गुजरानवाला इथल्या छावणीतील निर्वासितांमध्ये आता हिंदुस्तानात जाण्याच्या उमेदीने चैतन्यं आलं होतं. हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न सर्वांपुढे आSS वासून उभा राहणार होता! छावणीत आलेला प्रत्येकजण आपलं घरदार, नोकरी किंवा व्यवसाय पाकीस्तानात सोडून कायमचा हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होता. प्रत्येकाला पुनश्च हरी ॐ म्हणूनच पुन्हा सुरवात करावी लागणार होती. परंतु हिंदुस्तानात पोहोचल्यावर निदान जीवाची सुरक्षीतता तरी लाभणार होती! कोणत्याही क्षणी एखादा धर्मांध माथेफिरू आपल्यावर चाल करुन येईल आणि आपला जीव घेईल ही तरी भीती नव्हती.
मेजर चौहाननी या जथ्याची दहा तुकड्यांमध्ये विभागणी केली होती. प्रत्येक तुकडीचा एक प्रमुख नेमला होता. आपल्या तुकडीला कोठेही रेंगाळू न देता नेमून दिलेल्या क्रमाने मार्गस्थं ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपावण्यात आली होती. प्रत्येक तुकडीला जीप आणि पायी चालणार्या सैनिकांचं संरक्षण असणार होतं. तीन ट्रकवर मशिनगन्स बसवण्यात आलेल्या होत्या. जथ्याच्या पुढेमागे दोन ट्रक आणि एक ट्रक मध्यभागी अशी व्यवस्था असणार होती.
गुजरानवाला येथून हिंदुस्तानच्या सीमेवर जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्धं होते. यापैकी एक मार्ग धर्मकोट, नारोवाल या मार्गे हिंदुस्तानातील डेरा बाबा नानक इथे जात होता. हा मार्ग तुलनेने अधिक लांबचा आणि खडतर होता. दुसरा मार्ग म्हणजे इतिहासप्रसिद्ध ग्रँड ट्रंक रोड! हा मार्ग लाहोरमार्गे वाघा या सीमेवरील चेकपोस्टवर येत होता. याच मार्गाने आपला जथा नेण्याची मेजरसाहेबांची योजना होती. वाटेत मुरीदके इथल्या छावणीतील लोक जथ्यात सामील होणार होते. नानकाना साहेब हे शीखांचं धर्मस्थळ पाकीस्तानात गेल्यामुळे तेथील शीखांचा मोठा जमाव लाहोर इथे आला होता. तो देखील या जथ्याबरोबरच हिंदुस्तानात जाणार होता.
चौधरी महेंद्रनाथ यांची एका तुकडीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आपल्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली मेजरसाहेबांनी आपल्यावर विश्वास दाखवावा त्यांना अभिमान वाटला.
"आपण माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी माझ्या कुवतीप्रमाणे पार पाडेन मेजरसाहेब!" चौधरी म्हणाले, "आपल्याला तक्रारीसाठी कोणताही मोका मी देणार नाही!"
दोन दिवसाच्या आत चौधरी महेंद्रनाथांनी आपल्या तुकडीतील प्रत्येक व्यक्तिची तपशीलवारपणे नोंद केली. प्रा. सिन्हा आणि आदित्य यांची त्यांना या कामी खूप मदत झाली. प्रत्येक तंबू आणि राहुटीमधून गोळा करण्यात आलेल्या या माहीतीची तपशीलवार यादी करण्याचं काम सरिता आणि रजनी करत होत्या. आपल्या तुकडीची ही यादी पूर्ण झाल्यावर चौधरींनी ती मेजरसाहेबांच्या हवाली केली. रोज सकाळी आपलं सर्व काम आटपलं, की चौधरी, केशवराव आणि प्रा. सिन्हा मेजरसाहेबांच्या तंबूत जाऊन त्यांना लेखनकामात शक्य ती सर्व मदत करत असत.
एक दिवस मेजरसाहेबांनी दहाही तुकडी प्रमुखांना बोलावून सूचना दिल्या -
"छावणीतून निघाल्यापासून हिंदुस्तानच्या सीमेपर्यंतचा सर्व प्रवास हा प्रत्येकाला पायी चालत करावा लागणार आहे! केवळ अपंग आणि गंभीर जखमी, तसेच गरोदर स्त्रिया यांनाच ट्रकमध्ये घेण्यात येईल! कोणाचंही कोणतंही सामान ट्रकमध्ये घेतलं जाणार नाही! सामान नेण्यासाठी आपल्यापाशी ट्रक नाहीत! हा प्रवास सुमारे साठ मैलांचा आहे आणि तो पायी-पायी चालतच करायचा आहे! त्या दृष्टीने स्वत:ला उचलता येईल इतपतच सामान प्रत्येकाने बरोबर घ्यावं! बैलगाड्या अथवा सायकली अशी वाहने बरोबर घेण्यास परवानगी आहे, परंतु त्याची जबाबदारी ज्याची त्याने घ्यावी.
वाटेत जिथे कुठे रात्रीचा मुक्काम करावा लागेल, तिथे तंबू ठोकले जाणार नाहीत. कारण लष्कराकडे तेवढे तंबूच नाहीत! केवळ मुरीदके आणि लाहोर इथल्या छावणीत उपलब्ध तंबू रिकामे असलेच तर मिळू शकतील! बाकी ठिकाणी स्त्री, पुरुष, लहान मुलं सर्वांनाच उघड्या आभाळाखालीच रात्रीचा मुक्काम करायचा आहे! त्या दृष्टीने आवश्यक ती आंथरूण - पांघरूणं प्रत्येक कुटुंबाने आपल्या सामानात बरोबर घ्यावीत!
