राशिभविष्य
मे २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. जरी दोन्ही राशींची भविष्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध वाटली तरी दोन्हीचा सारासार अर्थ लक्षात घ्यावा. )
मेष : ह्या महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्र द्वितीयात आहे. गुरु तृतीयात आहे आणि शनि सप्तमात आहे. ह्यामुळे अनेक लोकांना लांबच्या प्रवासाचे योग येतील असे दिसते. आर्थिकदृष्ट्या देखील हा महिना अतिशय उत्तम आहे. महिन्याच्या सुरुवातीला चंद्र-मंगळ नवपंचम योग आहे, हा योग लक्ष्मीकारक आहे असे म्हणतात. पण मंगळ वक्री असल्याने ह्याचा उपयोग कितपत होईल शंका वाटते. तृतीयातील गुरु पराक्रम स्थानात अतिशय चांगली फळे देईल असे वाटते. जे लेखक आहेत, त्यांचे लिखाण पूर्ण होईल व पुस्तक प्रकाशन देखील होऊ शकेल, जे नोकरीच्या संदर्भात इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना देखील अपेक्षित यश मिळेल. घरातील वातावरण थोड्याफार कुरबुरी वगळता आनंदाचे आणि मनासारखे राहील. घरासंबंधी खरेदी इ. मनाप्रमाणे होईल. मुलांसंबंधी चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तसेच चांगल्या कंपनीचे शेअर लाभ देऊन जातील. शेअरच्या व्यवहारात देखील लाभ होईल, (मात्र संपूर्ण महिना लाभाचा कधीच नसतो, काही दिवसच लाभदायक असतात) तरी अंदाज घेत व्यवहार करावा. षष्ठ स्थानी मंगळ असला तरी प्रकृतीला तेवढा त्रासदायक नाही. (मंगळावर पाणी सापडले असे नासाचे वक्तव्य आहे, त्यामुळे मंगळाच्या उष्णतेच्या ऐवजी सर्दीचा त्रास होईल, असे वाटते!!) एकंदरीत मे महिना उत्तम जाईल.
वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र लाभात असून शनि षष्ठात आहे, त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धन स्थानी गुरु, तो सुद्धा आर्थिक लाभ मिळवून द्यायला पोषकच आहे. कौटुंबिक स्वास्थ्य देखील गुरुमुळे उत्तम राहील. जो तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहे, अश्यांना यश मिळण्याची बरीच शक्यता आहे. तृतीय स्थान लेखनाचे स्थान असल्यामुळे लेखकांचे लेख प्रसिद्ध होण्याची बरीच शक्यता आहे. काही लोकांना नवीन घर बुक करण्याचे पण योग आहेत. घरासंबंधी इतर खर्च पण होण्याची संभावना आहे. शेअर किंवा तत्सम संस्था ज्या भरपूर व्याजाची प्रलोभने दाखवतात, अश्या संस्थांपासून जरा दूरच राहिलेले बरे, अन्यथा नुकसान दिसत आहे!!! षष्ठेश शुक्र लाभात आणि शनि पण षष्ठात, त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना हा योग अतिशय चांगला आहे. (नवरे मंडळींनी सासरी भेट द्यायला हरकत नाही, काहीतरी लाभ नक्की होईल!! सासरेबुवांच्या पत्रिकेत आर्थिक फटका दिसत आहे!!) सप्तमेश मंगळ पंचमात आहे पण शनि षष्ठात असल्यामुळे हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल.
मिथुन : मिथुनेला गुरु लग्नी असून तो स्वतःच्या नक्षत्रात व उपनक्षत्रात आहे. गुरूमुळे शरीरप्रकृती व सामाजिक स्थान उत्तम राहील. गुरु सप्तमेश असल्याने वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्याचे संबंध राहतील. चतुर्थातील मंगळ अनेक लोकांना घर अगर जमीन खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करेल आणि बऱ्याच अंशी हा बेत सिद्धीस जाण्याची देखील शक्यता आहे. पंचमातील तूळ राशीचा शुक्र दशमात आणि शुक्र शनिच्या नक्षत्रात असल्यामुळे मुला-बाळांची प्रगती समाधानकारक राहील. दशम भावात शुक्र आणि लग्नी गुरु हे दोन्ही तुमच्या नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. लाभातील दोन ग्रह, रवि आणि बुध, हे देखील अनेक प्रकारचे लाभ मिळवून देतील. ह्या महिन्यात बराचसा वेळ घरातील छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यात जाईल त्यामुळे प्रवास करण्याची संधी येणार नाही.
कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र पहिले दोन दिवस लाभ स्थानी असल्याने अनेक लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. तृतीयातील मंगळ अनेकांना १० ते १५ मे ह्या सुमारास प्रवासाचे योग देईल. चतुर्थात राहू आणि नवम स्थानी शुक्र ह्यामुळे दोन-तीन गोष्टी संभवतात. ज्यांनी डॉक्टरेटसाठी किंवा परदेशी शिक्षणासंबंधी अर्ज केले असतील, त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळेल, किंवा काही लोकांच्या घरीच मोठा धार्मिक कार्यक्रम होण्याची पण तेवढीच शक्यता आहे. चतुर्थातील शनि मात्र थोडा त्रासदायक होईल असे वाटते. वाहने जपून चालवणे जरुरीचे आहे. मुलांच्या दृष्टीने महिना समाधानकारक आहे. दशमातील रवि-बुधामुळे नोकरीमध्ये बदली होण्याची दाट शक्यता आहे. काहींना नोकरीत बदल करावा असे देखील वाटेल. अर्थात वरील घटनेमुळे आर्थिक दृष्ट्या फटका बसण्याची शक्यता नाही.
सिंह : सिंह राशीची ह्या महिन्याची सुरुवात पहिल्या आठवड्यात जोरदार होईल. नोकरी-व्यवसायाविषयी चांगली बातमी मिळेल. पण दुसर्याा आठवड्यात प्रकृतीसंबंधी काहीतरी समस्या येण्याची शक्यता आहे. द्वितीय स्थानातील मंगळ मारक स्थानात असल्यामुळे तो देखील चंद्राच्या भ्रमणानुसार प्रकृती नरम-गरमच ठेवणार आहे. त्यामुळे ह्या महिन्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रकृतीकडे जास्त लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे. तृतीयातील राहू-शनि थोडाफार प्रवास दाखवत आहेत, पण ह्या प्रवासात अडचणी येऊ शकतात. पंचमेश गुरु लाभत असल्याने सर्वसाधारण मुलांच्या दृष्टीने चांगला आहे. लग्नेश रवि नवम स्थानी, पंचमेश गुरु लाभ स्थानी त्यामुळे अध्यात्मिक वाचन किंवा धार्मिक कार्यात रुची वाढीस लागेल असे दिसते. घरगुती वातावरण सलोख्याचे राहील. एकादश स्थानी गुरु हा आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने समाधान कारक राहील.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना किरकोळ गोष्टी वगळता प्रकृतीच्या दृष्टीने महिना चांगला जाईल. द्वितीयेतला उच्चीचा शनि आणि मिथुनेतला गुरु आर्थिक आवक समाधान कारक ठेवील. द्वितीयातल्या शनिमुळे कदाचित डोनेशन द्यायची वेळ येईल. तृतीयेश मंगळ लग्नी असल्याने आणि शनि द्वितीयात असल्याने तुमच्या पराक्रमाला चांगलाच् वाव मिळेल, बोलण्याला धार प्राप्त होईल. त्यामुळे हा काळ लेक्चरर्स, प्रोफेसर्स ह्यांना चांगला जाईल. जी मंडळी शिक्षण किंवा शिक्षण खात्यासंबंधी काम करतात त्यांच्या कार्याची वाखाणणी होईल. पंचमेश शनि द्वितीयात असल्याने शेअर अगर तत्सम गोष्टींपासून दूर राहणेच चांगले. सप्तमेश शुक्र असल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अष्टमातील रवि व बुध वैवाहिक जोडीदाराकडून धनलाभाचे योग दर्शवतात. ह्या काळात अनेक लोकांना उच्च शिक्षणाची संधी देखील मिळणार आहे, कारण नवमेश शुक्र सप्तमात आहे व शनि द्वितीय स्थानी आहे. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल.
