हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना

Submitted by श्यामली on 9 November, 2011 - 11:57

हितगुज दिवाळी अंक २०११ वर दिलेल्या अभिप्रायांसाठी सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद.

यंदाचा हितगुजचा हा बारावा अंक. संपादक आयडीने एक धन्यवादाची पोस्ट टाकून दिवाळी अंक हे प्रकरण माझ्यापुरतं संपवता आलं असतं . पण मायबोलीशी असणारं नातं हे त्यातून असं सहज बाहेर पडू देत नाही. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

आमच्याकडे आलेलं उत्तम साहित्य बघून आपण (मायबोलीकर) अजून चांगला अंक देऊ शकतो असं जाणवल. त्यासाठी जुन्या जाणत्यांच मार्गदर्शन आवश्यक आहेच, हे ही जाणवलं. नवीन मंडळींच्या नव्या कल्पनांना जुन्या जाणत्यांच्या सूचना, सल्ले याची साथ असेल तर पुढे येणारे अंक अजून चांगले होतील यात शंका नाही.

आम्हाला आलेल्या अडचणी त्यातून शोधलेली वाट, हे सगळं फक्त मी इथे लिहिण्यात काहीच हशिल नाही. यंदाच्या संपादक मंडळातल्या सगळ्यांनीच त्यांचे त्यांचे अनुभव इथे लिहावे, सुधारणा करता येण्यासारख्या असतील त्याही इथे लिहाव्या.

पुढील अंकांच्या सुधारणेसाठी काय करायला हवं, हे आजवरच्या सगळ्या संपादक मंडळातील मंडळींनी पण इथे लिहावं.

मला सुचलेले काही मुद्दे.
१) अंकाच काम अजून जरा लवकर सुरु करायला हवं
२) तांत्रिक बाजू सांभाळणारी एक स्थायी समिती आपल्याकडे असावी.
३) टेस्टिंगसाठी मंडळाच्या बाहेरची एक समिती असावी.
४) अंकासाठी जनसंपर्क विभाग वेगळा असावा (किमान ३-४ लोक तरी यात असावेत)
५) मुद्रित शोधनासाठी तांत्रिक उपलब्धता असेल तर वेळ आणि श्रम कमी लागतील
६) अंकाच प्रकाशन ऐन दिवाळीत न करता जरा आधीच करावं.

फेसबुकवर आलेली एक विचारणा अशी की, अंक बाजारात केंव्हा येणार (गो, अ‍ॅडमिन Happy )
माध्यम प्रायोजक हितगुज दिवाळी अंकासाठी काम करणार का? Happy

सध्या तरी एवढच.. सुचेल तसं इथे लिहिन.
अंक अजून चांगला कसा होईल केवळ एवढ्याचसाठी इथे लिहावं . अवांतर वाद-विवादांसाठी इतर अनेक बातमी फलक आहेत.

विषय: 

वरचा दिवाळी अंक हेवी असण्याचा व त्याचा दबदबा वाटण्याचा मुद्दा पटतोय.
मायबोलीवर जसे साहित्य अधिक वाचले/लिहिले जाते, त्याला दिवाळी अंकात स्थान मिळायचे नाही असे लेखक /वाचक दोघांनाही वाटत असल्याने दुर्लक्ष होत असण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्यांनाच दिवाळी अंकातून काही ना काही मिळेल असे पाहायला हवे. पण मग लगेच चाळण लागली नाही असाही प्रतिसाद येणार, यंदाही (नेहमीसारखाच) आलाय बहुतेक.

जाहीराती नकोत अजिबात. इम्युन होत चाललंय पब्लिक त्याला. तीस तीस पोस्टी पडूनही वर दिसणार्या पोस्टरबद्दल अक्षर नसते. >>> अगदी अगदी.

माझ्या सुचनेनुसार फारसे एक्स्ट्रा काम न पडताही व्हिजिबिलिटी वाढेल.

