घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2015 - 15:21

..

या शनिवारची ऑफिसमधील चर्चा!

मद्यप्राशनाचा विषय निघाला, कोण किती पिते आणि घरी आपल्या बायकांच्या आपल्या या व्यसनाबद्दल काय रिअ‍ॅक्शन असते वगैरे..

एक विवाहीत महिला सहकर्मचारी, जी माझी एक चांगली मैत्रीण देखील आहे, जिला दोन लहान मुले आहेत, ती मोठ्या कौतुकाने सांगू लागली,
"आमच्या यांना मी घरातच पिण्याची परवानगी देते. सोबत चकणा म्हणून मस्तपैकी त्यांच्या आवडीची कांदाभजी करून देते. जवळच्या मित्रांची मैफिल जमवायची परवानगीही दिली आहे. त्यामुळे बाहेरून पिऊन येत नाहीत. उगाच आपण बंधने टाकली तर पिणे वाढतेच.. वगैरे वगैरे .. वगैरे वगैरे.."

आणखी एकदोघांनी या पद्धतीला संमती दिली आणि पहिलाच विचार माझ्या मनात आला तो असा,. मुलांसमोर पिणे कसे चालते?? त्यांच्यावर चुकीचा परीणाम नाही का होणार, त्यांना चुकीचा संदेश नाही का जाणार??

आणि मी तसे तिला सर्वांसमक्ष बोलूनही दाखवले..
तसेच माझ्यासाठी हा धक्काच असल्याने आणि मला हे व्यक्तीश: जराही न पटल्याने माझ्या बोलण्याचा टोनही किंचित निषेध व्यक्त केल्यासारखा वा जाब विचारल्यासारखा जरा कडकच होता.

त्यामुळे ती बावरली, समर्थन देणारेही पटकन काही बोलले नाहीत, पण मग तिने सारवासारव सुरू केली,...

१) मुलांना काही समजत नाही !

माझे उत्तर - कमाल आहे, इतरवेळी तुम्हा सर्वांची मोठ्या कौतुकाने चर्चा चालू असते की आमच्या मुलांना लहान वयातच हे समजते आणि ते समजते, नव्हे आजची पुर्ण जनरेशनच स्मार्ट आहे, वगैरे वगैरे गप्पा असतात. तर मग नेमके हेच का समजत नाही? ते तसे तुमच्या सोयीचे आहे म्हणून? थोडक्यात तुम्ही स्वताला डिफेंन्ड करत आहात.

२) तसेही हि आताची पिढी मॉडर्न आहे. पुढे जाऊन आणखी काय कशी होणार, हे आपण काय सांगणार !

माझे उत्तर - दारू पिणे आणि आधुनिकता यांचा काहीही संबंध नाही, मद्यप्राशन पुरातन काळापासून चालत आले आहे आणि ते वाईटच समजले गेले आहे. तुझ्या नवर्‍यालाही कबूल असणार की दारू हि वाईटच आहे, त्यामुळे पित असला तरी त्याचा अतिरेक तरी तो टाळतच असणार. पण लहान वयातच मुलाच्या मनावर बिंबले की दारू म्हणजे काही वाईट वगैरे नसते, बरेच जण पितात, आपले बाबाही पितात, बस्स काही जणांना तिची चव वगैरे आवडत नसल्याने पित नाही इतकेच. तर मग ते सहजपणे वाहावत नाही का जाणार? पण याउलट मन संस्कारक्षम असेल तर त्याला मर्यादा तरी राहतील.

३) जे पित नाहीत त्यांना (म्हणजे इथे मला) दारू म्हणजे खूप वाईट वगैरे आहे असे वाटते. त्यामुळे असे विचार आहेत तुझे. तसेही रोज रोज नाही पित, दर आठवड्यालाही नाही पित, ओकेजनली ड्रिंक घेतो.

माझे उत्तर - तो काय किती पितो ते तुलाच ठाऊक, आणि किती वेळा हे घडल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होणार हे देखील तूच ठरव. पण आम्ही रोज रोज नाही पित, ओकेजनली घेतो, वा आम्ही बेवडे नसून लिमिटमध्येच पिणारे आहोत हा सर्रास सर्वच मद्यपींचा युक्तीवाद असतो. पण तो आपल्या नवर्‍याला डिफेंड करायला तू करत आहेस हे मात्र खूप चूकीचे आहे.