सर्वात महत्वाचं म्हणजे, आपल्या खाण्या-पिण्याची व्यवस्ता प्रत्येक कुटुंबाला स्वतःच करावी लागणार आहे! लष्कराकडून कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पाणी पुरवलं जाणार नाही! खाद्यपदार्थ आणि पाणी - दूध वाटेवर लागणार्या गावातून खरेदी करण्यास लष्कराची परवानगी आहे, मात्रं हे पदार्थ मिळवण्यासाठी कोणीही गावच्या किंवा शहराच्या अंतर्भागात जाऊ नये!
मार्गाने चालत असताना जर गावातील गुंडांचा हल्ला झाला नजीकच्या लष्करी वाहनाच्या शक्य तितक्या जवळ आश्रय घेण्याचा प्रयत्न करावा! सैनिक आणि अधिकार्यांच्या सूचनेचं सर्वांनी पालन करावं. याबाबतीत कोणतीही हयगय चालणार नाही! या सर्व सूचना प्रत्येकाने आपल्या तुकडीतील माणसांपर्यंत पोहोचवायच्या आहेत!"
मेजरसाहेबांच्या या सूचनेचा साधा अर्थ असा होता की, प्रत्येक कुटुंबाने संपूर्ण प्रवासात पुरेल इतका शिधा आणि पैसे बरोबर घेणं जरुरीचं होतं. त्याच्या जोडीला आवश्यक ती आंथरूण - पांघरूणं बरोबर घ्यावी लागणार होती. इतर कोणतीही गोष्ट, मग ती कितीही लहान असली तरी तिचं वजन जास्तीचं ठरणार होतं!
छावणी सोडून निघण्यासाठी सर्वजण अधीर झाले होत. काही लोकांपुढे मात्रं वेगळीच समस्या उभी होती.
पाकीस्तानातील शीख धर्मियांना हिंदुस्तानात सुखरुप पोहोचण्यासाठी आपल्या डोक्यावरील केसांना चाट द्यावी लागेल असं सर्वांचं मत होतं. डोक्यावरील पगडीमुळे किंवा केसांच्या बुचड्यामुळे शीख पुरुष सहज ओळखू येत होते आणि त्यामुळे ते मुसलमान गुंडांच्या हल्ल्याचं लक्ष्यं ठरत होते. तेव्हा शीखांना सुखरुप हिंदुस्तान गाठायचा असेल तर डोक्यावरील केशसंभार उतरवण्याला पर्याय नव्हता.
छावणीतील अनेक शीखांनी हा मार्ग पत्करला होता. गुरकीरतनेही डोक्यावरील केस उतरवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वृद्ध कर्तारसिंगना मात्रं हे साफ नामंजूर होतं! कर्तारसिंगना आपल्या धर्माचा कट्टर अभिमान होता. केस कापणं म्हणजे धर्मभ्रष्ट होणं असं त्यांचं मत होतं! गुरकीरत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण कर्तारसिंग त्याचं काही ऐकून घेण्यास तयार नव्हते.
"पापाजी, हिंदुस्तानात सुखरुप जायचं असेल तर आपल्याला केस कापण्यावाचून दुसरा उपाय नाही!
"पुत्तर, एका सरदाराने केस कापणं म्हणजे धर्मभ्रष्टं होणं! मी हे करणार नाही!"
"पर पापाजी...."
"देख पुत्तर, मी एक खालसा आहे! आणि एका खालसाला गुरुमहाराजांनी सांगितलेल्या केश, कंगवा, कडं, कच्छा आणि कृपाण या पाच 'क' कारांचं पालन करणं हे बंधनकारक आहे! तेव्हा तू मला केस काढण्यास सांगू नकोस!"
"पापाजी! पापाजी! अहो तुम्हाला कळत कसं नाही? वाहत्या वार्याप्रमाणे पाठ फिरवणं सध्या आपल्याला भाग आहे! हा पाकीस्तान आहे! मुसलमानांचा मुल्क! आपलं इथलं अस्तित्वं त्यांच्यावर अवलंबून! अशा परिस्थितीत तुमचा हा हट्ट सगळ्यांच्याच जीवावर बेतेल!"
"मैनू कोई फिकर नहीं!" कर्तारसिंग निर्धाराने म्हणाले, "सच्चे पातशात तुस्सी पातशाही! प्राण गेला तरी मी माझा धर्म सोडणार नाही! तुला हवं तर तू केस काप आणि धर्मभ्रष्ट हो! मी हे करणार नाही!"
कर्तारसिंगांच्या कट्टर धर्माभिमानापुढे गुरकिरतचा निरुपाय झाला. जसवीरनेही त्यांच्या विनवण्या केल्या, लहानग्या सतनामला त्यांच्या पायावर घालून त्याची शपथ घातली, पण कर्तारसिंग आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत.
कर्तारसिंगांचा हा अट्टाहास कानी येताच चौधरींनी त्यांना गाठून समजावण्याचा प्रयत्न केला.
"कर्तारसिंगजी, हे मी काय ऐकतो आहे? तुम्ही आपल्या डोक्यावरचे केस काढणार नाही?"
"आपने ठीक सुना महेंदरभाई!"
"अहो पण का?"
"माझ्या गुरुमहाराजांची याला परवानगी नाही!"
"तुमच्या धर्मश्रद्धेची मी तारीफ करतो कर्तारसिंगजी! परंतु आताच्या या परिस्थितीमध्ये तुमचा हा हट्ट अनाठायी आहे असं मला वाटतं" चौधरी म्हणाले.
"गुरु तेगबहाद्दूरांनी धर्मासाठी आपले प्राण दिले. मी त्यांचाच नेक बंदा आहे! मी माझा धर्म सोडणार नाही!"