मायबोलीवर जसे साहित्य अधिक वाचले/लिहिले जाते, त्याला दिवाळी अंकात स्थान मिळायचे नाही असे लेखक /वाचक दोघांनाही वाटत असल्याने दुर्लक्ष होत असण्याची शक्यता आहे. तेव्हा सगळ्यांनाच दिवाळी अंकातून काही ना काही मिळेल असे पाहायला हवे. >>>> +११

दिवाळी अंक काढण्यापेक्षा 'दिवाळी उत्सव' साजरा करता येईल.

यात एखाद्या आधीच घोषित केलेल्या विषयावर कथा, लेख, कविता वगैरे दिवाळीच्या दिवसात प्रकाशित करता येतील. काही हलकेफुलके खेळ, स्पर्धा वगैरे घेता येतील. गणेशोत्सवाप्रमाणे पण वेगळ्या दृष्टीकोनातून. दिवाळी उत्सवातच मभादि किंवा इतर लेखनस्पर्धा वगैरे मर्ज करता येतील.

यामुळे मायबोलीवर उत्सवांची मांदियाळीही होणार नाही आणि कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त आउटपुट आणि प्रतिसादही मिळतील.

चाळणीसाठी आयडिया सुचली आहे "बंद /उघड्या खिडकी"ची.
घोषणेनंतर पहिल्या ५ कथा, कविता आल्या की संपादक कचेरीची खिडकी बंद होईल. मग इतर कामे झाली की पुन्हा रँडमली पंधरावीस दिवसांनी खिडकी उघडेल. तेव्हा पुन्हा नव्या पहिल्या ५ कथा, लेख, कविता स्वीकारल्या जातील. कोणताही विषय, साहित्य दर्जाची चाळण नाही. विविध प्रकारचे व अनेक उत्साही लोकांचे लेखन वाचायला मिळेल. दिअं साठी लेखन पाठवताना लेखक जागरूक असावेत हे गृहीतक आहे, अर्थात. Happy

एक सर्व्हे काढायला हवा. तुम्ही मायबोली दिवाळी अंक का वाचत नाही असा? लॉगिन केल्यावर सर्व्हेतल्या प्रश्नांना उत्तरे दिल्याखेरीज पुढची दारे उघडणार नाहीत अशी (गैर) सोय ठेवून.

नाय नाय मयेकर. मायबोलीचे लोकशाही धोरण अशी कोणतीच सक्ती कधी करत नाही. बारा हजार+ सदस्यांनी अंक वाचलाच पाहिजे हा हट्ट वेडेपणा होईल.
मामी, हितगुज दिअं म्हणजे मायबोलीचा मुकूटमणी वगैरे जोरदार इतिहास परंपरा ल्यायलेला आहे. ती संकल्पनाच बरखास्त करण्यापेक्षा त्याची पद्धत, अप्रोच बदलून बघायला हवा.

चला, दिवाळी अंकाची दैदिप्यमान परंपरा चालू राहिलेली आहे.

१. अंक वेळेत का आला नाही?
२. अंकांमध्ये अमुक डीझाईन का वापरले?
३. लोकांनी साहित्य का पाठवले नाही?
४. लोकांनी अंक का वाचलाच नाही..

अशा चर्चा दर वर्षी होत असतात. (आम्ही पण हिरीरीने त्यात भाग घेतोच!) सध्या अजून बराच अंक वाचायचा शिल्लक असल्याने चर्चेत तूर्तास सहभागी होणार नाहीये.

पण साहित्य का पाठवले नाही यावर बरंच काही लिहिण्याचा मानस आहे.

नंदिनी, Lol खरं आहे. ही एक वार्षिक रिच्युअल झाली आहे.

पण साहित्य का पाठवले नाही यावर बरंच काही लिहिण्याचा मानस आहे. >>> लिही की गं.

