पुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू

Submitted by मामी on 8 November, 2014 - 05:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

या प्रकारात मापं देणं कठिण आहे आणि खरंतर गरजही नाही. थोडं इकडं तिकडं झाल्यानं काही फरक पडत नाही.

मी जरी 'स्ट्यू' असं लिहिलं असलं तरी ते केरळी नाव नाही. केरळमध्ये त्या पदार्थाला 'इश्टु' म्हणतात. अर्थात तो 'स्ट्यू' चाच अपभ्रंश आहे हे उघड आहे.

कडला करी :

भिजवलेले हरभरे, कांदा बारीक चिरून ( ऑप्शनल), कढिपत्ता, गरम मसाला (मी बादशहाचे गरम मसाला आणि नबाबी मटण मसाला वापरले आहेत.), तेल, मोहरी, जिरे, हिंग, धणे-जीरे पूड, हळद, तिखट, मीठ.

कडला करी डायरेक्ट कुकरमध्ये केलेली चांगली. नेहमीपेक्षा मोठ्या कुकरमध्ये करावी कारण जरा जास्त पातळ करावी लागते. नेहमीच्या हरभर्‍याच्या आमटीच्या दुप्पट पाणी घालून हरभरे अगदी पूर्ण शिजतील इतक्या वेळ शिजवावी.

पोटॅटो स्ट्यू :

बटाटे, कांदे, आलं, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, नारळाचे दूध, मीठ. स्ट्यू करता जरा जास्तच आलं घ्यावं. त्याची चव स्ट्यूमध्ये मस्त उतरते.

बटाटे सोलून त्याचे बारीक क्यूब्ज कापावेत. कांद्याचेही त्याच आकाराचे तुकडे कापावेत. हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापाव्यात. आलंही स्वच्छ धुऊन अगदी बारीक कापावे. किसलेलं, वाटलेलं आलं नको. ती नेमकी चव येत नाही. नारळाचे दूध काढून ठेवावे.

पुट्टु :

पुट्टु पोडी ( तांदळाचे पीठ), काळ्या मिरीची पूड, खोवलेलं खोबरं, मीठ.

दाक्षिणात्य दुकानांतून पुट्टु पोडी नावाची पावडर मिळते. मुंबईत माटुंग्याला मिळते. पुट्टु पोडी म्हणजे तांदळाचे रवाळ पीठ. माटुंग्याला पांढर्‍या तांदळाची अथवा केरळच्या लाल तांदळाची अशी दोन्ही प्रकारची पुट्टु पोडी मिळते. ती नसेल तर साधे तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल.

माझ्याकडची पुट्टु पोडी संपली होती. म्हणून तांदळाच्या पीठाची शोधाशोध करताना इडलीचा रवा आणि लाल ब्रोकन राईस मिळाले ते वापरले. ब्रोकन राईस म्हणजे गव्हाच्या लापशीसारखे जाड असे तांदळाचे तुकडे. हा ब्रोकन राईस मी काहीवेळाकरता (१० मिनिटे) भिजत ठेवला. जेमतेमच पाणी घातले कारण पुट्टुचे पीठ भिजवायला अगदी कमी पाणी लागते.

क्रमवार पाककृती: 

कडला करी :

कुकर गॅसवर ठेऊन गॅस सुरू करा. तेल घालून ते गरम झाल्यावर मोहरी-जिरे आणि मग हिंग घाला. त्यात (वापरणार असलात तर) बारीक चिरलेला कांदा घालून जरा परता. मग भिजलेले हरभरे, कढिपत्ता, हळद, तिखट, धणेजिरे पूड, मीठ वगैरे घालून एक मिनिट परतून मग पाणी घाला. त्यात मग मसाला/ले घालून, जरा ढवळून मग कुकरचे झाकण बंद करा. मध्यम आंचेवर कडला करी शिजू द्या. चांगल्या ८-१० शिट्या करा म्हणजे हरभरे व्यवस्थित शिजून मऊ होतील.

कडला करी मध्ये आलं किंवा लसूण वापरण्याची गरज नाही. आवडत असेल तर वापरायला हरकत नाही. बाकी इतर पदार्थ करण्याच्या निदान एक तास आधी कडला करी करत ठेवावी. ती व्हायलाही जास्त वेळ लागेल आणि झाल्यावर वाफ निघून मग कुकर उघडला जाण्यासही वेळ लागेल हे लक्षात ठेवावे.

