मुलांसाठी नाश्ता - रोडगे

Submitted by आशिका on 21 May, 2014 - 01:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रोडग्याच्या पीठासाठी - तांदूळ - १/४ किलो (कोणत्याही जातीचा)
चणा डाळ - १/४ किलो
तूर डाळ - १/४ किलो
मुग डाळ - १/४ किलो
सालाची मुग डाळ - १/४ किलो (ऑप्शनल)
जीरे - १ मोठा चमचा
धणे - १ मोठा चमचा
वरील सर्व जिन्नस कच्चेच दळून आणणे.

ऱोडग्यासाठी - वर सांगितलेले पीठ -४ मोठे चमचे
हळद - १ लहान चमचा
तिखट - २ लहान चमचे किंवा चवीनुसार कमी-जास्त
जीरे पावडर व धणे पावडर- प्रत्येकी एक लहान चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी
तेल - तळण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

पीठ दळून तयार असल्यास पा. कृ.स १५ मिनिटे लागतात.

पीठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पुरीच्या पीठासारखे भिजवणे. तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालण्याची गरज नाही. घातले तरी काही बिघडत नाही. लहान्-लहान गोळे करून घेणे. वरील प्रमाण घेतल्यास साधारण १५ गोळे होतात. प्लास्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावून वडे थापणे. फार पातळ किंवा फार जाड थापू नयेत. कढईत तेल तापत ठेवून तेल तापले की वडे तळून घ्यावेत. दोन्ही बाजूनी लालसर होवून फुगतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. ही पा.कृ. करताना कुठलाही घटक कमी-जास्त झाला तरी काय बिशाद लागलेय पा. कृ. बिघडेल, इतकी गुणी पा.कृ. आहे.
२. पारंपारिक रेसिपी असूनही यात वैविध्य साधता येते कारण यात काहीही ढकलू शकता आणि तरीही बिघडण्याचे प्रमाण नगण्य. ऱोडगे खुसखुशीत होतातच.
३. मी यात बीट, गाजर, पालक वाफवून व नंतर मिक्सरमधून फिरवून पीठात मिसळून वेगवेगळ्या रंगांचे रोडगे करून पाहिले आहेत आणि त्यानुसार मुलांसाठी नाश्ता या प्रकारात समाविष्ट केले आहे. त्याचप्रमाणे पीठात सालाची मुगडाळही मनानेच (पौष्टिक म्हणून) घातली आहे.
४. महत्वाचे- भाज्या, सेलेड न खाणार्या द्वाड मुलांस गुलाबी, हिरव्या रंगाचे खरे कारण कळणार नाही याची दक्षता घ्यावी.
५. सर्व साहित्य न भाजता कच्चेच दळल्यामुळे हा प्रकार भा़जणीच्या वड्यासारखा तेलकट होत नाही.
६. सॉस, चटणी बारोबर किंवा नुसतेही खाऊ शकतात.
७. या पा.कृ.स माझ्या मुलाने ठेवलेले नाव - फुगलेले रंगीत वडे

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक + स्वतः करून पाहिलेल्या प्रयोगांचे फलित
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो काढ्ण्याएवढी स्पेशल वाटलीच नाही करताना, नेक्स्ट टाईम नक्की काढेन फोटो. पण हे रोडगे भाजणीच्या वड्यासारखेच दिसतात.

सत्वर पाव ग मला भवानीआई रोडगा वाहीन तुला ---- हे ऐकल होत पण रोडगा हा खाण्याचा पदार्थ कसा बनवतात हे माहित नव्हत. किंबहुना देवाला फक्त अन्न पदार्थ वहातात असे नाही. फुले, पाने वस्त्र इ पण वहातात त्यामुळे हा पदार्थ खाण्याचा आहे हेच माहित नव्हते.

धन्यवाद !

मस्त पाककृती!! Happy

नि३चंद्र, 'तो' रोडगा म्हणजे 'हा' नव्हे. आमच्या इथे नवस फेडायला 'वरण रोडगे' म्हणजे 'वरण बट्टी' (दाल बाटी) करतात्...त्या त्या देवतेच्या ठिकाणी जाउन. Happy

छान प्रकार. मूलाने सुचवलेले नाव जास्त क्यूट आहे. तेच द्यायला हवे.
"त्या" रोडग्याबद्दल बी ने लिहिले होते असे आठवतेय.

ही पा. कृ. पोस्ट केली तेव्हा फोटो टाकला नव्हता. आज नैसर्गिक रंग वापरुन रंगीत रोडगे केले.

