सांजोरी / साटोरी (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by नलिनी on 5 February, 2014 - 08:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सांजोर्‍यासाठी:
बारीक रवा १ की.
गुळ पाऊण की.
वेलची ५-६
पाणी- १ चहाचा कप (मग नाही)

पारीसाठी:
वस्त्रगाळ केलेले गव्हाचे पिठ
बारीक रवा ४-५ टे. स्पून
बेसन पिठ ४-५ टे. स्पून
तांदूळ पिठी ४-५ टे. स्पून
जरासा मैदा
तेल
मिठ

क्रमवार पाककृती: 

रवा अगदी चांगला भाजुन घ्यायचा.( भाजायला तुप वैगेरे काहीच वापरायचे नाही).
गुळ बारीक चिरुन घ्यायचा आणि एक कप थंड पाण्यात विरघळून घ्यायचा. ह्या पाण्यात रवा चांगला मिक्स करुन घ्यायचा. ह्यातच वेलची पुड टाकायची. पातेल्यात घालुन त्याला कापडाने बांधून ठेवायचे. हा सांजोरा किमान एक दिवस तरी भिजला पाहिजे.

गव्हाच्या पिठात थोडा मैदा, थोडेसे बेसन पिठ, थोडी तांदळाची पिठी, रवा व चवीपुरते जरासे मिठ असे सगळे एकत्र करुन त्यात थंड तेल टाकुन पिठाला चांगले चोळुन घ्यायचे आणि पिठ घट्ट मळायचे. आपण पुड्यांसाठी मळतो त्याहुन घट्ट. तास दोन तास झाकुन ठेवायचे. तोवर चांगले भिजते. मग जरासे कुटुन मऊ करुन घ्यायचे.

जेवढा हवा तेवढाच सांजोरा एक भांड्यात काढुन घ्यायचा. त्यात गोळ्या असल्यास फोडुन घ्यायच्या. हाताने गोळा होतो का पहायचे. नसेल होत तर अगदी थोडासा दुधाचा शिपका मारायचा.
पुर्‍या करायला जर एकटेच असाल तर आधी सांजोर्‍याचे लिंबापेक्षा बारीक गोळे करुन ठेवायचे. तेवढाच पिठाचा उंडा(गोळा) घेऊन वाटी कारायची आणि सांजोरा आत भरुन उंडा बंद करायचा. हलक्या हाताने कडा पातळ करत एकसारखी पुरी लाटायची आणि कापडावर पसरवुन ठेवायची. सगळ्या लाटुन होईस्तोवर तश्याच पसरवुन ठेवायच्या.
लाटताना सांजोरा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. जर काही पुर्‍या लाटताना फुटल्याच तर त्या तळायला शेवटी घ्यायच्या. कारण हा सांजोरा तळताना पुरीतुन बाहेर येतो. पुर्‍या लालसर रंगावर तळायच्या. देवाला नैवद्य दाखवायचा आणि त्यावर ताव मारायचा.

sanjora.jpgsanjora_1.jpgsanjori.jpg

गावाकडे ह्या पुर्‍यांसाठी रवा घरीच तयार केला जातो. त्याला गरा असेही म्हणतात.

दिवाळी आली म्हणजे घरोघरी गव्हाला पाणी लावायला सुरुवात होते. पाणी लावणे म्हणजे गहू ओले करुन सावलीत सुकवणे. त्यातच जाड मिठाचे खडे टाकुन बांधुन ठेवणे. मग हे गहू गिरणीत दळायला जातात. गेले की सांगायचे रवा बारिक धरा म्हणजे दळणार्‍याला कळते की रवा कश्यासाठी ते. त्याप्रमाणे जाते कमी जास्त करुन रवा दळला जातो.
घरी आला की सुती किंवा बरंगळ साडी मोठ्या पातेल्याला बांधली जाते. आणि त्यातुन रवा चाळायला सुरुवात होते. त्या साडीतुन किंवा कापडातुन बारिक पिठी खाली पडते. आगदी मैद्यासारखी बारीक. वरती रहाते ते रवा आणि कोंडा. तर रवा चाळण्यासाठी २ प्रकारच्या चाळणी वापरल्या जातात. एकीतून अगदीच बारिक रवा चाळून निघतो तर पुढच्या चाळणीला जरा मोठा म्हणजे आपण दुकानातुन आणतो तसा. आणि वरती शिल्लक राहतो तो अगदिच जाडा रवा आणि कोंडा. मग हे हवेसमोर वर केले जाते ( पाखडले जाते म्हटले तरी चालेल.). शिल्लक राहिलेला रवा हा खास लापशीसाठी ( गुळाचा शिरा) ठेवला जातो. आणि कोंडा जनावरांच्या खाद्यात जातो.

