हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना

Submitted by श्यामली on 9 November, 2011 - 11:57

हितगुज दिवाळी अंक २०११ वर दिलेल्या अभिप्रायांसाठी सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद.

यंदाचा हितगुजचा हा बारावा अंक. संपादक आयडीने एक धन्यवादाची पोस्ट टाकून दिवाळी अंक हे प्रकरण माझ्यापुरतं संपवता आलं असतं . पण मायबोलीशी असणारं नातं हे त्यातून असं सहज बाहेर पडू देत नाही. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

आमच्याकडे आलेलं उत्तम साहित्य बघून आपण (मायबोलीकर) अजून चांगला अंक देऊ शकतो असं जाणवल. त्यासाठी जुन्या जाणत्यांच मार्गदर्शन आवश्यक आहेच, हे ही जाणवलं. नवीन मंडळींच्या नव्या कल्पनांना जुन्या जाणत्यांच्या सूचना, सल्ले याची साथ असेल तर पुढे येणारे अंक अजून चांगले होतील यात शंका नाही.

आम्हाला आलेल्या अडचणी त्यातून शोधलेली वाट, हे सगळं फक्त मी इथे लिहिण्यात काहीच हशिल नाही. यंदाच्या संपादक मंडळातल्या सगळ्यांनीच त्यांचे त्यांचे अनुभव इथे लिहावे, सुधारणा करता येण्यासारख्या असतील त्याही इथे लिहाव्या.

पुढील अंकांच्या सुधारणेसाठी काय करायला हवं, हे आजवरच्या सगळ्या संपादक मंडळातील मंडळींनी पण इथे लिहावं.

मला सुचलेले काही मुद्दे.
१) अंकाच काम अजून जरा लवकर सुरु करायला हवं
२) तांत्रिक बाजू सांभाळणारी एक स्थायी समिती आपल्याकडे असावी.
३) टेस्टिंगसाठी मंडळाच्या बाहेरची एक समिती असावी.
४) अंकासाठी जनसंपर्क विभाग वेगळा असावा (किमान ३-४ लोक तरी यात असावेत)
५) मुद्रित शोधनासाठी तांत्रिक उपलब्धता असेल तर वेळ आणि श्रम कमी लागतील
६) अंकाच प्रकाशन ऐन दिवाळीत न करता जरा आधीच करावं.

फेसबुकवर आलेली एक विचारणा अशी की, अंक बाजारात केंव्हा येणार (गो, अ‍ॅडमिन Happy )
माध्यम प्रायोजक हितगुज दिवाळी अंकासाठी काम करणार का? Happy

सध्या तरी एवढच.. सुचेल तसं इथे लिहिन.
अंक अजून चांगला कसा होईल केवळ एवढ्याचसाठी इथे लिहावं . अवांतर वाद-विवादांसाठी इतर अनेक बातमी फलक आहेत.

विषय: 

२,३,५ हे मुद्दे आवडले.

अडचणींबद्दल मंडळातल्या लोकांनी लिहिले तर माबोकर काही उपाय सुचवू शकतील.

१, ४, ५, ६ हे मुद्दे आवडले व त्यासाठी अनुमोदन. अन्य मुद्द्यांविषयी माहिती / अनुभव नसल्यामुळे त्यांवर भाष्य करू शकत नाही.

१. यंदाच्या अंकावरील प्रतिक्रीयांत टेंप्लेट खूप बाळबोध असल्याच्या बर्‍याच प्रतीक्रीया आहेत. माबोवर कोणी फ्लॅश कोडगे असतील तर फ्लॅश वापरून 'आगळं-वेगळं' मुखपृष्ठ करता येइल. फ्लॅश द्रुपलवर चढवता येते आणि मर्यादित वापर असेल तर वेगावरही फारसा परीणाम होत नाही.

२. संपादक मंडळाने मागील एक वर्षात मायबोलीवर प्रकाशीत झालेल्या सकस आणि निवडक कलाकृती निवडून त्यांचा एक विभाग केला तर तो खूप वाचनीय असेल.

