मटार उसळ फॅन क्लब

Submitted by मंजूडी on 18 December, 2014 - 00:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लोकहो, मस्त थंडी चालू झाली आहे आणि बाजारात जागोजागी मटाराच्या शेंगांचे ढीगच्या ढीग दिसू लागलेत. खादाडीचे, चंगळ करण्याचे दिवस चालू झाले आहेत.

'नाव एक चवी अनेक' यानुसार प्रत्येकाची मटाराची उसळ करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. या धाग्यावर आपण निरनिराळ्या चवीच्या मटार उसळीच्या कृती जमवूया.

पाककृती वेगळ्या, नवीन धाग्यावर लिहा, इथे प्रतिसादात फक्त लिंक द्या, मी हेडरमधे अपडेट करेन. कारण काय आहे की ढीगाने आलेल्या प्रतिसादांतून नेमकी पाककृती शोधणे अवघड जाईल, स्वतंत्र धाग्यावर लिहिलेल्या पाककृती शोधायला सोपे जाईल कारण त्या सर्चमध्ये येतात.

मटार पुलाव, मटार पॅटीस, मटार कचोरी, मटार हलवा, मटार खीर इत्यादींसाठी वेगळा फॅन क्लब काढा Wink

इथे फक्त आणि फक्त मटार उसळच येऊद्या. करी, भाजी इत्यादी पदार्थ चालतील, थोडक्यात पोळीशी लावून खायचे मटाराचे पदार्थ इथे येऊ द्या. आणि पाककृतीमध्ये फोटो हवेतच. Happy

:मटार उसळ करण्याची माझी पद्धत:

चार वाट्या ताजे मटाराचे दाणे
दोन छोटे कांदे
अर्धी वाटी ओलं खोबरं
तीन-चार लसणीच्या पाकळ्या
गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ
तेल आणि फोडणीचं साहित्य

क्रमवार पाककृती: 

मटाराचे दाणे शिजवून घ्या. अगदी टणटणीत दाणे नकोत आणि अगदी गाळही शिजवायचे नाहीत. मी बेबीकूकरमधे एक शिट्टी काढून शिजवून घेते, म्हणजे सगळेच दाणे एकसारखे शिजतात.

कांदा उभा पातळ चिरून घ्या. लसणी सोलून घ्या. कढईत अगदी दोन-तीन थेंब तेल तापवून त्यात कांदा-लसूण-ओलं खोबरं खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त गुळगुळीत वाटून घ्या.

कढईत तेल तापवून मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करा. शिजलेले मटार त्यात परतून घ्या. थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग त्यात कांदा-खोबर्‍याचं वाटण घाला. लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून ढवळा. आमच्याकडे तिखट-गोड या चवी बरोबरीने लागतात त्यामुळे गूळ लागतोच. रस्सा पातळ हवा की अंगासरशी हे आपापल्या आवडीप्रमाणे ठरवा त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी घालून उसळ मस्त उकळू द्या.
गरम फुलक्यांबरोबर ओरपा. सोबत ताजा गाजरहलवा असेल तर मग स्वर्गच!

matar usal.jpg
वाढणी/प्रमाण: 
तीन-चार माणसांसाठी
माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टिपिकल मटार उसळीची फॅन अजिबात नाही Proud , नेहमी मसालेदार, तर्रीवालीच आवडायची Happy . सासूबाई मटाराची आमटी करतात, त्याच पद्धतीने मी करते.

फोडणी करून त्यात आलं , लसूण पेस्ट घालून मग मटार घालून परतायचे, थोडे पाणी घालून शिजवायचे. मग मिक्सर / फूड प्रोसेसरमधून अर्ध बोबडे वाटून घ्यायचे. परत एकदा थोड्या तेलात फोडणी करून हे मिश्रण त्यात घालायचे. मीठ, चिंच, गूळ घालून आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आमटी उकळायची. यम्म्मी Happy

हिरव्या रंगाची भाजी करायला थोडी कोथिंबीर वाटुन टाकायची त्यात..

पनीर माखनीच्या ग्रेव्हीत मटर आमच्याकडे हिट्ट आहे..

मटार चटणी - मटार उकळत्या पाण्यात १-२ मिन ठेवुन निथळुन घ्यायचे. बत्त्याने थोडे ठेचायचे. तेलात जिरं, मोहरी, वाटलेली मिरची-लसुन्-ओलं खोबरं, कोथिंबीर, कांदा असं परतायचं अन लगेच ठेचलेले मटार टाकायचे. मीठ टाकायचं. अन झाकण ठेवायचं कढईवर.. ५-१० मिन ठेवायचं. २-२ मिन हलवायचं.

