मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्या आमच्या रुटीन सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.
Wow, exciting. Is there any concert or what? आमचा अज्ञ प्रश्न आणि अमेलियाची 'हे येडं कुठून आलं इथे?' अशी प्रश्नार्थक चर्चा.
It's Rodeo sport Vishal and not a musical concert. अमेलियाचे उत्तर.
"After watching rodeo, you are going to experience 'the most dangerous eight seconds In Sports ' Vishal.", शेजारीच उभ्या असलेल्या लुईस रॉसने अजुन एक बाऊन्सर टाकला...
Is it? इति अस्मादिक...
कळले तर अजुनही काही नव्हते, पण (आम्हीसुद्धा गेली अडीच वर्षे पुण्यात राहतोय म्हटलं) Ohh Sorry, I heard it 'Radios' असं काहीतरी थातुरमातुर बोलून तात्पुरती वेळ मारून नेली आणि लगेचच 'गुगलबाबाला' साकडे घातले. गुगलबाबाने लगेचच सांगितले की Rodeo हा मुळ स्पॅनीश शब्द आहे. ज्याचा अर्थ 'राऊंड अप' किंवा 'टू सराऊंड' असा काहीसा होतो. अधिक खोलात जाण्यासाठी विकीबाबाच्या दारात जाऊन पोचलो, त्याने बरीच माहिती दिली.
रोडीओ बद्दल तर कळलं पण ते 'धोकादायक आठ सेकंद' ते काय प्रकरण आहे? हे मात्र कळायला मार्ग नव्हता. शेवटी स्वत:च्याच अज्ञानाची किव करत गुगलवर हेच शब्द सर्चला टाकले. उत्तरात गुगलबाबाचा पहिलाच दुवा होता "बुल रायडींग"
"बुल रायडींग" - (फोटो आंतरजालावरून साभार)
थोडी फार माहिती वाचून मी गुगलबाबाला लगेचच 'बाय-बाय' केलं, कारण तो अनुभव प्रत्यक्ष याची देही, याची डोळा अनुभवण्यातली रंगत, तो थरार कमी करायचा नव्हता मला. संध्याकाळी सातला शो सुरू होणार होता. फायनल्स होते. सुरूवातीच्या एकुण ९० स्पर्धकांमधून १२ कि १४ जण फायनल्सपर्यंत येवुन पोचले होते. आम्ही संध्याकाळी साडे पाच वाजता हॉटेल सोडले. शो सुरू होण्याच्या आधी डिनर उरकून घ्यायचे आणि मग शो बघायला जायचे अशी योजना होती.
नेमका मी जाताना त्या गडबडीत माझा कॅमेरा बरोबर घ्यायचे विसरलो. त्यामुळे शक्य तेवढे फोटो मोबाईल कॅमेरा वापरुनच काढलेले आहेत. सगळे मिळून जवळ-जवळ २२ जण होतो आम्ही. त्यामुळे सगळे एकत्र येवून जमा व्हायला, निघायला तसा जरा उशीरच झाला होता. पण तरीही आम्ही तासभर आधी पोहोचलो. ’डेनवर कलोसियम’ जिथे या मॅचेस घेतल्या जातात, मोठ्या दिमाखात झळकत होते. त्या दिवसात नेमका अमेरिकन फ़ुटबॉलचाही ज्वर असल्यामुळे सगळीकडे लोकल फ़ुटबॉल टीम ब्रॉंकोस चे बॅनर्स, पोस्टर्स लागलेले. आम्ही डिनर आटपून घेण्यासाठी म्हणून आधीच बुक केलेल्या रेस्टरॉमध्ये पोचलो. वेळ कमी असल्याने पटापट उरकण्याचे एकमेकाला पुन्हा-पुन्हा सांगत जेवण सुरू झाले. पण तरीही बराचसा वेळ बीअरनेच घेतला. मग जेवण घाई-घाईत...
जेवण आटपून सगळी गॅंग कलोसियमच्या दारात येवून पोचली. स्टेडियम फ़ायनल्स पाहायला आलेल्या माणसांच्या जथ्थ्यांनी गच्च भरलेली होते. असो.. आम्ही स्टेडीयममध्ये आपापल्या जागा पटकावल्या. स्टेडियम मात्र लोकांनी खचाखच भरलेले होते.
