अंडंबिर्यानी

Submitted by मृण्मयी on 28 November, 2012 - 17:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-६ अंडी
३ वाट्या बासमती तांदूळ
४ लवंगा
१ पेरभर दालचिनीचा तुकडा
६-७ मिरंदाणे
४ वेलदोडे
२ तमालपत्रं
१ काळा वेलदोडा
१ मोठा चमचा धनेपूड
भाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठ
एक वाटी घट्टं दही
चमचाभर टोमॅटोपेस्ट
४ हिरव्या मिरच्या
३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून
७-८ पानं पुदिना, चिरलेला
पळीभर साजुक तूप
पाव कप दुधात १०-१२ तंतू केशर
दोन पळ्या तेल
२ मोठे चमचे एव्हरेस्ट बटरचिकन मसाला
चवीनुसार तिखट

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ २-३दा धुवून, पाण्यात तासभर भिजवून ठेवावे. निथळून घ्यावे.
-अंडी उकडून (हार्ड बॉइल), सोलून बाजूला ठेवावी.
-७-८ वाट्या पाण्याला, त्यात लवंगा, वेलदोडे, मीठ आणि चमचाभर तेल घालून उकळी आणावी.
- निथळलेले तांदूळ घालावे.
- तांदूळ शिजत आले की चाळणीत ओतून, पाणी काढून टाकून, लागलीच ताटात भात मोकळा करावा. ताटाखाली स्टँडचं कोस्टर असल्यास उत्तम.

-मोठ्या, जाडबुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेल्या कांद्यातला अर्धा भाग खरपूस तळून बाजूला ठेवावा.
-त्याच तेलात आता उरलेला कांदा परतून घ्यावा.
-मिरच्या घालाव्या.
-तमालपत्र, मिरं, मोठा वेलदोडा (सगळे अख्खे मसाले) घालून परतावं.
-धनेपूड, तिखट आणि बटरचिकन मसाला घालून जरासं परतलं की टोमॅटोपेस्ट घालावी.
- दही घालून एकत्र करून घ्यावं.
-या मिश्रणात अंडी अख्खी किंवा काप करून घालावी.
-वरून भात घालावा.
-भातात तूप सोडावं
-भातात, भांड्याच्या बुडापर्यंत खड्डे करून, त्यात केशर+दूध घालावं.
-चिरलेली पुदिन्याची पानं घालून, घट्टं झाकण लावून १० मिनिटं मंद आचेवर शिजवावं.
-वरून खमंग तळलेला कांदा घालावा.

egg birayani-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ माणसांसाठी, एक वेळ पोटभर.
अधिक टिपा: 

-घटकपदार्थ भरपूर दिसत असले, आणि कृतीतल्या पायर्‍याही बर्‍याच दिसल्या तरी लवकर होणारा पदार्थ आहे.

-भात पूर्ण शिजवून घेतलेला असल्यामुळे वेळ लागत नाही.

-मटण, चिकन किंवा भाज्यांची बिर्यानी करताना जसा मांसाचा किंवा भाज्यांचा फ्लेवर भातात उतरतो, तसा अंड्याचा उतरत नाही.

-पानात घेताना नीट मिसळून घ्यावा, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थीत लागेल.

-अंडी अख्खी ठेवली तर ज्यांना बलक नको त्यांना काढून टाकता येतो. काप केले की सगळं भातात मिसळल्या जातं.

-आलं-लसूण ऐच्छिक. मी घातलंय. पण वाटण्यापेक्षा किसणीच्या बारिक भागातून किसून. यामुळे कमी उग्र लागतं.

-आलं लसूण घातलंच तर ते अख्खा मसाला घालण्यापूर्वी कांद्याबरोबर, उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यावं.

माहितीचा स्रोत: 
बहीण
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेच बनवली आहे आणि खातच पोस्ट टायपत आहे. एकदम मस्त, फंडू!!! इतकी चवदार बिर्याणी बाहेर कुठल्या हॉटेल मधेही खाल्ल्याचे स्मरत नाही. जियो!!!

मस्तच दिसतेय.. बरेच दिवस हि रेसिपी शोधत होते, पण मनासारखी मिळाली नाही. हि छान वाटते आहे. नक्की करुन बघणार.

धन्यवाद मंडळी!

पल्लवी, तुमचा प्रश्न वाचल्यावर पुन्हा एकदा मसाल्याचा ब्रँड बघितला. मसाला MDHचा आहे. बदल करते.

साधना, नूडल्सचा वापर कल्पक आहे. कुठल्या नूडल्स वापरल्या?

मी ही बिर्यानी कालच बनवली/रांधली केली.
घरी बटर चिकन मसाला नव्हता त्यामुळे घरी असलेला शानचा मलय बिर्यानी मसाला वापरला.
मृ च्या बिर्यानी सारखी देखणी नाही झाली पण चवीला मस्त झाली.
सिंडीने दिलेली आयडिया वापरून अंड्यांचे अर्धगोल दीपच्या कोथिंबीर चटणीत बुडबून मग ते लयर केले बिर्यानीच्या पातेल्यात.
मसाला फारच तिखट निघाला त्यामुळी बिर्यानी "कल मालूम" कॅटेगरीतली तिखटजाळ झाली Uhoh
पुदीन्याचा स्वाद मला फारच आवडला.
हा घ्या फोटो.