"अहो पण सरदारजी, तुम्हाला धर्मभ्रष्ट व्हा म्हणून कोण सांगतं आहे?" मध्येच केशवरावांनी प्रश्न केला, "सिर सलामत तो पगडी पचास!"
"केस कापणं म्हणजे माझ्या दृष्टीने धर्मभ्रष्ट होणंच आहे!"
"माफ करा सरदारजी, जरा स्पष्ट बोलतो!" केशवराव म्हणाले, "धर्म हा शेवटी कोणी निर्माण केला? माणसांनीच ना? सदाचारणासाठी आणि सुदृढ समाजासाठी आपल्या धर्मगुरुंनी विविध बंधनं घातली, कारण धर्माच्या नावाखाली कोणतीही गोष्ट करवून घेणं हे नेहमीच सोपं जातं! आपण आपलं सर्वस्व इथे सोडून हिंदुस्तानात जातो आहोत हे देखील एका धर्माच्या उन्मादी आणि अतिरेकी अनुयायांचं थैमान सुरु आहे म्हणूनच ना? धर्म जर मानवानेच निर्माण केला आहे तर धर्माचं अस्तित्व देखील माणसावरच अवलंबून आहे! नानकाना साहेब हे तुमचं प्रसिद्ध धर्मस्थळ! या धर्मस्थळाच्या आश्रयाला असलेल्या हजारो शीख बांधवांची गुंडांनी अमानुष कत्तल केली. उद्या प्रत्येक शीख माणसाने आपला हेका सोडला नाही आणि दुर्दैवाने सर्वांचंच शिरकाण झालं तर मग शीख धर्माचं अस्तित्वंच संपुष्टात येईल त्याचं काय? त्यातूनही केस कापल्याने आपण धर्मभ्रष्ट होऊ अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर हिंदुस्तानात सुखरुप पोहोचल्यावर तुम्ही तुमच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्या! खुशाल हवे तेवढे केस वाढवा! तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही!"
केशवरावांच्या या सडेतोड बोलण्याचा सरदारजींवर निश्चित परिणाम झाला असावा. त्यांची चल-बिचल झाली. त्यांची अस्वस्थता चौधरींच्या ध्यानात आली. कर्तारसिंगांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले,
"कर्तारसिंगजी, केशवजी म्हणाले ते बरोबर आहे! धर्मपालन हे प्रत्येकाचं कर्तव्य असलं, तरी प्राप्त परिस्थितीत आपला जीव वाजवणं हे सर्वात महत्वाचं! याउप्पर तुमची मर्जी!"
कर्तारसिंग काहीच बोलले नाहीत. चौधरी आणि केशवराव आपल्या कामाला निघून गेले. आपल्यापरीने त्यांनी सरदारजींना समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी हा निर्णय कर्तारसिंगांनाच घ्यावा लागणार होता. कर्तारसिंग रात्रभर विचार करत होते. त्यांना केशवरावांचा युक्तीवाद पटला होता, परंतु केस कापण्याच्या कल्पनेने आपण आपल्या गुरुमहाराजांना फसवत तर नाही ना असं त्यांना राहून राहून वाटत होतं.
"मी माझे केस कापण्यास तयार आहे!" दुसर्या दिवशी सकाळी कर्तारसिंगांनी आपला निर्णय जाहीर केला! "परंतु इतर कोणत्याही 'क' काराचा मी त्याग करणार नाही!"
"पापाजी!" गुरकीरतचा आनंद गगनात मावेना.
"कर्तारजी, तुम्ही योग्य निर्णय घेतलात याचा आनंद आहे!" चौधरी समाधानाने म्हणाले.
"एक गोष्ट ध्यानात ठेव कीरतबेटा, हिंदुस्तानात पोहोचल्यावर सर्वात प्रथम मी अमृतसरच्या सुवर्णमंदीरात जाऊन प्रायश्चित्त घेईन! माझ्याबरोबर ते तुलाही घ्यावं लागेल! हे मंजूर असेल तरच मी केस कापण्यास तयार आहे!"
"जरुर पापजी! हिंदुस्तानात पोहोचल्यावर आपण सर्वप्रथम सुवर्णमंदिरात जाऊ!"
मेजरसाहेबांनी एक दिवस आपल्या दहा तुकडी प्रमुखांना बोलावून सांगितलं,
"उद्या सकाळी आपल्याला छावणी सोडून हिंदुस्तानच्या सीमेकडे प्रस्थान करायचं आहे! छावणीपासून सीमेपर्यंतचा हा सर्व प्रवास महामार्गानेच करायचा आहे. दररोज सुमारे सात ते आठ मैलांची पदयात्रा आपल्याला करावी लागेल! प्रत्येक ठिकाणी आपल्याला केवळ एक रात्रीपुरताच मुक्काम करायचा आहे. अपवाद मुरीदके आणि लाहोर इथल्या मुक्कामाचा. अशा तर्हेने प्रवास करुन सुमारे बारा ते पंधरा दिवसात आपण हिंदुस्तानच्या सीमेवर पोहोचणार आहोत. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या तुकडीतील लोकांना निघण्याची तयारी करण्याच्या सूचना द्याव्यात!"
कॅ. वकार सईदने आदित्य आणि प्रा. सिन्हांना मुद्दाम चिठी पाठवून आपल्या निवासस्थानी बोलावून घेतलं. वकारची चिठी मिळाल्यावर दोघेही चकीत झाले. अखेरच्या क्षणी वकारचं आपल्याकडे काय काम निघालं असावं हे त्यांना कळेना.
छावणीच्या आवारातच असलेल्या एका लहानशा बंगलीत वकार राहत होता. आदित्य आणि प्रा. सिन्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा चहाची सर्व सिद्धता केलेली त्यांना आढळून आली. वकारच्या नोकराने चहाच्या जोडीला काही खाद्यपदार्थांच्या प्लेटी आणून ठेवल्या.