स्टेडियमच्या मधोमध उंचावर एकमेकाशी संलग्न असे एक चौकोन तयार करणारे चार मोठे स्क्रीन्स टांगलेले होते. ज्यावर सलग स्टेडियमच्या वेगवेगळ्या भागातली दृष्य़े प्रसारीत केली जात होती. अगदी मैदानात उतरणार्या प्रत्येक स्पर्धकाची पुर्वतयारीसुद्धा लाईव्ह पाहता येत होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गेल्या दहा वर्षातील चॅंपीयन्सबद्दल बरीच माहिती पुरवण्यात आली. एवढेच नव्हे तर एका सहा घोडे जोडलेल्या उघड्या टपाच्या बग्गीतून या सर्व माजी विजेत्यांची एक जंगी मिरवणूक त्या अॅरेनातून काढण्यात आली. कॉमेंटेटर अतिशय अभिमानाने प्रत्येक चॅंपीयनबद्दल माहिती देत होता. त्यांची नावे पुकारताना त्यात एखाद्या डेनवरच्या स्थानिक हिरोचे नाव आले की प्रेक्षकातून उठणारा आनंदाचा, अभिमानाचा हुंकार या खेळाबद्दलचे, खेळाडुंबद्दलचे त्यांचे प्रेम स्पष्ट करत होता. नंतर तर माझ्या असे लक्षात आले की स्पर्धक स्थानिक असो वा बाहेरुन आलेला (इथे अगदी जर्मनीपासून ब्राझीलपर्यंत वेगवेगळ्या देशाचे स्पर्धक हजर होते) असो, प्रत्येकाच्या बहाद्दरीला मिळणारा सन्मान, टाळ्या , प्रोत्साहन सारख्याच पातळीवर होते.
रोडीओ स्पोर्ट्स
विकीबाबाने सांगितले होते की पुर्वीच्या काळी इतस्ततः पसरलेली गुरेढोरे एकत्र आणून त्यांना त्यांच्या संबंधीत तबेल्याकडे/मध्ये ढकलण्यासाठी तिथल्या काऊबॉईजनी (गुराख्यांनी - काऊबॉय कसं रुबाबदार वाटतं ना म्हणायला ) ही पद्धती विकसीत केली होती. ३ किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने असलेले काऊबॉईज घोड्यावर बसून इतस्तत: विखुरलेल्या गुरा-ढोरांना गराडा घालत त्यांना त्यांच्या तबेल्यापर्यंत आणून सोडायचे काम करत. नंतर १८२० ते १८३० च्या दरम्यान काऊबॉईजचे हे स्किल तिकीट लावून लोकांसमोर आणण्याचे शो आयोजीत करणे सुरू झाले. आणि त्याला नाव दिले गेले Rodeo Sport. तसं सोपं वाटतं पण एकेक जनावर घोड्यावरून पाठलाग करत बरोबर तबेल्यात आणून कोंडायचं हे काम खुप कठीण आहे. कारण मोकळी सोडलेली ही जनावरं फार नाठाळ असतात. कधी हुलकावणी देवून सटकतील काही नेम नाही. त्यांना पळवत-पळवत बरोबर तबेल्यात / गोठ्यात (Ranch) मध्ये आणून सोडणं हे किती कौशल्याचे काम आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा का होइना हे Rodeo Sport अनुभवणं आवश्यक आहे.
एक झलक...
इथे चित्रफीत जोडता येत नसल्याने यु-ट्युबवर टाकून तिथले दुवे देतोय.
http://www.youtube.com/watch?v=w9EwfGAPNbU
रोडीओज हा प्रकार जरी कौशल्याचा वगैरे असला तरी मला त्यात फ़ारसे काही विशेष वाटले नाही. आपल्याकडचे गुराखी यापेक्षा सहज आपली गुरे हाताळतात.
मला उत्कंठा लागलेली होती त्या "धोकादायक आठ सेकंदांची"...... !
आता थोडंसं त्या ’धोकादायक आठ सेकंदांबद्दल....."
या खेळाचे स्वरूप साधारण असे आहे. यात वापरलेले जे बैल असतात ते अक्षरश: राक्षसी म्हणता येतील असे अवाढव्य असतात. स्पर्धक स्वत:चा एक हात एका मजबूत रस्सीने या बैलाच्या पाठीशी जखडून घेतो, दुसरा हात त्याला कायम हवेत मागच्या बाजुला फ़डकवत ठेवावा लागतो. (सतत उड्या मारणार्या बैलावर जास्तीत जास्त वेळ जम बसवण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी याचा उपयोग होतो) . या बैलांना आपल्या पाठीवर बसलेल्या स्पर्धकाला, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला खाली पाडण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यामुळे तो बैल सतत उड्या मारत त्या स्पर्धकाला आपल्या पाठीवरून पाडण्याचा प्रयत्न करत असतो. खेळाच्या नियमानुसार पात्र ठरण्यासाठी स्पर्धकाला कमीत कमी आठ सेकंद त्या बैलाच्या पाठीवर बैठक जमवणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्ती वेळ तो त्याचा बोनस आणि जो जास्त वेळ टिकेल तो जिंकला.