EggBiryani.jpg

करून पाहिली. मस्त झाली होती. मृ ने सांगितलेला मसाला नव्हता. घरी केप्रचा बिर्याणी मसाला व केप्रचाच चिकन मसाला होता तो घातला. पुदिना नव्हता. तरी चव मस्त होती.
मग ए. ब. चि. म. व पुदिना वापरुन किती मस्त चव या विचारानी तोंपासु झाले आहे. लवकरच करून फोटो टाकण्यात येईल.
मृण्मयी खूप धन्यवाद.

करून पाह्यली..मस्त झाली होती..
ब.चि मसाला नव्हता म्हणून गोडा मसाला घातला.
पुदीना नव्हता, म्हणून घातलाच नाही..तरी चव आवडली..
एक छान "वन डिश मिल" मिळाली.

मृ: धन्यवाद.

भारी दिसतेय बिर्यानी! Happy

सायो,
>>अंडं काढल्यास काय राहील?
..वैतागलेली कोंबडी! >>>> वैतागलेली लोला. Proud

बिर्यानी करून बघणार्‍या सगळ्यांना धन्यवाद! फोटो टाकल्याबद्दल शूम्पीला किंचित जास्त! Happy

अंड्यांना चटणी फासायची आयडिया आवडली.

परवा केली होती. यम्मी झाली होती!! नेहेमी करणार आता. फोटो काढायला जमलं नाही(इतकी मस्त झाली.होती)
मी शानचा तंदूरी चिकन मसाला व एम्डीएचचा किचन किंग मसाला वापरला. नो पुदीना..

आमच्याकडे आज ही बिर्याणी बनवण्यात आली. एकदम सही झाली होती चवीला. चटपटीत आणि मसालेदार. बटर चिकन मसाला नसल्याने एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरला होता. पुदिना नव्हताच, त्यामुळे तो पण कटाप. आलं लसूण पेस्ट मात्र घातली होती. सोबत, रायता आणि पापड आणि बाळबटाट्यांची भाजी. (ती पण आज अफलातून झाली होती.)

छान रेसिपीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

सुंदर अगदी!! बहुतेक उद्याच करण्यात येईल. इतरांनी मसाल्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत म्हणुन बरे झाले नाहीतर 'एबची' नाही म्हणुन करायचे राहिले असते.

मस्त कृती आणि मस्त फोटो.. अगदी तोंपासु... उद्या लगेच करून पहावी म्हणत्ये बिर्याणी... Happy
पण एक शंका आहे तो बटर चिकन मसाला नाही घातला तरी चालू शकेल का? त्याऐवजी दुसरा मसाला चालू शकेल का?

सगळ्यांना धन्यवाद!

मीनाक्षी, कुठलाही दाक्षिणात्य किंवा पावभाजीमसाला सोडून चिकन, मटण, पनीरबटर अशा प्रकारचा मसाला चालेल.

अख्खे मसाले तोंडात आले की वैताग येतो. ते टाळायला मसाले अशा 'टी होल्डर / टीइन्फ्यूजर्'मधे घालून भातात सोडायचे.

आत्ताच केलीये या पद्धतीने अंडा बिर्यानी. प्रमाण थोडंसं बदललं कारण दोनच जणांपुरती करायची होती. आणि आख्ख्या मसाल्यांऐवजी शाही बिर्यानी मसाला आणि बटर चिकन मसाल्या ऐवजी साधा चिकन मसाला वापरला.
बिर्याणी थोडी सात्विक वाटावी म्हणून थोडासा लसूण घातला. Proud

मस्त रेसेपी.

मी पण केली होती. छान झाली पण सुंदर नाही झाली... चुक सर्वस्वी माझीच कारण मसाल्याचे प्रमाण जरा कमी झाले म्हणुन कमी खमंग झाली. पुढच्यावेळी नक्की मस्त होईल. तळलेला कांदा फार छान लागतो.

आत्ताच केली या पद्धतीने अंडा बिर्याणी. मी कराही चिकन मसाला वापरला. तळलेला कांदा घातला नाही. आले लसूण पेस्ट घातली. छान झाली. रेसिपी सोप्पी आणि मस्त आहे.

मी मुद्दाम ही बिर्यानी जशीच्या तशी करून बघितली. आलं लसून(हिंदी की बोर्ड) नसूनही अप्रतीम चव आली . मी एम डी एच बचि मसाला वापरला. टाॅमेटो पेस्ट खास या साठी घेऊन आले आहे.
अप्रतीम पाककृती !

उरलेली मिक्स व्हेज भाजी (आलु-गोबी-गाजर-मटर + आलं आणि धण्याची पुड) आणि या बिर्यानीचे बाकीचे घटक वापरून मध्यंतरी व्हेज बिर्यानी केली होती. अफलातून चव आली. सकाळच्या उरलेल्या भाजीचा वापर करुन केलिये यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. Happy

मस्तंच हो सातू. बिर्यानी करून आवर्जून इथे कळवल्याबद्दल, फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद!

अल्पना, सुनिधी, अदिती, तराना, धन्याव्द!

मस्त रेसिपी आहे ही. रविवारी बनवलेली. टॉमॅटो पेस्ट नव्हती म्हणून टॉमॅटो चिरुन घातला.
एक प्रश्न आहे पण. ह्यामध्ये दह्याचा काय role आहे? दही घातल मी पण ते गरम भांड्यात घातल्यामुळे लगेच फाटल त्यामुळे थोडी चिंता वाटली.

Pages

Back to top