भाग पहिला : http://www.maayboli.com/node/50335
भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/50832
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51024
भाग चौथा : http://www.maayboli.com/node/51358
भाग पाचवा : http://www.maayboli.com/node/51433
भाग सहावा : http://www.maayboli.com/node/51506
भाग सातवा : http://www.maayboli.com/node/51573
--------------------------------------------------------------
सरासरी चारहजार शब्दांचे सात भाग लिहून झाल्यावर अजून काय आता ? तर हे थोडसं उरलं सुरलं..
माझा कैलासमानसला जायचा उद्देश्य काहीही असला तरी या प्रवासाला सरकार दरबारी, कागदोपत्री 'यात्रा' असच म्हटलं जातं. त्यामुळे मी कैलास मानससरोवर यात्रेला जाणार आहे हे कळल्यावर बर्याच जणांची पहिली प्रतिक्रिया यायची 'यात्रेला ? ह्या वयात ? सगळं ठिक आहे ना?!' ट्रेकला, प्रवासाला कुठे कुठे जायचं, काय काय बघायचं ह्याची यादी न संपणारी आहे. कैलास मानससरोवर ह्या यादीत बरच वरच्या स्थानावर होतं. मी आधी लिहिल्याप्रमाणे मी दहावीत असताना आईच्या मैत्रिणीने लिहिलेलं यात्रेचं वर्णन वाचलं होतं आणि तेव्हाच इथे जायची इच्छा झाली होती. नंतर शिक्षण, नोकरी दरम्यान ही गोष्ट मागे राहिली. दोन वर्षांपूर्वी मायबोलीवरच अनयाने लिहिलेली लेखमालाही वाचली आणि कैलासमानस यात्रेची सुप्त इच्छा पुन्हा जागी झाली. त्यामुळे मी इथे लिहिल्याप्रमाणे ह्या यात्रेचं श्रेय अनयाच्या लेखमालेलाच!
यात्रेच्या सुरूवातीला सगळ्या यात्रींना 'तुम्हांला कैलासमानसयात्रेला का जावसं वाटतय?' असा प्रश्न विचारण्यात आला. बर्याच लोकांचा अगदी स्पष्ट धार्मिक हेतू होता. पापं धुणे, पुण्य कमावणे, जन्म-मृत्यूच्या फेर्यातुन मुक्ती मिळवणे वगैरे. इथे आम्हांला ह्या जन्मातल्या गोष्टींचं प्लॅनिंग करता येत नाही तर पुढचे जन्म कोणी पाहिले? आणि धार्मिक बाबतीत मी कुंपणावरचा. इतर कोणी पुजा करत असतील तर मी त्यांना ते करू नका असं सांगणार नाही. पण मी त्यात भाग घेईनच असही नाही. देवळापर्यंत गेलो तर नास्तिक म्हणून बाहेर उभा रहाणार नाही, आत जाऊन दर्शन घेईन. पण आज देवळापर्यंत जायचं की नाही ते मात्र माझं मी ठरवेन. त्यामुळे बराच विचार करून यात्रेला का जायचं ह्याचं उत्तर मी 'to find spirituality in the nature' असं दिलं.
यात्रेत दिसणारा निसर्ग इतका खरोखरच अप्रतिम आणि गुढ आहे की त्यापुढेच नतमस्तक व्हायला होतं. परिक्रमेच्या दरम्यान एका वळणावर बराचवेळ डोंगराआड असलेल्या कैलासाचं अचानक दर्शन झालं आणि अक्षरशः भान हरपून त्याकडे बघतच बसलो. त्या पर्वतात काहीतरी अद्भुत नक्कीच आहे! कैलासाच दर्शन आणि मानससरोवरातली डुबकी अगदी आतून हलवून टाकते. एकप्रकारची उर्जा देऊन जाते.