मी आता यापुढे नाही पाठवलं तर त्यामागे व्हिजिबिलिटी हाच एक मुद्दा असेल. कारण 'गंध' चं कथानक बरंच आधी सुचूनही दिवाळी अंकात देण्यासाठी म्हणून थांबले. त्यावर कथा लिहून मायबोलीवर टाकली नाही. आता असं करण्यात अर्थ नाही असं वाटतंय.

त्याआधी अर्थात 'मुळात काही बरंसं सुचलंच नाही' हा मुद्दा मोडीत निघाला पाहिजे.

मी आता यापुढे नाही पाठवलं तर त्यामागे व्हिजिबिलिटी हाच एक मुद्दा असेल. >>>> ते तर झालंच.

मी ही खालची पोस्ट लिहत आहे ती केवळ माझ्यासंदर्भामध्ये इतर लेखक लेखिकांचे काही वेगळे फंडे असल्यास मला माहित नाही. माझेच काही गैरसमज झालेले असल्याचीदेखील शक्यता आहे. संपादक मंडळांमधील केवळ एक सदस्यानं माझ्याशी संपर्क साधला होता पण तेव्हा खूप उशीर झाला होता आणि मला जे साहित्य अभिप्रेत होतं ते मायबोली धोरणामध्ये बसलं नसावं (पण त्याबाबत काहीही क्लेआर कम्युनिकेशन संपादक मंडळाकडून झालेले नाही,. हे इथे आठवणीनं नमूद करते आहे. प्लीज नोट! किमान "जमणार नाही" एवढं तरी सांगायचे कष्ट घ्या.)

यंदाच्या दिवाळी अंकाची धूमशान फार लवकर चालू झाली, आणी ते एका अर्थानं बरंच होतं. मागच्या वर्षी माझी अजिबात प्रूफ रीड न केलेली कथा जशीच्या तशी छापलेली पाहून फार वाईट वाटलं होतं (यावर कुणी तुम्हीच स्वतःची कथा प्प्रूफ रीड का करून पाठवत नाही असा प्रश्न विचारल्यास उत्तर दिले जाईल. तर ते असो)

त्यामुळे यावर्षी लवकर दिवाळी अंकाचे ढोल वाजायला लागल्यावर फार बरं वाटलेलं. मी मागेच सुचलेलं एक कथानक खास दिवाळी अंकासाठी ठेवून दिलं होतं. मागच्या दोन दिवाळी अंकामध्ये माझ्या कथा "एक रात्र आणि दोन पात्रं" Proud अशा होत्या. तर तिसरी कथा पण साधारण त्याच धर्तीची होती. म्हणून दिवाळी अंकासाठी विचार करून ठेवली होती.

पण... अंकांच्या जाहिराती आल्यावर भयाकथा, विज्ञानकथा, गूढकथा वगैरेच हव्या आहेत हे समजलं> आपल्या लिखाणाची उडी त्या बाजूला जात नाही. म्हणजे झालंच!!! शिवाय यंदाच्या दिवाळी अंक संपादकांचं एकूणच "हम कुछ अलग करेंगे" टाईप वातावरण आणि इकडल्यातिकडल्या बीबींवरच्या पोस्ट्स पाहिल्यावर आणि लवकरातली डेडलाईन पाहून मी लिहायचा बेतच बारगळला. कथा रीजेक्ट व्हायची भिती नव्हती (झाली असती तर गुलमोहर होतंच की!!!) पण आपण जे लिहितो त्या जॉनरच्या कथा अपेक्षितच नसतील तर लिहायच्या कशाला? असा साळसूद विचार केला आणि कथा पाठवली नाही.

बाकी, इतर लेखनप्रकारांसाठी जर मला "तू यावर लिहू शकशील का?" असं कुणी विचारलं असतं तर नक्की काही तरी योगदान दिलं असतं. यापूर्वी जेव्हा कधी मायबोली दिवाळी अंकाला वैचारिक टाईप लेख दिले आहेत ते अशा चर्चेमधूनच. पण यंदा तसं काहीच बोलणं न झाल्यामुळं मी त्याचा विचार केला नाही. कदाचित संपादकांना हवे तसे लेख मिळाले असावेत असं वाटलं. त्यामुळं त्या विभगांचा विचारच केला नाही.

