मेथी बटाटा

Submitted by प्राची on 7 March, 2014 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,
१-१.५ टीस्पून मेथीदाणे,
मेथीदाण्यांच्या दुप्पट प्रमाणात उडीद डाळ,
एक ते दीड वाटीभर ओले खोबरे,
३-४ हिरव्या मिरच्या,
तूप,
मीठ, चिंच, मोहरी, हिंग, हळद.
कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१. उकडलेले बटाटे सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
२. थोड्याश्या तेलात मेथीदाणे आणि उडदाची डाळ लालसर होईपर्यंत परतावी. त्यातच हिंगही घालावे.
३. मेथीदाणे-उडदाची डाळ लाल झाली की त्यात खोबरे आणि हिरवी मिरची घालून परतावे जरा.
४. हे सगळे गार झाले की मिक्सरमधून वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात चिंच घालावी.
५. कढईत तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद फोडणी करावी.
६. त्यात बटाटे घालून परतून घ्यावेत.
७. बटाट्यांवर वाटण घालून मिक्स करावे.
८. चवीनुसार मीठ घालावे आणि पातळ रस्सा होईल अश्या तर्‍हेने पाणी घालावे.
९. वर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे.
१०. चिरलेली कोथिंबीर घालून वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. रस्सा बर्‍यापैकी आंबट होईल अश्या अंदाजाने चिंच घालावी.
२. मेथी आणि चिंच यांची कडू-आंबट अशी मस्त चव येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके, मेथीदाणे लिहिलं नसतं तर माझ्या लक्षात नसतं आलं. मी आपला विचार करतेय की पुढच्यावेळी मेथीची भाजी करेन तेव्हा आठवणीने दीड टीस्पून काढून ठेवायला हवी किंवा मग कसूरी वापरायला हवी Proud

हां, पूनम बरोबर. मेथ्या म्हटल्यावर कर्रेक्ट पोचेल.

मस्त रेसेपी.

मेथी बटाटा नाव वाचून मला वाटलं की युपी/पंजाब्यांच्या पद्धतीची बटाटे घातलेली मेथी ची भाजी आहे की काय. (ती तसली भाजी म्हणजे मेथी आणि बटाटे दोन्हीचा अपमान आहे) मी त्या भाजीची कृती लिहिल्याबद्दल निषेध नोंदवायला आले होते. Proud

कोकणी लोक उडीदमेथी नावाचा प्रकार करतात - त्यात नारळाबरोबर सुक्या मिरच्या, धणे थोडे परतून वाटलेले असतात. कोहळ्याचे सांडगे + कैरी हे कॉम्बो एकदम भन्नाट लागत उडीदमेथी मधे . पण सुरण, दुधी, कोहळा, भेंडी अशा भाज्या घालून सुद्धा करतात

आता हिरवी मिरची घालून करुन पाहीन.

भारी रेसिपी. करून बघेन नक्की.

बटाट्याऐवजी चिकन घातलं तर चालेल का हा प्रश्न समस्त नॉनव्हेज प्रेमींतर्फे विचारते आहे Wink

मेधा, इथे एक आहे कृती उडीदमेथी नावानं असं मला अंधूक आठवतं आहे. तूच लिहिली आहेस का? Happy

भारी रेसिपी.

चिकन घालून मस्तं लागेल.
पण तुम्हाला एका सजीवाला मारून काय मिळणार?
बटाट्यात नर्वस सिस्टीम नसते.
तसेच बटाट्याचा डोळा कापून(किती राक्षसी कृत्य!) जमिनीत लावल्यास अनेक बटाते येतात.
चिकनची हाडं जमिनीत पेरल्यास नवीन चिकनं येतील का?
Wink

चिकन बरोबर मेथ्या व चिंच ह्याची चव चांगली लागेल का? (आयुष्यात कधीही चिकन खाल्लेले नाहिये... ) Proud

चिकन बरोबर मेथ्या व चिंच ह्याची चव चांगली लागेल का? (आयुष्यात कधीही चिकन खाल्लेले नाहिये... ) >>>
मीही खाल्लेले नाहीये, त्यामुळे, मी सांगू शकत नाही. Happy