जानेवारी २००५ मध्ये एका वितरणसंस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होतो. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेर ताथवडे नावाच्या एका गावात गोदाम भाड्याने घेऊन तेथे Kajaria Vitrified Tiles ची साठवणूक केली जात असे. या Tiles भिवंडी येथील कजारिया कंपनीच्या गोदामातून थेट आमच्या गोदामात येत. आम्ही १० टन किंवा अधिक इतक्या वजनाच्या Tiles एका वेळी मागवत असू त्यामूळे त्या आमच्या गोदामात थेट पोचविल्या जात. आमच्या गोदामातून पुढे पुणे व पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात या Tiles चे वितरण होत असे. अर्थात आमच्या गोदामातून पुढे विकल्या जाणार्या Tiles ची संख्या तूलनेने कमी असल्याने वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत त्या पोचवण्याचे काम आम्हालाच करावे लागे. आमच्या गोदामापासून वाहतूकदारांची गोदामे दीड ते दोन किमी पर्यंत होती. या अंतराकरिता सुरुवातीला आम्ही छोट्या तीन चाकी बजाज / एपे रिक्षा भाड्याने करीत असू. ते रू.५०/- इतके भाडे आकारीत. पुढे हा मार्ग अतिशय खराब व खड्डेमय झाल्याने छोट्या रिक्षा येत नसत. मग मोठ्या मिनीडोअर रिक्षांचा पर्याय उपलब्ध होता परंतू ते रू.१५०/- ते २००/- इतके भाडे आकारू लागले. शिवाय अनेकदा त्यांची उपलब्धता नसली म्हणजे आम्हाला टाटा ४०७ चा पर्याय वापरावा लागे ज्याचे किमान भाडे रु.३५०/- असे. इतक्या कमी अंतराकरिता हा खर्च आम्हाला झेपेनासा झाला.
त्यातच आमच्या वितरण संस्थेकडे ज्युपिटर एक्वा लाईन (जल) या मोहाली (पंजाब) स्थित कंपनीच्या Bathroom Fittings च्या वितरणाचेही काम आले. ही जल कंपनी पटेल रोडवेज द्वारा Bathroom Fittings पाठवित असे. पटेल रोडवेज च्या गोदामातून आम्हाला या Bathroom Fittings आमच्या गोदामापर्यंत आणाव्या लागत असत. थोडक्यात सांगायचे, तर ताथवड्याच्या अंतर्गत भागात लहान अंतरावरील वाहतूकीचा आमचा खर्च वाढू लागला होता. आता आपल्या वितरण संस्थेला बाहेरच्या वाहनांचा भाड्याचा खर्च करण्यापेक्षा आपले स्वत:चे वाहन घ्यावे असा विचार मी करू लागलो. नवीन मालवाहू वाहन घेण्यात अर्थ नव्हता, कारण रोजचे वाहतूकीचे अंतर १० किमीपेक्षा अधिक नव्हते. जुने मालवाहू वाहन घेण्यात अडचण अशी होती की अशी वाहने व्यावसायिक तत्त्वावर चालत असल्याने त्यांचा अतिरिक्त वापर झालेला असून वाहन सुस्थितीत असत नाही व त्याच्या देखभालीचा खर्चही बराच येतो. त्याशिवाय अजुन एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक वाहनाला पिवळा क्रमांक फलक असतो. व्यावसायिक वाहन दरवर्षी तपासणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात न्यावे लागते, शिवाय ते चालविण्याकरिता वेगळा परवाना घ्यावा लागतो ज्याचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे लागते. या सर्व कारणांमूळे व्यावसायिक वाहन विकत घेण्याचा विचार अर्थातच मागे पडला.
आता पर्याय सुचला तो जीपसारखे एखादे हलके वाहन घेण्याचा. असे वाहन खासगी नोंदणीक्रमांकासह (पांढरा नोंदणीक्रमांक फलक) येते आणि आपल्या नेहमीच्या वाहतूक परवान्यावर (LMV-NT) चालविले जाऊ शकते. त्याप्रमाणे जुनी वाहने पाहिली जाऊ लागली आणि फेब्रुवारी २००६ मध्ये चाळीस हजार रुपयांत एका जुन्या टेम्पो ट्रॆक्स टाऊन ऎन्ड कन्ट्री (१० आसनी) या वाहनाची खरेदी केली गेली. वाहन संस्थेच्या नावावर खरेदी करावयाचे तर कर दुप्पट द्यावा लागतो असे कळले. त्यामुळे ह्या वाहनाची खरेदी करताना ते माझ्या वडिलांच्या नावावर नोंदले आणि ती रक्कम मी स्वत:तर्फे खर्च केली. याउप्पर जेव्हा वाहन गोदामाच्या कामाकरिता वापरले जाईल तेव्हा इंधनाची रक्कम गोदामातर्फे खर्ची टाकावी असे ठरले.