दुसरा मला अत्यंत जाणवलेला मुद्दा म्हणजे डेडलाईन एक्स्टेन्शन. परत एकदा... यंदाच्या दिवाळी अंकाला खूप वेळ असला तरीही त्यांनी दिलेली पहिली डेडलाईन फार लवकर दिली होती आणि त्यादरम्यान मला लिहिणं शक्य नव्हतं. नंतर डेडलाईन एक्स्टेण्ड होत राहिल्या तरी मी मुळात सुरूवातच न केल्यानं नंतरच्या अठ दिवसांत लिहिणं शक्य झालं नसतं.

त्यामुळे यंदाच्या दिवाळी अंकामध्ये प्रचंड इच्छा असूनही सहभागी होता आलं नाही.

धन्यवाद.

दिवाळी सुमारास एक तर लोक्स सुट्टी ला जातात व हार्ड कॉपी स्वरूपातच इतके नवे दिवाळी अंक वाचायला असतात कि नेट वरच एकूण वावर कमी होतो. मी १५ अंक विकत घेतले आहेत दर वीकांताला एक एक वाचते. वेळ मिळेल तसे. त्यात फॅमिली कमिट मेंट पार्ट्या वगैरे असतात ह्या सीझन मध्ये. त्यामुळे कमी वाचले जास्त असेल. मग हपिसात परत आल्याव्र कामाचे प्रेशर एखादा वीक जास्त असते. तो परेन्त अमेरिकेत थँक्स गिविन्ग लाँग वीकांताला लोक्स बाहेर जातात व मग तिथला पार्टी सीझन सुरू होतो. ऑन लाइन चार पाच तरी दिव. अंक वाचयचे पेंडिंग आहेत.

अंकांच्या जाहिराती आल्यावर भयाकथा, विज्ञानकथा, गूढकथा वगैरेच हव्या आहेत हे समजलं> आपल्या लिखाणाची उडी त्या बाजूला जात नाही. म्हणजे झालंच!!!
>>>
याला बरचंस अनुमोदन!
म्हणूनच या वेळेला कथा फार कमी आहेत का दिवाळी अंकात?

दिवाळी अंकाचे विभाग करण्यापेक्षा.. एखाद्या विषयाला अनुसरून साहित्य मागवावे. त्या विषयाला अनुसरुन काहिही कविता, कथा, लेख, चित्रे... ! प्रत्येकजण आपापल्या परीने त्या विषयाचा विचार करून लिहिलंच.
विषय निवडण्यात खरे कौशल्य दाखवावे लागेल.

अंकांच्या जाहिराती आल्यावर भयाकथा, विज्ञानकथा, गूढकथा वगैरेच हव्या आहेत हे समजलं
>>>> असं काही कुठे म्हटलं होतं? या कथाही चालतील असं लिहिलं होतं ना? या प्रकारातील साहित्य काहीसं उपेक्षित आहे म्हणून त्यांचा खास उल्लेख केला गेला होता असं मला तरी वाटतं.

शोधलं!

>>>> मराठी अर्वाचीन साहित्यात उत्तमपणे रुजून सर्वांत जास्त फोफावलेला साहित्यप्रकार म्हणजे लघुकथा. लिमये, नाथमाधव यांच्यापासून सुरू झालेली ही वेल गोखले, गाडगीळ, मोकाशी, माडगूळकर, शंकर पाटील, दळवी, जीए, पानवलकर, गौरी देशपांडे, विद्याधर पुंडलिक, मतकरी, राजन खान, मेघना पेठे, प्रज्ञा दया पवार, मनस्विनी लता रवीन्द्र, हृषिकेश गुप्ते अशी वळणे घेत जोमाने वाढते आहे. संपन्न कथांशिवाय दिवाळी अंक सजणे अशक्यच. म्हणूनच या वर्षीचा आपला दिवाळी अंक तुम्हां सिद्धहस्त कथालेखकांची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. इतर कथाप्रकारांबरोबरच हितगुज दिवाळी अंकात आजवर क्वचितच वाचनात आलेल्या विज्ञान-गूढ-रहस्य-भय इत्यादी कथाप्रकारांचे स्वागत आहे! >>> हे असं आहे. सगळ्या प्रकारच्या लघुकथा मागवल्या होत्या.