मंजूडी Lol
मला कोवळे मटार नुसते खायला आवडतात. गोड चवीचे दाणे सलादमध्ये (कच्चेच) मस्त लागतात. पण त्यांचे अतीप्रेम पोटाला त्रासाचे होते.
बायदवे मटार उसळ (उरलेली) पराठ्याच्या कणकेत ढकलून केलेले मटार पराठे, उकडलेल्या बटाट्याची भर घालून केलेल्या टिक्क्या इत्यादी पदार्थही मटार उसळ संप्रदायात येत असावेत.

मटार पराठे, उकडलेल्या बटाट्याची भर घालून केलेल्या टिक्क्या>>> अकु, घुसखोरगिरी करू नकोस Wink हे पदार्थ तू पोळीशी खातेस का? Proud

_प्राची_, मस्त फोटो आहे हिरव्या उसळीचा. कृती लिहा प्लिज.

मी काळ्या वाटाण्याची मालवणी मसाल्याची उसळ खाल्लीय <<<
मटार उसळ खाताना दाताखाली मटाराच्या रंगारूपाचा दगड यावा तसे झाले काळ्या वाटाण्याच्या आठवणीने.
अरे कोकण्यांनो पुरे त्या कडू काळ्या वाटाण्याचे कौतुक. निदान इथे तरी सुखाने मटार खाऊ द्या.

गरजूंसाठी Light 1

नीधप.:अरेरे:

अहो मी पहिल्यान्दा ती उसळ खाल्ली ती मालवणी शेजार्‍यान्कडुन आलेली. नेहेमीच गोड, कमी तिखटाचे जेवण खात असल्याने, ती उसळ खाल्ल्यावर फार आवडली. मी कोकणी नाही, देशावरची आहे. त्यामुळे काळे वाटाणे असतात हे सुद्धा माहीत नव्हते. तसेही घरी वाटण घाटण प्रकार कमीच. असो, तुम्हाला वाईट अनूभव आला असेल तर सॉरी.

इथल्या पोस्टी वाचून आता बाजारात जावून कोवळ्या वाटाण्याच्या शेंगा आणून चरत बसावे वाटतेय.

मंजूडी, शब्दखुणांमध्ये 'वाटाणा' टाकाल का?

५० किलो मटार!! धन्य! शिवाय येताना ते सोलत यायचे सुचले हे उत्तम. (तरी रस्त्यावर कचरा ..? ;-))
प्राची फोटो मस्त आहेत.
संपदाच्या आमटीच्या कृतीने केलेल्या पदार्थाला (वजा चिंच गूळ) आमच्याकडे ग्रीन पीज सूप म्हणतात Wink (आणि ते पोळीशी खात नाहीत. ;-))

एकंदरित धागा आवडला हा. फ्रोजन मटार कायमच उपलब्ध असल्याने कधीही यातली कोणतीही कृती करून बघता येईल.

वाटाणा का? मटार आणि वाटाणे वेगळे ना?

रश्मी, अहो दिवा दिलाय ना?

माझे काळा वाटाण्याचे प्रेम(!) भौतेकांना माहितीये इथे. विनोद आहे तो एक.

(तरी रस्त्यावर कचरा ..? डोळा मारा)>> मृदुला, जैविक कचरा Wink

नी, आपल्याला वाटाणा म्हटलं की वाण्याकडचा सुका पांढरा किंवा हिरवा वाटाणा डोळ्यांसमोर येतो. Wink पण काहीजण मटाराला ओला वाटाणा/ हिरवा वाटाणा म्हणतात.

मी तहहयात सदस्य. सध्या फ्रोझन मटार असल्यानं दर महिन्याला एक किलोचं पॅक आणलं जातंच. उपमा, पोहे, शेवयाचा उपमा, मिक्स व्हेज, वांग्याचं भरतं यात मूठभर मटार हवेच. सीझनमध्ये ताजे मटार एकदम तीन चार किलो आणून ते सोलून डीप फ्रीज्झ करायचा उपद्व्यापही लाडका आहे.

माझ्या माहितीप्रमाणे हिंदी मटारला मराठी शब्द वाटाणा असा आहे. (माहिती चुकीची असल्यास दुरुस्ती सुचवावी. पटली तर स्वीकारली जाईल. ;))

हो नीधप दिवा बघीतला. पण खरच एखाद्याला/ एखादीला विचीत्र अनूभव आले असतील त्याने/ तिने ते सान्गण्यात वाईट वाटुन घेऊ नये.:स्मित:

मला वाटत मटार ताजे आणी तेच मटार दाणे सुकवल्यावर त्याला बाजारात हिरवा वाटाणा म्हणत असावेत. कारण सुपर मार्केट मध्ये फ्रोझन हिरवे वाटाणे/ मटार मिळतात. पण खेड्या पाड्यात कुठे मिळणार हे फ्रोझन म्हणून वाटाणे सुकवत असतील.