ही यात्रा म्हणजे एक आव्हान आहे. शारीरीक, मानसिक, आर्थिक आणि म्हटलं तर प्रापंचिकही. सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय ती घडणं शक्य नाही आणि जुळवून आणायचे आपले प्रयत्न यशस्वी होतीलच असही नाही. प्रत्यंतर गेल्या वर्षी आलच. पाहिल्या तिनही गोष्टी जमल्या तरीही ऑफिसमधली इतकी मोठी सुट्टी, घरच्या जबाबदार्या, घरून पाठिंबा हे सगळंही तेव्हडचं महत्त्वाचं. माझ्या बाबतीत सुदैवाने ह्यावर्षी सगळ्याच गोष्टी जुळल्या. आर्थिक जुळवाजुळव तुम्ही आधीपासून करू शकता, जवळच्यांकडून मदत घेऊ शकता मात्र शारिरिक आणि मानसिक ताकद मात्र स्वतःची स्वतःच उभी करावी लागते. त्याचं उसनं अवसान आणता येत नाही. त्यामुळे ह्या प्रवासादरम्यान स्वतःच्या तीनही प्रकारच्या क्षमता ताणून बघण्याची उत्तम संधी लाभते. शारिरिक आणि मानसिक क्षमता अधेमधे ताणून बघायला खरतर मजा येते आणि त्या ताणून बघाव्याच. शिवाय आमच्या घरातले सगळे जण बर्यापैकी 'फॅडीस्ट' आहेत. प्रत्येकाची काही ना काही फॅडं सुरू असतात. ह्या सगळ्यात आधीचे आणि नंतरचे दोन चार माहिने बरे जातात. त्यामुळे ही यात्रा त्या दृष्टीनेही एक फॅड किंवा उपक्रमच होता.
मध्यंतरी 'साडेसाती'संबंधीच्या चर्चेत वाचलं की साडेसाती माणसाला पेशन्स शिकवते. ह्या यात्रेच्या निमित्ताने त्याचं अगदी पुरेपुर प्रत्यंतर आलं. एका वर्षीची यात्रा रद्द होऊन नंतर वर्षभर थांबून पुन्हा जायला मिळणे ह्या प्रकारात पेशन्सचा अगदी कस लागला. प्रत्येक गोष्टीतला वाट पहाण्याचा वेळ नको व्हायचा. पण नंतर त्यातुन मिळालेला अनुभव खूप आनंददायी होता! 'यात्रेला' जाऊन आल्यावर मी लगेच बदललो, संत प्रवृत्तीचा झालो असं अजिबातच नाही. (परत आल्यावर पहिल्याच आठवड्यात इथे मायबोलीवरच्याच एका चर्चेत आरे ला कारे करायचा मोह मला आवरला नाही!). पण यात्रेहून आल्यावर एकप्रकारचा आत्मविश्वास आला असं मात्र वाटतं. श्वास घेता येत नाही, हातात सॅकच काय पण पेनही धरवत नाही अश्या अवस्थेत लिपूलेख किंवा डोलमाची चढाई करू शकत असेन तर काहीही करता येणं शक्य आहे असं वाटायला लागलं. शिवाय करीयरची दहावर्ष झाल्यावर एक महीना सुट्टी स्वतःसाठी घेता येऊ शकते हा ही एक अनुभवच होता.
घरच्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या प्रवासाला जाणं शक्य नव्हतं. ट्रेकसाठी किंवा 'यात्रे'ला जाण्यासाठी तब्बल एक महिन्याची रजा मंजूर केल्याबद्दल ऑफिसमधल्या माझ्या वरिष्ठांचे आभार मानलेच पाहिजेत. ह्यावर्षी केदार बरोबर होता. कोणीतरी ओळखीचं बरोबर आहे हा स्वतःसाठी तसच घरच्यांसाठीही मोठा आधार होता. बाकी एकोणसाठ जणांशी पटलं नाही तरी एका माणसाशी काही बाबतीत का होईना पण पटेल ह्याची खात्री निघण्यापूर्वीच होती. मी आणि केदारने एकत्र खूप मजा केली, टवाळक्या केल्या. केदारचा स्टॅमिना आणि उत्साह (ह्या वयातही!) अफाट आहे. (चाचा चौधरींच्या पुस्तकांत जशी * करून वर वाक्य लिहिलेली असतात, तशी मी केदारबद्दल 'केदारको थंड नही लगती', 'केदार कभी मिठा नही खाता' आणि 'केदारको लेख-लडाखके बारे मे सबकूछ पता है' अशी काही वाक्य शोधून ती लेखांमध्ये लिहायचं ठरवलं होतं. पण मी त्यावरून प्रवासादरम्यान त्याला पुरेसं पिळलेलं आहे.)