"कहो वकारमियां, आज हमें कैसे याद किया?" आदित्यने विचारलं.
"बस ऐसेही! कल आप लोग हिंदुस्तानके लिये रवाना हो जाएंगे! पता नहीं फिर कब मुलाकात होगी, होगी भी के नहीं!"
"सच कह रहे हो वकार!" प्रा. सिन्हांनी दुजोरा दिला.
"सोचा, जानेसे पहले एकबार आपले मुलाकात कर लूं! आप तो देख रहे है जो हिंदुस्तान-पाकीस्तानके बीच चल रहा है! क्या सोचा था, क्या हो गया! ये हालात देखकर तो लगता है पाकीस्तान अलग ना होता तो ही ठीक था!"
काही वेळ कोणीच काही बोललं नाही.
"आता जो काही हिंसाचार आणि नरसंहार चालू आहे.... महायुद्धाचा अपवाद वगळता असा हिंसाचार पूर्वी कधी झाला नसेल!" आदित्य उद्गारला.
"झाला होता आदित्यबाबू! नुकताच झाला होता! तो देखील आपल्या हिंदुस्तानात!"
"हिंदुस्तानात?"
"हो! बंगालमध्ये! तिकडे भयानक दुष्काळ पडला होता! लोक अन्न-पाण्यावाचून भुकेने तड्फडून मरत होते! सरकारच्या माहीतीनुसार पंधरा लक्ष लोक दुष्काळात मरणा पावले. पण सरकारने सांगितलेला हा आकडा खूपच कमी होता! कलकत्ता विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार दुष्काळात एकूण चौतीस लाख लोक प्राणाला मुकले होते!"
"चौतीस लाख?" वकार आणि आदित्य दोघेही हादरुन गेले.
"सर, हिंदुस्तान-पाकीस्तानका बटवारा मुस्लीम लीग और जिन्हासाबकी वजहसे हुवा ऐसा सब कहते है! आपने इतिहास पढा है. ये बात कहांतक सच है?" वकारने प्रश्न केला.
"यह बात कुछ हद तक तो सच है वकार," प्रा. सिन्हा उत्तरले, "मुस्लीम लीगची स्थापना ३० डिसेंबर १९०६ या दिवशी ढाक्क्याला झाली. हिंदुस्तानातील नागरिकांपेक्षा मुसलमान हे वेगळे आहेत म्हणून लीगने विभक्त मतदारसंघांची मागणी केली. फोडा आणि राज्य करा या तत्वानुसार याला ब्रिटीशांची फूस होतीच! ही मागणी स्वातंत्र्य आंदोलनात फूट पाडण्यासा कारणीभूत ठरली!"
वकार आणि आदित्य दोघंही सिन्हासरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. प्रा. सिन्हा पुढे बोलू लागले,
"पुढे १९०७ मध्ये सुरतेला काँग्रेस दुभंगली! याचा लीगलाच फायदा झाला. मुस्लीम लीगच्या एका अधिवेशनात एक ठराव मांडण्यात आला. वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाब, बलुचीस्तान या सर्वांचे मिळून स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यावे असा हा ठराव होता! हा ठराव मांडणारे कोण होते ठाऊक आहे?"
"कौन?" वकारने प्रश्न केला.
"महंमद इक्बाल!"
"महंमद इक्बाल?" वकारला धक्का बसला, "या खुदा! उन्होंनेही तो कहा था ना, सारे जहांसे अच्छा हिंदोस्तां हमारा?"
"याचा अर्थ महंमद इक्बालही विघटनवादीच..." आदित्यने जीभ चावली. एका पाकीस्तानी लष्करी अधिकार्याच्या घरी बसून आपण हे बोलत आहोत याची एकदम त्याला जाणीव झाली.
"इक्बाल अलगाववादी थे या नहीं पता नहीं! पर ऐसा लगता है, हिंदुस्तानका एक हिस्सा धरमके आधारपर अलग प्रांत कहलानेसे उन्हें परहेज नही था!" वकार म्हणाला.
"पुढे रहमत अलीने पाकीस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून कल्पना मांडली ती मुस्लीम लीगने उचलून धरली. १९४० च्या लाहोर इथल्या लीगच्या अधिवेशनात अध्यक्ष असलेल्या जिन्हांनी मुसलमान हे अल्पसंख्यांक नाहीत आणि हिंदुस्तानचा भाग नाहीत तर ते एक स्वतंत्र राष्ट्र आहेत असं प्रतिपादन केलं. हिंदुस्तानचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय असून ब्रिटीश सरकारला शांतता हवी असल्यास भारत आणि पाकीस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रं निर्माण करावीच लागतील असा त्यांनी ब्रिटीश सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली! त्याचीच परिणीती पुढे हिंदुस्तानच्या फाळणीत झाली!"
बराच वेळ तिघांपैकी कोणीच काही बोललं नाही.
"ब्रिटीश सरकारने मुस्लीम लीगच्या या मागणीकडे फारसं लक्षं दिलंच नव्हतं. सरकार काँग्रेसबरोबरच वाटाघाटी करत होतं. परंतु दुसर्या महायुद्धाने सगळेच संदर्भ बदलून गेले! अर्थात जे झालं ते झालं. हिंदुस्तानची फा़ळणी झाली आणि पाकीस्तान स्वतंत्र झालं, परंतु दोन्ही देशातील अल्पसंख्यांक नागरीकांच्या अदलाबदलीच्या प्रश्नाचा ना काँग्रेसने विचार केला ना लीगने! याचे परिणाम आपण पाहतोच आहोत!"
