पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

Submitted by Mother Warrior on 5 November, 2014 - 13:10

मी आज कुठलेही ऑटीझमसंबंधित उपदेश करणार नाही तर मलाच थोडी मदत हवी आहे. आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी. कराल का?

झालंय असं, की मुलाच्या वय वर्षे २ पासून ऑटीझमशी झुंज देऊन जरा थकायला झाले आहे आता. हे सर्व किती दिवस चालणार, मुलगा कधी बोलणार अशा प्रश्नांनी आता २ वर्षं भंडावून सोडले आहे. आत्ता लिहीताना मला जाणवलं, २च वर्षं झाली या सगळ्याला? पण ७३० दिवस गुणीले २४ तास असं म्हटलं की जाणवते थकण्याची इंटेसिंटी.
दिवसाची सर्व कामे सुरळीत पार पडतातच, मुलाबरोबर हसतमुखाने दंगा केला जातोच, त्याचे जेवण-खाण आजारपण त्यात मी कुठेही कसूर होऊ देणार नाही. (बिलिव्ह मी, ऑटीझम आणि आजारपण = वर्स्ट काँबिनेशन! एरवी मुलं गृहीत धरतातच पालकांना परंतू माझा मुलगा आजारी पडला की माझी शब्दशः कसोटी असते. त्याची चिडचिड कमालीची वाढते व आपण शांत राहून त्याला काय होत असेल हे गेस करत राहणं = बॅटल.)

डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन.

आपण या पानावर आशादायी, ऑप्टीमिस्टीक, पेशन्स, जिद्द, हार्डवर्क इत्यादींबद्दल पोस्ट्स एकत्र करायच्या का? असं काहीतरी जे वाचून आमच्यासारख्या स्पेशल नीड्स मुलं असलेल्या पालकांना उभारी येईल. कारण पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड हा एकच लाकडाचा ओंडका आम्हाला ऑटीझमच्या समुद्रात जरा तरंगत ठेऊ शकतो..आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला बिग हग!

ओंडका झिजत चालला आहे वगैरे वाचून कळवलायला झाला.
इथे काही लिहिलं तरी ते शब्द बापुडे केवळ वारा !
त्यापेक्षा मायबोलीकर काय मदत करु शकतात हे तुम्हीच लिहा. तुमच्या प्रोफाइलवरुन तरी तुम्ही माझ्यापासून काही हजार मैल, कितीतरी टाइमझोन दूर आहात! इतक्या अंतरावरुन जी काय मदत होऊ शकेल ती मी नक्की करीन. फोनवर, स्काइपवर बोलणे, तुमच्यासाठी मेनु / मील प्लानिंग करणे हे इतकंच सुचतंय मला सध्यातरी.

तुम्ही अन बाळाचे बाबा दोघांना एकमेकांसाठी ग्रोन अप टाइम, क्वालिटी टाइम मिळतोय का ? नसल्यास तो मिळवण्याच्या द्र्ष्टीने बेबी स्टेप्स का होईना, पण सुरुवात करा, इट इज अ‍ॅन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ यूवर लाइफ. त्याकडे दुर्लक्ष करु नका .

थँक्स सो मच मेधा!

मी नीट लिहीले नाही बहुतेक.. तशी फिजिकल, कुठल्या कामात अशी मदत नको आहे मला. आय मिन आय डोंट मीन टू साउंड रूड!
पण मला अपेक्षित आहे ते म्हणजे अपलिफ्टींग करणारे मेसेजेस, तुमची आवडती वाक्यं, जनरलच मानसिक बळ देणारं असं काहीतरी. for example अवघड काळातून जात असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींनी सावरले? कशाने मानसिक उभारी मिळाली अश्या पॉझिटीव्ह स्टोरीज.

(लिहीता लिहीता फार ड्रामाटीक झाले आहे का ते ओंडका इत्यादी? Happy )

स्वमग्नता, वाचून फार वाईट वाटलं...पण त्याचबरोबर हे साहजिकच आहे हे ही समजतय!

एखाद्या सपोर्ट ग्रुपची खूपच गरज आहे. तिथे लोकल सपो र्ट ग्रुप आहेत का ? हल्ली फेसबुक वर असे बरेच लोकल सपोर्ट ग्रूप असतात. नसतील तर तुम्ही चालू करू शकता.

कोणी मित्र-मैत्रिणी आठवड्यातून २-३ तास येऊन बसू शकतात का? गप्पा मारायला, थोडी बाकी मदत करायला?

इथे लिहीलत ते फार बरं केलंत. फिजीकल मदत नको म्हणताय पण मिळाली तर थोडा स्ट्रेस रिलीव्ह व्हायला मदत होईलच ना?

तुला सकारात्मक दृष्टीकोनाची नाही तर रोज तासभर (किंवा आठवड्याला) बेबी सीटरची गरज आहे. काही प्रोब्लेम्स नसतानाही मुलाला तासभर दूर ठेवणे कठीण आयांना कठीण असते, त्यात तुझी लढाई आणखी कठीण. पण केयरगिविंग तू एकटीनेच करावे हा तुझ्यावर अन्याय आहे. एखादी चांगली बेबी सीटर बघून एक तास आवडीचे काहीही कर.

स्वमग्नता, तुम्हाला सर्व किती स्ट्रेसफुल होत असेल याची कल्पनाच करता येतेय. काहीही सुचवावे तर ते वरवरचे ठरेल असेच वाटते. एकच सुचलं ते म्हणजे थोडा ब्रेक - अधून मधून का होईना - मिळू शकतो का पहा. यात गिल्टी वाटण्याचे कारण नाही. नवरा आणि तुम्ही एकाने मुलाबरोबर थांबून दुसर्‍याने थोडा वेळ बाहेर जाणे, आपल्याला हवे ते करणे असे काही करता येते का पहा. जरा बदल मिळाला की पुन्हा जोमाने 'कर्तव्यांच्या रांगा ' सांभाळायला हुरुप येइल.
बाकी तुम्ही पॉझिटिव्ह आहातच, इथे कितीतरी जणांना तुम्ही मोटिव्हेटच केलं आहे. खूप शुभेच्छा !!

