दाल कचोरी

Submitted by सुलेखा on 30 June, 2014 - 05:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कचोरीचा हा प्रकार उत्तर प्रदेशीयांकडे कोणीही जेवायला येणार असले कि करतात.हलवा/खीर ,इतर पदार्थांबरोबर बरोबर पुडी-कचोडी तर हवीच इथे कचोरीसाठी उडदाची डाळ वापरली आहे .अशीच मुग डाळीचीही कचोरी करतात.या कचोरीची विशेषता ही कि ह्यात तिखटासाठी आले-हिरवी मिरची चा वापरअजिबात नाही.त्याऐवजी लवंग व मिरेपूड वापरली आहे.बडीशोप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे चव छान लागते.कचोरी तळण्याचे तंत्र जमले कि खुसखुशीत कचोरी तयार होते व थंड कचोरीही फुगलेलीच रहाते व खुसखुशीत लागते कचोरी नेहमी मंद गॅसवरच तळावी.
.१/२ वाटी उडिद डाळ [डाळ धुवुन पाण्यात भिजत ठेवा. साधारण २० मिनिटे भिजत ठेवावी.]
१ १/२ चमचा बेसन.
अर्धा टी स्पून प्रत्येकी हिंग , जिरे व मीठ.
१ चमचा तेल,
अर्धा टी स्पून लवंग पूड [साधारण ७ ते ८ लवंगा]
अर्धा टी स्पून मिरेपूड,
३/४ टी स्पून तिखट,
१ चमचा धणे--खडबडीत कुटलेले,
१ टी स्पून बडीशोप.,
अर्ध्या लिंबाचा रस,
अर्धा चमचा साखर,
थोडेशी चिरलेली कोथिंबीर व ७-८ पुदिना पाने हाताने तुकडे करुन घ्या.
वरच्या पारीसाठी--
१ वाटी मैदा,
१ १/२ चमचा तेल मोहनासाठी.
पाव टी स्पून मीठ.
तळण्यासाठी १ वाटी तेल.
सजावटीसाठी- बारीक शेव,चिंचेची आंबट गोड चटणी,पुदिना चटणी.

क्रमवार पाककृती: 

एका लहान नॉन स्टीक पॅन मध्ये भिजवलेली उडदाची डाळ त्यात साधारण पाऊण वाटी पाणी घालुन शिजायला ठेवावी..चमच्याने ढवळत रहावे.डाळीतले पाणी उकळायला लागले कि त्यात चमचाभर तेल ,हिंग ,जिरे,बडीशोप्,खडबडीत केलेले धणे, लवंग -मीरे पुड घालुन मिश्रण ढवळावे.त्यातील पाणी थोडेसे उरले कि त्यात दिड चमचा बेसन ,३/४ टीस्पून तिखट चवीपुरते मीठ आणि लिंबाचा रस घालुन परतावे.२ ते ३ मिनिटांनी पुन्हा परतुन गॅस बंद करावा व मिश्रण थंड करायला एका प्लेट मध्ये काढुन ठेवावे.थंड झालेले मिश्रण मिक्सरमधे फक्त एकदाच फिरवून घ्यावे.त्यात कोथिंबीर व पुदिना पाने घालुन या मिश्रणाचे गोल लाडू वळावे.
तयार सारणः--
kachori-1.JPG
पारीसाठी मैदा,तेल व मीठ घालून छान मिक्स करावे. कणिक पराठयासारखी मळुन घ्यावी.वरुन तेलाचा हात फिरवून ५ मिनिटे ठेवावी.या कणकेच्या गोळ्याचे लहान लहान ६ गोळे करावे.
मैद्याच्या गोळ्याला तळहातावर पुरीसारखे थापावे त्यात डाळीचा गोळा भरावा त्याची दोन्ही तळहाताने दाबुन कचोरी करावी..इथे दोन्ही गोळे एकसारखेच मऊ असावे.
लहान कढईत तेल तापायला ठेवावे.तेल छान तापले कि गॅस बंद करावाव तेल थोडे थंड होऊ द्यावे. गरम तेलावर आलेले बुडबुडे विरले कि तेल थंड झाले.आता त्यात कचोरी सोडावी. एकावेळी २ किंवा ३ च कचोरी सोडावी.मधुन मधुन २-३ वेळा कचोरीवर कढईतील तेल उडवावे.असे केल्याने पुरीची पारी खुसखुशीत होते.कचोरी तरंगुन वर आली
कि कचोरीची बाजु बदलावी .गॅस चालू करावा.आच मंद ठेवावी.. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्हीकडुन खरपूस तळावी.अशा सर्व कचोर्‍या तळाव्या.
kachri--2.JPGkachori-3.JPG
तळलेल्या गरम कचोरीवर सुरीने मधे उभे- आडवे /बेरजेच्या खूणेसारखे कापावे त्यामध्ये पुदिना चटणी भरावी त्यावर चिंच चटणी व बारीक शेव घालुन खायला द्यावी.
kachori-4_1.JPG

