'विजयाबाई आणि आपण' - 'झिम्मा'तील निवडक भागाचं अभिवाचन

Submitted by चिनूक्स on 2 September, 2014 - 22:35
मराठी सांस्कृतिक विश्वात 'बाई' या संबोधनात प्रेम, आदर, दरारा अशा अनेक भावना एकाच वेळी ऐकू येतात. बाई म्हणजे विजयाबाई. विजया मेहता. विजयाबाई तेवीस वर्षांच्या होत्या, तेव्हा विजय तेंडुलकरांनी त्यांना ही पदवी बहाल केली. अतीव आदरापोटी. सहा दशकांहूनही अधिक असलेल्या रंगभूमीवरच्या वावरात बाईंनी आपल्या जबरदस्त कर्तृत्वानं आपली आणि तेंडुलकरांनी बहाल केलेल्या नामाभिधानाची योग्यता वारंवार सिद्ध केली.

बाईंचं काम खरंच खूप मोठं. समविचारी मंडळींना बरोबर घेऊन त्यांनी नाट्यचळवळ उभारली. 'श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकं-एकांकिका, तसंच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या दिग्दर्शनामुळे अजरामर झाल्या. त्यांनी भारतीय नाटक परदेशात नेलं. उत्तमोत्तम भारतीय नाट्यकृती परदेशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, या ध्यासातून त्यांनी जर्मन दिग्दर्शक फ्रिट्‌झ् बेनेव्हिट्‌झ् व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या सहकार्यानं ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग परदेशी मंचांवर सादर केले.

बाई जितक्या उत्तम दिग्दर्शिका, तितक्याच कसदार अभिनेत्रीही. संध्याछाया‘मधली मुलाच्या आठवणीत झुरणारी नानी, ‘बॅरिस्टर‘मधली केशवपन केलेली, स्वतःच्या भावना दडपणारी मावशी, ‘हमीदाबाईची कोठी‘मधली हमीदाबाई, ‘वाडा चिरेबंदी‘मधली गतवैभवाच्या आठवणी जागवणारी आई, 'स्मृतिचित्रे'मधल्या लक्ष्मीबाई टिळक अशा अनेक भूमिका विजयाबाईंनी गोळीबंद संवाद, अचूक देहबोली, व्यक्तिरेखेचा खोल अभ्यास यांच्या मदतीनं जिवंत केल्या.

बाईंच्या तमाम शिष्यांनीही मोठं नाव कमावलं. विक्रम गोखले, नाना पाटेकर, रीमा, भक्ती बर्वे, उषा नाडकर्णी, सुहास जोशी, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, उदय म्हैसकर अशा अनेक तगड्या कलाकारांची फौज बाईंच्या हाताखाली तयार झाली.

'झिम्मा - आठवणींचा गोफ' हे विजयाबाईंचं आत्मचरित्र. घरातली वडीलधारी व्यक्ती संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आरामखुर्चीत शांतपणे बसलेली असावी, आणि तिच्या पायाशी छान मांडी घालून बसलेल्या लहानांसमोर तिनं विश्वासानं आपल्या आयुष्याचं गाठोडं उघडावं, तसं वाटायला लावणारं विजयाबाईंचा सफरनामा - 'झिम्मा'. म्हटलं तर या आठवणी. 'रंगायन'च्या, 'एनसीपीए'च्या, अतिशय कर्तृत्ववान अशा जयवंत,खोटे आणि मेहता कुटुंबांच्या, केशवराव दाते - मा. दत्ताराम - नटवर्य मामा पेंडसे यांच्यासारख्या नटोत्तमांच्या, तयार केलेल्या एकसे एक शिष्यांच्या, तेंडुलकर-दळवी-एलकुंचवार-कर्नाड यांसारख्या नाटककारांच्या, श्रीपु-अरविंद देशपांडे-माधव वाटवे-दीनानाथ दलाल-गोडसे-फ्रीट्झ बेनेविट्झ्-पीटर ब्रूक्स-आदी मर्झबान-एब्राहीम अल्काझी-डॉ. श्रीराम लागू-पु. ल. देशपांडे अशा नाट्यप्रेमी वल्लींच्या आणि मराठी रंगभूमीला नवतेकडे नेणार्‍या नाटकांच्या-एकांकिकांच्या आणि ही नाटकं प्रेक्षकांपुढे आणणार्‍या विजयाबाई (जयवंत / खोटे / मेहता) नावाच्या समर्थ दिग्दर्शिकेच्या आणि अभिनेत्रीच्या. म्हटलं तर हा आत्मशोध. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, जडणघडणीचा साक्षेपी आत्मशोध. आणि हा आत्मशोध घेताघेता केलेलं चिंतन - रंगभूमीचं प्रयोजन आणि मर्यादा, समाजाची अभिरूची, निर्मितीमागच्या प्रेरणा आणि प्रक्रिया यांबद्दलचं.

