दह्यातलं कारलं

Submitted by चिन्नु on 14 October, 2014 - 08:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ मध्यम कारली, १ वाटी दही, धनेपूड, जीरेपूड, तिखट, मीठ, आले-लसून पेस्ट प्रत्येकी एक चमचा, थोडे मोहरीचे तेल, थोडे पाणी, मीठ, ४ मोठे चमचे बेसन (किंवा स्टफींगला लागेल तसे), एक छोटा कांदा, शॅलोफ्रायसाठी तेल, फोडणी वापरत असाल तर. एक दोन हिरव्या मिरच्या व कोथिंबीर भाजीवर पेरायला.

क्रमवार पाककृती: 

एका मिक्सिंग बोलमध्ये दही, तिखट, मीठ (ग्रेव्हीला लागेल तसे अंदाजे), धने पूड, आले-लसूण पेस्ट घाला. हवे असल्यास यात थोडे बेसन घालू शकता. एका पॅनमध्ये चमचाभर मोहरीचे तेल गरम करा. त्यात चिमूट हळद घाला. हे दह्यात घाला. नीट मिक्स करून मिश्रण साधारण १० मिनिटे बाजूला ठेवावे. तोवर कारली स्टफ करून शिजवून घ्या.
त्यासाठी कारली धुवून पुसा व वरील भाग थोडा खरवडून घ्या. ती स्टफ करण्यासाठी मध्ये चिरा. बिया काढून टाका. बिया वापरत असाल तर स्टफिंगमध्ये घाला.
एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा. बारीक चिरलेला कांदा घाला. गुलाबीसर परता. त्यात तिखट मीठ बेसन घाला. खालून लागू न देता मिक्स करून घ्या. मिश्रण रवाळ असले तरी स्टफ केल्यावर नीट बसते कारल्यात. तरी वाटलेच तर थोडे पाणी शिंपडा. आता स्टफिंग कारल्यात भरावे. हवे असल्यास दोरीने बांधा.
पॅनमध्ये थोडे मोहरीचे तेल घ्या. कारली त्यावर शॅलोफ्राय करा. झाकण ठेवून कारली शिजू द्या. जरा मऊसर व्हायला हवीत. ५ ते ७ मिनिटे शिजवा. मधून मधून स्टफिंग ओघळू न देता हलवा.
दुसर्‍या पॅनम्ध्ये मोहरीचे तेल गरम करा. फोडणी ऑप्शनल आहे. तेल गरम झाल्यावर दह्याचे मिश्रण ओता. दही कडसर न होउ देता हात भराभर चालवा. उकळी आली की तीत शिजवलेली कारली सोडा. गॅस सिम वर करून झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा. एका छानश्या बोलमध्ये काढून स्लिट केलेल्या मिरच्या व कोथिंबीर पेरा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ झणांसाठी अंदाजे
अधिक टिपा: 

तिखट मिठाचे प्रमाण चवीनुसार घ्यावे. दही आंबट असल्यास लज्जत वाढते. दह्याच्या मिश्रणात बेसन नसेल घातले तरी स्टफिंगमध्ये असल्याने चव येते, पण ग्रेव्ही दाट हवी असल्यास बेसन दह्याच्या मिश्रणात घालावे. दोन तीन पॅन्स नसतील किंवा झटपट कामं करता येत नसेल तर लागणारा वेळ वाढू शकतो!

माहितीचा स्रोत: 
टिव्हीवरील कुकरी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासाठी अगदी नवीन पाककृती आहे. आवडली. चिन्नू, जमलं तर फोटो टाका.

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी एरवी चकत्या करून मिठाच्या पाण्यात बुडवणं किंवा मीठ लावून पिळून काढणं प्रकार करतात. तसं अख्ख्या कारल्यासाठी काय करता येईल? यातली कारली खूप कडू नाही का लागत?

अरे वा! वेगळाच प्रकार. मी शेंगदाणा तेल वापरून करून बघणार.
एक प्रश्न: कारल्याच्या बिया स्टफिंगमध्ये घातल्या तर अतिकडू होत नाही का?

मी टिपीकल सारस्वती 'कारल्याचं सासम' खाल्लं आहे. फारच चविष्ट! दह्यातलीच कारली, पण भरलेली नव्हती, तळलेल्या काचर्‍या दह्यात घातल्या होत्या. मस्त आंबट गोड कडू तिखट अशी चव. मला वाटतं मी कुठेतरी (बहुतेक लालूने मावेत कारली कुरकुरीत करण्याची रेसिपी लिहिली होती तिकडे) लिहिलं आहे या पाकृविषयी.

