राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकजी,
अत्यन्त सुन्दर व संयमपूर्ण लेख. दूरदर्शनला आपल्यासारखे अभ्यासु लेखक मिळाले तर मालिका प्रेक्षणीय तर होतीलच, पण इतिहासाशी प्रामाणिक पण रहातील.

आपले कादंबरी आणि इतिहास याविषयीचे मत वाचून आनंद झाला, कारण बहुतेक कादंबरया वाचतांना नेहेमीच वाटायचे कि हे खरेच असेल, का लेखकाचे कल्पनारंजन? (उदा: स्वामी, राधेय, मृत्युंजय ...).

विषयाची निवड आणि अभिनिवेशारहित लेखनाविषयी अभिनंदन.

(वरील सर्व प्रतिक्रिया वाचून पण अतिशय आनंद झाला - मराठीला अजून तरी बरे दिवस आहेत.)

हुश्श! आत्ता नीट शांतपणे वाचुन काढला लेख.. मामा तुस्सी ग्रेट हो.. मस्त लिहिलय..

का कुणास ठाउक पण मला रमा या नावातच खूप प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य आहे अस वाटत आलय. हे नाव उच्चारल तरी डोळ्यासमोर येणारी मूर्ती ही एका सद्गुणी, सालस व्यक्तीची प्रतिमा समोर येते..

सुरेख, अप्रतिम लेख! Happy
या सगळ्या पेशवाईतल्या स्त्रीयांची एकत्र माहिती अशी कुठे वाचायला मिळालीच नव्हती.
मामा, मोठं जिकीरीचं काम केलत. Happy

मी_आर्या :
<सुरेख, अप्रतिम लेख!
या सगळ्या पेशवाईतल्या स्त्रीयांची एकत्र माहिती अशी कुठे वाचायला मिळालीच नव्हती.
मामा, मोठं जिकीरीचं काम केलत. >
+1111111111111111111111111111111111

या सगळ्या पेशवाईतल्या स्त्रीयांची एकत्र माहिती अशी कुठे वाचायला मिळालीच नव्हती.>>+222222222

सुरेख लेख मामा. अभिनंदन..
<का कुणास ठाउक पण मला रमा या नावातच खूप प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य आहे अस वाटत आलय. हे नाव उच्चारल तरी डोळ्यासमोर येणारी मूर्ती ही एका सद्गुणी, सालस व्यक्तीची प्रतिमा समोर येते..>
हा स्वामी पुस्तक आणि मालिका या दोन्हीचा इफेक्ट असावा Happy

उद्या 'रमा माधव' हा चित्रपट रिलीज होत आहे त्यानिमित्ताने खोदकाम केले आणि हा सुंदर लेख व त्या खालचे प्रतिसाद वाचनात आले. वर कुणीतरी म्हटलंय तसं अत्यंत नॉन-जजमेंटल माहितीबद्दल अनेक धन्यवाद अशोकमामा Happy

पहिल्यापासून मला ऐतिहासिक कादंबर्‍यांचे फारसे आकर्षण वाटत नाही कारण कल्पनाविलास करण्याच्या नादात सत्यापासून फारकत घेतलेली असू शकेल हेच सारखे मनात येत राहते. त्यातली भाषा, वातावरण भुरळ घालते पण सारखे द्वंद्वच उभे राहते तपशील वाचताना. त्यापेक्षा असे तटस्थ वर्णनच वाचायला आवडते. जसे रमामाधवाबद्दल वाचतानाही रमा स्वेच्छेने सती गेली असेल का, त्यांच्यातले सहजीवन खरंच इतके आदर्श असेल का असे प्रश्न पडतच होते पण प्रतिसादांत छान चर्चा झाली आहे त्यावर. असे असूनही 'रमा माधव' बघायला खूप उत्सुक आहे Happy म्हणून नेट धुंडाळते आहे गेले दोन दिवस.