Vade.jpg

१. पांढरे रोडगे - वरील पीठात मीठ, तेल व पाणी घालून हे केले. पण दळतानाच त्यात जीरे-धणे भाजून घातले असल्यामुळे चवीला पुरी/चपातीसारखे ब्लँड न लागता छान लागले.

२. पिवळे रोडगे - केशर तव्यावर थोडा गरम करुन दुधात भिजत घातला तासभर आणि या केशरी दुधात वरील पीठ भिजवले. दूध व केशर यांमुळे थोडी गोडसर चव आली याला.

३. लाल रोडगे- मूळ पा. कृ. नुसार सर्व घातले. फक्त तिखटाचा रंग फिका होऊ नये म्हणून हळद घातली नाही , जीरे-धणे पावडर, गरम मसाला किंचितसा घातला.

४. गुलाबी रोडगे- बीट रूट कुकरला ३ शिट्या लावून वाफवून घेतले. साले काढून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली. मीठ, तेल घातले. बीटाचा उग्रपणा कमी होण्यासाठी जीरे- धणे पावडर थोडी जास्त घातली व पीठ मळले.

५. हिरवे रोडगे - पालकाची पाने वाफवून घेतली. त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, तेल घालून मिक्सरमध्ये पेस्ट केली व त्यात पीठ मळले.

किती मस्त दिसतायत!

जिन्नस दळुन आणताना धणे-जिरे घातले तरी पीठ भिजवताना पुन्हा धणे-जिरे पावडर घालायची का?

मस्तच. कलरफुल.

मलापण गाडगेबाबांचे रोडगा वाहीन तुला, गाणं आठवलं. रोडगा काय हे आज कळलं.

धन्यवाद सगळ्यांना !

यात खायचा सोडा घालायची गरज नाही ना ?>>>> नाही. हे जास्त तेल पित नाहीत आणि खुसखुशीतही होतात सोड्याशिवाय.

पीठ भिजवताना पुन्हा धणे-जिरे पावडर घालायची का?>>> हे प्रत्येकाच्या चवीवर अवलंबून आहे. मी पुन्हा घालते धणे-जीरे पावडर.

रोडगा काय हे आज कळलं.>>>> माझ्या माहेरी श्रावणी शनिवारी रोडगे करायची पद्धत आहे. हिरव्या माठाची भाजी, रोडगे व खिचडी.

>>> सत्वर पाव ग मला भवानीआई रोडगा वाहीन तुला ---- हे ऐकल होत <<<<
तेच ते नितिनचंद्र... त्या गाण्यातला रोडगा म्हणजे काय अस्ते? वर कृती सांगितली आहे तसाच काहीतरि खाद्यपदार्थ असावा... नै का?
मला आधी वाटायकी ज्ञानेश्वरांनी पाठीवर काय बरे भाजुन दिले होते मुक्ताबाईला... तेच म्हणजे रोडगा...

लिंबूभाऊ, मुक्ताबाईंचे मांडे!

रोडगे म्हणजे खरंतर बट्ट्या... गोवर्‍यांवर किंवा निखार्‍यांवर भाजतात. वांग्याच्या भाजीबरोबर खातात. अधिक माहिती इथे मिळेल.

धन्यवाद सर्वांना !

हे किती दिवस टिकतात? प्रवासात नेता येतील का ३-४ दिवसांसाठी?>>> कुठल्याही भाज्या वगैरे न घालता मूळ पा. कॄ. नुसार बनवले तर २-३ दिवस टिकतील असे वाटते. पण मी स्वतः कधी प्रवासात वगैरे नेले नाहीत. त्यामुळे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.

रेसीपी छान आहे पण रोडगे नाव भयंकर आहे. मुलीला म्हणाले नास्त्यासाठी रोडगे करु आ? तर ती रोडग्याएवढे डोळे करुन काआआआय? असलं काही नको करुस. असं म्हणाली

रेसीपी छान आहे पण रोडगे नाव भयंकर आहे>>>> खरं आहे. माझ्या मुलानेही या पदार्थाचे नामकरण केले आहे, 'फुगलेले रंगीत वडे' असे, कदचित हेही कारण असावे यामागे.

धनवन्ती - हे पुरी किंवा भाजणीच्या वड्यासारखे तळणात जास्त तेल शोषून घेत नाहीत. त्यामुळे कदाचित तुम्हाला नंतर कोरडे लागले असतील.