आपण दस्तऐवजीकरणाच्या बाबतीत भारी उदासीन. अनेक थोर कलावंतांबद्दल आणि कलाकृतींबद्दल आज केवळ ऐकायला मिळतं. विजयाबाईंनी 'झिम्मा'च्या रूपात आपला प्रवास शब्दबद्ध केला, याला त्यामुळे खूप महत्त्व आहे. विजयाबाईंचा काळ हा पुनर्निर्माणाचा काळ होता. विजयाबाई या त्या काळातल्या तरुणाईचं प्रतीक होत्या. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींबद्दल वाचायला मिळणं, ही म्हणूनच एक महत्त्वाची घटना आहे.

'झिम्मा'चं प्रकाशन २०१२ साली झालं ते आशय सांस्कृतिक यांनी आयोजिलेल्या 'पुलोत्सवा'त. पुलंच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त आशय सांस्कृतिकच्या वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी 'पुलोत्सव' पहिल्यांदा आयोजित केला. पुलंची भ्रमंती साहित्य-नाट्य-संगीत-चित्रपट अशा सर्व क्षेत्रांत होती. त्यांच्या भरीव कामगिरीला यथोचित अभिवादन करण्यासाठी सर्व कलांचा मेळ असलेला 'पुलोत्सव' नंतर दरवर्षी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत आयोजित केला जाऊ लागला. उत्तमोत्तम लघुपटांचं प्रदर्शन, मुलाखती, गायनाच्या मैफली, बहुरूपी आविष्कार यांबरोबरच विविध क्षेत्रांतल्या दिग्गजांचे आणि तरुण वयात कर्तृत्व गाजवलेल्यांचे सत्कार असं या उत्सवाचं स्वरूप असतं. गेली अनेक वर्षं आशय सांस्कृतिक 'पुलोत्सवा'चं अतिशय सुंदर आयोजन करत आले आहेत.

Zimma.jpg

'झिम्मा' मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Zimma.html

'पुलोत्सवा'त झालेलं 'झिम्मा'चं प्रकाशन हा एक अप्रतिम देखणा असा सोहळा होता. प्रकाशनसमारंभासाठी खुद्द विजयाबाई उपस्थित होत्याच, पण या निमित्तानं विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रीमा, भारती आचरेकर, रवींद्र मंकणी, प्रदीप वेलणकर आणि नाना पाटेकर या त्यांच्या शिष्यांनी 'झिम्मा'तल्या निवडक भागाचं वाचन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं स्वाती चिटणीस यांनी. 'विजयाबाई आणि आपण' असं या कार्यक्रमाचं शीर्षक होतं.

या कार्यक्रमातली विजयाबाई, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे, विक्रम गोखले, नाना पाटेकर यांची भाषणं आणि मराठी रंगभूमीवर राज्य करणार्‍या कलावंतांनी केलेलं वाचन महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत. विजयाबाईंच्या नाटकांच्या आणि एकांकिकांच्या ध्वनिचित्रफिती उपलब्ध नाहीत. त्यांचा चित्रपटातला वावर अनुभवता आला, तरी रंगभूमीवरच्या त्यांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या अफाट कर्तृत्वाबद्दल आज केवळ वाचता येतं. त्यामुळे 'पुलोत्सवा'त वाचनाच्या स्वरूपात का होईना, पण या दिग्गजांचा रंगभूमीवरचा एकत्रित वावर अनुभवता आला, ही रसिकांसाठी आनंददायक बाब होती.

'पुलोत्सवा'तल्या 'विजयाबाई आणि आपण' या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण यंदाच्या गणेशोत्सवात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हा अमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोली.कॉम श्री. वीरेंद्र चित्राव, श्री, सतीश जकातदार, श्री. अजित भुरे आणि श्री. दिलीप माजगावकर यांची ऋणी आहे.