ओंडका झिजत चालला आहे वगैरे वाचून कळवलायला झाला.
इथे काही लिहिलं तरी ते शब्द बापुडे केवळ वारा !>>>>>>>> +१ मेधा.
नुसतं सगळं वाचून थकायला होतं आम्हाला, तुम्ही तर त्यातून जात आहात.
हे सगळं जोमानी करण्यात खरच खुप शारिरिक बळ (स्टॅमिना ह्या अर्थानी) आणि मानसिक बळ हवं. फार सांगणार नाही पण एक उदाहरण आठवलं चटकन ते म्हणजे आपल्याला विमानात बसल्यावर सेफटी बद्दल सुचना देतात ते. ते म्हणतात जर काही कारणानी ऑक्सिजन मास्क डिप्लॉय झाले आणि तुमच्या बरोबर लहान मुलं असतील तर आधी स्वतः मास्क लावा आणि मग त्यांना मास्क लावायला मदत करा. थोडक्यात त्यांची मदत करायला तुम्ही नीट कंडिशन मध्ये पाहिजे.
तुमची कंडिशन नीट असण्याकरता तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. दिवसातला काही वेळ किंवा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी ह्या करायलाच पाहिजेत!

Good luck with everything! You are a great parent and an inspiration to a lot of people. Happy

अ‍ॅक्चुअली तुमचे सर्वांचे धीराचे शब्द वाचूनही बरं वाटत आहे! धन्यवाद!

सीमंतिनी, माझा मुलगा ऑटीझम असलेल्या मुलांसाठीच्या शाळेत जातो. स्कुल डिस्ट्रीक्ट कडून त्याला त्यासाठीचे ट्रान्स्पोर्टेशनही मिळते. जाण्यायेण्याचा प्रवास व शाळा असं सर्व मिळून तो ६-७ तास घराबाहेर असतो. शिवाय त्याच्या रोजच्या थेरपीस्ट घरी येतात. तुम्ही म्हणताय तसा प्रॉब्लेम माझा वर्षंभरापूर्वी होता आता उलटा प्रॉब्लेम आहे. आता माझा मुलगा माझ्या वाटणीला वीकडेला काही तास व विकेंडलाच येतो. Happy

मला भरपूर वेळ मिळतो तो मी काळजीत घालवते हा प्रॉब्लेम आहे. माझ्या मुलाला अजून शू-शीचं सांगता येत नाही, त्याचे पिक्चर कम्युनिकेशन बोर्ड जवळ नसेल तर भूक लागलेली सांगता येत नाही. त्यामुळे तो इतक्या वेळ बाहेर असतो त्याची पण एक काळजी अ‍ॅड होतेच. शाळा, त्याच्या टीचर्सची टीम सर्व उत्तम आहे त्यामुळे मी त्याला (पूर्ण निश्चिंत मन नसले तरी) शाळेत पाठवू शकते.

माझा मुलगा ७ दिवसाचा असताना त्याला ताप आला, रविवार संध्याकाळ. walkin बंद. ९११ इतक गंभीर वाटतं न्हवत. पण ER मध्ये जावे का थांबावे का Tylenol देऊन सकाळी डॉ. कडे जावे कळत न्हवतं. दोघांना काहीही अनुभव नाही. काही वेळ थांबून नर्स हेल्पलाईन ला फोन केला. त्यांनी ताबडतोब ER ला जायचा सल्ला दिला. तिकडे ब्लड टेस्ट करायला पायाला टोचलं पण टेस्ट पुरत रक्त जमा करायला सुद्धा ४-५ वेळा इकडे-तिकडे प्रयत्न करायला लागले. तरीही पुरेसं रक्त आलंच नाही. शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं. युरीन टेस्टला नोन- contaminated sample साठी catheter घालावा लागणार होता. ते ऐकूनच गलबललं, सुदैवाने नर्स टेस्ट करणार इतक्यात फवारा उडाला आणि तिने तो बाटलीत झेलला. हिंदी मुव्ही सीन होता. Happy कल्चर इ. रिझल्ट यायला वेळ लागणार होता. admit करून घेतलं. त्या एवढ्याश्या हातात सलाईन, ते टोचायला दोन्ही हा तावर १-२ ठिकाणी प्रयत्न, हात हलवू नये म्हणून एक पट्टी जोडलेली. ब्रेस्ट फीडीग शक्यच नाही, दुध पंप करून ठेवायचं, डिलिव्हरीमध्ये बायको शारीरिक आणि आता दोघेही मानसिक दमलेलो. डॉ नी meningitis नाही याची खात्री करायला लंबर पंक्चर करून लिक्विड काढायचं ठरवलं. (नीओनेटल फिवर मध्ये रक्त, मूत्र किंवा स्पायनल यापैकी एक infection शक्य असतं, तिन्ही टेस्ट लगेच कराव्याच लागतात. लगेच उपचार महत्त्वाचे म्हणून) . ती कशी करतात ते सांगितलं आणि पालकांपैकी एकाला उपस्थित रहायची परवानगी दिली. मी थांबायचं ठरवलं, नंतर डॉ. परत म्हणाले, नाही थांबलात तर बर, कदाचित तुम्हाला सहन नाही होणार. बाहेर थांबायचं ठरवलं. २ दिवसांनी समजलं युरीन infection आहे. आता अल्ट्रासाऊंड, असा का होतंय ते शोधायला. यात कळलं की दोन पैकी एका किडनीची लेव्हल खाली आहे. यामुळे युरीन जमा होऊन साचून राहणे किंवा उलटी परत जाणे असं होऊ शकत. जमा होतेय का हे बघायला catheter घालून परत टेस्ट. असा बराच इव्हेंटफुल तो आठवडा गेला. दरम्यान antibiotics चालू केले. कदाचित हा antibiotics चा कोर्स दर काही दिवस/ महिन्यांनी रिपीट करावा लागेल असं सांगितलं. सुदैवाने तसं काही न होता ६ महिन्यांनी केलेली अल्ट्रासाउंड नॉर्मल आली.

या दिवसांत मन आतून सांगतं होतं काहीही झालं तरी आपण मार्ग काढू, धिस इज नॉट द एन्ड ऑफ वल्ड. मुलाकडे बघून एनर्जी मिळायची, थोडी शक्ती आली तशी डोळे उघडणे, इकडे तिकडे बघणे, रडला तरी तोंडातून आवाज फुटणे, तो चिरका आवाजापासून सुधारणे अशा छोट्याछोट्या गोष्टी होप वाढवायच्या.

हे तुमच्यापेक्षा अगदीच मामुली उदाहरण आहे याची जाणीव आहे, आणि वर सगळे म्हणतायत तसं स्वतःला वेळ द्या. तुम्ही खरचं आम्हाला एक मोठं inspiration आहात. मन मोकळं करावसं वाटलं तर नक्की पोस्ट करात राहा.

मी अजुन पालक जाहलो नहिये... पण ती वेळ जेव्हा येइल तेव्हा एक पालक म्ह्णुन तुमचा आदर्श आहे माझ्या डोळ्यासमोर...
मी तुमचे लेख वाचले आहेत... अनि मझ्या पत्नीला ही दिले वाचण्यास..
मानतो राव तुम्हला अन तुमच्या जिद्दिला....

