मायक्रोवेव्हच्या वापरासाठी काही टिप्स

Submitted by webmaster on 6 June, 2014 - 00:43

मायक्रोवेव्ह अव्हनचा वापर हल्ली घराघरांत केला जातो. कमी वेळात स्वयंपाक करण्यासाठी मायक्रोवेव्हसारखं दुसरं साधन नाही. मात्र अजूनही अनेक गृहिणी मायक्रोवेव्हचा वापर दूध / पाणी गरम करणे, किंवा अन्न गरम करण्यापुरताच करतात. खरं म्हणजे आपला रोजचा सगळा स्वयंपाक अगदी व्यवस्थित मायक्रोवेव्हमध्ये करता येतो. मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
microwave.png
१. एखादं भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यायोग्य आहे की नाही, हे कसं ओळखायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही धातूची वस्तू किंवा भांडे मायक्रोवेव्ह मधे चालत नाही. मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यास सुरक्षित आहे, हे निश्चित ठाऊक असलेल्या एखाद्या मगमध्ये थंड पाणी भरून घ्या. हा मग ज्या भांड्याची खात्री करून घ्यायची आहे, त्यात ठेवा. एक मिनिट 'हाय'वर मायक्रोवेव्ह सुरू ठेवा. जर पाणी तापलं असेल, आणि हे भांडं थंडच असेल, तर ते तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये खुशाल वापरू शकता.

२. अनेक गृहिणी अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करतात, आणि तसं करताना प्लास्टिक रॅपचा वापर केला जातो. असा वापर करण्यात काही चूक नसलं, तरी हे प्लास्टिकचं आवरण अन्नाला स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. तसंच, अन्न गरम करताना ते अधूनमधून चमच्यानं हलवत राहा. त्यामुळे अन्न एकसारखं गरम होईल, आणि गार राहिलेल्या अन्नात जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही.

३. अन्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह एक उत्तम साधन असलं, तरी काही अन्नपदार्थांचा आणि मायक्रोवेव्हचा संबंध येऊ न देणंच हिताचं. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकडण्याचा प्रयत्न करू नये. उकडलेलं अंडंही मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करू नये. स्टफ्ड कोंबडी शिजवतानाही काळजी घ्यावी. मायक्रोवेव्हमध्ये नेहमीच्या अव्हनपेक्षा अन्न लवकर शिजत असल्यानं आतलं स्टफिंग अनेकदा शिजत नाही. त्यामुळे असे पदार्थ शिजवताना काळजी घ्यावी. तसंच पाणी किंवा इतर द्रवपदार्थ एखाद्या पाककृतीत सांगितलेल्या किंवा मायक्रोवेव्हबरोबर दिलेल्या पुस्तिकेत सांगितल्यापेक्षा जास्त वेळ गरम करू नका. केक किंवा पुडिंग शिजवताना त्यांत अल्कोहोल असल्यास ते शक्यतो मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका.

४. रिकामा मायक्रोवेव्ह शक्यतो चालवू नका. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवल्यावर सुमारे मिनिटभर तो बंद ठेवा आणि मगच पदार्थ बाहेर काढा.

५. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजत असताना लहान मुलांना फार जवळ जाऊ देऊ नका.

६. मायक्रोवेव्हमध्ये कांदा किंवा इतर भाज्या शिजवायच्या असल्यास भाज्या एकसारख्या चिरून एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात ठेवा. एक चमचा पाणी वरून घाला आणि ’हाय’वर १-२ मिनिटं शिजवा. तेलातुपाचा वापर न करता भाज्या उत्तम शिजतात. भाज्या शिजवण्याआधी त्यात मीठ घालू नका.

७. भांड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेले पदार्थ लवकर शिजतात. त्यामुळे मासे, किंवा भाज्यांचे लहान तुकडे भांड्याच्या मध्यभागी ठेवा. फूलकोबी, ब्रोकोली अशा भाज्या शिजवताना देठं भांड्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. भाज्या शक्यतो एका आकारात चिरा.

८. बटाटे, सॉसेज इत्यादी शिजवताना काटेचमच्यानं आवरणाला छिद्रं पाडल्यास आत कोंडलेली आर्द्रता वाफेच्या स्वरूपात बाहेर पडते आणि हे पदार्थ विना-अपघात व्यवस्थित शिजतात.

९. शक्य असल्यास फ्रोजन पदार्थ थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका. मायक्रोवेव्हमध्ये डिफ्रोस्ट करायचे असल्यास ’लो’ किंवा ’मीडीयम’वर करा.