१. मुखपृष्ठासाठी किंवा बाकी सजावटीसाठी mouseover , jquery सारखी छोटी गोष्ट वापरुन काहि ईंटरेस्टींग इफेक्ट तयार करता येतील उदा. जत्रा, आवाज सारखी खिडकी चित्र.
२. काही मायबोलीकरांकडुन विषय देऊन साहित्य मागवणे
३. संपादक मंडळाने येक दर्जा बाबत क्रायटेरीआ ठरवावा, या अंकातले बरेचसे साहित्य सुमार आहे ( माझे मत)
४. मायबोली बखर - गेल्या दहा /बारा वर्षातला गुलमोहारावरचा येखाद दुसरा लेख , काहि कविता पुन्हा प्रकाशित करता येतील
५. अंकाचे टेंप्लेट कंटेम्पररी असावे.
बर्‍याच सुचना आहेत, पुढल्या वर्षी सांगतो Happy

२, ५, ६ ला अनुमोदन.

तांत्रिक मदत फार जरुरी आहे. गणेशोत्सवाचे काम करतानाही हे प्रामुख्याने जाणवले.

माधव यांचा मुद्दा २ ला अनुमोदन.

मायबोलीवर एक कायमचा डाटाबेस करावा. यात ज्या आयडीज तांत्रिक, मुद्रित शोधन, जनसंपर्क, ग्राफिक्स इ इ अश्या क्षेत्रात आहेत किंवा मदत करु शकतात त्यांनी आपापली नावे आणि काय मदत करु शकतात हे लिहावे. याचा मायबोलीवरिल सगळ्याच उपक्रमांसाठी उपयोग होइल.

कधी काही कारणाने एखादा संपादक/संयोजक मंडळाने ठरवेला आयडी सोपवलेले काम करु शकला नाही तर आयत्यावेळेस खुप शोधाशोध करावी लागते, वेळेचे बंधन असते, बरीच इतर कामेही असतात. अश्या वेळेस या तयार डाटाबेसवरुन कोण मदत करु शकेल हे बघुन त्या आयडीला संपर्क करता येइल, समजा त्यांना जमत नसेल तर लिस्ट वरच्या नेक्स्ट आयडीला विचारता येइल.

मुद्दा क्र. २ आणि ५ ला जोरदार अनुमोदन.
शुध्दलेखन-चिकित्सक उपलब्ध असेल दिवाळीअंकाच्या मुद्रितशोधनाचा बराच वेळ वाचेल. अंकासाठी साहित्य पाठवणारी मंडळी शु.ले.चुका सुधारण्याच्या बाबतीत जरा निवांतच असतात असं म्हटलं पाहिजे. 'संपादक बघून घेतील ना' - असा साधारण सूर असतो. संपादकांना मात्र त्यापायी अतिरिक्त वेळ घालवावा लागतो. (हे एक सर्वसाधारण निरिक्षण म्हणून नोंदवलं आहे. कुणा एका विशिष्ट व्यक्तिला उद्देशून नाही.)

लाजोच्या डेटाबेस कल्पनेलाही अनुमोदन.

यंदाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानंतर बरीच चर्चा झाली. त्या संदर्भात श्यामलीनं आधी झालेल्या या चर्चेचा संदर्भ देऊन काही छान मुद्दे मांडले होते (जे इथेही वर आहेत.)

त्यावर मी माझीही एक प्रतिक्रीया दिली होती. फिरतीवर असल्याने जास्त लिहिता आले नव्हते पण आता जरा आणखी सविस्तर लिहित आहे :

आपण मायबोलीवर दिवाळी अंक का काढतो? मायबोलीवर अनेक उपक्रम सतत होत असतात. गणपती आणि दिवाळी हे तर आपले जिव्हाळ्याचे सण. म्हणूनच आपण ऑनलाईन गणेशोत्सव दणक्यात पार पाडतो. त्याला अतिशय छान प्रतिसादही मिळतो. मराठी माणसाकरता दिवाळी आणि दिवाळी अंक हे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी आपण दिवाळी अंक काढतो. ठीक आहे. पण दरवर्षी त्यात त्याच त्याच अडचणी येत असतात असं दिसतं.

दरवर्षी त्याच त्याच अडचणी येत असतील तर सिस्टिम मध्ये काहीतरी चुकतंय. दरवर्षी नव्या संपादक मंडळाला त्याच अडचणींचा सामना करून दिवाळी अंक काढावा लागत असेल तर दिवाळी अंकाच्या एकूणच स्वरूपाकडे आणि प्रक्रियेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे.