तूळ : तूळ राशीला लग्नी शनि, पंचमात शुक्र आणि नवमात गुरु....ग्रहांची ही बैठक अध्यात्म योगाला अतिशय उत्तम आहे. अध्यात्माची आवड असणाऱ्यांना ध्यान-धारणेसाठी अतिशय उत्तम काळ आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम जाईल असे दिसते. नवम स्थानातील गुरु हा तृतीयेश देखील असल्याने बऱ्याच लोकांना लांबच्या प्रवासाची संधी प्राप्त होईल. मुलांच्या दृष्टीने हा काळ समाधान कारक जाईल...परीक्षा, निकाल, अॅडिमशन, इ. गोष्टी मनासारख्या घडतील. रवि व केतू दोन ग्रह षष्ठात आहेत, पण त्याच्या विरुद्ध शुक्र पंचमात आणि गुरु नवमात हे दोन बलाढ्य ग्रह असल्याने प्रकृतीची चिंता नको. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक जाईल. लाभेश रवि षष्ठात आणि शुक्र पंचमात, ह्या ग्रह स्थितीमुळे आर्थिक प्राप्ती चांगली होत असली तरी नुकसान वा अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे, तरी सर्व व्यवहार जपून करावेत. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल.
वृश्चिक : वृश्चिकेचा राशीस्वामी मंगळ लाभ स्थानी असल्याने विविध प्रकारचे लाभ होतील असे दिसते, पण मंगळ मार्गी होईपर्यंत कदाचित थांबावे लागेल. गुरु जसा धनेश आहे तसाच तो पंचमेश आहे आणि अष्टमात आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार जपूनच करावेत. मुला बाळांच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. रवि, बुध, केतू हे तीन ग्रह व मेष रास षष्ठात असल्याने प्रकृतीची काळजी घेणे इष्ट!! गृह सौख्याच्या बाबतीत मात्र हा महिना समाधान कारक आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासंबंधी प्रयत्नशील आहेत त्यांना ह्या महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळेल. नोकरी-व्यवसायाच्या बाबत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील. षष्ठातील रविमुळे चांगली फळे मिळतील मात्र शुक्र पंचमात आणि राहू द्वादशात ही दोन्ही स्थाने नोकरीच्या दृष्टीने योग्य नाहीत. तरी सावधानतेने पाऊले उचलणे जरुरीचे आहे. सर्व साधारणपणे हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.
धनु : धनु राशीचा स्वामी गुरु सप्तमात असल्याने हा संपूर्ण महिना कौटुंबिक सलोख्याचा जाईल असे दिसते. (भूत प्रसन्न आहे....योग्य उपयोग करून घ्या!!) मकरेचा शनि लाभात, कन्येचा राहू दशमात आणि मिथुनेचा गुरु सप्तमात हे तीन ही ग्रह नोकरी-व्यवसायासाठी फारच उत्तम आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. पंचमातील रवि आणि बुध ह्यामुळे हा महिना मुलांच्या बाबत समाधान कारक राहील. षष्ठातील शुक्र देखील नोकरी-व्यवसायासाठी उत्तम राहील, हे वरील विधानाला पुष्टी देत आहे. दशमातील मंगळ सर्व दृष्टीने उत्तम आहे! पण मंगळ वक्री असल्याने चांगली फळे मिळण्यासाठी कदाचित २० मे पर्यंत वाट पहावी लागेल. (ज्यांच्या पत्रिकेत अश्या प्रकारचे योग असतील त्यांनाच ही फळे मिळतील.) प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना उत्तम जाईल. धार्मिक बाबतीत प्रवासापेक्षा घरीच पूजा-अर्चा करण्यात वेळ जाईल, असे दिसते. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.