ह्या सगळ्या प्रवासाचं वर्णन लिहून काढणं हा ही एक अतिशय आनंददायी अनुभव होता. लिहिताना, फोटो बघताना सगळं परत आठवत होतं. केदारने एका लेखाच्या प्रतिक्रिये लिहिलं तसं ह्या लेखांमध्ये भरपूर 'अडगळ' होती, पण ती 'समृध्द' होती आणि महत्त्वाची होती. मी हे आत्ता लिहून ठेवलं नसतं, तर बारिकसारिक गोष्टी हळूहळू विसरून गेलो असतो. त्यामुळे काही ठिकाणी पाल्हाळ झाली खरी पण एकंदरीत लिहून झाल्यावर थोडेफार बदल वगळता संपादन करणं मी टाळलं. लेखांवर प्रतिक्रिया यायच्याच पण बर्याच जणांनी इमेल, फोन, चॅटवर देखील लेख आवडत असल्याचं आवर्जून कळवलं. काही काही प्रतिक्रिया 'अगदी खास तुझी स्टाईल', 'लेखनाची उत्तम शैली' अश्या होत्या. आपल्या लेखनाला स्वतःची 'स्टाईल' आहे, ती लोकांना जाणवते आहे आणि मुख्य म्हणजे आवडते आहे हे वाचणं फारच सुखावून टाकणारं, गुदगुल्या करणारं वगैरे होतं! तर लेख वाचून प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
काही जणांनी 'यात्रेचं वर्णन खूप आवडलं, आता प्रत्यक्ष गेलं नाही तरी चालेल' असं काही लिहिलं आहे. तर सांगणं एव्हडच आहे, की शब्दांत कितीही वर्णन केलं तरी प्रत्यक्ष अनुभूती प्रत्येकासाठी निराळीच असणार आहे. त्यामुळे इच्छा असेल आणि शक्य असेल तर नक्की जा. वेळ असेल तर भारताच्या बाजूनेच जा कारण सगळाच परिसर खूप सुंदर आहे.
अनयाने तयारीबद्दलची सगळी माहिती लिहिलेलीच आहे. आमची 'key learning' तिथेच लिहिन, जेणेकरून माहिती एकत्र राहील.
|| ॐ नमः शिवाय ||
समारोप.. छोटासाच नि छान
समारोप.. छोटासाच नि छान आढावा! पुर्ण प्रवासवर्णन नि फोटोही अप्रतिम!
मला जमेल की नाही शंकाच आहे पण तुम्हा दोघांच्या लिखाणामुळे आता या यात्रेला जावेसे वाटतयं
मस्त.
मस्त.
वा वा लेखमालेचं उद्यापन च
वा वा लेखमालेचं उद्यापन च झालं की ..
उत्तम समारोप!
उत्तम समारोप!
सही लिहीलायस शेवट. मधले मधले
सही लिहीलायस शेवट.
मधले मधले भाग तुटक वाचलेत. म्हणून शेवट आता वाचणार न्हवतो, पण वाचलाच. आता सगळं नीट वाचतो.
छान समारोप पराग तुम्ही परत
छान समारोप पराग
तुम्ही परत आल्यावर इथल्या हवेशी, वातावरणाशी, वेळापत्रकाशी, खाण्यापिण्याशी पुन्हा जुळवून घेताना काही खडखडाट जाणवला असेल तर त्याविषयी वाचायला आवडेल.
क्या बात है! नेटका आणि हृद्य
क्या बात है!
नेटका आणि हृद्य समारोप...आतून आलेला
आणि हो... संपूर्ण वर्णनात किमान मला तरी कुठेही पाल्हाळ जाणवलं नाही.
प्रामाणिक समारोप पराग.
प्रामाणिक समारोप पराग.
तुम्ही परत आल्यावर इथल्या हवेशी, वातावरणाशी, वेळापत्रकाशी, खाण्यापिण्याशी पुन्हा जुळवून घेताना काही खडखडाट जाणवला असेल तर त्याविषयी वाचायला आवडेल.>>>> असं होत असेल असं वाटत नाही मला समहाऊ. हां त्या वातावरणात जाऊन आलं की इथलं सगळंच फोल वाटायला लागतं, निदान माझ्याबाबतीत तरी होतं असं. आधी यावसंचं नाही वाटत मला परत
पराग, या यात्रेसाठी काही विशेष शारिरीक तयारी केली होतीस कां? हो असेल उत्तर तर कशी केलीस ते ही लिही कृपया.