८ सेकंद खुप कमी वाटतात आपल्याला. पण इथे स्पर्धकाची खरोखर अग्निपरीक्षा असते. कारण बैल सारखा हवेत उड्या मारत असतो. कधी-कधी तर या उड्या ६-७ फ़ुटापेक्षा जास्त उंचीच्या असतात. बैलावर खोगीर किंवा पाय अडकवण्यासाठी रिकीब नावाची सोय अजिबात नसते. फ़क्त एक हाताने बैलाच्या पाठीला बांधलेला दोर धरायचा आणि दुसरा हात हवेत ठेवत संतुलन साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यातुनही स्पर्धक खाली पडल्यावर बैल शांतपणे "मी जिंकलो" असे म्हणून प्रेक्षकांना हात दाखवत मैदानाच्या बाहेर निघून जात नाही. तर तो प्रचंड संतापलेला असतो. स्पर्धक खाली पडल्यावर सुद्धा काही काळ त्याचे उड्या मारणे चालुच असते. अश्या वेळी खाली पडल्या-पडल्या लगेच तोल सावरून सुरक्षीत जागी पळावे लागते. नाहीतर थयाथया तांडव करणारा तो बैल त्याला आपल्या पायाखाली तुडवण्याची शक्यता अधिक असते. हे सगळे घडते ते १० ते १५ सेकंदाच्या कालावधीत. त्यातही त्यातले किमान आठ सेकंद जर स्पर्धक त्या बैलाच्या पाठीवर टिकाव धरु शकला तर ठिक नाहीतर ३-४ सेकंदातच सगळाच "खेळ" आटोपण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते आठ सेकंद "अतिशय धोकादायक आठ सेकंद" म्हणून ओळखले जातात. हा खेळ म्हणजे निव्वळ प्राणाशी गाठ असते. चपळता, ताकद, एकाग्रता या सगळ्यांचाच कस लावणारा हा खेळ......
स्पर्धा सुरू झाली. मी... किंबहुना आम्ही सगळेच नाक मुठीत धरुन वगैरे म्हणतात तसे, किंवा प्राण डोळ्यात आणुन म्हणतात तसे पाहात होतो. एकामागुन एक स्पर्धक मैदानात येत होते. बहुतेक जण ४ ते ५ सेकंदात बाद होत होते. कुणीतरी ’रिसेंडे’ म्हणून ब्राझिलियन स्पर्धकाने ती स्पर्धा जिंकली. आपला स्थानिक स्पर्धक जरी हरला असला तरी तिथल्या प्रेक्षकांनी विजेत्याला त्याच्या धैर्याच्या, विजयाच्या सन्मानार्थ दिलेले ’स्टॅंडींग अवेशन’ फ़ार बोलके होते. पंधरा मिनीटे सलग टाळ्यांचा कडकडाट होत होता. भडकत्या ज्वालांच्या साह्याने विजेत्याला मानाचा मुजरा करण्यात आला.
तो थरारक प्रकार पाहण्याच्या तंद्रीत सगळ्या मॅचेसचे चित्रीकरण करणे शक्य नाही झाले, पण मी त्यातल्या त्यात एक दोन मॅचेस माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्याच. त्याचे चित्रीकरण खालील दुव्यावर पाहता येइल.
http://www.youtube.com/watch?v=GZxQeGQ-q_Y
http://www.youtube.com/watch?v=1Mf5FgXAQmI
तो सगळाच प्रकार प्रचंड थरारक, विलक्षण होता. त्या राक्षसी बैलांशी बेदरकारपणे झुंजणार्या,(हो मी तर त्याला झुंजणेच म्हणेन. भले ते थेट लढणे नसेल. पण झुंज नक्कीच आहे.) त्या बहाद्दुरांना मनोमन मुजरा ठोकतच आम्ही हॉटेलकडे परतलो.
विशाल
धन्यवाद मंडळी. सुनिधी, हा शो
धन्यवाद मंडळी. सुनिधी, हा शो मी डेनव्हर (कोलोराडो) इथे पाहीला
Pages