"आपकी बात बिलकूल सच है सर!" वकार म्हणाला, "लखनौ और कानपूरमें हमारे कई सारे रिश्तेदार है. पाकीस्तानका आगाज होने के बाद यहां आने के वास्ते निकल पडे है! लेकीन अब वो कहां है, किस हाल में है, जिंदा भी है या नही पता नही! शायद एक दिन यहां आ जाएंगे, शायद कभी नहीं!"
काही वेळाने प्रा. सिन्हा आणि आदित्य जाण्यासाठी उठले.
"एक मिनीट रुकना!"
वकार आतमध्ये निघून गेला. काही वेळातच तो बाहेर आला तो दोन्ही हातात धारदार सुरे घेऊनच! दोन्ही सुर्यांची पाती सुमारे बारा इंच लांबीची होती.
"क्यों वकारमियां, दो काफीर कम करनेका इरादा है क्या?" आदित्यने चेष्टेने विचारलं. वकार खदखदून हसला.
"ये मै आप लोगोंके वास्ते लाया था!" दोघांपुढे सुरे धरुन तो म्हणाला, "आप इन्हे अपने साथ रखो!"
"इनका हम क्या करेंगे वकार?" प्रा. सिन्हांनी आश्चर्याने विचारलं, "हमारे साथ तो हिंदुस्तानकी फौज होगी सुरक्षाके लिए!"
"सिन्हासर, आप पंदराह हजार लोग है! हिंदुस्तानी फौजमें पाचसौ सिपाही है! रास्तेंमें कई गांव है जहां लोग इसी इंतजार में रहेंगे की कब उन्हे किसी हिंदुस्तानीको काटनेका मौका नसीब हो! खुदा न करे अगर हमला हुआ तो फौज किसकिसको संभाल सकेगी? आप इसे अपने साथ रखेंगे तो कुछ तो मुकाबला कर सकेंगे!"
दोघांनी काही न बोलता ती शस्त्रं घेतली.
"अच्छा वकारमियां अब चलते है!"
"उम्मीद है आप बिना किसी परेशानीसे हिंदुस्तान पहुंच जाएंगे! खुदा हाफीज!"
वकारचा निरोप घेऊन दोघे आपल्या वाटेला लागले. वाटेत आदित्य म्हणाला,
"कॉलेजमधला पाकीस्तानच्या मागणीसाठी आंदोलन करणारा वकार आणि पाकीस्तान आर्मीचा कॅ. वकार सईद... माणूस इतका कसा बदलू शकतो सर?"
"वस्तुस्थिती ही कल्पनेपेक्षा भयंकर असल्याची जाणीव झाली की माणूस भानावर येतो आदित्यबाबू! पाकीस्तान अस्तित्वात आल्यावर दोन्हीकडच्या लोकांनी जो नृशंस आणि अमानुष क्रौर्याचं जे प्रदर्शन घडवलं ते पाहून धर्मांध नसलेला कोणीही माणूस हादरुन गेला असता. वकारचं तेच झालं असावं!"
"मग मुळात वेगळ्या पाकीस्तानची मागणी करायचीच कशाला?"
"चुकताय तुम्ही आदित्यबाबू! पाकीस्तानची मागणी आणि नंतरचं हे अमानुष हत्याकांडं यांना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहवं लागेल! फाळणीची मागणी करणार्यांना नंतरच्या या परिणामाची कल्पना आली नसावी!"
"पाकीस्तानची मागणी आणि अल्पसंख्यांकांची सुरु असलेली कत्तल हे वेगळं कसं करता येईल सर? सध्या सुरु असलेली लुटालूट, जाळपोळ आणि अत्याचार हा पाकीस्तानच्या अस्तित्वाचाच परिपाक आहे!"
"मला नाही तसं वाटत! मी आधीच म्हटल्याप्रमाणे फाळणी टळत नाही हे स्पष्ट झाल्यावर दोन्ही बाजूच्या अल्पसंख्यांकाचा प्रश्न आधी धसास लावणं आवश्यक होतं. त्यात आपले पुढारी कमी पडले. त्याचेच परिणाम आपण भोगतो आहोत!"
दुसरा दिवस उजाडला!
गुजरानवाला इथल्या छावणीतून बाहेर पडण्याचा तो दिवस!
छावणीतील सर्वजण आज उत्साहात होते. छावणीतील लोकांपैकी पंधरा हजार जणांचा पहिला जथा मेजर वीरप्रताप चौहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी तुकडीच्या संरक्षणात आज हिंदुस्तानकडे रवाना होणार होता. अनेकजण गेल्या तीन-चार महिन्यांपासून छावणीत राहत होते. हिंदुस्तानच्या सीमेपर्यंतची ही खडतर वाटचाल पायी करताना आपल्याला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल. वाटेत मुसलमान गुंडांचा हल्ला तर होणार नाही? हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय? असा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता, परंतु 'एकदाची या नरकवासातून सुटका होणर!' हीच भावना बहुतेकांच्या मनात येत होती.
कॅ. वकार सईदने जथ्यातील प्रत्येक माणसाची नावानिशी नोंद असलेली यादी मेजरसाहेबांच्या हवाली केली. छावणीतून बाहेर पडणार्या लोकांच्या संरक्षणासाठी त्याने फाटकापाशी लष्करी शिपायांचा कडक पहारा बसवला होता. त्याखेरीज फाटकापाशी दोन छोट्या तोफादेखील तैनात करण्यात आल्या होत्या. कॅ. वकारच्या हाताखालील अधिकारी या व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
छावणीच्या फाटकापाशी बर्याच लोकांची गर्दी जमली होती. हे सर्व लोक शहरात लुटालूट आणि जाळपोळ करणारे मुसलमान होते. कोणत्याही सुसंस्कृतपणाचा त्यांच्याजवळ अभाव होता. ओरडा-आरडा करत छावणीच्या कुंपणावर आणि फाटकावर चढून आत घुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होते. इतके सारे हिंदू आणि शीख एकत्रं असलेले पाहून बहुधा त्यांची मूळ सैतानी वृत्ती पुन्हा जागी झाली होती. छावणीवर पहारा करणार्या सैनिकांनी त्यांना आत घुसण्यास अटकाव केला होता हे नशिबच! छावणीत घुसण्यात जर ते यशस्वी झाले असते तर त्यांनी काय उत्पात घडवला असता कोणास ठाऊक!