खरंतर पेशवाईवरचे एखादे पुस्तक आणून वाचले पाहिजे. मृणाल कुलकर्णींनी पेशवाईवर श्रीराम साठे (???) ह्यांनी लिहिलेल्या नऊशेपानी पुस्तकाचा उल्लेख केला होता बहुतेक. शाळेत जे काय थोडेबहुत वाचले असेल त्यानंतर पेशवाईत इतका इंटरेस्ट वाटला नव्हता कधीच. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे कलाकृती लोकांच्या मनात इतिहासाबद्दल ओढ निर्माण करतात हे मात्र अगदी खरे !

अतिशय अतिशय सुरेख लेख . लेखनशैली उत्कृष्ठ
डिटेल मध्ये माहिती मिळाली अगदी प्रतिसादात सुद्धा
असच छान लिहित रहा Happy

रमा माधव चा ट्रेलर पाहिला, पण का कोण जाणे मला नाही फारसा आवडला, फारच भडक भडक आणि खुपच नाट्यमय वाटत आहे. पुर्ण पाहिल्याशिवाय कळणार नाही.

अगो, रमा-माधव ही सत्य परिस्थितीचा आधार घेऊन फुलवलेली प्रेमकथा आहे. अतिशय लहान वयातले नवराबायको, त्या काळातली सामाजिक, कौटुम्बिक बंधने, वागायचे नियम यात नवराबायकोचं नातं कितपत फुलायला वाव होता माहित नाही, त्यात सतत राज्यकारभारात गुंतलेले माधवराव आणि अकाली आजाराने झालेला मृत्यू, बरोबर रमाबाई सती गेल्या. ही सत्यपरिस्थिती. त्यातल्या लेखकासाठी आणि लेखकालाच दिसणार्‍या 'जागा' हेरून त्यात कल्पनाविलास आणि प्रतिभेची जोड देऊन रणजित देसायांनी रमा-माधवाची प्रेमकथा उभी केली. अतिशय सुरेखपणे.

पण म्हणून ती बाजीराव-मस्तानी सारखी 'ऐतिहासिक' प्रेमकथा नक्कीच नाही. ऐतिहासिक पात्रांना घेऊन बेतलेली प्रेमकथा आहे. शेक्सपीअर इन लव्ह सारखी.

मला सिनेमाचा लुक आवडला. प्रॉडक्शन व्हॅल्यूज छान वाटताहेत. पण तेवढंच. पहाताना तरी मी ऐतिहासिक प्रेमकथा म्हणून नाही पाहू शकणार. हिस्टॉरिकल फिक्शन म्हणूनच बघणार.

मोहन की मीरा
आनंदी बाई ची समाधी व रहाता वाडा नाशीक येथे आनंद वल्ली येथे आहे ( कॉलेज रोड हुन सातपुर ला जाताना आम्हाला रिक्षा वाल्याने नेलं होतं. मला आवड आहे पाहुन त्याने तो वाडा आतुन दाखवायचे प्रयत्न पण केले होते). शेवट पर्यंत ती तीथेच राहीली. नवरा पेशवा व्हावा म्हणुन तिने खुप प्रयत्न केले. पण ज्या वेळेस नारायण राव म्रुत्यु प्रकरण झाले तेंव्हा ती फक्त १८-२० वर्षांची असावी. त्यावरुन तिची तयारी दिसुन येते. नंतर ही तिने नाना साहेब आणि सखाराम बापु बोकीलांना हैराण केले होते. तिचा सगळा खर्च पेशवाईतुनच चालत होता. तिच्यासाठी एक कारभारी पण होता. तो तर तिच्या नखर्‍यांनी हैराण झाला होता. तिने नवरा पेशवा होताना पाहिले नाही पण मुलगा पेशवा झालेला पाहिला. पण तिच बीज किडकं नीघालं. त्याच्याच हातुन पेशवाईचा अंत व्ह्यायचा होता.

आनंदीबार्इंच्या पोटी जन्मलेला दुसरा बाजीराव मुळे पेशवार्इंचा अंत झाला हे म्हणणे जरी खरे असले तरी या अंताची दुसरी बाजूही ही. हा धागा याचा खल काढण्यासाठी मी करत नाही. मात्र, लवकरच दुसºया बाजीरावाविषयी माहिती मी येथे देतो. कावळा बसायला व फांदी मोडायला अशीच काहीशी बाजाीरावची स्थिती पेशवे पदावर बसल्यावर झाली होती. आपल्या दृष्टीने कावळा म्हणजे ‘बाजीराव’ व फांदी म्हणजे अर्थातच ‘मराठेशाही’, पेशवाई...