पोटॅटो स्ट्यू :

एका भांड्यात स्ट्यूचे सर्व जिन्नस एकत्र करा. बटाटे, कांदे, मिरच्या, आलं, कढिपत्ता आणि मीठ एकत्र करून त्यात हे सर्व बुडतील इतके पाणी घाला. त्यावरही आणखी दोन कप पाणी जास्त घाला. मग हे भांडं गॅसवर ठेऊन गॅस मध्यम ठेऊन शिजू द्यात. झाकण ठेऊ नका. ठेवलेच तर वाफ जायला थोडी जागा ठेवा कारण नाहीतर पाणी उकळून बाहेर येतं. अर्ध्यातासात बटाटे अगदी छान शिजतील. ते चमच्याने थोडे थोडे दाबून फुटू द्यात. मग त्यात हवे तेवढे नारळाचे दूध घालून व्यवस्थित ढवळून एक उकळी येऊ द्या.

शिजलेले स्ट्यू - नारळाचे दूध घालण्याआधी:

पुट्टु :

पोटॅटो स्ट्यू करत ठेवला की पुट्टु कडे वळा.

सगळे जिन्नस एका परातीत घेऊन त्यात अगदी थोडे थोडे असे ५-६ चमचे पाणी घेऊन एकत्र करा.

पाणी इतकं कमी घालायचं की पीठ सुटं सुटंच राहिलं पाहिजे.

पुट्टु शिजवण्यासाठी पूर्वी बांबूचा वापर केला जाई. आता स्टील अथवा पितळेची सिलिंडर्स मिळतात. हे पुट्टु मेकर. माटुंग्याहूनच आणलंय.

पुट्टुच्या मूळ रेसिपीमध्ये खवलेलं खोबरं तांदळाच्य पीठात एकत्र करत नाहीत. सिलिंडरमध्ये भरताना थोडं खोबरं- बरंच तांदळाचं मिरीपावडर आणि मीठ घालून भिजवलेलं पीठ - पुन्हा थोडं खोबरं - पुन्हा तांदळाचं पीठ - शेवटी पुन्हा खोबरं अशा क्रमाने भरतात. पण हे सगळं आधीच एकत्रं करायचं ही माझी अ‍ॅडिशन आहे.

या खालच्या भांड्यात पाणी घालून गॅसवर ठेवायचे. मग या मधल्या सिलिंडमध्ये तयार केलेली पुट्टुची पावडर चमच्याने सुट्टी सुट्टीच भरायची. दाबून अजिबात भरू नका.

हे सिलिंडर मग त्या भांड्यावर लावून त्यावर झाकण लावायचे. सिलिंडरमध्ये खालच्या बाजूला जाळी असल्यामुळे भांड्यातील पाण्याची वाफ वरच्या सिलिंडरमध्ये येते आणि त्या वाफेवर पुट्टु शिजतं. झाकणालाही वाफ जाण्यासाठी भोकं असतात. शिजल्यावर पुट्टु एकसंध निघतं. ते सुरीनं कापून मग वाढायचं.

माझ्या ब्रोकन राईसमुळे तयार झालेलं पुट्टु अगदी पूर्ण एकसंध राहिलं नाही. कदाचित पाणीही जरा कमी पडलं असण्याची शक्यता आहे.

पुट्टु मेकर नसेल तर मोदक पात्रात जाळीवर छोट्या छोट्या वाट्यांतून पुट्टुचं पीठ भरून वाफवता येईल. किंवा थोडं पाणी जास्त घालून हातानेच मुटके वळून ते मोदक पात्रातून अथवा कुकर ला शिटी न लावता वाफवता येतील.

गरमागरम पुट्टु, कडला करी आणि स्ट्यू तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
अंदाज अपना अपना
अधिक टिपा: 

टीपा :

एखाद्या दिवशी ब्रंचकरता हा प्रकार छान होतो.

आवडत असल्यास कडला करी आणि स्ट्यू शिजल्यावर वरून खोबरेल तेल घालू शकता.

हे स्ट्यू इतर काही भाज्या वापरूनही करता येतं उदा. गाजर, फ्लॉवर, फरसबी इ.

हे स्ट्यू इडली, डोसे, अप्पम बरोबरही अप्रतिम लागतं.

नुसतं सूप म्हणून प्यायलाही छान लागतं.

माहितीचा स्रोत: 
केरळी मैत्रिण, अथिरापल्लीचा खानसामा
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! फोटोमूळे छान समजंतय. केरळी मित्र याची फारच तारीफ करत असत, म्हणून एकदा त्यापैकी एकालाच करुन आणायला सांगितले होते.. खाऊन बरीच वर्षे झाली त्याला. पण चव आठवतेय अजून.

मामी मस्त, बरेच दिवस पुट्टू केले नाही, बघितल्याक्षणी करावेसे वाटले..
कडला करी म्हणजे हरब-यांचे कढणच आहे, मस्त नक्की करणार!

झकास आणी स्टेप बाय स्टेप भन्नाट कृती. मामी तुमच्या रसिकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच, कारण तुम्ही जीवनाचा आस्वाद पण, आल्याचा चहा कसा चवीचवीने प्यावा तसा घेता.:स्मित: ( आल्याच्या चहा ऐवजी जायफळ्+वेलची घातलेली फिल्टर कॉफी घातली तरी चालेल.)