मी काही सुचवावे एवढा अनुभव नाहि.. पण एक सांगायचे आहे कि... अशा खास केसेस मधुन विजय मिळवलेल्या लोकांचे आत्मकथण वाचा...जसे हेलन केलर.....

मला माहित नाही पण तुमच्या मुलासोबत मुल बनुन राहुन काही स्ट्रेस कमी होतोय का पहा.....

थोडा वेळ स्वत: साठी काढा....

मला भरपूर वेळ मिळतो तो मी काळजीत घालवते हा प्रॉब्लेम आहे. >> हे खूप सहाजिक आहे. पण त्याने कुठलाच प्रश्न सुटणार नाही. लेखनवाचनसिनेमा/नेटबघणे हे उद्योग केले तरी मन काळजी करत राहत. एखादी फिजिकल अॅक्तीव्हिती मागे लावणे फायद्याचे ठरेल.
तू मुलाशिवाय इतरही काही करतेस हे तुला आणि इतरांना (नातेवाईक) कळले की नकळत येणारे बोचरे प्रश्न/सल्ले ही कमी होतात. इथेही मायबोलीवर मला तुझी ओळख स्पेशल नीड्स असलेल्या मुलाची आई एवढीच आहे. तुझे छंद, आवडी कधीच समोर येत नाहीत.

मला भरपूर वेळ मिळतो तो मी काळजीत घालवते हा प्रॉब्लेम आहे>> म्हणजे जरासं कळतय पण वळत नाही असं झालय का? मग स्वतःला ठामपणे समजावून फक्त स्वतःच्या मनाला केवळ आनंद देणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये मध्ये रोज नियमाने तासभर तरी घालवा. ती अ‍ॅक्टिव्हिटी ऑटिझमशी कोणत्याही प्रकारे निगडीत नको. केवळ तुम्ही ज्या गोष्टी करताना कंप्लीटली झोन आउट होय शकता अशी एखादी गोष्ट. मग ती वाचन असेल, सिनेमा बघणं असेल, बागकाम असेल, वॉकिंग असेल, रनिंग असेल, योगासने असतील, झुंबा असेल, क्रोशा असेल, पेंटिंग असेल, ज्वेलरी मेकिंग असेल. तुमच्यासाठी अशी कोणती गोष्ट आहे ते आठवून ती गोष्ट नियमाने करायला लागा.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

<< मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात.>>

तुम्हाला किती वेळ मिळेल माहीत नाही पण वेळात वेळ काढून ज्यात रस वाटेल तो छंद जरुर जोपासा. त्यातही इन्स्पायरिंग मुव्हीज, डॉक्युमेन्टरीज बघता येतील. किंवा अगदी डोक्याला ताप नाही असं एन्टरटेनिंग काहीही.

माझा नवरा कधीतरी हैराण होतो की रोज तू नवीन पुस्तक, नवीन शो किंवा डॉक्युमेन्टरी कशी बघू शकतेस. पण माझी ती गरज आहे असं मला वाटतं. एक एस्केप मिळतो रोजच्या लाईफमधून. त्यात मग लोकांना जे आवडतं तेच मला आवडायला पाहिजे असं नाही. मला पाहिजे ते मी वाचते किंवा पाहते. आणि त्यातून मधेच काहीतरी मिळूनही जातं जे आपल्या लाईफशी रिलेट होऊ शकतं. मला असे serendipity अनुभव खूप वेळा येतात. मी काहीतरी समस्येचा विचार करत असते आणि नेमकं त्यावर काही दृष्टीकोन देणारं पुस्तक लायब्ररीत नावही न बघता घाईघाईत उचललं जातं. मोटिव्हेशन तर अनेक वेळा मिळतं. सध्या प्रधानमंत्री सीरीज बघते आहे त्यातही इतक्या इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत- अरे देशात इतकं होऊन गेलंय इतकं लोकांनी काम केलंय..आपले प्रॉब्लेम बघायला perspective मिळतं. तसंच आमीरचं सत्यमेव जयते बघते आहे ज्यात परवा LGBT एपिसोड लावला होता त्यात काही भारतीय तरुण LGBTs च्या मुलाखती होत्या, त्यांचे पालक, आजी वगैरेंच्याही मुलाखती होत्या की कसं सुरुवातीला धक्का बसणं, दु:ख होणं इथपासून आता स्वीकार, पाठिंबा आणि आपल्या मुलांच्या वाटचालीबद्दल समाधान, अभिमान हा प्रवास त्या पालकांचा झाला.

तुम्हाला खूप शुभेछा आणि प्रेयर्स Happy

ओके, वेळ मिळतोय... तो काळजीत न घालवता दुसरं, स्वतःकरीता काय करता येईल हे बघणार का? मला कळतय असं बोलणं सोप्पं आहे, प्रत्यक्ष जमवणं अवघड आहे. पण हळू- हळू प्लीज करा. मैत्रिणींबरो बर बाहेर जा - कॉफी, शॉपिंग काहीही करा. ठरवून मुलाचा वि चार न करता काहीतरी वेगळं करा - विनोदी सेरिअल्स बघा. मला असं वाटतं - ह्याचा नक्की उपयोग होईल. मुलगा शाळेत गेल्यानंतर च्या ह्या "me time कडे you will start looking forward to it. आणि मग तो घरी ये ईल तेव्हा तुम्ही छान त्याच्याकडे लक्ष देउ शकाल.

हे सांगण सोप पण करणे अवघड असे असले तरी... तुम्हाला जे करता येत ते सगळ तुम्ही तुमच्या कुवती बाहेर जाऊन करतच आहात. 'मी जितके करते आहे तितकेच मी करू शकते आणि जरी गरज असली तरी इतकेच मी देऊ शकते.' हे स्वतःशी मान्य करा. स्वतःकडुन जर अवाजवी अपेक्षा असतील केअरगिव्हिंगच्या तर आधी त्या तपासुन त्या कंट्रोल मधे आणता आल्या तर पहा. आयुश्यभर मुलाची काळजी रहाणारच... पण त्या काळजिचा अतिरेक होतो आहे का हे फक्त तुम्हीच स्व्तःशी पडतालून पाहू शकाल...