त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. >>>
आज 'रमा-माधव' पाहिला त्यात पानीपताच्या लढाईवर जाण्याआधी त्याचे लग्न झालेले दाखवले आहे. बायकोचे नाव लक्ष्मी दाखवले आहे. तसेच तो मारला गेल्यावर तिचे केशवपन झालेलेही दाखवले आहे. ही लक्ष्मी कोण होती ?
आणि मग राधिका दुसरी बायको म्हणून योजली होती का ? कारण गोपिकाबाईंनीही आपल्याला सवत आली होती असा उल्लेख केला आहे.

सगळी चर्चा एकाच धाग्यावर राहावी म्हणून अशोकमामांनी विपुत दिलेले उत्तर इथे चिकटवत आहे.

***********

माझ्या स्वतःच्या वाचनात विश्वासराव यांची पत्नी म्हणून "लक्ष्मी" नामक कुणीही स्त्री आलेली नाही. पार्वतीबाई ही सदाशिवरावांसाठी तर राधिका ही विश्वासरावासाठी पत्नी म्हणून छत्रपती शाहू यानी नानासाहेबांशी सल्लामसलत करून पक्के केले होते. चित्पावन आणि देशस्थ (वा कर्‍हाडे) अशी सोयरीक गोपिकाबाईना पसंत नव्हती, पण मराठा राज्य अशा तुकड्यामुळे विभागले जाऊ नये म्हणून छत्रपती व नाना प्रयत्नशील होते, म्हणून मुलीकडील शाखा वेगळी असली तरी लग्न हे ठरले होतेच. बाकीचे त्यापुढील मी लेखात लिहिले आहे. राधिकामुळेच माझा विश्वास गेला अशी धारणा गोपिकाबाईच्या मनी अखेरच्या श्वासापर्यंत राहिली होती.

काही शंका असतील तर जरूर विचारा.

त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. >>>

चित्पावन आणि देशस्थ (वा कर्‍हाडे) अशी सोयरीक गोपिकाबाईना पसंत नव्हती >>>

मामा, वरच्या दोन विधानातील ठळक केलेल्या भागात विसंगती वाटते आहे. गुप्ते हे आडनाव पदवीवाचक असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे ते देशस्थ (वा कर्‍हाडे) असण्याची शक्यता वाटत नाही.

खूप छान लेख. बरेच सुटे धागे जोडले गेले मनातले.

चांगल्या वर्तमानपत्राकडे पाठवा छापायला. सिनेमाच्या निमित्ताने विषय चर्चेतही आहे आणि लोकांना इतिहासातल्या सुट्या दुव्यांची माहिती होईल.

प्रतिसादांमधे दिलेली रमाबद्दलची वस्तुनिष्ठ माहितीही मूळ लेखात अपडेट करावी असं वाटतं.

माधव....

धन्यवाद....

नाशिकच्या सरदार गुप्ते यांची राधिका ही कन्या. गुप्ते हे पहिल्या बाजीरावाकडे "टिपणीस" पदावर कार्य करीत (यालाच सचिव असेही म्हटले जात असे). शाहुंच्या विश्वासातील होते आणि पेशव्यांच्या राज्यकारभाराची व्याप्ती वाढविण्यासाठी बल्लाळांसारख्या चित्पावनांनी अन्य शाखेतही विवाह संबंध जुळवावेत असे त्यांचे मत होते. पेशवे पद हे परंपरागत चालविण्यासाठी शाहूंनी ज्या काही अटी घातल्या होत्या त्यामध्ये असे विवाह संबंधही सुचविले गेले, याला नानासाहेबांचीही मान्यता होती. गोपिकाबाई थेट विरोधात नसल्या तरी त्या चित्पावनांनी असे खुलेपणाने विवाह करू नयेत या मताच्या होत्याच....पुढे नाशिकात गोदावरी काठी भिक्षा मागून जगण्याची वेळ आली असली तरी ती कुणाकडून घ्यायची हे देखील त्यानी ठरविले असल्याचे इतिहास सांगतो.

