३१ डिसेंबर वेगळ्याने साजरा करायची तशी सवय नाही. आणि त्याचं कारण पूर्णपणे भौतिक आहे. मला जागरण जमत नाही. आम्ही जांभया द्यायला सुरुवात केली की इतरांचा हिरमोड होतो. त्यापेक्षा नकोच ते. मात्र यावर्षीची गोष्ट वेगळी होती. "मुक्तांगण" हा संशोधनासाठी केसस्टडी म्हणुन घेतल्यानंतर त्यातील सर्व पैलुंचा अभ्यास करणं आलंच. त्यामुळे तेथे साजरे होणारे सण, विशेष दिवस, रुग्णमित्र कशा तर्हेने साजरा करतात, त्यामागे मुक्तांगणची संकल्पना काय आहे, त्याचा एक उपचार म्हणुन किती उपयोग होतो या सार्या गोष्टी जाणुन घ्यायच्या होत्या. त्यातुन माधवसरांनी अगोदरच कार्यक्रम साडेआठला संपणार असे सांगुन जागरणाचा प्रश्नच निकालात काढला होता. त्यामुळे यावेळी भल्या पहाटे निघालो. मुक्तांगण मध्ये अनेकांच्या भेटी घ्यायच्या होत्या. बरेच काही पाहायचे होते. मुख्य म्हणजे त्या वातावरणात हिंडायचे होते. त्यामुळे फक्त संध्याकाळी जाण्यात अर्थ नव्हता. साडेदहाच्या सुमारास पोहोचलो. बाहेर झडती घेऊन आत सोडण्यात आले. आणि एक वेगळेच वातावरण दृष्टीस पडले.
आज महिन्याचा पाचवा मंगळवार. कुटुंबाचा भेटीचा दिवस. आज रुग्णमित्रांची कुटुंबे त्यांना भेटायला आली होती. त्यामुळे सारे वातावरण अगदी इन्फॉर्मल होते. पांढर्या गणवेषातील रुग्णमित्र आतील पायर्यांवर बसले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या बायका, मुले, नातेवाईक होते. एकंदरीत वातावरण आनंदाचे होते. अनेक वर्षे घरात या माणसांनी व्यसनामुळे त्रास काढला होता. आता ते दिवस त्यांच्या आयुष्यातुन कायमचे निघुन जाणार होते. सर्वप्रथम माधवसरांना भेटलो. आज ते प्रमुख असल्याने ३१ डिसेंबरची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते व्यस्त राहाणार होते. मात्र त्यांनी काही आवश्यक माणसांच्या ओळखी करुन दिल्या. अमोल पोटे तेथेच भेटले. वर्तमानपत्रातील लिखाणातुन माहित झालेल्या महेंद्र कनिटकरांची भेट हा एक सुखद आनंदाचा धक्का होता. त्यानंतर माधवसरांनी मला मोकळे सोडले. दिवसभर मी मुक्तांगणात हिंडत होतो. खाली, वर लायब्ररीत (पु.ल्.देशपांडे वाचनालय), मध्येच कुणालातरी गाठुन त्यांच्याशी बोलायचे. कुणाच्यातरी केबीनमध्ये आगावुपणे शिरुन त्यांना माहिती विचारायची असेही प्रकार केले. कुणीही आक्षेप घेतला नाही. अगदी मुक्तामॅडमनाही भेटुन आलो. ज्यांच्याकडे वेळ होता त्यांनी पुरेसा वेळ देऊन माहिती दिली. ज्यांच्याकडे वेळ नव्हता त्यांनी नम्रपणे पुढच्यावेळी भेटुन माहिती देण्याचे आश्वासन दिले. ३१ डिसेंबरचा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता होता. तोपर्यंत माझे हे उद्योग चालले होते. मध्येच अवचटांचे "छेद" नावाचे पुस्तक तेथल्या स्टॉलमधुन विकत घेतले आणि ते लायब्ररीत जाऊन वाचत बसलो. वेळ मस्त गेला. संशोधनाच्या दृष्टीने तर खुपच उपयोग झाला.
