पडझडीनंतरची धडपड: ज्ञानप्रबोधिनी, हराळी (जि. उस्मानाबाद)

Submitted by आनंदयात्री on 21 April, 2014 - 06:10

प्रस्तुत लेख ही कुणाचीही जाहिरात नाही. पण 'मी, माझं, मला' या तीन स्वयंशत्रूंपासून थोडं लांब गेल्यावर जे जग दिसलं, जी आत्मीयता दिसली तिला शब्दांत लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. भयंकर काळरात्रीनंतर येणार्‍या सूर्योदयाच्या स्वागताला पुन्हा नव्या उमेदीनेही उभं राहता येऊ शकते, सर्वस्व नाहीसं झालं असलं तरीही जगणं संपत नाही, तर ते पुन्हा सुरूही होऊ शकतं ही खात्री पटवणारी ही माणसं आणि हे पुरावे!

*******************************

'परब्रह्म शक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये'.... बरोब्बर सकाळी सव्वासहाला उपासना सुरू होते. झाडून सगळे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक उपासनेला जमतात. अर्धवट झोपेमध्येही धीरगंभीर आवाज कानात घुमतो, आणि बराच वेळ तिथेच ठाण मांडून बसतो. साडेसहाला उपासना संपते. प्रत्येकजण आपापल्या कामाला निघतात.

१९९३ च्या किल्लारी भूकंपामध्ये मराठवाड्यात विशेष नुकसान झाले. लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे विशेषत्त्वाने भूकंपाच्या तावडीत सापडले. त्या पडझडीनंतरच्या गेल्या वीस वर्षांत काही गावे पुन्हा उभी राहिली, माणसे सावरली, पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली. त्या पडझडीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंपात पुसल्या गेलेले 'हराळी' नावाचे एक खेडे दत्तक घेऊन तिथे 'ज्ञानप्रबोधिनी'ने शाळा बांधली आहे. एक कृषी पदविका विद्यालय (डिप्लोमा)सुद्धा सुरू केले आहे. जोडीला फळप्रक्रिया, गांडूळखत इत्यादी उपक्रमही सुरू आहेत. नुकतीच या शाळेला भेट देण्याची संधी मिळाली.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गपासून अंदाजे ३० किमी वर 'आष्टामोड' इथे उतरून (मोड = फाटा) लोहारा रस्त्याने सोळा-सतरा किमी वर आत हराळीला जावे लागते. एकूणातच दक्षिण मराठवाड्याचा परिसर मैलोन्मैल सपाट, उजाड आहे. एप्रिलमधल्या ऊन्हाने तर तो अजूनच भकास वाटत होता. बाईकवरून जाताना शाळेतले सर भूकंपात पडलेल्या घरांबद्दल सांगत होते. एखाद-दुसरे पडलेले घरही दाखवत होते.

शाळेत पोचलो तेव्हा सूर्य कलतीला आला होता. एप्रिल महिन्यातही कोरडी संध्याकाळ पसरत चालली होती.
प्रवेशद्वाराशीच हा दिसला आणि दिवसभराचा थकवा दूर पळाला -

भूकंपानंतर अनेक दानशूरांनी संस्थेला जमीन दिली, कुणी पैसा दिला, कुणी यंत्रसामग्री दिली, कुणी मनुष्यबळ दिलं. नऊ एकर जमिनीवर पैसा आणि उपलब्ध सामग्री यांचा नेटका वापर करून संस्थेने शाळा उभारली, आंबा-लिंबू-काजू-चेरी यांच्या बागा फुलवल्या, उपलब्ध मुबलक सौरशक्तीचा आणि पवनशक्तीचा वापर करून पाच तास लोडशेडींग असतानाही वीज उपलब्ध करून घेतली आहे. त्याचे हे फोटो -

तिथल्या फळप्रक्रिया विभागात 'घरच्या' शेतातल्या फळांवर प्रक्रिया करून आवळ्याचे सरबत-सुपारी-लोणचे, आले-लिंबू सरबत, पेरूच्या वड्या (यांची चव आवडली मला!) असे कितीतरी पदार्थ पुणे-सोलापूर-मुंबईत विक्रीसाठी पाठवले जातात.

पुरूष व महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र निवास नुकतेच बांधून झाले आहेत. स्थानिकांबरोबरच बाहेरगावातून कामासाठी येणार्‍या लोकांसाठी इथे राहण्याची सोय होते.

व्यसनमुक्ती केंद्राचं बांधकाम सध्या सुरू आहे.