तुम्ही म्हणता "... त्यामुळे ते देशस्थ (वा कर्‍हाडे) असण्याची शक्यता वाटत नाही....". तरीही माझ्या पाहाण्यातील एक गुप्ते सीकेपी आहेत....त्या अनुषंगाने मग इतपत तरी म्हणता येईल की राधिका चित्पावन नसल्यामुळेच गोपिकाबाई त्या नात्याला अनुकूल नव्हत्या.....पण छत्रपतींच्या इच्छाही मोडता येत नव्हती. अर्थात तो विवाह जरी प्रत्यक्षात आला नसला तरी राधिकाने आपले आयुष्य योगिनी म्हणूनच काढले....निदान हा तरी इतिहास आहे.

मामा, गुप्ते हे सिकेपी आडनावच आहे.

त्यामुळे ते विधान 'चित्पावन आणि सिकेपी अशी सोयरीक गोपिकाबाईना पसंत नव्हती' हवे होते असे मला म्हणायचे होते. बाकी माहिती एकदम चोक्कस! Happy

होय माधवराव....

व्यापक प्रमाणात जातपात यावरची चर्चा किती क्लिष्ट (आणि वैतागाचीही) होऊ शकते हे आपण जाणतोच, म्हणून मी प्राधान्याने त्यावर काही भाष्य करणे सुरुवातीलाच टाळले होते....कारण आता त्या लग्नामागील जी काही कारणमीमांसा होती ती आजच्या काळाचा विचार करता कितपत उपयुक्त होती....वा नव्हती...यावर चर्चा करण्यात अर्थही नसतो.

चित्पावनांचीही काही एक भूमिका असेल....असू शकते. त्या मागील तर्कशास्त्र ते मानतात. छत्रपतींची इच्छा तमाम महाराष्ट्रीयनांनी शत्रूविरोधात एकत्रपणे कार्य करावे...आणि त्याना उपजातीतही विवाहसंबंध व्हावेत असे जर वाटत होते तर ते चुकीचेही म्हणता येणार नाही.

शर्मिला फडके.....

"रमा" विषयी अपार प्रीती आहे समस्त महाराष्ट्राच्या.....कारण अर्थातच "स्वामी"...कादंबरी, नाटक, विविध चर्चा या माध्यमाद्वारे त्या मुलीची छबी अशी काही मनी वसली की पुढे टेलिव्हिजनच्या जमान्यात मृणाल कुलकर्णीच्या रुपात ती समोर आली त्यावेळी तर प्रत्येकाला ती आपल्या घरातीलच लाडकी मुलगी वाटू लागली.

या पेशवीणबाईच्याबाबतीत ती मग केवळ एक स्त्री न राहता तिच्याभोवती आपसूकच मायेची दुलई पांघरली गेली आहे. सबब तिच्या सतीपणालादेखील एकप्रकारचे असे काही दिव्य वलय प्राप्त झाले आहे की खरा इतिहास काय होता वा असू शकेल याबद्दल काही वाचायला सर्वांचे मन तयार होत नाही.

वास्तविक दोन व्यक्तींमधील संबंधांचा इतिहासावर परिणाम होत नाही तोपर्यंत त्यावरची चर्चा आणि मुख्यत्वेकरुन आक्षेप हे थोडेसे अनुचित ठरतात असे माझे मत.

शर्मिलाने सुचवल्याप्रमाणे खरंच लेख लोकसत्ता किंवा मटाला द्या मामा. प्रतिसादांच्या अ‍ॅडिशनमुळे लेख आणखी परिपूर्ण आणि महत्वाचा होईल यात शंकाच नाही. हा योग्य कालावधी आहे लेखासाठी, त्यामुळे ही वृत्तपत्रेदेखिल ताबडतोब तो प्रकाशित करतील.

याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?
नाही . ह्यांना मुले बाळे झाली नाहीत . शिवाजी महाराजांना सई बाई पासून सखू नावाची मुलगी आणि संभाजी झाला . त्यानंतर अनेक वर्षांनी सई च्या मृत्युनंतर सोयरा बाई पासून राजाराम झाला . महाराज आपल्या पत्नींना महिनोन्महिने भेटत सुधा नसत . त्यांना संसार नकोच होतां. पण १ सोयरिक जुळली कि त्याबरोबर हजार माणसे सोबत येतात आणि स्वराज्य स्थापने साठी त्यांची गरज होती म्हणून जिजा बाईंनी जबरदस्तीने राजांची ८ लग्न लावून दिली होती . म्हणून तर महाराजांना 'श्रीमंत योगी ' म्हणतात .