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा बाई..कुठे आहात?????? कस्ली तोंपासु रेसिपी आहे.. माझ्या आवडत्या दहात,.. सुपर

कचोरी तळायला खूप कौशल्य लागते ना??? Uhoh (भीत भीत) ट्राय करीन तरी

सुलेखा, तुझ्याजवळ ,' राजकचोरी' ची रेसिपी असेल तर दे ना इकडे.. मला हवीये...

अप्रतिम दिसतायत, पण मला जमेल असं वाटत नाही. करुन बघाव्या असं खूप वाटतयं पण जमतील की नाही अशी भीती ही वाटतेय.

वर्षुनील,
यापूर्वी महाकचोरी ची रेसिपी लिहीली आहे .ती पहा.माझ्या मते तिच राजकचोरी आहे.सजावटीसाठी काजू,किशमीश ,तूपात परतलेले मखाणे,डाळिंबाचे दाणे घट्ट दही व इतर सगळं घालुन सजवतात.

पूर्वा, सामोसा व कचोरी किंवा मठरीची ची पारीथोडी कडक पण खुसखुशीत /खस्ता असावी. कचोरी पुरीसारखी तळली तर मऊ होईल.त्यापेक्षा मिक्सरमधुन बारीक केलेले सारण व मैदा/गहू पीठ एकत्र करुन भिजवुन पुर्‍या केल्या तर चव छान येईल.

मृदुला. लाटलेली पारी जाड पुरीसारखी असावी. तळताना वर सांगितल्याप्रमाणे आधी तेल गरम करुन गॅस बंद करायचा .गरम तेलातले बुडबुडे विरले कि कचोरी/समोसा तेलात सोडायचा .तेलात सोडलेली कचोरी कढईच्या तळाशी जाते. .कचोरी ची खालची बाजु छान तळली [शिजली]गेली कि ती तेलावर तरंगायला लागते.आता गॅस चालु करुन आच मंद ठेवायची.झार्‍याने कचोरीवर थोडेथोडे तेल उडवायचे म्हणजे पारी /पापुद्रे सुटुन खस्ता होते.आता झार्‍याने कचोरी पलटवायची.सोनेरी रंग आला कि झार्‍यात तिरकी धरुन तेल पूर्ण निथळले कि बाहेर काढायची.अशा रितीने तळलेली कचोरी अजिबात तेलकट होत नाही.जर फार गरम तेलात कचोरी सोडली तर पारीचा वरचा भाग शेकला जाऊन आतुन कच्ची राहील व थंड /कोंबट तेलात सोडली तर तेल जास्त पिवुन तेलकट होईल .तळलेली कचोरी हातात धरली कि हात तेलकट व्हायला नको.या सूचनांप्रमाणे केले तर फारसे कठिण नाही.जमले कि कोणतेही वैविध्यपूर्ण सारण भरुन कचोरी वा समोसा करता येईल.खरपूस भाजलेला मावा/खवा सारण भरुन गोड कचोरी वा सामोसा करायचा. अशा तळलेल्या सामोशाला चिरोट्याप्रमाणे पाकवुन ही छान लागतो.

मला समोसे उत्तम जमतात (असे सगले म्हणतात) तलण्याच तंत्र जमलंय तेव्हा कचोरी जमायला हवी नक्की करून पाहीऩ