४) निदान बाहेरून ढोसून घरी येण्यापेक्षा घरीच पिणे चांगले नाही का?

माझे उत्तर - अच्छा, मग त्याने बाहेर ऑफिस आणि मित्रांच्या पार्ट्या मध्ये पिणे सोडले आहे का? अर्थात नाहीच! म्हणजे ते देखील ओकेजनली चालूच आहे, तर ज्या कारणासाठी तू घरी पिण्याची परवानगी दिली आहेस असे तू सांगत होतीस ते कारणही तसेच आहे.

५) पण तुला काय त्रास होत आहे? आमचे आम्ही बघून घेऊ ..
(माझ्या वरच्या एकाही उत्तराला प्रत्युत्तर करता न आल्याने मला थेट चर्चेतूनच तोडून टाकायचा प्रयत्न झाला, पण मी एकदा सुरू झालो की माझे मला स्वत:लाही थांबवता येत नाही)

मी म्हणालो - प्रश्न तुझ्याच मुलांचा नाही. तू जसे हे कौतुकाने सांगत आहेस ते ऐकून इथले इतरही पालक प्रभावित होतील. प्रश्न समाजाचाही आहे. त्यात कुठलीही चुकीची विचारसरणी रुजली नाही पाहिजे. उद्या माझी मुलेही याच समाजात वाढणार आहेत, त्यामुळे मला बोलायचा हक्क आहेच..

या शेवटच्या काही वाक्यांना माझा आवाज नकळत उपदेश करत असल्यासारखा गंभीर होत त्याला एक धार आली... आणि... तिचा बांध फुटला!
तिला डोळे टिपताना पाहून मलाही माझी चूक माझ्या ध्यानात आली. जोशमध्ये जरा जास्तच बोलून गेलो होतो. नेहमी तिची मस्करी मस्करीत थट्टा करायचो पण यावेळी अचानक सिरीअसच झालो, वा तसा आव तरी आणला. सर्वांसमोर तिच्या खाजगी बाबींवर उगीच वाद घातला.

असो,
ते प्रकरण तात्काळ माफी मागत मिटवून टाकले. दुपारी आम्ही जेवायलाही बाहेर जाऊन आलो. भांडणे आणि पुन्हा एक होणे माझ्या नजीकच्या लोकांसाठी नवीन नाही. तर ते सोडा..

पण यावरूनच हा प्रश्न इथे घेऊन आणायचे सुचले ! इथे मात्र आधीच माफी मागत सांगतो, जे असे करतात त्यांना धारेवर धरायचा हेतू नाही. बस यावर आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. काही वेगळे द्रुष्टीकोनही समजतील, पटले तर स्विकारले जातील.

तर शिर्षक हाच एक प्रश्न - पुन्हा एकदा लिहितो - घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक

चूक

>>मुलांसमोर पिणे कसे चालते?? त्यांच्यावर चुकीचा परीणाम नाही का होणार, त्यांना चुकीचा संदेश नाही का जाणार??>> मुलांसमोर न पिता बाहेरून पिऊन आल्यावर 'घरी प्यायला अलाऊड नाही, पण बाहेरून/लपून्/चोरून पिऊन घरी यावं ' हा संदेश चांगलाच. नाही का?

>>पण मी एकदा सुरू झालो की माझे मला स्वत:लाही थांबवता येत नाही)>> हे मात्र एकदम पटलं. ऑफिसमध्येही चालूच आहे असं दिसतंय.

फसवा प्रश्नं आहे.
यात मूळात 'दारू प्यायली तरी चालेल' हे गृहित धरलेले आहे.
मग कधी/कुठे /मुलांसमोर्/घराबाहेर असे प्रश्नं आहेत.

'दारू कधीच अजिबातच पिऊ नये' अश्या विचारांच्या लोकांना या पोलमध्ये काहिच से नाहीये.
(चल, यावर एक नविन पोल काढ आधी!)