सर्वांत पहिले म्हणजे मादिअंकाचं स्वरूप छापील अंकापेक्षा वेगळं असू शकतं. नव्हे असावंच. आपल्या दिवाळी अंकाला टेंप्लेट वगैरे टेक्निकल बाजू सांभाळण्याकरता बरीच कसरत करावी लागते तिचं मुख्य कारण म्हणजे आपला दिवाळी अंक छापील अंकासारखा दिसावा हे गृहित धरलं आहे. पण त्याची गरज नाही. 'इंटरनेट' या माध्यमात जी लवचिकता आहे ती वापरून आपण आपला युनिक आणि देखणा 'नेटका' ( Wink ) दिवाळी अंक काढू शकतो.

याकरता गणेशोत्सवाचाच साचा वापरता येईल. गणेशोत्सवात जसं मुख्य पान तयार होतं तसंच दिवाळी अंकाचंही मुख्य पान बनवता येईल. गणपतीची स्थापना केली जाते तिथे मुख्यपृष्ठ बनवता येईल. म्हणजे मध्यभागी वरती मुख्यपृष्ठ आणि आजूबाजूला विविध विभाग दिसतील.

दिवाळीच्या पाच दिवसात रोज नवनविन लेख, कथा, कविता आणि इतर साहित्य/माध्यम प्रकार या अंकात समाविष्ट करता येतील. अगदी मुख्यपृष्ठही रोज बदलता येईल. रोज वेगवेगळ्या कलाप्रकारातील मुख्यपृष्ठ आपल्या अंकाची शोभा वाढवू शकेल. त्यात मग अगदी दृकश्राव्य माध्यमही येऊ शकेल.

दिअंकाकरता अर्थात वेगळा गृप असेलच पण शिवाय (शक्य असेल तर) प्रकाशित होणार्‍या लेखांच्या शीर्षकांना अजून एक सबहेडिंग देऊन त्यात दिवाळी अंक २०१४ असं लिहिता येईल. (वर्ड मध्ये असतं तसं हेडर अथवा फूटर देता आलं तर उत्तमच. इथेच विचारते - बॉर्डर वगैरेही देता येईल का?)

दिअंकाकरता साहित्याची निवड :

खरंतर एक वेगळी निवड समिती असावी. तिचं कार्य खूप आधीपासून सुरू व्हावं म्हणजे दिअंकाला उत्तम साहित्य लाभेल. हे स्वप्नरंजन झालं. प्रत्यक्षात हे प्रॅक्टिकल नाही आणि संपादक मंडळानं काय किंवा निसनं निवडलेले साहित्य काय, शेवटी त्यांना सर्व प्रकारचे प्रतिसाद मिळतात. काही साहित्य खरोखरच उत्तम असतं तर काही तितकसं रुचत नाही. निसमध्ये अगदी दिग्गज घेतले तरी ही बाब तशीच राहणार असं मला वाटतं.

त्यापेक्षा त्याकाळात येणारं (जवळपास) सर्व लेखन दिअंत समाविष्ट केलं जावं - अर्थात थ्रू संपादन मंडळ. जे लिखाण अगदीच योग्य नाही ते वगळता बाकी सर्व या पाच दिवसात प्रकाशित केलं जावं. मग ते आवडतंय, नाही आवडत ही त्या त्या लेखक/लेखिकांची जबाबदारी. हे लेख एकाचवेळी दिवाळी अंकातही असतील आणि नेहमीच्या मायबोलीवर सार्वजनिकही होतील.

या लेखांना सजवण्याकरताही ऑप्शन असावा. प्रत्येकाने आपला लेख सजवून द्यावा किंवा ते शक्य नसेल तर मग ती संपादक मंडळाची जबाबदारी असावी. दृकश्राव्य माध्यमातील साहित्य आता जसं अ‍ॅडमीनच्या थ्रू येतं तसंच येऊ शकेल.

या अशा प्रकारच्या दिअंकाचं संपादन आणि प्रकाशन अतिशय सुटसुटीत होईल. संपादक मंडळाचं कामही सुकर होईल आणि लेखकांचाही सहभाग वाढेल. शिवाय लेखन सार्वजनिक असल्याने त्यांचा वाचकवर्गही वाढेल.