गेल्यावर थोड्याच वेळात टेबल मांडुन नाश्ता ठेवला होता. बटाटेवडे घेतले. खात बसलो. आणखी घेण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळावा लागला अशी चव होती. त्यानंतर भटकंती सुरु झाली. प्रत्येक ठिकाणी लावलेले बोर्ड वाचत होतो. बराच वेळ हिंडल्यानंतर खाली आलो. समोरच्याच केबीनमध्ये एक सडपातळ तरुण बसला होता. हे सागर काकड. मुक्तांगणमधील समुपदेशक. त्यांची परवानगी घेऊन आत शिरलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी चटकन हातातील काम संपवुन माहिती दिली. फॉलोअप ग्रुपचे महत्त्व त्यांनी अगदी आगळ्यावेगळ्या शब्दात सांगीतले. ते म्हणाले जर एखादी अगदी कठीण केस असेल तर मी देखिल कधी मित्राला, बहिणीला फोन करतो. हे माझ्यासाठी आउटलेट असतं. तर जी माणसे व्यसनात बुडाली आहेत. त्यातुन बाहेर आली आहेत. त्यांच्या मनात काय काय चाललं असेल याची सर्वसामान्यांना कल्पना नसते. त्यांना आपले म्हणणे कुणीतरी ऐकणारा हवा असतो. बरेचदा जे सांगायचं असतं ते सर्वाना सांगायला संकोच वाटतो. या सार्या गोष्टी ते समुपदेशकाकडे सांगु शकतात. सागरसरांशी मैत्री जुळली. पुढच्यावेळी त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवायचा हे ठरवुन तेथुन बाहेर पडलो. जेवण्याची वेळ झाली होती. भेंड्याची भाजी, वरण, भात, पोळ्या असा थाट होता. दोन घास जास्तच गेले.
त्यानंतरच्या भटकंतीत आणखि एका तरुणाशी भेट झाली. तो नेमका अवचटांचा ड्रायव्हर निघाला. त्याच्या बद्दल एका लेखात वाचले होतेच. त्याच्याशी थोडावेळ बोलुन मग एका बाजुला बसलो होतो. तेथे पाटील म्हणुन एक गृहस्थांशी ओळख झाली. अतिशय श्रीमंत अशा या मध्यमवयीन माणसाने मोकळेपणाने आपण होऊन माहिती सांगायला सुरुवात केली आणि मुक्तांगणचा आणखि एक पैलु समोर आला. पाटील आणखि कुठल्यातरी रीहॅबीलीटेशन सेंटरमध्ये जाऊन आले होते. या माणसाच्या सवयीदेखिल श्रींमंताच्याच होत्या. एका रुममध्ये दोघे राहणार हे ऐकताच दुसर्या कॉटचे पैसे स्वतःच भरुन रुम फक्त एकट्याची करुन घेतली असे त्यांनी सांगीतले. त्यानंतर अगदी ए.सी लावायला पैसे देतो इतके सांगण्यापर्यंत मजल गेली होती. मात्र पैसा बनवणे हा एकच उद्देश असलेल्या त्या सेंटरमध्ये पाटलांना फारसा फायदा झाला नाही. इलेक्ट्रॉनिक इंजीनियर असलेल्या या चौकस माणसाच्या प्रश्नांना तेथील डॉक्टर उत्तरे देऊ शकले नाहीत. पाटील निराश होऊन परतले. मुक्तांगणने मात्र त्यांना पहिल्याच आठवड्यात धक्का दिला. दारुचे व्यसन हा एक आजार आहे आणि यावर जगात कुठलेही औषध नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले. पाटीलांनी त्यांच्या आयुष्यात हे पहिल्यांदाच ऐकले होते. पुढे बोलताना पाटील यांच्या बोलण्यात "पैसा कमवणे" हा मुक्तांगणचा उद्देशच नाही" हा मुद्दा वारंवार येत होता. एक तर्हेने "या आजारावर औषध नाही" हे सांगुन ही माणसे आपल्याच पायावर धोंडा मारुन घेत नाहीत काय? ज्याला पैसा मिळवायचा आहे असा कोण माणुस ही गोष्ट स्पष्टपणे सांगेल? पाटीलांनी मलाच प्रश्न केला. पाटील मुक्तांगणच्या या दृष्टीकोणामुळे प्रचंड भारावले होते.
