लोकहो, मस्त थंडी चालू झाली आहे आणि बाजारात जागोजागी मटाराच्या शेंगांचे ढीगच्या ढीग दिसू लागलेत. खादाडीचे, चंगळ करण्याचे दिवस चालू झाले आहेत.
'नाव एक चवी अनेक' यानुसार प्रत्येकाची मटाराची उसळ करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. या धाग्यावर आपण निरनिराळ्या चवीच्या मटार उसळीच्या कृती जमवूया.
पाककृती वेगळ्या, नवीन धाग्यावर लिहा, इथे प्रतिसादात फक्त लिंक द्या, मी हेडरमधे अपडेट करेन. कारण काय आहे की ढीगाने आलेल्या प्रतिसादांतून नेमकी पाककृती शोधणे अवघड जाईल, स्वतंत्र धाग्यावर लिहिलेल्या पाककृती शोधायला सोपे जाईल कारण त्या सर्चमध्ये येतात.
मटार पुलाव, मटार पॅटीस, मटार कचोरी, मटार हलवा, मटार खीर इत्यादींसाठी वेगळा फॅन क्लब काढा
इथे फक्त आणि फक्त मटार उसळच येऊद्या. करी, भाजी इत्यादी पदार्थ चालतील, थोडक्यात पोळीशी लावून खायचे मटाराचे पदार्थ इथे येऊ द्या. आणि पाककृतीमध्ये फोटो हवेतच.
:मटार उसळ करण्याची माझी पद्धत:
चार वाट्या ताजे मटाराचे दाणे
दोन छोटे कांदे
अर्धी वाटी ओलं खोबरं
तीन-चार लसणीच्या पाकळ्या
गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ
तेल आणि फोडणीचं साहित्य
मटाराचे दाणे शिजवून घ्या. अगदी टणटणीत दाणे नकोत आणि अगदी गाळही शिजवायचे नाहीत. मी बेबीकूकरमधे एक शिट्टी काढून शिजवून घेते, म्हणजे सगळेच दाणे एकसारखे शिजतात.
कांदा उभा पातळ चिरून घ्या. लसणी सोलून घ्या. कढईत अगदी दोन-तीन थेंब तेल तापवून त्यात कांदा-लसूण-ओलं खोबरं खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त गुळगुळीत वाटून घ्या.
कढईत तेल तापवून मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करा. शिजलेले मटार त्यात परतून घ्या. थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग त्यात कांदा-खोबर्याचं वाटण घाला. लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून ढवळा. आमच्याकडे तिखट-गोड या चवी बरोबरीने लागतात त्यामुळे गूळ लागतोच. रस्सा पातळ हवा की अंगासरशी हे आपापल्या आवडीप्रमाणे ठरवा त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी घालून उसळ मस्त उकळू द्या.
गरम फुलक्यांबरोबर ओरपा. सोबत ताजा गाजरहलवा असेल तर मग स्वर्गच!
गाजर मटार भाजी - मनिषा लिमये
गाजर-मटर सब्जी - अल्पना
ओल्या मटारचं पिठलं - अल्पना
कटर की सब्जी (मटारच्या सालींची भाजी) - अल्पना
मस्त कृती. मटार खरेच भरपूर
मस्त कृती. मटार खरेच भरपूर आलेत बाजारात. मी ताज्या मटाराची उसळ कधी केली/खाल्ली नाही. आता या विकांताला करून पाहीन.
रच्याकने, ते- खा खा, मटार उसळ खा आठवलं एकदम!
मी फॅन क्लबात फक्त हाताशी
मी फॅन क्लबात फक्त हाताशी फोटु नसल्याने मी उसळीची रेस्पी उद्या टाकेन. आज मटार उसळ ब्रेडचा बेत आहे आमच्यात. लाळेर लावलेली बाहुली:
परवाच केली होती.. मटार
परवाच केली होती..
मटार शिजवायची .
टोम्याटो , कांदा , लसुण , आले किसुन घ्यायचे.
तेलात हा सगळा कीस शॅलो फ्राय करायचा. त्यात मटार , तिखट मीठ घालुन शिजवुन घ्यायचे. पाणी घालायचे नाही
मीही आहे या फॅक्लत मटार
मीही आहे या फॅक्लत मटार उसळीचे कधी फोटो काढले नाहीत बाई! आता काढेन
इथे एक रेसिपी आहे- बहुतेक अल्पनाची, नक्की आठवत नाही- गाजर-मटार भाजी. ती इथे फिट्ट बसेल.
उसळ-पाव... वॉव शुभांगी,
उसळ-पाव... वॉव शुभांगी, मस्त!! फोटो काढच नक्की.