मामी, छान सूचना.

आणखी एक कल्पना म्हणजे ब्लॉगर / वर्डप्रेस इ. च्या वेगवेगळ्या टेंप्लेट्स असतात, त्या वापरून आपण आपला ब्लॉग सजवू शकतो. त्याच धर्तीवर मायबोलीच्या दि अं साठी दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या ४-५ किंवा जास्त टेंप्लेट्स बनवता येणे शक्य आहे का? हे काम संपूर्णपणे वेगळे, वेळेअगोदर आणि तंत्रनिपुण व्यक्तींच्या साहाय्याने करता येऊ शकते. त्यासाठी आयत्या वेळेपर्यंत थांबायची गरज नाही. अशा टेंप्लेट्स बनवण्यासाठी मायबोलीवरील कलाकारांकडून उत्कृष्ट रेखाटने, चित्रे आधीपासून मागविता येऊ शकतात, किंवा अगोदर प्रकाशित झालेल्या त्यांच्या कलाकृतींवर त्यांच्या परवानगीने यथोचित संस्करण करून ती चित्रे वापरता येऊ शकतात.

दरवर्षीच्या दिवाळी अंकात ठराविक संख्येत वर्षभरात मायबोलीवर प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट कथा/ललित/लेखांचा समावेशही करता येऊ शकेल. (ही सुचवणी अगोदरही कोणी दिली असल्यास क्षमस्व!)

दिवाळी अंकाची मायबोलीच्या यूट्यूब चॅनलवरून दृक् श्राव्य स्वरुपात जाहिरातही करता येऊ शकेल.
तसेच उत्कृष्ट पोस्टर्स / जाहिराती / टेंप्लेट्स साठी माबोकरांमध्ये स्पर्धाही घेता येऊ शकेल.

मामी, तुझी पोस्ट प्रचंड आवडली, पटली.

दिअं करताना ऑनलाईन माध्यमाची लवचिकता ध्यानात घेतली पाहिजे आणि तिचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे याला तर अगदी जोरदार अनुमोदन.

अगदी गणेशोत्सवाच्या मुख्य पानाप्रमाणे नसली, तरी तत्सम 'माबो-स्पेशल' मुख्य पानाची मांडणी भारी वाटेल. रोज बदलणारं मुखपृष्ठ - हे पण एक नंबर!

सगळ्याच सूचना आवडल्या आहेत मला. तुझ्या सूचना + गेल्या वर्षी लाजोनं मांडलेली डेटाबेसची कल्पना यांना कम्बाईन केलं जावं असं वाटतं.

धन्यवाद अकु आणि लली.

>>> आणखी एक कल्पना म्हणजे ब्लॉगर / वर्डप्रेस इ. च्या वेगवेगळ्या टेंप्लेट्स असतात, त्या वापरून आपण आपला ब्लॉग सजवू शकतो. >>> हे जर शक्य असेल तर किती छान होईल. आपला अंक एकदम देखणा दिसेल.

दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी अंकाला प्रतिसाद अतिशय कमी आहे. असे का? हा प्रश्न माझ्यासकट सगळ्या मायबोलीकरांकरता आहे. ( गैरसमजाला थारा नको म्हणून वाक्य संपादित केले आहे.)

नेहमीच सुरवातीला उत्सुकतेनं अंक चाळून पाहिला जातो आणि मग थोडाफार अधून मधून वाचला जातो. पण मुळातच तो मुख्य मायबोलीपासून वेगळा पडल्यामुळे वाचक तेथपर्यंत पोहचत नाहीत असं आहे का? यावर उपाय काय?

संपादक मंडळातर्फे त्या अंकाच्या अनुक्रमणिका, संपादकीय सकट सर्व साहित्याच्या लिंका इथे एका वेगळ्या धाग्यात देता येतील का? उदा.

धाग्याचे शीर्षक : हितगूज दिवाळी अंक २०१४
हेडर : संपूर्ण अनुक्रमणिका आणि त्यातील प्रत्येक घटकाला मूळ दिवाळी अंकाची लिंक. जसे तिथल्या अनुक्रमणिकेच्या पानावर आहे तसे.