अमितव, थँक्स! बापरे, बाळ ७ दिवसांचे असताना इतक्या सगळ्यातून जायचे म्हणजे अवघड आहे.
तुम्ही म्हणता ते, छोट्याछोट्या गोष्टी होप वाढवायच्या. हे आमच्याही बाबतीत खरे आहे. परवा माझ्या मुलाने हेडफोन्सच्या वायरीबरोबर खेळताना बोटांना वायर घट्ट गुंडाळत होता. मी त्याला 'नो' सांगून इंडेक्स फिंगर नाचवले त्याच्यासमोर. त्याने एका क्षणात सेम तसेच बोट मला नाचवून नक्कल करून दाखवली. Happy ४ वर्षात त्याने प्रथम आमची नक्कल केली. (अर्थात तो बर्‍याच गोष्टी एकदा करून सोडून देतो. Sad काकोणजाणे.)
पण हा प्रसंग किंवा क्वचित कधीतरी २-३ महिन्यातून एकदा उत्सुर्फतपणे तो मला "आई" अशी कुजबुजत्या स्वरात हाक मारतो, हे प्रसंग,छोट्याछोट्या सुधारणा मला बळ देतात. Happy

वेदिका, चांगली पोस्ट. तुम्ही तुम्हाला आवडलेल्या डॉक्युमेंटरीज देखील इकडे नोट करून ठेऊ शकाल. मलाही आवडायचे डॉक्युमेंटरीज पाहायला.

शूम्पी, खरं आहे तुम्ही म्हणता ते. स्वतःला आवडणारे, काळजीपासून दूर ठेवणारं काहीतरी व्याप मागे लागून घेतला पाहीजे. तेही विना-गिल्ट. हे महत्वाचे. कळतंय पण वळत नाही हीच सिचुएशन आहे. इथे वाचताना खरंतर फार सिंपल सोल्यूशन वाटत आहे हे. पण प्रत्यक्षात या सगळ्या परिस्थीतीत आनंदी राहणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोश्ट आहे. विचित्र वाटेल विचार, पण स्वतःचा मुलगा आपल्याशी अजिबात कनेक्ट होऊ शकत नसेल तर आपल्याला आनंदी राहायचा काय अधिकार!? किंवा कसं कोणी आनंदी होऊ शकेल अशी विचारधारणा तयार झाली आहे. आणि ती पुसून टाकणेच अवघड जात आहे.

मेधा+१
काळजी करण्याबाब त... कुठे वाचल आठवत नाही...

प ण काळजी करणं आउट्सोर्स करायचं...किंवा काळजी करण्यासाठी काही ठराविक वेळ ठरवून घ्यायची..
म्हणजे आज मी दुपारी १-२ या एक तासात कळजी करेन.
आज माझ्या सगळ्या काळ ज्या माझ्या वतीने अमुक व्यक्ती करेन....इथे मायबोलीवर सगळ्यांना एकेक तास तरी तुम्ह्नी काळज्या वाटून दिल्या तर तुम्हाला थोडा ब्रेक मिळेल म आम्हाला थोडी मदत केल्याचं समाधान.

एक बिग ह्ग

>>स्वतःचा मुलगा आपल्याशी अजिबात कनेक्ट होऊ शकत नसेल तर आपल्याला आनंदी राहायचा काय अधिकार!? किंवा कसं कोणी आनंदी होऊ शकेल अशी विचारधारणा तयार झाली आहे. आणि ती पुसून टाकणेच अवघड जात आहे.>>
तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम कळलाय तेव्हा त्यावर मात करणे नक्की जमेल. तुमचा मुलगा तुमच्याशी त्याच्या परीने कनेक्ट होत आहे/होण्याचा प्रयत्न करतोय. तो स्पेशल आहे तेव्हा त्याचे हे कनेक्ट होणे ही सामान्य मुलासारखे नसणार. तुम्हाला आनंदी रहायचा पूर्ण अधिकार आहे. मुलाची काळजी असणारच. पण आनंदी राहून तुम्ही त्याचे संगोपन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. बाळाचे आईबाबा हा त्याचा सगळ्यात मोठा आधार. छोट्या-छोट्या गोष्टीतला आनंद नाकारुन तो कमकुवत बनवू नका.

वर शूम्पीने लिहिलंच आहे तेव्हा पुन्हा लिहित नाही पण तुम्हांला जे आवडतं ते करण्यात गुंतवून घेतलंत तर काळजी करणं कमी होईल. नशिबाने मुलाची शाळा, त्याला मिळणारा सपोर्ट चांगला आहे. तुमच्या हातात थोडा मोकळा वेळ मिळतोय तेव्हा तो तुम्ही काळजी न करता सत्कारणी लावलात तर मुलगा आल्यावर तुम्ही आनंदात असाल. कधी तुमच्या नवर्‍याला विकडेला सुट्टी घेणं शक्य असेल तर मुलगा शाळेत गेल्यावर अधूनमधून मूव्ही, लंच असं करा. बरा वाटेल असा चेंजही.

बिग हग!! थोडंसं take it easy. स्वतःबरोबर खूप हार्श होऊ नका. सांगणं सोपं आहे हे माहिती आहे. पण तुम्हीच तुमच्याबरोबर असं वागून कसं चालेल?
तुम्हाला दुखावायचा अजिबात हेतू नाही... मनापासून सांगतेय... एकलकोंडेकर हा आयडी बदला. पहा, कदाचित तुम्हाला थोडासा हुरूप येईल!

चक दे.. ऑस्ट्रेलियाशी पहील्याच सामन्यात दारुण पराभव झाल्यावर स्पर्धेत टिकायची कुठलीच आशा उरत नाही..
सगळं संपल्यात जमा असंतं.. असा हताश निराश झालेला तो पावसात एकटाच बाकड्यावर बसंलेला असंतो..
गत काळात घडलेल्या सगळ्या वाईट गोष्टी,अपमान अवहेलना,सोसलेले हाल अशा सगळ्या निगेटीव आठवणी जास्त तिव्रतेने त्याला बोचत असंतात.. आणि त्या विमनस्क मनस्थितीतच एक प्रकारचा निर्धार त्याच्या चेहृयावर पसरतो.. नसरुल बिन ईल्लाहे.. म्हणत पूर्वी पेक्षा जिंकायच्या दुप्पट जिद्दीने निर्धाराने आणि कराराने तो उठतो आणि इतिहास घडवतो..
बॅकग्राउंड ला मौला मेरे लेले मेरी जान हे गाणं...
निराश्,हताश वाट्तं तेव्हा मी हा सीन आठवतो.. खूप उभारी मिळते..
शेअर करावासा वाटला..
ऑल द बेस्ट..

rmd, मला तुमचं सजेशन आवडले. मी आता 'मदर वॉरिअर' आहे! Happy

श्रीयू थँक्स फॉर शेअरिंग! चकदे माझाही आवडता मुव्ही आहे. Happy

वैद्यबुवा, तुम्हाला पावती द्यायची राहीली. अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही. मी ते ऑक्सिजन मास्कचे उदाहरण कायम लक्षात ठेवीन. थँक्स!

पेशवा, केअरगिव्हिंगच्या अवाजवी अपेक्षा - बुल्स आय! मी/आम्ही अमुक इतक्या प्रमाणापर्यंत्च काही करू शकतो हे मनात ठसवण्याची खरोखर गरज आहे. थँक्स अ लॉट!