***

'विजयाबाई आणि आपण' - भाग १


***


'विजयाबाई आणि आपण' - भाग २

·
***


'विजयाबाई आणि आपण' - भाग ३


***


'विजयाबाई आणि आपण' - भाग ४


***


ही ध्वनिचित्रमुद्रणं मायबोली.कॉमवर उपलब्ध करून दिल्याबद्दल व ती मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. वीरेंद्र चित्राव (आशय सांस्कृतिक, पुणे), श्री. सतीश जकातदार (आशय सांस्कृतिक, पुणे), श्री. अजित भुरे, श्री. दिलीप माजगावकर (राजहंस प्रकाशन, पुणे) यांचे मनःपूर्वक आभार.

***


या ध्वनिचित्रमुद्रणांचे सारे हक्क संबंधितांकडे सुरक्षित आहेत. ध्वनिचित्रमुद्रणांचा कुठल्याही स्वरूपात इतरत्र वापर करण्यास परवानगी नाही.

***


विजयाबाईंची एक सुंदर, दीर्घ मुलाखत श्री. माधव वझे यांनी 'सा. सकाळ'च्या दिवाळी अंकासाठी घेतली होती. 'सा. सकाळ'च्याच दिवाळी अंकांसाठी माधव वझे यांनी सुहास जोशी, सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, नसिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, बी. व्ही. कारंथ, रतन थिय्यम, भास्कर चंदावरकर, सतीश आळेकर, वीणापाणी चावला, सत्यदेव दुबे या दिग्गजांच्या मुलाखतीही घेतल्या. या सार्‍या मुलाखतींचं संकलन राजहंस प्रकाशनाने 'रंगमुद्रा' या पुस्तकात केलं आहे.

Rangamudra.jpg


हे पुस्तकही मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Rangmudra.html

भारतात रुपये तीनशेहून अधिक खरेदीवर शिपिंग मोफत

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद - चिनूक्स. इतक्या सुंदर मेजवानी बद्दल.चवीचवीन आस्वाद घ्यायचाय.भाग १ ऐकून झाला. हळूहळू बाकीचे ऐकणार.

सुंदर ओळख. विजया मेहता यांच्या एकाही कलाकृतीची ध्वनिचित्रफीत उपलब्ध नसावी हे दुर्दैवच. मराठी रंगभूमीवरील अभिनयसंस्था म्हणावी असं व्यक्तित्व असणाऱ्या बाईंचा प्रवास पुस्तकरुपात तरी शब्दबद्ध झाला हे भाग्यच. अभिवाचन इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.

सुरेखच!!
इथे हे सगळं उपलब्ध करून दिल्याबद्दल माबो आणि लष्करच्या भाकर्‍या भाजल्याबद्दल चिनूक्सचे मनापासून आभार Happy

माझ्या अत्यंत आवडत्या कलाकार. हे वाचन म्हणजे पर्वणीच आहे.
त्यांच्या अनेक नाटकांचे दूरदर्शनवर सादरीकरण झाले होते पण ते चित्रण आता उपलब्ध नाही ( हे बाईंनीच लिहिले आहे ) त्यांनीच आता लक्ष घालून, नवे कलाकार घेऊन त्या नाटकांचे चित्रीकरण करायला हवे.

बॅरीष्टर, अखेरचा सवाल, संध्याछाया हि नाटके मराठीतच, तर हवेली बुलंद थी ( वाडा चिरेबंदी ) आणि हमिदाबाई कि कोठी हि नाटके हिंदीत सादर झाली होती.

त्यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकांचेही सादरीकरण झाले होते---कुणाकडे ते खाजगी स्वरुपात असेल अशी वेडी आशा आहे मला.

ललित कलादर्शचे मालक भालचंद्र उर्फ चंदूअण्णा पेंढारकर हे साहित्य संघाच्या सहकार्याने तिथे होणारी नाटकं...पुढील पिढीसाठी एक मार्गदर्शक दस्त-ऐवज म्हणून ध्वनीमुद्रित करून ठेवतात असे ऐकलंय...ध्वनीचित्रमुद्रितही करत असल्यास कल्पना नाही...पण त्यांच्याकडे चौकशी करायला काहीच हरकत नाहीये.

धन्यवाद - चिनूक्स. इतक्या सुंदर मेजवानी बद्दल.चवीचवीन आस्वाद घ्यायचाय.बाग १ ऐकून झाला. हळूहळू बाकीचे ऐकणार

अगदि माझ्याहि ह्याच भाव्ना आहेत.