यातला प्रसंग आणि संवाद इंटरेस्टींग आहेत.
महीला कर्मचारी, ती चांगली मैत्रीण असणे, रुसवे फुगवे काढणे एकत्र जेवायला जाणे आणि तिच्या नव-याचे दारू पिणे यांचा परस्परसंबंध तर नाही ना ? आणि गर्लफ्रेण्डचे काय झाले ? तिला चालले का हे ? आणि बायकोला ही ? Wink

चूक

आमच्या यांना मी घरातच पिण्याची परवानगी देते.>>>>>>>>> ही मनाची काढलेली समजूत आहे किंवा घातलेली मुरड आहे.

Trass

अल्कोहोल हे पूर्वीच्या तुलनेत आता, म्हणजे गेल्या दहा वीस वर्षांत, भारतीय संस्कृतीत अधिक रुजलेले आहे. 'घेणे' ही तिरस्करणीय बाब किंवा प्रतिष्ठेची बाब राहिलेली नसून एक आम गोष्ट बनलेली आहे. निर्व्यसनी पालकांची मुले व्यसनी झाल्याची उदाहरणे आहेत व व्यसनी पालकांची मुले निर्व्यसनीच राहिल्याचीही उदाहरणे आहेत. असे असल्यामुळे ह्या प्रकारच्या पोलवर एखादे मत सर्वानुमते स्वीकारार्ह बनणे अवघड आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असेच शेवटी म्हणावे लागेल. व्यक्तिशः मला वाटते की ज्या गोष्टी मुले मोठी झाल्याशिवाय करणार नसतात त्या गोष्टी त्यांच्यासमोर त्यांच्या लहान वयात करू नयेत. Happy

मला तरी असे वाटते की दारु पिणे मग ते घरात बसुन मुलाच्या समोर, मोठ्यान्च्या समोर, बाहेर लपुन छपुन कुठेही पिणे हे वाईटच आहे. मुळात दारु पिणे हेच वाईट आहे. High status आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली आज दारु पिणारे हे लोक उद्या काहिही करु शकतील.. शेवटी स्टेटस कि बात है, ते टिकवण किती गरजेच आहे नाही का ??

दारु पिणार्या लोकाना जर विचारले तर ते स्वतः सुद्धा दारू पिणे हे वाईटच असे म्हणतील. त्याना जर विचारले की तुमची मुलगी वा आई जर ओकेशनली / रोज दारु पिऊ लागली तर तुम्हाला कसे वाटेल तर त्याना नाहि आवडणार.

मुलांसमोर न पिता बाहेरून पिऊन आल्यावर 'घरी प्यायला अलाऊड नाही, पण बाहेरून/लपून्/चोरून पिऊन घरी यावं ' हा संदेश चांगलाच.
>>>>>>>
सायो, नाही.
संदेश द्यायचाच म्हटले तर मी पिऊच नका बोलेन. पण प्राप्त परिस्थितीत जे आहे त्यात काय योग्य हे विचारलेय.

..

फसवा प्रश्नं आहे.
यात मूळात 'दारू प्यायली तरी चालेल' हे गृहित धरलेले आहे.
>>>
साती नाही,
पुन्हा वरचेच उत्तर, चालेल हे गृहीत न धरता आता पितच आहेत तर मग वरील दोघांपैकी काय पर्याय योग्य हे विचारले आहे.

..

ही मनाची काढलेली समजूत आहे किंवा घातलेली मुरड आहे.
>>>>
देवकी,
खरे तर हे विषयबाह्य आहे, पण हा आपला अंदाजच आहे, प्रत्येक घरात पुरुषाचीच चालते हे गृहीत धरून. आणि माझ्यामते हे येथील बहुतांश महिलांना पटणार नाही. Happy

व्यसन याचा नक्की अर्थ काय?
कुठल्याही गोष्टीचा हानीकारक अतिरेक अशी व्यसनाची व्याख्या असते. ते दारू, सिगारेट, जुगार, वर्क, देवधर्म वगैरे कशाचेही असू शकते.
महिनापंधरादिवसातून एखादेदुसरे ड्रिंक हे व्यसन होत नाही.
हे फॅक्ट म्हणून सांगतेय मत म्हणून नाही.