बेन, का़ळजी आउटसोर्स ही कल्पना छान आहे! काश, मी देव किंवा अमुक एका शक्तीवर विश्वास ठेवणारी असते. सगळी काळजी आउटसोर्र्स केली असती. पण तुम्ही म्हणता तेही चालून जायला हरकत नाही. Happy

स्वाती२, धन्यवाद! हो, माझा मुलगा त्याच्यापरीने कनेक्ट होतच असतो. आमच्याबरोबर तो कधीकधी अफेक्शनेट पण असतो. दोज मोमेंट्स कीप अस गोईंग. पण हो, ती विचारधारा पुसून टाकणे व मनापासून एन्जॉय करणे शिकायलाच हवे. आत्ता मी माझी काळजी मुलापर्यंत नक्कीच पोचवत नाही, परंतू मी मनापासून आनंदी असले तर मात्र त्याला काही नवीन गोष्टी शिकवायला हुरूप येईल हे पण खरंय. त्यादृष्टीने प्रयत्न करते चालू. पण मला आत्तातरी हे इतकं अवघड वाटतंय. आजूबाजूला प्रचंड प्रमाणात लहान मुलं आहेत. १.५ वर्षाच्या चिमुरडीने माझ्या मुलाला भैय्या हाक मारून गप्पा मारणे वगैरे होत असताना जरा अवघड जाते आनंदाने वागणे-वावरणे. मला कधी हे मिळणार हा प्रश्न येतोच. आयहोप मी काहीतरी मार्ग काढेन यावर. थँक्स!

रायगड, अव्यक्त मी, सिंडरेला, अमा सर्वांचे आभार.

थँक्यू mother warrior! माझं सजेशन पॉझिटिव्हली घेतल्याबद्दल आणि हे एक छोटंसं पाऊल उचलल्याबद्दलही.

खरं सांगू का? मदर वॉरियर पेक्षा फक्त मदर लिहिलं तर? वॉरियर या शब्दाने आपण स्वतः कडून अवाजवी अपेक्षा ठेवतो आहोत असं वाटत नाही? राग मानू नका. अधून मधून वॉरियर मोड मध्ये सार्‍यांनाच जावे लागते पण कायम वॉरियर असणे सस्टेनेबल नाही. या प्रवासात गेली दहा वर्षे आम्हा दोघांनी बरेच चढ उतार पहिले आणी थोडासा व्यापक पर्स्पेक्टीव्ह आला. आपण स्वतःसाठी वेळ काढणे, ई ई सूचना वर आल्याच आहेत. सुरुवातीची दोन तीन वर्षे माझ्या पत्नीला फारच त्रास झाला कारण तिच्या मनात एक गिल्ट आलेले होते की तिच्या निष्काळजी पणा ने हे झाले. सुदैवाने अमेरिकेत पब्लिक स्कूल वगैरे इकोसिस्टीम चांगली आहे. माझी नोकरी अशी आहे की मी सोमवार ते शुक्रवार झोपायलाच घरी येतो. पण वीक एंड मध्ये तिला सकाळी स्टार्बक्स मध्ये पिटाळतो की जा, एक कप कॉफी घे, एखादा पेपर खरेदी करून वाचत कॉफी पी. तंबोर्‍याची तार अगदी सैल असू नये, पन इतकीही पिळू नये की तुटून जावी. काही चुकलं तर माफ करा पण जे मनात आलं ते ल्हिलं.

>>> आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. >>> हे वाचून गलबलले.

मनातलं अगदी मनापासून इथे लिहिलं ही एक फार मोठी स्टेप घेतली आहेत तुम्ही. स्वतःला काय हवं आहे याचीही कल्पना आहे तुम्हाला. स्वतःकरता काही सुरू केल्यामुळे मुलावरचा फोकस जाईल असा काही मनातून गिल्ट असेल तर तो दूर करायला हवा. तुम्ही जितक्या आनंदात रहाल तितकी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही मुलाला देऊ शकाल. तो जेव्हा तुमच्यापाशी नसतो त्यावेळेकरता प्रयत्नपूर्वक (त्याची काळजी न करता) स्वतःचे असे खास तुम्हाला आनंददायी वाटेल असे आयुष्य आखा. त्याकरता वर खूप छान छान सल्ले आले आहेतच.

रमडचा सल्ला फारच भावला. पण तरीही नवा आयडी तुम्ही पूर्णपणे वेगळा घ्यावा असे सुचवेन. एखादा छानसा आनंदी, तुमच्या स्वतःची स्वतंत्र ओळख करून देणारा आयडी बघायला नक्कीच आवडेल.

खूप खूप शुभेच्छा. Happy

मदर वॉरिअर,

सीमंतिनींनी लिहिलेलं "लेखनवाचनसिनेमा/नेटबघणे हे उद्योग केले तरी मन काळजी करत राहत. एखादी फिजिकल अॅक्तीव्हिती मागे लावणे फायद्याचे ठरेल." हे अगदी खरे आहे. दिवसातला काही काळ काहीतरी अशी अ‍ॅक्टिव्हीटी करा ज्यात मन आपसूक एंगेज होते आणि शारीरिक श्रमही होतात. उदा. बागकाम ( किंवा अगदी घराबाहेर पडायचं नसेल तर घरातील स्वच्छता स्वतः करणे हेही येऊ शकेल. स्वानुभवाने सांगू शकतो.) याशिवाय दोनेक दिवसांतून एकदा खूप दिवस ज्यांच्याशी अजिबातच संपर्क झालेला नाही अश्या एखाद्या आप्तेष्टाशी, मित्रमैत्रिणीशी संपर्क करून बोला. फक्त ख्यालीखुशालीचा फोन.

तुम्हांला खूप शुभेच्छा व मोठ्ठा हग!

काळजी करून काहीही साध्य होत नाही. उलट सदोदित वाटणारी काळजी ही मनाला व शरीराला पोखरत राहाते. मनाला व शरीराला सशक्त ठेवायचं असेल तर काळजीला रामराम ठोकावा लागेल!

मी एक सांगू का? जेव्हा जेव्हा मनात नकारार्थी विचार येतात, खूप मानसिक थकवा येतो, आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे या विचारांनी मन संत्रस्त होतं, एखाद्या व्यक्तीच्या काळजीने मन व्यथित होतं, तेव्हा या काही गोष्टींवर जरूर विचार करावा. मनाला त्यातून नक्कीच उभारी येते. (स्वानुभव)

~ आजवर तुम्हांला आयुष्यात बर्‍याच चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. चांगली परिस्थिती, चांगली माणसे मिळाली, निसर्गाने दिलेले सक्षम शरीर, बुद्धी व मन लाभले. चांगले शिक्षण मिळाले. आयुष्यात अनेक प्रेरणादायी घटना, माणसे यांना तुम्ही जवळून पाहिले - अनुभवले असेल. या सर्व गोष्टी मनाशी आठवून बघा. यांप्रती कृतज्ञतेची भावना ही खूप दिलासा देणारी असते.

