुमचा त्रासपट वाचत असताना प्रत्येक वळणावर तुम्ही दिसत होता असेच वाटत राहिले. कोल्हापूर ते कागल हा रस्ता जितका चांगला तितकाच तो सरळही असल्याने चढउताराचा तसा त्रास जाणवत नाही. मात्र निपाणीपासून संकेश्वरपर्यंत सायकलवाल्यांचा घामटा निघतो हे मी स्वत: अनुभवले आहे....त्यातही माझी जुन्या धाटणीची हर्क्युलस सायकल. सोबतीला हवा भरण्यासाठी पंपही नसायचा. सबब काळजीपोटी स्तवनिधी घाट ते शिप्पूर तिठ्ठा हा चढ सायकल घेऊन पायीच आम्ही पूर्ण करत असू. सोबतीला गप्पा असल्या म्हणजे दम लागत नाही हाही शोध त्या काळी लागला होता.
तुम्ही "तवांडी घाट" असा लिखाणात उल्लेख केला आहे....ते त्या भागातील ग्राम्यउच्चाराने पडलेले नाव आहे. सरकार दरबारी त्या घाटाचे नाव "स्तवनिधी" अशा उल्लेखाने येते. तिथे जैनधर्मीयांचे मोठे मंदिर लागते...चढ संपतेसमयी...त्याच नावाने घाट ओळखला जातो.
बाकी धारवाडसारख्या एरव्ही शांत समजल्या जाणा-या गावातील शाळकरी मुलांनी तुमच्या गटातील सायकलस्वारांना अकारण त्रास दिल्याचे वाचून फ़ार वाईट वाटले.
आणि तोपर्यंत मोबाईलच्या
आणि तोपर्यंत मोबाईलच्या बॅटरीने जीव टाकला. माझा म्हणजे चडफडाट झाला. आता स्ट्राव्हा वर अपलोड होणार नाही >>.
हा हा हा. प्रॉब्लेम ऑफ मॉडर्न सायकलिस्ट !
माझंही बरेचदा झालं आहे असं. स्पेशली मी जेंव्हा संध्याकाळी सायकल चालवायचो तेंव्हा आयफोन मधील बॅटरी संपायची. आता त्याचेही काही वाटत नाही. काल देखील गार्मिन मध्येच झोपले आणि २३० ऐवजी १८५ कॅप्चर झाले. डिडन्ट गिव्ह अ थॉट टू दॅट.
इती - डिसऑर्डर ऑफ ऑब्सेसिव्ह सायकलिंग - केदार
अरेरे.. प्ण पुढे जात राहिलात
अरेरे.. प्ण पुढे जात राहिलात हे महत्वाचं
"तवांडी घाट" >> 'तवंदी घाट' ..
जामच हालत झाली रे तुझी पण
जामच हालत झाली रे तुझी
पण तुझ्या मानसिक शक्तीला सलाम, एवढे होऊन पण हार मानली नाहीस,
मजा येतेय वाचायला हा वृतांत
अरे बापरे... येवढ्या
अरे बापरे... येवढ्या त्रासातही तू टीकून राहिलास हेच विशेष... ग्रेट !
ती देखिल रात्रीची व पावसाळी थंड हवेत - माझ्या मूर्खपणाचा अन चूकांचा वृत्तांत देतो नंतर सवडीने )
(मी परवा पहिल्या सव्वातासातच डीहायड्रेशनने मान टाकली
कष्ट्मय झाला की हा प्रवास.
कष्ट्मय झाला की हा प्रवास. हार मानली नाही हे विशेष.. लेखमालिका अतिशय वाचनीय होत आहे.::)
आशु तुझ्या हिमतीला
आशु तुझ्या हिमतीला सलाम.....
ग्रेट आहेस बाबा...
कष्ट्मय झाला की हा प्रवास.
कष्ट्मय झाला की हा प्रवास. हार मानली नाही हे विशेष.. लेखमालिका अतिशय वाचनीय होत आहे.: >>>> +१००
मस्त रे... वाचतोय. सॅडल सोअर
मस्त रे... वाचतोय.
सॅडल सोअर चे दु:ख माहिती असल्याने प्रवासवर्णन जास्ती भिडले.
मस्त वर्णन... लिहित रहा
मस्त वर्णन... लिहित रहा
जिद्द आणि
जिद्द आणि चिकाटी".................!
छान.
खडतर.. या रस्त्याने एस्टीने
खडतर..
या रस्त्याने एस्टीने अनेकवेळा गेलोय, त्यावेळी काही जाणवत नाही चढ वगैरे..
न्यू झीलंडमधे सायकलस्वारापासून किमान दिड मीटर अंतरावरून वहाने न्यावीत असा नियम आहे.
