१. मोठी वांगी (जांभळी) - २
२. घट्ट दही - दीड कप
३. हळद
४. हिरव्या मिरच्या - दोन लहान
५. मोहरी - अर्धा चमचा
६. आलं - अर्धा चमचा
७. लसूण - चार पाकळ्या
८. दालचिनीची पूड - पाव लहान चमचा
९. पाच-सहा वेलदोड्यांची पूड
१०. पुदिन्याची पानं - दहाबारा
११. मीठ
१२. साखर
१३. तेल
१. वांग्याचे हवे तसे काप करावेत. म्हणजे चौकोनी, लांब, चकत्या इत्यादी.
२. हे काप मिठाच्या पाण्यात साधारण पंधरा मिनिटं बुडवून ठेवावेत.
३. नंतर पाण्याबाहेर काढून पाणी चांगलं निथळलं की त्यांवर हळद, साखर चांगली चोळावी.
४. अर्ध्या तासानंतर सुटलेलं पाणी फेकून हे काप तेलात खरपूस तळावेत.
५. वांग्याचे तळलेले काप थंड होईपर्यंत दही पाणी घालून चांगलं फेटून घ्यावं. घट्ट कढीइतपत ते दाट असावं.
६. दह्यात मीठ, वेलदोड्याची पूड, दालचिनीची पूड घालावेत. दही आंबट असल्यास आपापल्या इच्छेनुसार साखर घालावी.
७. एका कढईत तेलाची मोहरी, हळद घालून फोडणी करावी.
८. फोडणीत आलंलसूण घालून चांगलं परतावं.
९. तांबूस रंग आला की हिंग घालावं. हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.
१०. शेवटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या तडतडल्या की कढई खाली उतरवावी.
११. एका भांड्यात वांग्याचे काप ठेवावेत. त्यावर दही ओतावं आणि शेवटी तयार केलेली फोडणी घालून हे मिश्रण एकजीव करावं. फोडणी अगदी गरम असतानाच दह्यावर घालावी.
१२. वरून पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घालावीत.
हा पदार्थ अनेक पद्धतींनी करता येतो.
दह्याची चव कशी असावी, हे आपलं आपण ठरवावं. हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरता येईल, आलंलसूण वगळता येईल, किंवा फोडणीत कांदा घालता येईल. दालचिनी-वेलदोडा न घालता धणेजिर्याची पूड घालता येईल. पुदिन्याऐवजी कोथिंबीर वापरता येईल. क्वचित कढीपत्ताही वापरला जातो. 'पण हे असलं काहीतरी हल्लीहल्लीच इकडे आलेले साउदिंडियनच करतात, आमच्यात कढीपत्ता घालत नाहीत', असं मला ही पाककृती सांगणार्या आजोबांनी सांगितलं.
दह्याऐवजी फेसलेली मोहरी वापरली तर 'शोर्शे बेगुन' हा पदार्थ तयार होतो.
हा पदार्थ पोळी, भात, पुलाव यांबरोबर खाता येतो.
चविष्ट लागत असेल ... अरेबिक /
चविष्ट लागत असेल ... अरेबिक / लेबनीज बाबा गनूश पेक्षा टेस्टी वाटतेय
फोटो टाक नेक्स्ट टैम
वेगळाच आहे प्रकार! मस्त
वेगळाच आहे प्रकार! मस्त वाटतोय पण. अगदी कमी प्रमाणात करून चाखायला हवा...
बदेमजा न बोलानी जवळपास अशीच
बदेमजा न बोलानी जवळपास अशीच बनवतात. चविष्ट लागतो तो प्रकार. वरून तळलेला कुरकुरीत पुदीना टाकतात.
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा'
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.>> रिअली? हमे लगा हिंगही बोलते है.
देवीका, बदेमजान बुर्रानी हा
देवीका,
बदेमजान बुर्रानी हा पदार्थ खरा म्हणजे आपल्या वांग्याच्या भरतासारखा करतात. वांगं भाजून अगदी बारीक तुकडे केले जातात. ही पारंपरिक फारसी पाककृती आहे, पार नवव्या शतकापासूनची. अधिक माहितीसाठी वाचा....
क्स, धन्यवाद त्या वांग्याच्या
क्स, धन्यवाद
त्या वांग्याच्या कापांना हळद आणि साखर चोळायची का हळद आणि मीठ? आम्ही सहसा मीठ लावतो.
शिवाय फोडणीत वांग्याचे काप घालून वरती दही घालून ते एकदोन मिनिट गॅसवर ठेवलं तरी चालतं. चव बिघडत नाही.
मसाल्यातले बदल सोडले तर आम्ही दोई पोटोल (परवर) पण असंच करतो. दोई माछ पण अशाच कृतीने करत असतील.
वर्दातै, आधी मिठाच्या पाण्यात
वर्दातै,
आधी मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने पुन्हा मीठ न चोळता साखर चोळावी, म्हणजे वांग्याला उत्तम रंग येतो.
मस्त आहे, सोपं आहे करायला.
मस्त आहे, सोपं आहे करायला. पदार्थ आणि कृतीची लांबी बघून उगीचच क्लिष्ट वाटली आधी..
जरा नवीन काहीतरी. थँक्स रे.. मॉडिफिकेशन्सबद्दल वेगळे थँक्स
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.>>> हे असं मुद्दाम का सांगितलंय?
मजा वाटली मला मधेच वाचताना..
ह्म्म्म, करून बघेन आता. पण
ह्म्म्म, करून बघेन आता.
पण उत्तम रंग म्हणजे कसा?
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा'
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.>>>
हे एकदम बेश्टे!