मेजरसाहेबांनी आदेश दिल्यावर पहिली तुकडी फाटकातून बाहेर पडून मार्गाला लागली. या तुकडीच्या अग्रभागी मशीनगन बसवण्यात आलेला ट्रक होता. दोन ओळींमध्ये तुकडीतील माणसं बाहेर पडू लागली. त्यांच्याबरोबर संरक्षणासाठी सैनिक आणि लष्करी जीपही होत्या. छावणीतून बाहेर पडताना प्रत्येकजण गुजरानवाला शहराकडे डोळे भरुन पाहत होता. प्रत्येकजण आपलं घरदार, जमिन-जुमला, नोकरी-व्यवसाय इथे ठेवून कायमचा हिंदुस्तानला निघाला होता. पुन्हा कोणालाही या शहराचं दर्शन होणार नव्हतं!
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. हे सगळे मुसलमान होते. छावणीतून बाहेर पडून हिंदुस्तानच्या मार्गाला लागलेल्या तुकडीतील लोकांची ते हुर्यो उडवत होते. टाळ्या पिटत होते. जथ्यातील स्त्रियांकडे पाहून अश्लील शेरेबाजी करत होते. अर्वाच्य शिव्या देत होते. बिचार्या स्त्रिया आणि मुली मान खाली घालून आणि या टोळभैरवांना मनातल्या मनात शिव्या देत चालत होत्या. मोजकेच सहृदय आणि विचारी मुसलमान आपल्या मित्रांना, सहकार्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर दोन पावलं चालत होते.
एकेक तुकडी छावणीतून बाहेर पडू लागली!
तंबू रिकामे होऊ लागले!
जथ्यात सामानाने भरलेल्या काही बैलगाड्यादेखील होत्या. अनेक लोकांबरोबर त्यांच्या सायकली होत्या. सायकलींवरही बरंच सामान लादलेलं होतं. जवळपास प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या हातात, खांद्यावर सामानाची गाठोडी होती. काही मुलांच्या डोक्यावरही गाठोडी होती. गर्दीत हरवू नये म्हणून आई-बापांनी मुलांचे हात घट्ट धरुन ठेवले होते. अनेक लोकांनी आयुष्यात कधी एखादी काडीही उचलण्याचे कष्ट घेतले नव्हते. चालत कधी फर्लांगभर अंतरही ओलांडलं नव्हतं. असे लोकही आता डोक्यावर आणि खांद्यावर सामानाची बोचकी घेऊन पदयात्रेने मार्गस्थं झाले होते. देशाच्या फाळणीने गरीब-श्रीमंत सर्वांना एका पातळीवर आणलं होतं.
चौधरी महेंद्रनाथांची तुकडी पाचव्या क्रमांकावर होती. चौधरी तुकडीचे प्रमुख असल्याने त्यांना सारा वेळ कमलादेवी आणि सरितेबरोबर राहता येणार नव्हते. तुकडीतील सर्वांवर त्यांना नजर ठेवावी लागणार होती. कोणी मागे रेंगाळत नाही याबद्दल डोळ्यात तेल घालून लक्षं ठेवावं लागणार होतं.
रुक्सानाबानूचा नवरा चमनलाल हा कधीपासून गायब झाला होता. छावणीतही तो कोणाच्या दृष्टीस पडला नव्हता. मात्रं आज तो छावणीच्या फाटकापाशी उभा असलेला सरदार कर्तारसिंगांच्या दृष्टीस पडला. त्याने संपूर्ण मुसलमानी पोशाख केला होता. डोळ्यात सुरमा घातला होता. हातात लाल गोंड्यांची टोपी होती. कर्तारसिंगांनी चौधरींचं त्याच्याकडे लक्षं वेधताच चौधरी त्याच्याजवळ गेले.
"अहो चमनलाल! कुठे होतात इतके दिवस?"
"कोण चमनलाल? माझं नाव शेरखान!"
"तुम्ही आणि शेरखान? एखाद्या खर्या शेराने ऐकलं तर झेप घेऊन तुकडे करेल तुमचे!"
"हॅ हॅ!"
"काय हो शेरखान तुम्ही होता कुठे इतके दिवस? रुक्सनाबहन कधीपासून शोधताहेत तुम्हाला!"
"रुक्साना? हड! ती गेली जहान्नम मध्ये!"
"अहो असं काय म्हणता? आणि हे काय रुप हो तुमचं? काय करुन घेतलंत हे?"
"जे करायला हवं होतं तेच केलं. असंही हिंदुस्तानात मला काय मिळालं असतं?"
"इथे पाकीस्तानात तरी काय मिळणार आहे तुम्हाला?" चौधरींनी आश्चर्याने विचारलं.
"तुम्ही राहत होतात तो वाडा आता माझ्या मालकीचा आहे! त्या दळभद्री बाईची दोन्ही उपहारगृहं आता माझ्या मालकीची आहेत! त्यापैकी एकात मी आता दारु विकायला ठेवणार आहे! शिवाय लवकरच मला एक मुसलमान बिवीसुद्धा मिळायची आहे!"