~ कोणकोणत्या गोष्टी / माणसे / वातावरण तुम्हांला प्रेरणा देते, शक्ती देते किंवा आनंद देते याचा शोध घ्या व त्यांच्या संगतीत काही वेळ तरी व्यतीत करत राहा.

~ सर्वात मुख्य म्हणजे स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी वेळ द्या. गिल्ट-फ्री वेळ. मन व शरीर दोघांनाही रेस्ट अ‍ॅन्ड रिजुविनेशन हे खूप आवश्यक आहे, असतं. तसेच इतर कोणा व्यक्तीला तुम्हांला पॅम्पर करायची संधी द्या. कदाचित ती व्यक्ती तुमची पार्टनर असेल, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील किंवा हितचिंतक असतील. अलाऊ युवरसेल्फ टू बी पॅम्पर्ड.

जर तुमचा मेडिटेशनवर विश्वास असेल तर मेडिटेशनचा अनुभव घेऊन पाहा.
यू कॅन ओन्ली गिव्ह व्हॉट यू पझेस.

~ ऑटिझमशी संबंधित नसलेली अशी कोणतीही एखादी तुम्हांला आनंद देणारी, ऊर्जा देणारी अ‍ॅक्टिविटी शोधून त्यासाठी रोज किमान थोडा वेळ देणे. मग ते बासरी वाजवायला शिकणे असेल किंवा साल्सा डान्स असेल किंवा पेन्टिंग करणे असेल किंवा सायकलिंग असेल.... ज्या वातावरणात किंवा जी अ‍ॅक्टिविटी करताना तुम्हांला मजा येते, काळजी विसरायला होते अशी अ‍ॅक्टिविटी.

स्वतःकरता काही सुरू केल्यामुळे मुलावरचा फोकस जाईल असा काही मनातून गिल्ट असेल तर तो दूर करायला हवा. तुम्ही जितक्या आनंदात रहाल तितकी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही मुलाला देऊ शकाल. तो जेव्हा तुमच्यापाशी नसतो त्यावेळेकरता प्रयत्नपूर्वक (त्याची काळजी न करता) स्वतःचे असे खास तुम्हाला आनंददायी वाटेल असे आयुष्य आखा.>> +१

बेबी स्टेप्स. आज तो शाळेत गेलाय मी दहा मिनीटे प्रयत्नपुर्वक त्याचा विचार करणार नाही. तो शाळेत सेफ आहे आणि आनंदी रहाणार आहे. असा विचार करून दहा मिनीटे तुमच्या आवडत्या कुठल्याही गोष्टीवर फोकस करा. तुम्हाला शुभेच्छा! Happy

एक बाप, तुमची पोस्ट पाहून आनंद झाला. प्लीज जमेल तसं अजुन लिहीत जा. आम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुमची हरकत नसेल तर लिहाल का थोडं तुमच्या प्रवासाबद्दल? ऑटीझम स्पेक्ट्रमवर कुठे होता/आहे तुमचा मुलगा? व्हर्बल की नॉन व्हर्बल इत्यादी.

तंबोर्‍याच्या तारेचे वाक्य फारच छान आहे, लक्षात ठेवेन. कायम वॉरियर असणं ही अपेक्षा नाही माझी माझ्याकडून. शक्यही नाही ते. पण तुमची पोस्ट पाहून जाणवलं सततचा आवेश कामाचा नाही! Happy बहुतेक तसंच काहीसं केल्याने थकायला होते आहे.

तुम्ही नक्की लिहा.

मामी, थँक्स.

स्वतःकरता काही सुरू केल्यामुळे मुलावरचा फोकस जाईल असा काही मनातून गिल्ट असेल तर तो दूर करायला हवा. तुम्ही जितक्या आनंदात रहाल तितकी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही मुलाला देऊ शकाल. तो जेव्हा तुमच्यापाशी नसतो त्यावेळेकरता प्रयत्नपूर्वक (त्याची काळजी न करता) स्वतःचे असे खास तुम्हाला आनंददायी वाटेल असे आयुष्य आखा.>> +१

एव्हड्यात कोणता मुव्ही बघितला नसेल तर डॉ. प्रकाश बाबा आमटे नक्की बघा.. खुपच छान मुव्ही आहे..

स्वतःची काळजी घ्या, तुम्ही जेव्हड्या आनंदी रहाल तेव्हडं तुमचं पिल्लु पण आनंदी राहील.. स्वतःला आनंदी रहायचा काय अधिकार वगैरे अजिबात मनात आणु नका. आजुबाजुला कोणी असं म्हणत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा..

Worry is like a revolving chair; it keeps you occupied but takes you nowhere.

Try to visit spa/ beauty salon maybe get body massage / head massage / hair wash/pedicure /facial etc done.

Other day I saw an advertisement on SAP company staff bus that they are recruiting autistic candidates. They were asking candidates to cherish their oneness instead of becoming one of the lot Happy

किती चांगले सल्ले देत आहात सगळे! दुपारपासूनचा माझा दिवस अगदी छान गेला आज! थँक्स!

गजानन, तुम्ही एक महत्वाचा पॉईंट लिहीला आहेत. फोन व गप्पा. हा प्रकार गेल्या २ वर्षात फारच कमी होत गेला. कारण मुलाची डिसॅबिलिटी अजुन जगाला ओपन माईंडने आम्ही सांगू शकत नाही. त्यात एक पॉझिटीव्ह आशेचा किरणही असतो की त्याला थोडा वेळ देऊया, सगळ्या जगाला आत्ताच सांगत बसायची आवश्यकता नाही. त्यामुळे संपर्क कमीच ठेवला जातो. त्यातही मार्ग काढला पाहीजे.

अरूंधती कुलकर्णी, फारच चांगली पोस्ट. थँक्यू! मेडीटेशन कायम माझ्या लिस्टवर असते, मी कधी केले नाही. शिकले नाही. पण ध्यान करण्यासाठी मन एकाग्र करावे लागेल, तरच ध्यान करून मन एकाग्र होईल अशी विचित्र कॅच२२ परिस्थिती होते बर्‍याचदा. काही युट्यूब लिंका मिळाल्या स्टार्टरसाठी तर बरं होईल.

Maybe try and become more active on maayboli, if you're are not. There are always n no. Of topics / discussions are going on and has ability to keep you relaxed for whole day.