अट्टल बेवडे, रेग्युलरली पिणारे, ऑकेजनली पिणारे, कधीही न पिणारे, पिण्याला पाप मानणारे अश्या सर्व कॅटेगरीतले लोक माहितीयेत. त्यांचे आईवडिल हे त्यांच्याच कॅटेगरीतले होते असे म्हणता येणार नाही आणि त्यांची मुलेही त्यांच्याच कॅटेगरीतली आहेत हे म्हणता येणार नाही. त्यामुळे आईबापांनी दारू या विषयासंदर्भात अमुक वागणे ठेवले तर मुले दारूव्यसनाधीन होणार नाहीत असे समीकरण मांडता येणे अशक्य आहे.

दारू या विषयावर टोकाला न जाता मध्यम मार्ग आणि मोकळा संवाद असेल तर मुले पिणे-न पिणे - किती पिणे याबद्दल जे काय ठरवतील ते जबाबदारीने (रिस्पॊन्सिबली चे हे भाषांतर बरोबर वाटत नाहीये पण बरा शब्द न सुचल्याने सध्या हेच!) ठरवतील असे मला वाटते.

मुलांसमोर पिणे कसे चालते?? त्यांच्यावर चुकीचा परीणाम नाही का होणार, त्यांना चुकीचा संदेश नाही का जाणार??
----- पिणे वाईट का चान्गले... ?

एखादी गोष्ट/ कृती केल्यावर आनन्द मिळत असेल तर जरुर करावी, पण ते करताना तुमचे परिस्थितीवर (जिभेवर) नियन्त्रण असायला हवे... गरमा गरम कान्दा भजे खायला मला आवडतात पण किती खावे यावर नियन्त्रण नसेल तर?

दारु पिणे वाईट/ चान्गले असे काही नाही, पण पिण्याच्या प्रमाणावर तुमचे नियन्त्रण नसेल तर नक्कीच वाईट... एखादे दिवशी (दोन ऑक्टोबर) प्यायला नाही मिळाले तर खुप त्रास होत असेल तर व्यक्ती व्यसनाच्या आधिन झाली आहे असे समजावे. पुर्णपणे व्यसनाधिन झालेली व्यक्ती (दारु मुलान्समोर पिणे) चुक अथवा बरोबर याचा सारासार विचार करण्याच्या मनस्थितीत नसेलही. असो. चुक आहे असे समजत असेल तरी त्यान्चे त्यान्च्या मनावर नियन्त्रण नसते. जोडीला बाहेर पिणे परवडणारे असेलच असे नाही.

पालक पित आहेत म्हणुन त्या पिण्याचा मुलान्वर सहसा वाईट परिणाम होत नसावा. बहुतेक पिणार्‍यान्ना माहित असते आपण करत आहोत ते चुकीचे आहे, मुलान्समोरे घेत आहोत हे तर अजुनही चुक आहे पण ते परिस्थितीचे गुलाम आहेत.... त्यान्चे परिस्थितीवर नियन्त्रण नाही... नव्हे ते वयाने मोठे असले, पाल्क असले तरी त्यान्नाच मदतीची तिव्र अवशक्ता आहे.

`आम्ही करतो आहे ते वाईट आहे, तु असे करु नकोस बाळा` असे मोठे लोक लहान्यान्ना नेहेमी कळकळीने सान्गतात. पिणारे लोक पितानाही असे सल्ले देतात तेव्हा लाहान मुलामधे कुतुहल (क्वचित द्विधा) निर्माण होणे स्वाभाविक आहे... पण निसर्ग काळजी घेतो.

'तुम्ही घेत आहात तेव्हा वाईट नाही... मग आम्हाला का नाही देत ?' असे स्वाभाविक पण चिकित्सक प्रश्न लहानग्याना पडतात... त्याचे शन्का निरसन वडिलधारे मन्डळी त्यान्च्या परिने (दारु रिचवत) करतात. यश येतेच असे नाही पण द्विधा मनस्थितीत मुलगा पाणी आणायला धावतो.