आम्ही धारवाड कित्तूर तिथून
आम्ही धारवाड कित्तूर तिथून पुढे एमके हुबळी असं सायकलवरून एकदा गेलो होतो, पण तेव्हा हा एक्स्प्रेस हायवे नव्हता जुना हायवे होता. पण मज्जा आली होती.
जुन्या हायवेला मज्जा येते. रस्ता एक्सप्रेस करायच्या नादात आजूबाजूच्या सगळ्या झाडांची कत्तल होते आणि नंतर गाड्या सुसा़ट जातात ते खरे पण रस्त्याचे वाळवंट होते.
अकलेपेक्षा जास्त पैसा असलेल्या एसयुव्ही वाल्यांच्या माजावर एक लेख उतरेल. + १००
अगदी अगदी
त्यातही माझी जुन्या धाटणीची हर्क्युलस सायकल. सोबतीला हवा भरण्यासाठी पंपही नसायचा. सबब काळजीपोटी स्तवनिधी घाट ते शिप्पूर तिठ्ठा हा चढ सायकल घेऊन पायीच आम्ही पूर्ण करत असू. सोबतीला गप्पा असल्या म्हणजे दम लागत नाही हाही शोध त्या काळी लागला होता.
वाह मामा...सॉलिड मानलं पाहिजे तुम्हाला...
तुम्ही "तवांडी घाट" असा लिखाणात उल्लेख केला आहे....ते त्या भागातील ग्राम्यउच्चाराने पडलेले नाव आहे. सरकार दरबारी त्या घाटाचे नाव "स्तवनिधी" अशा उल्लेखाने येते. तिथे जैनधर्मीयांचे मोठे मंदिर लागते...चढ संपतेसमयी...त्याच नावाने घाट ओळखला जातो.
अच्छा, हे माहिती नव्हतं मला...धन्यवाद...
प्रॉब्लेम ऑफ मॉडर्न सायकलिस्ट
प्रॉब्लेम ऑफ मॉडर्न सायकलिस्ट !
हाहाहा हो ना. एवढे कष़्ट करून जायचे आणि त्याचे डॉक्युमेंटेशन नाही म्हणजे काय अर्थ आहे. पण मी ज्यावेळी रुमवर जाऊन चार्ज केला त्यावेळी त्याने १३३किमी अंतरापर्यंत पॉज करून ठेवलेला अपलोड केला. सुदैवाने तेवढे तरी मिळाले.
(मी परवा पहिल्या सव्वातासातच डीहायड्रेशनने मान टाकली अरेरे ती देखिल रात्रीची व पावसाळी थंड हवेत - माझ्या मूर्खपणाचा अन चूकांचा वृत्तांत देतो नंतर सवडीने )
हो तुमचा वृत्तांत येण्याची वाट बघतोय. सगळ्यांसाठी बरीच रोमांचक झाली ही बीआरएम असे कळले.
न्यू झीलंडमधे सायकलस्वारापासून किमान दिड मीटर अंतरावरून वहाने न्यावीत असा नियम आहे.
दिड मीटर????
अरे कुणीतरी अापल्याकडे हा नियम सक्तीचा करा रे. च्यायला
मला वाचतानाच दमायला झालं. कसं
मला वाचतानाच दमायला झालं.
कसं पार पाडलंत हे दिव्य कोण जाणे!
आशु, दिलाय बघ वृत्तांत माझ्या
आशु, दिलाय बघ वृत्तांत माझ्या फजितवड्याचा.....
हार मानली नाही हे
हार
मानली नाही हे विशेष.....
Mast..... unable to type in marathi
सुंदर वर्णन! आणि तोपर्यंत
सुंदर वर्णन!
आणि तोपर्यंत मोबाईलच्या बॅटरीने जीव टाकला. माझा म्हणजे चडफडाट झाला. आता स्ट्राव्हा वर अपलोड होणार नाही >> फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम सुरू झाले
तो वारा आणि सरळ चढ यांचा प्रॉब्लेम पळणार्यांना पण खुप येतो. गावातच जे रस्ते गाडीत सरळ वाटतात ते खरे तर भरपूर मोठाचढ आहेत हे पळताना लक्षात येते.
सही रे तुम्हा सगळ्यांच्या
सही रे तुम्हा सगळ्यांच्या चिकाटीला मानलं .
सगळेच भाग छान! सही रे तुम्हा
सगळेच भाग छान!
सही रे तुम्हा सगळ्यांच्या चिकाटीला मानलं >> +१
सहीये!
सहीये!
सही रे तुम्हा सगळ्यांच्या
सही रे तुम्हा सगळ्यांच्या चिकाटीला मानलं . >> +१ वाचतोय.
Pages