मकर : मकर राशीचा स्वामी शनि दशमात असून गुरु षष्ठात आहे. त्यामुळे, नोकरी अगर व्यवसायाच्या दृष्टीने हा योग उत्तम आहे. तसेच गुरूची पंचम दृष्टी देखील शनिवर आहे, त्यामुळे नोकरी-व्यवसाय आणि प्रकृतीच्या दृष्टीने चांगला योग आहे. द्वितीय भावातील शुक्र, षष्ठातील गुरु आणि चतुर्थातील रवि हे तीन ही ग्रह तुमच्या पराक्रमाला साजेसा उत्साह देणार आहेत. मुला बाळांच्या दृष्टीने हा महिना समाधानाचा जाईल. काहींच्या बाबतीत कलेच्या आवडीला उत्तम संधी मिळेल. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण राहील. अष्टमेश रवि चतुर्थात आहे, केतू देखील चतुर्थात असून मेष राशीत आहे आणि मंगळ नवम स्थानी आहे. ही सर्व ग्रहस्थिती प्रवासास अनुकूल नाही, तरीही प्रवास करणे आवश्यक असल्यास सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. लाभेश व चतुर्थेश मंगळ नवम स्थानी, गुरु षष्ठात असल्याने मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात घरासंबंधी काही आनंददायक बातमी ऐकायला मिळेल. द्वादशेश गुरु षष्ठात आणि शनि दशमात त्यामुळे चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवण्यास उत्तम काळ आहे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि तूळ राशीत नवम स्थानी आहे. गुरु पंचम स्थानी आहे. एप्रिल महिन्याप्रमाणेच गुरु आणि शनिची ग्रहस्थिती असल्यामुळे अध्यात्मिक योगाच्या दृष्टीने हा महिना देखील तेवढाच उत्तम आहे. तरी ज्यांना अध्यात्माची आवड असेल त्यांची निश्चित ह्या महिन्यात प्रगती होईल असे दिसते! द्वितीय स्थानातील शुक्र ज्यांचा व्यवसाय अगर नोकरी फिरतीची आहे, त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल, इतरांना सर्वसामान्य राहील. तृतीयात रवि, बुध, केतू हे तीन ग्रह असल्याने छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. तृतीयेश मंगळ मात्र अष्टमात असल्याने जवळच्या चीज-वस्तूंची सावधपणे काळजी घ्यावी. चतुर्थेश शुक्रामुळे काही जातकांच्या मातुश्री तीर्थयात्रेला जातील. मुला-बाळांची प्रगती समाधान कारक राहील. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना आनंददायक जाईल. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना सर्वसाधारण जाईल. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.
मीन : मीन राशीला ह्या महिन्यात प्रकृतीविषयी थोड्याफार तक्रारी राहतील असे दिसते. द्वितीय स्थानातील ग्रह आर्थिक आवक बऱ्यापैकी ठेवतील असे योग आहेत. चतुर्थातील गुरु घरातील वातावरण आनंदी ठेवील. मात्र सप्तमातील मंगळ वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार कुरबुरीचे प्रसंग आणण्याची शक्यता आहे. मुला-बाळांच्या प्रगती बाबत थोडी चिंता राहील. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने चतुर्थातील गुरु बऱ्यापैकी यश मिळवून देईल. लाभेश शनि अष्टमात आणि गुरु चतुर्थात त्यामुळे घरासंबंधी काही खर्च होण्याची शक्यता आहे, उदा. फ्रीज, ए.सी., टी.व्ही. इत्यादी. काहींना नवीन वाहन खरेदीचे योग येतील असे दिसते.
धन्यवाद पशुपती
धन्यवाद पशुपती
धन्यवाद! पशुपतीजी , जर दर
धन्यवाद!
पशुपतीजी , जर दर महिन्यातील transits वर लिहिलेत तर अभ्यासकांना चांगले राहील .
पशुपती, आपलं मागच्या
पशुपती, आपलं मागच्या महिन्याचं भविष्य अगदी अचूक होतं (माझ्या बाबतीत).
धन्यवाद!