या कामासाठी लागणार्‍या विटाही तिथेच तयार होतात -

दोनमजली शाळा, उपासना वर्ग, स्वतंत्र भोजनगृह, वाचनालय, भोजनगृहासाठी खास करून बसवण्यात आलेले सोलर पॅनल्स. या पॅनल्समुळे संपूर्ण शाळेचे दुपारचे जेवण बनवले जाते.

अतिशय ओसाड भागावर अविरत प्रयत्नांमधून आता हळूहळू हिरवळ फुलू लागली आहे.

तीन दिवसांच्या मुक्कामात तिथे अनेक माणसे भेटली. वयाने, अनुभवाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठी. ज्ञानप्रबोधिनी सोलापूर आणि हराळी ज्यांनी बांधली ते अण्णा ताम्हणकर भेटले. (डॉ. स्वर्णलता भिशीकर किंवा लताताई आणि अण्णा ताम्हणकर या दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचं या कामी योगदान मोठं आहे. कामानिमित्त पुण्यात गेल्यामुळे लताताईंशी भेट होऊ शकली नाही.) वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षीही भर दुपारच्या उन्हात परिसरात देखरेखीसाठी 'राऊंड' मारण्यास जाणारा हा अवलिया माणूस म्हणजे शिस्त, जिद्द, ज्ञान, चिकाटी, निष्ठा यांचा नतमस्तक व्हावं असा अनोखा मिलाफ आहे. केवळ अण्णाच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आणि सहवासात आलेली प्रत्येकच व्यक्ती थोड्याफार फरकाने अशीच आहे. मीराताई आणि त्यांचे पति हराळीची शाळा सांभाळतात. पुण्याच्या अशोक विद्यालयातून निवृत्त झाल्यावर मीराताई आता तिथेच शिफ्ट झाल्या आहेत. आज उतारवयातही त्यांची धावपळ, प्रत्येक छोट्यामोठ्या बाबीकडे लक्ष देऊन काम करायची सवय, आपुलकी, मुलांबद्दलची माया बघत राहावी अशी आहे!

ही सगळीच माणसे वेळ पाळण्यात तत्पर आहेत. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळण्याची वृत्ती हे गुण माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात असं मला वाटतं. हळूहळू मोठा होत चाललेला पसारा सांभाळतानाही इथले सगळेच जण सेवाभावी वृत्ती जराही सोडत नाहीत, हे वैशिष्ट्य! पाट्या टाकून कामं करण्याची सवय इथल्या अस्सल सेवाव्रतीना ठाऊकच नाहीये, असं सारखं वाटत राहिलं. मग ते शाळेतल्या तासाबद्दल चर्चा करणं असो अथवा भोजनगृहात जेवताना एखादा पदार्थ वाढण्याबद्दल असो, जी सेवाभावी वृत्ती पाहुण्याबद्दल, तीच तिथल्या शाळकरी मुलांबद्दलही!

मी तिथून निघताना त्या अनोळखी, बुजर्‍या पण लाघवी मुलांनाही 'अजून एक दिवस तरी थांबा की' असा आग्रह करावासा वाटला, यापेक्षा अधिक माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला काय हवं होतं? हे समाधान शब्दांत मांडता येण्यासारखं नाहीच.

लिंबाआड मावळतीला उतरत जाणारा सूर्य पुन्हा चढण्याची उमेद घेऊनच गेली वीस वर्षे उगवतोय आणि यापुढेही उगवेल. पुढच्या वेळी जेव्हा हराळीत जाईन तेव्हा अशीच नवी पालवी तरारलेली दिसेल अशी खात्री आहे.
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/04/blog-post_21.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्यानाच तसेच हे उदात्त कार्य आम्हाला नजरेस आणुन दिल्याबद्दल तुम्हालाही दन्डवत. आम्हालाही तिथे भेट द्यायला आवडेल.:स्मित:

धन्यवाद आनन्दयात्री.

ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याला सलाम!उस्मानाबाद, नळदुर्ग, लोहारा वगैरे भागाची थोडीफार माहिती आहे. अश्या शुष्क आणि एका अर्थाने भकास प्रदेशात हे एक नंदनवनच म्हणायला हवे. खरोखर कौतुकास्पद!!