पुढील सर्व प्रकार मी जवळुन पाहिले आहे.
(अ) व्यसनी व्यक्तीन्चे लहान मुले पुढे मोठे झाल्यावर व्यसनी झालेले... बापसे बेटा सवाई.
(ब) व्यसनी व्यक्तीन्चे मुले पुर्णपणे निर्व्यसनी निघालेले.
(क) सम्पुर्ण निर्व्यसनी असलेल्या व्यक्तीन्ची मुले निर्व्यसनी निघालेले.
(ड) सम्पुर्णपणे निर्व्यसनी (सुपारी पण न खाणारे) असलेल्या व्यक्तीन्ची मुले व्यसनी निघालेले.

कशाचा कशाशी दाट सम्बध आहे असे मला म्हणता येणार नाही... (वयाच्या समजेल अशा योग्य वेळी) पिणार्‍या पालकान्नी मुलान्ना त्यान्च्या व्यसना बद्दल प्रामाणिक पणे विश्वासात घेऊन सान्गावे. त्यान्चे पिणे हा त्यान्चा `कमजोर` पणा आहे असे प्रामाणिक पणे मान्य करावे. आम्ही कमजोर (परिस्थितीचे गुलाम) आहोत, पण तुम्ही कुठल्याही प्रकारे कमजोर नका राहू... तुमचे आयुष्य जगा...

माझे वडील, सासरे दोघही नेवी मध्ये होते त्यामुळे घरी दारू यायचीच. घरी सुद्धा दारू पिणे व्हायचेच. पैकी कसा कोण जाणे माझा सख्खा भाऊ निर्व्यसनी राहिला. Happy पण नवरा,दीर सगळेच घरी दारू पितात. ( मला व्यक्तिश: हे अजिबात आवडत नाही). पण एक मात्र नक्की सांगेन कि जरी सासरे घरी दारू पीत नसते तरी नवऱ्याने / दिरांनी दारू प्यायलीच असती.
कदाचित घरापेक्षा जास्त मित्रांचा जास्त प्रभाव पडत असेल या बाबतीत. आणि घरी वडील घेत असतील तर मुले बिनधास्त कबुल करतात पण घरी परवानगी नसेल तर चोरून चोरून घेतात.
एक नक्की कि आपल्या मुलांनी जी गोष्ट करू नये असं आपल्याला वाटत असेल ती गोष्ट आपण स्वतः कधीच करू नये. कारण संस्कार नकळत पणे घडत असतात.

व्यसन दारूचेच काय कुठल्याही गोष्टीचे होऊ शकते हि एक पळवाट झाली. एखादा आवडीचा खाद्यपदार्थ कितीही आवडीचा असला तरी आपण रोज खात नाही, किंवा अतिरेक होऊन त्याचे दुष्परीणाम झाले तरी तो सहज सोडता येतो. जसे मधुमेहवाले गोड खाणेही सहज सोडतात, पण हे दारूच्या व्यसनात लागू होत नाही.

..

तसेच बेफिकीर यांचा हा प्रतिसाद,
<< अल्कोहोल हे पूर्वीच्या तुलनेत आता, म्हणजे गेल्या दहा वीस वर्षांत, भारतीय संस्कृतीत अधिक रुजलेले आहे. 'घेणे' ही तिरस्करणीय बाब किंवा प्रतिष्ठेची बाब राहिलेली नसून एक आम गोष्ट बनलेली आहे. >>

याच्याशीही असहमत,
कारण आमच्याइथे अजूनतरी पानाच्या टपरीवर एखादा बिनधास्त सिगारेट फुंकत असेल तर फारसे काही वाटत नाही, पण तिथेच नाक्यावर कोणी खुलेआम हातात दारूचा ग्लास घेऊन उभा असेल तर ते पचनी नाही पडत.

>>>पण तिथेच नाक्यावर कोणी खुलेआम हातात दारूचा ग्लास घेऊन उभा असेल तर ते पचनी नाही पडत.<<<

विषयाच्या अनुषंगाने प्रतिसाद घेतला जाईल अशी आशा होती. अल्कोहोल आम बाब झाली आहे ह्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ असा नव्हता की कुठेही रस्त्यात, चौकात आता लोक दारू पितात. मला असे म्हणायचे होते की पूर्वीच्या काळी जसे 'अरे? तो घेतो म्हणे' अशी भावना असायची तशी आता उरलेली नाही आहे.