"धन्यं आहे तुमची!" चौधरींनी त्याला कोपरापासून हात जोडले, "तुम्ही दोघं मियां-बिवी इथे पाकीस्तानात सुखाने संसार करा हो! आम्ही जातो आमच्या मार्गाने!"
ग्रँड ट्रंक रोडने जथा मार्गाला लागला. छावणी शहराच्या उत्तरेला असल्याने संपूर्ण शहर पार करुन त्यांना दक्षिणेचा मार्ग धरावा लागणार होता. शहरातून जाताना एकाही तुकडीवर कोणी हल्ला करु नये म्हणून लष्कराचे सैनिक सावधपणे चौफेर नजर ठेवून होते. दोन्ही बाजूला असलेल्या बघ्यांकडून अर्वाच्च शिव्यांचा आणि अश्लील शेरेबाजीचा भडीमार सुरुच होता. लष्कराला खिजवण्यासाठी सतत 'पाकीस्तान झिंदाबाद! हिंदुस्तान मुर्दाबाद!' अशी नारेबाजी जोरात सुरु होती. आपलं लक्षं तसूभरही विचलीत होऊ न देता लष्कराने जथ्यातील दहाही तुकड्यांना शहराच्या दक्षिण भागातून बाहेर काढलं.
गुजरानवाला शहराचा संबंध कायमचा संपला!
जथ्यातील सर्वजण उत्साहाने मार्गक्रमणा करत होते. लहान मुलांना तर ही जणू सहलच असावी असं वाटत होतं. खिदळत - बागडत ती मोठ्या आनंदाने आपल्या आई-बापाबरोबर निघाली होती. हे सर्व स्वतंत्र हिंदुस्तानचे उद्याचे नागरीक असणार होते! आपले आई-वडील कोणत्या गंभीर परिस्थितीत सापडले आहेत याची जराही कल्पना त्या अश्राप बालकांना नव्हती.
आपण काय काय मागे ठेवलं याचा प्रत्येकजण मनाशी हिशोब करत होता. चौधरी महेंद्रनाथांची दोन्ही दुकानं, भला मोठा वाडा मागे राहीला होता. त्याहीपेक्षा कर्तासवरता मुलगा गमावल्याचं दु:खं मोठं होतं. मुलाचं शेवटचं दर्शनही त्यांच्या नशिबात नव्हतं! सरदर कर्तारसिंगांचं दुकानही मागे राहीलं होतं. रुक्सानाबानूची उपहारगृह कधीच मागे पडली होती. केशवराव पटवर्धनांच्या कचेरीतील जागेवर कोणीतरी दुसराच बसणार होता. मुसलमानच असणार तो! प्रताप आणि उमेच्या स्मृतींनी कमलादेवींचे डोळे वारंवार पाण्याने भरुन येत होते. सरितेलाही भय्याची सतत आठवण येत होती. निदान आदित्य तरी आपल्याबरोबर आहे हेच दु:खात सुख होतं.
आतापर्यंतच्या सगळ्या कडू-गोड आठवणींचं थडगं मागे गाडूनच प्रत्येक जण पुढे निघाला होता. हिंदुस्तानात पोहोचल्यावर प्रत्येकाला नवा डाव मांडावा लागणार होता. कोणाला वृद्धापकाळी तर कोणाला उतारवयात, कोणाला तारुण्यात तर कोणाला अगदीच लहानपणी. स्वतंत्र हिंदुस्तानात आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याचीच प्रत्येकाला चिंता होती.
मोठ्या उमेदीने निघालेल्या जथ्यातील किती जण सहीसलामत हिंदुस्तानात पोहोचणार होते?
क्रमशः
छान आहे भाग असेच मोठे भाग
छान आहे भाग
असेच मोठे भाग टाकत रहा
स्पार्टाकस फार च सुंदर
स्पार्टाकस फार च सुंदर !!!
जणु काही हे प्रसंग तुम्ही स्वतः अनुभवले आहात इतके सुंदर ते इथे मांडले आहेत.
वायव्य सरहद्द प्रांतानी खरेच खुप भोगले फाळणी च्या वेळी.
मलाही काळजी लागून राहिलीये ते
मलाही काळजी लागून राहिलीये ते सुखरूप पोचले असतील का हिंदुस्थानात याची.
पु.भा.प्र.
पुढे काय वाचावे लागणार आहे
पुढे काय वाचावे लागणार आहे कल्पना नाही करवत..
चमनलाल>> सुखदेव
चमनलाल>> सुखदेव
मला सुंदर म्हणवतच नाहीये..
मला सुंदर म्हणवतच नाहीये.. फारच भिषण आहे हे!
कुठल्या काळाची गोष्ट कुठल्या काळात अंगावर काटा आणते..
काळा पलीकडे प्रवास केल्या सारखा वाटला..
आपण त्रयस्थ होऊन दुरुन हे सगळं बघतोय असं वाटुन गेलं..
आणि काही सुचत नाहीये.. काय करावं अशी मनाची अवस्था झालिये..
काहीच कसं केलं नाही त्या वेळी ब्रिटीशांनी तरी.. भारतात कुणाला अनुभव नव्हता.. पण त्यांना नक्की माहीत असेल असं काही होऊ शकतं म्हणुन..
ह्या आधी इतीहासात कधी अशी फाळणी झाली नव्हती का?
का ते लोक माणुस होते??? प्रत्येकाला समानतेनी वागवणारे?
मग हे लोक इतके अमानुष कसे?
भयाण आहे..
'रावी पार' वाचुनच काळजाचा ठोका चुकायचा,, ईथे तर .. मला सांगताच नाही येत आहे काय होतंय..
मला माझ्या ह्या मानसीक ताणाच्या अवस्थे मुळे आता पुढे वाचावसं वाटत नाही...