मायबोलीचा सदस्य असल्याचा सर्वात मोठा फायदा कुठला असेल तर अशारितीचे कार्य आणि संबंधित सविस्तर आदर्शवत माहिती समोर येते, तीही प्रकाशचित्रांच्या संगतीने. असे अथक कार्य करीत राहाणार्‍या आणि स्वतःला त्यात तनमनधनाने झोकून देणार्‍यांना मनःपूर्वक वंदन करावे असेच वाटते....तेही तिथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन.

आनंदयात्री यानी सुरुवातीला म्हटले आहे, "...सर्वस्व नाहीसं झालं असलं तरीही जगणं संपत नाही...". मानवी जीवनाचा हा झगडाच आहे शेवटी. पण नाहीसं झाले म्हणून वरच्याला दोष देण्यापेक्षा आपल्याला त्यानेच दोन हात दोन पाय दिले असतील तर उजाड धगधगीत माळरानावरदेखील हिरवळ फुलविता येते हे ज्ञाप्रबोधिनी हराळीने सिद्ध केले आहे ते फार अनुकरणीय आहे.

वयाची साठी आली म्हणजे "आता माझे जीवन संपले, मी आता कुणाकडे पाहून जगू ? वृद्धाश्रमात कसे जायचे ?" अशा विनवण्या करणार्‍यांच्या समोर श्री.अण्णासाहेब ताम्हणकर, वय वर्षे ८१, यांचे कार्य आणि उदाहरण आले तर उमजून येईल की लोक का यांच्यासमोर नतमस्तक होतात.

मस्त लिहिलं आहे . एका छान उपक्रमाची ओळख झाली तुमच्यामुळे.>>+१

आणि तुझही कौतुक. तुला स्वतःचा वेळ तिथे द्यावासा वाटला. अर्थात तू जे केलस ते करण्याने तुला खूप समाधान मिळालं आहे पन समाधान हे अशा प्रकारे मिळवावं असं तुला वाटलं हेच मला महत्वाचं आणि कौतुकास्पद वाटतं.

तू घरी आलास की सानिकाला ह्या सगळ्या अनुभवा बद्दल भरभरुन सांगावस असं मला वाटतं. तिला पुर्णपणे कळेल न कळेल पण जे तिच्या आत झिरपेल ते ही खूप मोलाचं असेल.

छान लिहिलय. कष्टाळू लोकांच्या मेहनतीने फुललेल्या या सुंदर नंदनवनाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
आज छान प्रेरणादायी लिखाण वाचायला मिळालं.

तुम्हाला अशा उपक्रमात सक्रीय सहभागी होता आले.खरच भाग्यवान आहात.

कडक सलाम तुम्हाला , ज्ञानप्रबोधिनी आणि त्यांच्या पुर्ण सहकारी लोकाना.

नचि, खुपच सुरेख लिहिलंय. Happy मनापासुन आवडलं. Happy

आणि तुझही कौतुक. तुला स्वतःचा वेळ तिथे द्यावासा वाटला. अर्थात तू जे केलस ते करण्याने तुला खूप समाधान मिळालं आहे पन समाधान हे अशा प्रकारे मिळवावं असं तुला वाटलं हेच मला महत्वाचं आणि कौतुकास्पद वाटतं.>>>>>+१ Happy

>>एकूणातच दक्षिण मराठवाड्याचा परिसर मैलोन्मैल सपाट, उजाड आहे. एप्रिलमधल्या ऊन्हाने तर तो अजूनच भकास वाटत होता...>>

आनंदयात्री , या लेखाच्या निमित्ताने अस्मानी आणि सुलतानी दोन्हींचा अनुभव पचवलेल्या मराठवाड्यातील रखरखीत वास्तव तुम्ही पुन; समोर ठेवले आहे आणि त्यावर मात करण्याचे मानवी प्रयत्नही.आभार या लेखासाठी , तुमच्या या वृत्तीचं कौतुक करावं तेवढं थोडं .

छान लिहिलय. कष्टाळू लोकांच्या मेहनतीने फुललेल्या या सुंदर नंदनवनाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
आज छान प्रेरणादायी लिखाण वाचायला मिळालं. >>>> +१०० ....

या कामासाठी तू वेळ देतोस हे फार कौतुकास्पद आहे. >>>> +१०० ....

कविता, जिप्सी, श्यामली, शशांकजी, भारतीताई, रंगासेठ, डीमुग्धा - थँक्स आणि शुभेच्छा-आशीर्वाद असू द्यात...

कविता, सानुला सांगण्याचं सुचलं नव्हतं मला. मस्त आहे आयडीआ. नेक्स्ट टाईम आमच्या स्पेशल गप्पा करू त्यावर. Happy

Back to top