संपादकीय

मुख्यपृष्ठ
श्रेयनामावली
संपादकीय

अंकातील सर्व साहित्याकरताही मूळ दिवाळी अंकाच्या लिंका या धाग्यावर देता येतीलच पण वाचकांना त्याहूनही चटकन लक्षात यावं म्हणून प्रत्येक कथेसाठी (कथा हा साहित्यप्रकार उदाहरणादाखल घेतला आहे. जे कथेला लागू तेच इतर लेख, कविता, गझल, शब्दकोडी वगैरे करताही लागू.) वेगळा धागा काढून त्यात त्याची लिंक देता येईल. इथे प्रतिसाद देण्याची खिडकी बंद करता येऊ शकेल म्हणजे मूळ अंकातल्या साहित्यावरच प्रतिसाद मिळतील.

उदा. संपादक मंडळातर्फे एक नविन धागा काढायचा.

धाग्याचे शीर्षक : गंध - मामी - हितगूज दिवाळी अंक २०१४
हेडर मधील मॅटर : कथेतील एखादा पॅरा आणि मग
'पूर्ण कथा इथे वाचता येईल.' हे वाक्य.

अंकातील साहित्याचे हे धागे मुख्य मायबोलीवरच्या नविन लेखनात सतत दिसत राहतील आणि त्यामुळे वाचकांपर्यंत चटकन पोहोचू शकतील.

नेहमीच्या 'नवीन लेखन' मधे दिवाळी अंकातील लेखांच्याही लिन्क्स आल्या तर आपोआप लोक बघतील. त्यावर क्लिक केल्यावर मात्र इतर लेखांप्रमाणे तेथेच न उघडता ती लिन्क दिवाळी अंकाकडे घेउन गेली, तर मग तेथे गेलेले लोक तेथील इतर लेखही पाहतील.

वरची "पूर्ण कथा येथे..." कल्पनाही आवडली.

नेहमीच्या 'नवीन लेखन' मधे दिवाळी अंकातील लेखांच्याही लिन्क्स आल्या तर आपोआप लोक बघतील

>>> याला +१००

हे व्हायलाच हवं.

यावर्षी केलेला काव्य वाचनाचा प्रयोग आवडला. पण प्रत्येक पानावरील कवितेसाठी त्याच कवितेचं वाचन असं केलं असतं तर अधिक चांगलं वाटलं असतं. पुढे हाच प्रकार अवलंबिला जाणार असेल तर त्यासाठी ही सूचना.

यावर्षीची प्रतिसादांची सोय (संपूर्ण अंकांची आणि प्रत्येक लेखाची) यात गेल्या वर्षीपेक्षा काहीच बदल नाही. अंक जिथे प्रकाशित करतो ती जागा (vishesh.maayboli.com) ही देखील वेगळी नाही

नवीन लेखनात दिवाळी अन्काच लेखन आणण्याबाबतीत हा खुलासा संपादक मंडळाने दिलेला आहे .

३. दिवाळी अंकातील नवीन लेखनाचे पान मुख्य मायबोलीत दिसत नाही,कारण दिवाळी अंक हा 'विशेष' डोमेनवर असतो, तर'मायबोली' ही मायबोली डोमेनवर असते.त्यासाठीच 'अभिप्राय' हा धागा मुख्य मायबोलीत काढलेला असतो.

मागच्या वर्षीच्या संपादक मंडळाने हा पर्याय वेबमास्तरांना सुचवला होता.

* मी लिहीपर्यत वेमांची पोस्ट आली

वेबमास्तर, यंदाचा अंक ताजा आहे म्हणून त्याचा रेफरन्स दिला. आणि यावर्षीच्या अंकाकरता आता लगेच हे करू शकतो.

बाकी हेच आधीच्या अंकांसाठीही लागू आहेच. मुद्दा यंदाचा अंक विरुध्द आधीचे अंक असा नाही आहे. गैरसमज झाला असल्यास क्षमस्व. मुद्दा व्हिजिबिलिटीचा आहे.

दिवाळी अंकातील नवीन लेखनाचे पान मुख्य मायबोलीत दिसत नाही,कारण दिवाळी अंक हा 'विशेष' डोमेनवर असतो, तर'मायबोली' ही मायबोली डोमेनवर असते.त्यासाठीच 'अभिप्राय' हा धागा मुख्य मायबोलीत काढलेला असतो.