मुक्तांगणमध्ये कुठेही बसलं तरी बाजुला कुणीतरी पांढर्यावेषातला रुग्ण दिसतो. बरेचदा नुकताच दाखल झाला असल्यास, व्यसनाच्या खुणा चेहर्यावर दिसत असतात. मात्र हळुहळु जसजसे दिवस जातात तशा या खुणा नाहीशा होतात. माणसे हसु खेळु लागतात. थट्टा मस्करी करु लागतात. तेथेल्या वातावरणात रुळतात. मात्र त्यांच्याशी बोलताना काळीज घट्ट करुनच बोलावं लागतं. काय ऐकावं लागेल ते सांगता येत नाही. प्रत्येकाची हकीकत वेदनेने चिंब भिजलेली असते. अनेक प्रकार केलेले असतात. मारझोड, बायकोवर हात उचलणे, रस्त्यात पडणे, स्मृतीभ्रंश होणे, पैशाची अफरातफर, चोरीमारी आणि कल्पनाही करवणार नाही अशा अनेक गोष्टी. आपल्या बाजुला बसलेला माणुस कुठल्या भयानक आगीतुन गेला असेल , त्याने आणि त्याच्या घरच्यांनी काय काय त्रास काढले असतील ते एक परमेश्वराच ठाऊक. सहज बाजुला बोलायला लागलो तर तो तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला, दारुसाठी घरातले देव विकुन खाल्लेला आणि दोनवेळा मुक्तांगण मध्ये अॅडमीट झालेला माणुस निघाला. आता अडीच वर्षे सोबर असलेले ते गृहस्थ अतिशय मोकळेपणाने बोलत होते. सार्या कडवट भुतकाळाचा मोकळेपणाने स्वीकार करुन त्यांनी आपले निर्व्यसनी आयुष्य सुरु केले आहे. ते खास ३१ डिसेंबर साजरा करायला आले होते. अंगावर हात उचलणारा मेहुणा आता गरज पडल्यास स्वतःचे क्रेडीट कार्ड विश्वासाने वापरायला देतो हे सांगताना त्यांच्या चेहर्यावर आत्मविश्वास दिसत होता.
संध्याकाळ होऊ लागली होती. ३१ डिसेंबरचे वारे वाहु लागले. माधवसर, पोटे सर तयार होऊन आले होते. हिन्दी चित्रपटातील धम्मल गाणे लागली होती. समोर छोट्याशा स्टेजवर बॅनर लागले होते. काही रुग्णमित्र उत्साहाने नाचत होते. बघणार्यांची गर्दी वाढत होती. सजावट सुरु झाली. फुगे लागले. निरनिराळ्या ठिकाणी रोषणाई झाली. लाईटस लावले गेले. नव्यावर्षाच्या स्वागताला मुक्तांगण सज्ज झाले. अनेक कार्यक्रम होणार होते. रुगणमित्र आणि स्टाफ आपपली कला सादर करणार होते. सर्वांचे लाडके नव्हे सर्वांचा लाडका बाबा येण्याची ते वाट पाहात होते. आणि मुक्तामॅडमसमवेत बाबा आला. अनिल अवचटांना प्रत्यक्ष पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. ज्या लेखकाचे लेखन आपल्या आयुष्यावर परिणाम करुन गेले त्यांच्याबद्दल फक्त आत्यंतिक अशी कृतज्ञताच बाळगता येते आणखि करणार तरी काय? अशी ऋणं कधीच फेडता येत नाहीत. अवचट अगदी स्टेजजवळ बसले आणि कार्यक्रम सुरु झाला. त्यात काय नव्हतं? स्कीटस होती, विडंबने होती, छोटेसे काव्यसंमेलन होते. छोट्याछोट्या नाटिका होत्या. गाणी होती, नकला होत्या. सांताक्लॉज होता, स्पर्धा होत्या, तेथे रोज जेवण करणार्या भगिनींच्या सहचरी ग्रुपने केलेला उखाण्यांचा धम्माल कार्यक्रम देखिल होता. सारेजण आनंद घेत रंगुन गेले होते. शेवटी स्टाफला स्टेजवर बोलावण्यात आले. त्यांना भेटी देण्यात आल्या. कृतज्ञता व्यक्त करण्याचा याहुन दुसरा मार्ग कोणता? वातावरण भावनांनी भरुन गेलं होतं. नवीन वर्षाचे संकल्प विचारले गेले. मी जिवंत आहे तो पर्यंत प्रत्येक ३१ डिसेंबर मुक्तांगणध्ये येऊन साजरा करणार या एक रुग्णमित्राच्या संकल्पाला जोरदार टाळ्या पडल्या. साडेआठच्या सुमाराला कार्यक्रम संपत आला.