एका महत्वाच्या आणि पराक्रमी, शूर स्त्रीचा उल्लेख करावाच लागेल . ती म्हणजे 'ताराबाई' . शिवाजी महाराजांची धाकटी सून . राजारामाची पत्नी .हि स्वतः घोड्यावर बसून लढायला जायची . महाराज गेल्यानंतर अतिशय हुशारीने तिने १० वर्षात मराठी राज्य बळकट केलं . औरंगजेबाने तिच्याबद्दल 'शिवाजी कि बहु शिवाजी से बहुत ' असे उद्गार काढले होते. तिने कोल्हापूर हि आपली राजधानी बनवली . राजारामला आणि संभाजी ला जे जमलं नाही ते हिने करून दाखवलं होतं. पण शाहू कैदेतून सुटून आल्यावर त्याच्यात आणि तारा बाईत जुंपली आणि पुन्हा स्वराज्य डळमळीत झालं. शाहूंनी सातार्याला स्वराज्याची राजधानी केली आणि पेशव्यांना कारभारी केलं . शाहू नुसतेच नावाचे राजे राहिले .
लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले.
अरेरे काय हा अन्याय . कसली डोंबलाची भारतीय संस्कृती . मला आपल्या संस्कृती बद्दल कधी कधी फार चीड येते .
राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला. नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या
करावे तसे भरावे . नीच बाई .
'भोसले घराण्यात सतीची प्रथा दिसत नाही. पुतळाबाई हा अपवाद. ती प्रत्यक्ष दहनावेळी सती गेली नाही.कारण प्रत्यक्ष दहन एक प्रकारे गुपचूप, घाईगर्दीने उरकले आहे. बहुदा शिवाजीस या मंडळींनी भडाग्नी दिला असावा. पुढे संभाजीने सर्व क्रिया १२ दिवसांपर्यंत - सुतक यांसह विधिपूर्वक केल्या आहेत. त्याने दर्भाच्या शिवाजीला मंत्राग्नी दिला.
शिवाजी महाराजांचा मृत्यू हा संशयास्पद झाला होतं. काही इतिहासकार म्हणतात त्यांना औषधाधामधून विष देण्यात आलं आणि परस्परच अंत्यसंस्कार हि करण्यात आले . महाराज आजारी असताना संभाजी त्यांच्याजवळ नवता आणि सोयराबाई ने कोणालाही महाराजांना भेटायची बंदी केली होती त्यामुळे पुतळा बाईंना राजांच्या शेवटच्या काळात त्यांच्या जवळ राहता आलं नाही. संभाजी आल्यावर त्याने सोयराबाई आणि राजारामला कैदेत टाकला . सन्मानाने पुतळा बाईंना रायगडावर घेवून गेला आणि मग पित्याचे अन्यासंस्कर केले. बाराव्या दिवशी पुतळा बाई सती गेल्या .
बहुदा शिवाजीस या मंडळींनी भडाग्नी दिला असावा.
आपल्याला विनंती आहे कृपया महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये . आपण तेवढे मोठे नाही आहोत .