>> माहित आहे जाई. त्यावरच मी वर उपाय सुचवला आहे.

ओक्के. मग माझी सजेशन इथेच लिहू का? (दोन्हीकडे लिहितो)

तुम्ही अगदी माझ्याच डोक्यातली कल्पना जरा वेगळ्या रूपात मांडलीय

<पण तरीही अंकाला प्रतिसाद अतिशय कमी आहे. असे का? > हा अंक वाचताना तरी मला या गोष्टीचे वाईट वाटले. इतकी मेहनत घेऊन प्रकाशित झालेला अंक वाचला जाऊ नये, त्यावर प्रतिसाद येऊन नयेत याचे वाईट वाटते. एकेका लेखला संपादन व अन्य प्रक्रिया देणार्‍या जितक्या लोकांचा हात लागला असेल तितकेही प्रतिसाद दिसत नाहीत.

दिवाळी अंकाची जाहिरात वाहत्या पानांवर आधीपासूनच सुरू असते: लेखन मागवण्यासाठी आणि मग अंक तयार होत आला की त्यात काय काय असेल अशा स्वरूपाची. पण एकदा अंक प्रकाशित झाला की संपादक मंडळाचे काम संपते. यात काही वावगे आहे असे नाही. पण तेच काम थोडे लांबवून दिवाळी अंकाची प्रकाशनोत्तर प्रसिद्धीही करत राहणे गरजचे आहे. वर मामी म्हणतात तसे अंकातल्या एखाद्या लेखनातला किंवा त्याबद्दलचा टीजर टाइप मजकूर , त्यात सामावलेली त्या लेखनाची लिंक अशी जमेल तेवढ्या लेखनाची जाहिरात वाहत्या धाग्यांवर महिनाभर तरी केली जावी.

मयेकरांचा पर्यायही चांगला आहे जाहिरातीचा . मामीन्च्या सुचवणीनुसार अभिप्रायबाफच्या हेडरमध्ये शीर्षक + लिंक दिल्यास तिथल्या तिथे वाचनाची सोय होईल .

जाहीराती नकोत अजिबात. इम्युन होत चाललंय पब्लिक त्याला. तीस तीस पोस्टी पडूनही वर दिसणार्या पोस्टरबद्दल अक्षर नसते. हा त्यांचा दोष नाही म्हणा. रोजच काहीतरी पडत असेल तर रंगात आलेल्या गप्पा कोण वळवेल तिकडे? शिवाय स्कोअर सेटलिंग हा ही एक प्राईम फँक्टर आहेच, त्याला इलाज नाही.
पण एकंदरीतच दिअं वाचण्याबद्दलची उदासीनता वाढत असताना त्यावर एवढे कष्ट घ्यायचे का? व्यक्तिश: मी अजून गेल्या २ वर्षांचे अंक संपूर्ण वाचवे नाहीत. कदाचित माबो दिअं फार "हेवी" असतो का? विषय, दर्जा, वैचारिक बैठक अशा सर्वच अंगांनी? जरा हलकेफुलके स्वरूप वाचकांना आकर्षित करेल कदाचित. शिवाय दरवर्षीच "उत्कृष्ट" च लेखन निवडण्याचा दबदबा आणि गवगवा. त्यामुळे स्वयंघोषित लेखकवर्ग कचरतो. पण याला काय पर्याय आहे? भारंभार लिखाण आले तर काहीतरी चाळण लावावीच लागेल ना? अजून एक स्पर्धा तर अजिबात नको.
अंकाचे स्वरूप हलकेफुलके ठेवणे, जाहीरातीतून अंकाचा दबदबा वाटण्यापेक्षा तो आकर्षक वाटेल असे काही करणे, आणि एकूणच या प्रक्रियेत मर्यादित हायउपस करणे. दरवेळी तुम्ही सर्वांना खूश करू शकत नाही हे लक्षात ठेवणे. बाकी ते अंकाच्या लिंक्स नवीन लेखनात दिसणे वगैरे तांत्रिक बाबी व्हायच्या तेव्हा होतील, ते आपल्या हातात नाही.

Pages

Back to top