There is a collection of fundoo threads by मामी id. Please go through it. Right now चालू घडामोडी group is hot. But you need to pick a side either them or us Happy Also there's various inspirational posts on mouse/rat bb, kids discipline and dogs bb etc. To name a few Happy

Hope it helps.

तुम्हाला आवड असेल व शक्य असेल तर एक भुभु पाळा. अगोदर पेट थेरपीचा वापर करुन पाहा. सच्चा मित्र असतो भुभु!

मदर वॉरिअर, एक सुचवू का? इथे एक व्यायाम ग्रुप आहे, ज्यावर लोकं - आज काय व्यायाम केला, काय खाल्लं ह्याची नोंद करतात. तसंच तुम्ही पण इथे आज स्वतःकरीता काय के लत, किती वेळ केलंत हे लिहायचं.

व्यायाम, गाणी ऐकत चा लणे, बागकाम, एकटे किंवा मैत्रिण्/नवर्‍या बरो बर शॉपिंग, कॉफी/ लंच - बाहेर पडताना मस्त तयार होऊन जाणे, टीव्ही सिरीअल बघणे, मुव्ही बघणे, पुस्तक वाचणे, कोणाला तरी फोन लावून गप्पा मारणे, काहीतरी मस्त जेवायला बनवणे/ बेक करणे - स्वतःच्या किंवा नवर्‍याच्या आवडीचं - यातलं किंवा याहीपेक्षा वेगळं जे आवडत असेल ते रोज एक-एक ठरवून करायच. ... आणि आज काय मज्जा केलीत ते इथे लिहायचं. पटलं तर असं करून बघा...नाही आवडलं तर सोडून द्या!

हॅलो मदर वॉरियर,

http://marc.ucla.edu/body.cfm?id=22 ही बिगीनर लेव्हल ची मेडिटेशन सिरीज आहे. थोडे दिवस केल्यावर मेडिटेशन कोर्स करू शकतेस. हल्ली बरेच कोर्स ओन लाईन असतात (ओप्रा विनफ्रेचा पण आहे, बरा आहे).

लोकांना सांगणे नको वाटणे, त्यांचे प्रश्न, सल्ले नकोसे वाटणे, लोकांना तुझे सतत मुलाच्या काळज्या ऐकणे नको वाटणे, तू त्यांचा सल्ला ऐकला नाहीस अशी त्यांची तक्रार असणे इ इ आणि त्या ओघात कधीतरी तू त्यांचा (किंवा त्यांनी तुझा) संपर्क टाळणे हे खूप साहजिकच घडते. पण पालकत्वाच्या प्रवासातील हे महत्त्वाचे टप्पे आहेत. आता लगेच नाही पण हळूहळू लोकांशी जरूर बोल. जो खरा मित्र परिवार असतो त्याला काही फरक पडत नाही की तुझे मुल कसे आहे. ते प्रेमच करत राहतील त्याच्यावर. (जे खरे नाहीत त्यांचा विचार आपण कशाला करायचा!)

There is a collection of fundoo threads by मामी id. >> धन्यवाद राजसी. ही त्या धाग्याची लिंक :

मायबोलीवरचे धम्माल धागे : http://www.maayboli.com/node/43117

>>>> कारण मुलाची डिसॅबिलिटी अजुन जगाला ओपन माईंडने आम्ही सांगू शकत नाही. त्यात एक पॉझिटीव्ह आशेचा किरणही असतो की त्याला थोडा वेळ देऊया, सगळ्या जगाला आत्ताच सांगत बसायची आवश्यकता नाही. त्यामुळे संपर्क कमीच ठेवला जातो. त्यातही मार्ग काढला पाहीजे. >>>

सत्यमेव जयते मधील LGBT व्यक्तींच्या एपिसोड मध्ये सुरवातीलाच एका मुलाने सेक्स चेंज करून तो मुलगी झाला आहे असा अनुभव सांगितला आहे. त्याच्या आईवडिलांनी एकदा हे अ‍ॅक्सेप्ट केल्यावर स्वतःच्या मोहल्ल्यात सगळ्यांकडे जाऊन ही बातमी सांगितली आणि त्यांना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. हा एपिसोड जरूर बघा. बरेचदा समाज काय म्हणेल किंवा कसा प्रतिसाद देईल याबद्दल आपल्याच मनात गैरसमज असतात.

मी सांगत आहे ते थोडे विचित्र आहे, पण मला स्वताला या गोष्टीचा थोडा फायदा झाला आहे.
माझ्या मुलाला hydrocephalus झालेला आहे, आणि तो slow learner आहे, तुमचे लेख वाचून मला खूप वेळा वाटायचे, कि मी पण या सगळ्यातून गेले आहे. पण तुमचे लेख वाचून मला खूप वेळा प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही सध्या असलेल्या परिस्थितीत मी ३ महिन्यापूर्वी होते. तेवा मी मुलाला स्पीच थेरपी साठी KEM ला नेले होते. तेवा तिथे एक पालक आलेले मुलाला घेऊन, एकदम छोट्या गावातून आलेले होते ते, जास्त शिकलेले पण नवते बहुतेक . त्यांना मुलाला स्पीच थेरपी साठी काय काय करायचे ते पण नीट काळात नवते. ती डॉक्टर त्यांना सांगून खूप वैतागली होती असे दिसत होती. तरी ती सगळे परत परत सांगायचा प्रयत्न करत होती. तेवा मला खरेच त्या मुलाबद्दल वाईट वाटले कि कसे होईल त्याचे, जर त्याने पालक त्याचा त्रास समजू शकले नाही, हे सगळे करू शकले नाही तर कसे होईल. आणि तो मुलगा बराच मोठा होता, त्या पालकांना खूप उशिरा त्याचा प्रोब्लेम कळला होता.
[मला असे नाही म्हणायचे कि कोणी मुद्दाम मुलांकडे लक्ष नाही देत. पण कधी कधी मार्गदर्शन नसेल किंवा वैद्यकीय मदत मिळत च नसेल तर ]तेवा मी विचार केला, असे कितीतरी मुले असतील कि त्यांना नीट treatment पण मिळत नसेल, किंवा छोट्या गावातून लोकांना इतक्या चांगल्या सुविधा पण मिळत नसतील [स्पीच थेरपी/ behavioural therapy ] अशा वेळी मी विचार करते कि आपली स्थिती तरी सुद्धा चांगली आहे. आपल्याला या सुविधा उपलब्ध आहेत. कधी कधी मला वाईट वाटते कि दुसर्यांबद्दल आपण असा वाईट विचार करतो. पण निदान मला या विचाराने बरे वाटते.
असा विचार करा कि मी माझ्या मुलासाठी जे जे शक्य आहे ते सगळे केले/ करत आहे. हा विचार सुद्धा खूप उभारी देतो. अजून एक स्वातीने सुचवल्या प्रमाणे थोडा थोडा वेळ अजिबात या गोष्टीचा विचार न करण्याचा पण फायदा होतो. सुरुवातीला नाही जमत, पण हळू हळू जमते [अवघड आहे, पण मी स्वत केलेले आहे ],
कोणाला प्रतिसाद वाईट वाटला तर सांगा, मी delete करेन.