पौ, फोटो काढाच बै आता
गाजर मटार भाजी.. येस्स. लिंक शोधते. पण बहुतेक ती मनिषा लिमयेने लिहिली आहे.
अल्पनाने कटर (मटाराच्या सालींची) की सब्जी लिहिली आहे.. ती नको बै
मटर घुगनी बिहारी रेसिपी ..
मटर घुगनी बिहारी रेसिपी .. अगदी सोप्पी फोडणीला घालून हिमि धणेजिरे पूड मीठ घालून वाफवायची...
अल्पनाने कटर (मटाराच्या
अल्पनाने कटर (मटाराच्या सालींची) की सब्जी लिहिली आहे <<
अरे एकदम मस्त आहे ती. मी एकदा करून पाह्यली होती.
टोम्याटो , कांदा , लसुण , आले किसुन घ्यायचे. <<
टोमॅटो किसताना गिचका नाही का होणार?
माझी रेसिपी मंजूच्या रेसिपीच्या जवळ जाणारी आहे.
मी त्यात धने जिरे पावडर पण घालते. मटार आधी शिजवत नाही.
प्रेशर पॅनमधे फोडणी- कांदा परतणे - खोबरे+धनेजिरे पावडर+गोडा मसाला+किसलेले आले+ठेचलेल्या लसूणपाकळ्या घालून परतणे - मग मटार घालून परतणे - पाणी - गूळ - लाल तिखट/ हिरव्या मिरचीचा ठेचा - कुकर बंद - शिट्टी - वाफ गेली - उघडणे - मीठ - जास्तीचे पाणी आटवणे(हे गरज असल्यास) + उकळी - गॅस बंद - वरून कोथिंबीर पेरणे. खायला घेताना हवे असल्यास लिंबू पिळून घेणे.
उसळ पाव खायचे असल्यास आणि कॅलरीचा विचार करायचा नसल्यास पाव पण अमूल बटरमधे भाजून घेणे आणि खायला घेताना पाभा मधे घालतो तशी उसळीत अ ब ची छोटी वडी घालणे.
पर्वाच करून झालीये. आता पुढच्या आठवड्यात परत करेन तेव्हा फोटु टाकेन.
मस्त मंजुडी. मी आठवडयातून
मस्त मंजुडी.
मी आठवडयातून दोनदा तरी मटारचा एखादा पदार्थ करतेच. काही नाही तर सुपात तरी टाकते. आता उसळी तुझ्या धाग्यामुळे मिळतील करायला वेगवेगळ्या प्रकारच्या.
३१ डिसेंबरचा फेव्हरेट मेनू...
३१ डिसेंबरचा फेव्हरेट मेनू... मटार उसळ ब्रेड..
हो . टोम्याटो गिजकाच
हो . टोम्याटो गिजकाच करायचा.
दोन चमचे तेल गरम करायचे. त्यात आधी आले लसुण पेस्ञ फ्राय करायची.. पेस्ट म्हणजे तो कीस.. मग कांदा व शेवटी टोम्याटो यांचाही कीस परतुन एकजीव करायचे. मसाला दमट रहायला टोम्यटो उपयोगी येतात.
या मसाल्यात , भिजवुन शिजवलेले हरबरे परतायचे. तिखट मीठ सोयीनुसार. मस्त चना मसाला होतो.
मी चना ऐवजी मटार घेऊन प्रयोग केला . मस्त होतात.
आमच्याकडे असा होतो रस्सा,
आमच्याकडे असा होतो रस्सा,
कांदा बारीक चिरून तेलावर परतून घ्यायचा, त्यात लाल तिख्ट घालून वर मटार परतून घ्यायचे (वाढीव करायचा तर बटाट्याच्या फोडी पण ) मग पाणी घालून शिजायला ठेवायच. तोवर उभाकांदा तेलावर परतून घ्यायचा त्यात मिरी,दाल्चिनी, धणे , लवंग ,बडीशोप भाजून घ्यायची , मग ओल खोबर घालून परत भाजायच. मटार शिजेपर्यंत ह्या भाजक्या मसाल्याच वाटण करायच . मटाअर बटाअटे शिजले की त्यात हे वाटाण घालायच. आणि गरम पोळ्या /शॉर्ट्कट असेल तर ब्रुन बरोबर ओरपायच ! इती रैवार ब्रंच.
वाहवा!! इकडे मस्त संग्रह
वाहवा!! इकडे मस्त संग्रह होणार.
इन्ना, सेम पिंच. मी वर लिहिली आहे ती अगदी ब्राम्हणी गोड्या मसालावाली उसळ होते. पण ब्रेडबरोबर खायची असेल तर झणझणीत तर्रीदार उसळ लागते ती आम्ही जवळपास तू लिहिली आहेस तशी करतो.