या वाहनात पुढे चालकाशेजारी दोन जण बसण्याची सोय असून मागे तीन आसनांचा एक बाक व त्याही पाठीमागे दोन दोन आसनांचे दोन बाक एकमेकांसमोर पाठीमागच्या दरवाज्याला काटकोनात अशी या वाहनाची आसन रचना होती.
दहा आसनी वाहनात बसणारे दोघेच - मी आणि माझा एक सहकारी. उरलेल्या मोकळ्या जागेत आम्ही Tiles व Bathroom Fittings घेऊन जात असू. आमच्या गोदामापासून ताथवडे अंतर्गत जवळच्या अंतरावरील वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत सामान घेऊन जाण्यासाठी आम्हाला हे वाहन अत्यंत उपयूक्त व किफायतशीर ठरू लागले. एकदा तर आम्ही त्यामधून १७०० (एक हजार सातशे फक्त) किग्रॆ वजनाचे सामान वाहून आणले. तसेच हे वाहन ताथवड्यातील गोदामातून माझ्या निगडी येथील घरी जाण्याकरिताही मी वापरीत असे. अशा प्रकारे या वाहनाने आम्हाला अत्यंत मोलाची सेवा दिली.
पुढे जुलै २००६ मध्ये ताथवडे गाव हे पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आले आणि तेथेही महानगरपालिकेची जकात लागू झाली तेव्हा वितरणसंस्थेचे गोदाम ताथवड्यातून फुरसूंगी येथे हलविण्यात आले. अर्थातच व्यवस्थापन देखील इतर व्यक्तींकडे सोपविले गेले. मीही इतर कामांमध्ये व्यस्त झालो. वाहन माझ्या घरासमोरच उभे केलेले असायचे. त्याचा फारसा वापर होत नसे. इंधन कार्यक्षमता ८ ते १० किमी प्रतिलिटर असल्यमुळे एकट्यादुकट्या व्यक्तिला फिरण्याकरिता ते परवडणे शक्यच नव्हते. तीन / चार अथवा अधिक लोकांना एकत्र प्रवास करावयाचा असल्यास मात्र आम्ही त्याचा आवर्जून वापर करीत असू.
२५ जानेवारी २००७ रोजी आमच्या एका परिचिताचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याच्या आदल्या सायंकाळी म्हणजे २४ जानेवारी रोजी आमचे काही नातेवाईक आमच्या घरी मुक्कामाला येणार होते. त्यांना निगडी बस स्थानकापासून आमच्या घरी आणण्याकरिता मी व माझी आई असे आम्ही दोघे आमच्या घरून निगडी बस स्थानकापाशी निघालो. घरापासून निगडी बसस्थानक नेमके १.७ किमी अंतरावर आहे. पाचेक मिनीटांत आम्ही १ किमी अंतर पार करून अग्नीशामक केन्द्र ओलांडले. अजून थोडे पुढे आल्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या इमारतीपाशी डावीकडे वळले की १०० मीटर अंतरावर निगडी बस स्थानक आहे. डावीकडे वळण घेताना वाहन चौथ्या गिअर मधून आधी तिसर्या व नंतर दुसर्या गिअर मध्ये टाकायचे या विचाराने आधी वेग कमी करावा म्हणून मी प्रथम ब्रेकवर पेडलवर पाय ठेवला. पेडल कुठल्याही रोधाशिवाय अगदी सहज खालपर्यंत दाबले गेले आणि वाहनाची गती जराही कमी झाली नाही. क्षणार्धात पुढचा धोका माझ्या लक्षात आला आणि मी जोरात ओरडलो, "आई, गाडीचे ब्रेक फेल झालेत."
अर्थातच आता साधारण ताशी ३५ / ४० किमीचा वेग असल्याने गिअर देखील बदलता येत नव्हते. तशाच स्थितीत जेव्हा डावीकडचे वळण आले तेव्हा मी वाहन आपसूक डावीकडे वळविले कारण चौकातून पुढे जाणे किंवा उजवीकडे वळणे म्हणजे अधिकच वर्दळीत घुसावे लागले असते. डावीकडे वळताना निदान काही अडथळा तरी नव्हता. डावीकडे वळाल्यावर वेग अजूनच वाढला कारण या रस्त्यावर अतिशय तीव्र उतार होता. रस्त्यावर अनेक पादचारीही होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्या आईनेही लोकांना ओरडून गाडीचे ब्रेक फेल आहेत हे सांगितले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. आता या गोंधळामुळे लोक गडबडले आणि त्यातला एक जण बावचळून नेमका अगदी माझ्या वाहनासमोरच आला.
(क्रमशः)
बापरे, आता काय ह्या विचार करत
बापरे, आता काय ह्या विचार करत असतानाच, क्रमशः आले
Pudhe kay jhale yeudya
Pudhe kay jhale yeudya
<बापरे, आता काय ह्या विचार
<बापरे, आता काय ह्या विचार करत असतानाच, क्रमशः आले> + १