१०. मायक्रोवेव्हमध्ये भात शिजवताना एकदम पाणी घालू नका. तसंच शिजताना खूप पाण्याची गरज असणारे पास्त्यासारखे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये शक्यतो शिजवू नका.

११. मायक्रोवेव्ह एका वेळी फार वेळ चालू ठेवू नका. पदार्थ जास्त शिजण्याची शक्यता असते, गरजेनुसार तुम्ही वेळ कमीजास्त करू शकता.

१२. मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही चॉकलेट सहज वितळवू शकता. त्यासाठी डबल बॉयलरची गरज नसते. ’मीडियम’वर अडीच मिनिटं ठेवल्यास चॉकलेट वितळतं. लिंबं किंवा संत्री मायक्रोवेव्हमध्ये २० सेकंद ते १ मिनिटं ठेवल्यास (पॉवर लेवल प्रमाणे) रस जास्त निघतो. हिरव्या भाज्याही चटकन शिजतात आणि त्यांचा रंगही कायम राहतो. सर्दाळलेले वेफर्स किंवा चिप्स एका पेपर टॊवेलावर ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यास पुन्हा कुरकुरीत होतात.

(या लेखात वर दिलेले कालावधी १००० वॉटच्या मायक्रोवेव्ह साठी आहे. तुमच्या मायक्रोवेव्हच्या वॉटेजप्रमाणे हे कालावधी बदलू शकतात.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"१०. मायक्रोवेव्हमध्ये भात शिजवताना एकदम पाणी घालू नका."

हे जरा आधिक स्पष्ट करुन सांगाल का कारण आम्ही तांदुळात एकदम पुरेसे पाणी टाकुन २५ मिनीटे माइक्रोवेव्ह मधे हाय मोड वर शिजु देतो.

केदार-मायबोली
मायक्रोवेव्हचा आतला आकार, भांड्याची उंची, वेळ आणि मायक्रोवेव्हची उर्जा पातळी (पॉवर लेवल) याचा मेळ घालणे सुरुवातीला सगळ्यांना एकदम जमतेच नाही. एकदा तो मेळ जमल्यावर सगळ्या गोष्टी कायम असतील तर तुम्ही करता तसे करण्यात काहीच हरकत नाही.

वर दिलेली माहीती मुख्यतः मायक्रोवेव्हचा वापर करण्यात नवशिके असणार्‍यांसाठी आहे. जे नेहमी वापरतात त्यांना यात काही नवीन वाटणार नाही.

अरे वा वेमा ! Happy

खूप जणं म्हणतात मायक्रोवेव्ह वापरून पदार्थ शिजवणं, गरम करणं हे पदार्थ नुक केल्यासारखंच आहे .. तुमचं काय मत?

मायक्रोवेव्ह कीती सेफ आहे सांगण कठीण आहे. काही प्रयोग झालेत त्यानूसार रेडीयेशन मूळे पदार्धाचे मूळ गूणधर्म बदलतात. खालील प्रयोगात एका झाडाला मायक्रोवेव्ह वरुन उकललेलं पाणी दिलं आणि दूसर्या झाडाला गॅसवर उकळलेलं पाणी दिलं.

दहा दिवसात मायक्रोवेव्ह मधून उकळलेल पाणी दिलेल झाड मेलं. त्याच कारण लिंक मध्ये आहे.
http://www.snopes.com/science/microwave/plants.asp

गूगल वर "microwave experiments" सर्च केल्यास अधिक माहिती मिळेल.

तन्मय शेंडे,
तुम्ही अगदी उलटा आणि चुकिचा निष्कर्ष लिहला आहे. रेडीयेशनमुळे पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलत नाहीत. आणि मायक्रोवेव्ह अजिबात हानिकारक नाही असं त्या पानावर सरळ लिहले आहे. तुम्ही फक्त पानावरचा थोडाच मजकूर पाहून लिहलं असावं. तो क्लेम कसा चुकीचा आहे हे पण खाली लिहलं आहे.

सशल,
माझ्या माहितीप्रमाणे मायक्रोवेव्ह मुळे अपाय होतो हे कुठल्याही संशोधनातून अजून सिद्ध झालेले नाही.

>>सशल,
माझ्या माहितीप्रमाणे मायक्रोवेव्ह मुळे अपाय होतो हे कुठल्याही संशोधनातून अजून सिद्ध झालेले नाही.>> जर योग्य ती काळजी घेतली (म्हणजे प्लॅस्टिक न वापरणं वगैरे) तर वाईट नसावं. मी जर फ्रोजन भाज्या आणल्याच तर त्या थॉ करून मग सिरॅमिक मध्ये वगैरे ट्रान्सफर करून गरम करते.