हां त्या वातावरणात जाऊन आलं
हां त्या वातावरणात जाऊन आलं की इथलं सगळंच फोल वाटायला लागतं,>> हे मानसिक झालं. आमच्यासारखी लोकं एक दिवस ट्रिपला जाऊन आली तरी त्यांना नेहमीचं सगळं फोल वाटू लागतं
तरीही एक महिनाभर वेगळं पाणी, वेगळी दिनचर्या, वेगळं वातावरण, प्रदुषणविरहीत हवा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शारिरीक कष्ट याचा शरीराच्या वेळापत्रकावर काहीतरी परीणाम होतच असेल ना..
आमच्यासारखी लोकं एक दिवस
आमच्यासारखी लोकं एक दिवस ट्रिपला जाऊन आली तरी त्यांना नेहमीचं सगळं फोल वाटू लागतं >>> अगदी!!
आणि त्या दिवसभरात इतकी ऊर्जा निर्माण होते की घरी परतल्यावर लवकर झोपही लागत नाही (हे माझ्या बाबतीत २-३ तासाच्या गटगमुळे पण होतं.)
हृद्य समारोप.... नुसता
हृद्य समारोप....
नुसता कैलासातलाच नाही, तर त्या संपूर्ण देवभूमीतला ईश्वर अनुभवलात.
|| ॐ नमः शिवाय ||
अप्रतिम समारोप!
अप्रतिम समारोप!
सगळीच्या सगळी मालीकाच मस्त,
सगळीच्या सगळी मालीकाच मस्त, समारोप त्याला साजेसा....
लिखाणात पाल्हाळ असलाच तर जाणवला नाही म्हणजेच आवश्यक होता
अशा ठिकाणांहून विशेषतः हिमालयातून परत यावेसे वाटत नाही हे अगदी खरे.
|| ॐ नमः शिवाय ||
|| ॐ नमः शिवाय ||
संपूर्ण वर्णनात किमान मला तरी
संपूर्ण वर्णनात किमान मला तरी कुठेही पाल्हाळ जाणवलं नाही.<<< +१.
उलट मागेच लिहिलंय तसं या छोट्या छोट्या डीटेल्सनी जास्त मजा आली. नुअतं आम्ही गेलो, आम्ही आलो आम्हीफिरलो याऐवजी भेटलेल्या व्यक्तींची मानसिकता, त्यांचा स्वभाव, त्याचे फायदेतोटे विसंगती वगैरे अफाटरीत्या टिपलं आहे.
सुंदर लेखमाला. लिखते रहो.
lekhamaalaa faarach
lekhamaalaa faarach aavaDalI.
maraThIt shabd umaTatach naahI aahet :-|
सगळे लेख आवडले पराग!
सगळे लेख आवडले पराग!
वाह खूप सुंदर झाली आहे
वाह खूप सुंदर झाली आहे मालिका.. खूप आवडली..
दरवेळी प्रोग्राम ठरवते.. बहुतेक मनातल्यामनात.. आता प्रत्यक्षात उतरवायलाच हवंय.. ग्रेट इन्स्पिरेशनल मालिका.
धन्यवाद, पराग!!
अप्रतिम झाली आहे ही लेख
अप्रतिम झाली आहे ही लेख मालिका.. पराग, वन ऑफ युअर बेस्ट!!
मला तर शब्दच सापडत नाहीयेत, तुमच्या धाडसासाठी, तिथल्या गूढ सौंदर्यासाठी, तू इथे लिहिलेस त्या शब्दांसाठी!
मला वाटतं अशा ठिकाणी जाउन कोणी कोरडे पाषाण राहूच शकणार नाही. काहीनाकाहीतरी शिदोरी मिळेलच अनुभवांची..
पुस्तक छाप रे. मी सर्वात आधी घेईन..
दोघांनीही अप्रतिम लिहिले
दोघांनीही अप्रतिम लिहिले आहेत. यात्रा करून काय मिळवले, हा प्रश्न निरर्थक आहे कारण जे काही मिळाले ते नेमके शब्दात व्यक्त करणेच कठीण आहे.