तर अश्याप्रकारे दिवाळीसाठी रवा तयार केला जातो. साहित्यात सांगितलेल्या पिठाऐवजी हेच वस्त्रगाळ केलेले पिठ वापरतात.

सांजोरा फ्रिजबाहेर साधारण महिनाभर टिकतो. म्हणजे एकदा सांजोरा केला की हव्या तेव्हा पुर्‍या करुन खाता येतात. शिवाय ह्या पुर्‍याही फ्रिजबाहेर बर्‍याच दिवस टिकतात. नुसत्याच खायला खुप छान लागतात पण माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे शेंगदाण्याच्या आमटी सोबत, बेसनपिठल्या सोबत आणि शेंदाण्याच्या चटणी सोबत(हिरवी मिरची घालुन केलेली चटणी) खुपच छान लागतात.

गावी ह्या पुर्‍या करणे म्हणजे किमान १०-१५ किलो गव्हाचा रवा काढुन आणला जातो. पुर्‍या करायला सुरवात करताना एक गणपती केला जातो. तो आधी तळला जातो. गॅस वर तळत असाल तर गॅसवर नाहितर चुलीवर ठेऊन त्याची हळदी कुंकवाने पुजा केली जाते आणि मग बाकिच्या पुर्‍या तळायचे काम सुरु होते. पुर्‍या करायला बसले की तिन चार बायकांना ५- ६ तास लाटायला जातात आणि तळायला किमान ३ तास. एवढ्या मोठ्याप्रमाणावर तळायचे म्हटले की मग मस्त चुल पेटवली जाते. तळण्याचे हे दिव्य मी बर्‍याचदा पार पाडलेय. पुर्‍या तळल्या की पाटीतच काढुन ठेवल्या जातात आणि मग थंड झाल्या की डब्यात रवाना होतात.

सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे पुर्‍या लाटतालाटता सांजोर्‍याचे गपाणे मारणे.

अधिक टिपा: 

घरी लग्नकार्य असले की अश्याचप्रकारे मोठ्याप्रमाणावर साग्रसंगीत सांजोर्‍या केल्या जातात.

जुन्या मायबोलीवर http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115935.html?1157537930 इथे आणखी चर्चा आहे.

माहितीचा स्रोत: 
आई, काकू, आजी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा नलिनी, किती निगुतीनी केलंयस सगळं Happy खुप सुबक आणि देखण्या दिसतायत सांजो-या. मला फक्त साटो-या आणि भाजलेल्याच माहिती होत्या, हा प्रकार नवीन आहे. लिहिलंयस पण अगदी छान.

मस्त!
तळायला किमान ३ तास. एवढ्या मोठ्याप्रमाणावर तळायचे म्हटले की मग मस्त चुल पेटवली जाते. तळण्याचे हे दिव्य मी बर्‍याचदा पार पाडलेय. > ---------^---------

नलिनी छानच..... मी केल्या होत्या तुला विचारुन त्याची आठवण झाली. मस्त महिनाभर टिकल्या होत्या.

वा, मस्त रेसिपी आणि वर्णन.
मला सांजोरी म्हणजे रव्याचा गुळातला सांजा करून त्याचं सारण भरून केलेल्या पोळ्या असं माहिती होतं.
पुर्‍या करतात हे माहिती नव्हतं.

छान पाकृ!

या वेळी आईने बांधुन दिलेल्या शिदोरीत साटोर्‍या आहेत! आणि हे वाचताना मी ती अप्रतिम चवीची साटोरी खातेय. मायबोलीवर रेसिपी यावी आणि तो पदार्थ लगेच खायला मिळावा यापेक्षा अजून सुख ते काय! Happy

मस्त माहीती व कृती.
अश्या एखाद्या गावात रहायला जावून हे सगळे रोज पहायला व करायला मिळाले तर किती मजा येईल. (नि:श्वास)

किती निगुतीने केल्या आहेत पुर्‍या... मस्तच एकदम! माहितीही मस्त लिहिली आहे. छान वाटतं असं वाचायला.