शेवटी अवचटांचे भाषण झाले. छोटेखानी भाषणात त्यांनी सांगीतले की येथे कुणी मोठा कलाकार बोलावलेला नाही, आपल्यातला कुणी एखाद्या कलेतला मोठा तज्ञ नाही. आपण आपल्याला जमेल तसे कार्यक्रम साजरे केले आणि त्याचा अतिशय सुंदर तर्हेने आनंद घेतला. अशा तर्हेने आनंद घेता येणे हे सर्वात महत्त्वाचे असते. अवचटांना गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. अवचटांनी कसलेही आढेवेढे न घेता गाणे सुरु केले. ते अगदी रंगुन गेले होते. गाणे नवीन असावे कारण तेच नेमके माझ्या आठवणीतुन निसटले. आणि हा अगदी आगळा वेगळा असा ३१ डिसेंबरचा कार्यक्रम संपला. अवचट लगेच निघाले होते. ते बाहेर पडताना गाडीजवळ महेंद्र सर त्यांच्याशी काहीतरी बोलत होते. त्याचवेळी मी बाहेर जाऊन त्यांच्या पायाला वाकुन स्पर्श केला. त्यांनी माझ्याकडे पाहुन स्मित केले. २०१३ ने जाता जात मला दिलेली ही अनमोल भेट होती.
अतुल ठाकुर
मस्त झालाय लेख
मस्त झालाय लेख
मस्त लेख अतुल.
मस्त लेख अतुल.
फारच छान.. तुम्ही काय संशोधन
फारच छान.. तुम्ही काय संशोधन करत आहात?
व्यसनी माणसांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात परत उजेड आणणार्या ह्या उपक्रमाबद्दल चांगला लेख लिहीला आहे. अजून वाचायला आवडेल.
मस्त अनुभव..
मस्त अनुभव..
सुंदर लेख. मुक्तांगणच्या अनेक
सुंदर लेख. मुक्तांगणच्या अनेक गोष्टी आठवल्या.
छान अनुभव
छान अनुभव
अतुल, कमालीच्या वेगळ्या अन
अतुल, कमालीच्या वेगळ्या अन अर्थपूर्ण रीतीने वर्षान्त साजरा केलात अन तो आनंद आमच्याशी शेअरही केलात. अभिनंदन. आयुष्य उपभोगण्याची रूढ समीकरणं किती कंगाल होत चालली आहेत याची जाणीव करून दिलीत.
मस्त अनुभव..
मस्त अनुभव..
सुंदर लेख आणि अनुभव.
सुंदर लेख आणि अनुभव.
लेख आवडला.
लेख आवडला.
अतिशय सुंदर लेख आणि प्रत्यक्ष
अतिशय सुंदर लेख आणि प्रत्यक्ष अनुभव देखील!!
>>आयुष्य उपभोगण्याची रूढ समीकरणं किती कंगाल होत चालली आहेत याची जाणीव करून दिलीत. >>+१
वा! खूप सुरेख अनुभवकथन आणि
वा! खूप सुरेख अनुभवकथन आणि अनुभवही! अनिल अवचट यांना प्रत्यक्ष भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे! त्यांच्या कार्यरत ह्या पुस्तकाचा माझ्या विचारांवर अजूनही फार मोठा प्रभाव आहे!
छान, लेख आणि अनुभव दोन्ही
छान, लेख आणि अनुभव दोन्ही ..
आणखी फोटो बघायला आवडले असते..
सुंदर लेख .
सुंदर लेख .
वा!
वा!
सुंदर लेख आणि अनुभव पण......
सुंदर लेख आणि अनुभव पण......
अतुल, कमालीच्या वेगळ्या अन
अतुल, कमालीच्या वेगळ्या अन अर्थपूर्ण रीतीने वर्षान्त साजरा केलात अन तो आनंद आमच्याशी शेअरही केलात. अभिनंदन. आयुष्य उपभोगण्याची रूढ समीकरणं किती कंगाल होत चालली आहेत याची जाणीव करून दिलीत.>>> +१
छान लेख.१४ मध्येही अशाच अनमोल
छान लेख.१४ मध्येही अशाच अनमोल भेटी मिळत राहोत.
तुमचे संशोधन कशावर आहे.
शोभनाताई, प्रतिसादाबद्दल
शोभनाताई, प्रतिसादाबद्दल आभार.
सामाजिक संबंधांचा शारिरीक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम असा सर्वसाधारण विषय आहे. मात्र या विषयाची व्याप्ती खुप मोठी असल्याने आणि मला स्वतःला त्यातल्या छोट्याशा भागावरच संशोधन करण्याची इच्छा असल्याने मी व्यसनाधीनता हा भाग निवडला, त्यातही मुक्तांगण हे केस स्टडी म्हणुन घेतले आहे.
लेख आवडला.
लेख आवडला.
छान, लेख आणि अनुभव .
छान, लेख आणि अनुभव .