घेणार्‍याबद्दल 'तो घेतो?' असे नवल न वाटणे ह्या माझ्या मताची तुलना 'कोठेही दारू पिण्याच्या काल्पनिक शक्यतेशी' कृपया केली जाऊ नये. Happy

व्यसन दारूचेच काय कुठल्याही गोष्टीचे होऊ शकते हि एक पळवाट झाली. <<
अहो ती पळवाट नाहीये. व्यसन या शब्दाचा अर्थ सांगितलाय.

मधुमेहवाले गोड खाणेही सहज सोडतात <<
आपल्याकडे एक डायबेटिस स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. या विधानाची सत्यासत्यता त्या जास्त सांगू शकतील. मात्र माझ्या माहितीतले जे मधुमेही आहेत त्यातले तुरळक अपवाद वगळता गोड खाणे सोडणे सहजपणे जमलेले कोणी नाही.

महिनापंधरादिवसातून एखादेदुसरे ड्रिंक हे व्यसन होत नाही.
हे फॅक्ट म्हणून सांगतेय मत म्हणून नाही.
>>>>>

नक्कीच. पण हे मद्यप्राशन करतानाच्या तुमच्या हेतू अन मानसिकतेवरही अवलंबून आहे की तुम्ही किती आहारी जातात.

मी स्वतः पित नाही, पण मागे उत्तरेकडे गेलेलो, सिमला-मनाली वगैरे, कडाक्याची थंडी, त्यावर उपाय म्हणून थोडीशी घेतली. त्यावेळी मस्तही वाटले. पण त्यानंतर पुन्हा मुंबईत आल्यावर लगेच पुढच्या मित्रांबरोबरच्या पार्टीला मस्त असते रे म्हणत मी सुद्धा एक ग्लास उचलला नाही.

बेफिकीर,
तसे तर विषय आहे मुलांसमोर घ्यायची की नाही. दारू पिणे समाजात कसे समजले जाते हे नाही. जर बाहेर नाक्यावर खुलेआम पिणे गैर वाटते कोणा बघणार्‍याला तर ते मुलांसमोर पिणे का वाटू नये?

गंमत बघा, शेजारी जर दरवाजा उघडा ठेवून पित असेल आणि आपल्या मुलांच्या ते नजरेस पडत असेल तर आपण नक्कीच ओरडा करू की अरे आमच्या मुलांवर वाईट परीणाम होतील म्हणून..

पण हे मद्यप्राशन करतानाच्या तुमच्या हेतू अन मानसिकतेवरही अवलंबून आहे की तुम्ही किती आहारी जातात. <<
किती जज कराल लोकांना?

जोवर आहारी जात नाही तोवर व्यसन नाही.
कशाच्याही आहारी जाता येते. त्यालाही व्यसन म्हणतात.

पिण्यामागचे नक्की कुठले हेतू आणि कुठली मानसिकता योग्य आणि कुठली अयोग्य?

शेजारी जर दरवाजा उघडा ठेवून पित असेल आणि आपल्या मुलांच्या ते नजरेस पडत असेल तर आपण नक्कीच ओरडा करू की अरे आमच्या मुलांवर वाईट परीणाम होतील म्हणून.. <<<
ऑ?

मुलं आहेत की कोण? यांच्या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून जगाने कसे वागायचे हे पण हेच ठरवणार...

एकदा विद्यापिठात ओपन कॅन्टिनला बसले असताना बाजूला अचानक काहीतरी वादावादी चाललेली लक्षात आली. बसण्याच्या जागेवरून काहीतरी कुरबुर झाली होती. आणि कुणीतरी समोरच्या पार्टीच्या विधानावर 'ब्लडी, हेल!' असा उदगार काढला होता. समोरची पार्टी लेकुरवाळी होती त्यातली माता त्या कुणीतरीला शिकवू लागली आमच्या लहान मुलांसमोर ब्लडी, हेल वगैरे म्हणू नका. कुणीतरी त्या मातेला म्हणाला त्यापेक्षा तुम्ही जरा नीट वागायचं बघा तुमच्याकडून जास्त शिकणार तुमचं पोरगं.