मामी, वेगवेगळ्या बीबींवर ज्या जाहिराती आल्या त्यामध्ये फोकस फक्त याच कथांवर होता, आणि ते मला जमणारं नसल्यानं मी फार विचार केलाच नाही.

ओह. ओके. हायला मी इतकं काही सखोल परिक्षण केलंच नाही. जे कथानक डोक्यात होतं त्यावर कथा लिहिली. गाजराची पुंगी! दिवाळी अंक नही तो गुलमोहोर सही! मागच्या वर्षी तेच केलं होतं मी. Proud

घोषणेतलं वाक्य : इतर कथाप्रकारांबरोबरच हितगुज दिवाळी अंकात आजवर क्वचितच वाचनात आलेल्या विज्ञान-गूढ-रहस्य-भय इत्यादी कथाप्रकारांचे स्वागत आहे!

या घोषणेवरच्या प्रतिसादांत संपादकांचं स्पष्टीकरण : ललितलेखांचा विषय शक्यतो घोषणा धाग्यावर दिलेल्या विषयांशी निगडीत असावा. परंतु स्वतंत्र विषयावरील लेखही योग्य वाटल्यास स्वीकारला जाऊ शकतो. कथा / कविता व किशोरविश्व विभागांसाठी मात्र विषयाचे बंधन नाही.

नंदिनी :
बाकी, इतर लेखनप्रकारांसाठी जर मला "तू यावर लिहू शकशील का?" असं कुणी विचारलं असतं तर नक्की काही तरी योगदान दिलं असतं. यापूर्वी जेव्हा कधी मायबोली दिवाळी अंकाला वैचारिक टाईप लेख दिले आहेत ते अशा चर्चेमधूनच. पण यंदा तसं काहीच बोलणं न झाल्यामुळं मी त्याचा विचार केला नाही. कदाचित संपादकांना हवे तसे लेख मिळाले असावेत असं वाटलं. त्यामुळं त्या विभगांचा विचारच केला नाही. >>>>>> हे नाही पटले! लिहिण्यासाठी संपादकांनी व्यक्तिशः अक्षत घेऊन यायची का वाट पहायची ? लिहावेसे वाटते तर लिहावे!!

यंदा घोषणेवरून मला तरी असे नाही वाटले की फक्त गूढकथाच हव्या होत्या

मी ही खालची पोस्ट लिहत आहे ती केवळ माझ्यासंदर्भामध्ये इतर लेखक लेखिकांचे काही वेगळे फंडे असल्यास मला माहित नाही. माझेच काही गैरसमज झालेले असल्याचीदेखील शक्यता आहे.

मूळ पोस्टमधलं हे वाक्य वाचलंय का?

इतर लेखनप्रकारांसाठी जर मला "तू यावर लिहू शकशील का?" असं कुणी विचारलं असतं तर नक्की काही तरी योगदान दिलं असतं.

>>> खरंच नंदिनी. या विधानामागे इतर काही संदर्भ नसेल तर कोणी वैयक्तिक विचारणा करण्याची वाट बघण्याची गरज नाही. घोषणा म्हणजेच आवाहन असतं ना लिखाण देण्यासाठी. विपु मधून एकदाच हलकेफुलके करता लिहिण्याची विपु संपादक मंडळातील एकीकडून आली होती. ती देखिल अशी बर्‍याच जणांना केली असणार. आपल्याला स्वतंत्र विचारणा होण्याची वाट का बघायची?