ठँक यू. फोटो नाहीये, पुढच्या वेळेस Happy
मृण, कारली शॅलोफ्राय तसेच स्टीम करतो आणि ग्रेव्हीचा आंबटपणा कारली शोषतात. पण तरी मूळ कडवटपणा पूर्णपणे जात नाही. कारल्याची पाठ खरवडल्याने तसेच आत पोकळी केल्याने थोडा कडवटपणा जाईल. तरी वाटल्यास मिठाच्या पाण्यात घालून बघणे. ही रेस्पी म्हणजे दोन-तीन रेस्पीमिक्स आहे Happy जरा राजस्थानी पाकृकडे झुकणारा प्रकार.
या ग्रेव्हीत शिमला मिर्च मोठे तुकडे करून, फरसबी वगेरे वाफवून घालता येतील. शिमला मिर्ची अशीच स्टफ करता येइल पण कारली ती कारलीच Happy

थँक्यू चिन्नू!

सगळा कडूपणा घालवायचा नाहीये, पण अगदी कडूजहर कारलं खाववणार नाही म्हणून चौकश्या. Happy

लवकरच करून बघेन.

Happy
मंजुताई, काही ज्ये.नांना बिया टाकवत नाहीत, त्यांच्यासाठी लिहीलं होतं. ऑप्शनल आहे बिया वापरणे. मी तरी नाही वापरत. काचर्‍या केल्या तर राहू देते फक्त.

मस्त वाटतेय रेसिपी चिन्नु.
घरी चिल्लरपार्टी पण कार्ले फॅन क्लब मधेआहेत. छोटी कारली मिळाली की लगेच करण्यात येईल .

एकदम वेगळी दिसतेय रेसेपी. पण मला काचर्‍यांशिवाय कारल्याचं दुसरं काहीही व्यवस्थित जमत नाही. साबांचं कारलं स्पेशल असत्म अगदी.
जरा हिम्मत करून, करुन बघेन.(गेल्या वेळी मी केलेली भरली कारली माझ्याच्यानी पण खाववली नव्हती.) Happy

मस्तय. सासरी कारली नेहमी मोहरीच्या तेलातच करतात. अप्रतिम लागतात. मसाल्यात बडीशोप मिक्सरवर बारीक करून घातल्यास अतिशय चविष्ट लागतात.

थँक यू. कराल तर फोटू डकवा प्लीज Happy
मामी, बडीशेपेचा स्वाद छान येतो. जर ग्रेव्ही न करता भरली कारली केली तर वरच्या मिश्रणातच बडीशेप घालून मस्त होतात कारली. एक सिंधी काकू कारली स्टफ करण्याआधी आतून पूर्ण खरवडून लसणीची पाकळी फिरवून घेतात. त्यानी स्वाद आता है म्हणाल्या. Happy

मस्तय. सासरी कारली नेहमी मोहरीच्या तेलातच करतात. अप्रतिम लागतात. मसाल्यात बडीशोप मिक्सरवर बारीक करून घातल्यास अतिशय चविष्ट लागतात. >>> सगळ्याला सेम पिंच.

मस्तयं रेसिपी.. काल वेळ नव्हता म्हणुन सेम मसाला वापरुन कारल्याच्या काचर्या केल्या.. धनेपुड करताना त्यात बडीशोप पण आला .. चव मस्त आली Happy

मी कारलं खातेय हे बघुन मातोश्री आश्चर्यचकित झाल्यात .. बट आय लाईक इट नाऊ!

कारलं ... कसही केलेलं असो ....... माझं अत्यंत आवडतं. मग त्यात इतके मसाले / दही घातलं तर विचारायलाच नको.

रेसिपी खरंच वेगळीच आहे .. ट्राय करून बघेन .. Happy

फक्त फोडणीवर दही घालणे हे प्रकरण मला आजतागायत जमलेलं नाही .. तेव्हा दह्यावर फोडणी घालेन ..

सशल, फोडणी ऑप्शनल आहे. मोहरीच्या तेलावर दह्याचं मिश्रण घालायचं, आणि हात भराभर चालवायचा. मिश्रणातले मसाले आणि मोहरीचं तेल छान मिक्स होतात. दहीचं टेक्स्चर बदलतं.

आशु२९, मोहरी तेल वापरले होतेस का? कोणता ब्रँड ? मोहरी तेल वापरणे जरा नको वाटतेय- वासामुळे कुणीच नाही खाणार भाजी असे नको व्हायला. आज संध्याकाळी दह्यातले कारले बेत आहे Happy

Pages