अतिशय सुरेख समारोप. माझ्या
अतिशय सुरेख समारोप.
माझ्या विशलिस्टमध्ये आहे कैलासमानस यात्रा. जेंव्हा कधी जाणं होईल तेंव्हा केदार, अनया, तुझ्या लेखांचे पारायण नक्कीच करणार.
संपूर्ण वर्णनात किमान मला तरी कुठेही पाल्हाळ जाणवलं नाही>>>>>+१००००
हेही मस्तच रे
हेही मस्तच रे
म्ही परत आल्यावर इथल्या
म्ही परत आल्यावर इथल्या हवेशी, वातावरणाशी, वेळापत्रकाशी, खाण्यापिण्याशी पुन्हा जुळवून घेताना काही खडखडाट जाणवला असेल तर त्याविषयी वाचायला आवडेल.>>>> असं होत असेल असं वाटत नाही मला समहाऊ
>> सहमत आडो. मला तरी काहीच त्रास झाला नाही. पण एक दोघांनी हिमालयात सफर करून आल्यावर, त्यांना त्रास झाला असे त्यांनी सांगीतले. (उदा नैनीताल वगैरेला ४-८ जाऊन आल्यावर) पण मला काही त्रास अनेकदा नॉर्थ मध्ये फिरूनही झाला नाही.
मस्त लिहिलं आहेस पराग.
सुरेख addendum.
सुरेख addendum.
मस्त!
मस्त!
अनया ची लेख मालिका वाचल्यावर
अनया ची लेख मालिका वाचल्यावर कैलास मानसरोवर माझ्या विशलिस्ट मध्ये जमा झालं होतं ,आता तुमची लेख मालिका वाचल्या वर तर नक्किच जायचं आणि लवकर जायचं हे पक्क झालंय.
बाकी तुमचं लिखाण एकदम साधं , सोप्प आणि सहज आहे. कुठे ही कसलं ही अवडंबर नाही आणि पाल्हाळ तर नाहिच नाही.
समारोपदेखिल सुंदर झालाय.
समारोपदेखिल सुंदर झालाय.
नेटका आणि हृद्य समारोप...आतून
नेटका आणि हृद्य समारोप...आतून आलेला >> +१
सगळे लेख मस्तच जमले आहेत
नेटका आणि हृद्य समारोप...आतून
नेटका आणि हृद्य समारोप...आतून आलेला >> +१
सगळे लेख मस्तच जमले आहेत
धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही
धन्यवाद सगळ्यांना.
तुम्ही परत आल्यावर इथल्या हवेशी, वातावरणाशी, वेळापत्रकाशी, खाण्यापिण्याशी पुन्हा जुळवून घेताना काही खडखडाट जाणवला असेल तर त्याविषयी वाचायला आवडेल. >>>>> असं काही फारसं झालं नाही. सकाळी लवकर जाग यायची न चुकता चार-साडेचारच्या आसपास. जीवनात आता काही करण्यासारखं उरलच नाही छापाचं फीलींग थोडें दिवस होतच.. पण त्रास वगैरे नाही झाला काही..
पराग, या यात्रेसाठी काही विशेष शारिरीक तयारी केली होतीस कां? हो असेल उत्तर तर कशी केलीस ते ही लिही कृपया. >>>>> हो तयारी करावीच लागते. चालण्याचा सराव महत्त्वाचा.. तो ही डोंगरावर. ह्यासाठी मी जवळ जवळ वर्षभर दर शनिवारी सकाळी सिंहगडावर जायचो. पहिल्यावेळी गेलो तेव्हा सव्वातास लागला नंतर नंतर तो वेळ पाऊणतासापर्यंत खाली आणला..वीक डेजना साधारण चार ते पाच किलोमिटर चालायचो.. आमच्या इथे बरेच चढ उतार आहेत. कधीकधी घरासमोरच्या टेकडीवर जायचो.. अधेमधे सायकलिंग सुरू होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या सवयींना जरा शिस्त आणली. आबरचबर खाणं कमी केलं आणि संध्याकाळचं लवकर म्हणजे सात वाजता करायला सुरूवात केली. त्याने बराच फरक पडला एकंदरीत पचन आणि वजनावर असं वाटलं.
Pages