ऑनलाईन दिवाळी अंक किंवा खरा दिवाळी अंक हातात पडल्यावर माझा पहिला फोकस असतो तो म्हणजे कथा. त्याच कमी असतील तर अंक परत हातात धरवत नाही, निदान काही काळाकरता. दुसरं काही वाचण्यासारखं नसेल तेव्हाच पुन्हा अंकाकडे वळलं जातं. ह्या वर्षीच्या अंकात गोष्टी नाहीतच. मोजून पाच. त्या वाचल्या, दोन दिवाळी संवाद वाचले. आणखीन एक दोन काहीबाही लेख वाचले. चित्रं सगळीच आवडली. मेंडकावरची चित्रं मस्तच. पण सल्ले अतिशय पाल्हाळिक. त्यामुळे ते स्कीप केले. पुन्हा काही दि अंकावर फिरकावंसं वाटलं नाही.
माझ्यामते थीम हा प्रकारही बाद करावा. सगळ्यांनाच त्या साच्यातलं लिहायला जमेल असं नाही. वरची बरीच सजेशन्सही पटण्यासारखी आहेत.
>> वाटलं. त्यामुळं त्या विभगांचा विचारच केला नाही. >>>>>> हे नाही पटले! लिहिण्यासाठी संपादकांनी व्यक्तिशः अक्षत घेऊन यायची का वाट पहायची ? लिहावेसे वाटते तर लिहावे>> सहमत.

>> माझेच काही गैरसमज झालेले असल्याचीदेखील शक्यता आहे.
>> मूळ पोस्टमधलं हे वाक्य वाचलंय का?

हो - तसे ते झालेलेच आहेत असं वाटतंय.

माझेच काही गैरसमज झालेले असल्याचीदेखील शक्यता आहे.
>> मूळ पोस्टमधलं हे वाक्य वाचलंय का?

>>>> हो वाचले पण " संपादक मंडळांमधील केवळ एक सदस्यानं माझ्याशी संपर्क साधला होता " आणि " जर मला "तू यावर लिहू शकशील का?" असं कुणी विचारलं असतं तर नक्की काही तरी योगदान दिलं असतं." या दोन वाक्यावरून तरी असेच दिसतेय की एकाने नव्हे तर सगळ्या संपादकांनी विनवण्या/ अक्षता वगैरे आणणे अशी काही तरी स्पेशल ट्रीटमेन्ट हवी होती का ??? हा नक्की कुणाचा कसला गैरसमज ?

असो पण हे लिहिले तेही बरेच झाले एका प्रकारे. इथे नियमित लिहिणारे नेहमी लिहीत असून,माहेर इ . मधे लिहून हितगुज दिअं मधे मात्र का लिहीत नाहीत त्याची उत्तरे तरी समोर येत आहेत.

कोणीतरी लिहिलेला स्कोअर सेटल करण्याचा मुद्दा पण मला महत्त्वाचा वाटला.
पण हा मुद्दा संपादकांनी स्कोअर सेटल करणे यापेक्षा साहित्य देणार्‍यांनी "अमूक एकजण संपादक मंडळात आहे तेव्हा मी साहित्य देणार नाही " असा जास्त असावा. कारण संपादकमंडळ कधीही एका कंपूचे वगैरे निवडले जात नाही.वेगवेगळे लोक असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे साहित्य निवड करताना कुणा एकाची मर्जी चालत नाही. केवळ एका संपादकाने स्कोअर सेटल करायला मानांकन अगदी कमी दिले तरी बाकीचे ७-८ लोक तसेच करतील असे नाही आणि बहुमताने साहित्य निवडले जाते.
यावर उपाय म्हणाजे संपादक मडळाची नावे जाहीरच केली नाही तर ?
हवे तर आलेले साहित्य हेही निवड होईपर्यन्त कोणते कुणाचे तेही गुप्त ठेवण्याची काही सोय केली तर ?