ही हरबर्‍याची कडला करी तमिळ मैत्रिणीकडे खाल्ली होती. आता तुमची रेसेपी बघुन ती आठवली. ते पुट्टुचे भान्डे पण मस्त दिसतेय.

आता इथे झुमरितलैय्या मधे पुट्टूमेकर शोधणं आलं. ब्रोकन राईस ऐवजी कुसकुस वापरलेला चालेल का?

धन्यवाद सगळ्यांना.

रश्मी, Happy

पिन्की, यात कुठे आहे हो मेहनत? मेहनत असती तर मी केलंच नसतं. तुम्ही तर मलाही टशन देताय की! Proud

इब्लिस, ब्रोकन राईस घातलाच पाहिजे असं नाही. मूळ पाककृतीत केवळ तांदळाचे रवाळ पीठ असते. त्याऐवजी आपल्या घरी असते ते बारीक पीठ वापरले तरी चालते. मी आपलं असंच सुगरणपणा दाखवायला इडली रवा आणि ब्रोकन राईस वापरला. खपून गेलं. त्यामुळे तुम्हीही कुसकुस वापरून बघा. चालून जाईल. कोणा केरळ्याला सांगू नका म्हणजे झालं. आणि पुट्टुमेकरला पर्याय लिहिलाय की वर मी.

आता उद्याला पुट्टू करणं आलं. आमच्याकडं हे पुट्टू गोडेघाशे लोक ओलं खोबरं आणि साखर घालून खातात. Happy

स्ट्यु केलं तर जास्त करून आप्पमसोबत केलं जातं. पुट्टूसोबत करीच हवी.

भारी आहे. कडला करी माहिती होती. बाकी दोन पदार्थ ऐकून सुद्धा माहिती नव्हते.

कुकर गॅसवर ठेऊन गॅस सुरू करा >>> फार महत्वाची स्टेप Happy

झकास पाकृ! फोटोजही मस्तच... ते हरबर्‍याचं कढण तर तसही खायला मस्त लागेल. पुट्टू तर कठीण आहे मला करणं पण बाकी दोन करून पाहाणेत येतील. पुट्टू नाही तर वाफाळत्या राईस बरोबर ही करी अन स्ट्यू मस्त लागेल असं वाटतंय... Happy

मामी,

ग्रेट रेसीपी,

पुट्टु पोडी म्हणजे तांदळाची जाडसर पिठी :

सर्वसाधरणपणे केरळ मध्ये चोमन्न पोडी (तांबडी पुड = तांबडा उकडा तांदुळाची पिठी ) वापरतात,

केरळातील पद्धती प्रमाणे " स्टू" हा अप्पम बरोबर सर्व केला जातो तर "पुट्टू" कडला करी बरोबर,

पण दुसरे काँबिनेशन ही चालतातच, जस अप्पम व चिकन करी,

हे खातात कसं. भात खातो तसे कालवण घालून कालवून? की एक चमचा पुट्टु आणि एक एक चमचा वाटीतील द्रव पदार्थ?

मस्त पण जरा खटपटीची रेसिपी. >>> नाही गं सायो. अजिबातच खटपटीची नाहीये. खवलेलं खोबरं आणि नारळाचं दूध तयार असेल तर काम एकदम सोपं आहे.

केरळातील पद्धती प्रमाणे " स्टू" हा अप्पम बरोबर सर्व केला जातो तर "पुट्टू" कडला करी बरोबर, >>> हो विवेक नाईक. बरोबर. मी आज लंचला केलं होतं म्हणून करी आणि स्ट्यू असं दोन्ही केलं.

हे खातात कसं. भात खातो तसे कालवण घालून कालवून? की एक चमचा पुट्टु आणि एक एक चमचा वाटीतील द्रव पदार्थ? >>> सुमेधा, दोन्ही प्रकारे चालेल. Happy

मस्त बेत. मला हे पुट्टू थोडे कोरडे वाटतात. अर्थात, कधी घरी करुन बघितले नाहीत. घास अडकतो कितीही करी घालून घेतली तरी. तुमचे soft झाले का पुट्टू ?

इंटरेस्टिंग. फोटो आणि कृती दोन्ही मस्त. सगळे पदार्थ आज पहिल्यांदाच पाहिले Happy
पोटॅटो स्ट्यू नक्की केला जाईल. बाकीचं कधी ते माहीत नाही.

घास अडकतो कितीही करी घालून घेतली तरी. >>> म्हणून मी करी खूप पाणीदार करते. मग पुट्टु सुकं लागत नाही. शिवाय खोबरंही जरा जास्त घालायचं.

मामी, फोटो मस्त..
आजच कडला करी, अप्पम आणि इतर साग्रसंगीत जेवण झालं (अर्थातच रेस्टॉरंट्मध्ये Wink )

Pages