>> वाळलेला मटार म्हणजे वाटणा ना<< हे माहितीये
पण
>> पण काहीजण मटाराला ओला वाटाणा/ हिरवा वाटाणा म्हणतात. << हे माहित नव्हते.

हिंदी मटारला मराठी शब्द वाटाणा << हिंदी शब्द मटर आहे ना?
मटार हा हिंदी शब्द आहे?

असो.. मटारला ओला/ हिरवा वाटाणाही म्हणतात ही नवीन भर पडली ज्ञानात. Happy

ओले सोललेले वाटाणे कढईत थोडे तेल टाकुन परतावे, मीठ भुरभुरावे आणि मस्त प्लेटमधे घेउन पुस्तक वाचत खावे. अहाहा काय सुख असते Happy

हे हरभर्‍याचे जास्त मस्त लागते.
एका बाजूला हरभर्‍याची गड्डी, ताटाबाहेर वरच्या बाजूला डिंगर्‍यांचा ढीग, ताटामधे बाकीच्या सगळ्या घटकांबरोबर एका वाटीत भरपूर काकवी आणि तूप. उजव्या हाताने बाकीचे जेवता जेवता मधेच डाव्या हाताने हरभरे सोलून तोंडात टाकायचे, मधूनच डिंगरी चावायची.. असे थंडीच्या दिवसातले रविवारचे जेवण... अहाहा ओहोहो..
पण तो वेगळ्या बाफचा विषय आहे.

नीरजा, बाबू वडापाववाल्याचं 'ओला वाटाणा पॅटीस' फेमस आहे.

मी एरवी सफलचे मटार ज्यातत्यात घालते. मटाराची तर्रीदार उसळ आवडते पण तिखट खाणं फारसं झेपत नाही. मटाराची उसळ म्हटले की गोडा मसाला-गूळ-खोबरंवाली उसळच आठवते. मटार सोलायचा मात्र भारी कंटाळा ! गप्पा मारत सामूहिकरित्या करायला आवडेल फक्त.

माझ्या माहितीप्रमाणे हिंदी मटारला मराठी शब्द वाटाणा असा आहे>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! हिंदीत मटर (आणि त्याचं साल कटर) आणि मराठीत मटार म्हणतात.
फ्लॉवरला मराठीमधे काय म्हणतात हे शोधायला हवं.

बाबू वडापाववाल्याचं 'ओला वाटाणा पॅटीस' फेमस आहे. << म्हणजे मी अजून ट्रू ब्लू(की काय ते!) पार्लेकर बनले नाहीये. Happy

आहा.. मटार उसळ आजच केली. सुकं खोबरं+कांदा+लसूण्+आलं+मिरी+दालचिनी+लंवगा असं तेलावर जरासं भाजून ते वाटण तमालपत्राच्या फोडणीवर बारीक चिरलेले टोमॅटो आणि मग हिरवेगार किलोभर मटार. मला अशी तर्रीदार उसळ ब्रेड, पाव, पोळ्या, भात किंवा नुसती. कशीही आवडते.

एरवी ओलं खोबर, गुळ, गोडा मसाला वगैरे नेहमीचीही आवडतेच.

मलाही मटार सगळ्यात घालायला आवडतात. धाकट्या मुलीला ते कच्चे (च फक्त) खायला आवडतात त्यामुळे विशेषतः मटारच्या सीझनला रोज आमच्याकडे किंचितसं ताटातलं वादळ असतंच. ती म्हणते तू अजून फक्त चहात मटार घातलेले नाहीस Proud

आमच्या इथे रुचीकडे ताज्या मटारच्या गरमागरम करंज्या मिळतात. दुपारच्या चहाबरोबर मस्त.

माझ्या सासूबाई ओला वाटाणा म्हणायच्या मटारला. पार्ल्याच्या भाजीबाजारातही बहुतेक सगळे, अगदी वसईवालाही ओला वाटाणाच म्हणतात.

चहात मटार <<< शर्मिला Lol
वाटाण्याच्या (म्हणजे शेंगांच्या टरफलांनाच ना?) कटर म्हणतात, हे माहीत नव्हतं. मंजूडी, धन्यावाद.

आमच्यातही भाजलेले वाटाणे आणि हरभरे दोन्ही खाल्ले जातात. पण मला हरभरे जास्त आवडतात.

मटार घालून चहा केल्यावर त्याची चव कशी लागेल या कल्पनेने मी हिरवीगार पडलेय. Biggrin
पुण्यात मटारच्या करंज्या (जोशी बंधूंच्या) फेमस आहेत. मटार सामोसे. पण अर्र, ते पोळीसोबत खाता येत नाहीत. Lol

Pages