मनापासून धन्यवाद

धन्यवाद - चिनूक्स.
स्वतःच ज्याबद्दल आग्रही असत ते संकेत मोडून [ अर्थात प्रेक्षकांची विनम्रपणे परवानगी घेवून] विक्रम गोखले यानी एका नाटकाच्या मध्यंतरात प्रेक्षागृहातल्या विजयाबाईना स्टेजवर आमंत्रित करून, त्याना भावूकपणे 'माझी व नाट्यक्षेत्राची माऊली' संबोधून चक्क साष्टांग नमस्कार घातल्याचं पहाणं, हा एक अविस्मरणीय योग माझ्या नशीबीं होता. 'बाई' नि:संशय ग्रेट आहेत.

पर्वणीच!!!! >> +१

प्रस्तावनाही सुरेख झालीये! अजून ऐकणं झालं नाही आहे (आजच ऐकेन) पण इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

चिनुक्स,

अतिशय उत्तम खजिना दिल्याबददल त्रिवार धन्यवाद !

काल चारही क्लिप्स डाउनलोड होईपर्यंत एक क्लिप पाहीली. मंत्रमुग्ध झालो.

आपल्या या पोस्टमुळे एक चांगले पुस्तक संग्रही येईल शिवाय हा चालता बोलता खजिना मिळाला तो वेगळाच.

बुकगंगा वर याची उपल्ब्ध असलेली पाने वाचली. हे संपूच नये असे वाटत होते. त्यामुळे पुस्तक घेण्याची उत्सुकता अजुन वाढली.

पुन्हा एकदा धन्यवाद !!

असेच काही असल्यास पोस्ट करत राहा.

तुम्ही जर नाटकवेडे असाल तर मधुकर तोरड्मलांचे 'तिसरी घंटा', डॉ. लागुंचे ''लमाण'' व दिलीप प्रभावळकरांचे 'एका खेळीयाने' अवश्य वाचा.

केदार

उत्तम. अनेक धन्यवाद.
भारतीताईंचे गायन ऐकून अंगावर काटा आला. सूफी पण अगदी पर्फेक्ट पकडले आहे. त्यात इत्र संदल....
शेवटच्या यात्रेचा जीवघेणा सुगंध. सर्व ज्येष्ठ नटवर्यांचे उत्तम अ‍ॅक्सेंट्स व पर्फेक्ट डिक्षन ऐकून फार छान वाटले. यातली बरीचशी नाटके टीव्हीवर किंवा प्रत्यक्ष पाहिली आहेत.

खूप खूप धन्यवाद, चिनुक्स. इतक्या सुंदर मेजवानी बद्दल.

भारतीताईंचे गायन ऐकून अंगावर काटा आला. >> +१

काल सरव भाग ऐकले/पाहिले. खरच मेजवानी होती. अनेकानेक धन्यवाद!
मला रीमाचं अभिवाचन खूप आवडलं, शिवाय अमांनी म्हटल्याप्रमाणे भारती आचरेकरांचं गाणं. नाना पाटेकरचं सुरवातीचं भाषणही मस्तच.

काय भारी झालंय हे! माझी संध्याकाळ सार्थकी लागली!सगळेजण किती आपुलकीने बोलले आहेत. सगळीच अभिवाचनं सुरेख! मला रीमा लागूंचं विशेष आवडलं. हे पुस्तक गेल्या भारतवारीत अधाश्यासारखं वाचलं होतं. आता संधी मिळाली की पुन्हा सावकाश वाचणार आहे. पण विजयाबाईंच्या कारकीर्दीच्या काळात कळत्या वयात नसल्याने स्वतःच्या आठवणींशी कनेक्ट होण्यासारखं काहीच नाही माझ्याजवळ याची खंत वाटते.

सुरेख.... खूप खूप आभार ....इतके सुंदर अभिवचन ऐकण्याची, पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ..

चिन्मय, मनःपूर्वक __/\__ .

हा लेख गणेशोत्सवात असल्यामुळे रोज नविन लेखन, क्लिप्स वाढत राहतील अशी वेडी आशा होती Happy

वा! वा! सुरेख!
पुस्तक वाचतानाचे क्षण पुन्हा अनुभवले Happy
बाईंचा शिष्यगण कसला तगडा म्हणायचा हा!!