तुम्हाला पु ले शु
विमनस्क.. हाच तो शब्द!
धनुकली + १
धनुकली + १
इतके दिवस फाळणी च दु:ख अन
इतके दिवस फाळणी च दु:ख अन आठवणी बद्दल नुसत ऐकून होते. कधी जास्त माहीत करून घ्यायची हिम्मत नाही
केली.
पण हे वाचल्यावर मीच तिथे आहे अस वाटतेय. आपण इथे बसून फक्त कल्प्नाच करु शकतो.
प्रत्यक्षात किती भोगलय आपल्या माणसांनी.....
अरे देवा!
अरे देवा!
सर्व भाग वाचले. काय भोगलय
सर्व भाग वाचले. काय भोगलय त्या लोंकानी फाळणी च्या वेळी. उर्मीला मातोंड्करचा पिंजर देखील असाच हादरवतो.
खुप परिणामकारक लिहितो आहेस
खुप परिणामकारक लिहितो आहेस स्पार्टाकस!
कालपासून आत्तापर्यंत सगळे भाग सलग वाचून काढले, अत्यंत उत्कंठावर्धक चालू आहे कथेचा प्रवास.. प्रत्येक पात्र, लोकेशन्स, प्रसंग, संवाद, संदर्भ, सगळंच अतिशय तपशीलवार आहे, त्यामुळे एकदम सुरस वाचनाचा आनंद मिळतो आहे.
जबरदस्त लिहीले आहे. आता आमचा
जबरदस्त लिहीले आहे.
आता आमचा ही प्रवास सुरु झाला असे वाटते --- ती हुरहुर, उत्सुकता, अनामिक भिती , अगदी सर्व अनुभवतोय.
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच अशी आहे, की फाळणीच्या वेळेचं वर्णन अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभं राहतं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...................
स्पार्टाकस, अतिशय समतोलपणे
स्पार्टाकस, अतिशय समतोलपणे आणि संयतपणे लिहित आहात. त्यात हि वाक्य जरा खड्या सारखी टोचत आहेत. इथे दंग्यात भाग घेणार्या मुसलमांना विषयी म्हणाचय बहुधा. ते पुरेस स्पष्ट कराल का? <<छावणीच्या फाटकापाशी बर्याच लोकांची गर्दी जमली होती. हे सर्व लोक अर्थातच मुसलमान होते. कोणत्याही सुसंस्कृतपणाचा त्यांच्याजवळ अभाव होता. ओरडा-आरडा करत छावणीच्या कुंपणावर आणि फाटकावर चढून आत घुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होते. इतके सारे हिंदू आणि शीख एकत्रं असलेले पाहून बहुधा त्यांची मूळ सैतानी वृत्ती पुन्हा जागी झाली होती.>>
तुमच्या अभ्यासपुर्ण लेखनाचा पंखा आहे, म्हणुनच जे वाटलं ते प्रामाणिकपणे सांगितले, क्रु. गै. न.
पु. भा. प्र.
रांचो, छावणीच्या फाटकापाशी
रांचो,
छावणीच्या फाटकापाशी जमलेले सर्व लोक मुसलमान असणं हे साहजिकच होतं कारण हे सर्वजण निर्वासितांची मजा पाहण्यासाठी शहरातून आलेले होते. शहरात कोणीही हिंदू अथवा शीख शिल्लक असणं अशक्यं आहे असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. सुसंस्कृतपणाचा अभाव अशासाठी की शहरात जाळपोळ आणि लुटालूट करणारे. बलात्कार करणारे आणि हैदोस घालणारे हेच लोक होते हे सूचीत केलं आहे. मुळात हिंदू आणि शीख यांच्याविरोधात धर्मांधतेने त्यांचं वर्तन सैतानाप्रमाणे झालं होतं.
याला अपवाद असणारे विचारी आणि समतोल मनोवृत्तीचे कॅ. वकार आणि मिर्झा सिकंदरअलीखान यांच्यासारखे फारच थोडे मुसलमान होते.
मान्य आहे स्पार्टा. म्हणुनच
मान्य आहे स्पार्टा. म्हणुनच मी "इथे दंग्यात भाग घेणार्या मुसलमांना विषयी म्हणाचय बहुधा" असे म्हणालो. जे सहाजिकच आहे, तेच नेमकं खोड काढणार्यांना समजावुन घ्यायच नसतं. तुमच्या ह्या वाक्यात "हे सर्व लोक अर्थातच मुसलमान होत"" फक्त "हे सर्व लोक अर्थातच दंग्यात भाग घेणारे मुसलमान होते" असे असते तर ते लेखातच अधिक स्पष्ट झाले असते. पुन्हा एकदा नोंदवतो, विषय नाजुक आहे, तुम्ही तो आत्ता पर्यंत छान आणि संयतपणे हाताळत आहात आणि आपल्या ह्या चर्चेमुळे, तुमचे विचार स्पष्ट होत आहेतच.
धन्यवाद रांचो! हे वाक्यं आता
धन्यवाद रांचो!
हे वाक्यं आता अधिक स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच अशी आहे, की फाळणीच्या वेळेचं वर्णन अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभं राहतं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...................
>>>>>>> +१
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच
स्पार्टाकस, तुमची लेखनशैलीच अशी आहे, की फाळणीच्या वेळेचं वर्णन अगदी हुबेहुब डोळ्यासमोर उभं राहतं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........>>>>>+२
वाचवत नाही, तरी वाट पहात असतो.
एकच शब्द -
एकच शब्द - अप्रतिम!
पु.भा.प्र.
बापरे , पुढे काय असेल या
बापरे , पुढे काय असेल या विचारानेच धाकधूक होतेय