सडा-फटिंग म्हटल्यासारखं
सडा-फटिंग म्हटल्यासारखं वाटलं...तसंही अस्फटीडा आमच्या मिसळणाच्या डब्याच्या बाहेर वेगळ्या डबीत (वास टिकून रहावा म्हणून) सडाफटींगच असतो
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा'
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात. <<<<
Sugar gets caramalized.
Sugar gets caramalized. giving a pretty brown crisp shade. sizzling!
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा'
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात. >>> अधिक माहितीसाठी पाहा...:फिदी:
जांभळ्याऐवजी हिरवी वांगी
जांभळ्याऐवजी हिरवी वांगी घातली तर?
जांभळ्याऐवजी हिरवी वांगी
जांभळ्याऐवजी हिरवी वांगी घातली तर?>> चव बदलते !
पांढरी किंवा हिरवी वांगी ही
पांढरी किंवा हिरवी वांगी ही कमी कडवट असतात. मात्र हिरव्या वांग्यांचं साल हे जांभळ्या वांग्यांच्या सालीपेक्षा थोडं जाड असल्यानं हिरवी वांगी तळायला बरी असतात. मात्र चकत्या करायच्या असल्यास जांभळी वांगी चांगली कारण ती अधिक निमुळती असतात. शिवाय जांभळ्या वांग्यांचं टेक्श्चर स्पंजसारखं असतं. त्यामुळे सगळ्या चवी आत शोषल्या जातात. हिरव्या वांग्यांमध्ये असं टेक्श्चर नसतं.
कृती मस्त आहे. वांगं डीप
कृती मस्त आहे.
वांगं डीप फ्राय करायचं असल्यामुळे अगदी अशाच पद्धतीने करुन बघायचा मुहूर्त कधी मिळेल ते मात्र माहीत नाही. वांग्याचे काप जरा जास्त तेलावर खरपूस भाजून घेऊन किंवा मग ग्रिल करुन वरचे मसाले वापरुन करेन.
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा'
हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात
सुंदर....
रच्याकने, पाकृ पण सुंदर. वांगी तळून बेस्टॅस्ट लागतील यात शंकाच नाही. मी करुन पाहेन आणि कळवेन इथे.
चिनूक्स, माहितीबद्दल
चिनूक्स, माहितीबद्दल धन्यवाद.
मगाशी लिहायचं विसरले -
वांग्याचे काप भ र पू र तेल पितात. तेव्हा त्यासाठी एक सजेशन - चकत्या करू नका. मोठ्या फोडी करा. तेलात सोडताना आधी सालासकटची पाठीची बाजू सोडा. ती खरपूस झाली की मग गराच्या बाजूला उलटून घ्या. असे केल्याने किंचित कमी तेल पितात.
आणि त्याच तेलात फोडणी करून घ्या.
छान पाककृती.
छान पाककृती.
मस्त पाकृ! मी पण अगो प्रमाणेच
मस्त पाकृ! मी पण अगो प्रमाणेच परतून नायतर ग्रील करून पाहेन.
यात वांग्याऐवजी काय घालता
यात वांग्याऐवजी काय घालता येईल?
दोई बेगुन या पदार्थात
दोई बेगुन या पदार्थात वांग्याशिवाय इतर काहीही घालता येणार नाही. क्षमस्व. धन्यवाद. कृपया. मुकाट्याने वांगी खा.
वांग्याचे काप अगोदर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्याने ऑस्मॉसिसमुळे वांग्यांमधलं पाणी बाहेर पडतं. त्यामुळे वांगी कमी तेलात उत्तम तळली जातात. कमी तेलात नुसती परतली तरी हरकत नाही.
त्या रिवर्स ऑस्मॉसिस नंतरचं
त्या रिवर्स ऑस्मॉसिस नंतरचं तेलही मला जास्तच वाटतं. असो. अगोने सुचवल्याप्रमाणे शॅलो फ्राय करून बघितलं पाहिजे
इंटरेस्टिंग !! वांग्याचे काप
इंटरेस्टिंग !!
वांग्याचे काप अगोदर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्याने रिव्हर्स ऑस्मॉसिसमुळे वांग्यांमधलं पाणी बाहेर पडतं. त्यामुळे वांगी कमी तेलात उत्तम तळली जातात. कमी तेलात नुसती परतली तरी हरकत नाही.>>> माहितीसाठी धन्यवाद.
रिव्हर्स नव्हे, नुसतं
रिव्हर्स नव्हे, नुसतं ऑस्मॉसिस. वर दुरुस्त केलं आहे..तंद्रीत होतो लिहिताना.
रिवर्स ऑस्मॉसिस! हंं ...
रिवर्स ऑस्मॉसिस!
हंं ... स्वैंपाकातलं विज्ञान.
वांगं मला कसंही केलं तरी आवडतं.
हे तर फारच चविष्टं दिसतंय.
एवढं तेल वापरण्याचा योग आल्यास करून बघण्यात येईल.
हां, तरीच. मी खूप वेळ डोकं
हां, तरीच. मी खूप वेळ डोकं चालवत होते की वांग्यात रिव्हर्स ऑ. कसा होत असेल... पण म्हणलं मला माहित नसेल
मस्त! पाकृचं नाव वाचून बंगाली
मस्त! पाकृचं नाव वाचून बंगाली आहे का असं वाटलं होतं. पण ही ओरिसातली खास पाकृ दिसतेय. आता उन्हाळ्यात दही घालून नवं काय करता येईल याच्या शोधात असताना मस्त पाकृ दिलीत! धन्यवाद!
Pages