सबब तिच्या सतीपणालादेखील एकप्रकारचे असे काही दिव्य वलय प्राप्त झाले आहे की खरा इतिहास काय होता वा असू शकेल याबद्दल काही वाचायला सर्वांचे मन तयार होत नाही.>> चित्रपटात तर ती सामान्य स्त्री अशीच समोर येते ते शेवटच्या सतीजाण्याच्या निर्णाया परेन्त. तेव्हाही मरण पत्करण्यापेक्षा जिवंत राहून नवर्‍याचे राज्य चालवणे, सासूस वठणीवर आणणे असे काही चॅलेंजिन्ग केले असते मूळ व्यक्तिरेखेने तर नक्की कौतुकास्पद. प्रेमकथा हे एक वैयक्तिक पातळीवर ठीक आहे. त्याकाळात आणि तिला किती कमी ऑप्शन्स होत्या हे बघून कसेतरीच झाले. मला काही मायेची दुलई लाडकी पोर असे वगैरे वाटले नाही त्यामुळे कनेक्षन डेवलप झाले नाही.बाल रमा क्यूट आहे पण उंच माझा झोका पासून ही एक टेंप्लेट डेवलप होत चालली आहे. कुठल्याच स्त्री व्यक्तिरेखेत कणखर पणा, हुषारी तडफदारी दिसत नाही. गोपिका बाईंना पन पहिल्याच संवादात तो नवरा गप्प बसवतो. आणि ते वैधव्य आल्यावरही कोरलेल्या भुवया वगैरे... घर सोडून जातानाही नुसता हुप्प चेहरा. मुलगा मला पोरके करून जाउ नको म्हनतो तर क्षणभर विरघळणे वगिअरे अभिनयातून दाखविता आले असते.

कोक्या....

इतिहासावर परिणाम होणार असेल तरच दोन व्यक्तीमधील संबंधाबाबत चर्चा होऊ शकते असे काही नसते. एखाद्या संबंधामुळे वा घटनेमुळे समाजावर होणारे परिणाम हे नेहमी चर्चांचा विषय होत असतात. इतिहासासाठी त्याची आवश्यकता आहे की नाही हा मुद्दा निदान त्यावेळी तरी नसतो. पण त्या संबंधाचा पुढे इतिहासात उल्लेख आलाच तर त्यावेळी ठिकठिकाणी झालेल्या चर्चाचा समावेश त्यामध्ये (भला असो वा बुरा) येणे क्रमप्राप्त होतो. परिणाम तात्काळ स्वरूपाचे जसे असतात तसे दूरगामीदेखील असू शकतात त्यामुळे चर्चा घडत राहणे क्रमप्राप्त ठरते. देशोदेशी अशापद्धतीनेच इतिहास लिहिला गेला आहे.

उदाहरणार्थ.... ब्रिटनची युवराज्ञी डायना हिची लंडनस्थित पाकिस्तानी डॉक्टर हसनत खान याच्याशी दवाखान्यातील एका पेशंटच्या निमित्ताने ओळख झाली....पुढे ती वाढली. त्यावेळी डायनाची त्या हॉस्पिटलच्या जसजशा वाढू लागल्या तसतशा जनतेतील लोकांच्या चर्चा अगदी चविष्ठपणे उतरू लागल्या.... टॅब्लॉईड पत्रकारीता तर पिच्छा सोडेना. आता त्या दोघांत जे काही संबंध निर्माण झाले त्याचा सर्वसामान्य लोकांना काही उपसर्ग असेल वा नसेल पण चर्चा थांबल्या नाहीत....इंग्लंडच्या इतिहासात त्या नोंद झाल्याच. डायनाच्या मृत्यूनंतर केट स्नेल यानी लिहिलेल्या "डायना : हर लास्ट लव्ह" या पुस्तकातील मजकुरावर तर डॉ.खान यानी तीव्र आक्षेप घेतले होते. हे सारे घडले ते संबंधावर घडलेल्या चर्चेमुळे.

आक्षेपाचा मुद्दा बरोबर आहे. मात्र जी व्यक्ती आक्षेप घेते तिला त्याबद्दले स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अन्यथा मग ते अनुचित ठरू शकतात.

थोडक्यात इतिहासावर परिणाम झाल्याचे दिसल्यावरच चर्चा अस्तित्वात याव्यात असे होणार नाही असे मला वाटते.

नाही नाही, मामा. गैरसमज नसावा. मला फक्त आक्षेपांच्याच अंगाने म्हणायचं होतं की दोन व्यक्तींमधील संबंध कसे होते रोमॅंटिक होते की नवरा सारखा चिडचिड करायचा यावर अधिक "चविष्ट" चर्चा होऊ नये. मला काय म्ह्णयचे आहे ते मी नीट शब्दात मांडु शकत नसेन कदाचित पण तुमचा मुद्दाही बरोबरच आहे. Happy

Pages