ऋन्मेऽऽष - तुमची गर्लफ्रेंड गायब आहे ह्या लेखातुन. तिचे काय मत आहे ह्या बद्दल? तिचे एकुणच दारु पिण्याबद्दल काय मत आहे?

ते प्रकरण तात्काळ माफी मागत मिटवून टाकले. दुपारी आम्ही जेवायलाही बाहेर जाऊन आलो. भांडणे आणि पुन्हा एक होणे माझ्या नजीकच्या लोकांसाठी नवीन नाही. तर ते सोडा..>>>>
तुमच्या इतक्या नजिक ची मैत्रिण असुन सुद्धा तिच्या नवर्‍याच्या घरी पिण्या बद्दल तुमच्यात आधी कधीच काही बोलणे का झाले नव्हते.
तुम्ही दरवेळेला नजिक च्या लोकांना उपदेशाचे ढोस पाजता का?

तुमची मैत्रिणी बरोबरची नजिकता तिच्या नवर्‍याचे दारु पिण्याचे कारण आहे का?

पुढचा लेख तुम्ही स्त्री आणि पुरुष कलिग मधे कीती नजिकता असावी असा काढणार आहात का? आणी असाल तर पोल कसा असेल?

मुळात दारु पिणे (चूक किंवा बरोबर पेक्षाही) आरोग्यास हानिकारक आहे!! जरी व्यसन नसले, अगदी महिन्यातून एकदाच घेत असाल तरीही. दारु पिउच नये हे माझे मत आहे. त्यामुळे मुलांसमोर घ्यावी किंवा नाही हा प्रश्नच येत नाही!!

सुमुक्ता आणि डॉ. साती यांच्याशी पूर्णतः सहमत. डॉ. साती यांना मिळालेले + पाहावे. त्यांचा प्रतिसाद ५ व्या स्थानावर आहे. तो २ र्‍या अथवा ३ र्‍या स्थानावर असता तर निश्चितच अजुन जास्त + मिळाले असते. मला वाटते. त्यांचा प्रतिसाद हाच या पोलचा निकाल ठरावा.

दारु पिण्याचे समर्थन करणारे तब्येतीकरिता व थंड प्रदेशात गरजेची ह्या कारणांनी दारुची तरफदारी करीत असतात. या पार्श्वभूमीवर साती या डॉक्टर असल्याने आणि सुमुक्ता या स्कॉटलंडनिवासी असल्याने त्यांच्या मताला विशेष महत्त्व प्राप्त होते.

बाकी धागालेखक स्वतः पूर्णतः निर्व्यसनी असताना त्यांनी असा धागा काढल्याने सखेद आश्चर्य वाटले.

व्यसनाच्या व्याख्येबद्दल ...

आचार्य रजनीशांनी व्यसनाची व्याख्या केली आहे.

' ज्याच्यावाचून माणसाचे चालू शकते पण चालत नाही '

(बाकी चालू द्या )

चेतन,
काय आहे की 'दारू पिणं वाईट' असं म्हटलं की लोक 'कार्डिओप्रोटेक्टिव अ‍ॅक्शन ऑफ अल्कोहोलच्या' लिंक्स आणून चिकटवतील.
पण आपल्याला माहित्येय लोक काय दारू कार्डिओप्रोटेक्टिव म्हणून पित नाहीत.
उलट थोडी थोडी करून व्यसन लागायची शक्यताच जास्तं.
म्हणून दारू कशीही पिण्यास माझा विरोध आहे.

बाकी धागालेखक स्वतः पूर्णतः निर्व्यसनी असताना त्यांनी असा धागा काढल्याने सखेद आश्चर्य वाटले.
>>

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे..... .....

व्यसनमुक्ती, एड्स्,इत्यादि क्षेत्रात प्रबोधनाचे काम करणारे लोक 'त्यातले' थोडेच असतात ?