खूप छान लिहीता आहे सगळे जण ... अ बिग हग mother warrior!..

मामींच्या धाग्याची लिंक आहेच वरती ... खरच छान stress buster aahe

तुमचेच अवलोकनातील लेख वाचलात एका मागोमाग एक तरीही प्रचंड प्रेरणा मिळेल.
बाकी स्ट्रेसबस्टर उपाय म्हणून आवडत्या छंदासाठी तासभर देणे शक्य असेल तर अजुन उत्तम होइल.

आयडी नामांतरण आवडलं.
Happy

यु आर रीअली अ इम्प्रेसिव्ह वारियर.

मदर वॉरियर, एक बाप, तरल सगळ्यांच्या जिद्दीला सलाम!

बाकी सगळ्यांनीही छान सल्ले दिलेयत.

मदर वॉरिअर....

मी वयाने तुला ज्येष्ठ असा इथला एक सदस्य आहे.....आणि "मायबोली" च्या या घरात, जिथे संवादातून निश्चितच आपुलकी न मागताही मिळत असते, मला अगणित असे भाचे आणि भाच्या मिळाल्या आहेत, यांच्यासाठी मी अशोकमामा आहे.....तेव्हा त्या नात्यानेच मी आता इथे लिहितो.

तुझ्यासारखी भाची आयुष्यात आलेल्या एका कठीण (जो ती वर्षानुवर्षे अनुभवत आहे, पण मोडलेली नाही) प्रसंगाची मांडणी इथे जेव्हा मांडते त्यावेळी मला कौतुक वाटते ते प्रथम "मायबोली" या संस्थळाचेच. शेकड्यांनी विषय इथल्या पटलावर येत असतात....सदस्य वाचतात, भाग घेतात, वाद घालतात, रुसवेफुगवे करतात, आयडीवरून वादळ घुमते, अ‍ॅडमिन त्यांचा लेखाजोखा करतात, कालचे वाद आज नसतात, तर आज नवीन विषय येतात, त्यातून परत वेगळे धुमारे फुटतात. अशा या घडामोडीत जेव्हा "मदर वॉरिअर" सारखी एक माता तिच्या आयुष्यातील एक कौटुंबिक घटना वर्णन करते तेव्हा झाडून सारे प्रतिसादक तिला सावरण्यासाठी जी भाषा व धीराच्या गोष्टी करतात, त्या वाचून समजते की सार्‍यांना तुझ्याविषयी किती आत्मियता वाटत आहे. शब्दांची किंमत उमजते ते अशा प्रसंगातूनच. या पटावर तू नेहमीच येत राहिलीस म्हणजे पुन्हा शब्दातूनच तुला जो दिलासा मिळत राहिल त्याची किंमत कोणताही शेअर बाजार करू शकत नाही.

वर प्रतिसादात अनेक सदस्यांनी आमिर खान यांच्या "सत्यमेव जयते" भागाचा उल्लेख केला आहे. फार प्रभावी आहे ते सारेच प्रकरण. एलजीबीटीच नव्हे तर सीझन ३ चे सारेच भाग खूप परिणामकारक उतरले आहेत...."सत्यमेव जयते" च्य साईटवर तिन्ही सीझन्सचे सारेच...जवळपास २०.... एपिसोडस तुला पाहाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातील अनुभव आणि करण्यात आलेले उपाय....झालेली मदत...सहकार्‍याचे हात...हे सारे तुला पाहाणे गरजेचे वाटेल. ह्या एकाच कारणासाठी तुला तुझा वेळ (जो सध्या तुला खूपच चिंताग्रस्त करत आहे) देता येईल आणि त्यातून एक प्रकारे काहीतरी दिलासाही मिळत जाईल अशी मला आशा आहे.

तुझ्या लेखातील "...आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे...." हे वाक्य माझ्यासारख्या सेवानिवृत्त व्यक्तीला फार गलबलून टाकणारे वाटते....मीही त्याच गटातील आहे पण मायबोलीवरील भाचेभाच्यांच्यासोबत होत असलेल्या घरगुती संवादामुळे माझे सध्याचेच आयुष्य फार आनंदाने वाहते झाले आहे असेच मी मानतो, ओंडकाच आहे पण झिजणार नाही याची खात्री आहे....त्याबद्दल कृतज्ञही आहे.

संवादात राहा...तुलाही हाच आनंद प्राप्त होईल.

अशोकमामा

हा धागा वाचत आहे लिहावसं वाटत होतं पण काय लिहू कळत नव्हतं! पण सगळ्यात पहिल्यांदा अ बिग वॉर्म हग! तुमच्यात एवढे प्रेम आणि बळ आहे म्हणूनच देवाने तुम्हावर ही जबाबदारी टाकली आहे!

जेवढे शक्य असेल तेवढे तुमच्या मुलाच्या बाबतीत ओपन रहा! जी खरोखरीची स्नेही मंडळी असतील त्यांना काही फरक पडत नाही! आपली माणसं आपली असतात...those who matter do not mind and those who mind do not matter! Reconnect to people! इथे मायबोलीवर या! खूप मजा चालू असते इथे Happy

सगळे प्रतिसाद +१
नव्याने काही लिहायला माझ्याकडे नाही कारण मी अनुभवाने फारच लहान आहे सगळ्याच बाबतीत Happy

फक्त मला तुमचा अभिमान वाटतो आणि आय एम विथ यू ऑल्वेज इतकंच सांगायला ही पोस्ट Happy

तुमचे अस्वस्थ करणारे शब्द वाचून मन गलबललं. वर सर्वांनी चांगल्या suggestions केल्या आहेतच.
काळजी घ्या. खरं तर काय लिहू ते कळत नाहिये. आवडीच्या गोष्टीत मन रमवण्याचा नक्की फायदा होइल. थोडा वेळ झुंबा अथवा तत्सम व्यायामाला देता येइल का? व्यायामाने मनःस्थिती सुधारायला मदत होईल.
स्वतःकडे लक्ष देण्यात काही चूक नाही. स्वतःसाठी वेळ काढून आनंदी राहिलात तर तुमच्याबरोबरच बाळाला पण फायदा होईल. आपली शरीरभाषा मुलाला समजते.
ए बिग वॉर्म हग.

Pages