नी, आमच्याकडे उसळ-मिसळीबरोबर खाताना पाव भाजून घेत नाहीत. ती ऐश फक्त पावभाजी खाताना
मला हिरव्या उसळीची सप्रमाण कृती हवी आहे. कोणीतरी लिहा लवकर.
माझी नेहमी फसते. म्हणजे चव चांगली असते पण हिरवा रंग येत नाही. तो लाल/ पिवळ्याकडेच झुकतो
मला हिरवी मिरची, आले यांचे
मला हिरवी मिरची, आले यांचे वाटण लावून केलेली हिरवी उसळ आवडते. यात थोडीशी खसखस घालतात. आणि ओले खोबरेही. आमच्याकडे नेवैद्यात करतात. म्हणून कांदा लसूण नसतो. मायबोलीवरच्या एका गणेशोत्सवात मी फोटो टाकला होता.
थोडक्यात कृती..
तेलाची हिंग जिर्याची फोडणी करून त्यावर आले मिरचीचे वाटण टाकायचे. बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची. हळद नेहमीपेक्षा थोडी कमीच घालायची. मग त्यावर मटार दाणे टाकून परतायचे. झाकण ठेवून शिजवायचे. कोवळे मटार असतील तर वाफेवर शिजतात. नाहीतर किंचीत पाण्याचा हबका मारायचा. मग मीठ, साखर, ओले खोबरे व वापरत असू तर खसखस टाकायची. नेवैद्यात नसते पण ताटात घेताना वरून लिंबू पिळून घ्यायचे.
याच उसळीचे पॅटीस, करंज्या पण छान होतात.
छान व अगदीं वेळींच आलेली
छान व अगदीं वेळींच आलेली रेसिपी !
मला माहित नाही कीं ही टिपीकल कोकणी पद्धत आहे का तें पण आमच्याकडे अशीही उसळ करतात व छान होते -
तेलांत मोहरी, हिंग फोडणी, त्यांत हिरवी मिरची, थोडा बारीक चिरलेला कांदा व किंचित हळद, नंतर त्यांत माफक प्रमाणांत बटाट्याच्या फोडी, शेवग्याच्या शेंगा व न उकडलेले/ वाफवलेले ओले वाटाणे. हें सर्व तेलांत परतवून घेवून, अगदीं थोडं पाणी घालून ,मंद आंचेवर शिजवून घ्यायचं. शिजल्यावर त्यांत मीठ, किंचित कोथिंबीर व ओल्या नारळाचं खोबरं घालून एक वाफ काढायची. बस्स ! [ अर्थात ग्रेव्ही हवी असेल तर ही रेसिपी उपयोगी नाही पण ओल्या वाटाण्याचा खरा स्वाद व चव यात खुलून येतात].
आमच्याकडे उसळ-मिसळीबरोबर
आमच्याकडे उसळ-मिसळीबरोबर खाताना पाव भाजून घेत नाहीत. ती ऐश फक्त पावभाजी खाताना <<
आमच्याकडे म्हणजे बाबांना मटार उसळ-पाव या मेनू मधे पाव (नव्हे ब्रेड स्लाइस) भाजलेले नसतील तर अजिबात चालत नाही.
आमच्यात कांदा -टोमॅटो परतुन
आमच्यात कांदा -टोमॅटो परतुन त्यात कोल्हापुरी तिखत, मीठ, हळद मग पाणी घालुन शिजवायचे , शेवटच्या स्टेजच्या जरा आधी दाण्याचे कुट घालयचे , मस्त कट येतो दाणे कुट टाकल्यानंतर.
आमचे बाबा काहीतरी गोडसर चव
आमचे बाबा काहीतरी गोडसर चव असलेली मटार उसळ करतात. नेहमी खायला मला तरी नको वाटते ती. कधीतरी ठिकेय. विचारून सांगते रेसीपी
(मी नाही या क्लबात )
वाचतेय
वाचतेय
मला कधीतरी(च) चापायला मटार
मला कधीतरी(च) चापायला मटार उसळ आवडते. थंडीत तर्रीदार मटार उसळ व सोबत हिंदुस्थान / ग्रीन बेकरीचा पाव. शेव, कोथिंबीर, लिंबूही हवेच.
साजूक चवीची मटार उसळ व सोबत गरमागरम फुलके / पोळ्या.
आमच्याकडे मटारचे नि:स्सीम चाहते घरी असल्यामुळे या सीझनात भाजी, आमटी, उसळ, डाळ, पोहे, उप्पीट, भात वगैरे जिथे तिथे मटार दाण्यांची सढळ हस्ताने पेरणी असते. तो अजब उत्साह मला आजवर उमगलेला नाही. कदाचित हा धागा वाचून उमगेल ही आशा.