बाकी धागालेखक स्वतः पूर्णतः निर्व्यसनी असताना त्यांनी असा धागा काढल्याने सखेद आश्चर्य वाटले.

>>>

असा म्हणजे कसा?
मी दारूचे समर्थन न करता विरोधच करतोय.

मी दारूचे समर्थन न करता विरोधच करतोय. > काय सांगतात मग काही जण मात्र तुम्ही दरवाजा उघडा ठेउन पीत आहेत असा का अप्रचार करत आहे ? Uhoh Lol

टोचा,
जेव्हा येथील चर्चा पुर्णपणे थांबेल तेव्हा आपण वा इतर कोणी विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे नक्की देईन, तुर्तास धागा त्या वळणावर नको म्हणून नाही देत, तरी इतर कोणाला असे प्रश्न विचारायचे असल्यास प्लीज कृपया बेझिझक Happy

धन्यवाद चेतन!! थंड प्रदेशात दारुची गरज ह्यासारखा मोठा विनोद नाही (असे माझे मत आहे)....मी आणि माझा नवरा कधीही दारु पीत नाही आणि तरीही इथली थंडी आम्हाला खूप आवडते. गेल्या सहा वर्षात अगदी उणे१४ असे तापमान असले तरीही दारु प्यावी असे कधीही वाटले नाही. ह्याउलट माझ्या माहितीतले काही लोक अगदी नियमितपणे दारु पिउन सुद्धा इथल्या थंडीशी कोप अप करू शकलेले नाहीत.

दिदे, काहीतरी शब्दांचा गोंधळ वा गैरसमज उडतोय तुमचा वा माझा..
अन्यथा दारूला माझा विरोधच असतो वा समर्थन तर नसतेच नसते..

मी स्वत: निर्व्यसनी असणे हा मी माझा फार मोठा गुण समजतो, तर मी दारूचे समर्थन करून माझ्यातील या गुणाचे महत्व कमी का करेन? Happy

उणे तापमानात जास्त दारू पिणे म्हणजे दारूच्या अंमलाखाली शरीर एक्स्पोज होऊ देणं. थोडासा निष्काळजीपणा थंडीमुळे होणा-या गंभीर आजाराला निमंत्रण देउ शकतो. यात रक्त गोठणे, शिरा फुटणे, ब्लिस्टर, गँगरीन, फ्रॉस्ट बाईट इ. आजार संभवतात. (आजार हा शब्द योग्य आहे का ?)

चर्चा दारू प्यावी का पिऊ नये ही नसुन, मुलांसमोर प्यावी का पिऊ नये अशी आहे. तेव्हडीच लिमिटेड ठेवा.

चान्स मिळाला म्हणुन दारु ला नावे ठेवू नका.

टोचा,
जेव्हा येथील चर्चा पुर्णपणे थांबेल तेव्हा आपण वा इतर कोणी विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे नक्की देईन, तुर्तास धागा त्या वळणावर नको >>>>

तुमच्या धाग्यावरची चर्चा कधी संपतच नाही. चर्चा संपण्याची वाट नकाच बघू तुम्ही. सस्पेंस नी आज झोप लागणार नाही.

सुमुक्ता +१ हा शुद्ध आचरटपणा आहे.
अल्कोहोलने शरीराचे तापमान कमी होते. सुरुवातीला त्वचेचे तापमान वाढल्यासारखे वाटले तरी शरीरातील उष्णता त्वचेकडील रक्तवाहिन्यात जाऊन गरमपणाचा काहीकाळ आभास निर्माण होतो. थंड हवेत अल्कोहोल फेटल ठरू शकते. जपून. -४० तापमानात संरक्षण म्हणजे जास्तीतजास्त त्वचा कवर करणे आणि कमीतकमी वेळ त्या तापमानात राहणे.
संपूर्ण अवांतर प्रतिसाद, माफ करा.

ये रहा और एक लोकप्रिय धागा.

ऋन्मेऽऽष भाऊ आगे बढो!

घेतला कीबोर्ड, काढला धागा. १०० तर होणारच!!

(प्रतिसाद) असा कसा देत नाही? घेतल्याशिवाय रहात नाही!!

Pages