वाचले पण " संपादक मंडळांमधील केवळ एक सदस्यानं माझ्याशी संपर्क साधला होता " आणि " जर मला "तू यावर लिहू शकशील का?" असं कुणी विचारलं असतं तर नक्की काही तरी योगदान दिलं असतं." या दोन वाक्यावरून तरी असेच दिसतेय की एकाने नव्हे तर सगळ्या संपादकांनी विनवण्या/ अक्षता वगैरे आणणे अशी काही तरी स्पेशल ट्रीटमेन्ट हवी होती का ??? हा नक्की कुणाचा कसला गैरसमज ?>>> मैत्रेयी, वाचताना काहीतरी गैरसमज होतोय का? नीट वाचा.

संपादक मंडळांमधील केवळ एक सदस्यानं माझ्याशी संपर्क साधला होता पण तेव्हा खूप उशीर झाला होता >>> केवळ सात ते आठ दिवसांत कथा लिहून देणं मला त्यादरम्यान शक्य नव्हतं आणि ही विचारणा कथेबाबत झाली होती. त्यानंतर एका कंटेंटबद्दल बोलणं झालं होतं, पण त्याचंही पुढं काही झालं नाही.

मी वैचारिक लेखांब्द्दल लिहिलं आहे की दरवर्षी संपादक मंडळ मेल पाठवून "तुम्ही लिहू शकाल का?" टाईप काहीतरी विचारतात. तिथून चर्चेची प्रोसेस चालू होते, यंदा तशी काही झाली नाही. (त्याबद्दल क स ली ही तक्रार नाही!! कारण आधीच लिहिलंय तसं त्यांना अपेक्षित असेल तर कंटेंट मिळालं असेल तर ठिक आहे ना!)

दिवाळी अंकाला कमी साहित्य का आलंय यावरून विषय चालू झाला आहे. मी कथा का पाठवली नाही त्याच कारण दिलंय. आणि वैचारिक लेखांबद्दल सुद्धा कारण दिलेलं आहे. मला विचारलं नाही, म्हणून मी लिहायचा विचारसुद्धा केला नाही. दरव्र्षीसारखं "त्यांनी विचारल्यावर बघू" म्हणत पुढं ढकलत राहिलं. इतकं ते सिम्पल आहे आणि मी हे कारण प्रामाणिकपणे कबूल करतेय. कदाचित मी न विचारताच एखादा लेख लिहायला हवा होता, किंवा मी संपादकमंडळाला संपार्क करून "यावर लिहू का" विचायला हवं होतं. पण मी केलं नाही. वैयक्तिक कमिटमेंट्स होत्या. अजूनही कामं होती. काहीही कारण असेल.

का विचारलं नाही म्हणून मी काय रडतबिडत नाहीये अथवा कसले इगो वगैरे हर्ट झालेले नाहीत. कुणाचाच त्याबद्दल गैरसमज नसावा.

मझ्यापरीनं मी कारणं दिलेली आहेत.
या विषयावर माझी ही शेवटची पोस्ट!

त्याआधी अर्थात 'मुळात काही बरंसं सुचलंच नाही' हा मुद्दा मोडीत निघाला पाहिजे. <<<
का बरं मामे?
खरोखर काही सुचलं नाही असा प्रॉब्लेम असू शकतो की लोकांचा.

त्याआधी अर्थात 'मुळात काही बरंसं सुचलंच नाही' हा मुद्दा मोडीत निघाला पाहिजे.

>>> आज गैरसमजाचा दिवस आहे बहुतेक. नी, ते वाक्यं मी माझ्यासाठी लिहिलंय. वाक्यरचना बेक्कार आहे बहुतेक.

म्हणजे असं की मुळात दिवाळी अंकात शोभेल असं बरंसं काही मला सुचेलच असं नाही. त्यातून ते सुचलंच तरी व्हिजिबिलिटीची इतकी बोंब असेल तर मी ते लिखाण प्रकाशित करण्यासाठी एक महिना का थांबावं?

Pages