अकु, मटारचे ढीग दिसायला
अकु, मटारचे ढीग दिसायला लागले की माझ्या मनात ही ज्यात्त्यात मटार उत्साह शिरतो. सोबत गाजराचे ही ढीग दिसतात. त्यामुळे फिल्मी मां चा रोल पण करावासा वाटतो
भन्नाट ....तोपासु
भन्नाट ....तोपासु
दिनेशदा, धन्यवाद. अशी हिरवी
दिनेशदा, धन्यवाद. अशी हिरवी उसळ करून बघेन.
ओल्या नारळाऐवजी सुकं खोबरं
ओल्या नारळाऐवजी सुकं खोबरं ब्राऊन होईपर्यंत परतलं आणि उसळीत घातलं तर एक मस्त खमंग चव येते.
मटर-पनीरची रेसिपी पण चालेल इथे, नाही का?
इन्ना!! मी इयत्ता सहावी -
इन्ना!! मी इयत्ता सहावी - सातवीत असल्यापासून मला नित्यनियमाने (व भक्तीभावाने) दरवर्षी घरी या सीझनात होणारे मटार उसळ व गा.ह. चे जंगी बेत आठवले! घरातले मटार संपत आले म्हणून मी सुटकेचा नि:श्वास सोडावा तोवर मंडईतून किलोभर मटार पुन्हा घरात हजर!
बरं, कोणाकडे जेवायला / खायला आमंत्रण असेल तर त्यांच्याकडेही तोच्च बेत!
या तर्रेदार उसळीत काटदरेन्चा
या तर्रेदार उसळीत काटदरेन्चा मिसळ मसाला घालायचा. लई भारी!
मी काळ्या वाटाण्याची मालवणी मसाल्याची उसळ खाल्लीय त्यामुळे मी मालवणी मसाल्याच्या जाम प्रेमात आहे.( भाऊ आणी जागुन्ची मजा आहे कोकणातले असल्याने) आता तो मसाला मिळाला की मटार उसळीत घालणारच.
सर्वान्च्या रेसेपी भन्नाट.:स्मित:
पौर्णिमा.+++४
पौर्णिमा.+++४
१)मंजुडीच्या रेसिपीसारखीपण
१)मंजुडीच्या रेसिपीसारखीपण गोडा मसाला ऐवजी मालवणी मसाला घालून उसळ करते.त्यात चिमूट भर साखर कधीतरी घालते.चिंचेच बुटुक वाटणात असते.
२) दिनेश यांनी सांगितल्याप्रमाणे (फक्त आले वगळून ) उसळ जास्त आवड्ते.
३) आमची वनिता,थोडे ओले खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, १ र्टॉमेटो, १ लवंग ,दालचिनी,४मिरी,आले, लसूण एकत्र वाटते. तेलावर कांदा घालून वरील वाटण ,त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतते.त्यात वाटाणे (मटार) शिजवते.त्यात१ बटाटा घालते.
४) एका लग्नात खाल्लेलीभाजी. बहुदा खोबरेल तेलाची फोडणी असावी,नक्की आठवत नाही.राई + हिंग +ओली मिरचीची फोडणी होती.ओले काजू+मटार+ ओले खोबरे, भाजी काय मस्त लागत होती.
अरुंधती, एकदा पुण्यात
अरुंधती, एकदा पुण्यात गुलटेकडीला मटार खूप स्वस्त मिळत आहेत आणि मुंबईला जाताना घर्पोच गाडी मिळणार आहे म्हणून माझे बाबा पन्नास किलोचं पोतं घेऊन आले होते.
पुणे-मुंबई प्रवासात बाबा आणि मामा मटार सोलत आले. मटार दाणे पिशव्यांमध्ये आणि सालं खिडकीबाहेर. एखादा जटायू मटार उसळीच्या वासावर आला असता तर त्याला दोघांच्याही घरांचा माग लागला असता
आमच्याकडे पण सिझनात ज्यात
आमच्याकडे पण सिझनात ज्यात त्यात मटार असतात. आलू मटर, आलु- गोबी विथ मटर, गाजर मटर, मटर पनीर्, मिक्स भाजी, मटर उसळ, मटर आमटी, मटर घातलेलं वांग्याचं भरीत, मेथी मलई मटर यातले किमान २-३ पदार्थ तरी एका आठवड्यात होतातच.
मी पण ह्या फॅन क्लबात मटार
मी पण ह्या फॅन क्लबात मटार उसळ ब्रेड मे ह्या सिझनमधे रोज खायला तयार असते.
Pages